विश्वास बसू नये अशा गोष्टींवर विशषत: जपानमध्ये संशोधन व प्रयोग झाले आहेत. वरील निष्कर्षांवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण डॉ. मासारू इमोटो या जपानी संशोधकाने ‘Messages from Water’ या आपल्या पुस्तकात ही सर्व माहिती व त्याला पुराव्यादाखल पाण्याच्या स्फटिकांची छायाचित्रेही दिली आहेत.
जुनाट व बरे न होणाऱ्या रोगांवर उपचार करण्याकरिता मंतरलेले पाणी वापरणे हा अंधश्रध्देचा भाग असेच मानले जात असे. परंतु, पाण्यावर खरोखरच बाह्य गोष्टींचा काही परिणाम होतो का याचा अभ्यास केल्यावर असे निष्कर्ष निघाले की -1. पाण्याची स्तुती केली किंवा अपशब्द वापरले तर त्यावर त्याचा परिणाम होतो.
2. पाण्याला व्यक्तींची नावे समजतात व त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार पाणी प्रतिसाद देते.
3. पाण्यावर संगीताचा परिणाम होतो व ते तसा प्रतिसाद देते.
4. पाण्यावर चित्रांचा किंवा विशिष्ट दृश्यांचा प्रभाव होतो.
विश्वास बसू नये अशा गोष्टींवर विशषत: जपानमध्ये संशोधन व प्रयोग झाले आहेत. वरील निष्कर्षांवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण डॉ. मासारू इमोटो या जपानी संशोधकाने ‘Messages from Water’ या आपल्या पुस्तकात ही सर्व माहिती व त्याला पुराव्यादाखल पाण्याच्या स्फटिकांची छायाचित्रेही दिली आहेत. पाण्यातील गूढत्व या विषयावर ठाम मत व्यक्त करताना, त्यांनी या तंत्राचा अवलंब केला आहे Magnetic Resonance Analyser आवश्यक ते पृथ:करणही केले आहे.
या तंत्राचा अवलंब करून इमोटो यांनी पाण्याच्या विविध ठिकाणच्या नमुन्यांचे पृथ:करण केले -
1. शहरातील पाणी - जपानमधील निरनिराळ्या 14 शहरांमधील पाणी व त्यांची स्फटिके यांचा अभ्यास केला.
2. नैसर्गिक पाणी - जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा देशातील पाणी स्त्रोतांचे नमुने घेऊन त्याची स्फटिके अभ्यासली.
3. नद्यांचे पाणी - नद्यांच्या प्रवाहातील पाण्याचे वेगवेगळ्या ठिकाणचे नमुने घेऊन प्रदूषणामुळे बिघडलेल्या स्फटिकांकृतींचा अभ्यास केला.
4. हिमनद्यांचे पाणी - कॅनडा, द.ध्रुवप्रदेश, न्यूझीलंड येथील पाण्याच्या नमुन्यांवरून स्फटिकांचा अभ्यास केला.
5. पावसाचे पाणी - जपानमधील 11 ठिकाणच्या पावसाच्या पाण्याचे नमुने तपासल्यावर स्फटिकांचे वेगवेगळे आकार दिसले. डॉ. इमोटो यांचा मुख्य अभ्यास पाणी गोठल्यावर होणाऱ्या स्फटिकांबद्दलचा आहे. त्यांनी निरनिराळ्या परिस्थितीमधील व वेगवेगळ्या बाह्य वातावरणातील पाणी गोठल्यावर तयार झालेल्या स्फटिकांची छायाचित्रे घेऊन व त्यांचा अभ्यास करून आपले निष्कर्ष मांडले आहेत. बाह्य वातावरणातील लहरींचा व ऊर्जेचा परिणाम स्फटिकांवर होतो. याबाबतीत त्यांची एक मुलाखत श्री. रेइको म्यामोटो ड्यूइ यांनी घेतलेली आहे. ती मुळातूनच वाचण्यायोग्य आहे. परंतु त्यातील काही आश्चर्यचकित करणाऱ्या उत्तरांचे नमुने वाचकांसाठी येथे नमूद करावेसे वाटतात - पाण्याला वाचता येते व दिसते हे सिध्द करण्यासाठी -
1. निरागस मुलाच्या चित्रावर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतील स्फटिक फारच सुंदर होते व कुरूप चित्रावर ठेवलेल्या पाण्याचे स्फटिक वेडेवाकडे होते.
