पांझरा नदीचे बारमाहीकरण

वरीलप्रमाणे खरंच घडले तर या महाराष्ट्रात तलावांच्या साखळ्या तयार होतील. मग पिण्यासाठीच काय पण शेतीलाही भरपूर पाणी मिळेल. पाण्यासाठी कोणत्याच वेगळ्या योजना करण्याची गरज नाही. आणि वरीलप्रमाणे कामे झालीत तर भरपूर पाणी मिळेल. त्यातूनच नवीन उद्योग तयार होती. हातांना काम मिळेल. बेकारी कमी होईल आणि खरंच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.

ते वर्ष होते 2003, जल आणि भूमि व्यवस्थापन संस्था, कांचनवाडी (वाल्मी, औरंगाबाद) येथे मी कार्यक्रमासाठी आलो होतो. त्या ठिकाणी डॉ.माधवराव चितळे यांची भेट झाली, आणि चर्चेतून त्यांनी पांझरा नदीवरील सिंचनाची फडपध्दत याचा इतिहास असलेले पुस्तक मी लिहावे असे मला सुचित केले. मीही पटकन सांगून टाकले की मी ते लिहिले म्हणून समजा. त्या आधी या नदीवर जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांच्या संयोजनाखाली दोन कार्यशाळा झाल्यात. त्यात या नदीवरील बांध बांधून पीक नियोजनाची फड पध्दत ही जागतिक पातळीवर गौरविली गेली. परंतु त्या योजना आज जवळ जवळ बंद पडण्याच्या मार्गावर आहेत म्हणून त्या योजनेचा पूर्ण अभ्यास करून त्या परत सुरू करता येतील कां या विषयावरील वेगवेगळे प्रबंध कार्यशाळेत आलेत.

त्या सर्व निबंधांचा अभ्यास केला आणि पांझरेच्या उगमापासून ते तापी नदीला मिळते (संगम) त्या ठिकाणापर्यंत सर्व बंधारे असलेल्या गावांना भेटी दिल्या. प्रत्येक बंधाऱ्याचा अभ्यास केला. त्यांच्या इतिहासाचे पुरावे जमवले व गावातील ग्रामपंचायतीतील जुने कागद जमवले. वेगवेगळ्या ठिकाणचे नकाशे व फोटो काढलेत, या कामात सातत्याने सहा महिने घातलेत आणि त्यातून सिंचनाची फड पध्दत हे पुस्तक बाहेर आले. त्या पुस्तकाची प्रस्तावना डॉ. चितळे यांनी लिहिली.

हे सर्व काम चालू असताना मात्र माझे मन अस्वस्थ झाले आणि ही आमची जीवनदायिनी पांझरा नदी बारमाही वाहती व जीवंत करता येणार नाही का ? व खानदेशातील नदीमुळे असलेले पूर्वीचे वैभव परत आणता येणार नाही का? हा विचार सारखा मनात घोळत होता. मग पूर्वी बारमाही वाहत होती म्हणजे नेमके काय कारण होते, बारमाही वाहत असलेली ही नदी हंगामी का झाली याचा अभ्यास करण्यासाठी काही काळ गेला.

मग पांझरा नदी हंगामी होण्याचे मुख्य कारणे लक्षात आली. ती पुढील प्रमाणे आहेत - 1. पावसाचे बदलते स्वरूप, 2. जंगले नष्ट झाल्यामुळे, 3. भूजलाचा अमर्याद उपसा, 4. भूजल पुनर्भरणाचे तोकडे प्रयत्न, 5. मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन ही ती कारणे असून त्यांचा शास्त्रीय अभ्यास केला. त्यावेळच्या जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.धुळे यांच्याशी चर्चा झाल्यात. मग नदी कोरडी होणे म्हणजे भूगर्भातील जल पातळी खोल गेली. नदीच्या पात्राच्या वरील भूभागावर पाणी असणे म्हणजे नदीत पाण्याचे स्त्रोत सतत चालू राहणे व नदी वर्षभर वाहणे, परंतु भूजल पातळी ही नदीच्या पात्रापासून खोल गेली मग नदीत पाणी येणार कसे ? मग नदी बारमाही वाहती करावयाची असेल तर ' माथा (डोंगर) ते पायथा' ही कामे पांझरेच्या पाणलोट क्षेत्रात करणे महत्वाचे, म्हणजेच ' जो थेंब जिथे पडला तो तिथेच मुरवणे म्हणजेच जलसंधारण.'

