राजस्थानचे रजत जलबिंदू - 1


राजस्थानकी रजत बुंदे हे पुस्तक 1999 - 2000 च्या आसपास हाती आले. आणि वाचता वाचता त्या विषयाने मनाची एवढी पकड घेतली की एकदा वाचून पुरेसे वाटेना. मग लेखकाशी म्हणजे दिल्लीच्या श्री. अनुपम मिश्र यांच्याशी पत्र - व्यवहार केला आणि चेंबूरचे श्री. मेमाणी यांच्याकडून हे पुस्तक मी स्वत:साठी विकतच घेतले. मग काय ? कधीही कुठलंही पान उघडून वाचायचे असे चालू झाले. आणि शेवटी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. तेच भाषांतर जलसंवाद मध्ये प्रमश: प्रकाशित होत आहे.

लेखिकेचे मनोगत :


राजस्थानकी रजत बुंदे हे पुस्तक 1999 - 2000 च्या आसपास हाती आले. आणि वाचता वाचता त्या विषयाने मनाची एवढी पकड घेतली की एकदा वाचून पुरेसे वाटेना. मग लेखकाशी म्हणजे दिल्लीच्या श्री. अनुपम मिश्र यांच्याशी पत्र - व्यवहार केला आणि चेंबूरचे श्री. मेमाणी यांच्याकडून हे पुस्तक मी स्वत:साठी विकतच घेतले. मग काय ? कधीही कुठलंही पान उघडून वाचायचे असे चालू झाले.

इतकं सुंदर पुस्तक भाषांतर करून पाहाव म्हणून तो छंद लावून घेतला. त्यावेळी तो कालखंड माझ्यासाठी कौटुंबिक दृष्टीने खूप कठीण, परीक्षेचा काळ होता. शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक या सर्व आघाड्यांवर सर्व पातळ्यांवर फक्त झगडणं होतं. मानभंग, मनोभंग या खेरीज काहीही हाती लागत नव्हतं. त्या दिवसांमध्ये माझ्यासाठी विसाव्याच्या अशा दोनच जागा होत्या, एक माझे गाणं शिकणं आणि दुसरं या पुस्तकाचं मराठीच रूपांतर करणे. श्री. अनुपम मिश्रजींनी मला अतिशय आनंदाने अनुवादासाठी परवानगी दिली, आणि माझ्यावर मेहेरबानीच केली.

ह्या पुस्तकाचं आणि लेखकाचं माझ्यावर ऋण आहे. काही प्रकाशकांना आशेने भेटले पण या विषयावरचं पुस्तक त्या जागतिक मंदीच्या काळात कोणी छापायला तयार होईना. माझ्या नैराश्यात भरच पडली.

आज 2014 उजाडलं, आता त्या अनुवादाच्या नशिबाचं अपेक्षेचा वनवास संपला असावा असं वाटतंय. त्यावेळच्या मनाच्या पुसलेल्या पाटीवर मला पुन्हा एकदा आनंदाची अक्षरं उमटतील असं वाटायला लागलंय. जलसंवादच्या डॉ. देशकरांनी मला छोटीशी पाऊलवाट दाखवली. जलसंवाद मधून हे पुस्तक क्रमश: वाचकांपर्यंत पोचणार आहे.

पाणी या विषयावर व्यक्तीगत आणि सार्वजनिक अशा दोन्ही पातळ्यांवर येणाऱ्या अनुभवांचा साठा लोकांपुढे ठेवणं आणि त्या अनुषंगाने एका चांगल्या विधायक वाटचालीसाठी जनजीवन ढवळून काढणं ह्या काळाच्या गरजेला ओळखून जलसंवाद मासिक गेली 10 वर्षे काम करते आहे. त्यासाठी माझा हा खारीचा वाटा असं मी समजते मला खूप छान वाटतंय. धन्यवाद डॉ. देशकर.

कधी तरी इथे समुद्र होता. लाटांवर लाटा उसळायच्या. काळाच्या लहरींनी त्या अथांग सागराला कोण जाणे कसे, कोरडे ठक्क करून टाकले. आता, तिथे रेतीचा समुद्र आहे. लाटांवर लाटा अजूनही उठतात, वाळूच्या !

