राजस्थानचे रजत जलबिंदू - 4


श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


खाली कुंडीच्या तळाशी साचलेली रेती सहज गोळा करून काढता येईल, याचाही पुरा विचार केला जातो. तळ एखाद्या मोठ्या कढईसारखा 'ढालदार' बनविला जातो. त्याला 'खामाडियो' किंवा 'कुंडलियो' सुध्दा म्हणतात. पण वरती आगोरमध्येच इतकी अधिक दक्षता घेतली जाते, की खमाडियो तून रेती काढायचं काम दहा - वीस वर्षांतून एखाद्या वेळीस करावं लागतं.

कुई चं तोंड लहान ठेवण्यासाची तीन मोठी कारणं आहेत. वाळूत जमा झालेल्या ओलाव्याने पाण्याचे थेंब अगदी हळूहळू झिरपतात. दिवसभरात एक कुंई फारतर दोन तीन घडे भरू शकतील एवढच पाणी जमा करू शकते कुईच्या तळाशी पाण्याचे प्रमाण इतके कमी असतं, की कुंईचा व्यास मोठा असेल तर पाणी (कमी प्रमाणातलं) जास्तच पसरेल आणि मग ते वर काढणं शक्य होणार नाही. कमी व्यासाच्या कुईंमध्ये हळूहळू पाझरणारं पाणी दोन -चार हात उंची गाठतं. काही ठिकाणी कुईंतील पाणी काढतांना बादलीच्या ऐवजी छोटी चडस (चामड्याची थैली) वापरतात ती ह्याच कारणामुळे.

धातूची बादली पाण्यात पटकन् बुडत नाही... पण जाड कपड्याच्या किंवा चामड्याच्या चडस च्या तोंडाशी लोखंडाचं जड कडं बांधायचं, ती थैली पाण्याला टेकते, वरच्या कड्याचं वजन तिच्यावर पडतं, अशा रीतीने कमी पाण्यात सुध्दा ती व्यवस्थित बुडते. भरल्यानंतर वर उचलतांच चडस आपला पूर्ण आकार धारण करते.

गेल्या काही काळात अशा काही गावांच्या आसपास सडका झाल्या आहेत, ट्रक धावले आहेत. ट्रकच्या फाटलेल्या ड्यूबपासूनही छोटी चडसी बनू लागली आहे.

कुंईच्या व्यासाचा संबंध इथे पडणाऱ्या कडक उन्हाशी सुध्दा आहे. व्यास मोठा असेल तर कुईंतले पाणी जास्त पसरेल. मोठा पृष्ठभाग पाण्याला वाफ बनून उडून जाण्यापासून थांबवू शकणार नाही.

कुंईला आतलं पाणी स्वच्छ राहण्यासाठी, झाकून ठेवण जरूरीचे आहे. छोटं तोंड झाकालया सोपं पडतं. प्रत्येक कुईवर लाकडाचं बनवलेलं झाकण ठेवलेलं आढळेल. कुठे कुठे वाळ्याच्या तरटासारखं गवताबिवताच्या छोट्या फांदुऱ्यांनी बनवलेल्या झाकणांचाही वापर होतो. जिथे आता नवे रस्ते झालेत आणि त्यामुळे नव्या आणि अपरिचित लोकांची ये - जा वाढली आहे, तिथे अमृतासारख्या गोड पाण्याचे रक्षण करणं भागच पडतं. अशा इलाख्यांतून कित्येक कुईच्या झाकणांवर छोटी छोटी कुलुंपही लागायला लागलीत. अशी कुलुपं पाणी वर खेचण्यासाठी लावल्ल्या घिरनी - चक्री यांवरही लावली जातात.

