पिण्याचे पाणी व आपण


आरोग्य - सेवा म्हंटले की, आपणासमोर रूग्णालये, त्यातील रूग्ण, रूग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, परिचारीका असे चित्र उभे राहते. रूग्णसेवा ही महत्त्वपूर्ण आरोग्य - सेवा आहे. परंतु रूग्ण निर्माण होऊच नयेत यासाठी दिली जाणारी आरोग्य सेवा जास्त महत्त्वपूर्ण आहे. अनेक आजार हे जीवाणू व विषाणूमुळे होतात. अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आपणाकडे दोन उपाय आहेत.

आरोग्य - सेवा म्हंटले की, आपणासमोर रूग्णालये, त्यातील रूग्ण, रूग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, परिचारीका असे चित्र उभे राहते. रूग्णसेवा ही महत्त्वपूर्ण आरोग्य - सेवा आहे. परंतु रूग्ण निर्माण होऊच नयेत यासाठी दिली जाणारी आरोग्य सेवा जास्त महत्त्वपूर्ण आहे. अनेक आजार हे जीवाणू व विषाणूमुळे होतात. अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आपणाकडे दोन उपाय आहेत. एक म्हणजे रोगप्रतिबंधात्मक लसी घेऊन विशिष्ट रोगांसाठी कायमचा प्रतिबंध करणे. दुसरा म्हणजे ज्या रोगांसाठी प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध नाहीत अशा रोगांचे जिवाणू, विषाणू व एकपेशीय जीव यांचा शरीरात शिरकावच होऊ न देणे.

हे असे रोगजिवाणू, विषाणू व एकपेशीय जीव दूषित पिण्याच्या पाण्यातूनच आपल्या शरीरात शिरकाव करीत असतात. अनेक प्रकारची कार्बनी व अकार्बनी रसायने विरघळण्यासाठी पाणी हे उत्तम द्रावक आहे. तसेच न विरघळणारे सूक्ष्म कण पाण्यात तरंगत्या अवस्थेत राहू शकतात.

आपणास पिण्याच्या पाण्याचे खरेखुरे अंतरंग जाणून घ्यायचे असेल तर ते प्रयोगशाळेतील पृथ:करणानंतरच जाणून घेता येते. त्यातूनच पाण्याची गुणवत्ता कशी आहे हे स्वच्छ, पारदर्शक, चवीला चांगले व वाईट वास नसलेले एवढेच गुणधर्म पाहू शकतो. पाण्याची गुणवत्ता माहीत होण्यासाठी एवढेच गुणधर्म पुरेसे होत नाहीत.

पिण्याच्या पाण्याचे मुख्यत्वे दोन स्त्रोत आपणास उपलब्ध आहेत. भूजल व भूपृष्ठावरील पाणी. हे दोन्ही स्त्रोत प्रदूषित असू शकतात. वाढती कारखानदारी, शहरीकरण, सांडपाण्याची अयोग्य विल्हेवाट, मानवी कृति- ही पाणी स्त्रोत प्रदूषित होण्याची प्रमुख कारणे आहेत. वरवर डोळ्याने स्वच्छ दिसणारे पाणी त्यात विरघळलेल्या रासायनिक पदार्थामुळे प्रदूषित असू शकते. तसेच त्यात न दिसणारे सूक्ष्म कण तरंगत्या अवस्थेत असू शकतात.

पाण्याची गुणवत्ता माहीत करून घेण्यासाठी प्रयोगशाळेत मुख्यत्वे दोन प्रकारच्या तपासण्या केल्या जातात.

1. सूक्ष्मजीव शास्त्रीय तपासणी व
2. रासायनिक तपासणी

सूक्ष्मजीव अनेक प्रकारचे असतात. पाण्याची सूक्ष्मजीवीय गुणवत्ता तपासण्यासाठी ठराविक जिवाणूंसाठीच चाचणी घेतली जाते. जे जिवाणू अस्वच्छ वातावरणात हमखास आढळतात असेच जिवाणू पाण्यात आहेत की नाहीत हे पाहिले जाते. यावरून पाण्याची सूक्ष्मजीवीय गुणवत्ता चांगली की वाईट हे ठरविले जाते. या तपासणीत पिण्याच्या पाण्यात मानवी किंवा प्राण्याच्या विष्ठेचे अंश मिसळले गेले आहेत किंवा नाही हेही निश्चित करता येते. असे जिवाणू पाण्यात आढळल्यास या पाण्यापासून जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते. कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, विषमज्वर हे पाण्यात असणाऱ्या जिवाणूंमुळे होणारे रोग आहेत. कावीळ, पोलीओ व काही अतिसाराचे प्रकार हे विषाणूमुळे होणारे रोग आहेत. पाण्याची सूक्ष्मजीवशास्त्रीय गुणवत्ता वाईट असेल तर वरील सर्व जलजन्य आजार होण्याचा धोका असतो.

