विषय प्रवेश :
घरांमध्ये शुध्द पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर त्या पाण्याची योग्य प्रकारे साठवण करणे गरजेचे आहे. घरगुती पातळीवर साठवण करण्यात आलेल्या पाण्याची योग्य प्रकारे हाताळणी अत्यावश्यक आहे. यात कसूर झाल्यास पाण्याची गुणवत्ता बाधीत होवून रोगराईस निमंत्रण दिल्यासारखे होते. घरगुती पातळीवर साठवणूकीची भांडी दररोज स्वच्छ करावीत, ती भांडी स्वच्छ जागी अथवा लान मुलांच्या हाताला येणार नाही इतक्या उंच आढणीवर ठेवावीत, बाहेरील धूळ, कचरा यांनी पाण्यास बाधा होवू नये यासाठी साठवणुकीचे व्यवस्थित झआकलेले असावे.
पाण्याची गुणवत्ता ही पाण्याच्या वापरासंबंधातील अतिशय महत्वाची बाब आहे. म्हणजेच पाण्याचा उपयोग कोणकोणत्या वापराशी संलग्न आहे हे ठरविण्याचे महत्वाचे परिमाण सुध्दा पाण्याची गुणवत्ता आहे. ढोबळमानाने विचार केला असता, पिण्याचे पाणी, घरगुती वापरासाठी पाणी, शेतीसाठी उपयुक्त पाणी तसेच कारखान्यासाठी उपयोगात येवू शकणारे पाणी असे विविधांगी पाण्याच्या गुणवत्तेचे प्रकार लक्षात येतात. अर्थातच या सर्वांमध्येही पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अत्युच्च असणे आवश्यक आहे.भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल या दोन्हीही अवस्था शुध्द असू शकतात. निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित परिस्थितीमुळे पाण्याच्या या दोन्ही अवस्था प्रदूषण बाधीत होवू शकतात. विज्ञानाच्या भाषेत पाण्याची गुणवत्ता तीन प्रकारात मोडते - १. भौतिक गुणवत्ता, २. रासायनिक गुणवत्ता आणि ३. जैविक गुणवत्ता.
रंग, गंध, चव आणि तापमान हे घटक भौतिक गुणवत्ता दर्शवितात. थंड व गोड पाणी प्यायल्याने समाधान मिळते परंतु खारट पाणी तसेच दर्पयुक्त पाणी चित्त - विचलित करते व समाधान सुध्दा मिळत नाही. रंगहीन पाणी शुध्दतेचे आणि प्रसन्नतेचे द्योतक आहे. रासायनिक गुणवत्ता धन आणि ऋण भार आधारित अणु - रेणु अथवा रासायनिक पदार्थामुळे स्थापित होत असते. जैविक गुणवत्ता, पाण्यातील विषाणू व इतर जीवजंतूसाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूच्या मात्रेशी संबंधित असते. वर दिलेल्या तीनही गुणवत्ता प्रकारात भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांचे अपेक्षित योग्य प्रमाण व जास्तीत जास्त मर्यादा याचे परिणाम वेगवेगळ्या संशोधन संस्थांशी घालून दिलेले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अशा दोन मानांकित संस्थेचे मानक आपण उपयोगात आणतो.
केंद्रीय भूजल प्राधिकरण, जलसंसाधन मंत्रालय, भारत सरकार या संस्थेने पाण्यात आढळणार्या भौतिक, रासायनिक घटकामुळे अथवा सूक्ष्म जिवाणूंमुळे होणार्या रोगांबाबत पत्रके तयार केलेली आहेत. त्यानुसार शरीरातील अवयवांवर होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत.
