पवनामाई जलमैत्री अभियान एक विचार


आज भारतात कुठल्याही शहरात प्रवेश केला आणि नदीची अवस्था पाहिली तर फारच बिकट दिसून येते. त्या नदीला आपण देवी माता म्हणून संबोधतो ती जवळजवळ मृत झाली असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. ज्ञानदेवांनी त्यांच्या विचारात असे म्हटले आहे की पाण्याची ठेव एका पिढीने सांभाळून दुसऱ्या पिढीला परत देवून उतराई झाले पाहिजे. दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला दिली पाहिजे, असे पिढ्यान पिढ्या झाले पाहिजे. म्हणजेच माणूस समृध्द होईल

आज भारतात कुठल्याही शहरात प्रवेश केला आणि नदीची अवस्था पाहिली तर फारच बिकट दिसून येते. त्या नदीला आपण देवी माता म्हणून संबोधतो ती जवळजवळ मृत झाली असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. ज्ञानदेवांनी त्यांच्या विचारात असे म्हटले आहे की पाण्याची ठेव एका पिढीने सांभाळून दुसऱ्या पिढीला परत देवून उतराई झाले पाहिजे. दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला दिली पाहिजे, असे पिढ्यान पिढ्या झाले पाहिजे. म्हणजेच माणूस समृध्द होईल. माणूस माणसाला ओखळू लागेल व संस्कृतीचे जतन होईल. आज दूषित पाण्यामुळे शरिरास होणाऱ्या रोगाची यादी खूप आहे, या बद्दल सर्वांनाच जाणीव आहे. पण हे पाणी अयोग्य आहे ह्याबद्दल नगरपालिकेला दोष देवून आपण मोकळे होतो. वास्तविक पाहता शुध्द पाणी देणे ही जरी नगरपालिकेची जबाबदारी असली तरी त्यामध्ये आपण काही अंशी जबाबदार आहोतच. ह्या प्रश्नाकडे जर गांभीर्याने अथवा खोलवर जावून विचार केला तर ह्याचे उत्तर लगेच मिळते.

पाण्याचे प्रमुख स्त्रोत म्हणून जर पावसाकडे जरी नजर गेली तरी त्या पाण्याची साठवणूक व वाहतूक नदीतून होते. म्हणजेच पाण्याचा उपसा नदीतून केला जातो व शुध्दीकरण करून घरोघरी पोहचवले जाते, ही जरी गोष्ट आपणास माहिती असली तरी आपण नदीची खरोखर किती काळजी घेतो हे आपणास नदीकडे पाहिल्यावर चांगलेच जाणवते. आपला मानवी स्वभाव असा असतो की जोपर्यंत आपण कोठलीही गोष्ट बघत नाही तोवर विश्वास लगेच बसत नाही (English Proverb - Seeing is Believing) व जोवर प्रत्यय येत नाही तो पर्यंत त्यावर काही कार्य होत नाही. थोडक्यात आपण रस्त्यावरून जात असलो की रहदारीचा प्रत्यय येतो, त्याचे गांभीर्य कळून येते. ह्या विचारातून जलदिंडीची संकल्पना उदयास आली असावी. नदीतून जलदिंडीचा प्रवास करायचा व त्यामुळे तिच्या समस्या व त्याचे गांभीर्य कळण्यास मदत होते. दिंडी म्हणजे महाराष्ट्राची प्राचीन परंपरा ही वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाच्या ध्येयानी झपाटलेला असतो. हाच हेतू धरून जलदिंडी / जलमैत्री हा प्रवास जलमार्गाने म्हणजेच नदीतून एका विशिष्ट ध्येय घेवून केलेला प्रवास. जलदिंडी / जलमैत्री मधील तत्वज्ञान म्हणजे सामाजिक भान तर आहेच पण त्याच बरोबर शारीरिक व मानसिक विकास असे महत्वाचे पैलू आहेत.

पुराणात लोकजनन्य: नद्य: असे संस्कृत वाक्य आहे म्हणजे नदीचा गौरव करून नदीला लोकमाता म्हटले आहे. पण आज चित्र नेमके उलटे दिसते परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे याला लोकसंख्येचा विस्फोट, औद्योगिकरण, पाश्चात्य जीवनशैलीचे अंधानुकरण व अंधश्रध्दा असे अनेक घटक कारणीभूत आहेत. आजच्या नदीचे चित्र व सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे चित्र याच जमीन आस्मान इतका फरक आहे. ज्या नदीस आपण माता, आई म्हणतो ती आता आजारी झाली आहे. तिच्या या कारणास आपली पिढीच कारणीभूत आहे. आज गावोगावच्या नद्या सांडपाण्याच्या गटारी झालेल्या दिसतात.

