पाण्याचा आनंदमार्ग


पाण्याची भूगर्भातील पातळी कायम ठेवता यावी म्हणून त्यांनी येथे एक नवाच प्रयोग केला. आज इतक्या वर्षांनंतर आढावा घ्यावयाचा तर एकूण 1371 एकर भूक्षेत्रापैकी 50 एकर क्षेत्र हे घरे तसेच रस्ते आणि पायाभूत सुविधांनी व्यापलेले आहे. 200 एकर क्षेत्रावर वनशेती घनदाट रूपात उभी आहे.

सन 1949, बाबा आमटे नावाच्या एका ध्येयवेड्याने कुष्टरोग्यांच्या पुनर्वसनाचे स्वप्न पाहिले. त्यासाठी शासनाकडे जमीन मागितली. वरोरा गावाच्या जवळ शासनाने जमीन दिली देखील. 500 एकर.

हा सगळा परिसर महाकाय दगड धोड्यांनी आणि रेताड शुष्क माळरानांनी व्यापलेला होता. पाण्याचा थेंबही नाही त्यामुळे गवताचे पातेही उगवत नाही असा होता हा परिसर. जवळ ना डोंगर, ना झरा, ओढा, नाला किंवा नदी. खरे तर वस्तीसाठी अयोग्यच. आणि इथे रहाणार होते रूग्ण, महारोगी. पण गरजवंताला निवड करायचा अधिकार नसतो. त्यामुळे जे मिळेल ते पत्करावे लागते. त्यामुळे ती जमीन स्विकारली.

बाबांनी आपल्या सोबत असलेल्या मोजक्याच कुष्टरोग्यांना सोबत घेऊन प्रचंड काबाडकष्ट केले. अथक परिश्रण घेतले. तेथे रहाण्याची सोय केली. थोडी झाडे लावली. थोड्या भागात शेती सुरू केली. अर्थातच फक्त पावसाच्या पाण्यावर. परंतु पाण्याचा प्रश्न काही सुटत नव्हता. एप्रिल उजाडला की पाणी संकट उग्र रूप यधारण करी. आनंदवन रिकामे करावे लागे.

हा बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीयांवरचा लेख नाही. तथापि एखाद्या कामाबद्दल लिहावयाचे असेल तर त्यामागे उभ्या असणाऱ्या व्यक्तीचे उल्लेख त्यात येणे व त्यांच्याबद्दल लिहिणे हे अपरिहार्यच असते. त्यानुसार येथेही हे उल्लेख येणार आहेत.... आले आहेत.

अशा पध्दतीने पाण्याअभावी आनंदवन खाली करावे लागणे बाबांना मानसिकरित्या सहन होईना. आपला प्रश्न आपणच सोडविला पाहिजे, त्यासाठी वेगळे मार्ग धुंडाळावे लागले तरी चालतील. अथक परिश्रम करावे लागले तरी चालतील. शेवटी यश हे मिळणारच, ह्या ध्येयाने बाबा प्रेरित झाले.

गरज ही शोधाची जननी असते, त्यामुळे त्यातूनच त्यांना मार्ग सापडला. पावसाचे पडणारे पाणी अडविण्याचा, साठविण्याचा, जमिनीत जिरविण्याचा. त्यामुळे दगड - धोडे हटविले, तलाव खोदले, विहीरी खोदल्या, तलावांच्या तिथल्याच दगडाच्या पिचींग मधून बाजू बळकट केल्या. माती ढासळणार नाही याची व्यवस्था केली. सुरूवात तर चांगली झाली.

एक कूपनलिका खोदली, तिला पाणी लागले. आणि तिथून खऱ्या अर्थाने आनंदवन स्थिरावू लागले. पाण्याचे मार्गावर त्यांच्या कामाची ही केवळ सुरूवात होती.

वेस्टर्न कोलफिल्डस् ह्या कंपनीने खोदकामासाठी आनंदवनाला एक सयंत्र भेट दिले. त्यामुळे मानवी हातांना यंत्रशक्तीची साथ मिळाली आणि कामाने खऱ्या अर्थाने वेग घेतला. ह्या पाण्याच्या शोधाबरोबरच 'एक थेंबही पाणी वाया जावू देणार नाही' ही प्रतिज्ञा करून तीही प्रत्यक्ष कृतीत आणली.

त्यानंतर आजपर्यंत आनंदवनाबरोबरच इतर प्रकल्प म्हणजे मूल तालुक्यातील सोमनाथ, हेमलकशा लोकबिरादरी, नागपूर जवळचे अशोकवन, पांढरकवड्यातील मूळगव्हाण, अशा पाच ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प उभारून त्यांचे हे काम सुरू आहे. महारोगी सेवा समिती, आनंदवन ह्या संस्थेच्या नावे, आनंदवन (वरोरा) येथून हा सगळा कारभार चालतो. संपूर्ण सामाजिक उत्थानाचा हा रथ कसा कार्यरत आहे, हे समजावून घ्यावयाचे असेल तर तिथे प्रत्यक्ष भेट द्यायलाच गेले पाहिजे. मी मात्र ह्या लेखात आनंदवन आणि सोमनाथ ह्या दोन ठिकाणी जलसंवर्धनाची जी कामे झाली, त्याबद्दलच लिहिणार आहे.

