पाणी वापर संस्था व सामाजिक पैलू


सामुहिक रित्या पाण्याचे व्यवस्थापन आत पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून शक्य आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी करुन घ्यावा व आपल्या पाणी वापर संस्था आर्थीक दृष्टया सक्षम करुन पाण्याचा सुयोग्य वापर करावा.

पाण्याचे महत्व अन्नन्य साधारण आहे. पाण्याला संजिवनी, अमृत, जिवन अश्या विविध नावाने ओळखले जाते. पाण्यामुळे मानवाच्या जिवनात सुख-समृध्दी येऊ शकते, त्याच प्रमाणे पाणी हे सामाजिक व आर्थीक मुल्य असलेले संसाधन आहे. शेती, शेतकरी, उद्योजक, सामान्य नागरीक यांच्या पासून ते शहरी, ग्रामिण, श्रीमत व गरीब या सर्वावर पाण्याचा परिणाम जाणवतो.

पाण्यावर समाजातल्या प्रत्येक घटकाचा समान हक्क आहे. त्याच बरोबर पाण्याच्या संवर्धनाची ही जबाबदारी सर्वांची आहे. पाण्यावर हक्क सांगणारे त्याच्या संवर्धनाकडे आणि काटेकोर व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करत आहेत. पाण्याची उपलब्धता ही आता कमी कमी होत चालली आहे. कारण भुगर्भातील पाण्याचे साठे दिवसे दिवस खोल जात असून ते कमी कमी होत आहेत. त्याच प्रमाणात पिण्याच्या पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. एके काळी ओल्या देशामध्ये जगामध्ये ज्याचा दुसरा नंबर होता त्या भारताची वाटचाल आता मुबलक पाण्याच्या प्रदेशाकडून टंचाईग्रस्त पाण्याच्या प्रदेशाकडे होत आहे. त्यामुळे पाणी हा अत्यंत चिंतेचा विषय झालेला आहे.

पाण्याचा वाढता वापर, व त्याची उपलब्धता पहाता पाण्याचा जपुन वापर करण्याच्या जनजागृती बरोबरच पाण्याच्या परिणाकारक व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे.

उपलब्ध पाण्याचे लोकसहभागातून सुयोग्य व कार्यक्षम नियोजन केल्यास वाढत्या लोकसंख्येला ते पुरविणे शक्य आहे. यापुढे पाण्याची उपलब्धता तपासून पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. उस, भात, केळी या सारखी जास्त पाणी लागणारी पिके घेणे भारतासारख्या विकसनशिल व लोकसंख्या वाढीत अग्रेसर असलेल्या देशात सुक्ष्म सिंचनाच्या पध्दतीनेच पाणी देणे परवडण्या सारखे आहे. प्रामुख्याने भाता सारख्या जास्त पाणी लागणा-या पिकाचे उत्पादन वाढवणाऱ्या तंत्रज्ञानास आत्मसात करणे गरजेचे आहे. अन्यथा भातावर भाता सारखी पिके घेऊन जमिनीचा -हास व पाण्याचा विनाश करण्यास आपणच हातभारच लावत आहोत असे खेदाने नमुद करावे लागेल.

अनेक पिंकासाठी मोठया प्रमाणावर पाणी व रासायनीक खताच्या अति वापरामुळे जमिनीतील पाण्याचे साठे प्रदुषीत होण्यास व उपलब्ध जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढत आहे. याच खालोखाल गहू या पिकासाठी देखील मोठया प्रमाणावर पाण्याचा वापर होत आहे. वास्तविक गहू हे पिक महाराष्ट्राच्या कृषि हवामानाचा विचार करता मोठया प्रमाणात येथे घेणे संयुक्तीक वाटत नाही. कारण पंजाब, मध्य प्रदेश या राज्यासारखी उत्पादकता येथे येत नाही. त्यासाठी आवश्यक हवामान येथे उपलब्ध नाही. या पिकास पाण्याची आवश्यकता ज्वारी, बाजरी या पिका पेक्षा 2 ते 3 पट जास्त लागते. त्याच पाण्यात ज्वारी, भुईमुग, भाजीपाला व इतर पिके घेतल्यास शेतकरी आपली आर्थीक स्थीती सुधारु शकतो त्याकरीता पिकाची फेर पालट करणे गरजेचे आहे. एकाच प्रकारचे पिक त्याच क्षेत्रावर घेतल्याने अनेक प्रश्न व अडचणी निर्माण होतात. त्यात बाजार भाव न मिळणे, किड रोगांचा प्रादुर्भाव एकदाच काम एकवटल्याने मजुराची टंचाई, जमिनीचा पोत बिघडणे, पर्यायाने उत्पादन खर्चात वाढ ह्या बाबी प्रकर्षाने जाणवत आहे.

अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यातील अनेक पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उसा ऐवजी ज्वारी (हुरडा) घेण्या कडे मोठया प्रमणावर सुरुवात केली आहे. त्यातून त्याची आर्थिक प्रगती साधण्यास, पाण्याचा सुयोग्य वापर होण्यास व पाणी वापर संस्था आर्थिक दृष्टया सक्षम होण्यास मदत होऊ लागली आहे.

देशातील एकूण धरणापैकी 40 ते 45 टक्के धरणे महाराष्ट्रात आहे. राज्याने सिंचन क्षमता निर्माण करण्या मध्ये जरी चांगले कार्य केले असले तरी प्रत्यक्ष पाणी वापरा मध्ये जे इप्सित गाठावयास पाहिजे होते ते अद्यापही साध्य करता आलेले नाही. याकरीता शासन सातत्याने प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांनी या कामात आता अग्रेसर राहून पुढे यावयास पाहिजे.

या बाबींचा विचार करुन शासनाने सिंचन व्यवस्थापनात गेल्या 10 -15 वर्षापासून अमुलाग्र बदल के लेले आहेत. पाण्याचा कार्यक्षम व काटेकोरपणे वापर करुन शेवटच्या शेतकऱ्यापयंर्त पाणी कसे पोहचविता येईल यासाठी पाणी वापर संस्थेची सक्षम भूमिका अंगीकारली आहे.

सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांंचा सहभाग वाढवून पाण्याचे वितरण आणि व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्थेकडे देण्याचे धाडसी पाऊल महाराष्ट्राने उचलले आहे राज्यातल शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. जागतिक अर्थव्यवस्था खुली झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता पारंपारीक शेती करुन चालणार नाही.

शेतीकरण्याकडे आता समाजातल्या विविध घटकाचा समावेश होत आहे. त्यात प्रामुख्याने कारखानदार, इंजिनिअर, डॉक्टर, प्राध्यापक, कृषि व विविध खात्यातील अधिकारी ही मंडळी पारंपारिक शेती करणारी नाही. त्यामुळे या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यासाठी सामान्य शेतक-यांना या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर याबाबतचे नियम पाळावेच लागतील. कुस्ती खेळावयाची आहे परंतु व्यायाम नको असे म्हणून चालणार नाही, तसेच शेती करावयाची आहे तर प्रत्यक्ष शेताचे बांधावाटे आत उतरुन शेती करावी लागेल. शेती करत असतांना पिकाची भाषा कळाली पाहिजे. त्याला पाण्याची किती, केव्हा व कशी आवश्यकता आहे ती कोणत्या माध्यमाद्वारे पूर्ण करता येईल याचा विचार करावा लागेल.

हे माहितीचे युग आहे ज्याला जास्त माहिती आहे तो प्रगत शेतकरी गणला जाणार आहे. मोबाईल, इंटरनेट, फे सबुक, वॉटसअप किंवा इतर सामाजिक मिडीयाचा वापर शेतीसाठी कसा करता येईल याचा विचार करावा लागेल. या पुढील काळात स्व:तच्या आवडी निवडी प्रमाणे शेतातील मालाचे उत्पादन किवा प्रत काढून चालणार नाही. समोरच्या लोकांची गरज काय आहे. त्यांना कोणत्या प्रतीच्या मालाची आवश्यक आहे हे पहावे लागेल ,तरच आपणास चांगले आर्थीक मुल्य किंवा बाजाभाव मिळू शकेल. शेतकऱ्यांनी आता यापुढे शेतात काय पिकते त्या पेक्षा बाजारात काय विकते याचा विचार करुन शेती करावी लागेल. शेती करण्याचा व्यवसाय आता आम्ही स्वीकारलेला आहे तो इमाने इतबारे करावा लागेल.

गटशेतीच्या मध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादन वाढविता येईल. त्यात होणारा समान खर्च व वाचणारा वेळ याचा विचार करावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांना समान संधी उपलब्ध होऊ शकतील. शेतकऱ्यांच्या समान समस्या सोडविल्या जाऊ शकतील तसेच पाणी वापराची कार्यक्षमता देखील वाढविता येऊ शके ल. याच गट शेतीद्वारे त्यांना सेंद्रीय शेतीकडे देखील वळता येईल.या माध्यमातून शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळवता येतील. जमिनीचा पोत टिकविता येईल व सेंद्रीय खते आपल्याच शेतात तयार करता येतील. त्याकरीता आवश्यक असलेला पालापाचोळा, शेतातील उसाची पाचट भाताचे तुस याचा वापर करता येईल व रासायनिक खतावरील खर्च कमी करता येईल. सेंद्रीय खतामुळे जमिनीचा कस आणि पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढू शकते यासाठी सामुदायीक रित्या शेतक-यांनी प्रयत्न करावयास पाहिजेत.

