पाण्याची विविध रूपे - भाग 5


धबधबा बहुतेक ठिकाणी उगमस्थानी हिम स्वरूपात असतो. तसे छोटे छोटे ओहोळ एकत्र होऊनही मोठ्या धबधब्याचे रूप घेऊ शकतात. पण एकूणच उंचावरून खाली दरीत कोसळणार्‍या पाण्याचे उंचावर उडणारे तुषार, उन्हामुळे त्यात निर्माण झालेली इंद्रधनुष्ये, हे मोहक पण तितकेच कधीकधी रौद्र रूप वाटते. नेमकी ती वेळ साधणारी आणि या आश्‍चर्यकारक निसर्गदृश्याची कदर करणारी पारखी नजर मात्र पाहिजे.

आधुनिक काव्यामधील गिरसप्पा ते नायगरा या पर्यंतच्या धबधब्यांची फार सुंदर वर्णने विविध कवींनी केलेली आहेत. भवानीशंकर पंडितांची -

किती उंचावरूनी तू उडी ही टाकिशी खाली
जणू व्योमातुनी येशी प्रपाता जासि पाताळी


ही कविता बहुतेकांनी शालेय पाठ्यपुस्तकात वाचलेली, पाठ केलेली नक्की आठवत असेल. परंतु, संत वाङमयातही विशेषत: १२ वर्षे देशस्थिती पाहण्यासाठी भ्रमंती करणार्‍या समर्थ रामदासांनी, धबधब्याचे वर्णन अगदी हुबेहुब डोळ्यांपुढे उभे केलेले आहे. हे आपणास माहित नसेल. ल.रा. पांगारकर संपादित श्रीसमर्थ ग्रंथ भांडार या ग्रंथात ते ग्रंथित केलेले असून वाचकांच्या माहितीसाठी ते मुद्दाम इथे देत आहे -

गीरीचे मस्तकी गंगा। तेथुनी तालली बळे।
जबाबां लोटल्या धारा। धबाबां तोय आदळे ॥१॥
गर्जतो मेघ तो सिंधू। ध्वनीकल्लोळ उठीला ।
कड्यासी आदळे धारा। वात आवर्त होतसे ॥२॥


असे सर्वांना मोहित करणारे धबधबा हे निसर्गाचे एक वेगळेच मनोहारी रूप आहे. धबधबा बहुतेक ठिकाणी उगमस्थानी हिम स्वरूपात असतो. तसे छोटे छोटे ओहोळ एकत्र होऊनही मोठ्या धबधब्याचे रूप घेऊ शकतात. पण एकूणच उंचावरून खाली दरीत कोसळणार्‍या पाण्याचे उंचावर उडणारे तुषार, उन्हामुळे त्यात निर्माण झालेली इंद्रधनुष्ये, हे मोहक पण तितकेच कधीकधी रौद्र रूप वाटते. नेमकी ती वेळ साधणारी आणि या आश्‍चर्यकारक निसर्गदृश्याची कदर करणारी पारखी नजर मात्र पाहिजे.

हे सौंदर्य पारखणारी नजर पाहिजे, त्याबरोबरच, धबधब्यामुळे निर्माण होणार्‍या ऊर्जेचा योग्य तो उपयोग करून घेण्यासाठी, संशोधक शास्त्रज्ञाची नजर पाहिजे. धबधब्याच्या खूप उंचावरून खाली कोसळण्याचा उपयोग अनेक ठिकाणी वीजनिर्मितीसाठी केलेला आढळतो. काही धबधबे उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने तयार होतात, तर काही केवळ पाऊसकाळात वाहतात. काही धबधबे वर्षभर वाहणारे असतात. त्यामुळे वर्षभर वीजनिर्मिती होऊ शकते. याबाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, या प्रकारे होणारी जलविद्युतनिर्मिती ही सर्वात स्वस्त समजली जाते. पाण्याचा साठा आणि त्याची उंची व्यवस्थित साधली गेली, तर सध्याच्या वीजटंचाईच्या काळात, .या वीजनिर्मितीची गरज खूप मोठी आहे. महाराष्ट्रातील कोयना धरण आणि त्याचे जलविद्युतनिर्मितीचे ३ किंवा ४ टप्पे हे याचे आदर्श उदाहरण समजावे लागेल.

