पथदर्शी दिवे


खाजगीकरण म्हणजे वाईटच असे एक मत आपल्या नव्या जमान्यात रूढ होऊ पहात आहे. खाजगीकरण म्हणजे प्रचंड भांडवल आणि इतरांचा काहीही विचार न करता कमावलेला गडगंज नफा हे चित्रही दिसते. त्यामुळे ह्या खाजगीकरणाला होणारा प्रचंड विरोधही लक्षात येतो. पाण्याची गरज वाढली आहे, पुरवठा तेवढाच आहे. अशावेळी समव्यायी वाटप आणि सामाजिक जाणिवा ह्या गोष्टी मला तरी खूप महत्वाच्या वाटतात. आणि अशा लाभार्थींच्या माध्यमातून त्या त्या समाजापुरते खाजगीकरण असे स्वरूप त्याला दिले तर अनेक कठीण प्रश्न हे मोठ्या प्रमाणावर सोपे होऊ शकतात असा माझा विश्वास आहे.

पाण्याचा प्रश्न आणि त्याच्या खाजगीकरणातून हा प्रश्न सोडविण्याचे जगभर सुरू आसलेले प्रयत्न, त्याचे तोटे आणि फायदे ह्यावर जगभर सर्वत्रच एक चर्चा वेगवेगळ्या रूपाने होत आहे. हा प्रश्न आजच उद्भवला आहे का ? पूर्वीच्या काळी असा प्रश्न कधीच पडला नव्हता का ? जरा शोध घेऊ या....

खासगीकरण हे नाव नसेल पूर्वीच्या काळी, नव्हतेच, पण उद्देश तोच होता. पाणी उपलब्ध करून घेणे, त्या पाण्याचे योग्य रीतीने वाटप करणे आणि उपलब्ध पाण्याचा चांगल्यारीतीने वापर करणे. त्यासाठी गेल्या फक्त एक हजार वर्षांचा आढावा घेतला तरी असे आढळते की देशभर वेगवेगळ्या भागात सुमारे 100 पेक्षाही अधिक अशा जलसंधारणाच्या पारंपारिक पध्दती होत्या. त्याही जरा वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या पध्दतीची नोंद बघूया. भारतभर विविध राज्यांमध्ये विखुरलेल्या ह्या चौतीस पध्दती विशेष नोंद घेण्यायोग्य वाटतात.

1. जम्मू - काश्मीर - कुल
2. हिमाचल प्रदेश - कोहल
3. उत्तर प्रदेश - इटयवेपुरा
4. बिहार - आहर, पिने
5. बंगाल - खारट पाण्यावर गोड्यापाण्याचे साठवण, ओव्हर फ्लो (ही पध्दत ओरिसा व बिहार मध्येही)
6. मेघालय - बांबूच्या वापर करून पाण्याचे वहन व ठिबक सिंचन
7. नागालँड - झाबो, अंगामी
8. आंध्रप्रदेश - पलार, वाळूची धरणे (ही पध्दत तामीळनाडू व केरळातही)
9. तामीळनाडू - एरी
10. केरळ - पल्लीयार, सुरूगेम्
11. कर्नाटक - कट्टे, कुंटे, केरे इ
12. गोवा - खजाना
13. महाराष्ट्र - फड, मालगुजारी तलाव, खजीना विहीर, पाट (ही पध्दत मध्यप्रदेशातही)
14. गुजराथ - वीरदा
15. मध्यप्रदेश - हवेलर्ट, फट, मुंड
16. राजस्थान - जोहड तोबा खदीन, कुंड, रपट, जलाशायांतर्गत विहीर
17. अंदमान निकोबार - बांबूंचे पाट
18. सिंध - बलुचीस्थान - गबरबंड

एकमेकांपासून प्रचंड भौगोलिक अंतर तसेच वेगवेगळ्या स्वरूपाचे हवामान, वातावरण, पाण्याची उपलब्धता, तापमान ह्यामुळेच स्थानिक गरजांनुसार त्या त्या वेळच्या माणसांनी ह्या वेगवेगळ्या अशा पध्दती विकसित केल्या.

माझ्यासमोरचा मुख्य प्रश्न आहे तो असा की त्या इतकी वर्षे कशा टिकल्या ? त्या मागचे रहस्य काय ? सर्वच पध्दतींना इतकी वर्षे टिकून रहाण्यासाठी काही समान दुवा होता का ? असलाच तर तो कोणता ? आजची त्यांची स्थिती काय ? कालानुसार बदल होणे किंवा जुने जावून त्याची जागा नव्याने घेणे हा तर निसर्गाचा नियमच आहे. त्याबद्दल खूप वाईट वाटून घेऊन पूर्वजांचे गोडवे गात बसणे ह्यात मोठेपणा नाही. असे असूनही आज हा आढावा घ्यावासा वाटतो. त्यामागे दीर्घकाळ टिकून रहाण्याची ह्या सर्व पध्दतींमागची क्षमता हे फार मोठे कारण आहे.