कुई खोल असेल तर पाणी खेचण्यासाठी सोय म्हणून तिच्यावर घिरनी (घिरट) किंवा चक्री (रहाट) लावली जाते. यालाच गरेडी , चरखी किंवा फरेडी असंही म्हणतात. फरेडी लोखंडाच्यादोन कांबीवरही लावली जाते. पण बहुदा ही गुलेल च्या आकाराच्या एका मजबूत दांड्याला आरपार छेड बनवून लावली जाते. तिला ओडाक म्हणतात. ओडाक किंवा चक्री (चरखी) यांच्याशिवाय इतक्या खोल आणि निरूंद कुईतून पाणी काढणं हे फार कठीण काम बनू शकतं. ओडाक किंवा चरखी, चडसीला इकडे - तिकडे न आपटतां सरळ वरती आणते, त्यामुळे पाणी मध्येच हिंदकळून पडत नाही. वजन उचलण्यात तर त्यामुळे सोयच होते.

खडीच्या दगडांची पट्टी एका मोठ्या भागातून जाते, त्यामुळे त्या पुऱ्या भागात एकापुढे एक अशा कुई बनत जातात. अशा भागात एखाद्या मोठ्या, स्वच्छ मोकळ्या मैदानात तीस - चाळीस कुंई असू शकतात. प्रत्येक घरी एक कुंई, कुटुंब मोठं असेल तर एकाहून अधिकही.

व्यक्तिगत आणि सार्वजनिक संपत्तीचं विभाजन करणारी मोठी सीमारेषा कुंई च्या बाबतीत एकास विचित्र प्रकारे जणू पुसली जाते. प्रत्येकाची आपापली कुंई असते. ती बनविण्याचा व तिचं पाणी वापरण्याचा हक्क हा त्याचा स्वत:चा हक्क असतो. पण कुंई ज्या क्षेत्रात बनते, ती जागा मात्र गांव - समाजाची सार्वजनिक असते. त्या जागी पडणारा पाऊसच मागाहून वर्षभर ओलाव्याच्या रूपात सुरक्षित राहील आणि त्याच ओलाव्यामुळे वर्षभर पुढे कुंईमध्ये पाणी राहील. ओलाव्याचे प्रमाण तिथे पडून गेलेल्या पावसावरूनच ठरलं आहे. आता त्या भागात बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक कुंई चा अर्थ म्हणजे पहिल्यापासून ठरलेल्या ओलाव्याची आणखी वाटणी. त्यामुळे खाजगीरीत्या बनलेल्या असल्या, तरीही सार्वजनिक क्षेत्रांत बनणाऱ्या प्रत्येक कुंईवर गांवसमाजाचा अंकुश असतो. त्यामुळे फारच गरज पडेल, तेव्हाच गांवसमाज नवी कुंई खोदण्यासाठी आपली संमती देतो.

प्रत्येक दिवशी एक सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची चिरपरिचित कहाणीच कुंई जशीकांही प्रत्यक्षात जमिनीवर आणते. तिच्यातून दिवसांकाठी, बस्, दोन - तीन घडे गोड पाणी काढलं जावू शकतं. त्यामुळे बहुदा पुरा गांव गुरे चरून परतण्याच्या वेळी ( गो - धूली बेला) कुंईवर येतो, तेव्हा जशी जत्रा भरते, गांवाला लागून असलेल्या मैदानातल्या तीस - चाळीस कुंईवरच्या रहाटांचे आवाज, गायरानातून परतणाऱ्या गुरांच्या गळ्यांतल्या घंटांच्या आणि हंबरण्याच्या आवाजात मिसळून जातात. दोन - तीन हंडे भरून झाले की डोल आणि दोऱ्या गुंडाळून घेतल्या जातात. कुंईची झाकणे पुन्हा नीट लावली जातात. आता रात्रभर आणि पुढचा दिवसभर कुंईना आराम मिळेल.

