प्रश्न पिण्याच्या पाण्याचा


पाण्याचे स्त्रोत किंवा लहान नद्या यांमध्ये भराव टाकून इमारती बांधल्याने ते नष्ट होत चालले आहेत. ओढे, नाले, झरे इ. आता केवळ शहराच्या जुन्या नकाशांमध्ये दिसतात. पण यामुळे मर्यादित धरणांवर प्रचंड ताण येऊन आधीच मर्यादित उपलब्ध असलेले पाणी अधिकच दुर्मिळ होत चालले आहे. या बरोबरच पाण्याची होणारी गळती व चोरी दोन्हीचे प्रमाण वीज चोरीसारखेच प्रचंड वाढले आहे.

अगदी लहान असल्यापासून, आमच्या पिढीने एक म्हण वारंवार एैकली - चकाकते ते सारे सोने असते असे नाही. All that glitters is not gold. वेळीच मनावर केला जाणारा तो एक संस्कार होता. केवळ वरलिया रंगाला भुलू नये याची ही शिकवण होती. वय वाढत गेले, तसे या म्हणीचे अर्थ अंतरंगात अधिक गहिरे होत गेले.

याच धर्तीवर म्हणावेसे वाटते की - स्वच्छ दिसते ते सारे शुध्द असते असे नाही. पाण्याच्या संदर्भात तर हे शब्दशा लागू होते आणि खोलवर जाऊन पोहोचते. आपण राहतो तो पृथ्वी हा ग्रह 3/4 प्रमाणात पाण्याने वेढलेला आहे. राहिलेल्या 1/4 भूपृष्ठावर माणसे, जनावरे आमि वनस्पती या जलजीवनी घटकांचे वास्तव्य आहे. पाणी नसेल तर यापैकी कुणीही जगू शकणार नाही. बहुतांश पृथ्वी खाऱ्या पाण्याच्या समुद्रांनी वेढलेली असून तिच्या पोटातील जेमतेम 3 टक्के इतके पाणी गोडे असल्यामुळे पिण्याच्या उपयोगाचे आहे. कित्येक शतके लोटली, माणसे, जनावरे, वनस्पती यांच्या संख्येत कोटींनी वाढ झाली तरी गोड्या पाण्यांच्या प्रमाणात मात्र वाढ झालेली नाही. उलट आहे ते उपयोगाचे पाणीही प्रदूषणाद्वारे व स्त्रोत नष्ट करून निरूपयोगी होण्याच्या मार्गावर आहे असे दिसते.

पाणी : गुणवत्ता :


उपलब्ध असलेले पाणी पिण्यायोग्य असण्याकरिता ते आरोग्याच्या दृष्ट्या सुरक्षित असायला पाहिजे. यासाठी पिण्याच्या पाण्याची भौतिक, रासायनिक व जंतूविषयक चाचणी करणे आवश्यक आहे. रेती- माती - चिखल यासारखे पाणी गढूळ करणारे घटक, हैड्रोजन सल्फाइडसारख्या द्रव्यामुळे आलेली दुर्गंधी इ. गोष्टी पाण्याच्या स्वीकारार्हतेवर परिणाम करणाऱ्या असतात. पण त्या पाणी योग्य प्रकारे गाळून घेतल्यावर व त्याचा स्वच्छ वातावरण आणि सूर्यप्रकाश यांच्याशी संपर्क आल्यावर बदलू शकतात. यासाठी -

1. पाणी चवीला चांगले असावे. मचूळ, तेलकट, खारट नसावे.
2. दिसायला स्फटिकासारखे स्वच्छ, तळ दाखवणारे व रंगहीन असावे.
3. त्याला कुठलाही वास नसावा, शेवाळे किंवा तेलकट तवंग नसावा.
4. अपायकारक जीवाणू किंवा विषाणू त्यात नसावे. त्यामुळे विविध रोग उद्भवतात.
5. अपायकारक रासायनिक द्रव्ये प्रमाणाबाहेर किंवा अजिबात नसावी.
6. पाण्याचा सामु (pH value) 6.5 ते 8.5 इतका असावा.
7. क्षार, लोह, शिसे यांसारख्या धातूचे पाण्यात अस्तित्व नसावे.
8. आयुर्वेदाने पाण्याचा जो विचार केला आहे त्यात पाण्याकाठी ज्या वृक्षांचे किंवा वनस्पतींचे प्रामुख्याने अस्तित्व असते त्याचे गुणधर्मही पाण्यात उतरत असे संशोधनपूर्वक म्हटले आहे. तसेच विविध ऋतूंमधील हवामानानुसार पाण्याचेही गुणधर्म बदलत असतात तेव्हा पिताना काय काळजी घ्यावी तेही सांगितले आहे.

9. आर्सेनिक, लोह, क्रोमियम, फ्लोराइड, अल्यूमिनियम हे घटक पाण्यात जर मर्यादेबाहेर वाढले तर ते पिण्यायोग्य राहात नाही.

