पाणीदार कथा


संध्याकाळची वेळ होती, फिरायला निघालो होतो. शेजारी बाबुराव नावाचे माझे एक मित्र राहतात. त्यांच्याकडे गेलो तर बाबुराव अख्ख्या अंगणात पाणी मारत बसले होते. पाईप हातात घेतलेला होता. आणि सगळीकडे पाणी मारत होते. मी वाचारले -

- अहो बाबुराव काय चाललय काय?
- काही नाही, काही नाही.... अहो संध्याकाळी लेक जावई येणार आहेत.. अं. आणि तुम्हाला माहीतच आहे की उकाडा किती जाणवतोय ते. म्हटलं थोडासा थंडावा मिळावा .....
- अहो नुसतं अंगण नाही काही गच्चीवर सुध्दा पाणी मारायचय.
- हो?
- हो ना
- बाबुराव तुमचे घर बैठे आहे ना?
- हो ना! म्हणजे दोन मजली नाहीय.... त्यामुळे काय होतं की उन जरा जास्तच जाणवतं छताला. त्यामुळे गच्चीवर पाणी मारून घेतलं म्हणजे घराला जरा थंडावा मिळतो
- अच्छा! म्हणजे लेक जावयाच्या स्वागताची तयारी चाललेली दिसतेय बाबुराव - त्यांच्यासाठी थंडावा करताय.
- हो ना आता तुमच्यासारखी मंडळी आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचा थंड नकोका वाटायला. तुम्हाला सांगतो....
असं म्हणून बाबुरावांनी सांगायला सुरूवात केली.
- अहो काय सांगायचं म्हणाले किती उकाडा, किती उकाडा, किती उकाडा..... अहो आमच्या लहानपणी एवढा उकाडा नव्हता. आता किती वाढलाय बघानं.
- मी म्हणालो बाबुराव खरयं तुमच म्हणणं. अगदी खरंय. पण या उकाड्याचं कारण काय?- प्रदूषण हो, दुसरं काय? प्रदूषणामुळे उकाडा वाढलाय सगळा. अहो मला सांगा इतक्या प्रचंड प्रमाणात प्रदूषण चाललय, आणि किती प्रचंड तापमान वाढलय? अहो आता सहन होत नाहीये उन्हाळा. खरच सांगतो. आमच्या लहानपणी असं नव्हतं आणि आता? सकाळी 5 वाजता सुध्दा घाम पुसावा लागाते?
- असं बाबुरावांचं बोलणं सुरू झाल्यानंतर मी पाहिलं बाबुरावांनी त्यांच्या नोकराला सांगितलं अरे ते घेवून जा पाईप अन् वर छतावर पाणी मार.

घरातल्या छताला, अंगणाला अणि भिंतीना सुध्दा पाणी मारायला सुरूवात केली. म्हणजे अख्खं घर जसं पावसात भिजते तसं पाईपने पाणी मारून भिजवायला सुरूवात केली.

काय बोलायचं? अशी बाबुरावांसारखी मनस्थिती असलेली, वर्तणुक असलेली माणसं तुम्ही पाहिलीयत का? मी तर पाहिलेली आहेत. भिंतीला, छताला आणि अंगणाला पार पाण्यानं आंघोळ घालतात.

- अहो प्यायला इथे पाणी मिळत नाहीय आणि अख्खं घर तुम्ही ओलं करताय? आज नशीबवान आहात की तुमच्या घरात जो बोअर आहे त्याला पाणी येतं. आणि पाणी नाही आलं तर?

पाण्याची किंमत त्यालाच कळते ज्याला पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. 24 तासातील 5 ते 6 तास जेव्हा पाणी आणण्यासाठी खर्च करावे लागतील ना... तेव्हा तुम्हाला पाण्याची किंमत कळते. नळ सोडला की नळाला पाणी येतं तिथं पाण्याची किंमत कळत नाही. थोडसं शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे चला मग पाण्याची किंमत कळते. शेजारच्या गल्लीतल्या लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. चार-चार दिवस त्यांच्याकडे पाणी येत नाही. आणि आपण मात्र संपूर्ण घराला थंडावा देण्यासाठी पाणी मारत राहतो. ही कुठली मनोवृत्ती?

लक्ष्मीकांत धोंड , औरंगाबाद

Path Alias

/articles/paanaidaara-kathaa

Post By: Hindi
×