राजकारण पाण्याचेही


आपणच घेतलेल्या दृढ निर्णयाबाबत उलटसुलट कोलांटउड्या मारणाऱ्या एका प्रतिथयश यंत्रणेच्या घटनाक्रमांचा हा एक धावता आढावा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. ही प्रतिथयश संस्था आहे मुंबई महानगरपालिका आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होणारे संन्माननीय सदस्य आहेत महानगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या निर्णयाचा खेळखंडोबा करणारे सर्वेसर्वा लोकप्रतिनिधी म्हणजेच मुंबई महानगरपालीकेचे नगरसेवक.

आपणच घेतलेल्या दृढ निर्णयाबाबत उलटसुलट कोलांटउड्या मारणाऱ्या एका प्रतिथयश यंत्रणेच्या घटनाक्रमांचा हा एक धावता आढावा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. ही प्रतिथयश संस्था आहे मुंबई महानगरपालिका आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होणारे संन्माननीय सदस्य आहेत महानगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या निर्णयाचा खेळखंडोबा करणारे सर्वेसर्वा लोकप्रतिनिधी म्हणजेच मुंबई महानगरपालीकेचे नगरसेवक.

घटना आहे काही महिन्यांपूर्वीची. म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधीची आणि ऐन पावसाळ्यातली देखील. यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल अन् जवळपास दरवर्षीच्या सरासरीएवढाच पाऊस पडेल हा वेधशाळेचा अंदाज नुकताच व्यक्त झाल्याची पार्श्वभूमी मुंबई महापालिकेच्या प्रथम प्रशासकीय घोषणेला लाभली होती. या पाशर्वभूमीवर येत्या काही महिन्यात, किंबहुना वर्षभरातच संपूर्ण बृहन्मुंबईला 24 तास पाणीपुरवठा करण्याची लोकप्रिय घोषणा करून मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना दिलासा दिला होता. महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेली ही घोषणा कागदोपत्रीही उतरली होती. पण या निर्णयाची शाई अजून पुरती वाळण्याच्या आतच पावसाने जून महिन्यात थोडाफार ताण दिल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाला ʅघुमजावʆ करावे लागून महिन्याभरासाठी का होईना पण 15 ।़ पाणीकपात जाहीर करण्याची वेळ आली. एवढ्यावरच थांबेल तर ते प्रशासन कसले ? बहुधा अटकपूर्व जामीन का काय म्हणतात त्याप्रमाणे लगोलाग महानगरपालिकेने हेही जाहीर करून टाकले की पावसाचे प्रमाण असेच राहिले तर महिन्याभरातच पाणीकपात पंधरा टक्क्यांवरून पंचवीस टक्के केली जाईल.

लवकरच वृहन्मुंबईला 24 तास पाणी पुरवठा करण्याबाबतचा निर्णय ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घेण्यात आला तेव्हा आणि 15 टक्के तसेच 25 टक्के पाणी कपातीचा निर्णय जाहीर करावा लागला तेव्हाही बृहन्मुंबईला पाणीपुरवठा करणारे तान्सा, पवई, तुलसी, वैतरणा अन् भातसा ही सर्व जलाशये जवळपास रिकामी किंवा अंशत: भरलेली असल्याने 24 तास पाणीपुरवठा चालू ठेवण्याची घोषणा वा निर्णय कशाच्या आधारे होता हे तो आकाशातील परमेश्वर व महानगरपालिका प्रशासन यापैकी नक्की कोणी सांगू शकेल असे वाटत नव्हते. बहुधा लोकप्रतिनिधींच्या दडपणाखाली प्रशासनाने हा निर्णय केवळ नाखुशीनेच जाहीर केला असल्याचा निष्कर्ष काढता येवू शकेल असे वाटण्याजोग्या घटनांचा क्रम नंतरच्या काही दिवसात दिसून आला.

पावसाने घेतलेली तात्पुरती विश्रांती संपली अन् दुसऱ्या टप्प्यात पाऊस असा काही जोरदारपणे कोसळायला लागला की या धुंवाधार पावसाने वैतरणेचा मोडकसागर आणि तुलसी हे दोन जलाशय पूर्ण भरून वाहू लागल्याचे मनोहारी दृश्य मुंबईच्या लोकप्रतिनिधींना पाणीकपात रद्द करण्यासाठी खूणावू लागले. प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींचे दडपण महानगरपालिका प्रशासनावर यायलाही सुरूवात झाली. पण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या छोट्यामोठ्या मिळून सहा जलाशयांपैकी दोन जलाशये पूर्ण भरून वाहू लागली एवढ्यावरून मुंबईकरांवरचे पाणीकपातीचे संकट सर्वार्थाने टळले असे मानायला प्रशासन अजिबात तयार नव्हते. आणि प्रशासनाची ही भूमिका रास्तच होती.