सृष्टीच्या एका विराट रूपाचे दुसऱ्या विराट रूपात, सागराचे वाळवंटात रूपांतर व्हायला लाखो वर्षे लागली असतील अन् ह्या नव्या रूपाला देखील आज हजारो वर्षे झालीत. पण राजस्थानचा समाज इथल्या जुन्या रूपड्याला विसरलेला नाहीए. आपल्या मनांत खोलवर आजही 'हाकडो' या नावाने त्याची याद करतोय. काही हजार वर्षांपूर्वीची डिंगल भाषा आणि आजच्या, प्रचलित राजस्थानी मध्येही हाकडो हा शब्द पिढ्यांपिढ्यांच्या सोबत असाच तरंगत आलाय. अशा पिढ्या, ज्यांच्या कितीएक पूर्वजांनी सुध्दा समुद्र पाह्यला नव्हता.

आजच्या मारवाडांत पश्चिमेला लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या हाकडो ह्या नावाखेरीज राजस्थानच्या मनांत सागराची आणखी कितीतरी अभिधानं आहेत. संस्कृत भाषेच्या वारश्याने मिळालेली सिंधू, सरितापति, सागर, वाराधीप ही नावं तर आहेतच. शिवाय आच, उअह, देधाण, वडनीर, वारहर सफरा - भडार अशी नावं सुध्दा आहेत. एक संबोधन हेल असं आहे आणि ह्या शब्दाचा अर्थ जसा समुद्र, तसाच विशालता आणि उदारता असाही आहे.

ही राजस्थानच्या मनाची उदारताच आहे, की विशाल मरूभूमीमध्ये राहून सुध्दा त्यांच्या मुखी समुद्राची इतकी संबोधने मिळतात. हा दृष्टीकोन सुध्दा वेगळाच काही असेल. सृष्टीची जी घटना घडूनही लाखो वर्ष लोटली जी घडायला देखील हजारो वर्ष जावी लागली, त्या काळाचा जमाखर्च जर कुणी मांडायला बसेल, तर त्याच्या हाती आकड्यांच्या अमर्याद अंधारात हरवून बसण्याखेरीज दुसरं काय लागणार ? लाखो- करोडो मैलांच्या अंतराला खगोलशास्त्रज्ञ प्रकाश वर्षांनी मोजतात, पण राजस्थानच्या मनानं, युगांच्या त्या अवाढव्य गुणाकार - भागाकारांना निमिषार्धांत निपटून टाकलं. ह्या एवढ्या मोठ्या घटनेकडे 'पलक - दरियाव' म्हणून बघितलं. पापणी लवते ना लवते तेच सागराचं कोरडं होणं जसं यांत संभवते, तसंच भविष्यकाळात ह्या कोरड्या ठणठणीत मरूभूमीचा पुन्हा अथांग सागर होणं हे सुध्दा !

काळाच्या अंतहीन धारेला प्रत्येक क्षणी पाहाणाऱ्या आणि विराटाला अणुरूपात निरखणाऱ्या ह्या नजरेला हाकडो पारखा झाला, पण त्याच पाण्याच्या कणाकणाला तिने थेंबामध्ये बघितले. ह्या इथल्या समाजाने स्वत:ला अशा करारी रीतीने घडवलं, की अखंड सागर खंड होवून ठायी ठायी दृष्यमान झाला.

हिंदीच्या चौथ्या इयत्तेच्या पाठ्य पुस्तकापासून ते देशाच्या योजना आयोगांपर्यंत राजस्थानचा चेहरा, विशेषत: मरूभूमीचा चेहरा, एका सुकलेल्या - उजाड आणि मागासलेल्या क्षेत्राचाच आहे. थरच्या वाळवंटाचं वर्णन तर असं, की काळीज सुकून जावं. क्षेत्रफळाच्या आधारे, देशांतील सर्व राज्यांच्या तुलनेत मध्यप्रदेशानंतर दुसऱ्या स्थानावरचं सर्वात मोठं राज्य राजस्थान, लोकसंख्येच्या आकडेवारीत नवव्या क्रमांकावर आहे... परंतु भूगोलाच्या एकूण एक पुस्तकांमध्ये त्याचा क्रमांक पावसाच्या बाबतीत मात्र सर्वात शेवटचा आहे.

