पूर रेषा : जलशास्त्रीय दृष्टिकोण


आता सांगा मी माझे घर कसे दुरूस्त करू ते


बांधकाम किंवा भौत्तिक रचनात्मक कामा व्यतिरिक्त उपायामध्ये पूर मैदान विभागीकरण, पूराचे भाकित करणे आणि चेतावणी देणे, पूराशी संघर्ष, शक्यतो पूर रोधक बनवणे, पूराचा विमा काढणे, मदत कार्य अणि पुनर्वसनात सहभागी होणे. पूर सुरू असतानाच भविष्यातील पूर स्थिती समजावून घेण्यासाठी त्याच्यातील पाण्याची पातळी उंची आणि पाण्याचे आकारमान यांचे मोजमाप करणे आणि त्यावरून भविष्यातील अंदाज बांधणे. हा खरे तर बांधकामाशिवायचा प्रभावी उपाय आहे.

मला माझ्या घराचा वरचा मजला वाढवायचा आहे. 2005 च्या पूरात माझ्या घरात आठ फूट पाणी होते.
कार्पारेशनचे काय हो ! घेतला नकाशा - फूटपट्टी, आणि मारली पूर रेषा !
 

नागरिकांचे काही कां होईना !


अशा प्रतिक्रिया ज्या ज्या शहरात शासनाने पूररेषा संबंधी निवेदने जारी केली आहेत, त्या त्या प्रत्येक शहरातून ऐकायला येत आहेत. मुळात पूर रेषा म्हणजे काय आणि ती कशी ठरवली जाते, हेच माहित नसल्यामुळे अशा प्रतिक्रिया उमटत असतात. सर्व सामान्य नागरिकाला असे वाटत असते की महानगरपालिकेतील नगरसेवकांना आणि कर्मचाऱ्यांना मलिदा खाण्याची सोय करण्यासाठीच पूररेषेचे झेंगट निर्माण केले आहे.

वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी पूर रेषेची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे बरेच गैरसमज दूर होवू शकलीत. हा विषय आहे भूपृष्ठजल भूशास्त्र विषयाचा.

भूपृष्ठजल - भूशास्त्र भूपृष्ठावरील जल ते नदी - तलाव यातील पाण्याचा स्त्रोत असते किंवा भूपृष्ठावरून वहात असते- त्या पाण्याच्या वहन प्रक्रियेचा शास्त्रोक्त अभ्यास करणारे विज्ञान आहे. हे शास्त्र आहे नैसर्गिक आणि मानव विकसित भूपृष्ठ जल गुणधर्मांचा अभ्यास करणारे. भूपृष्ठावरील पाण्याचा साठा, बाष्पीभवन, जमिनीत मुरणे, सरळ प्रवाह, दरीचे गुणधर्म, पूर आणि अवर्षण, वहन आणि पायाभूत प्रवाह यांचा अभ्यास यात केला जातो. जलविज्ञान हवामान शास्त्राबरोबर पाऊस आणि बाष्पीभवन यांचाही अभ्यास करते.

सद्यस्थितीत पूरापासून निर्माण होत असलेले वादग्रस्त प्रदेश आणि होत असलेले वाढते नुकसान, यानी शास्त्रीय पध्दतीने परिस्थितीचे विश्लेषण आणि आकलन करण्यासाठी जलविज्ञानाची नवीनवी तंत्रे वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.

जलविज्ञानाच्या अभ्यासात भूरूपशास्त्राचा अभ्यास अत्यंत आवश्यक ठरतो. कारण नदी आणि तिची दरी ही भूरूपेच आहेत. त्यामुळे नदीला समजावून घ्यायचे असेल तर तिच्या दरीला समजावून घेतले पाहिजे. तरच आपल्याला नदीच्या भूशास्त्रीय कार्याची खरी ओळख होईल. कारण नदीच्या पात्राची आणि दरीची पाण्याने झीज किंवा भर पडल्यानेच आजची स्थिती तयार झालेली असते. म्हणेच नदी, दरी आणि त्यातून वाहणारे पाणी यांची रूपे आणि त्यातील बदल हे त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर, त्याच्या आकारमानावर, वेगावर आणि वेळेवर अवलंबून असतात. आता हे पाणी येते कोठून त्याचा थोडा विचार करू.