भातसा, वैतरणा आणि तानसा या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर परिसरातील जलाशयांबरोबरच मुंबईतीलच तुलसी, विहार आणि पवई अशा एकूण सहा जलाशयांतून मुंबईला पाणीपुरवनठा होत असला तरी त्यात सिंहाचा वाटा हा उर्ध्व वैतरणा आणि भातसा या मोठ्या जलाशयांचाच असल्याच्या वस्तुस्थितीची रास्त जाणीव मुंबईमहानगर प्रशासनाला निश्चितच होती. शिवाय प्रशासनाला याचीही पूर्ण जाणीव होती की भातसा, उर्ध्व वैतरणा, वैतरणा व तानसा हे जलाशय भरण्यासाठी मुंबईत होणारा व लोकप्रतिनिधींच्या दृष्टीसमोर दिसणारा धुंवाधार पाऊस उपयुक्त नसतो, तर इगतपूरी - कसारा - शहापूर परिसरात घाटमाथ्यावर पाऊस पडणे महत्त्वाचे असते. नेमकी याच बाबींची त्यावेळी वानवा होती. मुंबईत पाऊस कोसळत असताना घाटमाथ्यावर मात्र पावसाचे दुर्भिक्ष होते. त्यामुळेच मुंबईची पाणीकपात मागे घेण्याबाबत महानगरपालिका आयुक्त श्री. ज.मो.फाठक सावधगिरीची पावले टाकू पाहात होते. पण आयुक्तांची ही भूमिका नगरसेवकरूपी उथळ लोकप्रतिनिधींना अजिबात मान्य नव्हती. यावरून महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या भौगोलिक स्थानमहात्म्याची थोडासीही कल्पना लोकप्रतिनिधींना नसावी असाच निष्कर्ष काढता येतो.

महानगरपालिका आयुक्त ज.मो.फाटक यांनी वैतरणा (मोडकसागर) व तुलसी जलाशय भरून वाहू लागल्यावर बेभान न होता अत्यंत संतुलीत भूमिका घेत सद्यास्थितीत पाणीकपात रद्द करता येणार नाही अशी जाहीरपणे घेतलेली रास्त भूमिका तुलसी तलाव भरून वाहू लागताच हर्षाेत्फुल्ल होवून जल्लोष करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी दबाव आणून बदलायला लावली. पुढेमागे अपेक्षित पाऊस होईल का, भातसा व उर्ध्व वैतरणा जलाशय भरतील का याचा यत्किंचितही विचार न करता केवळ अविचाराने अन् घाईघाईने आयुक्तांवर राजकीय दबाव आणणाऱ्या लोकप्रतिनिधींचे केवळ नशिब बलवत्तर म्हणूनच वरूणराजा त्यांच्या मदतीला धावून आला अन् बृहन्मुंबईला पाणीपुरनठा करणारे भातसा - वैतरणासह सर्वच जलाशय पावसाळ्याअखेर भरून वाहू लागले आहेत. अन्यथा काय प्रसंग ओढवला असता याची नुसती कल्पनाही थरार निर्माण करणारी ठरली असती.

याची प्रचिती राजकीय दबावामुळे आयुक्तांना पाणीकपात रद्द करावी लागली त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच यायला सुरूवात झाली होती. पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय होवून 24 तास उचलण्याच्या आतच पावसाचा जोर कमी होवून पुन्हा एकदा पावसाने दडी मारली. पावसाच्या अनिश्चिततेचा हा खेळ यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यात सर्वत्रच चालू होता. अशा वेळी अधिक सावधगिरीने व डोके थंड ठेवून पावले टाकणे गरजेचे होते. आयुक्त अन् लोकप्रतिनिधींच्या हट्टाग्रही भूमिका अनूचित होत्या.

असे असले तरी मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला हे योग्यच झाले. दिवसागणिक वाढणाऱ्या लोकसंख्येने मुंबई शहराला धोक्याची सूचना यापूर्वीच देवून ठेवली आहे. या महानगराची तहान भागविण्यासाठी पाण्याचे नवे स्त्रोत शोधून काढण्याची अन् असलेले स्त्रोत तारतम्याने वापरण्याची नितांत गरज आहे. ठाणे जिल्ह्यातील मोरवाडा तालुक्यात शंभराहून अधिक मीटर उंचीच्या मध्य वैतरणा प्रकल्पाचे काम मुंबई महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या सहकार्याने हाती घेतले आहे. पण तेथेही चिनी तज्ञांना प्रकल्प उभारणीसाठी पाचारण करण्याच्या भूमिकेवरून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात लाथाळ्या चालू आहेत. या महानगराची वर्षाकाठी पाण्याची गरज 13 लाख दशलक्ष लिटर असताना आजमितीला सर्व जलाशयांतून मिळून एकत्रीतपणे जेमतेम 5 (पाच) लाख दशलक्ष लिटर पाण्याचा साठाच उपलब्ध आहे. हे विदारक सत्य विचारात घेवून राजकारण्यांनी संघर्षाची भूमिका न घेता हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न संपूर्णपणे तज्ञ अभियंते व प्रशासनावर सोपविण्याची सामंजस्याची भूमिका घेणे हेच मुंबईकरांच्या अंतिमत: हिताचे ठरणार आहे.

लोकप्रतिनिधी अन् तज्ञ तथा प्रशासक यांच्यातील पाण्याचे राजकारण लवकरात लवकर थांबून दोघेही विधायक सामाजिक भूमिका घेवून पुढे येणे ही यापुढे काळाची गरज असणार आहे.

जे मुंबईसाठी लागू आहे तेच अन्य सर्व शहरांसाठीच केवळ नव्हे तर राज्यासाठी अन् देशासाठीही लागू पडते हे राज्यकर्ते अन् जलतज्ञ अभियंते यांच्या जेवढे लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर पाण्याचे प्रश्न सुटण्यास मदत होवू शकेल.

पाण्याच्या राजकारणातून देश बाहेर पडेल तो सुदिन - एवढे सत्य सर्वांना उमगले तरी या लेखाचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

दीपनारायण मैंदर्गीकर, सोलापूर

Path Alias

/articles/raajakaarana-paanayaacaehai

Post By: Hindi
×