पावसाची मोजणी जुन्या इंचात करोत, की नव्या सें.मी मध्ये होवो, पाऊस ह्या ठिकाणी सर्वात कमीच पडतो. इथे संपूर्ण वर्षभरांत पडणाऱ्या पावसाची सरासरी केवळ 60 सें.मी आहे. देशभराची पावसाची सरासरी 110 सें.मी मोजली गेली आहे. त्या हिशोबाने सुध्दा राजस्थानांत ही सरासरी अर्धी आहे. परंतु सरासरीचे हे आकडे सुध्दा इथलं खरं चित्र देवू शकत नाहीत, कारण राज्यांत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कधीही पाऊस एकसमान नसतो... कुठे तो 100 सें.मी पेक्षा जास्त असू शकतो तर कुठे 25 सें.मी पेक्षाही कमी.

भूगोलाचे पुस्तक ह्या ठिकाणच्या निसर्गाला- पावसाला अतिशय कृपण महाजनाप्रमाणे समजतात आणि राज्याच्या थेट पश्मिमेकडील भागाला तर ह्या महाजनाची 'अति दयनीय शिकार' म्हणतात. ह्या क्षेत्रात जेसलमेर, बिकानेर, सुरू, जोधपूर व श्रीगंगानगर हे भाग येतात. इथे त्या श्रेष्ठीच्या कृपणतेची परमावधीच आहे. पावसाची वाटणी अतिशय विषम आहे. पूर्वेकडून पश्मिमेकड येईपर्यंत पाऊस सूर्यासारखा अस्ताला जायला येतो. इथे पोहोचेपर्यंत पाऊसमान फक्त 16 सें.मी एवढं उरतं. तुलना करा ह्या प्रमाणाची दिल्लीशी, जिथे 150 सें.मी पेक्षा अधिक पाऊस पडतो. तुलना करा त्या कोकण - गोवा - चेरापुंजीबरोबर, जिथे हा आकडा 500 सें.मी ते 1000 सें.मी पर्यंत जातो.

गोवा - चेरापुंजीमध्ये जसा पाऊस कोसळतो, तसा ह्या मरूभूमीवर सूर्य आग ओकतो. जिथे पाणी कमी आणि उष्णता जास्त ह्या दोन्ही गोष्ट एकत्र येतात, तिथलं संपूर्ण जीवनच दुष्कर होवून जातं. जगातल्या अन्य वाळवंटांमध्ये सुध्दा पाऊस साधारण इतकाच पडतो. उष्णताही सामान्यत: इतकीच असते. त्यामुळे त्या ठिकाणी वसाहत खूप कमी असते. परंतु जगातील अन्य वाळवंटी प्रदेशांशी तुलना करता राजस्थानच्या वाळवंटात केवळ जास्त वसाहत एवढंच नाही, तर त्या वसाहतीला चैतन्याचा सुगंध देखील आहे. हा इलाखा इतर देशांच्या वाळवंटाहून सर्वाधिक जीवंत - चैतन्यशील मानला गेला आहे.

ह्या चैतन्यमयतेचं रहस्य इथल्या समाजमनांत आहे. राजस्थानचे लोक, निसर्गाने दिलेल्या इतक्याशा पाण्यापायी रडत नाही बसले, तर त्यांनी त्याचा एक आवाहन म्हणून स्वीकार केला आणि स्वत:ला वरपासून खालपर्यंत अशा प्रकारे सिध्द केलं, की पाण्याचा वाहण्याचा स्वभावधर्म हा त्या समाजाच्या जणू काही स्वभावांतच मिसळून सरळ आणि तरळ बनून वाहू लागला. म्हणून गेल्या हजार वर्षांच्या दरम्यान जेसलमेर, जोधपूर, बिकानेर आणि नंतर जयपूर ह्यासारखी मोठी शहरं सुध्दा ज्या दिमाखात वसवली गेली, त्याचे रहस्य इथल्या ह्या 'सवाई' स्वभावाचा परिचय झाल्याशिवाय नीट लक्षात येणार नाही. ह्या शहरांची वस्तीही काही कमी नव्हती. इतक्या कमी पाण्याच्या इलाख्यांत राहूनही ह्या शहरांचे जीवनमान हे देशांतील अन्य शहरांच्या तुलनेने काही कमी सोईचे होतं असं नाही. ह्यांच्यातील प्रत्येक शहर वेगवेगळ्या कालावधीमध्ये बराच काळपर्यंत सत्ता, व्यापार आणि कला यांचे प्रमुख केंद्र बनून राहिले. जेव्हा मुंबई, मद्रास, कलकत्ता यांसारख्या आजच्या मोठ्या शहरांची पांचवी पण पुजली गेली नव्हती, त्या काळात जेसलमेर हे आजच्या ईराण, अफगाणीस्तान पासून रशियापर्यंतच्या कित्येक भागांत पसरलेल्या व्यापाराचं मोठं केंद्रस्थान होतं.

