पाण्याची गुणवत्ता व तिचे नियंत्रण


पाण्याची चव, स्वाद, वास, रंग व स्वच्छता या सर्व गोष्टी पाण्याच्या गुणवत्तेच्या निदर्शक असल्या, तरी पाणी पिण्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे असे म्हणण्याकरिता, पिण्याच्या पाण्याची भौतिक, रासायनिक आणि जंतुविषयक चाचणी करणे आवश्यक असते.

पाण्याच्या गुणवत्तेचा विचार करीत असताना, कोणत्या कारणासाठी वापरले जाणाऱ्या पाण्याचा विचार करायचा हे पाहावे लागेल. पिण्याकरिता, वापरण्याकरिता, जलतरणाकरिता, शेतीकरिता असे विविध कारणांनी पाणी वापरले जाते. त्यानुसार पाण्याच्या आवश्यक गुणवत्तेत बदल होतो. मुळात पाण्याची गुणवत्ता त्यामध्ये मिसळलेल्या विद्राव्य किंवा अविद्राव्य घटकांमुळे ठरत असते. अनेक कारणांनी होणारे पाण्याचे प्रदूषण ते पिण्यासाठी किंवा रोजच्या विविध प्रकारच्या वापरासाठी असुरक्षित होत असते. त्यासाठी आधी सुरक्षित पाणी म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल.

सुरक्षित पाणी - पिण्याकरिता


पाण्याची चव, स्वाद, वास, रंग व स्वच्छता या सर्व गोष्टी पाण्याच्या गुणवत्तेच्या निदर्शक असल्या, तरी पाणी पिण्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे असे म्हणण्याकरिता, पिण्याच्या पाण्याची भौतिक, रासायनिक आणि जंतुविषयक चाचणी करणे आवश्यक असते. पाण्यामधील रेतीचे बारीक कण, किंवा चिखल - माती यामुळे आलेला गढूळपणा आणि हायड्रोजन सल्फाइडसारख्या द्रव्यामुळे आलेली दुर्गंधी याचा परिणाम पाण्याच्या स्वीकारार्हतेवर होऊ शकतो. हे सर्व आक्षेपार्ह घटक पाणी योग्य पध्दतीने गाळून घेतल्यावर कमी होतात. तसेच पाण्याचा स्वच्छ वातावरणाशी आणि सूर्यप्रकाशाशी संर्पक आल्यावरही त्याची दुर्गंधी कमी होते. पाणी पिण्यायोग्य असण्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, ते पाहूया -

1. पाणी चवीला चांगले असावे. मचूळ, खारट, तेलकट नसावे.
2. दिसायला स्फटिकासारखे स्वच्छ, रंगहीन आणि तळ दाखविणारे असावे.
3. पाण्याला कसलाही वास नसावा - शेवाळे किंवा तेलकट तवंग नसावा.
4. अपायकारक रासायनिक द्रव्ये प्रमाणाबाहेर किंवा मुळीच नसावी.
5. अपायकारक जीवाणू किंवा विषाणू त्यात नसावे.
6. पाण्याचा सामु PH 6.5 ते 8.5 इतका असावा.
7.पाणी स्वच्छ, झाकून ठेवलेल्या व सोयिस्कर अशा भांड्यात साठविलेले असावे. त्याला नळ असल्यास फार चांगले. नसल्यास, दांड्याचा डोया किंवा कप वापरावा.