हे पाणी मुरवून ठेवायचे असेल तर डोंगर माथ्यापासून पायथ्यापर्यंत नियोजन करणे गरजेचे आहे. या प्रकारे नियोजन केले तर त्यात तीन विभागांचा सहभाग असणे गरजेचे आहे. डोंगरावरच्या जमीनी या सर्व वन विभागाकडे आहेत. त्यांनी ते पाणी जागच्या जागी मुरवून ठेवण्यासाठी समतल चर घेवून नंतर डोंगराच्या घळीत दगडी बांध घालावीत. मातीचे बांध असतील, पाण्याची आवक व आकार पाहून पाझर तलावात पाहिजे तिथे सिमेंट बांध असावेत आणि शेवटी वनतळी बांधावीत. समतल चर खोदल्यावर जिथे मातीचा बांध येतो त्यावर त्या वातावरणात वाढणाऱ्या झाडांच्या बिया पावसाळा सुरू होण्याच्या आधीच लावून टाकाव्यात म्हणजेच पाऊस पडल्यावर त्या जोरात वाढतात. रोपे तयार करण्याच्या भानगडीत न पडता खूप पैसा व वेळ वाचतो. हा प्रयोग चांगला यशस्वी झाला आहे. हे काम करीत असतांना चराईबंदी फार महत्वाची आहे. तसेच झाले तर नैसर्गिकरित्याही खूप झाडोरा वाढेल. निसर्गासारखा चांगला रोपवनकार या पृथ्वीवर दुसरा कोणीही नाही. त्याला त्याचे काम करू द्या, दुसरे म्हणजे निसर्गाला फक्त निर्मिती माहिती आहे, वांझपणा नाही. या प्रकारे वन जमिनीवरील पाणी जागच्या जागी थांबेल. तसेच शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात पडणाऱ्या पावसाचा एक थेंब पाणी शेेताच्या बाहेर पडू देवू नये. त्यासाठी शेतबंडिंग असेल, बांध दुरूस्ती असेल जैविक बांध असतील, शेताच्या पेरणी किंवा मशागती उताराच्या आडव्या पध्दतीने असेल. बांधावर व पडीत जमिनीवर वृक्ष लागवड असेल. हे वृक्ष उत्पादित असू शकतील, फलोद्यान असेल, जास्तीचे पाणी असेल तर उतारावर शेततळी असतील. यासंबंधी योजना राबविणे गरजेचे आहे. बांधावरील वृक्ष लागवड म्हणजे शेतात वनभिंती तयार होतील आणि ह्या वनभिंती तयार झाल्या म्हणजे एखादा पाऊस पडला नाही तरी आर्द्रता चक्र तयार होवून दुष्काळ पडणार नाही. वरील सर्व कामाचा आढावा व खर्च तयार करून त्याला त्याच्याच शेतातील कामाचे पैसे द्यावेत. तसे तो करत नसेल तर त्याच्या शासकीय सर्व सवलती काढून घ्याव्यात. याप्रमाणे शेतात पडणारे सर्व पाणी शेतातच थांबेल.

