पाणी वापरा - पण जरा जपून


ज्या ठिकाणी (मग तो वापर शाळा कॉजेल मधला असो, कारखान्यातील असो अथवा हॉटेलमधील असो) भरपूर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते त्याठिकाणी पाण्याच्या ग्लासचा आकार छोटा ठेवला तर बरेच पाणी वाचू शकेल कारण अशा ठिकाणी अर्धाच ग्लास पाणी वापरून बाकीचे पाणी सहसा फेकून दिले जाते.

पाणी दुर्मिळ वस्तू बनत चालली आहे याची आता आपल्या सर्वांना जाणीव व्हायला लागली आहे. जितके काटकसरीने आपण ते वापरू तितके ते जास्त दिवस पुरणार आहे. पाणी ही एक जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे ते वापरावे लागणारच आहे पण ते वापरत असतांना जरा थोडे जपून अथवा काटकसरीने वापरले तर त्यात निव्वळ आपलेच नव्हे तर समाजाचेही भले आहे. मग चला तर आपण शोधू या पाण्याच्या बचतीचे मार्ग :

1. नळ सुरू ठेवून तोंड धुतले तर 20 लिटर पाणी आपण वाया घालतो. मग मध्ये पाणी घेवून तोंड धुतले तर फक्त 5 लिटर पाणी लागते.
2. बेसीन मधला नळ चालू ठेवून दाढी केली तर 25 लिटर पाणी लागते पण मग मध्ये पाणी घेवून दाढी केली तर दाढी 5 लिटरमध्येच आटोपते.
3. बादली मध्ये पाणी घेऊन आंघोळ केला तर फक्त 20 लिटर पाणी लागते पण शॉवर खाली उभे राहून आंघोळ केली तर 250 लिटर पाणी आपण वापरतो.
4. टबमध्ये बसून आंघोळ करणे हा पाण्याच्या अतिरेकी वापर ठरतो. यासाठी 600 लिटर पाणी लागते.
5. बादली मध्ये पाणी घेवून भांडी घासली तर 40 लिटर पाणी लागते पण तीच भांडी वाहत्या नळाखाली धुतली तर 200 लिटर पाणी लागेल.
6. बादलीमध्ये पाणी घेऊन कपडे धुतले तर 40 लिटरमध्ये काम भागते पण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले तर एका वापरात 200 लिटर पाणी लागते.
7. कालचे भरलेले व उरलेले पाणी शिळे पाणी म्हणून फेकून देवू नका. पाणी एका दिवसात शिळे होत नसते.
8. आंधोळ केलेले पाणी जमा करा. त्याच पाण्याचा सडा टाका, त्याच पाण्यातून गाड्या धुवा, तेच पाणी संडास सफाईसाठी वापरा, तेच पाणी बगीच्यातील झाडांना टाका, यालाच पाण्याचा पुनर्वापर म्हणतात.
9. घरी आलेल्या पाहुण्याला त्याचे स्वागत म्हणून पाणी देण्याची परंपरागत पध्दती बंद करा. तो निव्वळ पाणी उष्टावून ग्लास ठेवून देतो. अर्थातच त्याने मागितल्यास त्याला पाणी जरूर द्या.
10. घरातील गळक्या तोट्या विनाविलंब दुरूस्त करून घ्या. जरी ते थेंबथेंब गळत असले तरी दिवसभरातील गळती शेकडो लिटर असू शकते.
11. घरातील फरशा, जिने, गच्च्या धुण्याच्या फंदात पडू नका. ओल्या पोछाने जरी पुसले तर त्या स्वच्छ राहतात.
12. शहरातील पाण्याच्या पायपात गळती दिसल्यास योग्य अधिकाऱ्यांकडे किंवा कार्यालयात तक्रार नोंदविणे आपले कर्तव्य समजा.
13. पाण्याचा कोणी चुकीचा वापर करीत असेल तर त्याला योग्य प्रकारे समजावून सांगून त्याला त्यापासून परावृत्त करा.
14. विहिरी, तलाव, नद्या तसेच पाण्याचे इतर साठे यांना शुध्द ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या.
15. गच्चीवरील पाण्याच्या टाक्या नळ बंद न केल्यामुळे विनाकारण वाहतच राहतात. त्या वाहणार नाहीत याची काळजी घ्या.