पाण्यातील द्रव्ये आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम :
सेलेनियम - केसांचे गळणे, दातांचे क्षीण होणे
थॅलियम - केसांचे गळणे
मँगनीज - मानसिक व मज्जातंतूचे विकार
शिसे - मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासाला बाधा पारा, सायनाईड व आर्सेनिक - मज्जातंतूचे विकार
मिथाईल पारा - केंद्रीय मज्जसंस्थेवर दुष्परिणाम, विषाक्त (मिनामाता रोग)
अॅल्युमिनियम - अल्झेमर रोग ( मेंदूचा रोग)
आर्सेनिक - नाकपुड्यांचा कर्करोग, त्वचा विकार
निकेल - श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे
फ्लोराईड - दातांवर डाग व खड्डे पडणे, हाडांना वाक येणे, त्वचा रोग
जिवाणू / विषाणू/ कृमी/ किटाणू - टायफॉईड, अतिसार, कॉलरा, कावीळ, पोलियो, हागवण,खरूज, मलेरिया, फायलेरिया इत्यादी रोग होतात.
गढुळता - गढूळतेमुळे पाण्यात रोगजंतू आढळतात. आकर्षकता निघून गेल्यामुळे गढूळ पाणी पिण्यासाठी वापरायोग्य राहत नाही.
जडपणा - अन्न शिजविण्यासाठी वेळ लागतो, भांड्यांवर डाग जमतात, साबणाचा फेस होत नाही, पचनसंस्थेवर विपरित परिणाम
पीएच (pH) - जीवरासायनिक क्रियांमध्ये अनावश्यक बदल होवून या क्रिया योग्य रितीने कार्य करीत नाही. पिण्याच्या पाण्याचा पी.एच ७ पेक्षा कमी नसावा अथवा ८.५ पेक्षा जास्त वाढू नये.
लोह व मँगनीज जठारात व्रण होण्यास वाव असतो
क्लोराईड - पाणी खारे होते, दूध फाटते, चव बदलते
नायट्रेट - रक्ताभिसरणाचे रोग जडतात
फॉस्फेट - पाण्याची गुणवत्ता निकृष्ट होते. प्रत खराब होते. अशा पाण्यात पाणवनस्पती / शेवाळे वाढीस लागतात.
गुणवत्ता बाधीत पाणी :
भारतात मुख्यत्वे करून फ्लोराईड, नाईट्रेट, आर्सेनिक, शिसे व लोह या रासायनिक पदार्थांच्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता बाधीत झालेली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने फ्लोरोसिस या रोगासाठी त्यांचा पहिला लेखसंग्रह सन १९५९ साली प्रसिध्द केला. आपणाला या रोगाची माहिती होण्यास मात्र १९८५ साल उजाडावे लागले. फ्लोरोसिसची माहिती सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा तहसिल मधून आली. दातांचा फ्लोरोसिस व हाडांचा फ्लोरोसिस येथूनच समजण्यात आला. तत्पूर्वी दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यात गुरेढोरे यांच्या कळपात हा रोग तेथील शेतकर्यांना लक्षात आला व त्यानंतर तो मानवात दिसून आला.
केंद्रीय भूजल प्राधिकरण (१९९९ , २००२) च्या अन्वये सद्य:स्थितीत भारतात फ्लोरोसिसने ग्रस्त असलेली १५ राज्ये हूडकून काढण्यात आलेली आहेत. राजीव गांधी नॅशनल ड्रिंकींग वॉटर मिशन (१९९३) ने भारतातील राज्यनिहाय फ्लोरोसिसचे नकाशे प्रसिध्द केले. त्यानुसार आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजराथ, राजस्थान आणि तत्कालीन उत्तर प्रदेशातील ५० टक्के ते १०० टक्के जिल्हे बाधीत होते. जम्मू आणि कश्मिर, ओरिसा व केरळ या राज्यात ३०ट क्के पेक्षा कमी जिल्हे प्रभावित होते. तर हिमाचल प्रदेश, पं. बंगाल आणि सिक्कीमसहित सात बहिणींच्या प्रदेशात फ्लोरोसिस आढळून आला नाही. अनेक सर्वेक्षणातून असे लक्षात येते की, भारतासाठी ०.६ ते १.० मि.ग्रॅ / लिटर इतकी फ्लोराईडची मात्रा असलेले पाणी हाडांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. भारतीय मानक ब्युरोने १.० मि.ग्रॅ / लिटरची मर्यादा घालून दिलेली आहे. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO. १९८४) नुसार पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण १.५ मि.ग्रॅ / लिटर इतके चालू शकते.