वाळूखाली सर्वच ठिकाणी खडीच्या पत्थराची पट्टी नाही आहे, त्यामुळे संपूर्ण राजस्थानात कुंईसुध्दा सगळीकडे मिळणार नाही. चुरू, बिकानेर, जैसलमेर आणि बाडमेरच्या मोठ्या भागातून ही पट्टी जाते. त्यामुळे तिथे गांवागांवात कितीतरी कुंई आहेत. जैसलमेर जिल्ह्यातील 'खडेरोंकी ढाणी' ह्या एका गावात तर 'एकशेवीस कुंई' होत्या. लोक ह्या भागाला 'सहाविशी' (छहबीसी - म्हणजे सहापटीने वीस) म्हणून ओळखतात. कुठे कुठे ह्यांना 'पार' असंही म्हणतात. जैसलमेर आणि बाडमेर मधली कित्येक गांवे ह्या पारांमुळेच सुखी - समृध्द आहेत आणि म्हणूनच ह्या गावाची नांवेही ह्या पारां वरूनच दिलेली आहेत. जसे 'जानरे आलो पार' आणि 'सिरगु आलो पार.'

सिरगु आलो पार :


ह्या खडीच्या पट्टीची पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे - कुठे तिला ' चारोली' म्हणतात तर कुठे 'धाधडो' किंवा ' धडधडो', तर कुठे 'बिट्टू रो बल्ली' या नावानेही ओळखतात, तर कुठे तिचे नाव फक्त ' खडी' च असतं. आणि ह्या खडीच्या बळावर खाऱ्या पाण्याच्या मधोमध 'गोडं पाणी' देत उभी असते कुंई.

थांबलेलं पाणी निर्मळ


'वाहातं पाणी निर्मळ' ही म्हण राजस्थानात जागीचं थबकते. इथे कुंड्या आहेत, ज्यांमधून वर्षभर आणि कधी कधी त्याहून जास्त काळदेखील साठून राहनही पाणी निर्मळच राहातं -

तत्व तेच - पावसाच्या थेंबांना म्हणजे पाझरपाण्याला एका अतिशय स्वच्छ जागी रोखून धरून त्याचा साठा करणे. कुंडी, कुंड, टाकं नाव किंवा आकार बदलेल, पण काम एकच आज पडलेल्या थेंबांना उद्यासाठी थांबवून ठेवणे. कुंड्या जिथे तिथे आहेत, पर्वतांवर बनलेल्या, किल्ल्यांमध्ये, देवळांमध्ये, डोंगराच्या तळघाटांत, घरांच्या अंगणांमध्ये, छप्परांवर, गांवात आणि गावाबाहेर, वाळवंटात, शेतात ह्या कुंड्या सगळीकडे सदासर्वकाळ बनत राहिल्या आहेत. तीनशे - चारशे वर्षांपूर्वी बनलेल्या कुंड्या आहेत, तशा अगदी काल परवा बनलेल्या कुंड्याही आहेत. बाकी राहू दे, पण अगदी टी.व्ही च्या अँटेनाच्या थेट बुडाशी सुध्दा कुंडी दिसू शकेल.

जिथे जितकी म्हणून जागा मिळू शकेल, तिथे गार चुन्याने (चुन्यामातीने) लिंपून एक अंगण बनवलं जातं, ज्याला थोडासा उतार असेल. हा उतार एकीकडून दुसरीकडे असू शकेल, किंवा अंगण जरा जास्त ऐसपैस असलं, तर हा उतार त्याच्या चारही बाजूंकडून मध्याकडे आलेला असेल. अंगणाच्या हिशोबाने तिथे पडणाऱ्या पाऊसथेंबांच्या हिशोबाने या मध्यावर एक कुंड बनवलं जातं. कुंडाचं आंतलं बांधकाम अशाप्रकारे केलं जातं, की त्यात होणारे पाणी एक थेंबभरसुध्दा झिरपणार नाही, तसंच त्यातल पाणी वर्षभर सुरक्षित आणि स्वच्छ राहील.

ज्या अंगणातून कुंडीसाठी पावसाचे पाणी जमा केलं जातं, त्याला 'आगोर' म्हणतात. 'आगोर' हा शब्द 'आगोरना' ह्या क्रियापदापासून ' गोळा करणे' ह्या अर्थी आहे. ह्या आगोर ला खूप स्वच्छ ठेवलं जातं - अगदी वर्षभर. पावसाळ्याच्या आधीच ह्याची अगदी दक्षतेने साफसफाई होते. बूट - चप्पल घालून तिथे आगोर मध्ये जावूच नाही शकत.

