संस्था स्थापनेपूर्वीची पार्श्वभूमी :
पिंपळनारे गावाच्या पश्चिमेस रामशेज किल्ल्याच्या कुशीत पिंपळनारे लघू पाटबंधारे तलाव नाशिकपासून 15 कि.मी. अंतरावर पिंपळनारे गावातून वाहणाऱ्या करंजी नाल्यावर आहे. हृा तलाव 1983 साली लघू पाटबंधारे विभाग, नाशिक यांचेमार्फत पूर्ण करण्यात येवून 1987 सालापासून पाटबंधारे विभागाकडे सिंचनासाठी हस्तांतरीत करण्यात आला. या तलावाची साठवण क्षमता 79.40 द.ल.घ.फूट (2.25 द.ल.घ.मी) आहे. पिंपळनारे गाव अवर्षणप्रवण भागात येत असल्याने सन 1994 या वर्षाचा अपवाद वगळता तलाव कधीच पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. तलावास 6 कि.मी. लांबीचा डावा कालवा आहे. त्यावेळेस पाण्याविषयी फारशी जागृती नव्हती. पाण्याचे मोल ज्ञात नव्हते. क्ष्यामुळे हा कालवा हलक्या व पडीक जमिनीतून गेला खरा.
बागायती व वहितीयोग्य क्षेत्र गावाच्या मधून वाहणाऱ्या नाल्याच्या दोन्ही बाजूस आहे. साहजिकच शेतकरी कालव्याऐवजी नाल्याचेच पाणी सोडण्याचा आग्रह धरीत असत. परंतु त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर नाश होत असे. त्यातच विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर सर्व पाणी खालच्या भागात वाहून जात असे. गावच्या लाभार्थींना पाण्याकडे नुसतेच आशाळभूत नजरेने पाहण्यावाचून गत्यंतर नव्हते. कालव्याने पाणी सोडल्यास कालवा फुटून संबंधित शेतकऱ्यांच्या पिकांचे नेहमी नुकसान होत असे. शेतकऱ्यांना एक-दोन रोटेशनचे पाणी मिळत असे. त्यातून गहू-हरभरा अशा रब्बीची पिके घेतली जायची. उन्हाळ्यात तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत असे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी व कंगाल तर बनत चालला होताच त्याचबरोबर शेतीविषयीचे प्रेम कमी होत चालले होते.
या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी व पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून विचारविनिमय करून एक अभिनव योजना आखली. प्रत्येक बाबतीत शासनावर अवलंबून न राहता संघटित होऊन आपल्या गरजा आपणच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या स्वयंसहायता कल्पनेने शेतकऱ्यांमध्ये एक नवीन उत्साह व जागृती निर्माण झाली व त्यातूनच 29.4.1995 रोजी श्रीराम पाणी वापर सहकारी संस्था मर्यादित स्थापन झाली. धरणात प्रतिवर्षी साठणारा अल्प पाणी साठा वापर व धरण पूर्ण भरण्याची शाश्वती नसल्याने पाण्याचा थेंब न थेंब उपयोगात आणून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त लाभार्थींचा सहभाग करून घेऊन जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याच्या दृष्टीने पाईपलाईनचा उपयोग करून थेट लाभधारकांच्या क्षेत्रातच पाणी पोहचविण्याचे ठरले व त्याच पाईपलाईनने पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी धरणात परत टाकण्याचे ठरले. यासाठी सुरूवातीला 9 नंतर, 9 असे 18 पाईपलाईचे ग्रुप तयार करण्यात आले. प्रत्येक पाईपलाईनच्या ग्रुपवर आवश्यकतेनुसार 5 अश्वशक्ती, 7,5,10,12.5 अश्वशक्तीचे विद्युत पंप बसविलेले आहेत. हे पंप जिथे पाईपलाईन नाल्याजवळून जाते तिथे एक टी कनेक्शन बसवून तिथून धरणात पाणी टाकण्यात येते व हंगामात तेच पंप धरणाजवळ ठेवून पाणी वितरण केले जाते.