जगातील सर्वात उंच धबधबा दक्षिण अमेरिकेमध्ये व्हेनिझुएलातील गियानाच्या डोंगराळ भागात आहे. त्याची उंची ९७९ मीटर्स इतकी असून, पाणी पडण्याचा पहिला प्रदीर्घ टप्पा ८०७ मीटर्स इतका आहे. याला एंजल धबधबा असे नाव त्याच्या उंचीमुळेच पडले असावे. तो जणू वरून परमेश्वराने पाठवलेला देवदूत भासत असावा. याचे पाणी नंतर पुढे रॅरिओ नदीच्या प्रवाहात विलीन होते.

जगभर आपापली वैशिष्ट्ये घेऊन अनेक रौद्रसुंदर धबधबे वाहात असतात. त्यापैकी नायगारासारख्या धबधब्यांचा आवाज काही मैलांवर एैकू येतो. विद्युतनिर्मिती बरोबरच अनेक ठिकाणी पर्यटकांच्या दृष्टीने सर्व सुविधा तयार केलेल्या आढळतात. आणि देशी-परदेशी पर्यटकांचे थवे येथील सौंदर्याचा मन:पूत आस्वाद घेतात.

धबधब्याचे प्रकार :


ढोबळ मानाने धबधब्याचे दोन प्रकार पडतात -

१. कॅटरॅक्ट व २. कॅसकेड.

१. कॅटरॅक्ट :


ज्रदीच्या पात्रातील खडकाळ भाग पाण्याच्या प्रवाहाने झिजत जातो. त्यास भेगा पडताता व खडकाचे थर मोकळे होतात. कठीण खडक कमी प्रमाणात झिजतात. नरम खडक झपाट्याने झिजतात. उतारावर पाण्याचा वेग वाढतो. अशा वेगवान प्रवाहाच्या मार्गात छोटे मोठे अडथळे येतात. असे अडथळे पार करताना वाटेत जी ठिकाणे प्रवाह पार करतो, त्यांना रॅपिड्स (Rapids) असे म्हणतात. हे रॅपिड्स गतिरोधकाचे काम करतात. असे नियंत्रित केलेले प्रवाहाचे पाणी जेव्हा पुन्हा खाली खोल दरीत कोसळते, तेव्हा कॅटरॅक्ट या प्रकारचा धबधबा निर्माण होतो. उत्तर अमेरिकेतील नायगरा व आफ्रिकेतील झांबेझी नदीवरील व्हिक्योरिया हे धबधबे या प्रकारात येतात.

२. कॅसकेड :


नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह जेव्हा ठिकठिकाणी भंग पावतो, आणि असे प्रवाह कमी जास्त उंचीवरून एकापाठोपाठ खाली कोसळतात, तेव्हा असा धबधबा कॅसकेड या प्रकारात मोडतो. छोटे छोटे धबधबेदेखील कॅसकेड्स असू शकतात.

धबधबे आणि पर्यटन स्थळे :


जगातील बहुतेक सर्व लहानमोठे धबधबे हे पर्यटकांची आवडती पर्यटन स्थळे झाली आहेत. कारण निसर्गाचे हे रौद्रमोहक स्वरूप पाहायला सर्वांनाच आवडते. काही ठिकाणी मोटारबोटीतून नदीप्रवास करून धबधब्याच्या अगदी जवळून पाहण्याची, त्याचे रूप रंग इंद्रधनुष्ये पाहून अगदी तुषार अंगावर झेलण्याचीसुध्दा सोय केलेली आहे. धबधब्यांजवळ रंगीत कारंजी, बागा, हॉटेल्स, वस्तुसंग्रहालये, प्रदर्शने व आहारविहाराच्या सोयी पर्यटकांना सुखावतात. विशेषत: परदेशात खूपच सोयी-सुविधा केलेल्या आढळतात.

काही निवडक प्रसिध्द धबधबे :


१. उत्तर अमेरिका - संयुक्त संस्थान व कॅनडाच्या सीमेवरील नायगारा हा धबधबा कॅनडात हॉर्स शू या नावाने प्रसिध्द आहे.

२. कॅलिफोर्निया - येथील नकी ब्रायडल व्हेल याची उंची ६२० फूट असून, तो कॅसकेड प्रकारातील आहे. हा वर्षभर वाहतो.

३. रिबन - (Ribbon) हा अमेरिकेतील सर्वात उंच धबधबा असून त्याची उंची १६१२ फूट व रूंदी फक्त ३० फूट आहे. याच्या भोवती अ‍ॅम्फीथिएटर सारखी अर्धवर्तुळाकार रचना नैसर्गिकरीत्याच तयार झालेली आहे. एप्रिल ते जून या काळात हा धबधबा पाहता येतो.