हे सर्व भूपृष्ठ जल पावसाच्या रूपाने जमिनीवर येत असते. शाळेत मुलांना नेहमी जलचक्र शिकवले जाते. ते लहानपणी सर्वांनाच चांगले अवगत असते. पण आपण जसजसे मोठे होवू लागतो तसतसे त्यातले विज्ञान विसरायला लागतो आणि लक्षात रहाते ती वरवरची कृति. समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते, ती आकाशात उंचउंच जाते, तेथे थंड हवा लागल्याने त्यांचे ढगात रूपांतर होते आणि पाऊस पडतो. किती सोपे नाही पाऊस पडण्याची क्रिया इतकी सोपी असती तर, किती बरे झाले असते, नाही ! पण , तसे ते इतके सोपे नाही. कारण सरळ वाफ आकाशात जाऊन थंड होवून पाऊस सरळ खाली पडण्याची प्रक्रिया असती, तर मान्सून कधीच तयार झाला नसता. कारण आपल्याकडे जो पाऊस पडतो तोच मुळी हिंद महासागराचे जे जल 20 अंश ते 40 अंश अक्षांश दक्षिण या पट्ट्यात दक्षिण गोलार्धात आहे त्याचे बाष्पीभवन झाल्याने बनलेल्या ढगांपासून पडतो.

पावसाचे सर्वच पाणी भूपृष्ठावरून वाहात जात नाही. त्यातील पाण्याचा जो भाग भूपृष्ठावरून वाहिल्याने जलप्रवाह तयार होतात. जलप्रवाह असे पाणी की जे जमिनीत न मुरता किंवा त्याचे बाष्पीभवन न होता जे लहान धारेच्या किंवा मोठ्या धारेच्या रूपाने जमिनीवरून वाहत असते. सुरूवातीला पहिल्या पावसापासून ते जमिनीवरून एका आच्छादनाच्या रूपाने म्हणजे पाण्याच्या चादरीच्या रूपाने जमिनीवरून वाहते. नंतर ते एकत्रीत येवून धारेच्या रूपाने वाहू लागते. शेवटी या धारांचेच रिल्स, गलीज, लहान ओहळ, नाले, छोट्या उपनद्या, नद्या आणि मोठ्या मुख्य नद्यांमध्ये होते. जमिनीवरचा जलप्रवाह, जमिनीखालचा भूजलप्रवाह असे त्याचे प्रमुख वर्गीकरण केले जाते. जलप्रवाहाला पावसाचे जे पाणी मिळते त्या पावसाच्या भागाला परिणामकारक पाऊस म्हणतात. हा एकूण पावसाच्या केवळ 40 ते 45 टक्के असू शकतो. हाच नदी - नाल्यांचा आणि भूजलाचा प्रमुख जलस्त्रोत असतो.

जलप्रवाहातून किती पाणी ठराविक वेळात वाहून जाते हे खालील सूत्रावरून सांगितले जाते -

वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण उ क्षेत्रफळ ज्र् पाण्याचा वेग (क्यु.मीसेकंद)

वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण तेव्हाच वाढते जेव्हा त्या नदीच्या पाणलोट क्षेत्रात जास्ती पाऊस पडतो, किंवा तिच्या उप नदीकडून जास्ती पाणी पुरवठा होतो किंवा त्यात झऱ्याच्या रूपाने भूजल मोठ्या प्रमाणात मिसळते.

आता तुम्ही म्हणाल की कळलं सगळं, पण याचा पूररेषेशी संबंध काय याचाच तर पूर रेषा तयार होण्याशी संबंध आहे. इथे आपण सरळ नदीचेच उदाहरण घेवू, म्हणजे माझे म्हणणे तुमच्या लक्षात येईल. नदीची सुरूवात कधीही डोंगराच्या एकदम माथ्यावर होत नाही. माथ्याच्या जरा खालच्या भागातून प्राथमिक प्रवाहाची सुरूवात होते. दोन प्राथमिक प्रवाह एकमेकांना मिळून दुय्यम प्रवाह तयार होतो. हा छोटा नाला, तर दोन दुय्यम प्रवाह एकमेकांना भेटतात तेव्हा तृतीय जलप्रवाह तयार होतो. हाच मोठा नाला होय. जेव्हा दोन किंवा अनेक प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय नाले एकमेकांना मिळतात तेव्हा छोटी उपनदी तयार होते. पुढे यातील एक उपनदी प्रमुख नदी बनते आणि तिला अनेक उपनद्या मिळत जातात. अगदी ती समुद्राला मिळेपर्यंत. तेव्हा जलप्रवाहाचा विचार करताना संपूर्ण नदीचा विचार केल्यास तिचा व पूररेषेचा संबंध व्यवस्थित समजेल.

