'महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियन 2005' या कायद्याअंतर्गत पाणी व्यवस्थापनासंबंधी पाणी वापर संस्थांसाठी अनेक तरतूदी केल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नियम, 2006ʈ यात अंमलबजावणी बाबतचा तपशिल दिला आहे हे अधिनियम व नियम यांचा पाणी वापर संस्थांना, तसेच शेतकऱ्यांना अत्यंत हिताचे ठरणार आहेत.
आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी व दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालविण्यासाठी पाणी वापर संस्थांना वित्तीय बाबी कार्यक्षमतेने, पारदर्शकपणे व व्यावसायिक दृष्टीने हाताळणे अत्यंत जरूरीचे आहे. पाणी वापर संस्थांना आर्थिक स्वावलंबनाचे ध्येय ठेवून अखंड आर्थिक लाभ होण्यासाठी सुनियोजित व पध्दतीशीर मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. पाणी वापर संस्थांनी व्यवस्थापन व देखभाल व दुरूस्ती करीता अनुदानावर अवलंबून न राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. कुठल्याही बाबतीत निर्णय स्वतंत्रपणे घ्यायचे असतील तर पाणी वापर संस्थांना आर्थिक स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे.
पाणी वापर संस्थांनी काटेकोरपणे हिशोब ठेवण्याचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत.
1. पाणी वापर संस्थांचे मूल्यमापन करून वित्तीय कामगिरी मध्ये सुधारणा करणे.
2. संस्थेच्या कामात पारदर्शकता राखणे.
3. जमा - खर्च यांचा ताळेबंद करणे व योग्य तो निर्णय घेणे.
4. पाणीपट्टी, सेवा शुल्क, अनुदान इत्यादी बाबत प्रस्ताव मांडणे.
5. वादाचे मुद्दे हाताळण्याच्या वेळी साक्ष म्हणून उपयोग करणे.
पाणी वापर संस्थेकरिता निधीची साधने :
खाली नमूद केलेली विविध साधने वापरून पाणी वापर संस्था निधी उभारू शकेल.
■ पाणीपट्टी
■ ठेवीवरील व्याज
■ सदस्यांकडून घेतलेली ठेव
■ कर्ज
■ देणग्या
■ सदस्यांनी केलेले अंशदान
■ अनुदान
■ सदस्यांकडून घेतलेली दंडाची रक्कम व शिक्षार्थ शुल्क
■ सेवा शुल्क
■ पाणीपट्टीच्या मागील थकबाकीची वसुली
■ किमान पाणीपट्टी
■ सिंचनाच्या पाण्याचा पुनर्वापर आणि भूजलाचा वापर यासाठीची पाणीपट्टी.
संस्था खालील उपक्रमांद्वारेही निधी उभारणी शकेल -
■ बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांचे वितरण करणे, शेतीची अवजारे भाड्याने देणे.
■ लाभक्षेत्रातील शेती उत्पन्नाचे पणन व त्यावर प्रक्रिया करणे, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय यासारखे इतर जोडधंदे करणे.
■ पाणी वापर संस्थेने कलम 57 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे अनुसूचित बँकेमध्ये (Scheduled Bank) किंवा सहकारी बँक, नागरी बँक , वाणिज्य बँक किंवा टपाल खात्याच्या बचत बँकेमध्ये आपले खाते उघडणे आवश्यक आहे.
■ पाणी वापर संस्थेने तिचे विविध लेखे व खाते वह्या योग्य प्रकारे ठेवणे आवश्यक आहे.
■ पाणी वापर संस्थेने नमुना ग मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पाणीपट्टी देयकानुसार आपल्या सदस्यांकडून पाणीपट्टी गोळा करावी, तसेच नमुना ह मध्ये त्याच्या पावत्या द्याव्यात आणि तत्परतेने ती रक्कम आपल्या बँक खात्यात भरणा करावी.