16. घरातील बगीचाला अथवा शेताला भर उन्हात पाणी देणे बंद करा. त्यामुळे पिकाला किंवा झाडांना फायदा तर होतच नाही उलट बाष्पीभवन वाढून पाणी वाया जाते.
17. बगीचातील झाडांना पाणी दिल्यानंतर आळ्यात पालापाचोळा, गवत इत्यादी टाकून ठेवा त्यामुळे ओल जास्त वेळ टिकून राहील व बाष्पीभवनाचा दर कमी होईल.
18. झाडांना पाणी देतांना ते झाडांना द्या, जमिनीला देवू नका. झाडाला जेवढे पाणी हवे तेवढेच दिल्याने त्याची वाढ चांगली होते व पाणीही वाया जात नाही.
19. ज्या पिकांना जास्त पाणी लागते ते लावण्याच्या आधी विचार करा व मगच पिकांची निवड करा. असे केल्यास पाण्याचा अपव्यय टाळता येईल.
20. जमिनीतून पाण्याचा उपसा कमीत कमी करा. जमिनीतील पाण्याचे साठे राखीव आहेत असे समजा व गरज असल्यासच उपसा करा.
21. सिंचनाच्या पारंपारिक पध्दती वापरण्याचे एैवजी आधुनिक सिंचन पध्दतीचा वापर करा. ठिबक सिंचन व तुषार सिंचन पध्दतींचा अवलंब केल्यास भरपूर पाणी वाचू शकते.
22. आधुनिक शेती पध्दतींचा अवलंब करून तेवढ्याच पाण्यात अधिक उत्पादन मिळवा. तेवढ्याच पाण्यात जास्त उत्पादन मिळाल्यामुळे प्रती क्विंटल उत्पादनास निश्चितच कमी पाणी लागेल.
23. मोठ्या शहरात वितरण पध्दती सदोष असेल तर 30 ते 40 प्रतिशत पाण्याची गळती होते. ही गळती शोधून काढून थांबविल्यास पाण्याची भरपूर बचत होवू शकेल.
24. बऱ्याच गावात सार्वजनिक नळांना तोट्याच बसवित नाहीत. त्यामुळे अशा नळांमधून अव्याहतपणे पाणी वाहत राहते. शुध्द केलेले पाणी अशा पध्दतीने वाया जाऊ देणे योग्य नव्हे.
25. सार्वजनिक ठिकाणी संडास, वॉश बेसिनमध्ये आपोआप स्प्रिंगद्वारे बंद होणाऱ्या तोट्या वापरल्या जाव्यात. त्यामुळे चुकून वा निष्काळजीपणे नळ चालू राहणार नाहीत व पाणी वापरावर आपोआप बंधन येईल.
26. फ्लशच्या संडासात प्रत्येक वापरापाठीमागे 15 लिटर पाणी लागते. मग तो वापर मूत्र विसर्जनासाठी असो अथवा मलविसर्जनासाठी, तेवढे पाणी लागतेच. त्यामुळे फ्लशची टाकी न वापरता बादलीचा वापर केला तर वापरात बरीच बचत होवू शकते.
27. ज्या ठिकाणी (मग तो वापर शाळा कॉजेल मधला असो, कारखान्यातील असो अथवा हॉटेलमधील असो) भरपूर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते त्याठिकाणी पाण्याच्या ग्लासचा आकार छोटा ठेवला तर बरेच पाणी वाचू शकेल कारण अशा ठिकाणी अर्धाच ग्लास पाणी वापरून बाकीचे पाणी सहसा फेकून दिले जाते.
28. विजेप्रमाणे नागरिकांना पाणीसुध्दा मीटरने देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे पाण्याच्या वापरावर बरेच बंधन ओलेले दिसेल.
29. आपण जसे पैशासाठी मासिक अंदाजपत्रक तयार करतो त्याचप्रमाणे नागरिकांना पाण्यासाठी सुध्दा अंदाज पत्रक करायला शिकवावे. त्यामुळे कोणत्या वापरात आपण पाण्याची बचत करू शकतो याची कल्पना येवू शकेल.
30. शाळाशाळांमधून जलसाक्षरतेचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. मुलांचे हेच वय असे आहे की ते संस्कारक्षम असते. या वयात झालेले संस्कार आयुष्यभर टिकून राहतील.
