पाऊस जपून ठेवला पाहिजे - 1


प्राचीन काळी लोकांनी पाण्याच्या समृध्दीकडे व पाणी टिकविण्याकडे लक्ष दिले आहे. ऐतिहासिक पाणी वयवस्थापनाची केंद्रे शोधणे आजही महत्वाचे ठरणार आहे. प्रत्येक ठिकाणी पाणी व्यवस्थापनात वेगवेगळे कौशल्य, वेगवगेळी तंत्रे, त्या त्या प्रदेशातील हवामानांशी, भूगोलाशी, समाजिक व्यवस्थांशी निगडीत झालेली दिसतात. जलसंचय किंवा पाण्याची साठवण हा जलव्यवस्थापनाचा भाग आहे.

पाण्याला जीवन म्हंटले आहे. मानवाच्या जगण्याच्या तीन महत्वाच्या गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. पण सर्वात महत्वाची गरज ऑक्सीजन आणि पाणी, मानवी शरीर हे ७० टक्के पाण्याने व्यापलेले आहे. यावरून मानवाला पाण्याची किती गरज आहे हे लक्षात येते.

आचार्य वराहमिहीराने बृहत्संहिता या ग्रंथात दकार्गलाच्यात पाण्याचे महत्व, अन्नाचे महत्व व भूगर्भातून पाणी कसे प्राप्त होईल याविषयांचे सांगोपांग विवेचन केले आहे. पहिल्या श्‍लोकात अन्नं जगत:प्राणा: असे म्हंटले आहे. याचा अर्थ सर्व जिवीत प्राणांसाठी अन्न हेच प्राण आहे. अन्न नसेल तर मनुष्यादी प्राणी जगू शकणार नाही. पण त्यापुढे आचार्य म्हणतात -

प्रावृष कालस्य अन्नमायत्त्म् ।
यस्मादत्त: परीक्ष्य प्रावृषकाल: प्रयत्नेन ।


प्रावृतकाल: याचा अर्थ वर्षाकाल म्हणजे पावसाळा वर्षाकालामुळे अन्न पिकते, उगवते म्हणून पावसाळ्याची परीक्षा ही प्रयत्नपूर्वक करावी म्हणजे पर्जन्यविद्येचा अभ्यास करावा. म्हणजेच पाण्याची जपणूक करावी असे सांगितले आहे. भगवत्गीतेच्या तिसर्‍या अध्यायातसुध्दा अन्नाद्भवान्ति भूतानि पर्जन्यास अन्नसम्भव:। असे म्हटले आहे. याचा अर्थ अन्नापासून जिवीत प्राणी होतात व पावसामुळे अन्न निर्माण होते.

प्राचीन काळापासून हा पावसाच्या अभ्यासाचा व हे पडलेले पाणी जपून ठेवण्याचा विचार आमच्या पूर्वजांनी केलेला आहे. वराहमिहीरांनी जीवन, अन्न व पर्जन्य यांचा एकमेकांतील संबंध अभ्यासपूर्णरितीने सांगितला आहे.

प्राचीन काळातील महर्षि गर्म, महार्षि पराशर व महर्षि कश्यप यांनी पावसाच्या भाकिताविषयी संशोधन व मार्गदर्शन केलेले आहे. प्राचीन ऋषींच्या मार्गदर्शनांचा अभ्यास करून त्यानुसार अवलोकन व निरीक्षण करून आजही अनेक योजना आखणे शक्य झाले आहे.

वरहामिहिराने पाणी साठवण्याचा उपाय सांगितला आहे. पूर्व - पश्‍चिम लांबी असलेल्या विहीरीत किंवा पाणवठ्यात पाणी बराच काळ राहते. असे ११८ व्या श्‍लोकात सांगितले आहे. दक्षिणोत्तर लांबी असलेल्या हौदात बराच काळ पाणी राहत नाही. जर दक्षिणोत्तर वापी बनविण्याची इच्छा असेल तर कठीण लाकडांनी किंवा पाषाणांनी बांधून ध्याव्यात व मातीचा प्रत्येक थर हत्ती - घोड्यांकडून तुडवून घ्यावा.