दूषित पाण्यात वास्तव्य करू शकणाऱ्या रोगजिवाणूंची व रोगविषाणूंची यादी मोठी आहे. सर्वसाधारणपणे आपल्या ग्रामीण भागात व कधी कधी शहरी भागात गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, विषमज्वर, कावीळ अशा रोगांच्या साथी नेहमीच आढळून येतात. साथ मोठ्या प्रमाणावर असली की नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते. कधी कधी मृत्यूही होतात. रोगांची लागण व मृत्यू दोन्हीही टाळावयाचे असल्यास स्वच्छता व पाणी शुध्दीकरण या दोन्ही बाबींना आपण महत्त्व दिले पाहिजे.

दूषित पाण्यात जीवाणूंची वाढ कशी होते?


सांडपाणी व मलमूत्राची विल्हेवाट व्यवस्थित नसेल तर त्यांचे अंश पाणी स्त्रोतात मिसळतात. यात विघटनशील कार्बनी पदार्थ असतात. हे जीवाणूंचे अन्न असते व त्यावरच जिवाणू वाढतात. विषाणूंचे मात्र दूषित पाण्यात फक्त अस्तित्व असते. शरीरात गेल्यावर त्यांच्या संख्येत वाढ होते.

परिसर अस्वच्छता व वैयक्तिक अस्वच्छता यामुळेही पाणी स्त्रोत व पाणी साठे दूषित होतात. प्रत्येक स्त्रोत दूषित आहे असे गृहीत धरूनच त्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करणे गरजेचे होऊन बसले आहे.

पाणी पुरवठा योजनेत पाणी शुध्द करूनच जलवाहिन्यांमार्फत आपणास पुरविले जाते. जलवाहिन्यात गळत्या असतील तर शुध्द केलेले पाणी पुन्हा अशुध्द होते.

ग्रामीण भागात भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी होतो. प्रक्रिया न करताच हा वापर होत असतो. जमिनीत लपलेले पाणी शुध्दच असते असा एक समज आहे. प्रयोगशाळेतील तपासणीवरून असे लक्षात आले आहे की, भूजलातही मलप्रदूषण व रासायनिक प्रदूषण झालेले आहे.

आपण घरगुती पातळीवर पाणी शुध्दीकरणाच्या सोप्या सोप्या पध्दती माहिती करून घेतल्या पाहिजेत व त्याचा नियमित अवलंब केला पाहिजे.

सूक्ष्मजीवांपासून पाणी मुक्त करावयाचे झाल्यास उकळणे, सूक्ष्म - गाळण व क्लोरीनेशन या पध्दती प्रभावी आहेत. त्याचा वापर कसा करावयाचा हे आपण जाणून घेतले पाहिजे.

सूक्ष्मजीवीय गुणवत्तेबरोबरच पाण्याची रासायनिक गुणवत्ता आपण जाणून घेतली पाहिजे. पिण्याच्या पाण्यात निसर्गत:च काही क्षार ठराविक प्रमाणात विरघळलेले असतात. म्हणूनच पाण्याला पिण्यालायक ग्राह्य चव असते. या क्षारांचे प्रमाण काही कारणामुळे जास्त झाल्यास पाण्याची चव बदलते. काही हापशाचे किंवा विहीरीचे पाणी खारे असते तर काही ठिकाणी मचूळ चव असते तर एखाद्या ठिकाणी कडवट चव असते. या वेगवेगळ्या चवीला वेगवेगळे क्षार जबाबदार असतात. रासायनिक तपासणीत विविध चाचण्या घेऊन पाण्याची गुणवत्ता ठरविली जाते. क्षारता, काठिण्य, नत्रांचे प्रमाण, एकूण विरघळलेले स्थायू पादर्थ, लोह, फ्लोराईड अशा विविध चाचण्या घेऊन त्याचे प्रमाण पाहिले जाते. भारतीय मानक संस्थेने ठरवून दिलेल्या प्रमाणकापेक्षा घटकांचे प्रमाण जास्त असेल तर पाणी पिण्यास अयोग्य ठरविले जाते.