वरवर स्वच्छ निर्मळ दिसणारे पाणी पिण्याकरिता योग्य किंवा सुरक्षित असेलच असे नाही. स्वच्छ पाणी आणि शुध्द पाणी या जवळच्या वाटल्या तरी वेगवेगळ्या संकल्पना आहेत. रसायने व क्षार याबरोबरच, सततच्या वापरातील अपायकारक धातूंचे प्रमाण पाण्यात जास्त असेल, तर दीर्घकालिन अपाय होऊ शकतात. आर्सेनिक, लोह, क्रोमियम, अल्युमिनिअम हे धातुयुक्त घटक जर प्रमाणाबाहेर असतील तर ते घातक ठरू सकतात. तसेच, पाण्याच्या निर्जंतुकीरणाकरिता वापरण्यात येणाऱ्या रसायनांचे प्रमाणही मर्यादेतच असायला पाहिजे. यामध्ये क्लोराईड, फ्लोराईड इ रसायनांचा समावेश होतो. परंतु यापेक्षा अधिक अपायकारक परिणाम पाण्यातील जीवाणू व विषाणूंमुळे दूषित झालेल्या पाण्याच्या वापरामुळे होत असतात. पाणी प्रदूषणामुळे विषज्वर, पटकी, अतिसार, आव, कावीळ, जंत इ. रोग होऊ शकतात. म्हणून पाणी पिण्यायोग्य सुरक्षित असल्याची खात्री करून घेऊनच त्याचा वापर करावा. ते सुरक्षित करण्याकरिता पाण्याचा साठा, विहिरी, कूपनलिका, खुल्या विहिरी यांच्याकरिता फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशनची व्यवस्था असावी. अन्यथा पाणी गाळून व उकळून घेतल्याने त्याची गुणवत्ता वाढून ते पिण्यालायक होते.

सुरक्षित पाणी - जलतरण तलावातील


जगातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये पोहोणे हा लोकांचा आवडता छंद व सर्वांगसुंदर व्यायामप्रकार मानला जातो. त्यामुळे सर्वत्र जलतरण तलाव बांधून व त्याची व्यवस्थित देखभाल करून ते जलतरणासाठी उपलब्ध करून देणे हा एक व्यवसायही झाला आहे. जलतरण तलावातील पाण्याचे शुध्दीकरण करून त्याची गुणवत्ता वाढविणे आणि ते सुरक्षित राखणे हे फार महत्वाचे असते. बहुतेक ठिकाणी पाण्याचे क्लोरिनेशन करूनच शुध्दता राखली जाते. त्यासाठी काही गोष्टींचा मुळातूनच विचार करावा लागतो -

1. तलावाचे आकारमान व त्यामधील पाण्याचे आकारमान (दशलक्ष लिर्टस) महत्वाचे ठरते.
2. या जलतरण तलावात दररोज सरासरी किती माणसे पोहोण्यासाठी येतात याचा आढावा घ्यावा लागतो. मोसमानुसार ही संख्या बदलू शकते. या संख्येवर पाण्याच्या प्रदूषणाचा अंदाज घेता येतो. व त्यातील अमोनिया नायट्रोजनचे प्रमाण किती वाढू शकते हे ठरविता येते.
3. मूळ पाण्यात आपोआप वाढणाऱ्या शेवाळाचे प्रमाण व ऋतुमानानुसार ते वाढण्याची शक्यता लक्षात घ्यावी लागते. शुध्दीकरणाकरिता केलेल्या क्लोरिनेशनमुळे पाण्याचा सामु घ्क्त वाढत जातो. तो जाग्यावर ठेवण्यासाठी, सौम्य क्लोरिन द्रावणाचा वापर ज्या काळात पोहायला कुणी नसेल अशा काळात करावा लागते.
4. जलतरण तलावाचे आकारमान, त्यातील पाण्याचे प्रमाण, पोहोणाऱ्यांची संख्या आणि पोहोण्याच्या वेळा यावर क्लोरिनेशन कोणत्या प्रकारे करायचे हे अवलंबून असते. क्लोरिन गह्ळस सिलिंडर व वापरण्याकरिता लागणारे पंप यांची योग्य निवड करून व पाण्यातील उर्वरित क्लोरिनेशनचे प्रमाण नियंत्रित करून सतत लक्ष ठेवावे लागते. क्लोरिनचे प्रमाण कमी झाले तर पाणी प्रदूषित होऊन धोका संभवतो. हे प्रमाण जास्त झाले तर पोहोणाऱ्यांचे डोळे व त्वचा यावर परिणाम होण्याची शक्यता असते. एकदा करून संपणारे हे काम नाही. जागरूक पर्यवेक्षकाची त्यासाठी गरज आहे.