पालीप्रागपरायताम्बु सुचिरं धत्ते न याम्योत्तरा कल्लोलैखदारमेति मरूता सा प्रायश: प्रेरितै।तां चेदिच्छति सारदारूमिरपां सम्पात मावारयेत्

पाषाणादि वा प्रतिचयं क्षुण्णं व्द्विपाश्‍वादित्रि:॥११८॥

विहीर बांधतांना विहीरीच्या काठावर वड, आंबा, कदम्ब, निचुल, जांभूळ, वेत, कुरबक, ताल, अहलेक, मधुक, बकुल इ. झाडे लावावीत.

वराहमिहिराने हा जो झाडांचा उल्लेख केला आहे, तो विशेष महत्वाचा आहे. ही झाडे photosynthesis जमिनीत खोलवर पाण्यापर्यंत जाणारी आहेत. ही झाडे जमिनीतील पाणी साठविण्यासाठी मदत करतात. म्हणून ह्या झाडांची विहीरीच्या कडेने लागवड करावी, असे वराहमिहिराने सांगितले आहे.

विहीरीतून किंवा मोठ्या हौदातून पाणी बाहेर जाण्याचा मार्ग एकाच बाजूला असावा व तो दगडांनी बांधून काढावा असे सांगितले आहे. तो मार्ग छिद्ररहित दरवाजासारखा करून वरून मातीचा लेप देवून तो हवाबंद करावा. याचे वर्णन करणारा श्‍लोक पुढीलप्रमाणे आहे -

द्वारं च नैर्कहिमेकदेशे कार्य शिलासात्र्चितवारिर्मागम्म।
कोशास्थितं निर्विवरं कपाटं कृला तत: पांशुभिरावफ्तम्म् ।


या प्रमाणे वरील ३ श्‍लोकांमधून वराहमिहिराने कृत्रिम पाणवठा करण्यास सांगितले आहे.

पाऊस जपून ठेवला पाहिजे :


प्राचीन काळापासून जलव्यवस्थापनेचा विचार आला आहे. आपला समाज कितीही समृध्द असला तरी पाण्याबाबतीत तो तोपर्यंत जागरूक राहणार नाही तोपर्यंत त्या समृध्दीला शाश्‍वतता लाभणार नाही.

प्राचीन काळी लोकांनी पाण्याच्या समृध्दीकडे व पाणी टिकविण्याकडे लक्ष दिले आहे. ऐतिहासिक पाणी वयवस्थापनाची केंद्रे शोधणे आजही महत्वाचे ठरणार आहे. प्रत्येक ठिकाणी पाणी व्यवस्थापनात वेगवेगळे कौशल्य, वेगवगेळी तंत्रे, त्या त्या प्रदेशातील हवामानांशी, भूगोलाशी, समाजिक व्यवस्थांशी निगडीत झालेली दिसतात. जलसंचय किंवा पाण्याची साठवण हा जलव्यवस्थापनाचा भाग आहे.

पाणी साठविण्याची जुनी साधने पुनश्‍च अर्थान्वित उरून जसेच्या तसे वापरता येणे शक्य नसले तरी या साधननिर्मिती मागचे कौशल्य, शहाणपण आणि त्यातून मिळणारा संदेश मात्र शाश्‍वत स्वरूपाचा राहील.

आजचे युग विज्ञानयुग आहे. प्राचीन पाणी व्यवस्थापन वैज्ञानिक तत्वांवरच आकारलेले आहे. या तत्वाचा आधुनिक जीवनात कसा उपयोग करून घेता येईल यावरचिंतन होण्याची गरज आहे. इतिहास आणि आधुनिक काळ यांची सांगड घालून समाजाचे पाण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काही पावले टाकता येतील का - यासाठी हा लेखन प्रपंच !