सर्व लाभार्थींना पाण्याचा योग्य वापर करता यावा म्हणून पाईपलाईनसाठी ग्रुप तयार करण्यात आले. एका ग्रुपमध्ये कमीत कमी 10 लाभार्थी असावेत असा नियम घालून दिला. तसेच प्रत्येक पाईपलाईनच्या ग्रुपने धरणात पाणी टाकणे बंधरनकारक ठेवले. प्रत्येक पाईपलाईनचा खर्च व त्यासाठी येणारा दुरूस्ती देखभालीचा खर्च त्यात सहभागी असणाऱ्या लाभधारकांनीच करावयाचा असे ठरले. अशाप्रकारे सर्वत्र पाईपलाईनचे जाळेच विणले गेले. अखंडित विद्युत पुरवठा होण्याकरीता विद्युत पंपासाठी सभासदांच्या वर्गणीतून धरणस्थळी 160 के.व्ही. चा रू.2,82,000/- खर्च करून व धरणात रिटर्न पाणी टाकण्यासाठी नाल्यावर 100 के.व्ही. चा रू.3,20,000/- खर्च करून एक असे दोन ट्रान्सफॉर्मर वीज मंडळाच्या सल्ल्याने विकत घेतले. धरणस्थळी असलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे पाणी वितरण करण्यावर नियंत्रण ठेवण्यास उपयोग होऊ लागला. अल्प पाणी असल्यास विद्युत पुरवठा संस्थेमार्फत खंडित केला जातो. त्यामुळे पाणी वाटपावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. अशाप्रकारे सभासदांनी अद्यापपावेतो कोणत्याही वित्तसंस्थेचे तसेच शासनाचे कर्ज न घेता स्वखर्चातून ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी लाभार्थी सभासदांचे एकूण रू.95,00,000/- खर्च झालेले आहे. या व्यतिरिक्त शासन पाणीपट्टी व्यवस्थापन खर्च व वीज बिलाकरीता प्रतिवर्षी लाखो रूपये खर्च होत आहे.
धरणात पाईपलाईनद्वारे कसे व किती पाणी टाकले जाईल याबाबत संक्षिप्त तपशिल : (खाली 15 अश्वशक्तीचे 9 पंप विचारात घेतले आहेत. परंतु प्रत्यक्षात यापेक्षा जास्त पंप पाणी टाकण्यासाठी वापरले जाणार आहेत.)
- 15 अश्वशक्तीचे 9 पंपाद्वारे येणारे पाणी
- 1.32 क्युसेस ज्र् 9 उ 11,77 क्युसेस उ 1.020 द.ल.घ.फुट
- म्हणजेच 15 अश्वशक्तीच्या 9 पंपाद्वारे दररोज 1.00 द.ल.घ.फुट पाणी तलावात टाकले जाईल
- तलावाची साठवण क्षमता 79.40 द.ल.घ.फु
- पावसाळ्यात येणारे नैसर्गिक पाणी सरासरी सुमारे 15.00 द.ल.घ.फुट
- पंपाद्वारे 65 दिवसात 64 द.ल.घ.फुट पाणी तलावात येईल व धरण पूर्ण क्षमतेने 65 दिवसात भरेल असे नियोजन आहे.