आमटे हे आतात केवळ एक आडनाव नाही, तो एक विचार आहे. अशा समविचारी मंडळींचे ते एक कुटुंब बनते. मग त्यांचे आडनाव कडु असो, कदम असो किंवा आणखी काही. या सर्व मंडळीने अनेक अंगांनी विकासात्मक कामे करून हा परिसर स्वयंपूर्ण व समृध्द करावयाचा प्रयत्न चालविला आहे.

आनंदवनाची पहिल्यांदा मिळालेली आणि नंतर मिळालेली मिळून एकूण जमीन सुमारे 500 एकर. येथे सुमारे 2500 लोक रहातात. त्यांची स्वत:ची ग्रामपंचायत आहे. मुख्य म्हणजे कला, विज्ञान व वाणिज्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय त्याच परिसरात असून तेथे सुमारे 3000 विद्यार्थी शिक्षण घेतात. मूक - बधिर, अंध मुलांसाठी शाळा असून, प्रत्यक्ष कार्यशिक्षण व त्यातून रोजगार उपलब्ध करून देवून तिथल्या व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे राहून स्वयंपूर्ण जीवन जगण्याची संधी ह्या संस्थेने मिळवून दिली आहे.

आनंदवनाचे 500 एकर जागेपैकी 250 एकर जागा ही शेतीसाठी वापरली जाते तर उरलेल्या 250 एकर जागेत निवासी व इतर इमारती, रस्ते आदी सुविधा तसेच जलसाठवणीचे तलाव वगैरे आहेत.

ह्या क्षेत्रात आनंदसागर, मित्रांगणसागर, मुक्तीसदनसागर, आवला तलाव, कृषी निकेतन , गोरक्षण तलाव, ग्रामपंचायत तलाव इत्यादी एकूण 10 तलाव आहेत. ह्या तलावांची रचना अशी आहे की एक तलाव भरला की त्याचा ओव्हर फ्लो हा दुसऱ्या तलावात जातो. गोरक्षण तलाव हा असा तीन टप्प्यात (3 तलाव एकाखाली एक) अशा स्वरूपात आहे. त्यामुळे जास्त पाऊस पडला तरी ते पाणी वाहून जात नाही, तिथेच अडविले जाते.

ह्या परिसरात 14 विहीरी व 10 बोअरवेल आहेत. बहुतेक सर्व विहिरींचे स्थान वैशिष्ट्य असे की त्या तलावांचे काठावर आहेत. त्यामुळे तलावातून भूगर्भात मुरणारे पाणी हे त्या विहीरींमध्ये येते. विहीरींची पातळी वाढते, आणि जमिनीत झिरपलेले पाणी हे देखील शेतीसाठी वापरता येते. एकूण ज्या 10 बोअरविहीरी आहेत त्या तलावांच्याच परिसरात किंवा दोन विहीरींचा पाझर अडविता येईल अशा ठिकाणी आहेत. त्यामुळे वरील हेतू साध्य होतो.

ह्या तलावांच्या तसेच विहीरांच्या आधारे कोणती पिके घेतली जातात ह्या ऐवजी काय पिकविले जात नाही, असे विचारले तर ते जास्त सोपे जाईल. गहू (50 एकर), हरभरा (25), केळी (5), साळी (3), भात (10), भाजीपाला म्हणजे टॉमॅटो, कोबी, वांगी, कांदा तसेच पालेभाज्या (30) असे हिवाळी पीक घेतले जाते. खरीप हंगामात ऊस (2-3) ,कापूस (30), तूर (3-5), सोयाबिन (35), मका (10) ह्याखेरीज आंबा, चिकू, फणस, पेरू, नारळ, आवळा ह्यांची छोटी वने आहेत, पॉलीहाऊस करून तेथे फुलांची नर्सरी फुलवली आहे. गुलाब, शेवंती, इत्यादी अनेक प्रकारची फुले तेथे घेतली जातात. तसेच जनावरांसाठी उत्कृष्ट दर्जाचे गवत (35 हेक्टर) मिळावे म्हणून त्याचे खास पिकही घेतले जाते.

विशेष म्हणजे ह्या सर्व कामांसाठी लागणारे कुशल कामगार हे तिथेच तिथल्या रूग्णांमधूनच तयार व्हावेत ह्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे ख्र् ः च्र् आणि आनंदवन समर्पित बांधकाम प्रशिक्षण केंद्र येथे चालविले जाते. त्यांचा अभ्यासक्रम पाहिला असता अशी प्रशिक्षण केंद्रे ठिकठिकाणी निर्माण झाली पाहिजेत हे जाणवते.