आगोर च्या ढालीवरून वाहात आलेलं पाणी कुंडीच्या मंडलात म्हणजे घेरात चहुबाजूंनी ठेवलेल्या ओयरो म्हणजे भोकांतून आंत पोहोचतं. ह्या भोकांना कुठे कुठे 'इंडू ' सुध्दा म्हणतात. आगोर ची उत्तम सफाई झाल्यानंतरही पाण्याबरोबर चुकून येवू शकणारी रेती - पानं थांबविण्यासाठी ह्या भोकांना कचरा गाळण्याच्या जाळ्यासुध्दा लावल्या जातात. मोठ्या आकाराच्या कुंड्यांमध्ये वर्षभर पाणी ताजं राहण्यासाठी 'गोख' (गवाक्ष) म्हणजे झरोक्यावाटे हवा आणि प्रकाश खेळण्याची व्यवस्था केली जाते.

कुंड असो, वा कितीही मोठं असो, ते 'अछायो' म्हणजे झाकण्याशिवाय खुलं ठेवलं जात नाही. उघडं कुंड अशोभनीय मानलं जातं - आणि पाण्याच्या कामाला शोभा ही हवीच. शोभा आणि शुचिता, सुंदरता आणि पावित्र्य स्वच्छता इथे बरोबरीने मिळतात.

कुंड्यांची तोंडं बहुदा गोलाकार असतात, म्हणून त्या झाकण्यासाठी 'गुंबद' म्हणजे घुमट बनवले जातात. मंदिर - मशिदींसारखे उभे हे घुमट कुंडीला भव्यताही देतात. जिथे दगडांच्या लांबट पट्ट्या मिळतात, तिथे कुंड्यांना घुमटांऐवजी ह्या पट्ट्यांनी सुध्दा झाकलं जातं. घुमट असो की दगडी पट्टी, त्याच्या एका कडेला लोखंडी किंवा लाकडाचं आणखी एक झाकण लावलं जातं... ते उघडून पाणी काढलं जातं.

काही कुंड्या किंवा कुंड इतकी खोल, तीस - चाळीस हात खोल असतात, की त्यातून एखाद्याखोल विहीरीतून काढल्यासारखं पाणी काढावं लागतं. तेव्हा कुंडीला 'जगत' - कठडासुध्दा बांधतात. त्या जगत वर चढून जायला पाच - सात पायऱ्या - आणि मग झाकणाच्या वर 'गगडी', चक्री सुध्दा लागते. चुरूच्या आसपासच्या बऱ्याच भागात कुंड खूप मोठी आणि खोल आहेत. खोलपणामुळे त्यांच्यावर चांगली मजबूत चक्री बसवली जाते - आणि इतक्या खोलातून पाणी ओढून आणणाऱ्या वजनदार बादलीचं वजन पेलू शकण्यासाठी ही चक्री दोन सुंदरशा खांबांवर (मिनारांवर) बसवतात. कुठे कुठे चारखांबी कुंडी (चारमिनार - कुंडी) देखील बनते.

जागेची अडचण असेल तर कुंडी अगदी छोटीही बनते. तेव्हा तिचा भवतालचा 'आगोर' उंच बनवला जातो. 'संकरी' ह्या शब्दाचा अर्थच मुळी असा, की आसपासची जागा समाज किंवा कुटुंबाच्या दुसऱ्या कुठल्यातरी कामासाठी वापरली गेली आहे. त्यामुळे एकत्र होणारं पाणी शुध्द - स्वच्छ राहावं म्हणून 'आगोर' अगदी एखाद्या चबुतऱ्यासारखा उंच उठविलेला असतो.

मोठ्या मोठ्या जोत्यांमुळे मरूभूमीत गांव आणि शेतामधलं अंतर आणखीच वाढतं. शेतावर दिवसभर काम करायलासुध्दा पाणी हवंच. शेतांमधूनही थोड्या थोड्या अंतरावर लहान लहान कुंड्या बनवल्या जातात.