2. दोन बाटल्यांमध्ये एकाच प्रकारचा भात एकाच पध्दतीने शिजवून ठेवला व एकाला उद्देशून Thank you व दुसऱ्याला उद्देशून You Fool असे शब्द सातत्याने उच्चारले तर Thank you वाल्या बाटलीतील भाताला मंद गंध येत होता व You Fool वाला भात काळा पडून सडल्याची दुर्गंधी येत होती.
3. एका कागदाच्या पृष्ठभागावार हीच वाक्ये लिहून त्यावर पाण्याच्या बाटल्या ठेवल्या तर त्यांच्या स्फटिकांवर होणारे परिणाम अगदी स्पष्टपणे वेगळे दिसतात. याबाबत अधिक संशोधन चालू आहे.
4. एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समुदाय परमेश्वराची प्रार्थना करीत असेल तर पाण्याच्या स्फटिकावर भक्तिभावाने प्रार्थना करण्याचे वेगळे परिणाम दिसू शकतात.
5. प्रत्येक उच्चारल्या जाणाऱ्या शब्दाला स्वत:ची स्वतंत्र लहरी निर्माण करण्याची ताकद असते. अपशब्दामुळे ते एैकणाऱ्या पाण्याचे स्फटिक एकत्र येऊन ते लवकर नाश पावतात.
6. मानवी शरीरातील रक्त, लाळ, लघवी यावरील परिणाम पाहाण्याकरिता त्या द्रावांचे सौम्यीकरण करणे आवश्यक असते. कारण या द्रावांमध्ये पाण्याशिवाय इतर पदार्थ असतात. त्यामुळे स्फटिक तयार करणे अवघड जाते. कधी कधी हे सौम्यीकरण (dilution) 10 -12 किंवा 10 -20 पर्यंत करावे लागते व मगच त्यापासून स्फटिक तयार होऊ शकतात.
अशा प्रकारे पाण्याच्या स्फटिकांवर होणाऱ्या परिणामांचे अगदी सूक्ष्मपणे निरीक्षण करून डॉ.इमोटो यांनी आपले निष्कर्ष नोंदविले आहेत. तसेच, शेवटी अंतराळातून येणाऱ्या पाण्याविषयीही काही विवेचन केले आहे. ऋग्वेदातसुध्दा काही ऋचा असे संदर्भ देणाऱ्या आहेत. ऋचा 7.101.6 मध्ये पर्जन्याला सर्व स्थावर - जंगम सृष्टीचा मूलाधार व जगदुत्पादक आदिशक्ती असे म्हटले आहे.
नासाचे 1997 मधील संशोधन आणि इ.स.पूर्व 5/6 हजार वर्षातील ऋग्वेदातील प्रतिपादन यात विलक्षण साम्य आहे हे सुध्दा एक महदाश्चर्यच म्हणावे लागेल.
स्फटिकजल - Water of crystallization :
कोणत्याही अजैविक रसायनाच्या रसायनशास्त्रामध्ये, त्याचा आकृतिबंध तयार करताना, स्फटिकजलाचा विचार करावाच लागतो. हे स्फटिकजल मूळ क्षाराच्या अणूंशी किंवा रेणूंशी कोणत्याही निश्चित बंधांनी निगडित नसते. (Not bonded) स्फटिक तयार होताना जर आर्द्र द्रावणातून (Moistsolvent) तयार केले जात असतील तर ते क्षार स्वत:बरोबर काही पाण्याची रेणूसुध्दा सामावून घेतात आणि मगच त्याचे स्फटिक तयार होतात. अशा या स्फटिकांमध्ये पाहुणे म्हणून आलेले पाणीसुध्दा सामावलेले असते. उदाहरणार्थ -
कॉपर सल्फेट - CuSO4, 5H2O
कोबाल्ट क्लोराइड - CoCl2, 6 H2o हेक्झा हायड्रेट
स्टर्निस क्लोराइड - SnCl2, 2 H2o डाय हायड्रेट
या स्फटिकांचे स्फटिकजलासकट केलेल्या द्रावणांचे गुणधर्म बहुतेकवेळा सारखे असतात. त्यामुळे CuSO4, 5H2O व CuSO4 ((स्फटिकजलाशिवाय) चे वेगळे द्रावण केले तरी त्यांचे गुणधर्म सारखेच असतात. परंतु सारखे गुणधर्म असणे हा काही नियम नाही. कारण काही काही स्फटिकजलयुक्त रासायनिक क्षारांचे गुणधर्म अगदी भिन्न असतात.