सेवानिवृत्त प्राचार्च सुधाकर कडु आणि कृषी क्षेत्रात काम करणारे नारायण हत्ते यांनी हा तपशील उपलब्ध करून दिला. मात्र ह्या जागेचा नकाशा मिळू शकला नाही अन्यथा हे सर्व तलाव, त्या काळच्या विहीरी व बोअर विहीरी ह्यांची स्थाने दर्शवून माझ्या वरील निरीक्षणांना पुष्टी देता आली असती.

येथे उन्हाळ्यात देखील विहीरीतील पाण्याची पातळी ही 60' ते 100' इतकीच खोल असते. तर बोअरवेल्सना सुमारे 150 फुटावर पाणी लागते. जेव्हा ह्या विहीरी खोदल्या व बोअरवेल्स केल्या तेव्हा त्या कोरड्याच होत्या. जसजसे तलाव खोदले व तिथे पाणी साठू लागले तसतसे विहीरींना पाणी येऊ लागले.

3000 वस्तीचे गाव म्हणजे सांडपाणी व मैलापाण्याचाही प्रश्न, त्यावरही त्यांनी उत्तर शोधले आहे. निवासाच्या व भोजनगृहाचे तसेच डेअरीचे परिसरात असलेले चार तलाव हे फक्त शेती व मत्त्यशेतीसाठी राखून ठेवले आहेत. सर्व सांडपाणी व मैलापाणी हे तिथे सोडले जाते. मासे खाद्य म्हणून हा सगळा मैला फस्त करून टाकतात, उरलेले पाणी हे पौष्टिक जल ह्या स्वरूपात सरळ शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे एक प्रकारचे सेंद्रीय खत दिल्यासारखेच होते.

बाष्पीभवनातून कमीतकमी पाणी उडून जावे ह्यासाठी शेतांना फक्त सकाळी .. सूर्याेदयापूर्वी पाणी देण्याची पध्दत तेथे सुरू केली व रूजविली आहे. तरीही आहे ते पाणी सर्व क्षेत्रावर हिवाळी पीक घेता येण्यास कमी पडते. त्यामुळे हिवाळ्यात सुमारे 100 ते 140 एवढ्याच क्षेत्रावर (पाऊस कमी जास्त पडेल त्या प्रमाणात) पीक घेता येते. तलाव खोल करणे व जलसाठवण वाढविणे ह्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आनंदवनाचे मुख्य परिसरापासून 3 - 4 कि.मी अंतरावर मोरनाला(सुळी) येथे टायर तसेच प्लॅस्टिक, बांबू व काँक्रीटचा वापर करून बंधारा बांधला आहे. ह्या भागात काम करणाऱ्या मंडळींची निरीक्षण शक्ती निसर्गाच्या सांनिध्यात राहिल्याने चांगलीच विकसित झालेली आढळते. येथे तीन प्रकारची जमीन आहे, तिथल्या एक शेतात काम करणारा कामगार सांगत होता. मुरमाड जमिनीचा एक भाग येथे जमिनीच्या पोटात पाणी लागत नाही. गोटा व काळ्यामातीचा दुसरा भाग - हा भाग पावसाळ्यात ओल धरून ठेवतो पण खाली पाणी लागत नाही. तिसरा भाग हा वाळू असलेला - ह्या भागात भूगर्भात हमखास पाणी लागते.

मात्र पाणी लागो की न लागो, तलावाच्या जागा त्यांनी सगळ्यात खोलखोल भागात निवडल्या आहेत. जिथे तशी नैसर्गिक स्थिती असेल तिथे तलाव खोदतांना जी माती निघेल ती पसरवून प्रत्येक तलावाचे पाणवहाळ भागाला बशीसारखा खोलगट आकार दिला आहे. सगळ्यातला खोल भाग हा तलाव सहाजिकच पावसाचे पडणारे सगळे पाणी हे आपोआप तलावाकडे वाहून येते.

येथे दरवर्षी सरासरी 1500 ते 2000 मि.मी पाऊस पडतो. दुष्काळासारख्या संकटाच्या काळातही तो 1000 मि.मी पेक्षा कमी पडत नाही. सर्व तलाव भरून, ओसंडून वाहून निघतात. मात्र तरीही सर्व तलावांची एकूण साठवण क्षमता किती ? त्यात किती पाणी मावते ? हे पाणी पडणाऱ्या पावसाच्या किती टक्के ? आणखी साठवण क्षमता वाढविता येईल पण तितके पाणी उपलब्ध आहे का हा सगळा तपशीलवार अभ्यासाचा विषय आहे . मात्र तरीही एक गोष्ट मोकळेपणाने मान्य करायलाच हवी - अगदी ओसाड माळरानापासून ते आजच्या स्थितीपर्यंत ही फार मोठी मजल त्यांनी मारलेली आहे.

