पाण्याचे व्यवस्थापन


पुण्यात खडकवासला धरणांतून निघणारा मुठा उजवा तीर कालवा पर्वती, पुढे सोलापूर रस्त्याने कॅन्टोन्मेंटमधून बारामतीकडे जातो. वाटेत कालव्यावर आधारित पाणीपुरवठा केंद्र आहे. तिथे केंद्राचा प्रमुख म्हणून काम करतांना आलेला अनुभव. 8.2 एक दिवशी सकाळी 11 च्या सुमारास एक ज्येष्ठ नागरिक भेटावयास आले. काय काम आहे असे विचारता, आमच्या भागात तुम्ही बांधलेली पाण्याची टाकी गळू लागली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सुमारे 2 वर्षांपूर्वी कनवडी येथे बांधलेली ही टाकी तेव्हाच्या प्रथेप्रमाणे दगडी बांधकामात होती. आमच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा करता, असा काही प्रकार नसल्याचे त्यांचे मत दिसले. 1. दैनंदिन गोष्टी सुरळीत चालू ठेवणे म्हणजे व्यवस्थापन असा अनेकांचा समज आहे. पण तो चुकीचा आहे. काही वर्षांपूर्वी कदाचित ही व्याख्या चालून केली असती. पण आता ती चालणार नाही. कमीत कमी खर्चात, वेळेवर, खात्रीशीर , विश्वसनीय आणि आश्वासित गुणवत्तेची सेवा ग्राहकांना देऊन, त्यांचे समाधान होईल असे पाहणे आणि याबाबतचा आपला लौकिक वाढवणे, किमान टिकवणे म्हणजे व्यवस्थापन.

2.1 व्यवस्थापन हे उत्कृष्ट असावयास हवे ही अपेक्षा कोणीही बाळगेल. त्यासाठी कटाक्षाने आणि कठोरपणे प्रयत्न करण्याची गरज असते. तेव्हा व्यवस्थापन हे निश्चित चांगले या दर्जाचे असावयास हवे. म्हणजेच व्यवस्थापनात निश्चित उद्दिष्ट आणि एक कारभाराची चौकट हवी, ज्यात विविध बाबी बसवता येतील. त्यासाठी काही गोष्टी निश्चितपणे झाल्या पाहिजेत, घडल्या पाहिजेत व तशी खात्री पटवता आली पाहिजे. तर काही बाबी निश्चितपणे घडता कामा नयेत आणि त्याबाबतही खात्री देता आली पाहिजे. या संदर्भात काही कसोट्या लावता येतील. व्यवहारात काय घडते, कोणते अनुभव येतात हे पाहण्यासारखे असते. जे अनुभव आपल्याला येतात, त्यांना व्यवस्थापन असे तरी म्हणता येईल का, असाही विचार पडू शकतो.

2.2 देखभाल दुरूस्ती म्हणजे व्यवस्थापन नव्हे. देखभाल दुरूस्ती हा व्यवस्थापनाचा केवळ एक भाग झाला. व्यवस्थापनात त्या पलीकडचा विचार अपेक्षित आहे. आलेल्या प्रसंगांना तोंड देणे हा देखभाल दुरूस्तीचा भाग होऊ शकतो. पण असे प्रसंग कसे टाळता येतील, त्यासाठी काही विशिष्ट बाबी आपल्याला हव्या त्या परिस्थितीत आणि पध्दतीने घडवणे म्हणजे व्यवस्थापन. काही अनुभव असे असतात की त्यांना व्यवस्थापन न म्हणता गैरव्यवस्थापन म्हणणे योग्य ठरेल.

3.1 पाण्याच्या उपलब्धीचा आढावा :
पाणीपुरवठा योजनांचे बाबतीतही सर्वात महत्वाची संख्यात्मक बाब म्हणजे पाण्याची उपलब्धी. वास्तविक योजना तयार करतांना, नियोजन करतांना भावी लोकसंख्येची पाण्याची गरज भागेला ना, याचा अभ्यास केलेला असतो. खात्रीकरून घेतलेली असते. तरीही अपवाद हे होतातच. अशा प्रसंगी अपरिहार्य म्हणून काही तडजोडी करायचे ठरवावे लागते. पण काही असले तरी योजना कार्यान्वित झाल्यावर उपलब्ध पाणी वर्षभर पुरवायचे आहे, याची जाणीव हवी.