राजस्थानच्या समाजाने स्वत:च्या जीवनशैलीच्या एका विशिष्ट सखोलतेमुळेच जीवनाच्या, कलेच्या, व्यापाराच्या, संस्कृतीच्या उंचीला स्पर्श केलेला होता. ह्या जीवनदर्शनात 'पाण्याचे काम' हे अतिशय महत्वपूर्ण स्थानावर होते. खरोखरच, पाण्याच्या त्या भव्य परंपरेची, विकासाच्या नवनवीन पर्वामुळे काही प्रमाणात हानी नक्कीच झाली आहे, तरीही हे नवपर्व त्या परंपरेला संपूर्णपणे खंडित करू शकलेले नाही आहे. ही एक भाग्याचीच गोष्ट म्हणायला हवी.

पाण्याच्या कामांत इथे भाग्य ही आहे आणि कर्तव्य सुध्दा आहे. भाग्याची गोष्ट नक्कीच होती, की महाभारत युध्द संपल्यानंतर कुरूक्षेत्राहून अर्जुनासह परत द्वारकेला जातांना, श्रीकृष्ण याच मार्गाने गेले होते. त्यांचा रथ ह्या मरूभूमीतून जात असतांना, आजच्या जेसलमेरच्या जवळील तेव्हाच्या त्रिकूट पर्वतावर त्यांना महान असे ऋषी तपश्चर्या करतांना भेटले होते. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना वंदन केले होते आणि त्यांच्या तपाचरपणाने प्रसन्न होवून त्यांना वर मागायला सांगितले होते. महान याचा अर्थ मोठा, उच्च, ऋषी खरोखरीच उत्तुंग होते. त्यांनी स्वत:साठी काहीच मागितले नाही. भगवंताकडे मागणं मागितलं ते हे की, 'जर माझ्या गांठीला काही पुण्य जमा असेल, तर हे भगवान असं वरदान दे की ह्या क्षेत्री पाण्याचं कधीही दुर्भिक्ष्य होवू नये. ' तथास्तु श्रीकृष्णाने त्यांना वरदान दिलं होतं.

तथापि, मरूभूमीचा भाग्यवान समाज, हा वर मिळाला म्हणून हातावर हात ठेवून स्वस्थ नाही बसला, त्या लोकांनी पाण्याच्या बाबतीत किती प्रकारे स्वत:ला कसून घेतलं. गावागावांत, ठायी ठायी, पावसाच्या पाण्याला वर्षभर सांभाळून ठेवायच्या रिती निर्माण केल्या.

'रीत' यासाठी इथे जुना शब्द 'वोज' असा आहे. वोज चा अर्थ रचना, युक्ती, उपाय हे आहेतच, शिवाय सामर्थ्य, विवेक आणि विनम्रता साठी सुध्दा हा 'वोज' शब्द वापरला जातो. पावसाच्या थेंबांना सांभाळून ठेवण्याचे कार्य विवेक वापरून केलं जातं. त्याचबरोबर ते नम्रपणाने केलं जातं. इथल्या समाजाने पाऊस इंच किंवा सें.मी मध्ये नव्हे, 'अंगुलं' आणि 'बित्त्यां' मध्ये नव्हे, थेंबाथेंबाने मोजला असेल. त्याने ह्या थेंबांना करोडो चांदीच्या थेंबांसारखं पाह्यलं आणि अतिशय निगुतीनं, वाजेने त्या तरल रजत बिंदूंना अति अगत्यपूर्वक सांभाळून आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी शुध्द परंपरा निर्माण केली की जिचा धवल प्रवाह, इतिहासांतून निघून वर्तमानापर्यंत वाहातो आहे आणि आताच्या वर्तमानाचाही इतिहास बनवण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी आहे.