त्या परिसरातून प्रवास करतांना एक हिरवागार टापू दिसला की ते आनंदवन, असे म्हणता येते. हेच त्या प्रकल्पाचे यश आहे. पाणी साठल्यामुळे तिथे एक चांगले जीवचक्र सुरू झाले आहे. पाणपक्षी मोठ्या प्रमाणावर येऊ लागले, अभयारण्यासारखेच सुरक्षित वातावरण मिळाल्याने जणू ते पाणपक्ष्यांचे अभयारण्याच झाले आहे. जिथे महारोगी रहातात म्हणून कोणीही जाऊ नये असा जनसामान्यांकडून वर्जित झालेला भाग होता. तिथे आता ह्या निसर्ग पर्यटनासाठी लोक गर्दी करू लागले आहेत. त्यांच्यासाठी उत्कृष्ट दूध, फुले, भाज्या, मासे ह्यामुळे ह्या पर्यावरण संरक्षणाला अर्थार्जनाची आपोआप जोड दिली गेली आणि ते स्वत:च्या पायावर स्थिर उभे राहिले आहेत.

मात्र तरीही डॉ. विकास आमटे हे संतुष्ट नाहीत. त्यांनी ह्यापेक्षाही मोठे स्वप्न पाहिले आहे. गावाभोवती हिरव्या भिंतीचे स्वप्न, गावाच्या सभोवती अशी हिरव्या झाडांची तटबंदी उभी राहिली तर तीन गोष्टी घडतील. हिरव्या तटबंदीत गाव सुरक्षित राहील, गावातील जे काय सांडपाणी बाहेर पडत असेल ते सगळे ह्या झाडांना उपयोगी पडेल व त्यामुळे सांडपाण्याचे व्यवस्थापनाचा प्रश्न आपोआप सुटेल. तापमानावर नियंत्रण (1 ते 3 सें.कमी) ठेवण्यास मदत होईल व पर्यावरणाचे सर्व प्रश्न हे आपोआप सुटतील. पर्यावरण संतुलन हा जगभर अभ्यासाचा विषय, येथे हा सर्वसामान्यांचा जगण्याचाच एक भाग बनला आहे.

डॉ.विकास आमटे ह्यांचे हिरव्या तटबंदीतील गाव हे सर्व केवळ पर्यावरण संतुलन एवढ्यासाठीच उपयोगी नाही, तो एक विकासाचा, स्वयंपूर्ण जीवनाचा, सर्वसामान्यांचे जीवन सुखद होण्याचा मार्ग आहे. वृक्षराजींची व पशुधनाची विविधता, विविधतेतून संपन्नता आणि ती संपन्नता ही निसर्गपूरक जगण्याचाच एक भाग, अशी दृष्टी देणारे हे आनंदवन व्हिजन.

बाबा आमटे म्हणाले होते - 'तुमच्या जवळ पाणी असेल तर तुम्ही काहीही करू शकता.'

हे त्यांचे 'काहीही' किती प्रचंड प्रमाणात वास्तवात आले. हे सांगावयाची गरज नाही. तो एक वास्तव पुरावा आहे. डॉ.माधवराव चितळे हे सगळे जलंसधारणाचे काम पाहिल्यावर म्हणाले होते हे एक जलसंधारणाचे उत्तम मॉडेल आहे. हा प्रश्न राजमार्गावरील वाटचाल, मळलेल्या वाटा की नव्या पाऊलवाटा असा नाही. केवळ रोजच्या सवयींचाही नाही. हा मार्ग विश्वासाचा आहे. स्वत:च्या विचारांवर विश्वास, कृतीवर विश्वास, निष्ठेवर विश्वास अन् चारित्र्यावर विश्वास. तो जर असेल तर शेतकरी आत्महत्येबद्दल काय करावे हा प्रश्नच उभा रहाणार नाही. शेतकरी हे आत्महत्याच करणार नाहीत. त्यांना हवा आहे तो विश्वास. उद्या सकाळी सूर्य उगवणार आहे हा विश्वास. मग काळसर्पावर मात करण्याचे सामर्थ्य आपोआप मिळते.

मिळेल त्या उपलब्ध गोष्टींचा पुरेपूर वापर करणे आणि नाही त्यावर पर्याय शोधणे हा मार्ग हमखास यशापर्यंत घेऊन जातो. धरण बांधायचय ? साहित्य नाही, हरकत नाही, जुने टायर घ्या, एकावर एक रचा, 9-10-12 आवश्यक ती उंटी गाठेल एवढी थप्पी करा, एका शेजारी एक अशा थप्प्या रचा. मधला पोकळ भाग काँक्रीटने भरून टाका - झाला बंधारा तयार. शक्य असेल तर एक जाड लोखंडी कांब प्रत्येक थप्पी मध्ये खोलवर जाईल अशी जमिनीत ठोका. कमी खर्चात, कमी वेळात बंधारा.