कोणत्याही नदीला मनुष्यासारखेच जीवनचक्र लाभलेले असते.जन्मतच ती बाल्यावस्थेत असते. नंतर तारूण्यावस्थेत प्रवेश करते मग गृहस्थाश्रमांत येते. शेवटी तिला वृध्दावस्था प्राप्त होते. या अवस्था नदीच्या विकासाशी आणि तिच्या भूवैज्ञानिकी कार्यशक्तीशी निगडित आहेत. प्रत्येक नदी या वर नमूद केलेल्या - बाल्यावस्था, तारूण्यावस्था, गृहस्थावस्था आणि वृध्दावस्था - चार एकापेक्षा अधिक अवस्थेत असणार. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे मनुष्य काळ जाईल तसा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करतो. उदा. तो बाल्यावस्था पूर्ण करून तारूण्यावस्थेत येतो, त्यातून पुढे काळाबरोबर गृहास्थावस्थेत जातो, शेवटी वृध्द होतो. पण मनुष्य कधीही एकाच वेळी दोन किंवा अधिक अवस्थेत असू शकत नाही. नदी मात्र एकाच वेळी या चारही अवस्थेत असू शकते. कारण नदीच्या या सर्वच अवस्था एकाच वेळी तिच्या डोक्यापासून ते मुखापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी अस्तित्वात असतात. डोक्याजवळ ती बाल्यावस्थेत तर मुखापाशी ती वृध्दावस्थेत असू शकते.

इथे अगदी ताजे उदाहरण आहे केदारनाथचे. त्या नदीला पूर क्षेत्रच नाही. नदीचे पात्र कित्येक हजार फूट खोल आहे, संपूर्ण केदारनाथ गावच, नदीच्या अरूंद पात्रातच वसले आहे, त्यातील केदारनाथाच्या मंदिरासकट. त्यामुळे पूर आला तेव्हा हाहाकार माजला. हजारोंना आपले प्राण गमवावे लागले.

आपण निर्माण केलेल्या देवाच्या संकल्पनेपेक्षा निसर्ग मोठा आहे. या जगाची रहाटी केवळ निसर्गाच्या नियमानुसारच चालणार. निसर्गापाशी दया, माया, कींव नाही, क्षमा तर मुळीच नाही. तुम्ही त्याच्या वाटेत आला की त्याचा कहर झालाच म्हणून समजावे. तो एकदम हल्ला बोलत नाही. आपल्याला प्राथमिक सूचना देत असतो. सावधही करत असतो. पण आपण त्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्याचे प्रायश्चित भोगतो.

तेव्हा जर आपले गाव तारूण्यावस्थेतील नदी पात्रात वसलेले असेल, दरी खूप खोल असेल, पूर क्षेत्र अजिबात नसेल आणि दरवर्षी जरी नाही तरी जेव्हा कधी पूर येईल तेव्हा मालमत्तेची आणि जीविताची हानी होण्याची शक्यता अधिक असते. जर तुमचे गाव नदी पात्राच्या काठावर पूर रेषेच्या वर असेल तर धोका अगदीच क्वचित अनुभवास येईल. कदाचित आपली घरे खूपच जुनी असतील आणि बांधली त्यावेळी पात्राबाहेर होती पण आता नदीने पात्रच बदलले असेल आणि घरे पाण्याने वेढत असतील तर, नुकसानीचा धोका आहे. तारूण्यावस्थाही जेथे नदीचा उतार तीव्र असतो अशा सुरूवातीच्या डोंगराळ भागातच असते. या भागात नदी खोऱ्याचा आडवा छेद इंग्रजी ' व्ही ' अक्षराप्रमाणे दिसतो. इथे नदीची कार्यशक्ती प्रचंड असते.

