राजस्थानचे रजत जलबिंदू - 7


श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


पण आज मात्र ज्यांच्या हाती जैसलमेर आणि सत्ता आहे, ते घडसीसर चा अर्थच विसरून गेलेत. तर त्याच्या त्या नेष्टा शी जोडलेल्या नऊ तलावांची आठवण त्यांना कशी बरं राहणार? घडसीसरच्या आगोरमध्ये वायुसेनेचा विमानतळ बनलाय, त्यामुळे आगोरमधल्या तेवढ्या भागातलं पाणी आता तलावाकडे न येता अन्यत्र कुठेतरी वाहून जातं.

आणि राजपरिवारात शिजणाऱ्या षडयंत्राने पाल वर उभ्या असलेल्या राजा महारावल घडसीवर प्राणघातक हल्ला केला. राजाच्या चितेवर राणीचं सती जाणं ही त्यावेळची प्रथाच होती. पण राणी विमला सती गेली नाही... तर राजाचं स्वप्न राणीने पूर्ण केलं.

वाळूच्या ह्या स्वप्नाला दोन रंग आहेत. एक, निळा रंग पाण्याचा - आणि दुसरा- पिवळा रंग आहे, तीन - चार मैलांच्या तलावाच्या साधारण अर्धगोलाकार काठावर बनलेल्या घाटांत, तसेच मंदिराचे बुरूज - बारादरी आणि व्हरांड्यांचा. पण हे स्वप्निल जग दिवसातून दोन वेळा फक्त एकाच रंगात रंगून जातं. उगवण्याच्या व मावळण्याच्या वेळी सूर्य घडसीसरमध्ये, जणूकाही विरघळलेलं सोनं मन:पूत म्हणजे मोजमापवालं मन नव्हे, तर सूर्याचं मन भरून जाईपर्यंत.

लोकांनी सुध्दा घडसीसरमध्ये आपल्या आपल्या सामर्थ्याचं सोनं ओतलं. तलाव राजाचा होता, पण प्रजा त्याला सांभाळीत - सजवीत गेली. पहिल्या टप्प्यांत मंहिर बनली, घाट आणि जलमहल यांचा विस्तार होत गेला. ज्याला - ज्या ज्या वेळी म्हणून काही चांगलं सुचलं, ते त्याने घडसीसरवर ओवाळून टाकलं. राजा आणि प्रजेच्या ह्या जुगलबंदीत घडसीसर हे एक अद्भूत गाणं बनलं. पुढे कधीतरी घाटावर पाठशाळाही बनल्या. त्यांच्यात, शहर व आसपासच्या गावचे विद्यार्थी येवून राहात आणि तिथेच गुरूकडून विद्या मिळवीत असत. पाल वर एका बाजूला छोटी छोटी स्वयंपाकघरं आणि खोल्यासुध्दा आहेत. दरबारांत - कचेरीत कुणाचं काही काम अडकून राहिलं की ते लोक गावातून येवून इथेच मुक्काम करीत. शंकर आणि कृष्णाची मंहिरं बनली, यज्ञशाळा बनली, जमालशाह पीराची चौकी बनली. सर्वकाही एका घाटावर !

मरूभूमी सोडून कामधंद्यासाठी देशात कुठेतरी अन्यत्र जावून वसलेल्या कुटुंबांची मनंसुध्दा ह्या घडसीसरमध्ये गुंतून राहिली. ह्याच भागांतून, मध्यप्रदेशांतल्या जबलपूरला जावून राहिलेल्या शेठ गोविंददास यांच्या पूर्वजांनी, इथे परतून पठसाल वर एक भव्य देऊळ बांधलं. ह्या प्रसंगी हे सुध्दा आठवलं जातं, की तलावांच्या अश्या परंपरेशी निगडित लोक - परिवार इथून बाहेर गेले, तर तिथेही त्यांनी तलाव बांधले. शेठ गोविंददास यांच्या पूर्वजांनी जबलपूरमध्ये आपल्या मोठ्ठ्या बाखर म्हणजे घराच्या समोर असाच एक सुंदर तलाव बांधला. हनुमानतलाव नावाच्या ह्या तलावामध्ये घडसीसर ची प्रेरणा दिसू शकते.