3.2 म्हणून पावसाळा संपताच. यंदा पाण्याची उपलब्धी किती असणार आहे, याचा आढावा घ्यावा लागतो. जर नदीतून पाणी उचलून पुरवायचे असेल तर, पावसाळ्यांत प्रसिध्द झालेल्या पावसाच्या आकडेवारीचा उपयोग करून पालिकेला वा संबंधित यंत्रणेला आखणी करावी लागते. जर धरणांत साठवलेले पाणी वापरण्यात येणार असेल, तर धरणातील पाण्याच्या साठ्याचा अभ्यास करावा लागतो. आजकाल पाण्याच्या साठ्यातील वापरासंदर्भात साठा आगाऊ राखून ठेवावा लागतो. त्याचबरोबर या वर्षी धरणाच्या पाण्याचा साठा जितका आहे, तितकाच साठा यापूर्वी कोणत्या साली होता, त्यावर्षी पाण्याचे नियोजन कसे केले गेले, पाण्याचा वापर होत गेला तसतशी पाण्याची पातळी कशी कमी होत गेली, उन्हाळ्यात काय परिस्थिती होती, कसा मुकाबला करावा लागला, याचा अभ्यास - तुलना करावी लागते. त्यासाठी आकडंवारीची नोंद अत्यंत महत्वाची. यालाच डाटा बेस म्हणतात.

4.1 कपात करणे :
समजा असे ध्यानात आले की यंदाच्या वर्षी धरणांत पाण्याचा साठा पूर्वीपेक्षा कमी आहे, आणि पाण्याची गरज, मागणी तर कायम रहाते वा वाढत जाते. मग आता काय करायचे? उत्तर साधे - सोपे, पण न पटणारे, न आवडणारे आहे. कपात करावी लागणार! जर या वर्षी अस उदभवांतून, यंत्रणेकडून जादा पाणी मिळू शकणार असेल तर, गोष्ट निराळी. शिवाय प्राधान्यक्रमानुसार पिण्याच्या पाण्याच्या गरजेचा थोडा वेगळा विचार होऊ शकतो.

4.2 एकदा कपात करायची ठरली, की प्रथम याबाबत लोकप्रतिनिधी - नगराध्यक्ष - महापौर अन्य नगरसेवक यांच्या नजरेस आणून त्यांच्याशी चर्चा करणे योग्य ठरते. एवढेच नव्हे तर, नागरिकांना विश्वासात घेऊन कल्पना देणे महत्वाचे. हा टप्पा पार पडला की मग कपात किती करायची, कशी करायची, केव्हा करायची याचा तपशील ठरवून निर्णय घ्यावा लागतो. जास्त पाणी वापरणाऱ्यांना आवरावे लागेल.

4.3 या ठिकाणी एक महत्वाची बाब ध्यानांत घेणे गरजेचे आहे. ती म्हणजे कपात अपरिहार्य असली तरी ती उन्हाळ्यांत करू नये. वा उन्हाळ्यात कपातीचे प्रमाण कमी ठेवावे. म्हणजे मागणी अधिक असतांना उलटी कपात असे होऊ नये. त्यापेक्षा ज्या काळात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात पाण्याची मागणी तुलनेने कमी असते तेव्हा थोडी जास्त कपात करावी. त्यावेळी लोकांची फार अडचण होणार नाही व तक्रारीही फार येणार नाहीत. परिणामी उन्हाळ्यातील थोडीशी कपात सुसह्य राहील.

4.4 पाणीपुरवठा योजनेतून मिळणारे पाणी आपण पिण्यासाठी वापरत असलो तरी, प्रत्यक्षात पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य बाबींसाठीच अधिक होतो. त्यासाठी पूर्वीच्या विहीरींकडे नजर वळवावी लागेल. अनेक ठिकाणी त्या बुजलेल्या असतात, वा बुजवलेल्या. त्यातील काही वापरता येतील. त्यात ब्लीचिंग पावडर / पोटॅशियम परमँगनेटची मात्रा देऊन पाणी उपसून टँकरद्वारे बांधकामासाठी, बागांसाठी, वाहने धुण्यासाठी वापरता येईल.