नदी जेव्हा तुलनेने सपाट प्रदेशात येते तेव्हा तिचे पात्र रूंद व्हायला सुरूवात होते. ही नदीची गृहस्थावस्था असते. या टप्प्यावर नदी मोकळ्या मैदानी प्रदेशातून वाहते. स्वतच्या गाळानी तयार झालेल्या 'पूर मैदानातून' नागमोडी वाहते. त्यामुळे तिचे भूवैज्ञानिकी कार्य दोन प्रकारे होवू लागते. एक म्हणजे अपक्षयाचे कार्य ज्यामुळे नदी दरी - दुभाजकांना एकमेकांपासून दूर लोटते, म्हणजेच नदीचे दोन्ही बाजूचे दुभाजक ती मागे रेटतेच, पण त्याचबरोबर त्यांची उंची कमी कमी करत रहाते. यासाठी नदीला नागमोडी मार्ग (मियांडरींग पाथ)' पत्कारावा लागतो. या भागात नदी अपक्षय करतेच पण त्याचबरोबर तात्पुरते गाळ संचयनही करते. त्यामुळे नदीपात्रात गाळ साचून 'पूरमैदान' तयार होते.

लष्करातील अभियंत्यांनी नदी कशी वाहते. तिचा मार्ग नागमोडी का होतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना असे आढळले की नदीचे पात्र कितीही गुळगुळीत असले तरी पाण्याचा प्रवाह लॅमेलर (सरळ रेषेत) न रहाता टर्बुलन्ट (वाकडा तिकडा किंवा नागमोडी) होतो. कारण पात्राच्या बाजू आणि तळ जरी सपाट गुळगुळीत असले तरी पाण्याचे स्वतचे कण एकमेकांना थडकून त्यांच्यात त्यांचा स्वतचाच अडथळा निर्माण होतो. त्यांचा प्रवाह सहाजिकच लॅमेलर - म्हणजे सरळ रेषेत न रहाता (टर्बुलन्ट) वेडावाकडा, नागमोडी होतो. सहाजिकच नदी नागमोडी वाहते.

दोन दुभाजकामध्ये (डिव्हाईड्), पूरक्षेत्राच्या मध्यावरून, छोट्या चॅनल मधून नदी वाहत असते. पण हे नदीचे खरे पात्र नव्हे. हा केवळ नदीचा जलप्रवाह आहे. याला इंग्लिश मध्ये 'रिव्हर चॅनल' असे म्हणतात. खरे नदी पात्र हे, एका दुभाजकापासून दुसऱ्या बाजूच्या दुभाजकापर्यंत पसरलेले नदी खोरे होय. त्यामुळे नदीच्या या भागात 'दुभाजक - बजाडा - नदीपूर क्षेत्र - नदी जलप्रवाह - नदी पूर क्षेत्र - बजाडा - दुभाजक' असा पात्राचा विस्तार असतो. या ठिकाणी नदीखोरे रूंद आणि मंद उताराचे असते. त्याचा आडवा छेद इंग्रजी 'यु 'अक्षराप्रमाणे दिसतो. त्यामुळे पावसाच्या प्रमाणाप्रमाणे नदीतून वाहात आलेले पाणी सर्व खोरेभर पसरते. नदी काठावरची बहुतेक गावे नदीपासून थोडी लांब वसवली गेली. त्याचे कारणच पुराचा धोका टाळणे हा होता. पण अलीकडे जागेअभावी ओहळ, नाले बुजवून, नदीचे पूर क्षेत्र आहे हे माहित असूनही लोक सखल भाग असला तरी तेथे बांधकामे करत आहेत. त्यामुळे जीवित हानी मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. हे सर्व थांबावे, नुकसान टाळावे आणि मनुष्य हानी होवू नये म्हणून सरकारने या नदी पूर क्षेत्रात आणि नदी चॅनलमध्ये लोकांनी वसाहती करू नये. त्या क्षेत्राच्या बाहेर त्यांनी जावे म्हणून पूररेषा नियंत्रण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नदीचा चौथा टप्पा हा वृध्दाश्रमाचा. यात नदीची भूवैज्ञानीकी कार्यशक्ती अगदीच क्षीण झालेली असते. या भागात नदीचे दोन्ही बाजूचे दुभाजक पूर्णपणे नाहीसे झालेले असतात. नदीचे संपूर्ण खोरे पूर मैदान झालेले असते. नदीचे पात्र शेकडोपटीने मोठे झालेले असते. नदीचा प्रवाहही एखाद्या समुद्रासारखा भासू लागतो. या भागात वसलेली गावे ही नदीच्या पूर मैदानातच असतात. त्यात नदीच्या मुखाशी त्रिभूज प्रदेश तयार झाला असेल तर तो सर्व भागच पूर मैदान असतो. इथे नदी समुद्राला अनेक प्रवाहाच्या रूपाने भेटत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रम्हपुत्रा आणि गंगा नद्यांची मुखाकडील बाजू. संपूर्ण बांगला आणि सुंदरबन प्रदेश त्रिभूज प्रदेश आहेत. तेथे दरवर्षी नदी आपले प्रवाह बदलत असते. त्यामुळे तेथील सर्व गावे दरवर्षी पूराच्या तडाख्यात सापडतात. लाखो लोक बेघर होतात. हजारो प्राणाला मुकतात. तरीही लोक त्या भागात रहातच असतात.