शहराला पाणी तर इथूनच जात होतं. असं तर दिवसभर इथून पाणी भरलं जायचं, पण सकाळी आणि संध्याकाळी शेकडो 'पनिहारिनी' चा जसा काही मेळाच भरायचा. हे दृश्य शहरांत अगदी नळ येईपर्यंत दिसत होतं. सन 1919 मध्ये उम्मीदसिंह महेताने घडसीसर वरील आपल्या एका गझलेत अश्या दृश्याचं मोठं सुरेख वर्णन केलं आहे. भादव्याची कजरी आणि तीज च्या मेळ्याला सगळं शहर नटून थटून घडसीसरकडे यायचं, तेव्हा फक्त निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या ह्या तलावांत सृष्टीच्या सगळ्या रंगांचा शिडकावा व्हायचा.

घडसीसरवरचं लोकांचं हे प्रेम एकतरफी नव्हतं. लोक जसे घडसीसरजवळ यायचे, तसंच घडसीसरही लोकांपाशी जायचं आणि थेट त्यांच्या मनांत घर करायचंं. दूर सिंध प्रांतांत राहणाऱ्या कोण्या एका टिलो नांवाच्या गणिकेच्या मनाने बहुधा अश्याच एखाद्या क्षणी काही निर्णय घेवून टाकले होते.

तलावावर देवळं, घाट - बीट सगळं काही होतं. थाटामाटांत काही उणं नव्हतं. तरीही टीमोला वाटलं, की ह्या सोन्यासारख्या तलावाला तसंच सोन्यासारखं प्रवेशद्वार सुध्दा असायला हवं. टीलोनं घडसीसरच्या पश्चिम घाटावर प्रवेशद्वार म्हणजे पोल बनवायचं ठरवलं. दगडांत बारीक नक्षीकाम केलेलं, सुंदर झरोक्याचं, मोठ्ठ प्रवेशद्वार आता पुरं होत आलंच होतं... आणि कोण्या नतद्रष्टांनी राजा महारावलचे कान फुंकले - ' काय आपण एका गणिकेने बनवलेल्या प्रवेशद्वारांतून घडसीसरमध्ये प्रवेश करणार?' झालं, वादंग माजले. तिकडे प्रवेशद्वाराचं काम चालू राहिलं - इकडे राजाने एक दिवस ते पाडून टाकायचा निर्णय घेतला. टीलोला ही खबर कळली. रातोरात टीलोने प्रवेशद्वाराच्या सर्वात वरच्या टोकाला मंदिर वनवलं. राजा महारावलने आपला निर्णय बदलला. तेव्हापासून संपूर्ण शहर ह्याच अतिदेखण्या प्रवेशद्वारांतून तलावांत प्रवेश करतं आणि आजही हे टिलोंच्या नावानेच ओळखलं जातं.

टीलोंच्या प्रवेशद्वाराच्या अगदी समोर, तलावाच्या दुसऱ्या बाजूला, परकोटवजा एक गोल बुरूज आहे. तलावांच्या बाहेर - काठावर तर आमराई - बागा वगैरे असतातच, पण ह्या बुरूजांत, तलावाच्या आत बाग बनवलेली आहे. जिथे लोक गेष्टी करायला, मौजमजा करायला येत असतात. ह्याच्याच बरोबर, पूर्वेला एक आणखी मोठा - गोल परकोट आहे. ह्याच्यांत, तलावाची राखण करणारी फौजेची तुकडी राहात असे. देशी - विदेशी शत्रूंनी घेरलेल्या ह्या तलावाच्या रक्षणाचीही अगदी चोख व्यवस्था केलेली होती, कारण तो पूर्ण शहराला पाणी पुरवीत होता.

मरूभूमीत पाऊस कितीही कमी पडो, घडसीसरचा आगोर मूलत:च इतका मोठा होता, की तिथे पडणाऱ्या थेंबाथेंबाला सामावून घेवून तलावाला काठोकाठ भरून देत होता. घडसीसरच्या समोर डोंगररावर बनलेल्या उंच किल्ल्यावर चढून कोणी बघू दे... किंवा खाली आगोरात पायी फिरून बघू दे, पुन्हा पुन्हा समजावून देवूनही, ह्या तलावात पाणी आणण्याची संपूर्ण व्यवस्था सहजासहजी समजण्यांत येत नाही. पार क्षितिजापासून ह्यांत पाणी येत होतं. विस्तीर्ण भागावरील पाणी एकवटून, ते तलावाच्या बाजूला वळवून घेण्यासाठी, सुमारे आठ किलोमीटर लांब आड म्हणजे एक प्रकारची तटबंदी केलेली होती. मग एवढ्या मोठ्या प्रमाणांत येणाऱ्या पाण्याची ताकद सामावून घेवून, त्याच्या लोंढ्याचा जोराचा मारा कमी करण्यासाठी दगडी चादर - म्हणजे एक आणखी मोठी, मजबूत भिंत बांधली होती. पाणी ह्या चादर वर आपटून, आपला सगळा आवेग कमी करून, धीम्या गतीने घडसीसरमध्ये प्रवेश करतं. जर ती दगडी चादर नसती, तर घडसीसरचं आगोर - त्याचे सुंदर घाट - सारं काही उखडून जावू शकतं.