४. मिडोबुक नदीवरील सिल्व्हर स्ट्रँड या धबधब्याची उंची ११७० फूट असून, तो एप्रिल ते जून या काळात पाहता येतो.

५. वॉशिंग्टन प्रांतांतील सिएटल शहराजवळ स्नोकामी नदीवरील धबधबा २७० फूट उंच आहे.

६. कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील डेला या धबधब्याची उंची १४४३ फूट असून तो कॅसकेड प्रकारचा आहे.

दक्षिण अमेरिकेत अनेक महत्त्वाचे धबधबे आहेत -
१. रिओकरोनी (R.O.Caroni) या नदीवर एंजल हा धबधबा असून, त्याची उंची ३२१२ फूट आहे.

२. व्हेनिझुएला, ब्राझिल व गियाना या देशांच्या सीमेवर कुकेनाम (Kukenaam) हा धबधबा असून, तो अराबोली या नदीवर आहे. त्याची उंची २००० फूट आहे.

३. गियानाममध्ये किंग जॉर्ज - सहावा याच्या नावे धबधबा असून, उंची १६०० फूट आहे.

४. अर्जेंटिना आणि ब्राझिल प्रांताच्या सीमेवर पन्हाना आणि इग्वासू या दोन नद्यांवर इग्वासू हा धबधबा असून, त्याची उंची २३६ फूट पण लांबी ८८५८ फूट आहे.

५. सेटी क्युडेस हा धबधबा सर्वात शक्तिशाली समजला जातो. दर मिनिटाला दहा लाख टन पाणी खाली पडते.आफ्रिकेतही मोठे धबधबे आहेत -

१. आफ्रिकेतील झांबेझी नदीवरील व्हिक्टोरिया धबधब्यावरून दर मिनिटाला ७५००० टन पाणी वाहते. त्याची उंची ४०० फूट असून, रूंदी सुमारे एक मैल आहे.

२. नाताळ प्रांतातील डगेला नदीवर डगेला धबधबा आहे. त्याची उंची ३१०० फूट असून तो दुसर्‍या क्रमांकाचा धबधबा आहे.

युरोप मधील नामांकित धबधबे असे आहेत -
१. स्विझर्लंडमधील ट्रमलबाख (Trummal Bach) हा नदीचा प्रवाह दहा ठिकाणी भंग पावून अचानक झालेला असल्यामुळे, सूर्यप्रकाश उजळतात व कधीकधी सुंदर इंद्रधनुष्य दृष्टीस पडते. प्रत्येक पर्यटक है ठिकाण पाहातोच. त्यासाठी लिफ्टने वर जाण्यासाठी सोय केलेली असून, एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात विशेष बघण्यासारखे असते.

२. गिरवबाख (Gicbach) या नदीवरील स्टाऊसबाख हा धबधबा १८८२ फूट उंच आहे. ही नदी १४ ठिकाणी वळणे घेऊन मग खोल दरीत उडी घेते. तेथपर्यंत बोटीने जाण्याची सोय असून, तो वर्षभर पाहता येतो.

३. ऑस्ट्रियातील किमल धबधबा १३०० फूट उंच असून तो तीन टप्प्यात कोसळतो. तो कॅसकेड प्रकारातील आहे.

४. फ्रान्स मधील गेव्हरपन नदीवरील गेव्हरपन धबधबा १३८० फूट उंच असून, दोन टप्प्यात खाली कोसळतो.न्यूझीलंड आर्थर नदीवर सदरलँड धबधबा असून १९०४ फूट उंच आहे. तीन टप्प्यात कोसळतो. लाओस येथील मिकाँग नदीवरील खोने धबधबा विस्ताराने जगातील सर्वात रूंद धबधबा असून रूंदी ३५००० फूट व उंची २३० फूट आहे.

ढग किंवा मेघ :


आकाशात जमून येणारे ढग हे सुध्दा पाण्याचेच एक रूप आहे. संस्कृत, मराठी, इंग्रजी किंबहुना जगातील सर्व भाषांमध्ये ढगांचे वर्णन करणारे ललित व शास्त्रीय लेख किंवा कविता लिहिल्या गेल्या आहेत. संस्कृत वाङमयात तर कालिदास कवीच्या यक्षाने आपल्या प्रिय पत्नीला मेघाबरोबर संदेश पाठविल्याचे मेघदुत हे खरोखर अजरामर काव्य लिहिले गेले आहे. आषाढस्य प्रथम दिवसे त्याला भेटलेला हा मेघ त्याचा जिवलग मित्र झाला आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी, वर्षातील कोणत्याही ऋतूत या ढगांचे आकाशात दिसणारे विविध आकार आणि ताजे सतेज रंग मनाला भुरळ घालतात.