आधुनिक काळातील पाण्याच्या पुनर्भरण या कल्पनेत वराहमिहिराच्या भूगर्भातील पाणी साठविणे या कल्पनेचे बीज लपलेले आहे. पाचव्या शतकात होवून गेलेल्या वराहमिहिराने पाऊस जपून ठेवण्याचा महत्वाचा संदेश दिला आहे. वैज्ञानिक तंत्रानुसार या पावसाची जपणूक व काळजी घेणे मानवाच्या हातात आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात पाणी साठवण कशी शक्य आहे याचा विचार करता येईल.

भूगर्भातील पाणी आणि महाराष्ट्र :


महाराष्ट्राच्या पाणी पुरवठ्यात भूगर्भातील पाणी पुरवठ्यास निरनिराळ्या कारणांनी महत्व प्राप्त झाले आहे. एक तर हा भाग हवामानाचा विचार करता पिकांच्या वाढीस उत्तम आहे. म्हणजे या भागात वर्षभर पीक वाढू शकेल. पिकांची वाढ वर्षभर होत राहणार म्हणजे त्यास वर्षभर पाणी पुरवठा करावा लागणार, तरच ही वाढ होत राहणार. यासाठी वर्षभर पाणी पुरवठा पाहिजे.

महाराष्ट्रात पडणारा पाऊस पाहिला तर तो अवघा चारच महिने पडतो. उरलेले आठ महिने पावसाशिवाय जातात. पिकाच्या वाढीसाठी हे आठ महिने पाणी पुरवठा करावयास हवा. नद्यांचे पाणी फारच कमी क्षेत्राला उपयोगी पडते. कारण या नद्या जास्तीत जास्त खोल जागेतून वाहात आहेत. अशा परिस्थितीत भूगर्भातील पाणी उपयुक्त ठरेल.

महाराष्ट्राचा भूगर्भ पाणी साठवून ठेवण्यास फारच उपयुक्त आहे. हा भूगर्भ भेगाळ दगडाचा आहे. या दगडाचे एकावर एक असे सुमारे २५ ते ३० फूट खोलीचे थर आहेत व हे थर भेगाळलेले आहेत. मूलत: हे थर दगडाचा रस गार होवून बनलेले असल्याने हा रस गार होताना त्यास भेगा पडलेल्या आहेत. याशिवाय दोन दगडांच्या थरामध्ये एक मुरमाचा थर आहे. याशिवाय ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी काही ठिकाणी वाफ किंवा इतर वायु कोंडले जावून विवरे तयार झाली आहे. याप्रकारे पाणी साठविण्यास या भागात पुष्कळ जागा आहे. दगडाचे असे हे थर सुमारे १०००० फुटांपर्यंत खोल आहेत व या काळ्या दगडाच्या भागाची लांबी - रूंदी सुमारे ४०० द २५० ते ३०० मैल आहे यावरून या भागाचा भूगर्भात पाणी साठवून ठेवण्यास किती वाव आहे याची कल्पना येईल. पण पाणी असूनही पाणी वाहून जाते व जरूर त्यावेळी मिळत नाही, असा अनुभव आहे.

पाणी पुरवठ्यावर परिणाम करणारी पहिली गोष्ट म्हणजे पाऊस होय. आपण ज्यास भूगर्भातील पाणी म्हणतो, ते मुख्यत: भूपृष्ठावर पडलेल्या पावसाचेच असते. पाऊस जमिनीतून मुरून आतील भेगांतून वाहात जावून विहीरीतून मिळतो, तेच भूगर्भातील पाणी होय. वास्तविक ते पाणी पावसाचेच असते. तेव्हा भूगर्भातील पाण्यावर परिणाम करणारा महत्वाचा घटक जर कोणता असेल तर तो पाऊस होय.

