राजस्थानचे रजत जलबिंदू - 2


श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


राजस्थान रजत बुंदे हे पुस्तक 1999-2000 च्या आसपास हाती आले. आणि वाचता वाचता त्या विषयाने मनाची एवढी पकड घेतली की एकदा वाचून पुरेसे वाटेना. मग लेखकाशी म्हणजे दिल्लीच्या श्री. अनुपम मिश्र यांच्याशी पत्र-व्यवहार केला आणि चेंबूरचे श्री. मेमाणी यांच्याकडून हे पुस्तक मी स्वतःसाठी विकतच घेतले। मग काय? कधीही कुठलंही पान उघडून वाचायचे असे चालू झाले. आणि शेवटी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. तेच भाषांतर जलसंवाद मध्ये प्रमशः प्रकाशित होत आहे.

अरवलीच्या पर्वतरांगांमध्ये साधारण 150 सें.मी हे प्रमाण राज्यांतील अन्य भागातील पाऊसमानापेक्षा तिप्प्ट जास्त आहे. हा भाग अरवलीच्या उंचीवर आहे. या शिखरांवर आपटून मान्सूनचे ढग आपला उरला - सुरला खजिना इथे रिता करतात.... आणि आजच्या भौगोलिक स्थितीने सुध्दा मरूभूमीला अरवलीच्या पलिकडे टाकून चूक केलीय.

पण, मरूभूमीच्या समाजाची भाषा, तिथली माती, पाऊस आणि ताप ह्या नवीन वैज्ञानिक परिभाषेपेक्षा संपूर्णपणे भिन्न आहेत. इथल्या लोकमानसांत पृथ्वी, आप आणि ताप ह्या महाभूतांच्या त्रिकुटाची तपस्या चालते. आणि ह्या तपस्येत जीवनाचं तेज आहे, आणि शीतलता सुध्दा. फाल्गून महिन्यात होळीच्या अबीर - गुलालाच्या बरोबर, इथे मरूनायक श्रीकृष्ण पिवळी रेती उडवू लागतो. चैत्र महिना येता येता धरणी तापून निघू लागते. नव्या भूगोलाचे अभ्यासक, सूर्याच्या ज्या आगीला इथे सर्वात जास्त भयाकारी मानतात, त्या सूर्याचे इथले एक नाव 'पीथ' असं आहे आणि 'पीथ' ह्याचा अर्थ 'पाणी' असाही आहे. सूर्यच तर ह्या धरणाच्या जलचक्राचा स्वामी आहे.

आषाढाच्या सुरूवातीला सूर्याच्या सभोवती दिसणाऱ्या एका विशेष प्रकारच्या तेजोवलयाला 'जलकुंडो' असं म्हणलं जातं. हे जलकुंड पावसाची सूचना देणारे मानतात, ह्याच दिवसांमध्ये उगवत्या सूर्याच्या प्रभेत 'माछलो' म्हणजे माशाच्या आकाराची विशेष किरणं दिसली, तर ताबडतोब पाऊस येणार असं मानतात. समाजाला पावसाची सूचना देण्यात चंद्र सुध्दा मागे नसतो. आषाढांत चंद्राची कोर जर नांगरासारखी उभी असेल, आणि श्रावणात विश्रांती घेत असल्यासारखी जास्त कलती असेल, तर पाऊस ठीकठाक पडणार - 'उभो भलो आषाढ, सूतो भलो सरावण.' जलकुंडो, मछलो आणि चंद्राच्या अनेक रूपकांनी भडली पुराण भरलेलं आहे. या पुराणाची रचना डंक नावाच्या ज्योतिषाचार्यांनी केली आहे. 'भडली' ही त्यांची पत्नी, तिच्या नावाने हे पुराण ओळखलं जातं. कुठे कुठे दोघांचा एकत्रित उल्लेख येतो, तिथे तिथे त्याला 'डंक-भडली' पुराण म्हणतात.

इथे ढग सर्वात कमी येतात, पण ढगांना इथे सर्वात जास्त नावं आढळली तर नवल वाटू नये. खडी बोली व बोली भाषा या दोन्हीत ब आणि व च्या फरकाने स्त्रिलिंग पुल्लिंग या फरकाने बादल चं बादली बादलो आहे तर संस्कृतमधून आलेली, जलहर, जिमतू, जलवाग, जलधरण, जलद, घटा, क्षर (लवकर नष्ट होणारे) सारंग, व्योम, व्योमचर, मेघ, मेघडंबर, मेघमाला, मुदिर, महीमंडल इत्यादी नावं आहेत. आणि बोलीभाषेमध्ये तर ढगांच्या नावांची नुसती रेलचेल आढळते.

