पाणी वापर संस्था यशस्वी आणि सक्षम होण्यासाठी पीक नियोजन आणि व्यवस्थापन


पाणी वापर संस्था यशस्वी आणि सक्षम होण्यासाठी शेतीवर घेतल्या जाणाऱ्या पिकांची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्थेने वेळेवर पाणी पुरवठा केला पाहिजे. शेतकऱ्यांनी सुध्दा उपलब्ध होत असलेल्या पाण्याचे रूपांतर पैशात करण्याचा दृष्टीकोन ठेवूनच पिकांची निवड करावी. देशांत व परदेशात ज्या पिकाला मागणी आहे व ज्यातून जास्त पैसे मिळतात त्या पिकांना प्राधान्य द्यावे.

पाणी वापर संस्था यशस्वी आणि सक्षम होण्यासाठी संस्थेच्या पाणी वाटपाबाबतच्या जबाबदाऱ्या चांगल्याप्रकारे पार पाडण्याकरिता संस्थेला सतत व पुरेसा पैसा मिळत गेला पाहिजे. हा पैसा शेतकऱ्यांकडून सिंचनामुळे वाढलेल्या शेती उत्पादनातून मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांकडून मिळणारी पाणीपट्टी हेच पाणी वापर संस्थेचे पैश्याचे प्रमुख स्त्रोत असावे लागते. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर संस्था जास्त दिवस टिकत नाही. शेतकऱ्यांचे शेती उत्पादन चांगले व स्थिर मिळत रहावे. शेती उत्पादन व उत्पन्न सतत चांगले मिळण्यासाठी पीक नियोजन आणि त्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते. पीक नियोजन म्हणजे पिकांची निवड झाल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करताना अधुनिक कृषि तंत्राचा अवलंब केला तरच त्यांना सतत चांगले उत्पादन मिळत रहाते.

शेती व्यवसायात पिकांची निवड नैसर्गिक अनूकुलतेवर आधारित असेल तर पिकांची वाढ चांगली होते, रोग व किडींना फारशी बळी पडत नाहीत. उत्पादन चांगले येते. उत्पादनात स्थिरता असते. लागवडीचा खर्च कमी येतो. नफा जास्त मिळतो. नफा जास्त मिळत राहीला तरच शेतकरी बियाणे, खते, औषधे, पाणी इत्यादी निविष्ठांवर खर्च करतात. या सर्व निविष्ठांमध्ये सिंचनासाठी लागणारे पाणी अत्यंत महत्वाचे असल्यामुळे पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी जास्त प्रयत्न करतात. अशी परिस्थिती असेल तरच पाणी वापर संस्था यशस्वी होते.

सध्या पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रात पीक स्वातंत्र्य दिलेले आहे. पीक स्वातंत्र्य देण्याचा प्रमुख हेतु असा की सिंचनासाठी घनमापन पध्दतीने उपलब्ध होत असलेल्या पाण्याचे रूपांतर शेती उत्पादनात व शेती उत्पादनाचे रूपांतर पैशात करताना शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचे बंधन असू नये. पाण्याचे रूपांतर पैशात करताना कमी पाण्यात ज्या पिकातून जास्त पैसा मिळतो त्या पिकांची निवड त्यांना करता यावी. मग ते कोणतेही पीक (भाजीपाला पिके, मसाला पिके, औषधी वनस्पती, फळपिके इत्यादी) असेल तरी चालेल. कदाचित काही ठिकाणी सध्या लागवडीखाली असलेली पिके ठिबक, तुषार अशा आधुनिक सिंचन पध्दतीचा अवलंब करून शेतकरी कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणतील तर त्यांनाही अडचण येऊ नये. ज्या ठिकाणी मोजून दिलेल्या पाण्यातून जास्त पैसा मिळतो तेथे रोजगार निर्मिती ही जास्त होत असते. हे सर्व लक्षात घेऊन पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रात पीक स्वातंत्र्य दिलेले आहे.