भूजलात क्षारांचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. भूस्तरात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास तेथील भूजलात क्षारता व काठीण्य जास्त आढळून येते. ही बाब नैसर्गिक असते. नवीन कूपनलीका किंवा विहीर खणल्यानंतर तेथील पाण्याची प्रथम रासायनिक तपासणी करून घेणे आवश्यक असते. क्षारयुक्त पाण्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होवू शकतात.

कारखान्यातील सांडपाण्याची प्रक्रिया न करता विल्हेवाट लावल्यास हे पाणी नदीच्या पाण्यात तसेच भूजल पातळीपर्यंत जाऊ शकते व मूळ स्त्रोत प्रदूषित होऊ शकतात. यामध्ये आरोग्याला अपायकारक रसायनेही असू शकतात. पाण्यातील विविध क्षारांमुळे विविध प्रकारचे शारीरिक विकार झाल्याचे आढळून आले आहे. त्याची काही उदाहरणे अशी आहेत - फ्लोराईडमुळे दातांचा व हाडाचा फ्लोरोसीस होतो, अर्सेनिकमुळे त्वचा काळी ठीक्कर पडते व तळहातावर, तळपायावर फोडे येतात. त्वचेचा कर्करोग होतो. लोहामुळे आतड्याला इजा पोहोचते, कॅलशीयम मॅग्नेशीयमच्या काठीण्यामुळे मूत्र - मार्गातील खडे होण्याची शक्यता असते. एकूण विरघळलेले क्षार जास्त असल्यास पचनसंस्था बिघडते. रक्तदाब वाढून हृदयविकार होऊ शकतात, नत्रांच्या क्षारामुळे लहान मुलांत अंग निळे पडण्याचा विकार होतो. नत्रांच्या क्षारात कर्करोगजन्यता असते. शिस्यामुळे मेंदूचे विकार जडतात. तांबे, जस्त यांचे प्रमाण जास्त झाल्यास विषारी परिणाम होतात. किटकनाशकाचे अंश पाण्यात राहिल्यास प्रजनन संस्थेवर विपरीत परिणाम होतात. एकूणच पाण्यातील रासायनिक प्रदूषण आरोग्यासाठी घातक आहे.

या सर्व प्रदूषकांपासून वाचण्यासाठी सध्या बाटलीबंद पाणी विकण्याचा व्यवसाय जोरात आहे. यात प्रामाणिकपणा असेल तर आरोग्यासाठी ते चांगलेच आहे.

कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडावे यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे त्यावर नियंत्रण असते. बाटलीबंद पाणी विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण असते. शहरातील शुध्द पाणीपुरवठा हा नगरपालिका व महापालिकेच्या नियंत्रणात असतो. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा हा ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्या नियंत्रणात असतो. या सर्व संस्था एक प्रकारे आपणास आरोग्यसेवाच पुरवत असतात. या सर्व संस्थांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे डॉक्टरांवरचा रूग्णसेवेचा ताण निश्चितच कमी होईल. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध बरा या म्हणीलाही अर्थ प्राप्त होईल.

वरील सर्व संस्थांची शुध्द पाणी पुरवण्याची जबाबदारी असली तरी आपण सर्वजणही पाणी शुध्द राखण्यास तेवढेच जबाबदार आहोत.

जोपर्यंत आपण आपल्या शरीरात, घरात, उद्योगधंद्यात व सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारी घाण परिसराचा विचार न करता जशीच्या तशी परीसरात टाकत राहू तोपर्यंत पाणी गुणवत्तेचा प्रश्न आपणास सतत भेडसावत राहणार आहे.

पाणी ही आपली मूलभूत गरज आहे. आपले आरोग्य अबाधीत राहण्यासाठी व आपले राष्ट्र अधिक बलवान करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता वाढवून ती नेहमीसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू या.

पिण्याच्या पाण्याविषयी आपणास अधिक शास्त्रीय माहिती खालील पुस्तकातून मिळेल -पिण्याच्या पाण्याविषयी सर्व काही

प्रकाशक मनोविकास प्रकाशन, शक्ति टॉवर्स लोखंडे तालमीजवळ, नारायणपेठ, पुणे

लेखक : डॉ.पी.जी.कुलकर्णी ( वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य प्रयोगशाळा, नाशिक भ्रमणध्वनी : 9423396482)

Path Alias

/articles/painayaacae-paanai-va-apana

Post By: Hindi
×