मग ह्या अशा काठोकाठ भरलेल्या घडसीसरच्या रखवालीची जबाबदारी नेष्टा च्या हाती येते. नेष्टा म्हणजे तलावाचा असा भाग, की जिथून जास्तीचं पाणी तलावाच्या पाल चं नुकसान न होवू देता बाहेर वाहून जावू लागतं. नेष्टा चालू होतो आणि इतक्या मोठ्या विशाल तलावाला तोडूं शकणाऱ्या जास्तीच्या पाण्याला बाहेर वाहून नेवू लागतो. पण हे वाहवणं - वाहून नेणंसुध्दा मोठं विचित्र होतं. जे लोक एकेक थेंब जमवून घडसीसर भरायचं जाणत होते, ते त्याच्या ह्या अतिरिक्त पाण्याला पाणी नव्हे तर जलराशी मानत होते. नेष्टा तून निघालेलं पाणी आणखी एका तलावात जमा करून घेतलं जात होतं. नेष्टा तरीही थांबला नाही, तर ह्या तलावाचा नेष्टा देखील चालू होत असे. मग त्यानेही आणखी एक तलाव भरून जायचा. हा सिलसिला - सहज विश्वास बसणार नाही - पण पुढे पुऱ्या नऊ तलावापर्यंत चालू राहायचा. नौताल, गोविंगसर, जोशीसर, गुसाबसर, सूदासर, मोहतासर, रतससर आणि मग किसनघाट... इथपर्यंत पोहोचूनही पाणी उरलंच, तर किसनघाटाच्या पुढे ते कित्येक बेरी मधून म्हणजे छोट्या छोट्या विहीरवजा कुंडांमध्ये भरून जात असे. पाण्याचा एकेक थेंब यांसारखे शब्द आणि वाक्य, घडसीसरपासून ते किसनघाटापर्यंतच्या 6.5 मैल लांबीच्या क्षेत्रात आपला खरा अर्थ प्राप्त करत असतं.

पण आज मात्र ज्यांच्या हाती जैसलमेर आणि सत्ता आहे, ते घडसीसर चा अर्थच विसरून गेलेत. तर त्याच्या त्या नेष्टा शी जोडलेल्या नऊ तलावांची आठवण त्यांना कशी बरं राहणार? घडसीसरच्या आगोरमध्ये वायुसेनेचा विमानतळ बनलाय, त्यामुळे आगोरमधल्या तेवढ्या भागातलं पाणी आता तलावाकडे न येता अन्यत्र कुठेतरी वाहून जातं. नेष्टा आणि त्याच्या वाटेवारच्या त्या नऊ तलावांच्या आसपासही बेसुमार वाढणारी शहरी घरं, नवनव्या गृहनिर्माण संस्था, एवढंच काय पण पाण्याचंच काम करणाऱ्या नव्या इंदिरा नहर प्राधिकरणाचं कार्यालय, तिथे काम करणाऱ्यांची कर्मचारी वसाहत, असं चित्र दिसतयं, घाट, पाठशाळा, रसोडे, बारादरी, देवळ, वगैरे चांगल्या देखरेखीअभावी हळूहळू मोडकळीला आली आहेत. आज शहर उल्हासाचा तो खेळ ही खेळत नाही, त्यामध्ये राजा प्रजा सगळे मिळून घडसीसरची साफसफाई करीत असत. गाळ काढून टाकीत असत, तलावाकांठचा दगडी जलस्तंभसुध्दा थोडासा हलून एका बाजूला झुकलाय, राखण करणाऱ्या सेनेच्या तुकडीच्या बुरूजाने दगडही ढासळलेयत.

घाटाच्या बारादरीवर कुठे कुठे कब्जा केला गेला आहे. पाठशाळांमध्ये, जिथे कधीतरी परंपरागत ज्ञानाचा उजेड होता, तिथे आज कचऱ्याचे ढीग लागले आहेत. गेल्या काही वर्षात, जैसलमेर जगाच्या पर्यटन नकाशा वर आलं आहे. थंडीच्या मोसमात - नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत इथे जगभराचे पर्यटक येतात आणि त्यांच्यासाठी एवढा सुंदर तलाव हे एक मोठंच आकर्षण आहे. त्यामुळे दोनेक वर्षांपूर्वी सरकारचं थोडं लक्ष ह्या बाजूला गेलं होतं. आगोरमधून येणाऱ्या पाण्याच्या कमतरतेला, इंदिरा गांधी नहर मधून पाणी आणून, दूर करण्याचा प्रयत्नही केला गेला... ह्या योजनेचं कायदेशीर उद्घाटनसुध्दा झालं.... पण एकदा केलेल्या भराई नंतर लांबून कुठूनतरी येणारी पाईपलाईन तुटून फुटून गेली. मग तिच्यात सुधारणा किंवा दुरूस्तीही होवू शकली नाही. परिणामी घडसीसर आजही भरतो तो केवळ पावसाच्या पाण्यानेच.