संस्था मार्गात दोन वर्षांपासून तलावात पाईपलाईनने पावसाळ्यात नाल्यांद्वारे वाया जाणारे पाणी टाकत आहे. परंतु लवकर नदी-नाले चालू न झाल्याने व अपुरा वीजपुरवठा यामुळे 65 द.ल.घ.फुट पाणी साठवण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहचलेली नाही. त्यासाठी यावर्षी संस्थेने रू. 3,20,000/- खर्च करून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर विकत घेतला. त्यामुळे दरवर्षी भविष्यात धरण पूर्ण क्षमतेने भरविण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
संस्था स्थापनेपूर्वी लाभार्थी गहू, हरभरा यासारखी अन्नधान्याची पिके घेत. द्राक्षबागांचे व नगदी पिकांचे क्षेत्र मर्यादित होते. भाजीपालासारखे पिक हंगामापुरते मर्यादित होते. उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत होता व त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी व हतबल झालेले होते. जीवनाशी लढा देण्यासाठी किमान गरजेइतके पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी निराशावादी होत चालले होते. परंतु संस्था स्थापनेनंतर त्यात आमुलाग्र बदल झाला. लाभार्थींचे उत्पन्नात निश्चितच वाढ झाल्याचे अनुभवास आले.
संस्थेचा हा उपक्रम गरजेतून, स्वयंप्रेरणेने प्रयोगातून उद्दिष्टांकडे जाणारा आहे. यात संस्थेच्या सर्व लाभार्थींचे सहकार्य व आर्थिक योगदान महत्वाचे आहे. संस्थेच्या या योजनेची दखल मुंबई दूरदर्शनने घेवून संस्थेच्या प्रत्यक्ष योजनेचे चित्रीकरण करून 29 जून 2000 रोजी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात प्रसारित करून आम्हाला सुखद धक्का दिला.
कर्नाटक राज्यातील पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने संस्थेस भेट देवून संस्थेच्या कार्याची माहिती घेतली व संस्थेच्या या उपक्रमाचे अनुकरण त्यांच्या राज्यात इतरत्र करता येईल किंवा कसे याबाबतची चर्चा केली.
पाणी वापर संस्थेचे जनक कै.बापूसाहेब उपाध्ये यांच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या ओझर येथील पाणी वापर संस्थेचे आज राज्यस्तरीय पाणी परिषद आयोजित करून पाणी वापर संस्थांना येणाऱ्या समस्यांवर विचारविनिमय करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांना प्रथम धन्यवाद दिले पाहिजेत. या निमित्ताने आमच्या पाणी वापर संस्थेस येणाऱ्या अडी-अडचणींचा विचार व्हावा अशी मागणी करणे अनुचित होणार नाही असे वाटते.
1. शासन जी पाणीपट्टी आकारते ती वेळेवर भरल्यास त्यावर 5 टक्के सवलत मिळते अशी सवलत संस्थेस मिळावी.
2. व्यवस्थापनासाठी असलेल्या पाणीपट्टीत 20 टक्के सवलत मिळावी.
3. शासन कालवा, वितरिका व लघू वितरिका यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी लाखो रूपये खर्चाची तरतूद करते. त्याचप्रमाणे संस्थेचे पाणी वाटप जरी पाईपलाईनद्वारे होत असले तरी त्यासाठी बराच खर्च येतो. उदा. पाईपलाईन फुटणे, पावसाळ्यात नाल्यातील पाईप वाहून जाणे, इले. पंप जळणे,स्टार्टर दुरूस्ती, कदाचित ट्रान्सफॉर्मर जळणे, इ. साठी सभासदांचे प्रतिवर्षी लाखो रूपये खर्च होतात. यासाठी पाटबंधारे खात्याने विशेष योजना तयार करून अनुदान मिळण्यासाठी शिफारस करावी.
4. संस्था स्वखर्चाने पाईपलाईनद्वारे धरणात पाणी टाकते. या धरणात टाकण्यात येणाऱ्या पाण्यावर पाणीपट्टी आकारू नये.
5. संस्थेने विद्युत पंपासाठी दोन ट्रान्सफॉर्मर स्वखर्चाने विकत घेतले. धरण स्थळी असलेला ट्रान्सफॉर्मर पावसाळ्यात 6 महिन्यांकरीता बंद असतो. या बंद कालावधीमध्ये संस्थेला वीज बिल भरावे लागते. ट्रान्सफॉर्मर जितक्या कालावधीसाठी वापरला जातो त्या कालावधीपुरतेच बिल आकारण्यात यावे यासाठी पाटबंधारे खात्याकडून वीज मंडळास योग्य ती शिफारस करण्यात यावी किंवा बंद काळात वीज बिलापोटी शासकीय अनुदान तरतूद व्हावी.