भरणनद, पाथोद, घरमंडल, दादर, डंबर, दलवाजल, घन, घममंड, जलजाल, कालीकांठल, कालाहण, कारायणा कंद, हब्र, मैंमट, मेहाजाल, मेघाण, महाघण, रामइयो आणि सेहर. ढग कमी असतील इतकी नावं आहेत इथे ढगांसाठी. मोठ्या साक्षेपाने बनवलेल्या ह्या यादीत एखादा ग्वाला, त्याला वाटलं तर आणखी जो-चौ नावं सहज जोडून जाईल.

भाषेची आणि त्याचबरोबर इथल्या समाजाची पाऊस विषयक अनुभव संपन्नता ह्या चाळीस पन्नास नावांबरोबर संपत नाही, तर इथे पुन्हा, या ढगांचे आकार प्रकार, चालढाल, स्वभाव यांच्या आधाराने सुध्दा वर्गवारी केली जाते. मोठ्या ढगांचे नाव आहे सिखर, तर छोट्या लहरत जाणाऱ्या ढगांना म्हणायचं 'छितरी'. विहरत लहरत जाणाऱ्या ढगांच्या झुंडीतून एकटाच जरा बाजूला पडलेला छोटुला ढग सुध्दा उपेक्षित ठेवला गेला नाही. त्याला एक वेगळं नाव 'चूंखो' (चुकार) ! दूरवर पडलेल्या पावसाच्या गारव्याला जे ढग बरोबर घेवून येतात त्यांना 'कोलायण' म्हणतात, काळ्या ढगांच्या पुढे पांढरं निशाण धरावं तसे उठणारे पांढुरके ढग म्हणजे 'कोरण' किंवा 'कागोलड' आणि अशा श्वेत पताकांशिवायच आलेल्या काळ्या घटेच नाव 'कांठल' किंवा 'कालायण'.

इतके हे सगळे ढग जर असतील आभाळात तर चारी दिशा सुध्दा कमी पडतील त्यांना, म्हणूनच की काय, दिशा इथे आठ आहेत आणि सोळा सुध्दा. या दिशांच्या पुन्हा काही पातळ्या, स्तर - आणि मग अशा, खूप उंचावरून, मध्यवरून आणि खालून उडणाऱ्या ढगांना सुध्दा वेगवेगळ्या नावांनी पुकारलं जातं. पातळ विरळ आणि उंचावरचे ढग 'कस' किंवा 'कसवड' नैऋत्य दिशेकडून ईशान्येच्या कोपऱ्याकडे थोड्या खालून पण वेगाने जाणारे ढग म्हणजे 'उंब', ढगांचं दिवसभर आच्छादून रहाणं, मधूनमधून पाऊस पाडणं याला 'सहाड' म्हणतात. पश्चिमेकडून वेगाने दौडत येणाऱ्या ढगांच्या झुंडी 'लोरां' आहेत, तर त्यातून संतत धारेने पडणारा पाऊस 'लोरांझड' असतो. लोरांझड म्हणून एक पाऊस गाणं देखील आहे. पाऊस पाडून रिते झालेले ढग म्हणजे कर्तव्य पार पाडून दमून कोण्या टेकडीच्या माथ्यावर किंचित विश्रांतीसाठी विसावलेले ढग - त्यांना 'रिंछी' असं अभिधान आहे.

कामात व्यग्र राहण्यापासून ते विश्राम करण्यापर्यंत ढगांचा असा 'खयाल' ठेवणारा समाज, त्यांच्यावर इतकं प्रेम करणारा समाज, त्यांच्या थेंबाथेंबाला किती मंगलमय मानत आला असेल?

आता तर सूर्यच बरसतोय्. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्णपक्षातल्या एकादशीपासून 'नौतपा' चा आरंभ होतो. ह्या तिथी कधी बदलत नाहीत. हो. इंग्रजी कॅलेंडरच्या हिशोबाने ह्या तिथी मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येतात. 'नौतपा ' - नवतपा म्हणजे धरणी खूप तापून निघण्याचे हे नऊ दिवस. धरती चांगली तापून नाही निघाली, तर चांगला पाऊस नाही पडत ! ह्या अपरिमित तापाच्या तपश्चर्येतूनच येथे वर्षेची शीतलता लाभते.