668 वर्षांपूर्वीचं घडसीसर संपलेलं नाही आहे. बनवणाऱ्यांनी त्याला, काळाच्या थपडा सहन करण्याएवढी, मजबुती दिलेली होती. वाळूच्या वावटळींच्या मध्येही आपल्या तलावांची उत्तम देखभाल करण्याचा पायंडा पाडणाऱ्यांना कदाचित ह्याचा अंदाज नव्हता, की आता उपेक्षेच्या वावटळी उठतील. पण ह्या वावटळींना सुध्दा, घडसीसर आणि त्याच्यावर जीव जडलेले लोक, खूप धीराने - नेटाने सहन करत आहेत. तलावावर पहारा देणारी फौजी तुकडी आज भलेही नसेल, पण लोकांच्या मनांचा काही थोडा पहारा आजही आहे. सूर्याच्या पहिल्यावहिल्या किरणांबरोबरच देवळांतल्या घंटा बावजातात. दिवसभर घाटावर लोकांची वर्दळ राहते. काही लोक इथे तासन्तास नि:शब्द बसून घडसीसरला न्याहाळत राहतात, तर काहीजण गाणी गात कावणहत्या (एक प्रकारची सारंगी) वाजवतांना दिसतात. घडसीसरपासून खूप दूरपर्यंत रेतीच्या टेकाडाला पार करता करता, उंटवाले त्याच्या गार पाण्याचे गुण गातांना भेटतील.

पनिहारिनी आजही घाटावर येतात. पाणी उंटांच्या गाड्यांमधून भरलं जातं... आणि दिवसांतून कित्येक वेळा अश्या टँकर गाड्या सुध्दा इथे पाहायला मिळतात, ज्यांच्यात घडसीसर चं पाणी भरायला डिझेलचे पंप ही लावलेले असतात.

घडसीसर आजही पाणी देतोय्... आणि म्हणूनच सूर्य आजही उगवतांना आणि मावळतांना घडसीसरमध्ये मनभरून सोनं ओतून जातो.

घडसीसर मानदंड बनलेला होता - किंबहुना त्यामुळेही त्याच्यानंतर कुठलाही दुसरा तलाव बांधणे खूप कठीण झालं असेल. तरीसुध्दा जैसलमेरमध्ये दर 50 - 100 वर्षांच्या अंतराने तलाव बनत राहिले, एकाहून एक सरस, घडसीसरसारख्या कंठमण्यासह माळेत मोती गुंफल्यासारखे !

घडसीसरच्या मागून साधारण 175 वर्षांनी बनला जैतसर. हा तसा बांधवजाच होता - पण आपल्या मोठ्या बगिच्यामुळे नंतर, बस्, त्याला बडा बाग म्हणूनच लक्षात ठेवला गेला. ह्या दगडी बांधाने जैसलमेरच्या उत्तरेकडे उभ्या पर्वतरांगांकडून येणारं सगळं पाणी अडवून धरलं आहे. एका बाजूला हा जैतसर तलाव आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याच पाण्याने शिंपलेली बडा बाग... दोघांच्या मध्ये उभी आहे बांधाची भिंत. पण ही नुसतीच भिंत नाही, तर चांगली लांबरूंद सडकच आहे, जी घाटी पार करून समोरच्या डोंगराकडे जाते. भिंतीखाली बनवलेल्या शिंपण - नालीचं नाव आहे. राम - नाल. हा रामनाला नहर - बांधाकडे शिडीसारखा होतो. जैतसर मध्ये पाणी कमी असो की जास्त, नाल्याचा शिडीवजा आकार पाण्याला बड्या बागेपाशी उतरवत राहातो. पड्या बागेत पोहोचल्यावर राम - नाला रामनामासारखा कणाकणांत विखुलरतो. नाल्याच्या एका टोकाला एक विहीर सुध्दा आहे. पाणी सुकून गेलं, नाला बंद झाला, तर जमिनीत झिरपलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीचा उपयोग होतो. ह्या मोठ्या विहीरीवर चडस चालवली जाते... कधीतरी तिच्यावर रहाटही चालत होता. बागेतल्या छोट्या छोट्या विहीरींची तर गणतीच नको.