मला शोध घेतांना आढळलेला समान दुवा म्हणजे ह्या सर्व पध्दतींमध्ये देखभाल, वाटप ह्या सर्वांमध्ये लाभाथीर्ंचा सरळ सहभाग होता, जलसाठा निर्माण करणे हे आर्थिक गुंतवणुकीचे काम असल्याने ते करणे अनेकदा हे त्या त्या गावकऱ्यांचे काम नव्हते. ते राजा, सरदार, कुणातरी पुण्य कमावू इच्छिणारा माणूस (पाणी जनतेला उपलब्ध करून दिले तर ते पुण्याचे काम.... सरळ स्वर्गाचे दार उघडते ही समजूत) हे करीत काहीवेळा ज्यांना हे काम करता येते आणि नंतरचे पाणी वापरून सुबत्ता निर्माण करता येते अशा समाजाची मंडळी हे काम करीत. (उदा. पांझरा नदीवरील अनेक फड पध्दतीचे बंधारे हे जिरे माळी समाजाच्या मंडळींनी बांधले आहेत.) परंतु त्यानंतरची सगळी कामे म्हणजे पाणी किती प्रमाणात साठले आहे ते मोजणे, त्यानुसार कोणाला किती पाणी मिळेल हे गणित करून देणे, त्यावर कोणते पीक घ्यावयाचे हे ठरविणे, पाणी वाटणे, त्याच्या वेळा, त्याचे आकारमान ठरविणे, ह्या पूर्वनियोजित गोष्टींना तसे कोणी अडथळा आणेल त्याला दंड करणे, जो कोणी संकटात / अडचणीत असेल त्याला मदत करणे ही सगळी कामे हे त्या लाभार्थी समुहाचा गट करीत असे.

त्या पाण्यावर त्यांची मालकी असल्यासारखा त्यांचा हक्क असे. त्यांच्या हक्काचे हे पाणी दुसरा कुणी घेऊ शकत नसे. पांझराच्या फड बद्दलचा एक मोठा रंमतीदार खटला पेशव्यांसमोर घडला. त्याची नोंद पेशवे कलाम मध्ये आहे.

एका फड बंधाऱ्यातून दोन्ही तटावरील शेतीला पाणी दिले जाई. दोन्ही तीरावर फड होते. एका तीरावर शुध्द पक्षात तर दुसऱ्या तीरावर वद्य किंवा कृष्ण पक्षात पाणी देण्याची परंपार होती. त्यामुळे दोन्ही तीरावरच्या शेतकऱ्यांना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळे.

समजा, शुध्द पक्षात एक तिथी .. समजा एकादशी... घटली आणि वद्य पक्षात एक तिथी ... समजा चतुर्थी ... वाढली तर हा समतोल बिघडे, एका तीरावर चौदा आणि दुसऱ्या तीरावर सोळा दिवस पाणी मिळे. ह्या असमतोल दूर व्हावा म्हणून हा खटला होता.

निर्णय असा दिला गेला की जी तिथी वाढेल उदा. दोन चतुर्थी... त्या तिथीला दोन्ही दिवस एका तीरावरच्या लोकांची दिवसा - सूर्योदय ते सूर्यास्त पाणी घ्यावे तर दुसऱ्या (ज्या पंधरवाड्यावर) तिथी घटली आहे त्या तीरावर) तीरावरील लोकांना रात्री म्हणजे सूर्यास्त ते दुसरा सूर्योदय असे पाणी द्यावे. अशा रीतीने दोन्ही तीरावरच्या लोकांना 15 - 15 दिवस पाणी मिळाले.

अर्थात हा उल्लेख एवढ्यासाठीच की जरी पाणी वापर हा त्या त्या लाभार्थींचा हक्क होता आणि तो सर्वांनी मान्य केला होता तरी ही मालकी शेवटी राजा, सरदार ह्यांचीच असे. व त्याने आखून दिलेल्या चौकटीत हे कामकाज चाले.

ह्या परंपरा टिकल्या, काही ठिकाणी त्या देवस्थानाला जोडल्या गेल्या. त्यामुळे सरळ त्याचे नाते देवाशी - पुण्याशी जोडले गेले. पापभिरू जनतेने ते मानले. पण त्याही पलिकडे जावून थोडा बारकाईने आढावा घेतला तर जातपंचायतीचे बंधन, त्यांचे कडक नियम आणि ते तोडल्यास जाती बाहेर टाकले जाण्याचा सामाजिक धोका ह्याचाही फार मोठा धाक समाजाला आणि लाभार्थींना होता. गावातील वडीलधारी, अनुभवी माणसे ही डोळसपणे ह्या सर्वांच्या हिताकडे निस्पृहपणे लक्ष देत. त्यांचे शब्द सर्व तरूण मंडळी पाळीत. आणि ह्या सामाजिक चौकटीत फार मोठा फरक 7-8 शतके तरी झाला नाही.