आज विकेंद्रीकरणातून ग्रामपंचायतींना खूप पैसा व अधिकार मिळाले. जवाहर योजनेतून मात्र अनुत्पादक कामे झाली. वेगवेगळ्या योजनेतून गटारी, संडास, गावातील रस्ते, समाज मंदीरे झाली. प्रत्यक्ष तर संडास कोणीच वापरत नाहीत. त्यांचा कोठीघर किंवा स्नानगृह म्हणून वापर होतो. बायका उघड्यावरच संडासला बसतात. फ्लशच्या संडासाला पाणी जास्त लागते. तेही आज नाही. मग या ठिकाणी श्रमदानातून केलेले चरांचे संडास योग्य होतील. खेड्यातील समाजमंदीरे म्हणजे मोकाट कुत्र्यांची वस्तीस्थाने, तसेच सट्टा बेटींगचे अड्डे झाले आहेत. त्यापैक्षा झाडांच्या भोवती बांधलेले पार उपयोगी वाटतात. गटारी म्हणजे डासांचे वस्तीस्थान मग पूर्वीचे शोषखड्डेच योग्य होते. तेव्हा ह्या सर्व अनुत्पादक कामात हा पैसा खर्च होतो. तो सर्व पैसा ग्रामपंचायतींनी गावशिवारातील पाणी अडवून ठेवायला का खर्च करू नये ?

मग शिवारातील सबंध क्षेत्रासाठी अभ्यासपूर्ण असा योजनाबध्द कार्यक्रम आखायला हवा. शिवारात जे लहान नाले असतील त्यांना दगडी बांध, मातीचे बंधारे, सिमेंट प्लग, कोल्हापूर टाईल बंधारे तयार करून गावशिवारात पडणारे पाणी हे जागच्या जागी अडविले गेले पाहिजे आणि जास्तच पाणी असेल तर गावतळी तयार करावयाची. मग गावातील शिवारात क्षेत्रानुसार एक किंवा अनेक असू शकतील. याप्रमाणे शिवारातील पाणी शिवारातच थांबविले जाईल. हे सर्व पाणी साठविण्याचे नैसर्गिक साधन म्हणजे वृक्षराई होय. शिवारात ज्या ज्या ठिकाणी मोकळ्या जागा असतील तेथे तेथे झाडे लावणे आवश्यक आहे.

वरील सर्व जागच्या जागी अडवून मुरवून योजना तयार झाल्या म्हणजे पावसाळ्यात कोणत्याच नद्या, नाल्यांना पूर येणार नाहीत. मग उन्हाळ्यात जेव्हा खरी पाण्याची गरज असेल तेव्हा वर डोंगर माथ्यावर अडवून ठेवलेले पाणी नद्यांमध्ये येवून वर्षभर नद्या जीवंत राहतील. ह्या सर्व नद्या आमच्या आई आहेत. त्यांना आमच्या साठीच आम्ही वाचविणार की नाही ?वरीलप्रमाणे खरंच घडले तर या महाराष्ट्रात तलावांच्या साखळ्या तयार होतील. मग पिण्यासाठीच काय पण शेतीलाही भरपूर पाणी मिळेल. पाण्यासाठी कोणत्याच वेगळ्या योजना करण्याची गरज नाही. आणि वरीलप्रमाणे कामे झालीत तर भरपूर पाणी मिळेल. त्यातूनच नवीन उद्योग तयार होती. हातांना काम मिळेल. बेकारी कमी होईल आणि खरंच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.

या प्रमाणे पाण्याचा प्रश्न निकाली निघाला तर पूर्वी सुरू असलेली फड पध्दती चालू होईल व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. तरी पण हे पाणी योग्य प्रकारे व कमी पाण्यात उत्पादन कसे वाढेल याचा अभ्यास करून निसर्ग शेती हा पर्याय बाहेर आला. या प्रकारे कमी पाण्यात जास्त उत्पादन व मातीचा कस कमी होणार नाही हे प्रयोग झाले. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाईल आणि त्यातूनच पर्यावरणपूरक ग्रामीण विकास साधला जाईल. हे सर्व ग्रामीण पातळीवर लोकांना समजेल या भाषेत 'पर्यावरण - नद्या - निसर्ग' शेती हे माहितीपूर्ण असे पुस्तक बाहेर आले. त्याला प्रस्तावना त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुरूषोत्तम भापकर साहेब व जिल्हाधिकारी श्री. भास्करजी मुंढे साहेब यांच्या शुभेच्छा मिळाल्यात. हे सर्व लोकांना समजावून सांगावे आणि ग्रामीणांचा सहभाग मिळावा, म्हणून 'पांझरा पुनरूज्जीवन, पर्यावरण, निसर्गशेती सायकल यात्रा 2006' या शीर्षकाखाली पांझरेचा उगम ते संगम अशी सायकल यात्रा काढली. या यात्रेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी (सैनिक) सहभागी झाले होते. ती यात्रा ता. 14.1.2006 ते 21.1.2006 या काळात निघाली. पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व गावांमध्ये जावून लोकांना समजावून सांगितले व प्रत्यक ग्रामपंचायतींना वरील पुस्तकाची एक एक प्रत दिली.

