पिण्याच्या पाण्याच्या समस्या


पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन्स या आतापर्यंत लोखंडी धातूच्या वापरत. अजूनही जून्या नळजोडणीसाठी त्याचाच वापर केलेला आहे. वर्षानुवर्षाच्या वापरामुळे त्या गंजतात, झिजतात आणि पातळ बनतात. काही ठिकाणी नळजोडणी पक्की झाली नसेल किंवा खंडलेली असेल तर जमिनीतील आजूबाजूचे घटक यात मिसळल्या जातात आणि पाणी दूषित होते.

पाण्याचा सर्वाधिक महत्वाचा वापर हा पिण्यासाठी होतो. निरोगी आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे पाणी स्वच्छ आणि शुध्द असावयास हवे. शुध्द पाणी म्हणजे, रंगहीन, गंधहीन, रूचिहीन, रोगाणू आणि अन्य विषाकत द्रव्यांचा अभाव असलेले. जीवनावश्यक घटकांच्या बाबतीत हितावह मात्रेने परिपूर्ण असणारे पारदर्शक पाणी होय. असे आदर्श स्थितीचे पाणी मिळणे व्यवहारात तरी कठीणच आहे, परंतु या आदर्श स्थितीच्या जवळपास गुणवत्ता असणारे पाणी आपण टिकवून ठेवू शकलो तरी मानवी आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे.

पाणी हे सर्वसमावेशक द्रावण आहे. ते तीनही भौतिक स्थितीत जसे की द्रव, घन आणि वायू रूपात पृथ्वीवर अस्तित्वात आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही घटकांना लगेचच सामावून घेण्याचा गुणधर्म असल्याने पाण्यात ते घटक मिसळतात आणि त्या घटकांमुळे पाण्याचे गुणधर्म बदलतात. हे विरघळलेले घटक पाण्यातून पूर्णपणे बाहेर काढून घेणे अतिशय कठीण असते. आणि म्हणूनच नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सांडपाणी किंवा कचरा इ. टाकून देण्याचे कटाक्षाने टाळले पाहिजे.

निसर्गात रासायनिकदृष्ट्या शुध्द पाणी सापडत नाही. पावसाचे पाणी शुध्द समजले जात असले तरी ते जमिनीवर पोहोचेपर्यंत त्यामध्ये हवेतील अनेकविध घटक मिसळतात. त्यानंतर जमिनीशी संपर्क आल्यावर जमिनीवरील सेंद्रीय आणि असेंद्रीय पदार्थ त्यामध्ये मिसळल्या जातात. पाण्याच्या या नैसर्गिक वहनामुळे जलसाठ्यातील पाणी पिण्यायोग्य मानकांमध्ये बसत नाही. म्हृणून पिण्यासाठी हे पाणी वापरण्याआधी त्यावर योग्य ते उपचार किंवा प्रक्रिया करणे आवश्यक ठरते. त्यामुळे त्यातील अतिरिक्त सेंद्रीय आणि असेंद्रीय घटक भौतिक, रासायनिक आणि जैविक पध्दतीने वेगळे करून पाणी पिण्यायोग्य आदर्शाप्रत आणले जाते. ही उपचार पध्दती अत्यंत आवश्यक आहे कारण डोळ्यांना रंगहीन आणि पारदर्शक दिसणारे पाणी पिण्यायोग्य असेलच असे नाही. प्रक्रियेनंतर विविध चाचण्या घेवून, पाण्याचे परिक्षण करूनच ते पिण्यायोग्य आहे किंवा नाही हे ठरविता येते. या जलोपचारण पद्दतीत पाण्याच्या मूळस्त्रोतात गुणधर्मानुसार त्यावर वेगवेगळे उपचार करून सर्वात शेवटी क्लोरिनीकरण केले जाते. क्लोरिनीकरणाने पाण्यातील सर्व सूक्ष्मजीव मरतात.

पाणीपुरवठा करतांना तेथील लोकसंख्येचा विचार करणे अनिवार्य आहे. कोणत्याही गावात/शहरात दरमाणशी पाणीपुरवठा हा तेथील एकूण लोकसंख्येवर तसेच तेथे असलेल्या विविध उद्योगधंदे आणि सोयीसुविधांना पूरक असतो. त्यामुळे महानगरे, शहरे येथे अधिक पाणीपुरवठा तर खेडेगावामध्ये त्यामानाने कमी पाणीपुरवठा होतो. या पार्श्वभूमिवर शहरांमध्ये प्लॅट / सदनिका पध्दतींची घरे, फ्लश पध्दती यामुळे पाण्याचा अनाठायी गैरवापर होतो तर खेड्यांमध्ये पिण्यासारख्या मुलभूत गरजेसाठीही पाणी मिळत नाही असे चित्र दिसते. औद्योगिक क्षेत्र, शेती आणि करमणूक ( उदा. पोहण्याचे तलाव, कारंजे इ.) साठीही पिण्याचेच पाणी वापरल्यामुळे शुध्द पाणी बनविण्याच्या प्रक्रियेवरील खर्च वाढतो आणि सर्वांना समान पाणी या न्यायाने पाणी मिळत नाही. पाण्याचे असमान वितरण याच्याशी अनेक मुद्दे निगडीत आहेत हे मान्य असूनही या असमान वितरणामुळे पाणीटंचाई अधिक तीव्र होत आहे, हे सत्य पाणी अभ्यासकाला स्वीकारावे लागेल.