इ.स. 2 शतकात दक्षिण भारतात चोला राजांचे राज्य होते. त्यांची राजधानीचे शहर होते पुंपुहार. हे शहर होते कावेरी नदीच्या मुखापाशी. पण ते शहर त्याच काळात समुद्रात बुडाले कारण ते त्रिभूज प्रदेशात असल्याने कावेरी नदीला आलेल्या पुरामुळे त्याचा ढिसूळ पाया पाण्याबरोबर वाहून गेला आणि शहराला जलसमाधी मिळाली. नंतर चोलानी आपली राजधानी तंजावरला हालवली.

त्यामुळे पूररेषेचा विचार करताना नदी खोऱ्याचा विचार केलाच पाहिजे. आपण ज्या शहरात रहातो ते शहर नदीखोऱ्याच्या कोणत्या अवस्थेत आहे - बाल्यावस्थेत, तारूण्यावस्थेत, गृहस्थावस्थेत की वृध्दावस्थेत. बाल्यावस्थेत पूर रेषेचा प्रश्नच नाही. अनेक गावांच्या आणि शहरांच्या मधून अनेक छोटेमोठे नाले आणि छोट्या नद्या वाहत असतात. जी शहरे नाल्यात किंवा नदी प्रवाहातच वसली आहेत त्यांना दरवर्षी किंवा काही वर्षातून एकदा तरी पूर आपत्तीला सामोरे जावे लागणार. पूर कधी आणि किती मोठ्या प्रमाणात येणार हे आता हवामान खात्याच्या अभ्यासावरून माहीत करून घेता येते. त्यामुळे भूवैज्ञानिकी - जलविज्ञानाच्या आधारे आपण पूरापासून होणारे नुकसान टाळू शकतो किंवा कमी तरी करू शकतो.

नदीसुध्दा खूप वर्षे भूवैज्ञानिकी कार्य करत असते. नदीचे आयुष्य हे कित्येक कोटी वर्षे असते. तिचे कार्य संथ गतीने चालत असतेच, पण कधीतरी भरपूर पाऊस पडल्याने अचानक भरपूर जल आकारमान (पाण्याचा व्हॉल्युम) उपलब्ध झाल्यामुळे काही वेळा अपक्षयाची प्रक्रिया वेगाने होताना दिसते. पण हे दरवर्षी होत नसल्याने ती घटना आपल्या समोर घडल्यास आपल्याला धक्का बसतो. नदी विकास हा संथ गतीनेच अधिक होतो. पण त्या मधल्या कोटीकोटी वर्षांमध्ये काही वेळा मध्येच सगळा भूभागच भूकवच वहन तांत्रिकी (प्लेटटेक्टॉनिक्स) मुळे उचलला जातो आणि नदी खोरे त्याच्या सद्य स्थितीतून माघार घेते आणि अगोदरच्या स्थितीला जाते. म्हणजे वृध्दाश्रम स्थितीतील नदी खोरे गृहस्थाश्रम स्थितीत आणि गृहस्थाश्रम स्थितीतील नदी खोरे तारूण्यावस्थेतील नदी खोऱ्यात परावर्तीत होते. इथे नदीचा 'कायाकल्प' होतो आणि नदीने हरवलेली भूवैज्ञानीकी कार्यशक्ती तिला परत मिळते. सहाजिकच नदी आता खनन कार्यही जोरात करू लागते.