काँक्रीटची ताकद वाढवायला हवी आहे, त्यात प्लॅस्टिक कचरा म्हणून मिळालेल्या बॅगा गोळा केल्या. स्वच्छ धुतल्या, वाळवल्या, त्याचे अगदी भूगा वाटावा असे बारीक तुकडे केले आणि काँक्रीट मिसळतांना सुमारे 2 - 3 टक्के इतके घातले. काँक्रीटची ताकद वाढली. गरज ही नवेनवे मार्ग दाखविते ते असे.

विचार रूजवा

कृतीचं फळ मिळेल

कृती रूजवा

तिची सवय लागेल

सवय रूजवा

चारित्र्य घडेल

चारित्र्य रूजवा

भवितव्य घडेल

 

एका पाण्यामुळे हे सारे घडवता आले. स्वप्ने साकारतात ती अशी आज हे साकारलेले स्वप्न बघून अनेकांना नवी नवी स्वप्ने पडू लागली आहेत. त्याला दृढनिश्यचायं, अथक कृतीच आन प्रदीर्घ काळ कार्यरत रहाण्याचं बळ दिलं तर त्यातून 'उज्वल उद्या' उगवणारच त्यासाठी कुणाकडेही 'करूणेचा कलाम' पठण करायची गरज नाही. ह्याचेच दुसरे प्रत्यंतरही लगेचच पहायला मिळणार होते.

आनंदवननंतर हेमलकशा, लोकबिरादरी प्रकल्प, हा मुख्यत: ज्या जंगलात रहाणाऱ्या गोंड आदिवासी लोकांसाठी, त्या 200 कि.मी परिसरात एकही आरोग्यसेवा केंद्र अथवा डॉक्टर नव्हता. सुरूवातीला सर्वच बाबींसाठी आनंदवनावर अवलंबून रहावे लागे. परंतु तेथेही स्वयंपूर्णतेची आस डॉ.प्रकाश व त्यांचे सहकार्याने सोडली नव्हतीच. शेवटी सन 2000 चे आसपास हेमलकशाचा प्रकल्प इतका स्वयंपूर्ण झाला की काही प्रमाणावर तो आनंदवनात धान्य पाठवून शकला. ही गंगा उलट दिशेने वाहिली ती अशा प्रयत्नाने आज हा प्रकल्प स्वयंपूर्ण आहे, निवासी शाळा मुलामुलींकरता आहेत 800 च्या वर विद्यार्थी वस्तीगृहात रहातात. 200 बेडस्चे हॉस्पिटल आहे, किमान तेवढेच रूग्णांचे नातेवाईकही असतात. शिवाय सतत ये - जा असलेल पाहुणे. ह्या सगळ्यांची अन्नधान्य, भाजीपाला ह्याची सोय तेथे प्रकल्पाच्या जागेवर होते.

खरे तर ह्या कोणत्याही प्रकल्पाबद्दल लिहायला किंवा बोलायला सुरूवात केली की 'बाबा आमटे' हे शब्द टाळता येत नाहीतच. ज्या कठोर परिश्रमातून आनंदवनाचा विकास झाला त्या श्रमशक्तीला प्रतिष्ठा मिळावी व एक चांगला संदेश जगात जावा म्हणून एक श्रमसंस्कार विद्यापीठ स्थापन करावयाची कल्पना मनात आली आणि बाबा त्याने झपाटले.

आनंदवनापासून सुमारे 11 कि.मी अंतरावर, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात, ताडोबाच्या जंगलाचे अगदी शेजारी अशी जवळजवळ 1800 एकर जागा त्यांना शासनाने देऊ केली. मात्र तेथे कुष्टरोगी येणार, रहाणार हे स्थानिक मंडळींना व सर्वाेदयींना पटेना. एक संघर्ष उभा राहिला. शेवटी काही जमीन परत करून तो मिटवावा लागला. शेवटी हातात सुमारे 1370 एकर जमीन उरली.

पुन्हा सगळे दुखणे तेच, तशीच खडकाळ जमीन, ओसाड माळरान, मधून फक्त तरागोंदीचा एक छोटा नाला वहाणारा, पाणी मिळण्याचा स्त्रोत म्हणून फक्त पाऊस. प्रश्न तेच, ते सोडविण्याची रीत आनंदवनात कळली होती. कामही तसेच होते मात्र येथे बाबांनी युवाशक्तीला आवाहन केले.

महाराष्ट्रभारातून तरूणतरूणी तेथे श्रमशिबीरासाठी आले. दरवर्षी हे शिबीर 14 मेला सुरू होते. पूर्वी साधारणत: वीस दिवस चालते. आता बहुधा 10 दिवस असते. संपूर्ण उत्साहाने हसत, नाचत, गाणी म्हणत ह्या युवावर्गाला काम करतांना पहावे हे एक जीवन अनुभवणेच असते.