खर्ब आणि सुशीला (१९९४) व सुशीला (२००१) यांची फ्लोरोसिसचे तीन प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. १. दातांचा फ्लोरोसिस, २. हाडांचा फ्लोरोसिस व ३. पेशींचा फ्लोरोसिस, फ्लोराईडची अधिक मात्रा असलेले पाणी प्यायल्याने दातांवरील चट्टे, तकाकीहीन डाग, दातांचा पिवळेपणा किंवा कथ्था रंग, दातांच्या वरील ऐनॅमल - आवरणाचा थर नाहीसा होणे असे प्रकार होतात. दातांचा फ्लोरोसिस हा केवळ स्थानिक नाही तर जीवनमान पध्दतीशी त्यांचा निकटचा संबंध आहे. ज्यांचे जीवनमान थोडे उच्च आहे त्यांना या रोगाची लागण कमी होते किंवा त्यांना रोग बाधत नाही. ज्याच्या जेवणात कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात आहे अशांना फ्लोरोसिसची बाधा कमी प्रमाणात आहे.
फ्लोराईडच्या अति मात्रेच्या सेवनाने हाडांचा फ्लोरोसिस होतो. संशोधनातून असे अनुमान काढता येते की, फ्लोराईडचे प्रमाण जर ४ ते ८ मि.ग्रॅ / लिटर या प्रमाणात असेल तर हाडांचा फ्लोरोसिस होतो. याचा प्रभाव मुले अथवा प्रौढांनासुध्दा जाणवतो मान, पाठ, सांधेदुखी तसेच सांध्याचे अकडणे अशी या रोगाची लक्षणे आहेत. याची तीव्रता वाढून पुढे मानेचा अथवा कमरेचा स्पाँडीलॉसीस नावाचा आजार बळावतो. खांदे, गुढगे दुखणे यातूनच सुरू होते व यासारख्या इतर दुर्धर रोगांना रोगी बळी पडतो. बिगर हाडाच्या फ्लोरोसिसमध्ये नसा व पेशींची अकडण, रोगप्रवणता, संवेदनशीलतेचा अति त्रास होणे, पित्ताशय खराब होणे, पोटफुगी, गरोदर महिलांना त्रास, मूत्रमार्गातील आजार तसेच तीव्र डोकेदुखी या सारख्या समस्या उद्भवतात. तसेच कर्करोग प्रजनन क्षमतेतील कमतरता यासारखे आजार बळावताना दिसत आहे.
फ्लोरोसिस या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वैयक्तिक स्तरावर तसेच सामुहिक स्तरावर प्रयत्न करता येवू शकतात. यामध्ये डिफ्लोरीडेशन ही पध्दती वैयक्तिक स्तरावर राबविता येते. वाढीव जीवनसत्व असलेले अन्न ग्रहण केल्याने बर्याच प्रमाणावर फ्लोरोसिसवर नियंत्रण ठेवता येते. नालगोंडा तंत्र नावाची विकसित पध्दती पिण्याच्या पाण्यातील फ्लोरोईडची मात्रा कमी करते, असे पाणी पिण्यास युक्त असून या तंत्राद्वारे पाणी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेस अगदीच नगण्य खर्च येतो. चुन्याची निवळी आणि तुरटी यांचे योग्य प्रमाणातील मिश्रण पाण्यात घालून ठेवल्याने त्यात रासायनिक प्रक्रिया होवून पाणी पिण्यायोग्य होते. फ्लोरोसिस बाधीत गावांमध्ये खैर, पीपळ, निंब, बोन चार, फ्लोरेक्स किंवा सिंथेटिक ट्रायकॅल्शियम फॉस्फेटसारखे रासायनिक पदार्थ वापरून पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सफल झालेले आहेत. सामाजिक स्तरावर राबविण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनेमध्ये भूजल पुनर्भरण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.