राजस्थानच्या जुन्या इतिहासांतून वाळवंट तथा अन्य क्षेत्राचं वर्णन हे कोरड्या, उजाड आणि एका शापित भूभागाप्रमाणे मिळत नाही. वाळवंट ह्यासाठीचा सध्याचा बहुप्रचलित शब्द 'थार' हा सुध्दा त्यात जास्त आढळत नाही. दुष्काळ पडलेत, कुठे कुठे पाण्यासाठी कष्ट सुध्दा पडलेत, पण संसारी गृहस्थापासून सर्वसंग परित्यागी संन्याशापर्यंत, कवींपासून मांगणियारांपर्यंत, भणंगांनी, हिंदू - मुस्लिम साऱ्यांनी याला 'धरति धोरां री' असं म्हटलंच. वाळवंटाच्या जुन्या नावामध्ये स्थल आहे, जो शब्द कदाचित 'हाकडो' म्हणजे समुद्र नष्ट होवून तिथे वर निघालेल्या स्थला चा सूचक असेल, मग 'स्थल' चा 'थळ' आणि 'महाथळ' तर बोलीभाषेत 'थली' आणि 'धरधूधल' बनला. 'थली' म्हणजे तर एक मोठी लांबरूंद ओळख असावी तसा शब्द आहे. छोट्या छोट्या ओळखीसाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. माड, मारवाड, मेवाड, मेरवाड, ढूँढार, गोडवाड यांसारखे मोठे भूभाग होते, तसेच दसरेक, धन्वदेश यासारखे छोटे छोटे प्रदेश होते आणि या विराट विशाल मरूभूमीमध्ये छोटे छोटे राजे अनेक झाले असतील, पण नायक मात्र एकमेव राहिला आहे - श्रीकृष्ण. इथे त्याला खूप स्नेहाने 'मरूनायकजी ' म्हणजे 'मरूभूमीचा महाराजा' असं म्हणतात.

या मरू नायकाचं वरदान आणि समाजातील धुरिणाचे ओज यांचा इथे अनोखा संगम झाला. ह्या संयोगामुळे 'वोजतो' म्हणजे हरेकजण आपली करू शकेल असा एक सरळ सुंदर रीवाज जन्माला आला. कधी खाली धरणावर पार क्षितीजापर्यंत पसरलेला हाकडो, वर आकाशात ढगांच्या रूपाने उडू लागला होता. हे ढग फार थोडेच असले असतील, पण त्यात मावलेल्या पाण्याला इथल्या लोकांनी इंच सेंटिमीटरमध्ये नाही मोजले तर मोजताही येणारा नाहीत अशा अगणित थेंबांमध्ये गणलं आणि त्या थेंबांना मरूस्थलीमध्ये राजस्थानभर ठीक थेंबांसारखच टाक्या कुंड, बेरी जोहज, नाली. तलाव विहीरी, कुआँ छोट्या विहीरी आणि पारांमध्ये भरून, त्या उडून जावू पहाणाऱ्या अखंड हाकडोला खंड खंड करून खाली उतरवून ठेवलं.

'जलढोल' म्हणजे यशाचे ढोल वाजवणं म्हणजे प्रशंसा करणे. राजस्थलीने पावसाच्या पाण्याची साठवण करण्याच्या आपल्या या कौतुकास्पद आगळ्या परंपरेच्या यशाचे कधी नगारे नाही पिटले. आज ह्या देशातील सगळी लहान - मोठी शहरे, छोटी मोठी गावे, राज्यांच्या राजधान्या, बाकीचे सोडा अगदी प्रत्यक्ष देशाची राजधानी सुध्दा, खूप चांगला पाऊस पडला तरीही पाणी साठवण्याच्या कामात बिलकूल खंक होत चालली आहे. ह्या देशाला पाण्याच्या बाबतीत, फार उत्तुंग उपदेश इतरांकडून ऐकून घ्यावे लागतील तर, त्या आधीच कोरड्या - रूक्ष मानल्या गेलेल्या राजस्थलीच्या मरूभूमीत समृध्द अशा जलसंचयाच्या भव्य परंपरेच्या यशदुंदुभी वाजू द्यात की - 'पधारो म्हारे देस' आमच्या देशी या.