1974 पासून... सतत... शिबीर असो की नसो, आपले कुष्टरोगी सहकारी आणि इतर कर्मचारी यांनी काय काय साध्य केले हे नुसते वाचले तरी अंगावर रोमांच उभे रहातात.

आपण फक्त व पाणी व पाण्याचे उपयोजन याबाबत लिहिणार - वाचणार आहोत. येथे त्यांनी 5 बंधारे बांधले, 17 विहीरी खोदल्या, 18 तलाव खोदले. पध्दत तीच. एकाचा ओव्हर फ्लो दुसऱ्यात जावा.

पाण्याची भूगर्भातील पातळी कायम ठेवता यावी म्हणून त्यांनी येथे एक नवाच प्रयोग केला. आज इतक्या वर्षांनंतर आढावा घ्यावयाचा तर एकूण 1371 एकर भूक्षेत्रापैकी 50 एकर क्षेत्र हे घरे तसेच रस्ते आणि पायाभूत सुविधांनी व्यापलेले आहे. 200 एकर क्षेत्रावर वनशेती घनदाट रूपात उभी आहे.

50 एकर क्षेत्रात तलाव आहेत. विहीरी आहेत. एका तलावाचे पोटात विहीर खोदून भूगर्भात पाणी भरता यावे अशी रचनाही केलेली आहे. एवढे असूनही तेथे खरीप हंगामात केवळ 500 एकर क्षेत्रावरच सिंचनासाठी पाणी मिळते तर रब्बीच्या मोसमात हे क्षेत्र केवळ 300 एकर इतकेच होते , इतर सर्व शेती ही अजूनही कोरवाडूच आहे.

येथे रोगमुक्त झालेल्या 500 कुष्टरोग्यांचे पुनर्वसन झालेले आहे. हे पुनर्वसित म्हणजेच तिथले शेतकरी, त्यांच्या येथे चार वस्त्या आहेत. त्या त्या वस्तीसाठी स्वतंत्र स्वयंपाक घर आहे, दोन दोन खोल्या असलेली स्वतंत्र घरे आणि दोन घरांना मध्यभागी सामायिक हॉल अशी रचना आहे. पुढे मागे थोडी थोडी मोकळी जागा आहे. एकदा उद्योगाची सवय लागली की तो माणसाला गप्प बसू देत नाही. आम्ही 4 - 5 घरांमध्ये जावून पाहिले. त्यांच्या परसबागेत वांगी होती, टॉमॅटो, कांदे होते, लसूण होता, हळद होती, काही फुलझाडे होती. हे परसबागेतले उत्पन्न ज्याचे त्याला स्वत:साठी घ्यावयाला परवानगी होती. प्रत्येक विभागाला काम करावयाचे क्षेत्र हे ठरवून दिलेले होते. प्रकृतीला जमेल, झेपेल तेवढेच काम. कामाच्या, शिवाय अन्न, वस्त्र, निवारा व औषध फुकट. जे नातेवाईक ह्यांना रोग झाला म्हणून टाकून गेले होते ते आता ह्यांच्याकडेच येऊन रहातात. त्यांना आपसात लग्न करता येते अर्थात मुले न होऊ देण्याचे तत्वावर. तसे ऑपरेशन करवून.

काय काय पिकत नाही इथे, भात, सोयाबीन, गहू, हरभरा, कापूस सर्व प्रकारचा भाजीपाला, फुले, फळे, मत्स्यशेती. हे उत्पादन इतके की इथली गरज भागवून ते हे पदार्थ आनंदवन, अशोकवन, सुंदरवन येथे पाठवू शकतात, सोमनाथ हे या सर्व प्रकल्पांचे अन्नाचे भांडार झाले आहे.

ह्या सर्व पाणी उपलब्ध करून घेण्याचे कामाला ते जलसुरक्षा अभियान म्हणतात. त्याचे कॅप्टन आहे श्री. अरूण कदम. आमच्याबरोबर दोन दिवस फिरता फिरतांना त्यांनी अनेक प्रकारची माहिती पुरवली.

सोमनाथ प्रकल्पाचे पश्चिमेच्या वरच्या अंगाला (ताडोबा अभयारण्याला लागून) त्यांनी एक मोठा टायरचा बंधारा बांधला. नाल्याला पूर आला की तो बंधाऱ्यावरून न जावू देता बाजूला बांधलेल्या कालव्याचे गेट उघडून पाणी वळवायचे. त्यातून शक्यतेवढे सोमनाथ मधले तलाव भरून घ्यावयाचे. अशारीतीने पावसाचे जे जास्तीचे पाणी वाहून जाते, त्याला पुनर्भरणासाठी वापर करावयाचा.