5.1 उल्हास - बारवी संयुक्त व्यवस्थापन :
उद्भवाच्या संदर्भातही व्यवस्थापन महत्वाचे असते. ठाणे- भिवंडी - भायंदर या भागास उल्हास नदीतून पाणीपुरवठा होतो. मुळात उल्हास नदीचा प्रवाह लहान पण पोशीर नदीचे पाणी, टाटाच्या भिवपुरी धरणांतून सोडलेल्या पाण्याबरोबर बारवी धरणांतून सोडलेले पाणीही येऊन मिळते. अभ्यास करता असे दिसून आले की पावसाळ्यानंतर काही दिवसात उल्हास नदीचा शेवटचा टप्पा मोहने येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहत असते. म्हणजे हे न वापरलेले पाणी आधी खाडीत व अखेर समुद्रात मिळते.

5.2 तेव्हा असे ठरले की जोवर बंधाऱ्यावरून पाणी वहात आहे, तोवर एम.आय.डी.सी ने बारवी धरणांतील पाणी आपल्या ग्राहकांना पुरवू नये, ते पाणी धरणांतच राहू द्यावे. या काळात उल्हास नदीत शिल्लक असलेले पाणी वापरावे म्हणजे ते समुद्रात विनावापर जाऊन मिळणार नाही. पावसाळ्यानंतर उल्हास नदीत जसजसे व जेवढे पाणी कमी पडू लागेल, तसतसे क्रमा-क्रमाने बारवी धरणांतील पाणी उल्हास नदीत सोडत जावे. पण यासाठी परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवावी लागते आणि जलसंपदा विभाग, एम.आय.डी.सी आणि उल्हास नदीतील पाणी उचलणाऱ्या यंत्रणा यांच्यात समन्वय व सामंजस्य हवे.

6.1 जालना शहराचे उदाहरण - असेच काही जालना शहराच्या पाणीपुरवठ्या बाबतीत अपेक्षित होते. सुरूवातीस 1934 साली बांधलेल्या घाणेवाडी तलावातील पाण्यावर आधारित एक लहान योजना होती. क्षमता कमी असली तरी या योजनेवरच अवलंबून रहावे लागे. 1985 च्या सुमारास गोदावरी नदीवर औरंगाबाद वरच्या अंगास पैठण येथे बांधलेल्या जायकवाडी धरणांतील पाण्यावर आधारित योजना बांधण्यात आली. धरणाचे पाणी गोदावरीत सोडायचे आणि जालना शहरासाठी वापरायचे असे योजनेचे स्वरूप होते.

6.2 ही योजना जालना - अंबड या शहरांसाठीची संयुक्त योजना आहे. गोदावरी नदीवर शहागड येथे एक बंधारा बांधून शीर्षकाने पूर्ण करावयाची व पाणी पंप करून जल उपचार केंद्राकडे न्यायचे प्रस्तावीत होते. कल्पना अशी होती की शहागड येथे नदीत पाण्याचा प्रवाह असतो तोवर घाणेवाडी तलावावर आधारित योजनेतून पाणी घेऊ नये, फक्त गोदावरीचेच पाणी नवीन योजनेतून घ्यावे. जेव्हा गोदावरीचा प्रवाह आटू लागेल तेव्हा घाणेवाडी तलावातून पाणी घेत जावे म्हणजे एकूण पाणीपुरवठा कायम टिकवता येईल. काही दिवस हे सुरळीत चालले, पण मागाहून बहुदा दुर्लक्ष झाल्याने हे व्यवस्थापन कायम राहू शकले नाही.

7.1 पाण्याचा वापर आणि वीज उत्पादन :
कोयना धरणांतील पाण्यावर आधारित वीज उत्पादनासंदर्भातही व्यवस्थापन महत्वाचे ठरते. कोयना धरणांत पाणी साठवणे आणि त्याचा वापर वीजउत्पादनासाठी करणे ही बाब, कोयना धरणांतून सोडलेले पाणी कोयनेतून कृष्णा नदीस येऊन मिळत असल्याने, कृष्णा आंतरराज्य वादाशी निगडित आहे. वीजउत्पादनानंतर वापरलेले पाणी पश्चिमेकडे वळून वाशिष्टी नदीद्वारे समुद्रात मिळत असल्याने, महाराष्ट्राने कृष्णा नदीत किती पाणी सोडायचे, राखायचे यावर बंधने घातली असल्याने वीज उत्पादनासाठी किती पाणी वापरायचे, हे ठरवावे लागते.

2008 च्या उन्हाळ्यात असे निदर्शनास आले की अशा तऱ्हेने धरणांतील पाण्याचा जेवढा वापर वीज उत्पादनासाठी करायचा, तो करून झाला. आता वीजउत्पादन करता येणार नाही. इकडे उन्हाळ्यात पाण्याची, विजेची गरज वाढतेय, मुलांच्या परीक्षा आल्या, भारनियमन कमी करण्याची गरज आहे.