याचा परिणाम असा होतो की नदी चॅनल अधिकाधिक खोल होवू लागते. पूर मैदाने उंचावू लागतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतील कोलोरॅडो नदी खोरे होय. ही जमीन उंचावण्याची क्रिया वारंवार किंवा अनेक वार घडल्यास नदी खोरे अनेक पूर मैदानांनी (टेरेसेसनी) तयार झाल्यासारखे दिसेल. या टेरेसना नदी पट्टा असे म्हणतात. पण असे पट्टे नदीच्या चारही अवस्थामध्ये आढळतात. यामध्ये सर्वात तरूण पट्टा नदी चॅनलच्या दोन्ही बाजूंना असतो. त्याच्यापेक्षा वयस्क पहिल्यांच्या बाजूला, तर सर्वात वयस्क दुसऱ्याच्या बाहेरच्या बाजूला सर्वात उंचीवर असतो. नदीपट्ट्यांची संख्या ती दरी किती वेळा कायाकल्पित झालीआहे - म्हणजे किती वेळा उचलली किंवा खचली गेली आहे - यावर अवलंबून असते. एकदा उचलली गेल्यास किंवा खचल्यास एक नदी पट्टा, दोन वेळा उचलली गेल्यास किंवा खचल्यास दोन नदी पट्टे असे विकसित होतात. तेव्हा एखाद्या नदीला चार नदी पट्टे असतील तर ते नदी खोरे चार वेळा उचलले किंवा खचले गेले असू शकते.

त्यामुळे पूर क्षेत्र व्यवस्थापन आणि विभागवारीप्रमाणे नदीखोऱ्याचा जो भाग नदी चॅनलमध्ये आणि सर्वात तरूण पट्ट्याचा असतो तो वसाहत, बांधकाम यासाठी 'प्रतिबंधात्मक' म्हणून जाहिर केला जातो. त्याच्या बाहेरच्या चॅनलच्या दोन्ही बाजूचा दुय्यम पट्ट्याचा भाग 'नियंत्रित' म्हणून घोषित केला जातो. तर सर्वात बाहेरचा सर्वात उंच पट्टा भाग 'वसाहतीसाठी' म्हणून जाहीर करतात. पण हा भागही धोकादायक आहे याची जाणीव करून दिलेली असतेच. कारण हा जो सर्वात उंच तिसरा जल पट्टा आहे त्या भागातही पूर येतो, पण तो 100 वर्षातून एकदाच. पण याचा अर्थ असा नव्हे की गेल्या वर्षी आला म्हणून या वर्षी येणारच नाही. सलग दुसऱ्या वर्षीही येऊ शकतो. दुय्यम नदीपट्टा भागात 10 वर्षातून एकदा पूर येत असतो. पण काही वेळा सलग तीन - चार वर्षे पाऊस चांगला झाला, तर सलग तीन चार वर्षेही या दुय्यम नदीपट्टा भागातही पूर येऊ शकतो. सर्वात तरूण पहिल्या नदी पट्टा भागात तर दर वर्षीच पूर येत रहाणार कारण हा भाग म्हणजे नदी चॅनल जलप्रवाह क्षेत्र म्हणून या भागात वसाहतीस आणि बांधकामास मनाई करण्यात आलेली असते.