31. विद्यालयीन अभ्याक्रमात पाणी व त्याचे व्यवस्थापन याबद्दल विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती देण्यात यावी. सर्वच विषयांमध्ये शिक्षकांनी शिकवत असतांना पाण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे दृष्टीने उद्बोधन करावे. लहान मुलांचा पालकांपेक्षा शिक्षकांवर जास्त विश्वास असतो. शिक्षकांनी हे विचार त्यांचेपर्यंत पोहोचविल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम आढळतील.
32. पाणी वापरात काटकसर कशी करायची यावर प्रबोधन व्हावे म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, जलदिंड्या, प्रभातफेऱ्या अशा सारखे कार्यक्रम आयोजित करून जल जागृती निर्माण केली जाऊ शकते.
33. 22 मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून पाळला जातो. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, प्रसार माध्यमे, सेवा भावी संस्था यांनी या संधीचा फायदा घवाून पाण्याच्या संबंधात जनजागरण करावे.
34. भूपृष्ठावरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते त्यामुळे त्या पाण्याला भूगर्भात कशा प्रकारे लपवून ठेवता येईल यासाठी मार्ग शोधून काढा.
35. वॉशिंग मशिनचे एक लोड पूर्ण होण्याइतके कपडे धुण्यासाठी रोज निघत नसतील तर मशीन एक दिवसाआड वापरल्यास पाणी मोठ्या प्रमाणात वाचू शकेल.
36. अंगणात भूपृष्ठावर किंवा जमिनीच्या आत फेरो काँक्रीटच्या टाक्या बसवून गच्चीवरील पावसाचे पाणी फिल्टर बसवून या टाक्यात संग्रहित करा व पावसाळा संपल्यानंतर जसजशी गरज लागेल तसतसा या राखीव पाण्याचा वापर करा.
37. राजस्थानमध्ये घर बांधतेवेळीच घराचे खाली पाण्याची मोठी टाकी बांधण्यात येते. या टाकीत पावसाचे पाणी संग्रहित केले जाते व जसजशी गरज लागेल तसतसे हे पाणी वापरले जाते. असे करून कमी पाऊस पडत असूनसुध्दा तिथे पाणी प्रश्नावर मात केली जाते.
38. तुमच्या घरी बोअरवेल असेल तर गच्चीवरील पावसाचे पाणी फिल्टर करून सरळ त्या बोअरवेलमध्ये सोडून द्या. उन्हाळ्याच्या आधीच ते बोअर आटून जात असेल तर असे केल्यामुळे पुढील पावसाळ्याचे पाणी बोअरला येईस्तोवर बोअर चांगल्याप्रकारे पाणी पुरवित राहील याची हमी बाळगा.
39. बोअरच्या सभोवताल किंवा नजिक सात ते आठ फूट खोल खड्डा खणा. तो खड्डा मोठे दगड, बारीक खडी, विटांचे तुकडे, जाडी रेती यांनी भरून टाका व गच्चीवरील पावसाचे पाणी या खड्ड्याजवळ सोडून द्या. हा खड्डा ते पाणी शोषून घेईल व पाणी पाझरत पाझरत शुध्द होवून भूजलाला जाऊन मिळेल. यामुळे भूजलाची पातळी वाढावयास मदत होईल.
40. घरातील अंगणात स्वच्छतेच्या नावाखाली फरशा, पेव्हींग ब्लॉक, सिमेंटचा जाड थर टाकू नका. यामुळे जमिनीत पाणी नैसर्गिकरित्या पाझरण्याला अडथळा निर्माण होतो व पुनर्भरणाचा वेग मंदावतो.
41. कंपाऊंडच्या आतल्या बाजूने सर्वत्र तीन ते चार फूट खोल चर खणा. या थरात विटांचे तुकडे, जाडी रेती टाकून हा चर भरून टाका. पावसाळ्यात या चरात सतत पाणी मरत राहील व ते बाहेर वाहून न जाता पुनर्भरणास मदतच होईल.