7.2 तेव्हा, मुळात नोव्हेंबर - फेब्रुवारी दरम्यान जेव्हा विजेची मागणी तुलनेने कमी असते तेव्हा कोयना धरणातील पाण्यावर आधारित वीजउत्पादनावर मर्यादा घालायची, ते पाणी राखून ठेवून उन्हाळ्यात वीजउत्पादन केले तर उन्हाळ्यातील वीजटंचाई काहीशी सुसह्य होऊ शकते.

8.1 पाण्याच्या टाकीतून गळती : नागरीकाचे निरीक्षण :

पुण्यात खडकवासला धरणांतून निघणारा मुठा उजवा तीर कालवा पर्वती, पुढे सोलापूर रस्त्याने कॅन्टोन्मेंटमधून बारामतीकडे जातो. वाटेत कालव्यावर आधारित पाणीपुरवठा केंद्र आहे. तिथे केंद्राचा प्रमुख म्हणून काम करतांना आलेला अनुभव.

8.2 एक दिवशी सकाळी 11 च्या सुमारास एक ज्येष्ठ नागरिक भेटावयास आले. काय काम आहे असे विचारता, आमच्या भागात तुम्ही बांधलेली पाण्याची टाकी गळू लागली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सुमारे 2 वर्षांपूर्वी कनवडी येथे बांधलेली ही टाकी तेव्हाच्या प्रथेप्रमाणे दगडी बांधकामात होती. आमच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा करता, असा काही प्रकार नसल्याचे त्यांचे मत दिसले. आपल्याकडे आजवर तक्रार आलेली नाही, शिवाय गळती असती तर रस्त्यांवर पाणी साचले असते, हे त्यांचे उत्तर. तेव्हा त्या गृहस्थांनी आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले.

8.3 दुसरे दिवशी मी त्यांच्या घरी पोचलो. घर एक मजली कौलारू होते. त्यांच्या घरातील भिंतींना खालून वर ओल येत होती. भिंतीवर काही आकडे नोंदलेले होते. ते गृहस्थ म्हणाले, ओल कधी जास्त, कधी कमी उंच दिसते, त्यानुसार तारखा लिहिलेल्या आहेत. मी टाकीतील पाण्याच्या पातळीचे रजिस्टर मागवले. आकडे पाहिले . आणि दोन्हींची सांगड घालता आली. तपशील तंतोतंत जुळले. ज्या दिवशी टाकीत पाण्याची पातळी जास्त, त्या दिवशी ओल अधिक होती. पातळी कमी, त्या दिवशी कमी ओल, असा प्रकार.

8.4 मी कर्मचाऱ्यांना टाकीच्या पायाजवळ जमीन खणण्यास सांगितले. सुमारे 2 मीटर खणल्यानंतर टाकीच्या पायांतून पाणी पाझरत असल्याचे उघडकीस आले. खालच्या खाली हे पाणी उताराच्या दिशेने जात त्या गृहस्थांच्या घरापर्यंत पोचत होते. कार्यकारण भाव स्पष्ट झाला. मी त्या गृहस्थांचे आभार मानले. 2-4 दिवसांनी टाकीचा पाणी पुरवठा थांबवून, टाकी रिकामी करून तळाच्या वरच्या भागांत दुरूस्ती करून घेतली. आता ओल येत नाही, काही दिवसांनी त्या गृहस्थांचा दूरध्वनी आला. त्यांच्या निरीक्षणास, चिकाटीस मी आनंदाने दाद दिली.

9.1 ग्राहकांची फसवणूक :
पाण्याची टंचाई अनेक ठिकाणी जाणवते, हे खरे. ही टंचाई वारंवार जाणवते, हेही खरे. तरीही याबाबतची ग्राहकांची हतबलता आणि पाणीटंचाईवर मात करायची तीव्र इच्छा यांचा कसा गैरफायदा घेतला जातो, ते पहाण्यासारखे आहे.

9.2 मुंबईजवळचे एक शहर. तिथे सुमारे 20 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणांवर पाणीटंचाई होती. एका भागातील लोकांनी महापालिकेत जाऊन विनंती केली, तक्रार अर्ज केले, काहीही परिणाम नाही. त्या भागात राहणारा माझा एका नातेवाईक येऊन मला म्हणाला की आमच्या भागातील लोकांनी बरेच प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. महापालिकेकडून आम्हाला सांगण्यात आले की नवीन प्रकल्पाचे काम सुरू आहे, त्यानंतर पाणीपुरवठा सुधारेल. ही वस्तुस्थितीच होती.