6. शासन जलसिंचनासाठी नार-पार सारख्या अब्जावधी खर्चाच्या योजना राबवित आहेत. तर आमचे धरणात पाण्यचा पुरेसा साठा होण्यासाठी शासनामार्फत आळंदी डॅम ते पिंपळनारे लघु पाटबंधारा अशी एक उपसा जलसिंचन योजना (फक्त धरणातील साठ्यापुरती) करावी, अशी विनंती आहे.
7. पिंपळनारे लघु पाटबंधारा सर्व कार्यसाठी संस्थेच्या ताब्यात मिळावा.
या संस्थेची प्रमुख वैशिष्ठ्ये :
1. पावसाळ्यात नाल्यातील व पाझर तलावातील पाणी उचलून धरणात टाकून धरणाचा पाणी साठा वाढविणे.
2. लाभक्षेत्रातील लाभधारकांचे वेगवेगळे ग्रुप करून पाणी वाटपाचे व व्यवस्थापनाचे अधिकार देणे.
3. सभासदांच्या वर्गणीतून पाणी वापर संस्थेने स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवला असून सदर ट्रान्सफॉर्मरवरून विद्युत पंप चालू बंद करण्याचे नियोजन केले जाते.
4. संस्थेने ठिबक सिंचन योजना राबविल्यामुळे कमीत कमी पाणी नाश व जास्तीत जास्त सिंचन होते.
5. ठिबक सिंचनामुळे द्राक्षबागाचे क्षेत्र वाढले.
6. सर्व लाभधारकांना समान पाणी वाटप करण्याचे धोरण.
7. संपूर्ण योजना स्वभांडवलातून तयार केली असून संस्थेने कोणत्याही वित्त संस्थेने अनुदान अथवा कर्ज घेतलेले नाही.
8.लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांबरोबर विनालाभक्षेत्रातील लाभधारकांचा संस्थेत सहभाग.
9. पाणी वितरण व्यवस्था पीव्हीसी पाईपद्वारे त्यामुळे पाणी वितरणात सुलभता.
लघु पाटबंधारे प्रकल्प पिंपळनारे गेल्या 15 वर्षात एकदाही पूर्ण क्षमतेने भरला नाही. त्यामुळे पुरेसे सिंचन होऊ शकले नाही. गेल्या 15 वर्षात धरणात 10 टक्के ते 63 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे लाभधारकांनी पाणीसाठा कसा वाढवता येईल याचा विचार करून संस्थेने योजना राबविली.
श्रीराम पाणी वापर संस्थेने पाईप लाईनचे ग्रुप तयार केले. पाणी वितरणासाठी ज्या पाईप लाईन तयार केल्या आहेत त्या नदी नाल्यांना ज्या ज्या ठिकाणी क्रॉस होतात त्या त्या ठिकाणी टी कनेक्शन देवून पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी पाईप लाईनद्वारे तलावात टाकले जाते. त्यासाठी एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. पाणी वितरणासाठी 160 अश्वशक्तीचा व पाणी रिफिलिंग करण्यासाठी 100 अश्वशक्तीचा असे दोन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे 10 ते 15 द.ल.घ.फुट पाणीसाठा जास्त होतो व याचा सिंचनासाठी फायदा होतो.
पाणी वापर संस्थेमुळे गावात हरीतक्रांती झाली असून लाभधारकांचे नगदी पिकांचे उत्पादन वाढले आहे. रूब्बी हंगामातील पिकाचे क्षेत्र 550 हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढले आहे व उन्हाळी हंगामातील पिकांचे क्षेत्र 350 हेक्टर पर्यंत वाढले आहे.