सुरक्षित पाणी - सांडपाणी व कारखाने


कोणतेही पाणी पिण्यासाठी, पोहोण्यासाठी, इतर वापरासाठी सुरक्षित आहे किंवा नाही हे पाहणे जसे महत्वाचे आहे, तसेच कोणत्याही स्वरूपाचे सांडपाणी जेव्हा नदीत सोडले जाते, तेव्हा त्याचे पृथकरण करून व त्यावर प्रक्रिया करूनच सोडावे लागते. शहरातील एकूण सांडपाण्यापैकी 80 टक्के पाणी योग्य ती प्रक्रिया करूनच नदीत सोडावे असा नियम आहे. परंतु अनेक मोठ्या शहरांजवळून वाहणाऱ्या नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता तपासली तर हा नियम पाळला जातो असे वाटत नाही. दरवर्षी या नद्यांच्या शुध्दीकरणाच्या नवनव्या योजना आखल्या जातात आणि कोट्यावधी रूपये खर्च करूनही नद्या प्रत्यक्षात मात्र त्या अपवित्र - अस्वच्छ - प्रदूषित गटारगंगाच राहतात. याला कारण काठावर राहणारी माणसे, कारखाने व उद्योगधंदे यांमधून सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले पाणी हेच असते. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये प्रदूषणाच्या समस्या आहेतच. उद्योगधंद्यांच्या निमित्ताने शहरात येणारे माणसांचे लोंढे आणि त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरणारे शासन यामुळे सांडपाण्याची समस्या वाढते आहे.

गंगा, यमुना, कावेरी यांसारख्या मोठ्या नद्यांच्या जलशुध्दीकरण योजनांवर खर्च होणारा जनतेचाच पैसा त्यामुळे अक्षरश पाण्यात जातो आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या कारणांबरोबरच कुंभमेळे - जत्रा - यात्रा यांसारखी तात्कालिक व पूरसदृश आपत्कालीन कारणे त्यात भर घालतात. नदीकाठावरील सर्वच ठिकाणी मानववस्ती सर्वात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. माणसाच्या पिण्यापासून, धुण्यापर्यंतच्या सर्व गरजा या लोकमाता पूर्ण करतात. यामुळेच नद्या - नाले - ओढे यांचे प्रदूषण होते. भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील पाण्याचे प्रदूषण याप्रकारे सहजपणे होत असते. ठिकठिकाणी असलेली सांडपाणी - मैलापाणी प्रक्रिया केंद्रे अपुरी आहेत.