आंध्रप्रदेशातील काही गावांना, जिथे पाण्याची गुणवत्ता फ्लोरोसिसमुळे बाधीत झालेली आहे तिथे, फक्त पिण्यासाठी शुध्द पाणी (५ लिटर्स) टाकीमधून पुरविण्यात येते. पाण्याच्या इतर वापारसाठी गावातील पाणी उपयोगात आणले जाते. यासारख्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
नागपूर विद्यापीठाअंतर्गत होमसायन्स व भूगर्भशास्त्र विभागाने राजीव गांधी नॅशनल ड्रिंकींग वॉटर मिशन प्रकल्पाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील (महाराष्ट्र) राजुरा व कोरपना तहसीलमधील फ्लोराईड बाधीत गावांमध्ये एक अनोखा प्रयोग केला. शाळेत न जाणार्या मुलांपासून ते वयस्क व्यक्तिवर हा प्रयोग करण्यात आला. यात ज्वारीच्या ऐवजी रागी (Eleucine Coracana) व कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेले अन्नसत्व खावयास देण्यात आले व फ्लोराईडची मात्रा तपसण्यात आली. प्रयोगाअंती असे लक्षात आले की फ्लोराईडची मात्रा जी पूर्वी १.५५ ते ४.१२ इतकी होती ती १.४० - ३.४३ मि.ग्रॅ / लिटर झाली.
आर्सेनिक नावाच्या रासायनिक घटकानी प. बंगाल व आजूबाजूच्या परिसरात थैमान घातलेले आहे. प. बंगालच्या नाडिया जिल्ह्यात आर्सेनिकचा प्रादुर्भाव जास्त आहे. सर्वेक्षणातून असे लक्षात येते की पिण्याच्या पाण्यातून जास्त मात्रेतील आर्सेनिक शरीरात जाते व त्यापासून जुनाट असे त्वचेचे रोग होतात. काही परिस्थितीमध्ये ते जीवन - घातक झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. नाडिया जिल्ह्यातील हुगळी व जलांही नद्यांच्या आजूबाजूचा हा परिसर आहे .
पाण्याचे प्रदूषण :
पर्जन्याचे पाणी जमिनीवर पडून वाहू लागले की काही प्रमाणात पाणी जमिनीत मुरते. जमिनीवरून वाहत जाणारे पाणी, गुणवत्ता बाधीत करणार्या वस्तूंशी संपर्कात आले तर पाणी प्रदूषित होते. पाणी जमिनीत मुरतांना भूस्तरांतील विविध क्षार त्यामध्ये विरघळतात अथवा न विरघळणारे घटक पाण्यात मिसळतात. भूपृष्ठावरील पाण्याच्या प्रदूषणाची कारणे :
- नदी, ओढे, नाले, तलाव यामध्ये घरगुती सांडपाणी मिसळल्याने.
- कारखान्यातून सोडले जाणारे सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता शुध्द पाण्याच्या स्त्रोतात मिसळल्याने.
- पिकांसाठी फवारलेली कीटकनाशके अथवा जमिनीतून उत्पदकता वाढविण्यासाठी घातलेले खते यांचा पाझर स्त्रोतांपर्यंत पोहचल्याने, ग्रामीण भागातील पाणी प्रदूषित होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.
- नदी, नाले, ओढे किंवा तलाव यामध्ये कपडे, जनावर अथवा वहान धुतल्याने
- स्त्रोतांमध्ये मानवांची अथवा पशुंची मृत शरीरे टाकल्याने, भारत देशातील अनेक नद्या याच कारणामुळे प्रदूषित झालेल्या आहे. उदा, गंगा, गोदावरी, शरयू, यमुना इत्यादी.
- स्त्रोतांच्या अगदी कडेला मलमूत्र विसर्जनाची जागा असेल तर त्वरित प्रदूषण वाढते.
- ग्रामीण भागात, आजकाल, सर्व्हिसिंग सेंटर्स उघडू लागली आहेत. यातून प्रदूषित पाणी मुख्य स्त्रओताला जावून मिळते व स्त्रोत गुणवत्ता बाधीत होतो.
- समुद्र किनार्यालगतच्या नदी, नाले ओढे यामध्ये भरतीच्या वेळेस पाणी शिरल्याने.
- खाणींमधील जमा झालेले पाणी उपसून खाणींच्याच आजूबाजूच्या परिसरात सोडतात. खाणींमधील पाणी खनिजाच्या स्वरूपात बाधीत असते. असे पाणी नदी, ओढे, तलाव यामध्ये जावून मिसळल्यास स्त्रोत प्रदूषित होतो.