निर्जीव पाणी - Dead water :
निर्जीव पाणी हा एक विचित्र अनुभव आहे. नॉर्वेजियन संशोधिका नॅब्सेन ह्या ध्रुवीय प्रदेशातील अनुभवांचा अभ्यास करित असताना, त्यांना एक चमत्कारिक अनुभव आला. कमी ताकदीच्या खाऱ्या पाण्याचा (Brackish water) थर जेव्हा जास्त घनता असलेल्या पाण्याच्या थरावर न मिसळता तरंगलेले असतात. अशावेळी त्या पाण्यावरून प्रवास करणाऱ्या जहाजाचा वेग मंदावतो. इतकेच नव्हे तर कधीकधी ते जहाज एकाच जागी खिळून राहते. कधी वेगामध्ये 20 टक्के घट झालेली आढळते. याला नॅब्सेनचा फिनॉमेना असे नाव आहे.
Brine Water - मिठवणी -
पाण्यामध्ये मिठाचे प्रमाण संपृक्त (Saturation) पातळीपर्यंत असले तर त्या पाण्याला मिठवणी (Brine water) असे म्हणतात. पूर्वी हे पाणी मासळी व भाजीपाला टिकवण्याकरिता वापरले जात असे. त्याचप्रमाणे ते उष्णतावाहक म्हणूनही वापरले जाते.
आभासी पाणी किंवा अदृश्य पाणी - Virtual water -
इ.स. 1993 साली, प्रा.जॉन अँथनी अॅलन या लंडनमध्ये राहणाऱ्या पाणी अभ्यासकाने , आभासी पाणी ही संकल्पना जगापुढे मांडली. समाजातील सर्वच महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या घटक व्यवस्थेमध्ये, म्हणजे कृषि उत्पादन, अर्थकारण, समाजकारण यामध्ये आभासी किंवा अदृश्य पाण्याचे महत्त्व त्यांनी स्वत:च्या लेखनामधून सतत समाजापुढे मांडले. आपण रोजच्या सर्व व्यवहारांमध्ये, प्रत्यक्ष पाण्याचा उपयोग पिण्याकरिता किंवा इतर सर्व वापराकरिता जेवढा करतो, त्याच्या कितीतरी पटीने अधिक वापर आपण अप्रत्यक्षपणे करीत असतो असा त्यांचा सिध्दांत असून त्याला त्यांनी आभासी पाणी - Virtual water असे नाव दिले.
हा सिध्दांत पटविण्यासाठी प्रा. अॅलन यांनी रोज सकाळी प्यायल्या जाणाऱ्या एक कपभर चहाचे उदाहरण दिले. प्रत्यक्ष कपभर चहा करताना सुमारे 50 ते 75 मि.लि. पाणी लागते. पण या चहासाठी लागणारे जे घटक पदार्थ म्हणजे चहा, दूध व साखर निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा हिशेब केला तर तो साधारणत: 20 ते 25 लिटर म्हणजे सुमारे दीड बादली इतका होतो. साखरेसाठी ऊस लागतो, चहाच्या पत्तीसाठी झाडे लागतात. ती वाढविण्याकरिता व आपल्यापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी येवढे पाणी लागते.
याच हिशेबाने शाकाहारी व्यक्तीला लागणारे गहू, तांदूळ, भाजीपाला, दूध, इ. गोष्टींचा विचार केला तर एका व्यक्तीला 2000 ते 2500 लि. पाणी लागते. मांसाहरी व्यक्तीच्या आहाराचा विचार केल्यास, ज्या प्राण्याचे मांस खाणार, त्याला वाढविण्यासाठी जे खाद्य लागते, ते तयार होण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा विचार केला, तर प्रत्येक मांसाहारी व्यक्तीला, एका भोजनासाठी 4000 ते 5000 लि. पाणी लागते.
प्रा.अॅलन यांनी दुसरे उदाहरण दिले की, जेव्हा लाखो लोक देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतरित होतात, तेव्हा त्यांना लागणाऱ्या पाण्याचा हिशेब केला जात नाही. मुंबईसारख्या राज्यात जेव्हा परराज्यातून 10 लाख लोक स्थलांतरिक होतात, तेव्हा मुळात पाण्याची त्रुटी असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 230 कोटी लिटर पाणी ते प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे रोज वापरत असतात. घरगुती वापराखेरीजही पाण्याशी संबंधित अशा इतर व्यवस्थांवरही ताण पडतो.