पृथ्वी आप आणि ताप यांची तपस्या :


मरूभूमीत ढगांची एक छोटीशी रेघ दिसली रे दिसली की मुलांची टोळी एकेक चादर घेवून बाहेर पडतात. आठ दहा इवले इवले हात मोठ्या चादरीची टोकं कशीबशी हातात धरून तिला ताणून धरतात. ही टोळी प्रत्येक घरासमोर जाते आणि गाऊ लागते -

बेडूक म्हणतो डरांव डरांव
पालर पाणी भरावं भरांव
अर्ध्या रात्रीत भरेल तलाव

मग प्रत्येक घरातून त्या चादरीत मूठभर गहू टाकले जातात तर कुठे कुठे बाजरीचं पीठ, एका मोहल्ल्याची फेरी पूर्ण होता होता चादर इतकी भरते, वजनदार होते, की ते चिमुकले हात पेलायला कमी पडतात. मग चादर गुंडाळून घेतली जाते. बाळं कुठेतरी टेकतात, ते धान्य शिजवतात, त्यांच्या घुगऱ्या बनवतात, कणाकणांनी जमवलेले ते धान्य पोरांची पोटं टम्म भरून शिल्लक रहात.

आता मोठ्यांची पाळी असते थेंब थेंब पाणी जमवून, वर्षभर तहान भागवून घेण्याची. पण राजस्थानमधील जलसंचयाची परंपरा समजून घेण्याआधी प्रथम आपल्या ह्या भूभागाची थोडी ओळख करून घेणे जरूरीचे आहे.

राजस्थानच्या कुंडलीत निदान जलस्थानात तरी कडक मंगळ असावा. ह्या मंगळ्या ला मंगलमय बनवणे काही साधी गोष्ट नाही. कामाच्या मुश्किलीबरोबरच, ह्या क्षेत्राचा विस्तारही काही लहानसहान नाही. क्षेत्रफळाच्या हिशोबात आजचा राजस्थान देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाच्या संपूर्ण क्षेत्रफळाचा साधारण अकरावा भाग म्हणजे जवळजवळ 3,42,215 चौरस किलोमीटर या राज्याखाली येतात. ह्या हिशोबाने तर जगातील काही देशांपेक्षा ही मोठा आहे हा आपला प्रांत. इंग्लंडच्या साधारण दुपटीने मोठा म्हणा ना !

पूर्वी छोट्या मोठ्या एकवीस रियासती होत्या, आता एकतीस दिल्हे आहेत. ह्यापैकी तेरा जिल्हे हे अरवली पर्वत रांगांच्या पश्चिमेकडे आणि बाकीचे पूर्वेला. पश्चिमेच्या तेरा जिल्ह्यांची नावे आहेत ती अशी - जेसलमेर, बाडमेर, बिकानेर, जोधपूर, जालौर, पाली, नागौर, चुरू, श्रीगंगानगर, सीकर, हनुमानगढ, सिरोही आणि झूंझनूं. पूर्वेला नी दक्षिणेला डुंगरपूर, उदेपूर, कांकरोली, चित्तोडगढ, भिलवाडा, झालावाड, कोटा, बांसवाडा, बाराबूंदी, टौंक, सवाई माधोपूर, धौलपूर, दौसा, जयपूर, अजमेर, भरतपूर आणि अलवर हे जिल्हे. जेसलमेर हा राज्यांतला सर्वात मोठा जिल्हा. हा सुमारे 38,400 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. सर्वात लहान जिल्हा धौलपूर, हा जेसलमेरच्या एक दशांश एवढा आहे.

