या वर्षी महाराष्ट्रात एक नवीनच गोष्ट जाणवली. पाणी प्रश्नाचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर ठिकठिकाणी जलस्त्रोत वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. तलाव, नदी, नाले, बंधारे यात जमा झालेला गाळ काढून पाण्याचे साठे वाढविण्याचे यशस्वी प्रयोग खेडोपाडी करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात स्थित असलेल्या पळशी या गावी लोक सहभागातून मोठे काम उभे राहिले.
या वर्षी महाराष्ट्रात एक नवीनच गोष्ट जाणवली. पाणी प्रश्नाचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर ठिकठिकाणी जलस्त्रोत वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. तलाव, नदी, नाले, बंधारे यात जमा झालेला गाळ काढून पाण्याचे साठे वाढविण्याचे यशस्वी प्रयोग खेडोपाडी करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात स्थित असलेल्या पळशी या गावी लोक सहभागातून मोठे काम उभे राहिले. गावकरी, जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वयंसेवी संस्था यांनी फक्त 19 दिवसात साडेछत्तीस हजार घनमीटर गाळ उपसला. बंधारा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला असून ग्रामस्थांना विकासाची नवी दिशा दिसली आहे.कोरेगाव तालुक्यात वसना नदीच्या तीरावर पळशी नावाचे गाव वसले आहे. या नदीवर सुळकेश्वर नावाचा बंधारा 100 - 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. याची बांधणी संपूर्ण दगडात असून उंची 38 फूट व लांबी 200 फूट आहे. या बंधाऱ्यातून आसमंतातील गावांना सिंचनासाठी पाणी मिळत होते. पण गेल्या काही वर्षांपासून गाळ जमा झाल्यामुळे बंधाऱ्याची साठवण क्षमता सतत घसरत होती.
या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ.अविनाश पोळ यांच्याशी या बंधाऱ्यात जलसाठा वाढविण्याबाबत चर्चा केली. त्यांनी गावकऱ्यांना या बंधाऱ्यातील गाळ काढण्याची सूचना केली. जनकल्याण समिती, आयडीबीआय बँक व जिल्हाधिकारी डॉ.रामस्वामी यांनी ही सूचना अंमलात आणली व लोक सहभागाने कल्पना वास्तवात आणण्याचे ठरविले. बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी एक डोझर, चार पोकलेन, दोन जेसीबी, चार डंपर व पंधरा ट्रॅक्टर यांची मदत घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सर्व यंत्रांना इंधन पुरविण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने स्विकारली, सतत 19 दिवस सकाळी 6 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत अविरत गाळ काढण्याचे काम सुरू होते. हा उपसलेला गाळ जवळपासच्या 500 हेक्टर शेतांमध्ये पसरविण्यात आला. यामुळे शेतांचे पोत तर सुधारलेच पण त्याचबरोबर बंधाऱ्यात चार कोटी लिटरचा जलसाठा निर्माण झाला आहे. गेल्या 50 वर्षात या बंधाऱ्यात इतके पाणी कधीच साचले नव्हते. या जलसाठ्यामुळे 25 विहीरीतील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जवळपासच्या गावांना पाणी उपलब्ध झाल्यामुळे ही गावे टँकरमुक्त झाली आहेत.
डॉ.अविनाश पोळ, जिल्हाधिकारी डॉ.रामस्वामी, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, सहसीलदार श्रीमती अर्चना तांबे, मंडलाधिकारी श्री.जगताप, तलाठी श्री.पवार, पाटबंधारे विभागातील अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, जनकल्याण समितीचे कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ यांनी हे काम पूर्ण करण्यात अनमोल सहकार्य केले. आय.डी.बी.आय बँकेचे महाप्रबंधक, शाखा व्यवस्थापक यांनी या योजनेची आर्थिक बाजू सांभाळली व योजना पूर्णत्वाला नेली. ग्राम पंचायतीचे उपसरपंच, पाणलोट विकास सभेचे अध्यक्ष, व गावकरी यांनी या योजनेवर काम करणाऱ्या चमूची भोजन व्यवस्था सांभाळली.
गावकऱ्यांना लोक सहभागाचे व जनशक्तीचे महत्व पटेल ही या प्रयोगाची निश्चितच उपलब्धी होय.
Path Alias
/articles/paaulavaataa-parakaasa-vaataa-laokasahabhaagaanae-4-kaotai-laitaracaa-jalasancaya
Post By: Hindi