ओम् - गोम्, आकाश आणि धरती, ब्रम्ह आणि सृष्टी यांचे हे शाश्वत आणि निरंतरचं नातं आहे. कडक उन्हाचं इथलं एक नांव 'धाम' - जे राजस्थान खेरीज बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश ह्या प्रांतात कितीतरी ठिकाणी वापरलं जातं. परंतु 'ओघमो' हा खास राजस्थानचाच शब्द आहे..... पावसा आधीचा ताप. ह्या प्रचंड तापाच्या दिवसांतच मरूभूमीमध्ये 'बलती' म्हणजे 'लू' आणि वाळूची वादळं घोंघावतात. बातम्या छापल्या जातात की त्यांच्यामुळे इथलं जीवन 'अस्ताव्यस्त' विस्कळीत झालं आहे, रेल्वे आणि अन्य मार्ग बंद आहेत वगैरे वगेरे ! पण आजही इथे लोक ह्या भयाकारी वादळांना 'ओम् - गोम्' चा - त्या दोन महातत्वांचा एक आविष्कार मानतात. म्हणून मरूभूमीमध्ये ज्येष्ठाला कोणी दूषणं देत नाही. ह्या दिवसांमध्ये संपूर्ण शरीर झाकलेलं नि फक्त चेहराच काय तो उघडा असतो. जोरात वहाणारे दक्षिणवारे वाळू उचलून उचलून चेहऱ्यांवर मारतात. पण गुराखी - गोपाल ज्येष्ठाची स्वागतगीतं गात असतात आणि थेट कबीराच्या शैलीत, ज्येष्ठाला इकडे पाठवल्याबद्दल, देवाचे आभार मानतात.

जेठ महिनो भलां आयो । दख्खन बाजे बा (हवा)
कानों रे तो कांकड बाजे । वाडे साईं वाह।


अश्याही कथा आहेत, ज्यांत सगळे बारा महिने एकत्र बसून गप्पा मारताहेत आणि प्रत्येक महिना म्हणतो की 'मीच रे ह्या सृष्टीचा लाडका गुणाचा बाळ' पण ह्या बोलाचालीत बाजी मारतो ज्येष्ठाचा महिना. तोच ज्येष्ठ म्हणजे सगळ्यात 'थोरला' भाऊ सिध्द होतो. ज्येष्ठ ठीक तापला नाही, रेतीच्या वावटळी उठल्या नाहीत तर 'जमनो काही खऱ्याचा नाही'. 'जमनो' म्हणजे पाऊसकाळ किंवा पावसाळा, पाऊस, शेतीभाती, गवतचाऱ्याचे हिशेब मांडायला योग्य काळ. ह्या काळातच 'पीथ' म्हणजे सूर्य आपला अर्थ बदलून पाणी होतो.

पावसाच्या आगमनाचे संकेत मिळू लागतात. 'आउगाल' पासून ! मग वस्तीवर पोरंबाळं चादरी पसरून 'डेडरियो' खेळायला निघतील नि मोठी माणसं चादरी साफ करायला सिध्द होतील. जिथे जिथे म्हणून पावसाचं पाणी गोळा करायचं असेल, तिथले तिथली अंगणं, छप्परं आणि कुंड्यांचे 'आगौर' साफ केले जातील. ज्येष्ठाचे दिवस मागे पडताहेत, लवकरच आषाढ येणार. पण पावसाला अजून जरा उशीर आहे, आषाढ शुध्द एकादशीपासून 'वरसाली' किंवा 'चौमासा' म्हणजे चातुर्मास सुरू होईल. इथे भले पाऊस कमी प्रमाणात आणि कमी दिवस पडत असेल, पण समाजाने मात्र त्याच्या आदरातिथ्यासाठी अख्खे चार महिने राखून ठेवलेले आहेत.

समाजाचं जे मन कमी येणाऱ्या ढगांनी इतक्या नाना प्रकारांनी आठवण काढतं, ते त्याच्या रूपेली थेंबांना किती किती रूपांत पाहत असेल - त्याला किती नावांनी ओळखत असेल. इथेही सरी लागलेल्या असतील.

थेंबाचं पहिलं नांव तर 'हरी' हेच आहे. मह 'मेघपुहुप' आहे. वृष्टी आणि त्यातून बोलीभाषेत आलेलं 'बिरखा' आणि 'बरखा' आहेत. ढगांचं, मेघांचं सार म्हणून 'घणसार' आहे. एक नांव 'मेवलियो' सुध्दा आहे. थेंबांची तर जशीकाही नाममालाच आहे. जलकण ह्या अर्थी 'बूला' आणि 'सीकर' आहेत. 'फुहार' तथा 'छींचा' हे शब्द सगळीकडे प्रचलित आहेत. त्यांपासूनच 'छांटों, छांटा, छको, छछोहो ' हे शब्द बनले आहेत. मग आभाळातून ठिपकणारं म्हणून 'टपका' आहे, 'टपको' आहे, तसेत 'झरमर' आणि 'बूंदा-बांदी'. शिवाय ह्याच अर्थासाठी 'पुणंग' आणि 'जीखा' हे शब्दही आहेत. बूंदा - बांदीतून पुढे वाढणाऱ्या पाऊसझडी 'रीठ' आणि 'भोट' आहेत नि ह्याच सरी अखंड झरूं लागल्या तर ते 'झंडमंडण' होतं.