10. गंगा - यमुना - गोदावरी - नर्मदा - कावेरी या पवित्र व शुध्द मानल्या गेलेल्या नद्यांच्या अतिवेगाने होणाऱ्या प्रदूषणामुळे त्यांच्या शुध्दीकरणासाठी कोट्यावधीचे प्रकल्प उभारण्याची वेळ आली आहे. तरीही परिणाम होत नाही. असे हे उपलब्ध पाणी पिण्याच्या दृष्टीने शुध्द करण्याकरिता अनेक मानवनिर्मित उपाय योजले जातात. पुण्यातील गटारगंगा म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मुळा - मुठा या नद्यांच्या शुध्दीकरणाचाही प्रकल्प आखल्याची बातमी वाचनात आली. त्याला शुभेच्छा देऊया.

शुध्दीकरणाच्या पध्दती :


1. पाण्यातील जंतू मारण्याकरिता क्लोरिन किंवा कधीकधी आयोडिन या रसायनांचा योग्य पध्दतीने व योग्य प्रमाणात उपयोग केला तर चांगला परिणाम होऊ शकतो. याची जबाबदारी नगरपालिका किंवा महानगरपालिकांवर असून पाण्याचे शुध्दीकरण ही एक 24 तास देखभालीची गरज असणारी प्रक्रिया आहे. तिला सुट्टी नाही. सतत डोळ्यात तेल घालून जागरूक राहिले तरच ती प्रभावी होऊ शकते.

2. ओझोन वायूच्या वापराने पाणी शुध्द होऊ शकते. मर्यादित स्वरूपात व व्यवस्थित देखभाल केली तरच सोपी व कमी खर्चाची पध्दत आहे. ओझोन वायूची निर्जंतुकीकरणाची ताकद क्लोरिनच्या दुप्पट असते. ऑक्सिजन वायूचाच तो एक अस्थिर व तीव्र दर्पयुक्त प्रकार असतो. पण त्याचे प्रमाण फार वाढले तर धोकादायक ठरू शकतो.

3. यू.व्ही. किंवा अतिनीलकिरणाचा वापर करून सूक्ष्म जीवाणू व विषाणूंना मारून टाकून त्यांची पुनर्निर्माणशक्तीही नष्ट केली जाते. यामुळे पाण्यात काहीही उपायकारक किंवा अपायकारक रसायने मिसळली जात नाहीत. मूळ खनिज घटक बदलत नाहीत. पण यू.व्ही. ट्यूबची शक्ती कालांतराने कमी होत जाते. वार्षिक देखभाल खर्च बराच होतो.

4. आयन अदलाबदल पध्दतीने पाणी शुध्दीकरण केल्यास, रेझिन्सच्या वापरामुळे अतिरिक्त क्षारांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. पण खर्चिक पध्दत आहे.

5. उलटे अभिसरण किंवा रिव्हर्स ओस्मोसिस या पध्दतीने पाणी शुध्द करताना पाणी अगदी सूक्ष्म जाळीदार पडद्यातून काढले जाते. ती जाळी प्रभावी फिल्टरचे काम करून शुध्दपेयजल निर्माण करते. परंतु या पध्दतीवरील आक्षेप बरेच आहेत. त्यांचे इथे सविस्तर विवरण करणे शक्य नाही.

बाजारात जलशुध्दीकरण करण्याचा दावा करणारी जी यंत्रे मिळतात, त्यांमध्ये यापैकीच काही गोष्टींचा व पध्दतींचा वापर केलेला असतो. त्यापैकी प्रत्येकाला आपापले गुणदोष आहेतच. निवड करणाऱ्याने तारतम्य राखावे लागते. उपलब्ध पाणी, वीज, भारनियमन या सर्वांचा विचार करावा लागतो. राष्ट्रीय पातळीवर मान्यातप्राप्त अशी कोणतीही प्रयोगशाळा किंवा तेथील गुणवत्ता तपसणी अनिवार्य करण्याचे काम अद्याप तरी कायदेशीररित्या झालेले नाही किंवा मानके घातली गेलेली नाहीत.

साठवण व वितरण :


सर्व प्रकारे प्रयत्न करून एकदाचे शुध्द पाणी उपलब्ध झालेच, तरी त्याचे साठवण योग्य प्रकारे झाले, तरच या सर्व खटाटोपाचा उपयोग होऊ शकतो. या दृष्टीने, पाण्याचे जेथून मोठ्या प्रमाणावर वितरण होते तेथील साठवण म्हणजे विहिरी, कूपनलिका, पाणी वाहून मेणारी यंत्रणा या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करावे लागते. पाण्याचे साठे शुध्द करावे लागतात व ते तसे राहतील याची खबरदारी सतत घ्यावी लागते. नद्या, तळी, सरोवरे हे मोठे साठे असले तर त्यांची मोठ्या प्रमाणात देखभाल करावी लागते ते न झाल्यामुळे सोलापूरला कॉलरऱ्याची साथ आली हे आपण नुकतेच पाहिलेत ते प्रदूषणमुक्त होण्यासाठी व राहण्यासाठी इतर यंत्रणांबरोबर कधी कधी कायद्याचाही वापर करावा लागतो.