- रस्ते बांधतांना किंवा डांबरीकरण करतांना आजूबाजूचे स्त्रोत प्रदूषित होवू शकतात.
भूगर्भातील पाणी प्रदूषित होण्याची कारणे :
- महानगर पालिका, नगर पालिका, ग्रामपंचायतीक्षेत्रामध्ये सांडपाण्याची व्यवस्था कोलमडली तर सांडपाणी जमिनीत झरपू लागते व भूजल बाधीत होते. यामध्ये जुन्या पाईप लाईन्स तुटल्यामुळे किंवा सांडपाण्याचे पाईप लावतांना केलेली हयगय, यांचा समावेश आहे.
- शहरी भागात झाडांची मुळं सांडपाण्याची व्यवस्था विस्कळीत करतात व अशा ठिकाणी सांडपाण्यामुळे स्त्रोत बाधीत होतात.
- ठिकाणे, कारखाने यातून द्रव स्वरूपातील घाण तयार होते. ती द्रवस्वरूप घाण झिरपून भूजलाचे प्रदूषण करविते.
- भूजलाच्या उद्भवाजवळील जागा, जसे विहीरी किंवा हातपंप या भोवती योग्य प्रकारे ओटे न बांधल्याने उद्भवतात, कचरा जावून भूजल प्रदूषित होते.
- उद्भवाजवळच एखादे शौचालय अथवा खतांचा खड्डा किंवा जनावरांचा गोठा बांधल्याने भूजल अति शीघ्र प्रदूषित होते.
- शेतजमिनीतून कीटकनाशके व रासायनिक र्खीें पाझरून भूजल प्रदूषित होते.
पाण्याचे निर्जंतुकीकरण :
स्वच्छ दिसणार्या पाण्यात न दिसणारे रोजजनक जंतू असू शकतात. जीव, जंतू व विषाणूंमुळे पाणी दूषित होवू शकते. हेच दूषित पाणी प्यायल्याने वेगवेगळ्या प्रकारचे रोग गोवू शकतात. टायफाईड, कॉलरा, काविळ, आंव, हागवण, गॅस्ट्रो यासारखे रोग लवकरच बळावतात, म्हणून पाणी शुध्द असणे आवश्यक आहे. याकरिता पाण्याचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे अत्यावश्यक आहे. शहरात घरोघरी वेगवेगळ्या कंपन्यांचे तयार गाळणयत्र (फिल्टर्स) बसविलेले आढळतात किंवा शुध्दीकरण संयंत्रातून शुध्द झालेले पाणी नळयोजनेद्वारे घरात उपलब्ध होते. ग्रामीण भागात गाळणयंत्र बसवून शुध्द पाणी मिळणे जरा दुरापास्त आहे, म्हणून पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. क्लोरीनीकरण करणे हा निर्जंतुकीकरण करण्यासाठीचा सोपा उपाय आहे. ब्लिचिंग पावडरच्या स्वरूपात क्लोरीनीकरण करतात.
त्यामुळे जीव जंतू व विषाणू नष्ट होतात आणि शुध्द पाणी सहज प्राप्त होते. चुन्यामध्ये यंत्राद्वारे क्लोरिन वायू मिसळून ब्लिचिंग पावडर तयार होते. (याला टी.सी.एल. पावडर या नावानेसुध्दा संबोधल्या जाते.) ताज्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असावे. क्लोरिनचे हे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी, बंद डब्यात, बंद पिशवीत परंतु कोरड्या जागी (ब्लिचिंग पावडर) ठेवणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारची नीट काळजी घेतली नाही तर कालांतराने ब्लिचिंग पावडरमधील क्लोरिन वायू हवेत जातो व पावडरची निर्जंतुकीकरणाची शक्ती कमजोर पडते.
योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमधील क्लोरिनचा परिणाम होवून जीव, जंतू आणि विषाणूंचा नाश होण्यासाठी साधारणत: ३० ते ४० मिनीटांचा कालावधई लागतो. ५ ग्रॅम ब्लिचिंग पावडरचे द्रावण १००० लिटर पाण्याचे निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे पूर्ण करू शकते. निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्यात क्लोरिनची मात्रा शिल्लक असते. पाण्यातील शिल्लक क्लोरिन प्रदूषणापासून संरक्षण करतो म्हणजेच पाण्यात क्लोरिन शिल्लक असेल तर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण झाली असे मानता येईल. आथोटोलिडीन चाचणी (याला ओ.टी. टेस्ट म्हणातात ) द्वारे पाण्यात क्लोरिन किती प्रमाणात शिल्लक आहे हे मोजून काढता येते. ही चाचणी करण्यासाठी क्लोरोस्कोप नावाचे उपकरण उपयोगात आणतात. ओ. टी टेस्ट नकारात्मक (निगेटिव्ह) आली तर पाण्यात क्लोरिन शिल्लक नाही असा अर्थबोध होतो.
क्लोरिन निधून गेलेली ब्लिटिंग पावडर निर्जेतुकीकरणासाठी अनवधानाने वापरली जाते, पण अपेक्षित शुध्दीकरण होत नाही. म्हणूनच ओ.टी. टेस्ट नियमित कालावधीनंतर करवून घेणे गरजेचे आहे. ओ.टी. टेस्ट सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्यास विहीरीचे पाणी अथवा हातपंपाचे पाणी शुध्दीकरणास अशा ब्लिचिंग पावडरचा अपेक्षित फायदा होतो. तथापि, कालांतराने निर्जुंतुकीकरण केलेल्या पाण्याची गुणवत्ता कायम राखणे व जल प्रदूषण होवू नये यासाठी विशेष दक्षता घ्यावे लागते.
घरांमध्ये शुध्द पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर त्या पाण्याची योग्य प्रकारे साठवण करणे गरजेचे आहे. घरगुती पातळीवर साठवण करण्यात आलेल्या पाण्याची योग्य प्रकारे हाताळणी अत्यावश्यक आहे. यात कसूर झाल्यास पाण्याची गुणवत्ता बाधीत होवून रोगराईस निमंत्रण दिल्यासारखे होते. घरगुती पातळीवर साठवणूकीची भांडी दररोज स्वच्छ करावीत, ती भांडी स्वच्छ जागी अथवा लान मुलांच्या हाताला येणार नाही इतक्या उंच आढणीवर ठेवावीत, बाहेरील धूळ, कचरा यांनी पाण्यास बाधा होवू नये यासाठी साठवणुकीचे व्यवस्थित झआकलेले असावे.
शक्यतो शुध्द पाण्यास हाताचा स्पर्श होवू नये याची दक्षता घरयावे त्याकरिता लांब दांड्याच्या पाणी वाढणीचा वापर करावा. चुकूनही जमिनीमध्ये माठ किंवा रांजण ठेवू नये. जमिनीत खड्डा करून त्यात माठ अथवा रांजण ठेवलेले आपण पाहतोच. पाणी थंड राहण्यासाठी असा प्रयोग करतात. तथापि, अशा माठातील किंवा रांजणातील पाणी आरोग्यास बाधक ठरू शकते. पाणी पिण्यासाठी तांब्या / गडवा उवा पेल्यास तोंड लावूनच पाणी पिणे आवश्यक नाही. तोंड न लावता वरून पाणी पिण्याची सवय लावणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येकवेळी पेला धुण्याचे प्रमाण कमी होवून पाण्याची बचत होईल आणि शुध्दता टिकविणे सोईचे जाईल.
पावसाळ्यात भूपृष्ठावरील आणि भूजल साठे प्रदूषित होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. याच प्रदूषित पाण्यातून साथींच्या रोसाची लागण होते. म्हणून अशा दिवसात निर्जंतुकीकरणासाठी विशेष काळजी घेणे क्रमप्राप्त असते. अशावेळी निर्जुंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडरची मात्रा वाढवावी, तसेच नियमितपणे ओ.टी. टेस्ट करवून घ्यावी.
डॉ. योगेश मुरकुटे - मो : ९८२२२९६२९५
Path Alias
/articles/paanayaacai-gaunavatataa
Post By: Hindi