प्रयोगसिद्ध पर्जन्ययागाची यशस्वी वाटचाल - श्री. नानाजी काळे, योगिराज वेदविज्ञान आश्रम


1981 पासून प्रारंभ करून 2009 पर्यंत अनेक सोमयाग भारतात नानांनी घडवून आणले. ओरिसा, केरळ, गुजरात, मध्यप्रदेश, 12 जोतिर्लिंगे असलेल्या सर्व ठिकाणी, महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र पर्जन्ययाग करून त्याची यशस्वीता प्रदीर्घ अनुभव, सूक्ष्म व विज्ञाननिष्ठा, निरीक्षण, अखंड व अविरत अभ्यास व ठेवलेल्या नोंदी यातून भविष्यात पावसाचा अंदाज नानांनी सिद्ध केला आहे. अस्वस्थ शेतकऱ्यांना कल्याणकारी जीवनाचा संदेश दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून जागतिक तापमानात होत असलेली वाढ (Global Warming) या जगभर उठलेल्या वादळाबाबत आपण ऐकत आहोत. पर्यावरणातील असमतोलामुळे वातावरणावर होणारे अनिष्ट परिणाम आणि त्यामुळे आपले जीवन ज्या घटकावर सर्वस्वी अवलंबून आहे तो घटक, म्हणजे पाऊस ! या पाऊसमानावर झालेला विपरित परिणाम अनुभवाला येत आहे. अनियमित व कमी पावसामुळे शेतकरी मनोमन खचला आहे. विहीरी, तळी, ओढे, तलाव आटत चालले आहेत. जीवापाड मेहतीने आणि न परवडणारी बियाणे, खते यावर प्रसंगी कर्ज काढून शेतीत केलेली धडपड वाया चालली आहे. शेतकरी अस्वस्थ होत आहे.

याच अस्वस्थेतून बार्शी येथील श्री. योगिराज वेदविज्ञान आश्रमाचे संचालक श्री. नाना काळे यांनी पर्जन्ययागातून पाऊस कसा पाडता येईल, शेतकऱ्यांना निश्चितपणे पावसाचा अंदाज कसा बांधता येईल, कोणत्या पिकांना येणारा पावसाळा फायद्याचा होईल याची निश्चित स्वरूपाची माहिती देणारे आधुनिक विज्ञानाचा (Metrology) च्या कसोटीवर पूर्णपणे उतरलेले यंत्र व तंत्र शोधून काढले आहे. पर्जन्यविज्ञान सांगणाऱ्या नारदसंहिता, पराशरसंहिता, बृहत्संहिता या संस्कृत ग्रंथाचा नानांनी अखंड व सूक्ष्म अभ्यास व परिशीलन केले. शेतकीय विधानाचा अभ्यास करून अच्छावद सूक्त प्रयोगशील केले. या अभ्यासामागे नानांची फार वर्षांची तपश्चर्या उभी आहे. महर्षी पराशरांचा वृष्टि:मूलश्च जीवनम्। जल हे सजीव सृष्टीचा प्राण आहे. या वचनावर श्रद्धा ठेवून नानांनी पर्जन्याच्या प्रयोगाला प्रारंभ केला.

नानांनी पहिलाच प्रयोग कासारवाडी येथील त्यांच्या आश्रमात 26 मार्च 1981 मध्ये 5 दिवसांचा याग केला. 4 दिवस जप, 1 दिवस हवन, लाव्हाळ्याच्या समिधा गाईच्या दुधात व तूपात भिजवून हवन केले. यागाची पूर्माहूति होण्याआधी 10 मिनिटे पाऊस पडला. त्यावेळचा नानांचा अनुभव विलक्षण होता. प्रथम वातावरण गरम झाले, सर्वांगाना घाम येऊ लागला, सोसाट्याचा वारा सुटला व पाऊस पडला. या अनुभवाने व प्रत्यक्ष पडलेला पाऊस बघून नानांनी पर्जन्ययागाची यशस्वी वाटचाल सुरू केली.

पर्जन्ययागाचे 2 प्रकार आहेत. 1. नित्य पर्जन्ययाग, 2. नैमित्तिक पर्जन्ययाग नित्य पर्जन्ययागासाठी दोन वर्षाचा संधीकाळातील वारूणयोग निश्चित सांगितले आहे. येणाऱ्या पुढील वर्षात चांगला पाऊस होण्यासाठी नित्य पर्जन्ययाग करावा, असे नानांचे मत आहे. नानांनी 1984 ते 2003 या काळात महाराष्ट्र व केरळमध्ये 18 नित्य पर्जन्ययाग केले. 1981 ते 2003 या काळात महाराष्ट्र व इतर नैमित्तिक पर्जन्ययाग केले. डिसेंबर 2003 मध्ये नानांनी विशेष प्रयोग केला. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष झाले होते. तेव्हा महाराष्ट्राच्या कृषी हवामान शास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञांनी संबंधित क्षेत्रात पर्जन्ययाग करण्याची नानांना विनंती केली. त्यावेळी जगन्नाथपूरी (ओरिसा), अकोला (विदर्भ), कासारवाडी, नीरा - नरसिंहपूर, पारवडी ही ठिकाणे नानांनी यागासाठी निवडली. ही सर्व स्थाने मेघ येण्याच्या (Cloud Travel) मार्गावरील (Trough Line) होती. या यागाचे सर्व निरीक्षण नानांनी त्यांच्या पुस्तकात विस्ताराने दिले आहे. या यागाने जो संकल्प केला होता तो पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्याचा होता. तोे ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात फलद्रूप होऊन महाराष्ट्रात उजनीसहीत सर्व जलाशये पाण्याने पूर्ण भरल्याचा अनुभव आहे.