आजचे भूगोलाचे अभ्यासक ह्या सगळ्या भूप्रदेशाचे चार भाग मानतात. मरूभूमीच्या पश्चिम भागाला 'वाळूचे मैदान' म्हणतात. किंवा 'शुष्कक्षेत्र' म्हणतात - त्याला लागूनच्या पट्ट्याला 'अर्ध शुष्क क्षेत्र' म्हणतात ह्या भागाचे जुने नाव 'बागड' असे होते. मग अरवली च्या पर्वतरांगा आहेत आणि मध्यप्रदेश वगैरेंना जोडलेला राज्याचा भाग हा 'दक्षिण - पूर्व पठारी प्रदेश' म्हणून ओळखला जातो. ह्या चार भागांपैकी सर्वात मोठा भाग हा वाळूच्या मैदानाचा म्हणजे मरूभूमीचाच आहे. ह्याचं पूर्वेचे टोक उदयपूरच्या जवळ आहे, उत्तर टोक पंजाबला स्पर्श करते, दक्षिण टोकाशी गुजरात येते, तर पश्चिमेकडची संपूर्ण सरहद्द ही पाकिस्तानशी जोडलेली आहे.

ही मरूभूमी सुध्दा संपूर्णपणे वालुकामय नाही, पण जी आहे ती काही कमी नाही. त्यामध्ये जेसलमेर, बाडमेर, बिकानेर, नागौर, चुरू आणि श्रीगंगानगर हे जिल्हे सामावले जातात. ह्याच भागात वाळूच्या मोठाल्या टेकड्या आहेत. ज्यांना 'धोरे' असे म्हटले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात उठणाऱ्या वेगवान वावटळींमध्ये जणू पंख लावून हे धोरे इकडे तिकडे उडतात. त्यावेळी कितीकदा रेल्वेचे रूळ, छोट्या मोठ्या सडका, आणि राष्ट्रीय महामार्ग सुध्दा ह्यांच्याखाली दबले जातात. ह्याच भागात पाऊस सर्वात कमी पडतो. भूपृष्ठाखालील पाणी ही खूप खोलवर आहे. सामान्यपणे शंभर ते तीनशे मीटर्सच्या खाली आणि ते देखील बहुतांशी खारट.

अर्ध - शुष्क क्षेत्र म्हटला जाणारा भाग, विशाल मरूभूमी आणि अरवली पर्वतरांगांच्या मध्ये, उत्तर- पूर्व ते दक्षिण पश्चिम असा लांबवर पसरलेला आहे. इथूनच पावसाचे प्रमाण थोडे वाढते. तरी देखील ते 25 सें.मी ते 50 सें.मी यामध्येच सरकते आणि देशाच्या सरासरी पावसाच्या अर्ध्या इतकच राहाते. ह्या भागात कुठे कुठे थोडी ओलसर माती मिळते आणि बाकी सगळी तीच चिरपरिचित वाळू. मरूविस्तार रोखणाऱ्या तमाम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योजनांना धि:कार, धडका देत, वाळूची वादळं इथल्या वाळूला अरवली पर्वताच्या दऱ्यांमध्ये पार पूर्वेपर्यंत नेवून टाकतात. अशा वाळूच्या छोट्या छोट्या दऱ्या ब्यावर, अजमेर आणि सिकरच्या आसपास आढळतात.

ह्या क्षेत्रातच ब्यावर, सीकर ढूंढनूं हे जिल्हे आहेत आणि एकीकडे नागौर, जोधपूर, पाली, जालौर आणि चुरू जिल्ह्यांचा थोडा भाग येतो. भूजल या ठिकाणी सुध्दा 100 ते 300 मीटर खोलवर आणि बहुधा खारटच असते.

इथल्या काही भागात एक आणखी विचित्र तऱ्हा आढळते. पाणी तर खारटं आहेच, पण जमीन सुध्दा खारट आहे. अशा खार जमिनीखाली येणाऱ्या प्रदेशांमध्ये खाऱ्या पाण्याची सरोवरं आहेत. सांभर, डेगाना, डीडवाना. पचपदरा, लूणकरणसर, बाप, पोकरन, कुचामन ह्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांमधून तर कायदेशीर मिठाचे उत्पादन निघते. सरोवरांच्या आसपास मैलोगणती, दूरवर जमिनीतून मीठ वरती आले आहे.