पाणीपट्टी वसुली तक्का
संस्था स्थापनेपूर्वी |
| संस्था स्थापनेनंतर |
वर्ष | एकूण वसुल रूपये | एकूण वसुल रूपये |
1992 – 93 | 4894.00 | - |
1993 – 94 | 10472.00 | - |
1994 – 95 | 10767.00 | - |
1995 – 96 | 17604.00 | - |
1996 – 97 | 16976.00 | - |
1997 – 98 | - | 50463.00 |
1998 – 99 | - | 34043.00 |
1999 – 00 | - | 48121.00 |
2000 – 01 | - | 48334.00 |
2001 – 02 | - | 20935.00 |
2002 – 03 | - | 35846.00 |
2003 – 04 | - | 151338.00 |
2004 – 05 | - | 139801.00 |
लघु पाटबंधारे योजना, पिंपळनारे, ता.दिंडोरी (ठळक वैशिष्ट्ये)
1. ल.पा.यो.पूर्ण झाले ते वर्ष | सन 1983 |
2. नदी/नाला | करंजी नदी |
3. भूसंपादीत | 64.00 हेक्टर |
4. बुडीत क्षेत्र | 52.80 हेक्टर |
5. बुडीत गावाचे नांव | रामशेज |
6. खोरे | गोदावरी खोरे |
7. पाणलोट क्षेत्र | 4.88 चौ.कि.मी |
8. पाणीसाठा | अ) उपयुक्त साठा : 77.62 द.ल.घ.फुट |
| ब) एकूण पाणीसाठा 79.40 द.ल.घ.फुट |
| क) मृत पाणीसाठा 1.78 द.ल.घ.फुट |
9. तलांक |
|
नाला तळ 102.27 मी. | धरण माथा 120.00मी. |
विमोचक तळ 107.80 मी. | पिचिंग तळ 107.30 मी. |
पूर्ण संचय पात 117.35 मी. | पिचिंग माथा 118.80 मी. |
पूर पातळी 118.50 मी. | विमोचक विहिर 118.80 मी. |
धरणाची लांबी 910.00 मी. | धरण माथा रूंदी 3.00 मी. |
10. जलोत्सारिका प्रकार क्लीअर ओव्हर फ्लो |
|
लांबी | 45.00 मी. |
इंग्लीश पूर | 3380.00 घ.फु.से. |
माथा रूंदी | 0.90 मी. |
11. मुख्य विमोचक विहीर |
|
आतील व्यास | 3.00 मी. |
बाहेरील व्यास | 4.20 मी. |
उभ्या दांड्याची उंची | 11.00 मी. |
लोखंडी झडप उंची | 0.90 मी. |
12. समादेश क्षेत्रातील गावे व क्षेत्र |
|
पिंपळनारे | 231 हेक्टर |
तळेगाव | 220 हेक्टर |
खतवड | 88.80 हेक्टर |
रामशेज | 10 हेक्टर |
13. समादेश क्षेत्रातील विहिरींची संख्या | 88 क्षेत्र 93.00 हेक्टर |
14. प्रकल्पीय सिंचन क्षमता (आय.सी.ए) | 530 हेक्टर |
15. पिक रचना - खरीप | : 60 टक्के - रब्बी : 50 टक्के –उन्हाळा |
16. समादेश क्षेत्र (जी.सी.ए) | 6,80,00 हेक्टर |
17. लागवडी लायक क्षेत्र (सी.सी.ए) | 540.00 हेक्टर |
18. सिंचन क्षेत्र (आय.सी.ए) | 530.00 हेक्टर |
19. धरणाकडे जाणारा रस्ता | लांबी - 1500 मी. रूंदी 3.00 मी. |
20. ल.पा.योजनेची एकूण | किंमत 57.64 लाख |
21. लाभव्यय प्रमाण | 5.60 |
श्री. यशवंत खांदवे, संस्थापक अध्यक्ष - (भ्र : 9420061490)
/articles/painpalanaarae-upasaa-jalasaincana-yaojanaecai-yasaogaathaa