पाण्याची विविध रूपे - भाग 4


गारांचा वर्षाव : Hailstones


पृथ्वीवर आढळून येणारा भूशास्त्रीय चमत्कार म्हणून समजले जाणारे गरम पाण्याचे झरे भारतात ठिकठिकाणी आढळतात. त्यांना उन्हवरे,उन्हाळे, गरम कुंडे असे निरनिराळ्या नावांनी संबोधले जाते. समर्थ रामदासांच्या देशभ्रमंतीत त्यांना असे झरे आढळल्याचा दासबोधातही उल्लेख आहे. इंग्रजीत त्याला हॉट स्प्रिंग किंवा थर्मल स्प्रिंग असे म्हटले जाते. उन्हेरे किंवा गरम झर्‍यांच्या ठिकाणी बहुधा सर्व जागी त्याच्या भोवती कुंड बांधून बंदिस्त केलेले आढळते.

गारपीट किंवा गारांचा वर्षाव किंवा गारांचा पाऊस ही निसर्गातील एक चमत्कृती समजली जाते. उन्हाळ्याच्या शेवटच्या काळात, म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरूवातीस उकाड्याचा खूप असह्य त्रास होत असतो. वाढलेले तापमान आणि त्यात भर म्हणून वातावरणात वाढत चाललेली आर्द्रता या दोहोंच्या पार्श्‍वभूमिवर, अचानकपणे, घरांच्या छपरांवर किंवा पत्र्यांवर टप्टप् असा आवाज करीत पावसाचे मोठाले थेंब पडू लागतात. इतक्यात तो आवाज बदलतो, तीविर होतो, वजनदार झाल्यासारखे वाटू लागते आणि मग लहानमोठ्या आकाराच्या गारा पडू लागतात. कधी कधी हा पाऊस टिकून राहतो. छपरे, रस्ते, झाडे भरून जातात. पांढर्‍या रंगाचे हे बर्फासारखे थंड लहानमोठे थेंब - ठिपके घनरूप धारण करतात आणि मग या गारा वेचून खाण्यासाठी, आबालवृध्द पावसात भिजण्याची पर्वा न करता, हाती मिळेल ते भांडे, टोपले, फार काय छत्र्या घेऊन रस्त्यावर उतरतात, गच्चीवर धावतात आणि पहिल्या वळवाच्या गारापावसाची मजा लुटतात.

पण एरवी सुखद वाटणारा गारांचा वर्षाव जर गारपिटीत रूपांतरित झाला तर मात्र तो पीकपाण्याचे नुकसान करणाराही ठरू शकतो. पण यापैकी काहीच आपल्या हातात नसते. आपण फक्त बघणारे आणि भोगणारेही असतो. म्हणून तर पूर्वापार म्हण आहे - नवर्‍याने मारले आणि पावसाने झोडले तर तक्रार कुणाकडे करणार? तर आता नवर्‍याने मारल्याची तक्रार करता येते. पावसाने झोडले तर शासन काही प्रमाणात नुकसान भरपाई देते. तर गारांच्या वर्षावाची एकच घटना कधी सुखद तर कधी दु:खद ठरू शकते. पण ती टाळता मात्र येत नाही. कारण ते पाण्याच्या विविध रूपांपैकी एक आहे.

आकारमान :


कोणतेही ठराविक असे विशिष्ट रूप किंवा आकार या गारांना नसतो. परंतु पावसाचे पाणी विशिष्ट तापमानात गोठून वर्षाव करणारा हा एड्ढ प्रकारचा पाऊसच असतो. सर्वसाधारणपणे गारांचा व्यास ५ ते ५० मि.मी. इतका असू शकतो. गर्जना करीत आलेल्या वादळी पावसात हे आकारमान मोठे असते. कुठे कुठे लिंबा येवढ्या गारांचा मार बसून माणसे दगावल्याच्याही घटना आहेत. या गारा बहुदा पारदर्शक किंवा कधी पांढर्‍या रंगाच्या असतात त्या एकावर एक साचून बर्फाचा थर बनू शकतो. त्यांचे गोळे बनून वजन १/२ कि.होऊशकते. त्यांच्या मध्यभागात धुळीचे कण किंवा सूक्ष्म जंतूही असू शकतात.