पाण्याच्या टंचाईमुळे प्रत्यक्ष अन्नधान्य निर्मिती करू न शकणारे परंतु पेट्रोडॉलरद्वारे हवे ते सर्व विकत घेण्याची क्षमता असणारे देश कितीतरी कमी खर्चात आभासी पाणीच आयात करतात असे म्हटले पाहिजे.
प्रा.अॅलन यांनी जगापुढे मांडलेल्या या महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल पाण्याच्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार समजल्या जाणाऱ्या स्टॉकहोम जलपुरस्काराने, त्यांना 2008 मधील जागतिक जलसप्ताहातील परिषदेत स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताव्ह यांच्या हस्ते 1,50,000 डॉलर्स देऊन सन्मानित करण्यात आले.
आभासी पाणी या संकल्पनेची व्यवस्था एकदा आपण स्वत:ला लावून पाहिली, तर पाण्याचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष गैरवापर किंवा नाश आपण रोज किती करतो ते आपल्यालाच लक्षात येईल. पुणे जिल्ह्यातील एका गावी, माहिती, निरीक्षण व अनुभव यांवर आधारित एका पाटीवर वनखात्याने असा मजकूर लिहिला आहे -
दहा हजार घनमीटर पाण्यात सव्वा एकर भात किंवा तीन एकर गहू पिकू शकतो.
ग्रामीण भागातील 100 कुटुंबांना तेवढे पाणी हातपंपाने चौदा वर्षे व नळाने चार वर्षे पुरते.
एवढ्याच पाण्याचा पुरवठा आदिवासी भागातील 100 कुटुंबांना व त्यांच्या 450 गुरांना तीन वर्षांपर्यंत पुरू शकतो. हेच दहा हजार घनमीटर पाणी शहरातील 100 कुटुंबांना दोन वर्षे पुरते. आणि एवढेच पाणी पंचतारांकित हॉटेलातील 100 लोक पंचावन्न दिवसात संपवतात. यावरून शहरी जीवनशैली ही पाण्याचे शोषण करणारी राक्षसी झाल्याचे पटते.
शतायुषी पाणी -
रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांवर जेवढे संशोधन व लेखन झाले आहे, तेवढे लेखन विविध पैलू घेऊन फार थोड्या ग्रंथांवर झाले असावे. संशोधकांच्या मते, महाभारतीय युध्दाच्या वेळेस, अर्जुनरथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाचे वय (फक्त) 95 वर्षे इतके होते. याचा अर्थ कौरव - पांडव, त्यांचे त्याहून ज्येष्ठ नातेवाईक व गुरू यांचे वय शंभरीच्या आसपास असायला पाहिजे. त्याकाळातील बरेच लोक शतायुषी होऊन गेल्याचे पुरावे असल्याचे इतिहास संशोधक सांगतात.
याचे कारण काय असावे? त्यांना एखादी कायाकल्प वटी किंवा संजीवनी तर प्राप्त झाली नव्हती? तर ʅहोतीʆ असेच उत्तर द्यावे लागेल. एखादे झाड जर उत्तम खत - माती - पाणी यांनी पोसलेल्या जमिनीत लावले तर ते जोमाने वाढते, आणि तसेच दुसरे झाड त्याच वेळी या सर्व गोष्टी विशेष अनुकूल नसलेल्या जमिनीत लावले, तर ते खुरटते असे आपण नेहमीच पाहतो. या सर्व गुणांनी युक्त माती म्हणजेच या झाडाची जीवशक्ती असते. माणसाचेही तसेच आहे. त्याचे शरीर 70 टक्के आणि मेंदू 90 टक्के पाण्याने युक्त आहे. एकंदरीतच मानवी शरीर अनेक प्रकारच्या उपयोगी किंवा निरूपयोगी स्त्रावांनी आणि त्यांच्या भोवती तरंगणाऱ्या पेशींनी बनलेले असते. या पेशीचे शरीरपोषणाचे आणि नकोशा गोष्टी बाहेर टाकण्याचे कार्य करीत चालू असते. त्या पुरेशा सशक्त मात्र असायला पाहिजेत. नाहीतर त्या शरीराला पोषण देण्याएैवजी स्वत:च शरीरावर बांडगुळा प्रमाणे पोसत राहतील.