प्रदूषणाची उगमस्थाने


1. साखर कारखाने महाराष्ट्रातील सुमारे 250 साखर कारखाने - यापैकी आजारी सोडून, किंवा देशातील इतर साखर कारखाने यांमधील मळीयुक्त सांडपाण्यामुळे तेथील नद्यांचे व ते जमिनीत मुरल्यामुळे जवळच्या विहिरींचे सतत प्रदूषण होते.
2. मोठ्या शहरातील मैलायुक्त सांडपाण्यामुळे नद्यांचे प्रदूषण होतच असते. शिवाय धार्मिक उत्सव, पर्वण्या, कुंभमेळे, उरूस या कारणांनी जेव्हा लाखो लोक एकत्र जमतात, तेव्हा एका दिवसात शंभर दिवसांचे प्रदूषण होत असणार. नद्या, तलाव, साचलेली कुंडे पवित्र मानून त्यात स्नान करणारे, त्याच्याच काठावर घाण करणारे, कपडे धुणे व इतर स्वच्छता करणारे, निर्माल्यासह प्लह्ळस्टिक पिशव्या पाण्यात टाकणारे या सर्वांमुळे शासकीय प्रदूषण नियंत्रण यंत्रणेवर ताण येतो.
3. घरे, बिल्डिंग्ज, कार्यालये इ. मधून गटारात किंवा सेप्टिक टँकमध्ये सोडलेले मैलापाणी व टँक्सची गळती प्रदूषणास कारणीभूत होते.
4. हाह्ळस्पिटल्स, हाह्ळटेल्स, लाँड्री, वाहने धुणारी गह्ळरेजेस या सर्वांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी वापरण्यात येणारे क्लिर्न्सस, साबण, डिटर्जण्टस्, फिनाईल्स, कीटकनाशके इ. मुळे निर्माण होणारे सांडपाणी घातक ठरते. हाह्ळस्पिटल्समध्ये रोज निर्माण होणारा वेगळ्या प्रकारचा कचरा व रूग्णांचे धुतले जाणार कपडे यांचे पाणी सोडण्यावर काही नियम आहेत - ते पाळले जातात का हा प्रश्न आहे.
5. शेतांमध्ये जैविक किंवा रासायनिक खते, कीटकनाशके वापरली जातात व शेतीला पाणीही दिले जाते. त्यामुळे, जमिनीवरून व खालून वाहणारे पाणी स्वत सोबत हे सर्व सांडपाणी वाहून आणून जमिनीत मुरवते. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरी, कूपनलिका यांमधील पाण्याची गुणवत्ता कमी होते.
6. पावसामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यात जे विद्राव्य किंवा अविद्राव्य घटक मिसळतात, त्यामुळे पाणी प्रदूषित होते.
7. रासायनिक खतांमधील नायट्रोजन व फाह्ळस्फरस पाण्यात मिसळून शेवाळे व पाणवनस्पती जास्त प्रमाणात वाढतात. जैव विघटनात्मक सेंद्रीय पदार्थ वाढल्याने, पाण्यातील विद्राव्य प्राणवायू कमी पडतो.
8. काश्मीरसारख्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे वास्तव्य असलेल्या हाऊसबोटी, व्यापारी व प्रवासी जहाजे यांच्या सांडपाण्याची व्यवस्था लावण्यासाठी वेगळे नियम आहेत पण ते पाळले जात नाहीत.

नियंत्रण व्यवस्था


पाण्याच्या सर्व प्रकारच्या स्त्रोतांचे नियंत्रण करण्याकरिता जलप्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये प्रत्येक राज्यात मंडळे स्थापन केली आहेत. त्यांना बरेच अधिकारही दिलेले आहेत. परंतु ते वापरताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे - स्थानिक राजकारण व उद्योगपतींचे दबाव, ते कागदोपत्रीच राहतात. काही कारखाने दाखवण्यापुरती सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था करतात. तिचा योग्य प्रकारे वापर केला जात नाही.

वास्तविक शहरातील पाण्याच्या शुध्दतेची जबाबदारी जीवन प्राधिकरणाकडे असते. शहरातील आणि औद्योगिक वसाहतीतील, कारखान्यांच्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळावर असते. आणि सिंचन तलावांमधील पाणी सिंचनायोग्य ठेवण्याची जबाबदारी पाटबंधारे खात्यावर असायला हवी.

काही ना काही कारणांमुळे आपल्याकडील प्रदूषण नियंत्रण मंडळे त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास कमी पडतात आणि त्यामुळे सर्वत्र पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असलेला दिसून येतो.

गुणधर्मानुसार पाण्याची नावे


ऋग्वेदात पाण्याचा उल्लेख जलदेवता असा केला आहे. आयुर्वेदात पाण्याचे महत्व सांगून त्याला नीर, जल, उदक, जीवन ही नावे दिली आहेत. याशिवाय सलील, आप, तोय, पय, अंभ, अर्ण वगैरे शब्दांचा वापर केवळ पर्यायी शब्द म्हणून केलेला नसून त्या त्या प्रकारच्या पाण्याच्या गुणधर्मानुसार वापरले जात असावेत. आप पुनातु पृथ्विम् । म्हणजे पृथ्वीला शुध्द करण्याची शक्ती पाण्यात असल्याचे सांगितले आहे.

श्री. शामराव ओक, पुणे - (दूरध्वनी 020-25432308)

Path Alias

/articles/paanayaacai-gaunavatataa-va-taicae-naiyantarana

Post By: Hindi
×