गरम पाण्याचे झरे :


भारतातील गरम पाण्याचे झरे आणि त्यांचा वैद्यकीय दृष्ट्या असलेला उपयोग याबद्दलची माहिती पुरातन कालापासून प्रसिध्द आहे. परंतु त्याचा व्यवस्थित योजनापूर्वक अभ्यास न झाल्यामुळे, योग्य तेवढ्या क्षमतेने जगाला उपयोग झाला नाही. ब्रिटिश आमदनीच्या काळात मात्र भारतावरील ब्रिटिशांचा ताबा पूर्णपणे प्रस्थापित झाल्यावर म्हणजे इ.स. १८१८ साली, मुंबईच्या प्रशासन विभागाने ठिकठिकाणच्या गरम पाण्याच्या झर्‍यांची आणि कुंडांची नोंद करून ठेवल्याचे आढळते. भारतातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि आश्‍चर्यकारक ठिकाणे, घटना, वास्तु, भौगोलिक चमत्कार वाटणार्‍या गोष्टींची माहिती ब्रिटिशांना हळूहळू होत होती. त्यापैकीच गरम पाण्याचे झरे आणि कुंडे होती. आणि त्यांची नोंद त्यांनी जाणीवपूर्वक केलेली आहे. सर्वसामान्य रयतेच्या हिताच्या दृष्टीने आणि स्वत:च्या प्रशासनाच्या उपयोगासाठी अशा प्रकारच्या गोष्टींची त्यांनी प्रशासकीय यंत्रणा वापरून अधिकृतपणे माहिती करून घेतली व ती काही प्रमाणात प्रसिध्दही केलेली आढळते.

मुंबई प्रांतातील गुजरात विभागातील कैरा जिल्ह्याच्या कलेक्टरने गरम पाण्याच्या झर्‍यांचे सर्वेक्षण करून दिलेला अहवाल व त्यासंबंधीचा शासकीय पत्रव्यवहार आजही पुस्तिकारूपाने उपलब्ध आहे. तोे वाचून मजा वाटते. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे, त्यावेळेस ब्रिटिशांनी केलेल्या अभ्यास - संशोधनाचा अहवाल शास्त्रीय भाषेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सर्वसाधारणत:, सभोवतालच्या वातावरणातील हवेचे उषणतामान किंवा पाण्याचे तापमान जे असेल, त्यापेक्षा अधिक तापमानाचे पाणी ज्या उगमस्थानापासून झर्‍याच्या रूपाने भूपृष्ठावर नियमितपणे वाहतावा दिसते, त्या झर्‍यांना गरम पाण्याचे झरे असे संबोधिले जाते. त्या ठिकाणी भूगर्भातील पाण्याचा मॅग्नाशी संपर्क येऊन, किंवा भूगर्भातील अद्यापही गरम राहिलेल्या खडकांशी संपर्क येऊन गरम पाण्याचे झरे वाहू लागतात. परंतु त्यांचा थेट ज्वालामुखीशी संपर्क नसतो.

सध्याच्या इंधनतेलाच्या टंचाईमुळे, या गरम पाण्याद्वारे मिळणार्‍या ऊर्जेचा उपयोग कॅलिफोर्निया, इटली आणि आईसलँडमध्ये सुरू झाला आहे.

हे गरम पाण्याचे झरे दोन प्रकारात विभागले जातात -
१. पावसाचे पाणी जमिनीतील भेगांमधून खोलवर जाते. ते भूगर्भातील ऊर्जेचा स्त्रोत असलेल्या भूपृष्ठाच्या पातळीपर्यंत जाऊन आपोआप त्या ऊर्जेच्या उष्णतेमुळे गरम होते. आणि सापडेल त्या सोयीच्या मार्गाने भूपृष्ठावर परत येते. त्या काळात भूगर्भातील खनिजे पाण्यात मिसळून भूपृष्ठावर येतात.