सध्याच्या दिवसात खाण्यापिण्यात येणाऱ्या कृत्रिम वास - रंग व पदार्थ टिकवण्यासाठी जी रसायने वापरली जातात, ती शरीराला सतत वापराने हानिकारक ठरू शकतात. तसेच, रासायनिक खते व प्रदूषित पाणी यांवर पोसलेल्या भाज्या - फळे - धान्ये आपला परिणाम साधतच असतात. त्यामुळे, कोरडी त्वचा व केस, सुरकुत्या इ. परिणाम शरीरावर होतात. या सर्वांमध्ये पाणी महत्त्वाचे कार्य करीत असते.
पृथ्वीवर अशी पाच ठिकाणे आढळली की, तेथील माणसे सामान्यत: 120 वर्षांवरील वयाची आहेत. त्यांची प्रकृती उत्तम, कॅन्सर, दंतक्षय व हाडांची दुखणी त्यांना ठाऊकही नाहीत. ते सशक्त व बलवान असून, त्यांची जननक्षमता अधिक वयापर्यंत टिकून राहते. फ्रान्समधील काही गावे अशी आहेत की, जेथील माणसे दीर्घायुषी आहेत. तर त्या मानाने इतर गावातील माणसे तशी नाहीत. भारतात हिमालयातील हंझा (Hunza) हे ठिकाण यासाठी विशेष प्रसिध्द आहे. तेथील माणसे 120 ते 140 वर्षांपर्यंत जगतात.
डॉ.हेन्री कोआण्डा या रूमानियन शास्त्रज्ञाला वयाच्या 78 व्या वर्षी नोबेल पुरस्कार याच विषयातील संशोधनामुळे प्राप्त झाला. त्याने आपल्या आयुष्यातील महत्त्वाची साठ वर्षे या संशोधनाला वाहिली. डॉ.हेन्री यांनी हंसा येथील पाण्याबाबत बरेच संशोधन केल्यावर, त्यांना त्या पाण्याचे वेगळे गुणधर्म आढळले. ते असे -
1. हंझा येथील पाण्याचा गोठणबिंदू इतर ठिकाणच्या पाण्यापेक्षा वेगळा आहे.
2. या पाण्याचा उत्कलन बिंदूही नेहमीच्या पाण्याहून वेगळा आहे.
3. या पाण्याच्या पृष्ठभागावरील ताण (surface tension)
4. व त्याची (Viscosity) वेगळी आहे.
यामुळे तेथील माणसांच्या दीर्घायुष्याचे रहस्य हंझा पाण्यातच असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढले. त्यानंतर वयामुळे पुढील काम त्यांनी आपले तरूण सहकारी डॉ.पॅट्रिक फ्लॅनगन यांच्याकडे सोपवले. पुढची सुमारे 30 वर्षे डॉ.पॅट्रिक यांनी हंझा पाण्याच्या संशोधनावरच लक्ष्य एकवटले. पण नंतर त्यांच्या असे लक्षात आले की, त्या मूळ हंझा पाण्याच्या ठिकाणावरून जाणारे हमरस्ते, तेथून जाणारी वाहने, त्यामुळे होणारे वायुप्रदूषण आणि माणसांनी आपल्यासोबत आणलेले जंतू यामुळे हे पाणी आता पूर्वीसारखे स्वच्छ शुध्द राहिलेले नाही. त्यांनी त्या पाण्यात पुन्हा पहिले गुणधर्म आणण्याचा खूप प्रयत्न केला. ते तसे आले तरी पाणी गलवले किंवा घुसळले की ते नष्ट होतात. यावर अजूनही संशोधन चालू आहे. पुढील पिढीतील शास्त्रज्ञ आता त्याची धुरा वाहत आहेत.
हिमालयात अनेक शतायुषी तपस्वी ऋषी असल्याचे आपण एैकत आलो आणि कदाचित या दंतकथा असतील म्हणून सोडून देत आलो. पण खरोखरच या हंझा पाणी पिण्यामुळे तसे असूही शकेल.
आपण माणसांना शुभेच्छा - आशीर्वाद देताना शतायुषी भव असे म्हणतो तर या पाण्याला काय म्हणूया ?
शामराव ओक, पुणे
Path Alias
/articles/paanayaacai-agalai-vaegalai-rauupae-mantaralaelae-paanai
Post By: Hindi