भूपृष्ठाची पाणी मुरविण्याची पात्रता पाणी जपणूक करण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे व भिज पावसाने पडले, जमिनीचा उतारही ४/६ फुटांचा दर मैलास असला व भूपृष्ठ हा कडक दगडांचा अथवा चिकणमातीचा असला तर त्यात एक थेंबही मुरू शकणार नाही.

भूपृष्ठावर पाणी पडल्यास जर त्या ठिकाणी माती असेल तर पाणी मुरण्यास वाव मिळेल. मातीचे कण हे विरळ असतात व दोन कणांमध्ये मोकळी जागा असते. कणांचा आकार साधारणपणे वाटोळा असतो. व त्यामुळे चार कणांमध्ये एक त्या कणांच्या मानाने मोठी पोकळी असते. मातीचे कण जितके बारीक तितके या पोकळीचे प्रमाण जास्त परंतु त्या मानाने ते पाणी पाझरण्यास अक्षर मुरवून घेण्यास मात्र कमी. उदा. वाळूसारखे मोठाले कण घेतल्यास त्यात पडणारे सर्व पाणी मुरू शकेल.

वराहमिहीराच्या दकार्गलाध्यायातील कित्येक श्‍लोकांमध्ये वालुकामिश्रित जमिनीचे वर्णन विपुल पाणी असल्याच्या संदर्भातील आहेत. वालुकामय जमिनीत पाणी भरपूर मिळेल. असे वराहमिहीराने सांगितले आहे.

पडणार्‍या व मुरणार्‍या पावसाच्या प्रमाणाचा अभ्यास मध्यवर्ती कृषि संशोधन संस्थेतर्फे करण्यात आला आहे., पाऊस उतार व भूपृष्ठाची रचना यादृष्टीने हा भाग भूगर्भातील पाणी पुरवण्यास तोषक असा आहे. तापी खोर्‍याचाही यात समावेश आहे. या भागात काळी जमिन तर आहेच पण तिच्या जोडीला गाळवर जमिनही आहे त्यामुळे हा ही भाग या दृष्टीने चांगला आहे. देशभरातील जमिनी या दृष्टीने चांगल्या आहेत.

भूगर्भाची मुरलेले पाणी साठवून ठेवण्याची पात्रता हा विचारणीय भाग आहे. चांगला पाऊस पडून तो भरपूर मुरला आणि जमिनीत तो राहू शकला नाही व पडला तसा खालून वाहून गेला तर त्याचा उपयोग होणार नाबी. वाळू असलेल्या प्रदेशात पडणारे सर्व पाणी जरी मुरले तरी ते वाळू मुरवून ठेवू शकणार नाही. वाळूचे कण मिळाले असल्याने त्यांच्या आकर्षण - शक्तीच्या मानानेच ते पाणी धारण करू शकणार. हे कण फारसे पाणी धारण करू शकत नाहीत. मात्र त्यांच्यात पाणी साठवूण ठेवण्यास जागा भरपूर असते. अशा प्रकारची परिस्थिती समुद्रतळात पहावयास सापडते. कोकणात थोड्या भागात अशी वालुकामय जमीन आहे. तीत पडणारे पाणी मुरते परंतु लागलीच ते वाहूनही जाते. अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात फारशा ठिकाणी नाही. काही नद्यांच्या आसपास मात्र अशी परिस्थिती पहावयांस मिळते. या नद्या बारमाही वाहणार्‍या असल्याने यात पाणी साठते व ते नेहमी मिळत असते. अशी परिस्थिती इंद्रायणी नदीच्या काठी चर्चेली म्हणून एक गाव आहे तेथे पहावयास मिळते. या विहीरींना कायम पाणी आहे. अगदी लहान विहीरींतून दोन मीटरपर्यंत पाणी सतत निघत आहे.