■ पाणी वापर संस्थेने रोकड वही, देय रक्कमेची नोंद वही, जडसंग्रह नोंदवही, वार्षिक वित्तीय अंदाजपत्रक, नफा तोटा लेखा, इत्यादींची पूर्तता वेळोवेळी करणे आवश्यक आहे. पाणी वापर संस्थेने कालवा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या देयकानुसार पाणीपट्टी मुदतीच्या आत भरावी व 5 टक्के सुट मिळवावी. (विलंब झाल्यास 10 टक्के प्रतिवर्ष एवढा दंड आहे.)
निधीचे वाटप :
पाणी वापर संस्थेने निधीचा विनियोग करतांना खालील बाबींचा अवलंब करावा -
■ पुढील वित्तीय वर्षाकरिता वेगवेगळ्या बाबींवरील संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून वर्षाच्या प्रारंभी वार्षिक सर्वसाधारण सभेची त्यास मान्यता घ्यावी. अंदाजपत्रकाच्या मर्यादेतच खर्च करावा.
■ फक्त एक हजार रूपयांपर्यंतचाच खर्च अध्यक्षांच्या लेखी पूर्व परवानगीने करता येऊ शकेल. एक हजार रूपयांपेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही खर्चासाठी व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये आगाऊ मान्यता घेण्यात यावी. खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी दरपत्रक किंवा निविदा मागविण्याची कार्यपध्दती अंमलात आणावी.
■ पाणी वापर संस्थेने आपल्या सचिवास चालू खर्च भागविण्यासाठी जास्तीतजास्त एक हजार रूपये इतकी रोख रक्कम स्वत:कडे ठेवण्याची मुभा द्यावी.
द निधीची जास्तीत जास्त रक्कम प्रत्यक्ष परिरक्षण, देखभाल - दुरूस्ती व व्यवस्थापन यासाठी वापरावी. तसेच इतर समारंभ, कार्यालयीन इमारत व तिची सजावट, वाहने, फर्निचर, बैठका, छायाचित्रे, वार्षिक अहवालांचे प्रकाशन, इत्यादी बाबींवर खर्च कमीत कमी करावा.
■ एक हजार रूपयांपेक्षा जास्त रकमेचे सर्व प्रदाने धनादेशाद्वारे करण्यात यावीत.
■ शासनाला द्यावयाची पाणीपट्टी, संस्थेचा स्वत:चा खर्च आणि नफा इत्यादी विचारात घेऊन संस्थेने सदस्यांकरिता पाणीपट्टी ठरवावी.
■ पाणी वापर संस्थेने आपल्याला झेपणार नाहीत अशी कर्जे काढू नयेत. अगदीच जरूर असल्यास व्यवस्थापन समितीच्या पूर्व मान्यतेने अल्प मुदतीची कर्जे घ्यावीत. पाणी वापर संस्थेने तिच्याकडे वापराकरिता सोपविलेल्या शासकीय मत्तांवर कर्ज काढू नये.
अर्थ संकल्प :
■ प्रत्येक वित्तीय वर्षात, पाणी वापर संस्थेच्या व्यवस्थापनात समितीने, पुढील वित्तीय वर्षाच्या संबंधात जोडपत्र - 6 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नमुन्यात अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करावा. हा अर्थसंकल्प प्रत्येक वर्षाच्या दिनांक 15 मार्च पर्यंत होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात यावा.
■ अर्थसंकल्पीय मसुद्यात कोणतेही आवश्यक बदल करावयाचे असल्यास सर्वसाधारण सभेमध्ये ते मान्य करून घ्यावेत.
■ राखीव निधी : प्रत्येक पाणी वापर संस्थेने कलम 58 अन्वये प्रमाणे एक राखीव निधी निर्माण करावा. सदस्यांकडून जमा केलेल्या पाणीपट्टीच्या दहा टक्के इतकी रक्कम आणि पाणी वापर संस्थेला होणाऱ्या नफ्याच्या दहा टक्के इतकी रक्कम प्रत्येक वर्षी या प्रयोजनार्थ उघडण्यात आलेल्या स्वतंत्र खात्यामध्ये जमा करावी.