तवागोदी हा तसा अगदी छोटा, अरूंद नाला, मात्र त्याची वळणे साधून त्याच्यावर बंधारे बांधले आहे. एकाखाली एक असे पाच बंधारे. सध्या त्या साठवण क्षेत्राचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळा आला आणि नाला वाहून निघाला की तेही तुडुंबतील.

सोमनाथ प्रकल्पाचे यश हे पाणी, शेती, अन्नधान्य स्वयंपूर्णता एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. ह्या जलसंधारणाचे कामांमुळे आजूबाजूच्या पडझरी आणि उमराला ह्या दोन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपोआप सुटला. भूजल पातळी उंचावली, आता 20 ते 30 फुटांवर पाणी लागते. हे तलाव आणि जंगलातले पाणी साठे हे जंगली प्राण्यासाठी आपोआप पाणवठे झाले आहेत. झाडोरा वाढला, सगळा प्रदेश हिरवागार दिसू लागला. सर्वत्र भूजलपातळी खोलावत असतांना येथे गेल्या 25 वर्षात ही भूजल पातळी दीड ते दोन फूटावर आली आहे.

येथील काही तलाव बारा महिने टिकतात, बाकीचे एप्रिल मे मध्ये आटतात. ह्या तलावांच्या खोलीकरण व रूंदीकरणातून त्यांची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. मात्र अद्याप एकूण किती पाणी साठते, भूगर्भात किती जिरते, भूगर्भातले पाणी उपसल्यावर किती वेळाने ते पुन्हा मूळ पातळीवर येते, किती पाणी वाफ होऊन उडून जाते हे गणित काढलेले नाही.

अन्नधान्य वगैरे पुरेशा प्रमाणात पिकते, पण ह्यावरून एकरी उत्पादनाचे प्रमाण किती, त्याला लागणारा खर्च किती हे गणितही तपासून पाहिलेले नाही. जागतिक पातळीवरील एकरी सरासरी उत्पादनाचे प्रमाणात येथील उत्पादन कोणत्या पातळीवर आहे हा आकडेवारीने शोध घ्याला लागणार आहे. प्रमाण कमी पडत असेल तर ते वाढविण्यासाठी काही वेगळे प्रयत्नही करावे लागतील. आणि हेच प्रमाण जागतिक सरासरी पातळीचे वर असेल तर (तसे असण्याची बरीच मोठी शक्यता आहे, अशी माझी कल्पना आहे) हा प्रयोग एक नवा आदर्श जगासमोर मांडू शकणार आहे.

माझी सर्व प्रकल्पातल्या कार्यकर्त्यांना व योजनाकर्त्यांना खास विनंती आहे, तुम्ही हा सगळा हिशोब मांडाच, तुमच्यासाठी नका करू पण किमान जे लोक तुमच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत त्यांच्या साठी तरी करा. त्यांच्याही प्रयत्नांना एक दिशा मिळू द्या.

पावसाळ्यातले खरीप हंगामाचे शेतताले काम संपल्यावर, रोजगार नसणे हा एक फार मोठा प्रश्न ग्रामीण भागातील तरूणांसमोर आहे. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या अनेक खेड्यातल्या आदिवासी मंडळींना येथे रोजगार मिळतो हे ह्या प्रकल्पाचे एक वेगळेच यश आहे.

सोमनाथचा प्रकल्प एकूण क्षेत्र 1370 हेक्टर. 700-800 ची वस्ती म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेड्याचे एक प्रातिनिधिक रूप समजावयला हरकत नाही. मात्र ज्या चंद्रपूर, यवतमाळ भागात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करतात, त्यांना हे असे काम पाहिल्यावर जगण्याची उर्मी जागृत का होत नाही, हा प्रश्न मनात येतो.

डॉ.विकास आमटेंच्याही मनात आला. आणि कृष्ठरोगी म्हणून हिणवला गेलेला आनंदवनातला रूग्ण समजला जाणार मानव ह्या शेतकऱ्यांच्या मदतीला उभा राहिला. यवतमाळ जिल्ह्यातल्या मूळगव्हाण येथे 10 एकर जमिनीवर हा सुंदरवन प्रकल्प उभा केला आहे. अवघ्या 7 वर्षांपूर्वी (2 ऑक्टोबर 2006 पासून) हे काम सुरू झाले.

नवनिर्माणाच्या काठावरचे हे डॉ.आमटेंचे टाकलेले पहिले पाऊल होते. आजपर्यंत अनेक वर्षे यशस्वीपणे पुनर्वसन केल्यावर त्याच्या पुढचे हे पाऊल. निराश झालेल्या, हतबल झालेल्या शेतकऱ्याला जगण्याची उमेद देणारे पाऊल. स्वावलंबनातून नवनिर्माण शिकविणारे हे पाऊल. अल्पभूधारक, त्यामुळे तेवढ्या शेतीतून पारंपारिक पध्दतीने उत्पन्न घेऊन खर्चाची दोन तोंडे न मिळणारे आणि पोटभर अन्न न मिळणारे हे शेतकरी. कर्जाचे ओझे पेलवेनासे झाल्यावर आत्महत्येकडे ओढले जावू लागले.