लोकांना सातत्याने पूराची महिती देण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पावसाच्या नोंदी अचूक आणि नियमित ठेवाव्या लागतात. भूपृष्ठजल पुरवठा सर्वेक्षण अहवालामध्ये जलभूवैज्ञानिकी सर्वेक्षण 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर मुदतीत करतात. हा 12 महिन्याचा काळ असतो. याला जलवर्ष म्हणतात. हे वर्ष ज्या कॅलेंडर वर्षात संपते त्या वर्षाचे ते जलवर्ष संबोधले जाते. उदा. सप्टेंबर महिना 2013 सालातील असेल तर हे जलवर्ष 2013 असे धरले जाते. नदी, कॅनॉल, तलाव किंवा धरणाचे थारोळे या ठिकाणी एक सोयीस्कर कमी पातळीची जागा निवडतात. तेथे पाण्याची पातळी मोजण्याची सोय केली जाते. त्याची नियमित नोंद ठेवली जाते. यालाच जलप्रवाह नोंदी केंद्र (रिव्हर गेजिंग स्टेशन) म्हणतात.

पूर नियंत्रण आणि व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. त्यासाठी पुढील प्रमाणे उपाय केले जातात.

1. बांधकाम युक्त उपाय - पूरापासून लोकवस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी भौक्तिक रचना करणे.
2. बांधकाम किंवा भौत्तिक रचनात्मक कामा व्यतिरिक्त उपाय - लोकप्रबोधन, शिक्षण, जाणीव , जागृती यासाठीचे उपाय.

बांधकाम किंवा भौत्तिक रचनात्मक उपायामध्ये धरणे आणि जलाशय मातीचे बांध, पात्रातील अडथळे दूर करणे. शक्य असल्यास नदीचे पात्र वळवणे. एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी पाठवणे, काठाचा अपक्षय क्षरण थांबवणे.

बांधकाम किंवा भौत्तिक रचनात्मक कामा व्यतिरिक्त उपायामध्ये पूर मैदान विभागीकरण, पूराचे भाकित करणे आणि चेतावणी देणे, पूराशी संघर्ष, शक्यतो पूर रोधक बनवणे, पूराचा विमा काढणे, मदत कार्य अणि पुनर्वसनात सहभागी होणे. पूर सुरू असतानाच भविष्यातील पूर स्थिती समजावून घेण्यासाठी त्याच्यातील पाण्याची पातळी उंची आणि पाण्याचे आकारमान यांचे मोजमाप करणे आणि त्यावरून भविष्यातील अंदाज बांधणे. हा खरे तर बांधकामाशिवायचा प्रभावी उपाय आहे. केंद्रीय जल आयोगाने सन 1958 मध्ये यमुना नदी संबंधात याची सुरूवात केली. त्याचे पहिले फोरकास्टींग स्टेशन, दिल्ली रेल्वे ब्रिज दिल्ली येथे आहे. सध्या देशभर त्याचे जाळे पसरले असून एकूण 159 स्टेशन्स स्थापण्यात आली आहेत.

मोठी आणि मध्यम आकारीच धरणे खरं तर पूर नियंत्रण करण्यासाठी बांधलेली असतात पण आता असा अनुभव येत आहे की सरासरी इतका पाऊस झाला तरी अभियंत्यांच्या मानसिकतेमुळे 56 टक्के धरण भरले असतानाही धरणाचे दरवाजे उघडून धरणाखालच्या गावातून पूर परिस्थिती निर्माण केली जात आहे. हे केवळ अभियंत्यांना धरणाच्या सुरक्षेची खात्री नसल्यानेच घडत आहे असे सर्व सामान्यांना वाटत असते.

शासकीय पातळीवर काही उपाय करण्यात येत असले तरी लोकांनी स्वतच स्वतच्या जीवाची आणि मालमत्तेची काळजी घेणे गरजेचे आहे. आज जरी आपले फार काही नुकसान होत नसले तरी भविष्यात कोणी सांगितले आहे तुमचे घर तुम्ही तुमच्या दृष्टीने मजबूतच बांधता पण, त्यावर किती मोठ्या आकारमानाच्या पाण्याचा मारा करायचा हे ना तुमच्या हातात आहे ना नदीच्या, ते आहे अवलंबून पावसाच्या. त्याने कधी आणि किती पडावे हे कुणीच सांगू शकत नाही. तेव्हा नदीच्या वाटेतून आपण बाजूला व्हावे, यातच शहाणपण आहे.

प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे, कोल्हापूर, मो : 08308001113
 

Path Alias

/articles/pauura-raesaa-jalasaasataraiya-darsataikaona

Post By: Hindi
×