2004 मध्ये नानांनी 13 ठिकाणी पर्जन्ययाग केले. नानांचा निरीक्षणातून आत्मविश्वास वाढत गेला व कासारवाडीला स्वतंत्र ऑटो वेदर सेंटर अभिभौम स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन झाले. नानांच्या या संशोधनातील हा अत्यंत महत्वाचा विज्ञाननिष्ठ, यशस्वी टप्पा आहे. या प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे. याचा हेतू पर्जन्ययागाचे यशापयश निरीक्षणे करणे, यागासाठी तज्ज्ञांची सल्लागार समिती स्वत: करणे, पर्जन्य अभियान योजना (प्रोजेक्ट पर्जन्य) आखणे, योजनेचा काळ 6 वर्षे असून यासाठी नानांनी 9 पॅरामिटर्सची निश्चितती केली आहे. ते खालीलप्रमाणे -

1. तापमान.
2. सौर उत्सर्जन
3. वातावरण दाब
4. सापेक्ष आर्द्रता
5. वायुवेग
6. वायुदिशा
7. वृष्टिमापन
8. ढगांचे निरीक्षण
9. ग्रहांची स्थिती (ग्रहांचे भ्रमण, युत्या, ग्रहणे, सौर वादळे इ. निरीक्षणे) या हवामानात केंद्रमुळे आगामी पावसाचा अंदाज बांधता येणे शक्य झाले आहे.

यागापूर्वीची, यागकाळातील व यागानंतरची हवामान घटकांची नोंद शास्त्रीय पद्धतीने ठेवण्याची वैदिक आचार्यांच्या शिक्षणासाठी हवामान शास्त्रज्ञ, कृषीहवामान तज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ आणि पारंपारिक ज्योतिषी यांच्या मार्गदर्शनाचा वर्ग श्री योगिराज वेदविज्ञान आश्रमात घेण्यात आला आहे.

कार्तिक पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा हा वृष्टिगर्भ धारणेचा काळ आहे. नानांचे निरीक्षण अत्यंत सूक्ष्म आहे. वृष्टि कधी होणार आहे, हे सांगतांना नानांनी चिन्हे सांगितली आहेत. ती वराहमिहिरांच्या बृहत्संहितेला अनुसरून आहेत. विशिष्ट महिन्यात, विशिष्ट तिथीला व विशिष्ट नक्षत्रावर होणारी वृष्टिगर्भधारणांची चिन्हे खालील गोष्टींना नानांनी सांगितली आहेत. सूर्याेदय किंवा सूर्यास्ताला आकाशात दिसणारे लाल गुलाबी रंग, पावसाळी ढग, सूर्य किंवा चंद्राभोवतीचे खळे, गडगडाट करणारे वावटळी, पूर्व किंवा पश्चिमेला दिसणारे इंद्रधनुष्य, उत्तर, ईशान्य किंवा पश्चिमेकडून वाहणारे वारे, वावटळी, चिमण्यांचे धुलरिनान, काळ्या मुंग्यांनी पांढरी अंडी वाहून नेणे, वसंत ऋतुतील आंबा आणि कडुंलिंबाला येणारा मोहोर, अल्प वृष्टि, बीजा यावरून पावसाचा अंदाज निश्चित काढता येतो, असे नानांचे मत आहे. जर या संहिता मधून दिलेल्या तिथिला किंवा नक्षत्राला ती ती वृष्टिगर्भधारणेची चिन्हे घडली तर वृष्टिगर्भधारणेच्या 193-95 दिवसानंतर पाऊस पडतो. जलप्रसूति होते असे नानांचे निरीक्षण आहे.

यज्ञामुळे जे वातावरण बदल घडतात त्यामुळे वृष्टिगर्भधारणाही होते. हे नानांनी सिद्ध करून दाखविले आहे.

आधुनिक हवामान शास्त्रज्ञाच्या पावसाचा वृष्टिगर्भधारणेचा काळ व वराहमिहिराने सांगितलेला काळ एकच आहे.