२. ज्या ठिकाणी पाण्याच्या स्त्रोताचा भूगर्भातील सुप्त ज्वालामुखींशी संपर्क येतो, त्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे खूप जोराने भूपृष्ठावर येतात. अशा झर्‍यांचे पाणी रेडॉन आणि ब्रोमाइडयुक्त असते. याशिवाय, या पाण्यात नेहमी आढळणारे क्षार म्हणजे कार्बोनेट्रस् व क्लोराइडस् हे असतात. शिवाय काही ठिकाणी अर्सेनिक आणि बोरॉन आढळल्याची नोंद आहे.

वैद्यकीय उपचारातील उपयोग :


नैसर्गिक गरम पाण्याचा उपयोग उपचारासाठी करतात.

१. पाण्यातील गंधकामुळे - सल्फरमुळे - निरनिराळे त्वचादोष दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे श्वसनक्रियेतील अडथळे दूर होतात.

२. पाण्यातील क्लोराईडस व अन्य क्षारांमुळे संधीवात व सांधेदुखीवर परिणाम होतो.

गरम पाण्याचे झरे, त्यांची वैशिष्ट्ये व पाण्याचे तापमान :


अ) जर्मनीतील आकेम येथे, युरोपमधीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक तापमान असलेला झरा आहे. त्याचे तापमान ७४ डि.सें.ग्रे. इतके असते.

ब) चिलीमध्ये सुमारे २७५ गरम पाण्याचे झरे आहेत.

क) तिबेटच्या उत्तरेकडील ल्हासाजवळ सुमारे ८७ कि.मी. अंतरावर गरम पाण्याच्या झर्‍याचे क्षेत्र कित्येक कि.मी. व्यापते. यांग बेजिंगच्या गरम पाण्याचा उपयोग वीजनिर्मितीकरिता केला जातो.

ड) जगातील सर्वात उंचीवरील गरम पाण्याच्या झर्‍यांच्या ठिकाणाची उंची, समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० मीटर्स आहे.

इ) इकेरिया व ग्रीसमधील गरम पाण्याचे झरे रेडिओ अ‍ॅक्टिव्ह असतात असे आढळले आहे.

ई) आइसलँडमधील गरम झर्‍यांच्या पाण्याचे तापमान कधीकधी ९७ डि.सें.ग्रे. पर्यंत असते. आणि ते पाईपद्वारे जवळच्या काही शहरात पुरविले जाते.

फ) अमेरिकेतील फेथफुल गीझर - यलो स्टोन नॅशनल पार्क - या गीझरमधून प्रथम धूर निघतो. आणि मग धुराबरोबर गरम पाणी उडताना दिसते.

मनीकरण - हिमाचल प्रदेशातील मनीकरण येथील गरम पाण्याच्या झर्‍यांना पर्यटनस्थळाचे महत्व आले असून, गंधयुक्त पाण्यामुळे औषधीसाठी प्रसिध्द आहे.

पृथ्वीवर आढळून येणारा भूशास्त्रीय चमत्कार म्हणून समजले जाणारे गरम पाण्याचे झरे भारतात ठिकठिकाणी आढळतात. त्यांना उन्हवरे,उन्हाळे, गरम कुंडे असे निरनिराळ्या नावांनी संबोधले जाते. समर्थ रामदासांच्या देशभ्रमंतीत त्यांना असे झरे आढळल्याचा दासबोधातही उल्लेख आहे. इंग्रजीत त्याला हॉट स्प्रिंग किंवा थर्मल स्प्रिंग असे म्हटले जाते. उन्हेरे किंवा गरम झर्‍यांच्या ठिकाणी बहुधा सर्व जागी त्याच्या भोवती कुंड बांधून बंदिस्त केलेले आढळते. ही सर्व ठिकाणे जत्रा - यात्रांची तीर्थस्थळे किंवा पर्यटनस्थळे झालेली आहेत.