9.3 पण बाहेर आल्यानंतर आम्हाला एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी सांगितले की महापालिकेच्या पाईपलाईनपासून आमच्या आणि आसपासच्या 2-3 मोठ्या सोसायट्यांसाठी एक नवीन पाईप लाईन टाकली तर प्रश्न सुटू शकेल. वर वर पाहता हा प्रस्ताव पटण्याजोगा होता आणि थोडीशी सुधारणा झालीही असती. तरीही मी त्याला समजावले की तेथील अभियंत्यांची ओळख काढून प्रश्न सुटण्याजोगा आहे का, याची विचारणा करतो. पालिकेने दिलेले उत्तर वस्तुस्थितीनुसारच होते. हा प्रश्न लागोलग सुटणारा नव्हता.

9.4 चार - पाच दिवसांनी नातेवाईक परत आला व त्याने घडामोडींची कल्पना दिली. संपर्क साधलेल्या व्यक्तीने अशी सूचना केली की घरटी रू.250 (आताचे 1000) जमा केले की पाईपलाईनच्या कामास सुरूवात होईल. सोसायटीचे सदस्य अस्वस्थ आहेत, आणि मला त्यांचेबरोबरच राहायचे असल्याने मीही पैसे दिले आहेत. रक्कमही तशी फार नाही.

9.5 काही दिवसांनी त्याचा फोन आला की पाईपलाईन टाकून झाली. त्या लोकांनी भराभर चर खणले, पाईप आणून टाकले, शनिवार - रविवार काम पूर्ण केले. आता खूपच सुधारणा आहे. मी म्हटले - ठीक आहे प्रश्न सुटला तर मलाही आनंदच आहे.

9.6 माझ्या हाताखाली काम करणारा एक कर्मचारी त्याच शहरात रहात होता. त्याला मी हा सारा प्रकार सांगितला. महिन्याभरानंतर येऊन त्याने काढलेली माहिती सांगितली, तो प्रकार थक्क करणारा होता. थोडी पाणीटंचाई 1।। - 2 वर्ष होतीच. पण ती अचानक वाढली. कारण तेथील व्हॉल्मनने व्हॉल्वचे आटे कमी करून, पाणी कमी जाऊ देऊन कृत्रिमरित्या पाणीटंचाई वाढवली. जेव्हा 4 सोसायट्यांकडून रू.50,000/- (आताचे 2 लाख) मिळाले तेव्हा चर खणले. मोठ्या आकाराचे जी.आय पाईप आणले. ते सर्व जोडलेच नाहीत. इकडे तिकडे मधून मधून 1-2, 1-2, असे पाईप जोडले, माती लोटून दिली. शिल्लक पाईप परत नेले. पाईपलाईन अशी टाकली नव्हतीच. दोन दिवसांनी व्हॉल्वचे आटे पूर्ववत केले. आधिक पाणी वाहू लागले - म्हणजे 1।। - 2 वर्षे पाणी टंचाई होती, तेवढे. तेवढ्याने सुध्दा लोक खुश झाले. हे लोक पैसे घेऊन पसार, महापलिकेला अंधारात ठेवून परस्पर या मंडळींनी नागरिकांना बनवले होते. आपल्या पायाखाली काय जळते आहे, आपले कर्मचारी संगमनत करून कसे लुबाडतात, इकडे नगरसेवकांनी लक्ष द्यावे. या गोष्टी त्यांच्या कानावर जाणार नाहीत, असे थोडेच होणार?

10.1 पाणीटंचाईवर लोकांची मात :
मुंबईजवळील एक शहर. 20 वर्षांपूर्वी इथे बरीच पाणीटंचाई होती. नजीकच्या काळात फारशी सुधारणा होण्याची शक्यता नव्हती. साहजिकच नागरिंकांना अस्वस्थ होऊन अन्य काही मार्ग निघू शकतो का, याचा शोध सुरू केला.