कुंड्या बनवताच अशा वालुकामय प्रदेशात, जिथे भूजल शे- दोनशे हातांपेक्षाही खोलावर सापडतं आणि तेही बहुदा खारट असतं. मोठ्या कुंड्यासुध्दा वीस - तीस हात खोल असतात - आणि त्याही वाळूमध्ये. आत थेंब थेंब पाणी झिरपत राहिलं, तरी पुरी भरलेली कुंडी रिकामी व्हायला वेळ नाही लागत.

त्यामुळे कुंडीच्या आतलं बांधकाम सर्वोत्तम दर्जाचे केले जाते. आकार लहान असो की मोठा, चिनाईकाम मात्र शंभर टक्के खात्रीचंच. चिनाईकामास दगड किंवा दगडी पट्ट्या वापरल्या जातात. 'सांस' म्हणजे दगड जोडते वेळी मध्ये राहून गेलेल्या बारीक फटीसुध्दा पुन्हा उत्तम चुन्याने बुजवल्या जातात. 'मरूभूमीत तीस हात पाणी भरलेलं असेल, पण तीस थेंबसुध्दा झिरपून वाया जाणार नाहीत.' असा शब्द मोठमोठे वास्तुशिल्पी एकवेळ देवू शकणार नाहीत, पण चेलवांजी मात्र देतातच.

'आगोर' ची साफसफाई आणि कमालीची दक्षता असूनही थोडीशी रेती पाण्याबरेबर कुंडीत उतरतेच. म्हणून कधी कधी पावसाच्या सुरूवातीला, चैत्रात, कुंडीच्या आत उतरून तिथली सफाई पण करावी लागते. खाली उतरण्यासाठी चिणकाम करण्याच्या वेळीच भिंतीच्या गोलाव्यात एकेक हात अंतराने जराशीच बाहेर असलेली अशी दगडाची एकेक छोटी - छोटी पट्टी बसवली जाते.

खाली कुंडीच्या तळाशी साचलेली रेती सहज गोळा करून काढता येईल, याचाही पुरा विचार केला जातो. तळ एखाद्या मोठ्या कढईसारखा 'ढालदार' बनविला जातो. त्याला 'खामाडियो' किंवा 'कुंडलियो' सुध्दा म्हणतात. पण वरती आगोरमध्येच इतकी अधिक दक्षता घेतली जाते, की खमाडियो तून रेती काढायचं काम दहा - वीस वर्षांतून एखाद्या वेळीस करावं लागतं. एक पुरी पिढी कुंडीला इतकं काही सांभाळून ठेवते, की दुसऱ्या पिढीलाच त्यांतल्या पायऱ्यांवरून आंत उतरायची संधी मिळते. मागील काही काळात सरकारने कुठे कुठे पाण्याच्या नव्या सोयी केल्या आहेत, तिथे मात्र कुंड्यांच्या रखवालीची मजबूत परंपरा नक्कीच कमजोर झाली आहे.

कुंडी खाजगीही असते आणि सामुदायिकही. खाजगी कुंड्या घरांच्या समोर, अंगणात, परसात, मागील दारी, वाड्यात बनवल्या जातात, तर सार्वजनिक कुंड्या पंचायत क्षेत्रांत किंवा साधारणपणे दोन गावांच्या मध्ये बनवल्या जातात. मोठ्या कुंड्यांच्या चार भिंतीमधून प्रवेशद्वार असतात. तिच्यासमोर बहुदा दोन खुले हौद असतात. एक लहान, एक मोठा. त्यांची उंचीही कमी जास्त ठेवली जाते. त्यांना खेल, थाला, हवाडो, अवाडो किंवा उबारा अशी नावे आहेत. त्यांच्यात, आजूबाजूने जाणाऱ्या भेड - बकऱ्या, उंट आणि गायींसाठी पाणी भरून ठेवलं जातं.

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 3



Path Alias

/articles/raajasathaanacae-rajata-jalabaindauu-4

Post By: Hindi
×