बेकायदेशीर नळजोडणीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त भार पडतो. अशा नळजोडण्या वर्षानुवर्षे चालू राहतात. काही कालांतराने त्या अधिकृत करण्याची मोहिम राबविल्या जाते. परंतु त्यालाही 100 टक्के प्रतिसाद मिळतोच असे नाही. यामागे अनेक सामाजिक, राजकीय तसेच आर्थिक कारणे आहेत.

अद्यापही आपल्याकडे सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची पध्दत पूर्णत: अवलंबिण्यात येत नाही. यामुळे सांडपाणी मानवी वसाहतींजवळूनच वाहण्याचे दृश्य सगळीकडेच दिसते.

पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन्स या आतापर्यंत लोखंडी धातूच्या वापरत. अजूनही जून्या नळजोडणीसाठी त्याचाच वापर केलेला आहे. वर्षानुवर्षाच्या वापरामुळे त्या गंजतात, झिजतात आणि पातळ बनतात. काही ठिकाणी नळजोडणी पक्की झाली नसेल किंवा खंडलेली असेल तर जमिनीतील आजूबाजूचे घटक यात मिसळल्या जातात आणि पाणी दूषित होते. बऱ्याचदा सांडपाण्याची पाईपलाईन आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही एकमेकाजवळून जात असते. अशावेळेस जर त्या कुठे खंडीत होऊन त्यातील पाणी एकमेकांत मिसळले तर गंभीर आजारास निमंत्रण मिळेल.

सुरक्षित नगररचना ही पध्दत भारतात रूढ झालेली नाही. निश्चित अशी सुनियोजित नगररचना नसल्या कारणाने वेगवेगळ्या पाईपलाईन्सचे जाळे जमिनीखाली पसरलेले आहे. मुंबईसारख्या शहरात तर हे जाळे इतके गुंतागुंतीचे आहे की भविष्यात एखादे संकट आल्यास मानवीजीवन अक्षरश: ठप्प पडेल असे तज्ञांचे मत आहे. पाणीपुरवठ्याची नळजोडणी हे एक विशिष्ट शास्त्रशुध्द तंत्र आहे. त्यानुसार त्या केलेल्या असल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर ठोस उपाय निधू शकतात. परंतु बऱ्याचदा अशा तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष होते आणि मग त्याचे पर्यवसन जलवाहिनी फुटणे, नळजोडणी गंजणे, झिजणे व पाण्यात अपायकारक घटक मिसळणे इ. बाबी घडतात. एकूणच पाणीपुरवठा करण्याची पध्दत ही अतिशय महत्वाची असून त्याच्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केल्यास पाण्याचा प्रचंड अपव्यय आणि प्रदूषण होण्याची सक्यता असते.

जलसाठे हे भौगोलिकदृष्ट्या सखल भागात आणि जलशुध्दीकरण केंद्र हे उंच भागावर असेल तर पाणी उपशासाठीच भरपूर वीज खर्च होते, पर्यायाने जलशुध्दीकरणावरचा खर्च वाढतो. औरंगाबाद शहर हे याचे उदाहरण आहे. जलशुध्दीकरण यंत्रणा पाणी पुरवठ्याचे वितरण आणि पाणीपट्टी भरून जमा होणारी रक्कम याचे प्रमाण थोड्याफार फरकाने सारखे असल्यास पराणीपुरवठा व्यवस्थेवर आर्थिक बोजा पडत नाही. परंतु तसे नसल्यास ती तोट्यात जाते आणि भविष्यात नागरिकांवर अधिक कर भरण्याची वेळ येते.

शुध्दीकरण केलेले पाणी आपण शिळे समजून ओतून देतो हा तर पाण्याच्या संदर्भात मोठा गुन्हाच आहे. कारण धरणे, नदी, तलाव इ. तून पाणी एका ठिकाणी आणून त्यावर शुद्दीकरणाची प्रक्रिया करणे त्यानंतर ते शहरभर वितरित करणे यामागे प्रचंड आर्थिक आणि तांत्रिक गुंतवणूक असते. त्याचे मूल्य आपण पाणीपट्टी भरून देवू शकत नाही. आणि म्हणूनच अशा वेळेस पाण्याची होईल तेवढी बचत करणे हेच धोरण सर्वांनी स्वीकाराला हवे.

डॉ. क्षमा खोब्रागडे, औरंगाबाद - (भ्र : 9822294639)

Path Alias

/articles/painayaacayaa-paanayaacayaa-samasayaa

Post By: Hindi
×