पाण्याचे स्त्रोत किंवा लहान नद्या यांमध्ये भराव टाकून इमारती बांधल्याने ते नष्ट होत चालले आहेत. ओढे, नाले, झरे इ. आता केवळ शहराच्या जुन्या नकाशांमध्ये दिसतात. पण यामुळे मर्यादित धरणांवर प्रचंड ताण येऊन आधीच मर्यादित उपलब्ध असलेले पाणी अधिकच दुर्मिळ होत चालले आहे. या बरोबरच पाण्याची होणारी गळती व चोरी दोन्हीचे प्रमाण वीज चोरीसारखेच प्रचंड वाढले आहे. पाणी वाहून नेणारे पाईप्स फुटल्यामुळे किंवा जागोजागी फोडल्यामुळे ते वाहून वाया जाते. मैलोनमैल पसरलेले जलवाहिन्यांचे जाळे सुरक्षित कसे ठेवावे हा मोठाच प्रश्न आहे. घरापर्यंत आलेले किंवा आणलेले पिण्याचे पाणी योग्य प्रकारच्या पात्रांमध्ये झाकून, साठवून ते काटकसरीने वापरणे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी तो एका अर्थाने सार्वजनिकही आहे. नळकोंडाळ्यांवरही अनेक ठिकाणी पाणी वाहून जाते. याशिवाय पिण्याचे शुध्द केलेले गोडे पाणी, शेती - बागायती तसेच, धुणे - भांडी - वारणे इ. घरगुती वापरातही वाया जाते. त्यासाठी काही तरी वेगळी योजना करणे जरूरीचे आहे. पण खर्च व सततची देखभाल केली तरच ते शक्य आहे.

पाण्याचे रूपांतर :


जगात सर्वत्र आज उपलब्ध असलेल्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य गोड करण्याचे प्रयोग चालू आहेत. बऱ्यापैकी खर्चिक असलेले हे प्रयोग मोठ्या प्रमाणावर केले गेले तर ते यशस्वीही होतील. पण त्यासाठी खर्च व वापर यांची सांगड घातली गेली पाहिजे. सध्या जगातील 39 देशांना पाण्याचे दुर्भिक्ष सतत जाणवते. 2025 साली ही संख्या 47 होईल. व त्याची लोकसंख्या 280 कोटी होईल. तरीही पिण्याचे पाणी 3 टक्के च असणार. त्यामुळे यापुढील युध्दे पाण्यासाठी पेटणार आहेत. म्हणून क्षारयुक्त खाऱ्या पाण्याचे पिण्याकरिता व शेतीकरिता लागणाऱ्या गोड्या पाण्यात रूपांतर करण्याचे प्रयोग इस्त्राईल, अमेरिका, सिंगापूर, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, टेक्सास आणि भारतातही चालू आहेत. पिण्याच्या पाण्याची गरज माणशी सुमारे 5 ते 10 लिटर - हवामानानुसार कमीजास्त असते. तर वापरण्याचे पाणी 100 लिटर लागते. तेव्हा हे पिण्याचे खर्चिक पाणी तेवढ्यासाठीच राखून ठेवणे फार महत्वाचे आहे. खाऱ्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारी योजना योग्य प्रकारे राबविली गेल्यास हा खर्च 5 ते 10 पैसे प्रतिलिटर येवढा होईल.

बाटलीबंद पाणी :


शुध्द पाणी पुरविण्याचा व्यवसाय करणारे व बाटलीबंद पाण्याची निर्मिती - साठवण - वितरण करणारे आज तेजीत आहेत. अनेक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या यात उतरल्या आहेत. या क्षेत्रातील भारताचा व्यवसाय पाच हजार कोटींचा आहे असे ताजी आकडेवारी सांगते. बाटलीबंद पाण्याचा वापरही प्रचंड प्रमाणात होत आहे. तरी सरकारचा त्यावर काहीही अंकुश नाही. ग्राहकांनी जागरूक राहिले, तरच काहीतरी उपयोग होईल. बाटलीबंद पाण्याच्या निर्मितीचा खर्च विक्रीच्या किंमतीपेक्षा किती तरी कमी आहे. त्यातही रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी, लोकांनी फेकून दिलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्यात साधे पाणी भरून पुन्हा सीलबंद करून विकणाऱ्यांचा धंदाही जोरात चालू आहे. ग्राहक या बाटल्या फोडून फेकून देण्याची दक्षता घेत नाही.

एकंदरीतच, पिण्याच्या पाण्याचा जो यक्षप्रश्न अवघ्या जगाला आज भेडसावत आहे, त्यावर जलसाक्षर होऊन पाण्याचा कमीत कमी वापर योग्य प्रकारे करणे हाच सर्वात महत्वाचा उपाय दिसतो आहे.

श्री. शामराव ओक, पुणे - (भ्र : 020-25432308)

Path Alias

/articles/parasana-painayaacayaa-paanayaacaa

Post By: Hindi
×