चार महिने पावसाचे आणि त्यातल्या प्रत्येक महिन्यात पडणाऱ्या पावसाची नावंही वेगवेगळी. 'हलूर' म्हणजे सरीच, पण श्रावण - भाद्रपदातल्या. 'रोहड' म्हणजे थंडीत कधीमधी पडणारा चुटपुटता पाऊस. 'वरखावल' हा शब्दही झडी ह्या अर्थानेच 'वर्षावली' शब्दापासून अपभ्रंश होवून बोलीभाषेत आलेला आहे. 'मेहाझड' मध्ये थेंबांची गतीही वाढते आणि अवधीसुध्दा. 'झपाट्यां' मध्ये फक्त वेग वाढतो आणि वेळ कमी होतो. एका झपाट्यात ढगांतलं सारं पाणी बरसून जातं.

'त्राट, त्रमझड, त्राटकणो आणि धरहरणो' हे शब्द मुसळधार पावसासाठी आहेत. 'ठोल' ह्या शब्दात सुध्दा असाच पाऊस ह्या अर्थाबरोबरच 'आनंद' असा अर्थही सामावलेला आहे. हा ' छोल' - हा आनंद सन्नाट्याचा नव्हे. अश्या तूफानी पावसाबरोबर होणारा पाणी वाहण्याचा आवाज 'सोक' किंवा 'सोकड' म्हणवितो. पाऊस कधीकधी इतका सुसाट आणि त्याचा आवाजही इतका चंचल होतो की जणू ढग आणि जमीन यामधलं अंतर एका क्षणात मोजलं जातं. तेव्हा ढगांतून धरणीला स्पर्श करणाऱ्या पाऊसधारेला इथं 'धारोलो' (धारावली) ह्या नावाने ओळखलं जातं.

इथे येवून ना पावसाचा खेळ थांबत - ना शब्दांचा ! 'धारोली' चा वर्षाव बाहेरून घरांत घुसूं लागला तर तो 'बाछड' बनतो आणि ह्या बाछडमध्ये भिजून मऊ झालेल्या, भिजल्या कपड्यांचे विशेषण 'घमक' हा वजनदार आणि पुल्लिंगी आहे. ह्या मोठ्या आवाजाबरोबर घोंघावणारा वारा 'वाबल' आहे.

हळूहळू वाबल मंदावतो, घमक शांत होतो नि थोड्याच वेळापूर्वी धरणीला स्पर्श करत असलेल्या धारोला (धारावली) पुन्हा ढगांपर्यंत जावू लागतात. पाऊस थांबतो. ढग अजून पांगले नाही आहेत. अस्ताला जाणारा सूर्य त्यातून डोकावतो आहे. ह्या डोकावणाऱ्या सूर्याचा लांब लांब किरणांना मोघ म्हणतात नि तेही वर्षासूचक मानले जातात. मोघ दर्शन झाल्यावर रात्री पुन्हा पाऊस पडणार. ज्या रात्री खूप पाऊस पडेल ती रात्र साधीसुधी रैण नव्हे, तर महारैण बनते.

पाऊस बरसण्याची क्रिया म्हणजे ' तूठणो' आणि तो कमीकमी होत (सिमटना) जाण्याची क्रिया आहे. उपरेलो तेव्हा चातुर्मास उठतात, निघून जातात. पाऊस बरसण्यापासून ते सिमटन्यापर्यंत प्रत्येक गांव, प्रत्येक शहर आपल्या घरांच्या छपरांवर, अंगणात, शेतात, चव्हाट्यावर आणि अगदी निर्जन जागीसुध्दा ह्या पाऊस थेंबांना सांभाळून ठेवण्यासाठी आपापल्या चादरी पसरून ठेवत असतं.

'पालर' म्हणजे पावसाच्या पाण्याची साठवण करायचे प्रकारसुध्दा इथे ढग आणि थेंबाप्रमाणेच अगणित आहेत. थेंबाथेंबाने घागरही भरते आणि सागरही. (थेंबेथेंबे तळें साचे) ही म्हण फक्त पाठ्यपुस्तकातच नाही, तर खरोखरच आपल्या समाजाच्या स्मृतीत सामावलेली आढळते. ह्या स्मृतिचीच 'श्रुती' बनली. जी गोष्ट समाजमनाने लक्षात ठेवली, ती त्याने पुढे ऐकवली, वाढवली - आणि कोण जाणे केव्हा पाण्याच्या ह्या कामाची इतकी मोठी, व्यावहारिक आणि सुव्यवस्थित अशी उतरंड रचली की पूर्ण समाज त्यात एकजीव झाला. ह्याचा विस्तार इतका मोठा झाला की राज्यांची सुमारे तीस हजार गावं आणि तीनशे शहरं - वस्त्यांमध्ये पसरून जणू निराकर बनली.

सौ. प्रज्ञा सरखोत

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1



Path Alias

/articles/raajasathaanacae-rajata-jalabaindauu-2

Post By: Hindi
×