बडा बाग खरोखरच हिरवीगार आणि बडी आहे. विस्तीर्ण आणि उंची आमराई आणि त्याच्याबरोबर तऱ्हेतऱ्हेची झाडं - झुपुपं. अधिक पावसाच्या भागात त्यातही साधारणपणे नदीच्या काठांवर सापडणारा अर्जुनवृक्ष देखील ह्या बड्या बागेत दिसेल. गर्द हिरव्या बड्या बागेत सूर्याची किरणं झाडांच्या पानापानांत अडकतात. झुळुक आली, पानं हालली, की संधी साधून किरणं खाली नाण्यांसारखी छन्छन् टपकत राहतात. बांधाच्या त्या बाजूला डोंगरावर राजघराण्याची स्मशानभूमी आहे. तिथे दिवंगतांच्या स्मृतीप्रीत्यर्थ असंख्य सुंदर छतऱ्या बनवलेल्या आहेत.

अमरसागर घडसीसरच्या नंतर 325 वर्षांनी बनला आहे. दुसऱ्या कुठल्यातरी दिशेला पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडवणं हे कारण तर असेलच, पण अमरसागर बनवणारा समाज कदाचित अशीही उर्मी मनांत जागवत असेल, की उपयोगी आणि सुंदर तलाव बनवीत राहण्याची त्याची इच्छा अमर आहे - न संपणारी आहे. दगडांचे तुकडे जोडून जोडून किती अजोड तलाव बनू शकतो त्याचं अमरसागर हे एक अद्भूत उदाहरण आहे. तलावाच्या रूंदीची एक बाजू - पाल सरळ उभ्या उंच भिंतीने बनवलीय. भिंतीला जोडलेल्या सुंदर पायऱ्या, झरोक्यांतून आणि बुरूजांतून जात जात खाली तलावात उतरतात. ह्याच भिंतीच्या मोठ्या सपाटीवर, वेगवगेळ्या उंचीवर, दगडी सिंह- हत्ती-घोडे बनवलेले आहेत. ह्या सुंदर सजलेल्या मूर्ती तलावाच्या पाण्याची पातळी दर्शवितात. अख्ख्या शहराला कळतं की पाणी किती आलं आहे आणि किती महिने पुरणार आहे.

अमरसागर चा आगोर, पूर्ण वर्षभराचं पाणी जमा करून घेण्याइतका मोठा नाही आहे. उन्हाळ्याच्या सुरूवाती सुरूवातीलाच हा तलाव कोरडा होवू लागतो. याचा अर्थ असा की जैसलमेरच्या लोकांनी ह्या सुंदर तलावाला त्या मोसमात विसरून जावं, ज्या मोसमात त्याची सर्वात जास्त गरज असते - पण जैसलमेरच्या शिल्पकारांनी इथे असं काही काम केलं आहे, की ज्यामुळे शिल्पशास्त्रात काही नवीन पानं जोडली जावू शकतात. इथे तलावाच्या आंत सात सुंदर बेरियाँ बनवल्या आहेत. बेरी म्हणजे एक प्रकारची विहीरच. तिला पगबाव (पायविहीर) सुध्दा म्हणतात. तलावातलं पाणी आटतं, पण त्याच्या झिरपावातून जमिनीतल्या पाण्याची पातळी उंचावते आणि ह्याच स्वच्छ - गाळीव पाण्याने ह्या बेरी भरतात. ह्या बेरीसुध्दा अश्याकाही बनवल्या आहेत, की पाणी संपल्याने रिकामा होवूनही अमरसागर आपलं सौंदर्य घालवून बसत नाही. सर्व बेरींच्या वर सुंदर दगडी चबुतरे, स्तंभ, छतऱ्या आणि खाली उतरायला कलात्मक पायऱ्या आहेत. उन्हाळ्यात भर वैशाखात आणि पावसाळ्यात ऐन भाद्रपदात सुध्दा इथे मेळा भरतो. कोरड्या अमरसागरात ह्या बेरी (विहीरी) कोण्या महालाच्या अवशेषांसारख्या भासतात - आणि जेव्हा तो भरतो तेव्हा असं वाटतं. की तलावात मोठाल्या छत्रीदार नावा तरंगताहेत.

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 3

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 4

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 5

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 6



Path Alias

/articles/raajasathaanacae-rajata-jalabaindauu-7

Post By: Hindi
×