लेखापुस्तके व अभिलेख :
अधिनियमातील कलम 35 प्रमाणे, प्रत्येक पाणी वापर संस्था आपल्या कार्यालयात खालील लेखापुस्तके व अभिलेख (Books & Records) ठेवील.
1. सभासद नोंदवही
2. सर्वसाधारण पावती पुस्तक
3. रोकड वही
4. मत्ता व दायित्वे विवरण
5. जमा व खर्च दाखविणारी लेखा पुस्तके
6. पाणी वापर संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्व खरेदी व विक्रीची लेखा पुस्तके.
7. लेखापरीक्षा अहवाल आणि चौकशी अहवाल यांच्या प्रती.
लेखा परिक्षण :
पाणी वापर संस्थेचे वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे असेल. प्रत्येक वित्तीय वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वित्तीय वर्षाच्या प्रारंभापासून तीन महिन्यांच्या आत पाणी वापर संस्था तिच्या लेख्यांची खाली दिलेल्या रीतीने लेखा परीक्षा करवून घेईल.
अ) लघु वितरिका स्तरावरील पाणी वापर संस्था आणि लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या प्रकल्पस्तरीय संस्था लेखा परिक्षणाविषयक कामाचा पुरेसा अनुभव असलेल्या लेखा परिक्षकाची नियुक्ती करतील.
ब) पाणी वापर संस्थेने अशा प्रकारे नियुक्त केलेला लेखा परिक्षक त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत जमा व खर्चाच्या लेख्यांचे परीक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपायोजना करील आणि लेखा विवरणपत्र व ताळेबंदासह आपला लेखा परीक्षा अहवाल पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांकडे दरवर्षी 31 जुलैपूर्वी सादर करील.
क) पाणी वापर संस्थेची व्यवस्थापन समिती लेखापरीक्षा अहवाल विचारात घेवून आवश्यक असल्यास लेखा परीक्षा दोष निरसन अहवाल तयार करेल. हा अहवाल लेखा परीक्षकांना त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत सादर करण्यात यावा.
ड) लेखा परीक्षा अहवाल दरवर्षी 30 सप्टेंबर च्या आत सर्वसाधारण सभेमध्ये सादर करावा.
इ) पाणी वापर संस्थेची व्यवस्थापन समिती लेखा परीक्षण अहवालात दर्शविलेल्या सर्व बाबींवरील कृति अहवाल सर्वसाधारण सभेमध्ये तसेच संबंधीत कालवा अधिकारी आणि उच्चस्तरीय पाणी वापर संस्थेला सादर करेल.
- लेखा पुस्तके व अभिलेख सुरक्षित ठेवणे आणि ती ताब्यात ठेवणे याची जबाबदारी पाणी वापर संसेथेच्या सचिवाची असेल. पाणी वापर संस्थेची व्यवस्थापन समिती जेव्हा प्राधिकृत करील तेव्हा पाणी वापर संस्थेच्या वतीने तो आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या करील.
महाराष्ट्र सिंचन पध्दतींचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 या कायद्यात अंतर्गत पाणी वापर संस्थांसाठी अनेक उपयुक्त तरतूदी केल्या आहेत. त्यांचा लाभ घेणे हे पाणी वापर संस्थांना तसेच शेतकऱ्यांकरिता अत्यंक हिताचे ठरेल.
कायदा व नियमांच्या पाठबळाने पाणी वापर संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि सिंचन व्यवस्थापन कार्य कार्यक्षमतेने पार पाडतील यात शंका नाही.
श्रीमती विद्या पुरंदरे, सहाय्यक प्राध्यापिका वाल्मी, औरंगाबाद
Path Alias
/articles/paanai-vaapara-sansathaancayaa-vaitataiya-baabai
Post By: Hindi