ह्याच्या बरोबरीने आहे ती संपूर्ण प्रदेशाला छेद देवून मोजणारी जगाच्या अतिप्राचीन पर्वत मालांपैकी एक पर्वतमाला अरवलीची. उंची भले असेल कमी, पण वयाने ही हिमालयापेक्षा मोठी आहे. हिच्या मांडीवर वसलेले आहेत ते सिरोही, डुंगरपूर, उदेपूर, अबू, अजमेर आणि अलवर हे जिल्हे. उत्तर - पूर्व दिशेने ही दिल्लीला स्पर्श करते आणि त्यात साधारणपणे 550 किलमोमीटर राजस्थानला छेद देते. पावसाच्या बाबतीत राज्यातील हा सर्वात संपन्न इलाखा मानला जातो.

अखलीवरून उतरून उत्तरदिशेला ईशान्येकडून आग्नेयेकडे पसरलेला आणखी एक भाग आहे. यात उदेपूर, डुंगरपूर काही भागांबरोबरच बाँसवाडा, भिलवाडा, बूँदीचौंक, चित्तोडगढ, जयपूर व भरतपूर हे जिल्हे येतात. मरूनायक म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म जिथे झाला, त्या ब्रज ला लागूनच भरतपूर आहे. दक्षिण - पूर्व पठार ही यामध्ये अडकलेले आहे. यामध्ये कोटा, बूंदी, सवाईमाधोपूर व धौलपूर जिल्हे आहे. धौलपूर पासून मध्यप्रदेशची हद्द सुरू होते.

या ठिकाणी खाली धरणीचा स्वभाव जसा बदलत जातो, तसा तसा वर आकाशाचा स्वभाव बदलत जातो.

आपल्या देशात वर्षा, मान्सूनच्या वाऱ्यांवर स्वार होवून प्रवेशते. मे - जून मध्ये उभा देश तापून निघतो. ह्या चढत जाणाऱ्या उष्णतामानामुळे हवेचा दाब सातत्याने कमी होत जातो. तिकडे समुद्राच्या वाफा आणणारे वारे, आपल्यासोबत समुद्राचा खारेपणा सुध्दा गोळा करतात आणि कमी दाबाच्या प्रदेशात वाहात जातात. ह्या वाऱ्यांना मान्सून वारे असे म्हणतात.

राजस्थानच्या आकाशात मान्सून वारे दोन बाजूंनी येतात. एक जवळून म्हणजे अरबी समुद्रावरून आणि दुसरीकडून लांबून तिकडे बंगालच्या उपसागरावरून. या दोन्ही बाजूंनी आलेले हे ढग , वाटेतल्या प्रत्येक ठिकाणी जितका पाऊस पाडतात, तितका पाऊस ह्या भागांतल्या थोड्याशा ठिकाणांवर सुध्दा पाडू शकत नाहीत.

दूर बंगालच्या उपसागरावरून उठणारे मान्सून वारे गंगेच्या विशाल मैदानाला ओलांडून येता येता आपली सगळी आर्द्रता संपवून बसतात. राजस्थानापाशी येईपर्यंत त्यांच्या पखाली इतक्या रिकाम्या होतात, की ते राजस्थानला पुरेसे पाणी देवू शकत नाहीत. तर अरबी समुद्रातून येणारे मान्सूनवारे जेव्हा इथल्या अतितप्त भागात येतात, तेव्हा इथली उष्णता, त्यांच्यामधली अर्धीअधिक आर्द्रता शोषून टाकते. त्यात आणि पूर्ण प्रदेशाला तिरका छेद देवून जाणाऱ्या अरवली पर्वतगांगांचीही भूमिका आहे.

अरवली पर्वत हा दक्षिण - पश्चिम ते उत्तर - पूर्व पसरलेला आहे. मान्सून वारे सुध्दा याच दिशेने वाहतात. त्यामुळे ते अरवली पार करून पश्चिमेकडच्या मरूभूमीवर प्रवेश करण्याऐवजी एरवली पर्वतरांगांशी समांतर वाहात, त्या भागात पाऊस पाडत जातात. ह्या पर्वतरांगांमध्ये सिरोही आणि अबूच्या पहाडी भागात खूप पाऊस पडतो.

क्रमश :

सौ. प्रज्ञा सरखोत, मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2



Path Alias

/articles/raajasathaanacae-rajata-jalabaindauu-1

Post By: Hindi
×