पीक नियोजनाबाबत दुर्लक्ष झाल्यास पाण्याची कमतरता असलेल्या भागात पाणी वापर संस्था त्यांच्या कोट्यानुसार संपूर्ण पाणी मायनरच्या मुखाजवळ विकत घेवून फक्त 15 ते 20 टक्के क्षेत्रावर, ऊसासारखी बारमाही पिकांना जास्त प्राधान्य देण्याची शक्यता आहे आणि तसे झाले तर सिंचनाचा फायदा फक्त 15 ते 20 टक्के क्षेत्राला म्हणजे 15 ते 20 टक्के शेतकऱ्यांनाच होत राहील आणि बाकी 80 ते 85 टक्के क्षेत्र जसेच्या तसेच कोरवाहू राहील आणि या पध्दतीने शासनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला हा हेतू साध्य होणार नाही. या सर्व बाबींचा विचार केला तर शेतकऱ्यांना पीक नियोजनाबाबत सविस्तर माहिती देणे जास्त गरजेचे आहे हेच लक्षात येईल.

पिकाची निवड करताना पिकासाठी नैसर्गिक अनूकुलता लक्षात घ्यावी लागते. त्याच दृष्टीकोनातून महाराष्ट्राचे नऊ कृषि हवामान विभाग पाडलेले आहेत. प्रत्येक कृषि हवामान विभागात नैसर्गिकरित्या कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची शिफारस केलेली आहे. सिंचनाची सोय असलेल्या भागात कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी पीक रचना काय असावी याबाबतही शिफारसी केलेल्या आहेत.

पाणी वापर संस्था यशस्वी आणि सक्षम होण्यासाठी शेतीवर घेतल्या जाणाऱ्या पिकांची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्थेने वेळेवर पाणी पुरवठा केला पाहिजे. शेतकऱ्यांनी सुध्दा उपलब्ध होत असलेल्या पाण्याचे रूपांतर पैशात करण्याचा दृष्टीकोन ठेवूनच पिकांची निवड करावी. देशांत व परदेशात ज्या पिकाला मागणी आहे व ज्यातून जास्त पैसे मिळतात त्या पिकांना प्राधान्य द्यावे. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली आहे. त्यांच्या गरजा लक्षात घ्याव्यात आणि त्यापैकी आपल्या प्रदेशात कोणकोणती पिके घेता येतात हे पहावे आणि अशा पिकांची उत्पादकता वाढवण्यावर जास्त भर द्यावा.

कृषि हवामान विभाग 1 आणि 2 च्या प्रदेशात नारळ, चिकी, सुपारी, केळी, पपई, आंबा, काजू, मसाल्याची पिके तसेच ताज्या भाज्या टोमॅटो, मिरची, भेंडी इत्यादी पिके चांगली वाढतात आणि यापैकी आंबा, काजू, मसाल्याची पिके, भाज्या यांना परदेशातून भरपूर मागणी आहे. महाराष्ट्रातील आंबा त्यांचा मनमोहक रंग, उत्तम सुवास आणि आवडणारी चव तसेच जास्त काळ टिकून रहाण्याची क्षमता या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे देशात व परदेशात प्रसिध्द आहे. हापूस आंब्याला दुबई, मलेशिया, फ्रांस आणि जर्मनी या देशात निर्यातीस वाव आहे. फळमाशीचे नियंत्रण झाल्यास अमेरिका, जपान या देशातही निर्यात होऊ शकेल. या पिकाला सिंचन कमी लगाते. अशीच परिस्थिती काजूची पण आहे. काजूलाही निर्यातीस भरपूर वाव आहे. मसाल्याच्या पदार्थांना परदेशातून मागणी आहे. फार पूर्वीपासून राज्यातून मसाल्याचे पदार्थ निर्यात होतात. त्यात काळी मिरी, मिरची, ओवा, धणे, जिरा याचा समावेश आहे. ही पिके नारळ, सुपारी इत्यादी पिकांच्या सावलीत आंतरपिके म्हणून येतात त्यामुळे या पिकांना लागवडीचा खर्च जास्त येत नाही. पण उत्पादन चांगले येते. नारळ, सुपारी या पिकांना जे पाणी दिले जाते त्याच पाण्यावर मसाला पिके येतात.