10.2 त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील माहितगार व्यक्तीच धावून आली. अर्थात् वाजवी मोबदला घेऊन! मुख्य जलवाहिनीवर एक जोडणी घेऊन पाईपलाईनने जिथवर गुरूत्वप्रवाहाने जाईल तिथवर न्यायचे, पुढे एका जमिनीखालील टाकीत साठवायचे आणि पंप करून जलकुंभात सोडायचे अशी त्या शहराच्या त्या भागांतील पध्दत होती. पंप करणाऱ्या दाबवाहिनीवर एकही जोडणी द्यायची नाही, असा नियम. कारण जोडणी दिली, की पाण्याचा दाब काही प्रमाणात कमी होणार.

10.3 या सल्लागाराने नेमका दाबवाहिनीवर (गुपचूप) जोडणी घेण्याचा सल्ला दिला. व्यवस्था तोच करणार होता. त्या विशिष्ट नागरिकाचा प्रश्न मिटला. तो सुखावला. पण हे लपून थोडेच राहणार? दुसऱ्याला, तिसऱ्याला समजले. त्यांनीही जोडण्या घेतल्या. असे होत अनेकांना समजले. साऱ्यांनी गुपचूप जोडण्या घेतल्या. दाबवाहिनीवर इतकी भोके पडली, की वाहिनीचा मसाला दोसा झाला!

10.4 शेवटी उंटावरची शेवटची काडी म्हणतात तो प्रकार झाला. दाब इतका कमी झाला, की जलकुंभात पाणी पडेना, पोचेना, त्या जलकुंभातून ज्या उरलेल्या लोकांना पाणीपुरवठा होत असे, त्यांना पाणी मिळेनासे झाले. ते वैतागले, चिडले, त्यांनी मोर्चा काढला.

10.5 जेव्हा अनेक लोक गैरप्रकारात सामील होतात, तेव्हा त्यांनाच जनता जनार्दन मानून परिस्थिती स्वीकारावी लागते. तसेच झाले. पुर्न: एकदा जलकुंभापासून पंपिंग स्टेशन पर्यंत नवीन पाईप लाईन टाकली, कार्यान्वित झाली. आणि जोडण्या घेतलेल्या आधीच्या दाबवाहिनीचे गुरूतत्ववाहिनीत रूपांतर झाले. व्यवस्थापनाच्या कुठल्या तंत्रात हे बसते?

11. पाणी केव्हा येणार, एवढे तरी सांगा!
11.1 कर्नाटकातील महापालिका असणारे एक शहर. यातील 2 लाख लोकसंख्येचा एक भाग, इथे गेली 7-8 वर्षे पाण्याची प्रचंड टंचाई. पूर्ण आठवड्यांतून एकदा पाणी यायचे, आता परिस्थिती सुधारली, 3 दिवसांनी एकदा येते.

11.2 पाणी कमी पडते, म्हणून पाणीटंचाई हे तर आहेच. पण पाण्याचे वाटप कसे करतो, वितरणाच्या वेळा हेही महत्वाचे. पाणी कमी असल्याने झोनिंग पध्दतीने पाणी पुरवठा करावा लागणे हे अपरिहार्य. साहजिकच काही लोकांना मध्यरात्री पाणी मिळेल, हेही समजून घेता येईल. पण नागरिकांचे म्हणणे, हेही चालेल, पण निदान पाणी केव्हा येईल हे तरी जाहीर करा आणि त्या वेळा पाळा.

11.3 पण महापालिकेच्या यंत्रणेला हे काही जमत नाही. मुळात आपण आपली जबाबदारी नीट पाळावी, ही आच नाही. रेल्वे स्टेशनच्या मागे कल्याणनगर, आनंदनगर अशा वस्त्या आहेत. इथे बैठे बंगले असल्याने कॉलनी लांबवर पसरली आहे. पाण्याच्या वेळा नक्की नाही म्हणून लोक काय करतात, झोपायला जातांना रात्री तोटी उघडी ठेवतात म्हणजे पाणी आल्याचे समजेल. सुरूवातीला पाणी येतांना फस् फस् असा आवाज करीत हवा बाहेर पडते त्यामुळे जाग येईल ही अपेक्षा. पण जाग येईपर्यंत पाणी वाया जाण्याचा धोका असतोच. मग एकदा का जाग आली की तो शेजाऱ्यांना रात्री दूरध्वनी करून उठवतो. बरेच जण असे करतात. आता त्यांची तक्रार आहे, आमच्या पाण्याच्या बिलापेक्षा फोनचे बिल जास्त येत आहे.!

श्री. अशोक अळवणी, निवृत्त मुख्य अभियंता, पुणे

Path Alias

/articles/paanayaacae-vayavasathaapana

Post By: Hindi
×