डॉ.वसंतराव गोवारीकरांच्या मताप्रमाणे मान्सूनचा प्रारंभकाळ हा नोव्हेंबर - डिसेंबर म्हणजे पॅसिफिक समुद्रात L निनो या उष्णप्रवाहात बदल होण्यास सुरूवात होते, हा आहे. वराहमिहिराने वृष्टिगर्भधारणेचा काळ नेमका नोव्हेंबर - डिसेंबर (शरदऋतु) हाच सांगितला आहे. प्राचीन व अर्वाचीन दोन्ही मते समान आहेत. हे यावरून दिसून येते.

1981 पासून प्रारंभ करून 2009 पर्यंत अनेक सोमयाग भारतात नानांनी घडवून आणले. ओरिसा, केरळ, गुजरात, मध्यप्रदेश, 12 जोतिर्लिंगे असलेल्या सर्व ठिकाणी, महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र पर्जन्ययाग करून त्याची यशस्वीता प्रदीर्घ अनुभव, सूक्ष्म व विज्ञाननिष्ठा, निरीक्षण, अखंड व अविरत अभ्यास व ठेवलेल्या नोंदी यातून भविष्यात पावसाचा अंदाज नानांनी सिद्ध केला आहे. अस्वस्थ शेतकऱ्यांना कल्याणकारी जीवनाचा संदेश दिला आहे.

या कामी निसर्ग निरीक्षणाच्या, डिजीटल कॅमेऱ्याच्या निरीक्षणात अनमोल मदत नानांना त्यांच्या धर्मपत्नी सौ.वैजयंती काळे व प्राजक्ता पत्की या विद्यार्थीनीने केली आहे. आता नाना ऐरोसोल सायन्स व यज्ञशास्त्राची समानता कशी आहे, याच विचाराने प्रभावित झाले आहेत व त्यावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे.

नानांच्या कार्यात एस.एस. दुगम, डॉ.वेणुगोपाल, श्री.मृगेंद्र विनोद, मनोज देशपांडे यांचे सहकार्य लाभले आहे.

पोलंड येथील नेचर लॅबोरेटरी या संस्थेचे डायरेक्टर यांनीही सोमयागाच्या संशोधनात पूर्ण सहकार्य दिले आहे.

हे जागतिक पातळीवर आव्हान नानांनी दिले आहे. त्यांना या कामात डॉ.एम.सी.वाष्णेय (V.C) आणंद अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, प्रा.डॉ.विद्याधर वैद्य (अॅग्रो मेट्रॉलॉजी डिपार्टमेंट, आणंद अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, डॉ. व्यासपांडे (H.D.O) अॅग्रोमेट्रॉलॉजी आणंद अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, श्री. पी.व्ही. काणे (रिटायर्ड मॅनेजिंग डायरेक्टर, नाबार्ड) यांचे सहकार्य लाभले आहे.

त्यांचेकडून श्री.केतन शास्त्री, श्री.योगेश शास्त्री, श्री.चैतन्य शास्त्री, त्यांच्या क.स्नुषा, पत्नी सौ.वैजयंती काळे व आश्रमातील आचार्य - विद्यार्थी परिवार या सर्वांचे नानांना त्यांच्या या प्रदीर्घ तपश्चर्येत प्रयोगसिद्धिसाठी सहकार्य लाभले आहे.

नानांचे हे पर्जन्ययागाचे संशोधन आता संशोधनाच्या पातळीवर न राहता ते जागतिक Metrology वर झेपावले आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण त्यांना नुकतेच मिळाले. जागतिक पातळीवरील उत्कृष्ट रिसर्च अॅवार्ड Asian Agro - History Foundation ICRISAT 2009 या संस्थेचे Sipani Agri Reasearch Farm Award 2009 या नावाने मिळाले आहे. डॉ. डॅनियल रोझेनफील्ड (Program of Atmospheric Sciences Institute of Earth Sciences, The Hebrew University of Jerusalem) यांनी नानांचा एका वाक्यात जो पत्राद्वारे गौरव केला आहे, त्यात नानांचे सर्व प्रयोगांचे यश सामावले आहे असे वाटते. ते नानांना पत्रात लिहितात -

It is interesting that your ancient scripts recognised the importance of aerosols in rain making.

आधुनिक विज्ञानाशी हातात हात घालून चाललेली पर्जन्ययागाची यशस्वी वाटचाल आजच्या व भविष्याच्या शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे कल्याणकारी ठरणारी आहे. या विचारानेच नानांचे अवघे जीवन उजळून निघाले आहे. या सकाळच्या महोत्सव प्रसंगी त्यांना शुभेच्छा !

सम्पर्क


डॉ. सौ.रजनी जोशी, बार्शी

Path Alias

/articles/parayaogasaidadha-parajanayayaagaacai-yasasavai-vaatacaala-sarai-naanaajai-kaalae

Post By: Hindi
×