म्हणून पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रात अशा पिकांची व्यापारी तत्वावर लागवड करून उत्पादकता वाढवावी. कृषि हवामान 3 म्हणजे हा घाटमाथ्याचा प्रदेश आहे. येथे 3000 ते 5000 मिमी पाऊस पडतो. या विभागातील जमिनी जास्त हलक्या, उथळ आणि चढ उताराच्या आहेत. येथे भात, सावा, वरई, कारळ अशी पिके पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. सिंचित क्षेत्रात रब्बी हंगामात गहू, बटाटा, स्ट्रॉबेरी सारख्या पिकांची लागवड करावी. आंबा, काजू, नारळ अशी फळपिके सुध्दा येथे येतात. सक्रमण विभाग - 1 हा सह्याद्री पर्वताच्या पूर्वउताराकडील भाग, सातारा, पुणे, नाशिक अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील व कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य पश्चिम भाग येथे 1250 ते 2500 मिमी पाऊस पडतो. येथील जमिनी तांबूस ते तांबूस तपकीरी रंगाच्या आहेत, येथे भात, ज्वारी, भुईमूग, तूर, कारळ, मका, नागली, वरई अशी पिके पावसाच्या पाण्यावर घेतली जातात.

सिंचित शेतीमध्ये हरभरा,वाटाणा, मोहरी, बटाटा, कोबी, पेरू, ऊस, आंबे, चिकी या पिकांची लागवड करावी देशात आणि परदेशात विक्री होण्यास या पिकांची लागवड पाणी वापर संस्थेला फायदेशीर राहील. संक्रमण विभाग - 2 या विभागात 700 ते 1250 मिमी पाऊस पडतो. या भागात करडी व काळ्या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. येथे ज्वारी, बाजरी, भुईमूग, तूर, मुग, उडीद पावसाच्या पाण्यावर येतात. जरण लाभक्षेत्रात पाणी वापर संस्थेने ऊस, अंजीर, पेरू, द्राक्ष, केळी, आंबा, बोर, सिताफळ, आवळा, ज्वारी, भरभरा, मोहरी, गहू, बटाटा, कांदे या पिकांना प्राधान्य द्यावे. घाटमाथ्यावर पडलेल्या जास्त पावसाचा फायदा संक्रमण विभाग - 1 व 2 यांना जास्त होतो. ऊसाचे पीक चांगले वाढते. येथे साखर उतारा जास्त आहे. साखर कारखाने आहेत. साखर निर्यातीस वाव आहे. जेथे मुबलक पाणी आहे तेथे ऊसाला प्राधान्य द्यावे. परंतु जमिनी क्षारयुक्त होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जेथे पाणी कमी आहे तेथे अंजीर, पेरू, सिताफळ, आवळा अशी पिके घ्यावीत. उपसासिंचन असेल तेथे बटाटा, कांदे, भेंडी, टोमॅटो अशा भाजीपाला पिकांची लागवड करावी.

कांद्याला परदेशातून चांगली मागणी आहे या पिकाचे चांगले वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. येथील हवामान चांगले आहे. शेतकऱ्यांना लागवडीचे तंत्र माहित आहे. त्यात थोडी सुधारणा करून लागवड केल्यास ऊसाच्या तुलनेत कमी पाण्यावर चांगला पैसा मिळतो. टोमॅटो, भेंडी, कोबी या ताज्या भाज्यांनासुध्दा परदेशातून चांगली मागणी आहे. मोजून घेतलेले पाणी तुषार पध्दतीने वापरल्यास भाज्यांचे कमी पाण्यातून चांगले उत्पादन मिळते.

अवर्षण विभागात पावसाचे प्रमाण 700 मिमी पेक्षा कमी आहे. काही भागात तर 400 ते 500 मिमी पाऊस पडतो. म्हणूनच या प्रदेशात बाजरी, ज्वारी, मुग, उडीद, सूर्यफुल, एरंडी, तूर अशी पिके पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. सिंचनाची सोय असलेल्या भागात गहू, हरभरा, करडई, कांदे ऊस, द्राक्षे, बोर, डाळींब, पेरू, मोसंबी, लिंबू या पिकांची लागवड करावी. पाणी वापर संस्थेने द्राक्षे, डाळींबासारख्या जास्त पैसे मिळवून देणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. द्राक्षाला परदेशातून भरपूर मागणी आहे. ही मागणी सतत वाढत आहे. कारण राज्यात उत्पादीत होणारी द्राक्षे चांगल्या दर्जाची, साखरेचे प्रमाण जास्त असलेली, बीया विरहीत आहेत. सध्या द्राक्ष निर्यात होत आहेत. द्राक्षाचे क्षेत्र आणि उत्पादन कसे वाढवता येईल यावर भर द्यावा. सध्या द्राक्ष बागा विहिरीच्या पाण्यावर जास्त वाढवल्या जातात. कालव्याचे पाणी मिळत असलेल्या भागात विहिरींनाही पाणी वाढते. उपलब्ध झालेले पाणी ठिबक पध्दतीने वापरून द्राक्षाचे क्षेत्र वाढवता येणे शक्य आहे. डाळींबाच्या लागवडीस सुध्दा भरपूर वाव आहे.