इच्छाशक्तीच्या जोरावर ह्या सगळ्यांवर मात करता येणे हे प्रत्यक्ष करून दाखविण्याच्या दृष्टीने डॉ.विकास आमटेंनी हे पाऊस उचलले. शेतकऱ्यांना त्यांचे शेतात जावून उत्पादन वाढीचे प्रयोग करून दाखवायचे.

त्यासाठी आधी त्यांनी एक विहीर खोदली, 3 शेततळी केली, 2 टायरचे बंधारे बांधले, जिथे फक्त पावसातच डोंगरावरून झरे वहायचे तिथे नाल्यावर तुडूंब साठलेले पाणी दिसू लागले. सर्व शेतकऱ्यांच्या सभा घेतल्या, त्यांना आनंदवन, सोमनाथ दाखवून आणले. त्यांच्या शेतात काय काय कामे करावयाची, पाण्याची सोय कशी करणार ह्याबद्दल प्रत्येक शेतकऱ्याची लेखी संमती घेतली.

त्यांचा विकास करावयाचा म्हणजे पाणी हवे. अल्पभूधारक असल्याने त्यांच्याकडे कोणतीच पाण्याची सोय नव्हती.

त्यांच्या शेताचे एकेक एकराचे तुकडे केले. त्याचे सपाटीकरण केले. बांधबंदिस्ती केली. शक्य असेल तिथे शेताभोवती समतल चर खोदले, शेतात खोल नांगरणी केली. त्यामुळे वाहून जाणारी माती ही शेतातच थांबली. पावसाचे पाणी शेतातच थांबले. जमिनीत ओलावा निर्माण झाला.

नाल्यावर 2 गावांमध्ये बंधारे बांधले. तिथे साठलेले पाणी आसपास कसे वाटून घ्यावयाचे ह्यावर नियम आखून दिले. दोन तलाव उंचावर बांधले व तिथले पाणी गुरूत्वाकर्षणाच्या सहाय्याने शेतात आणण्याची व्यवस्था केली.

आता ते शेतकरी दोन पिके घेतात. भाजीपाला पिकवितात. पूरक व्यवसायही सुरू केले आहेत.

पुन्हा मूळ पदावर येतो. जिथे काहीच नव्हते तिथेही हे जमते, जमू शकते याची ही चार उदाहरणे. केवळ पावसाचे पाणी अडवून व साठवून निर्माण केलेली. 700 - 800 लोकवस्ती असलेल्या 1000 - 1500 हेक्टर गावक्षेत्रातली शेती असलेल्या भागात, प्रयत्न केला तर राबविता येईल असा हा प्रयोग.

डॉ. विकास आमटेंना हा जमला. त्यांनी जिथे जिथे पाऊल टाकले, तिथे तिथे तो यशस्वी करून दाखविला. हे शक्य आहे. हा यशाचा मार्ग आहे. शेवटी स्वत:ची उन्नती स्वत:च करून घ्यावयाची असते हे सिध्द करणारा मार्ग, श्रमाला प्रतिष्ठा देणारा मार्ग, गरजवंताच्या मदतीला उभे राहून त्याला स्वत:चे जीवन जगायला शिकविणारा मार्ग.

एकदा पाणी मिळाले की उन्नती होऊ शकते. त्यासाठी प्रखर इच्छाशक्ती, जिद्द आणि श्रम करण्याची इच्छा लागते. त्यातून सर्व प्राप्त होऊ शकते. अगदी आरोग्य, शिक्षण, घरे, पुनर्वसन. पायाभूत सुविधा सारे काही. मी कुणीतरी आहे हा विचार बाजूला ठेवून, एकमेकांना सहकार्य करीत हातात हात गुंफले तर प्रचंड बळ निर्माण करता येते हा संदेश इथले पाणी देते.

कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा
माणसासाठी उद्याच्या, इथुनी निघतील वाटा
पांगळ्यांच्या सोबतीला, होऊ द्या बलदंड बाहू
नांगरू स्वप्न उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळील ज्ञान येथे, येथूनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली ही सर्व नीढळाची कमाई
शृंगला पायी तरीही मी गतीचे गीत गाई.

हे वर्णन खरेतर आनंदवनासाठी केलेले. पण आज महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर कुठेही लागू होईल असे. अशा पध्दतीने काम केले तर महाराष्ट्र हे तिथल्या जनतेसाठी एक आनंदमार्ग ठरू शकेल. पाण्याच्या थेंबाथेंबातून निर्माण झालेला. तेच उद्याचे स्वप्न आहे .

श्री. मुकुंद धाराशिवकर, धुळे - (फोन : 02562236987)

Path Alias

/articles/paanayaacaa-anandamaaraga

Post By: Hindi
×