अशाच प्रकारचा भूगर्भ कोकण भागात जेथे जांभळ्या दगडाचा भाग आहे तेथे आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यात या दगडाची जाडी सुमारे १२५ फुटांपर्यंत आढळते. हा जांभा दगड, काळ्या दगडांतील गारगोटी धुवून जावून तयार झाला आहे. काळ्या दगडाचे पृथकरण, डॉ. कृष्णन् यांनी दिले आहे. त्यात या दगडांत सुमारे ५१ टक्के सिलिका आहे. असे दिले आहे. त्याचप्रमाणे लोह व Aluminium असल्याचे लिहिले आहे. यातील सिलिका धूवून गेली आहे व लोखंड व Aluminium यांचा ऑक्सिजनशी संयोग होवून त्यांची ऑक्साईड तयार झाली आहेत. हाच जांभा दगड (लॅटराईट) होय. यातील ५१ टक्के भाग धूवून गेल्यामुळे या दगडात ही सर्व जागा मोकळी आहे. अर्थात या दगडात इतकी जागा पाणी साठविता येण्याजोगी आहे. यात मात्र याच्या बारीक कणांमुळे पाणी मुरण्यास फारच वेळ लागतो.

मुरल्यावर मात्र साठविण्यास यात भरपूर वाव आहे. हा वाव ५० टक्के पर्यंत आहे. या भागात पाऊस २५० इंच जरी पडला तरी ती सर्व मुरविण्यास समर्थ असा हा जांभा दगड आहे. मात्र या दगडाच्या वरच्या थराने पाणी मुरवून घेतले पाहिजे किंवा त्यात मुरेल अशी योजना आपण केली पाहिजे. यानंतरचा भाग म्हणजे संक्रमण भाग होय. यात भूपृष्ठ व भूगर्भ हे दोन्ही पाणी पुरवण्यास अनुकूल आहेत. भूपृष्ठाचे कण मध्यम असून पाणी मुरू शकते. उतार बेताचा असल्याने मुरलेले पाणी वाहून जात नाही व भूगर्भही ते सर्व मुरविण्यास समर्थ असाच आहे. या भागात भूगर्भास असणार्‍या दगडाच्या भेगाही साहाय्यभूत होतात. काळ्या दगडाच्या भागातील प्रत्येक थर सुमारे २५ फूट जाडीचा आहे. त्याच्या वरचा भाग ठिसूळ असून पाणी साठवण्यास वाव आहे. तसाच या सर्वच २५ फूट जाडीस भेगा असल्याने त्यातही पाणी मुरण्यास वाव आहे. अशी परिस्थिती या भागात आढळते.

जमिनीत पाणी मुरवणे या विषयावर बरेच संशोधन झाले आहे. जमिनीत पाणी मुरण्याची क्रिया ही त्या जमिनीची खोली व त्या जमिनीचे कण आणि त्या जमिनीत पाणी शोषण करून घेणारे सेंद्रीय पदार्थ Organic matter यावर अवलंबून असते. जमिनीचे कण बारीक असल्यास त्यात बरीच जागा मोकळी असते. त्या मोकळ्या जागेत पावसाचे पडलेले पाणी राहते. ज्या मानाने जमिनीचे कण बारीक अगर मोठे असतील त्या मानाने त्यात असणार्‍या मोकळ्या जागेचे प्रमाण कमी अधिक असते. याविषयावर अमेरिकेत बरेच संशोधन झाले आहे. टोलमन यांनी आपल्या पुस्तकात जो जो जमिनीतील कण मोठा तो एकूण जमिनीतील मोकळी जाहा असा निष्कर्ष काढला आहे.

खालील चार प्रकारची जमीन घेवून त्यात मोकळी जागा किती आहे याचे प्रमाण काढले आहे -

१. माळजमीन - ४८ टक्के मोकळी जागा
२. मध्यम जमीन - ५० टक्के मोकळी जागा
३. काळी जमीन - ५५ टक्के मोकळी जागा
४. पानमळा जमीन - ५८ टक्के मोकळी जागा

पुढील अंकात........

श्रीमती रजनी जोशी, मो : २१८४२२४०६७

Path Alias

/articles/paausa-japauuna-thaevalaa-paahaijae-1

Post By: Hindi
×