ब्रिटीश राजवट आल्यावर पाश्चात्य देशांच्या सर्व रूढी, पध्दती, ज्ञान हे भारतीयांपेक्षा अधिक चांगले आहे हे देशवासीयांवर विंबविण्याचा एक फार मोठा कार्यक्रम त्या राजवटीने घेतला. लॉर्ड मेकॉले ह्याचे ब्रिटीश पार्लमेंट मधील सुप्रसिध्द भाषण हे त्याचा पुरावा आहे. We want to make them (Indian people) to believe that our (Western) methods and knowledge is better than their (Traditional Indian). Then and then only we shall be able to rule that Country. त्यामुळे त्यांनी विविध कायदे अशा रितीने केले की ह्या सर्व परंपरांना उतरती कळा लागली.

पण तो आत्ताचा चर्चेचा विषय नाही. मुख्य विषय आहे तो प्रत्यक्ष लाभार्थींचा, जलव्यवस्थापनात स्वयंभू सहभाग ! स्वत: मालक नव्हे पण संपूर्ण व्यवस्थापक म्हणून त्यावरचे सारे हक्क, हे जर ताब्यात असले तर काय काय गोष्टी ह्या ठिकाणी घडत होत्या ह्याचा नुसता उल्लेख करणार आहे.

राजस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष, त्यामुळे आहे ते पाणी संभाळले पाहिजे. त्यायमुळे ते पाणी किती कुटुंबांना पुरेसे आहे हे गणित मांडले जाई. त्यातूनच त्यां त्या कुटुंबाच्या किती पशूंना ते देता येईल हा हिशेब मांडला जाई. किती क्षेत्राला कोणत्या पिकाला हे पाणी वापररायचे हे ठरवले जाई. त्याहून जास्त कुटुंब आली तर त्यांनी वेगळा पाणवठा करावा. त्यापेक्षा जास्त पशु आले तर ते हकलून द्यायचे. तसेच जिथून पिण्याचे पाणी घ्यावयाचे तेथे धुणी, भांडी, स्नान, प्रातर्विधी इ. वर संपूर्ण बंदी असे. जनावरांना त्या पाण्याजवळ जाऊ द्यायला बंदी, त्यामुळे शुध्दताही संभाळली जाई.

बंगालमध्ये खाऱ्या पाण्यावर गोडपाणी साठवितांना तर कच्छच्या रणात लांब रूंद परंतु कमी खोल खड्ड्यांमध्ये पाणी संभाळतांना किती खोलपर्यंत उपसा करावयाचा आणि खालचे खारट पाणी येणार नाही ह्याची काळजी घ्यायची. हे सारे अलिखित सामाजिक नियम होते व ते पाळले जात. वेगवेगळ्या जाती जमीतांचे वेगवेगळे पाणवठे गावाभोवती विखुरलेले असत.

माझा निष्कर्ष असा आहे -


ज्याला पाणी वापरावयाचे त्याच्यावरच जबाबदारी टाकली तर बहुसंख्य वेळा ती यशस्वीपणे घेतली जाते. त्यादृष्टीने आवश्यक ती नियमावली तो समाज - लोकसमुह तयार करतो. स्वत:चा ही त्यात लाभ असल्याने तो पाळतो. त्याला पुण्याची जोड असल्याने सहसा दांडगाई करून तोडत नाही. अशा एकेका गटाच्या, समुहाच्या ह्या संयुक्त हक्काला, वापराला म्हणजेच एका मर्यादेपर्यंत खाजगीकरणाला समाज विरोध करीत नाही. त्यातून सर्वांनाच काही प्रमाणात लाभ होतो आणि म्हणून अशा पध्दती प्रयत्नपूर्वक टिकविल्या जात, टिकत. हा ह्या देशाचा इतिहास आहे.

खाजगीकरण म्हणजे वाईटच असे एक मत आपल्या नव्या जमान्यात रूढ होऊ पहात आहे. खाजगीकरण म्हणजे प्रचंड भांडवल आणि इतरांचा काहीही विचार न करता कमावलेला गडगंज नफा हे चित्रही दिसते. त्यामुळे ह्या खाजगीकरणाला होणारा प्रचंड विरोधही लक्षात येतो.

पाण्याची गरज वाढली आहे, पुरवठा तेवढाच आहे. अशावेळी समव्यायी वाटप आणि सामाजिक जाणिवा ह्या गोष्टी मला तरी खूप महत्वाच्या वाटतात. आणि अशा लाभार्थींच्या माध्यमातून त्या त्या समाजापुरते खाजगीकरण असे स्वरूप त्याला दिले तर अनेक कठीण प्रश्न हे मोठ्या प्रमाणावर सोपे होऊ शकतात असा माझा विश्वास आहे.

खाजगीकरण अपरिहार्य असले तर ते येणारच, येऊ देत. पण त्याचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती ही दिवाणखान्यापर्यंतच यावी मात्र घरात किंवा बेडरूपमध्ये शिरू नये इतकी काळजी घेता येणे शक्य आहे. भारतीय सिंचन व्यवस्थापनातील खाजगीकरणाचा हे यशस्वी प्रयोग म्हणजे अंधकारातले दूरवर दिसणारे पथदर्शी उजेडाचे दिवे आहेत.

Path Alias

/articles/pathadarasai-daivae

Post By: Hindi
×