परंतु प्रत्यक्षात या हवेबरोबर येणार्‍या, जाणार्‍या, कधी वादळ, कधी पाऊस आपल्याबरोबर घेऊन येणार्‍या ढगांचे शास्त्रीय स्वरूप काय असते, ते पाहणेही मनोरंजक ठरेल. आणि पाऊस किंवा पाणी याचा त्याच्यावर काय प्रभाव असतो ते समजून घ्यावे लागेल. आकाशात हवेत तरंगणारे आणि हाती न लागणारे हे ढग वस्तुमान म्हणून नेमके काय असतात?

पृथ्वीच्या गरम पृष्ठभागावरून व उन्हाळ्यात समुद्रातील गरम जलपृष्ठावरून पाण्याची वाफ होते ती हलकी असल्यामुळे, वरवर जाते. उंच वातावरणातील थंड हवेमुळे हवेतील रेणूंची वर जाण्याची क्रिया मंदावते. या मंदगतीमुळे हे वाफेचे रेणू त्यांच्या हालचालींमुळे एकत्र येऊन ते गोठण्याची क्रिया सुरू होते. याच काळात हवेमधील सूक्ष्म धूलिकण त्याच्या भोवती जमा होऊ लागतात. या कणांना गोठण्याचे केंद्रबिंदू (Condensation nuclei) असे म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक सूक्ष्म कणांजवळ जमा झालेले बाष्प एकत्र येऊन त्यांचे घोस (droplets) तयार होतात. म्हणजेच त्यांचे ढगात रूपांतर होते. किंवा धुके तयार होते. या ढगांना वार्‍याची जोड मिळाली की, त्यातील घोस पाण्याच्या वजनामुळे थेंबांच्या रूपाने खाली येऊ लागतात. काही मध्येच विरतात पण बहुतांशी थेंब वातावरणातून पृथ्वीपर्यंत पोहोचतात. त्यालाच आपण पाऊस असे म्हणतो. हे घोस एकत्र येऊन मोठे झालेले ढग एकमेकांवर आदळतात आणि मग गडगडाट म्हणजेच मेघगर्जना ऐकू येतात. या काळात बाष्पयुक्त धूलिकणांचा आकार मोठा झालेला असतो. जेव्हा त्यांना स्वत:चे वजन पेलवत नाही, तेव्हा ढगांपासून वेगळे होऊन जमिनीवर पावसाच्या रूपाने कोसळतात.

अशा प्रकारचे बाष्पभरले घोस जेव्हा मोठ्या प्रमाणात एकत्र येतात, तेव्हा दाट काळपट किंवा राखाडी रंगाचे ढग तयार होतात. सूर्यकिरणसुध्दा त्यांना भेदून पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा वेळी दिवसभरात सूर्यदर्शन होत नाही. एकत्र झालेले हे काळे ढग खूप उंचीपर्यंत वर जाऊ शकतात. खूप मोठे व काळे ढग ऊष्ण कटिबंधामध्ये सुमारे १५ कि.मी. पर्यंत उंची गाढू शकतात. (हिमालयापेक्षा अधिक उंची!) अशा प्रकारच्या ढगांमधून अतिशय जोरदार किंवा मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊ शकते. काही वेळा ढगफुटी होऊन तेवढ्याच भागात पाणीच पाणी होऊन जाते.

काही ठळक वैशिष्ट्ये :


१. वातावरणाचे तापमान खूप थंड होते, तेव्हाच बाष्प थंड होऊन ढगातील छोट्या थेंबाच्या रूपाने एकत्र येते. या तापमानाला जलबिंदू तापमान असे म्हणतात.

२. ढग निर्माण होण्याकरिता धूलिकणांची आवश्यकता असते.

३.स्नानगृहामध्ये गरम पाण्याची वाफ ज्याप्रमाणे आरशाच्या काचेवर गोठते, त्याचप्रमाणे, हवेतील बाष्प थंड तापमानात धूलिकणांभोवती जमते.