वरील परिस्थितीचे स्वरूप बदलण्यासाठी डॉ.विश्वास येवले सरांनी जलदिंडीची अभिनव अशी संकल्पना तयार केली. याच विचारांनी प्रेरीत होवून पिंपरी चिंचवड मध्ये वाहणारी, उद्योग नगरीची जीवनदायनी असलेल्या अशा पवना नदीसाठी काही समविचार असणारे जलमित्र एकत्र आले. मार्च 2010 साली पहिल्या पवना जलमैत्रीचे आयोजन करण्यात आले. सुमारे 22 ते 25 जलमित्र एकत्र येवून पवना नदीच्या उगमस्थानाचा शोध सुरू झाला. लोणावळ्यापासून सुमारे 10 ते 12 कि.मी अंतरावर तिकोणा किल्ला असून, आटवन गावाजवळ नदीचा काठ संपतो व नंतर 8 ते 10 कि.मी गिर्यारोहण करीत सोनजाई देवीचे मंदिराजवळ नदीचा उगम आढळला. उगमापाशी नदीचे रूप व पाणी अतिशय सुंदर, स्फटिकासारखे होते. उगमस्थानापासूनचा प्रवास अवर्णनीय असतो.

वारा, आकाश व पाणी या पंचमाहाभूतांपैकी असलेल्या त्रयींचे सुंदर असे निर्व्याज रूप आपल्याला आनंद देवून जाते. पवना धरणात प्रवेश करताच जलाशयाच्या भव्य स्वरूपाने आपण भारावून जातो. पण जशी नदी शहरात प्रवेश करते, नदीचे बदलते असे स्वरूप बघून मन विषण्ण होत जाते आणि नदी विषयी काळजी वाटत मन अंतर्मुख होते. पहिल्या जलमैत्रीच्या प्रवासातील आम्ही साऱ्या वारकऱ्यांच्या मनाची अशीच स्थिती होती. सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली व मनामध्ये नदी प्रदूषणाविषयी कळकळ निर्माण झाली. अशा रितीने 'पवना जलमैत्री अभियान' उपक्रमाची सुरूवात झाली. पाण्याविषयी भक्ती पाण्याशी मैत्री ह्या वाक्याने बऱ्याच संस्था तसेच महत्वाच्या व्यक्ति पवना जलमैत्री अभियानामध्ये बांधल्या गेल्या.

जलदिंडी व पवनामाई उत्सव या सारख्या उपक्रमामुळे संपूर्ण पवना नदी खोऱ्यातील जनसमुदयाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व उपक्रमामुळे नदी शुध्द व पवित्र राखणे व हे सर्व सकारात्मक लोकसहभागामुळे शक्य होणार आहे. जलदिंडीच्या प्रवासात आपण थेट नदीच्या उगमापासून ते पवित्र तिर्थक्षेत्र मोरयागोसावी समाधी स्थान चिंचवडपर्यंत प्रवास करतो. हा सर्व प्रवास करताना चर्चा, भजन, किर्तन, माहितीपट, फलके अशी आधुनिक लोकशिक्षणाची साधने वापरत आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण व स्वास्थ्य, पर्यावरणाची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. या जलमैत्रीला पवनामाई महोत्सव असे उपक्रम जोडले गेल्यामुळे त्यास जनसागराचा पाठिंबा मिळत आहे.

दर वर्षी पवनामाईच्या उत्सवाचे निमित्त साधून पवना नदीवर जलमैत्रीचे आयोजन 20 ते 21 डिसेंबर रोजी करीत असतो. या जलमैत्रीच्या निमित्ताने सकारात्मक स्वास्थ्य पर्यावरण अध्यात्म विज्ञान आणि संस्कृती यांची सांगड घालण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.

श्री राजीव भावसार, पुणे

Path Alias

/articles/pavanaamaai-jalamaaitarai-abhaiyaana-eka-vaicaara

Post By: Hindi
×