42. तुमच्या शेतात नांगरणी करतांना ती उताराच्या दिशेने न करता उताराच्या काटकोनात करा. त्यामुळे पावसाचे पाणी शेतातून वेगाने वाहून जाणार नाही. तर ते जमिनीत मुरण्याचे प्रमाण निश्चितच वाढेल.
43. तुमच्या शेतात विहीर असल्यास त्या विहीरीवर जल पुनर्भरणाची व्यवस्था करा. विहीरीच्या परिसरात दोन खड्डे खणा - एक मोठा व दुसरा छोटा. मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा होईल त्याचा सांडवा छोट्या खड्ड्याकडे वळवा या छोट्या खड्ड्याच्या तळापासून एक पाईप विहीरीत सोडा. या छोट्या खड्ड्यात मोठे दगड, खडी, विटांचे तुकडे, जाडी रेती थराथराने भरा मध्येच एक कोळशाचा थर पण टाका. या थरांमधून पाणी जातांना ते शुध्द होत जाऊन विहीरीत पुनर्भरण होईल. या पाण्याचा विहीरीची क्षमता वाढविण्यास भरपूर लाभ होतो.
44. आपल्या शेतात आपली पाण्याची गरज अभ्यासून योग्य आकाराचे योग्य जागी शेततळे तयार करा. यासाठी सरकारी मदत मिळाली तर ठीकच पण न मिळाल्यास स्वप्रयत्नाने, स्वत:च्या कुटुंबाचे मदतीने हे काम पूर्ण करा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे हे चार महिने शेतीवर तुलनात्मकदृष्टीने कमी काम राहते. या वेळेचा शेततळे खणण्यासाठी सदुपयोग करा. यामुळे आपल्याला वर्षातून दोन पिके काढणे शक्य होईल व त्यामुळे शेतीच्या कामात शाश्वतता येईल.
45. आपल्या गावातील सार्वजनिक तलाव आपल्या सर्वांची सार्वजनिक मालमत्ता आहे हे लक्षात ठेवा. यात मलमूत्र विसर्जित होणार नाही, जनावरे धुतली जाणार नाहीत, यात केरकचरा व निर्माल्या टाकले जाणार नाही याची काळजी घ्या. गावातील 11 ज्येष्ठांची एक समिती करा व त्या समितीवर या तालावाच्या निगराणीची जबाबदारी सोपवा. यातील गाळ नियमितपणे आजूबाजूचे शेतकरी वाहून नेतील याची व्यवस्था करा. यामुळे जमिनीत पाझर वाढून परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. गाळ उपसल्यामुळे बुडातील छिद्रे मोकळी होऊन पाझर वाढीस लागतो.
46. समुद्रासमीपच्या गावांमध्ये बोअरवेलचा अवास्तव उपसा होवू देवू नका अन्यथा समुद्रातील खाऱ्या पाण्याचा पाझर बोअरमध्ये सुरू होईल व त्यामुळे नंतर ते बोअर पिण्याच्या पाण्यासाठी वापरता येणार नाहीत.
47. आपली कॉलनी मोठी असेल तर कॉलनीत जमा होणारे सांडपाणी ठराविक पातळीपर्यंत शुध्द करून ते पाणी संडासासाठी व बगीचासाठी सहजपणे वापरता येईल. सर्वच जबाबदाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ढकलणे योग्य नाही. आपलाही त्यास हातभार लागावा.
48. सिंगापूर मध्ये तर सांडपाणी शुध्द करून पिण्यासाठी सुध्दा वापरतात. ज्या पध्दतीने सध्या आपण पाण्याचा जो अविवेकी वापर करीत आहोत त्यामुळे नजिकच्या भविष्यात आपल्यावरती ती पाळी येणार आहे याची जाणीव ठेवा.
49. समुद्रातील खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतरण करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. सध्या हे काम खर्चाचे आहे पण लवकरच ते सामान्य जनतेला परवडणारे ठरो अशी आपण आशा करू या.

डॉ. दत्ता देशकर, पुणे - (भ्र : 9325203109)

Path Alias

/articles/paanai-vaaparaa-pana-jaraa-japauuna

Post By: Hindi
×