या प्रमाणे काम चालले असतांना राष्ट्रीय ग्रामविकास योजनेअंतर्गत 7.84 कोटी रूपये केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आले. या योजनेसाठी जिल्हास्तरावर एक समिती गठीत करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष मु.का.अ. जिल्हा परिषद धुळे, हे असून सचिव प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे होते. आणि सदस्य म्हणून उपसंचालक सामाजिक उपवन संरक्षक, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अशा प्रकारे सर्व महत्वाचे अधिकारी होते. तसेच सल्लागार तज्ज्ञ समिती स्थापण्यात आली. त्या समितीत माजी शिक्षक आमदार श्री.जयंतराव ठाकरे हे अध्यक्ष व श्री.वसंतराव ठाकरे, श्री.मुकुंद धाराशिवकर, डॉ. धनंजय नेवाडकर, श्री.सुरेश खानापूरकर जे प्रत्यक्ष या कामात कार्यरत आहेत. अशा प्रकारे कामाला सुरूवात झाली.

परत 2007 साली पांझरा परिक्रमा सायकल यात्रा ता 10.1.07 ते 14.1.07 अशी पांझरा नदीच्या उगमापासूनच्या भागात फक्त साक्री तालुक्यात लोकांचा त्या कामात सहभाग असावा म्हणून सायकल यात्रा काढून लोकांना समजावून सांगितले.

प्रत्यक्ष काम सुरू झाले. त्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारे कमतरता राहू नये, कामे व्यवस्थित व्हावीत यासाठी प्रत्येक कामावर बोर्ड लावण्यात आले. त्या बोर्डावर कामाचे स्वरूप, एकूण खर्च, कामाचा आराखडा, साचणारे पाणी ही सगळी माहिती असावी म्हणजे गावातील माणसांनाही ते कळावे, लक्षात यावे आणि त्यांनीही त्या कामावर लक्ष ठेवावे. ते बोर्ड लावण्यासाठी आधीच 1500 रूपये मंजूर करण्यात आले.

हे गावकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी व पांझरा नदी बारमाही का ? तुमच्या गावासाठी त्याचा फायदा काय ? आणि चुमचा सहभाह का ? हे सर्व समजावून सांगण्यासाठी परत ता. 1.5.08 ते 17.7.08 या काळात पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील 150 गावांत पांझरा बारमाही, पर्यावरण, निसर्ग शेती या विषयावर कार्यशाळा घेतल्या. त्यामुळे पांझरा बारमाहीच्या कामाला पारदर्शकता आली. सर्वच कामे चांगली झाली. त्यामुळे त्या भागातील भूगर्भ पातळी वाढली आणि पांझरा नदी उगमाकडील भागात वाहायला लागली.

धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती प्राजक्ता लवंगारे यांनी मी केलेल्या कामाबद्दल जे प्रशस्तिपत्रक दिले आहे ते खालील प्रमाणे -

I know Shri Vasantrao Krishnaji Thakare for last two years. He has devoted himself in the sphere of Water conservation, environment protection and agriculture development in Dhule District in particular and public life in general. He has delivered several talks and also conducted cycle rallies for public awareness and also written several articles in local dailies. He has authored 14 books on environment and water conservation all of which are prescribed as syllabus for North Maharashtra University. He has been associated with Panzara Rejuvenation Project for last five years and the results of the same have become visible in first 50 km length stretch. (Prajakta Lavangre), Collector, Dhule

श्री. वसंतराव ठाकरे

श्री. वसंतराव ठाकरे, धुळे - दू : 02562 - 278394

Path Alias

/articles/paanjharaa-nadaicae-baaramaahaikarana

Post By: Hindi
×