महाराष्ट्रात सुमारे ३० -३२ ठिकाणी गरम पाण्याचे उन्हेरे आहेत. यापैकी सुमारे २५ ठिकाणे कोकण विभागात उत्तरेस पालीपासून दक्षिण कोकणातील राजापूरपर्यंत सह्याद्रीच्या विशिष्ट भूगर्भीय रचनेमुळे, निर्माण झालेली दिसतात. याशिवाय नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नांदेड या भागात आढ उन्हेरे आहेत.

 

गरम झर्‍याचे ठिकाण

नदी

गणेशपुरी

तानसा नदीच्या मध्येभागी बेटवजा भागात गरम झरे असून त्यांची संख्या सुमारे १२ आहे. त्यांचे तापमान ५५ ते ५८ सें.ग्रे. आहे.

वज्रेश्वरी

तानसा - अनेक मंदिरे व गरम कुंडे आहेत.

सातबली (पालघर)

वांद्री नदी - मंदिरे व १२ गरम कुंडे

उन्हेरे पाली (गणपती अष्टविनायकांपैकी एक)

अंबा नदी - स्नानाची सोय.

सन (महाड जवळ)

सावित्री नदी - गरम पाण्याचे कुंड

उन्हेरे (पालवणी)

भारजा नदी - २/३ गरम कुंडे व मंदिरे

उन्हेरे (दापोली) फरारी खाडी

जमिनीतून गरम वाफा तापमान ७० सें.ग्रें

 

काही कुंडांमध्ये तांदूळ शिजवता येतात किंवा अंडी उकडता येतात. इतके त्यांच्या पाण्याचे तापमान असते. राजापूर येथे अर्जुना नदी आहे. तेथेही असे दिसते. एकंदरीत भूगर्भातून उसळणारे गरम पाण्याचे जिवंत झरे हा एक नैसर्गिक चमत्कारच म्हटला पाहिजे. पण हा केवळ भारतातच नाही. इतर देशा - परदेशातही तो पाहावयास मिळतो.

ओल्ड फेथफुल गीझर :


यलो स्टोन नॅशनल पार्क - अमेरिका येथे असाच चमत्कार आहे. प्रथम धूर दिसतो. थोड्या वेळाने, धुराबरोबर पाणी उडताना दिसते. यलो स्टोन नॅशनल पार्कमधील सरोवराचे पाणी म्हणजे थंडगार पाण्यामधून उष्ण उकळते पाणी देणारी कुंडे आहेत. तेथील रेड इंडियन्स त्यात मासे शिजवून खात असतात.

पृथ्वीच्या अंतर्भागातून सुमारे ३०० फूट उंचीचे गंधयुक्त गरम पाण्याचे कारंजे उडताना दिसते. असे हजारो गॅलन पाणी उंच जाऊन मग परत पृथ्वीवर पडताना पाहणे हा निसर्गातील अद्भूत चमत्कार आहे. हे आश्‍चर्यकारक नाट्य दर ९२ मिनिटांनी घडत असते. ही नियमितता वर्षानुवर्षे टिकून आहे.त्यामुळे त्याला फेथफुल गीझर असे योग्य नाव दिले गेले आहे. पौर्णिमा - अमावस्या जेवढ्या नियमित होतात, तेवढीच ही दर ९२ मिनिटांनी घडणारी घटना नियमित आहे. पृथ्वीच्या पोटातील हा उद्रेक इतका कालबध्द आणि विश्वासार्ह कसा? हा प्रश्‍न कुणालाही पडू शकेल.

Path Alias

/articles/paanayaacai-vaivaidha-rauupae-bhaaga-4

Post By: Hindi
×