४. ढगातील जलदवबिंदू आणि पर्जन्यबिंदू यामध्ये फक्त आकाराचा फरक असतो.

५. ढगातून जमिनीवर येणारे सर्वच पावसाचे थेंब जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. अशा थेंबांना “Vibra” असे म्हणतात.

ढगांचे प्रकार :


आकाशातील ढगांमध्ये दोन प्रकार संभवतात.

१. Comulonimbus - महाकाय किंवा प्रचंड मोठे ढग - पाण्याची वाफ गोठल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. ती या महाकाय ढगांमध्ये साठते. परिणामी गडगडाटी आवाज होऊन विजा चमकू लागतात. कधी मोठ्या अग्निगोलकाच्या रूपाने पृथ्वीवर कोसळतात. कधी मोठे तुफान किंवा चक्रीवादळ होऊ शकते.

२. Nimbostratus - वेड्या वाकड्या आकाराचे काळेकुट्ट किंवा राखट काळे ढग या प्रकारच्या अतिशय मोठ्या ढगांमधून केव्हाही प्रचंड पर्जन्यवृष्टी होऊ शकते. कधी कधी हिमवर्षावही होऊ शकतो, तर कधी उल्कापातसुध्दा संभवतो.

या ढगांमुळे पृथ्वीवरील काही प्रदेशात बाराही महिने पाऊस येत असतो. युरोपात बहुतेक ठिकाणी असा पाऊस पडतो. इतर ठिकाणी पाऊस हंगामी वार्‍यांवर अवलंबून असतो. आशियातील पाऊस मान्सून - मोसमी वार्‍यावर अवलंबून असतो. विषुववृत्तावरील हवामान अतिशय ऊष्ण असल्यामुळे, तो भाग वर्षभर ओलसर दमट असतो. त्या उलट आफ्रिकेमधील सहारा वाळवंटामध्ये पर्जन्यमान जवळजवळ शून्य असते. त्याचप्रमाणे उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेशात हवामानसुध्दा अतिशय थंड असल्यामुळे वाफ होण्याची क्रिया जवळजवळ नसतेच. त्यामुळे, पावसाचे ढग निर्माण होण्याची शक्यता नसतेच.

ढग हवेमध्ये तरंगतात कसे ?


ढगांचे हवेमध्ये तरंगत राहणे हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकतो. पाण्याचे हजारो - लाखो लहान लहान थेंब, स्फटिक किंवा बर्फ रूपातले अतिसूक्ष्म कण हे सर्व एकत्र येऊन, त्याचे लहान मोठे ढग बनतात. सूर्याच्या ऊष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापत असतो. त्यामुळे, भूपृष्ठावरील हवा हलकी होऊन वरवर जात असते. त्या वर जाणार्‍या गरम हवेमुळे, ढगांमुळे सूक्ष्म स्वरूपातील जलकण जमिनीवर न पडता हवेत राहतात. त्याचप्रमाणे, वादळामुळेही, जमिनीवरची गरम हवा ढग तरंगत ठेवण्यास मदत करते.

पाण्याची वाफ हवेतील धूलिकणांवर गोठत गेल्यामुळे अति सूक्ष्म अशा या केंद्रकणाची निर्मिती होते. साध्या डोळ्यांनी हे कण दिसू शकत नाहीत. पण अशा केंद्रस्थानी राहणार्‍या लाखो बाष्पयुक्त धूलिकणांमुळेच ढगांची निर्मिती होते. धूलिकणांवरील बाष्प गोठून राहताना, स्वत:बरोबर ढगांना तरंगत राहण्यास मदत करते.

जलचक्र :


या सर्व प्रक्रियेचे एक नैसर्गिकपणेच निर्माण झालेले जलचक्र असते. वाफ, द्रव किंवा बर्फ अशा कोणत्याही स्वरूपात पाणी पृथ्वीवर उपलब्ध असू शकते. परंतु सूर्याच्या ऊष्णतेमुळे, उच्च तापमानामुळे, पाण्याचे स्थित्यंतर वाफेमध्ये होण्याचे कार्य अखंडपणे चालूच असते. तलाव, नदी, समुद्र अशा कोणत्याही प्रकारच्या उघड्या पाणीसाठ्यामध्ये हे कार्य अविरत सुरू असते. त्याचप्रमाणे, प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये मुरलेल्या पाण्याचे बाष्पीभवनही चालूच असते. या बाष्पीभवनामुळे निर्माण झालेली वाफ हलकी होऊन वरवर जात असते.