हमखास पावसाच्या प्रदेशात साधारणपणे 700 ते 900 मिमी पाऊस खरीप हंगामात पडतो. कापूस, तूर, भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद अशी पिके घेतली जातात. रब्बी हंगामात ज्वारी, करडई आणि सिंचनाची सोय असलेल्या भागात गहू, कांदा, मोहरी, केळी, ऊस, संत्रा, लिंबू, चिकू, पेरू, मोसंबी या पिकांची लागवड आहे.

अधिक पावसाच्या प्रदेशात सुध्दा जवळ जवळ हीच पिके घेतली जातात. पावसाचे प्रमाण हमखास पावसाच्या प्रदेशापेक्षा थोडे जास्त म्हणजे 900 ते 1250 मिमी आहे या दोन्ही प्रदेशात कापूस, भुईमूग, तूर या बरोबरच मोसंबी, संत्रा यासारख्या पिकांची लागवड जास्त क्षेत्रावर करून शेतकऱ्याच्या शेतीचे उत्पादन व उत्पन्न वाढवावे.

चांगल्या प्रतीच्या सूताला, रेडीमेड कपड्यांना परदेशातून मागणी आहे. या भागात कापूस या पिकाच्या लागवडीस हवामान पोषक आहे. सध्या पिकाची उत्पादकता अत्यंत कमी आहे. त्याचे प्रमुख कारण 97 टक्के कापूस कोरडवाहू आहे. कापसाचा कालावधी 160 - 170 दिवसाचा आहे. बागायतीमध्ये या पिकाच्या लागवडीची शिफारस मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात असली तरी उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसल्यामुळे लागवड जुन - जुलै महिन्यात केली जाते व त्यानंतर पावसाळा 100 दिवस असतो. शंभर दिवसापर्यंत कापसाला फारशी अडचण येत नाही. परंतु सप्टेंबर अखेर म्हणजे पावसाळा संपल्यानंतर बोंडे मोठी होण्याच्या अवस्थेत जमिनीत ओलावा नसल्यामुळे उत्पादनात फार मोठी घट येते. (उत्पादन फक्त

क्विंटल / हेक्टर) पावसाळ्यानंतर या पिकाला 1 -2 पाणी दिल्यानंतर याचे उत्पादन 30 क्विंटल प्रती हेक्टर पर्यंत वाढते. म्हणजे पाणी वापर संस्थेने कापसाचे पीक बागायतीमध्ये घेण्याचा प्रयत्न करावा, तुरीची परिस्थिती सुध्दा कापसाप्रमाणेच आहे. बागायती तुरीचे उत्पादन चांगले आहे. पाणी वापर संस्थेने संत्रा, मोसंबी, केळी या पिकांनासुध्दा प्राधान्य द्यावे पंरतु या सर्व पिकांना ठिबक पध्दतीने पाणी द्यावे. केळी, संत्रा निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवता येईल. अशी परिस्थिती संस्थेने निर्माण करावी. या भागात भुईमुगाची लागवड करून सुध्दा चांगला फायदा मिळवता येईल.

जास्त पावसाचा आणि समिश्र खडकापासून तयार झालेल्या जमिनीच्या प्रदेशात 1250 ते 1700 मिमी पाऊस पडतो, येथे भात, सोयाबीन, खरीपात आणि गहू, ज्वारी, हरभरा, पावटा, जवस, राजमा, इत्यादी पिकांची लागवड रब्बी हंगामात केली जाते. या शिवाय ऊस, चिकी यासारखी पिकेसुध्दा अनेक औषधी वनस्पतीची लागवड सुध्दा या विभागात करता येते. पाणी वापर संस्थांनी आणि शेतकऱ्यांनी सिंचनासाठी उपलब्ध झालेल्या पाण्याचे रूपांतर पैशात करण्याच्या दृष्टीकोन ठेवूनच पिकांची निवड आणि व्यवस्थापन करावे.

प्रा.वसंत मुसांडे, औरंगाबाद - (भ्र : 9921892204)

Path Alias

/articles/paanai-vaapara-sansathaa-yasasavai-anai-sakasama-haonayaasaathai-paika-naiyaojana-anai

Post By: Hindi
×