या सर्व वाफेचे ढग तयार होऊन, ते वातावरणात उंचउंच जातात. त्यामध्ये सूक्ष्म धुळीचे कण मिसळून निर्माण झालेले ढग उंचावरील वातावरणातील थंड हवेमुळे गोठून पाण्याचे थेंब तयार होतात. हे ढग वार्‍याबरोबर वाहात असताना डोंगर किंवा उंच पर्वतराजीमुळे अडतात व अधिक उंचावर जातात. एकत्र आलेल्या अशा ढगांचा आकारही वाढतो. त्याबरोबरच सूक्ष्म कणांनी बनलेले पाण्याचे थेंबही आकाराने मोठे व जड होतात आणि शेवटी पावसाच्या रूपाने, पुन्हा जमिनीवर कोसळतात.

हे पावसाचे पाणी डोंगरउतारावरून परत वाहात जाऊन त्याचे छोटे ओहळ - ओढ्यांचे स्वरूप घेतात आणि ते स्वत:च नदीचे रूप घेतात किंवा नदीला जाऊन मिळतात. काही वेळा तलावरूपाने मध्येच साठून राहू शकतात. दरम्यान हेच पाणी वनस्पती, अन्य प्राणी व मनुष्य यांची तहान भागवीत असते. असे हे जलचक्र वर्षानुवर्षे चालू राहते. सर्व वनस्पती जमिनीत मुरलेले पाणी त्यांच्या गरजेनुसार शोषून घेतात व पानांच्या माध्यमातून पुन्हा बाष्प होऊन वातावरणात सोडले जाते. असे हे अविनाशी चक्र आहे. जमिनीत शोषलेल्या पाण्याचेही पुन्हा बाष्पीभवन होतच असते व ते यात मिसळते. अशा प्रकारे जलचक्र अविरत चालू राहते.

ओअ‍ॅसिस :


ओअ‍ॅसिस हा एक नैसर्गिक चमत्कारच मानावा लागेल. महाप्रचंड विस्तार असलेल्या वालुकामय प्रदेशातील, मैलोनमैल पसरलेल्या कोरड्या वाळूमध्ये आढळणारी ओअ‍ॅसिस म्हणजे छोटी छोटी हिरवी बेटेच म्हणावी लागतील. सभोवती नजर पोहोचेल तिथपर्यंत सगळीकडे वालुकामय प्रदेश आणि मध्येच या छोट्या वसाहती - जेथे गोड्या पाण्याचे छोटे झरे किंवा विहीरी असतात. विशेष करून खजुराची झाडेही असतात. जीवनावश्यक पाणी माणसे व वाळवंटातील जहाज समजले जाणारे उंट या दोन्हींना जरूरीचे असते. इथेे एकदा पोट भरून पाणी प्यायलेले उंट मैलोनमैल पाण्यावाचून प्रवास करू शकतात. वाळवंटातील व्यापार व वाहतुक यांवर नियंत्रण ठेवणारे हे ओअ‍ॅसिसचे टप्पे फार महत्वाचे ठरतात. खाण्या-पाण्याची सोय असेल तर राजकीय दृष्टीने व लश्कराच्या हालचालींसाठीही ते आवश्यक व उपकारक ठरतात.

इस्त्राईल, जॉर्डन, अरेबिया यांसारख्या वाळवंटी प्रदेशात ओअ‍ॅसिसचा ताबा सर्वच दृष्टीने महत्वाचा ठरतो. सहारासारख्या महाप्रचंड वाळवंटात अतिशय ऊष्ण तापमानामुळे अशी ओअ‍ॅसिस तात्पुरत्या मुक्कामांसाठी किंवा वालुकवादळाच्या वेळेस आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरतात.

अशा ओअ‍ॅसिसमधील सापडणार्‍या पाण्याचे पृथ:करण केले, तर थोड्या थोड्या अंतरावरील ओअ‍ॅसिसमधील पाण्याच्या गुणधर्मात खूपच फरक आढळतो. कारण त्या ओअ‍ॅसिसमधील पाणी जमिनीतून किती खोलवरून उपलब्ध होते, यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात. अशा वेळेस हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही यासंबंधीची काही गमके (Standards) थोडीशी दूर ठेवणे भाग पडते. दुसरा कोणताही जलस्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे, जुळवून घ्यावेच लागते.

Path Alias

/articles/paanayaacai-vaivaidha-rauupae-bhaaga-5

Post By: Hindi
×