शेती करतांना शेतीत दुय्यम धंदे करावे लागतील. कुटुंबातील सर्वानीच शेती न करता एकानेच शेती करावी व इतरांनी शेतीवर आधारीत दुय्यम धंदे करावेत. यामध्ये गांडूळ खत, कुकुट पालन, शेळी पालन, रेशीम उद्योग, सौर उर्जा वापरुन भाजीपाला सुकविणे, मधुमाशीपालन, फुलशेती, मत्सव्यवसाय व इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.यासोबत शहराच्या जवळील गावामध्ये कृषी पर्यटणाची बाजारपैठ उपलब्ध आहे अश्या सर्व शहरांच्या अवती भवती कृषी पर्यटणाचे जाळे वाढविता येईल.

शेतीमध्ये सर्वात महत्वाचा परंतु सर्वात दुर्लक्षीत राहिलेला घटक म्हणजे महिलांचा सहभाग. पाणी आणि महिलांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. पाण्याची खरोखर बचत करावयाची असेल तर त्यात प्राधान्याने महिलांचा विचार व्हावयास पाहिजे. प्रामुख्याने शेती आणि घरगुती वापरात मोठया प्रमाणात पाणी वापरले जाते. या पाणी वापरामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग मोठा असतो. जलसाक्षरतेमध्ये प्रामुख्याने महिला व शालेय विद्यार्थ्याचा सहभाग झाला पाहिजे. प्रचार आणि प्रसाराच्या मोहिमे मध्ये महिलांना अग्रक्रमाने सहभागी करुन घेतले पाहिजे. महिलांच्या बचत गटाना मोठया प्रमाणाम प्रोत्साहन देऊन जबाबदारी दिली पाहिजे. याकरीता शासनाने पाणी बचत करणा-या महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहनपर पुरस्कार दिले पाहिजेत.

पाण्या विषयीच्या प्रशिक्षणात कृषी खात्याच्या आत्मा सारख्या संस्था कार्य करीत आहेत. या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार व प्रसार करुन बचत गटाची भुमिका पाण्यासारख्या विषयाकडे वळवल्यास मदतच होत आहे. आत्मा आणि वाल्मी सारख्या संस्थेचे संयुक्त कार्यक्रम आखून जल साक्षरतेचा मंत्र जन-जन पर्यत पोहचविल्या जाऊ शकतो. शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण इतर घटकात वापरलेल्या पाण्याच्या गरजेपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. त्यामुळे शेतातील पाण्याचा वापर कार्यक्षम पध्दतीने के ल्यास पिकाच्या पाण्याच्या गरजे नुसार त्यांना योग्य पध्दतीने मोजून पाणी दिल्यास अधीक उत्पादन प्राप्त करण्यासोबतच अधीकाधीक क्षेत्र सिचनाखाली आणल्या जाऊ शकते. त्यामुळे शेतात पाण्याची बचत करणे ही आता काळाची गरज आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या डोळयात पाण्याचे थेंब आणले आहेत. त्याची व्यथा त्यालाच निस्तरावयाची आहे. स्वप्रेरणेने जागृत झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी जलसाक्षरतेचा मंत्र लोकापर्यत पोहचविण्यासाठी वाल्मीचे मित्रत्व स्विाकारले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची जलक्रांती घडवून आणण्याचे महत कार्य मागील अनेक वर्षपासून सुरु आहे. यात बाहय भूमिका किंवा बघ्याची भुमिका घेउन चालणार नाही. सर्व शेतकरी बंधु आणि भगीनी यांनी आप आपल्या गावापासून नव्हे तर कुटूंबापासून या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे. आता पाण्याची उपलब्धता आणि वापर याच्यात सांगड घालावयची वेळ आलेली आहे. अन्यथा भविष्यात पाणी यावर मोठे प्रश्न लागायला वेळ लागणार नाही. यापुढे कालवे, बंधारे बांधून के वळ पाण्याचा साठा निर्माण करणे पुरेसे नाही त्यासाठी पाण्या सारख्या अत्यंत दुर्मीळ स्त्रोताचे जतन करणे, जलसंधारण वाढविणे व परीणामकारक पाणी व्यवस्थापनाची खरी गरज आहे. सिंचन व्यवस्थापन हे शेतकऱ्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देणारे व त्यांना अधीक जबाबदार करणारे साधन आहे. त्यासाठी त्याना पाणी वापर संस्था हे एक व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे.

पाणी वापर संस्थानी आता शेतकरी व शासन यांच्यातील दुवा किंवा मध्यस्थ म्हणून काम करणे अत्यंत जरुरीचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन कार्यक्षम व्हावे असे सर्वाना वाटते परंतु स्वत:वर पाळी आली की सुरवात दुसऱ्यापासून व्हावा ही प्रवृत्ती सर्वत्र दिसते. जास्त पाणी देणे म्हणजे जास्त उत्पादन हा गैरसमज काढून टाकावा लागेल. पाटात व शेतात खळखळून वाहणारे पाणी अमर्यादित आहे अशी सर्वाची भावना झाली आहे. जल संपत्ती निर्माण करण्या बरोबरच तिच्या कार्यक्षम वापर करणेवरही लक्ष पुरविणे आवश्यक आहे. यापुढे पाण्याचा वापराचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्राहकांना विश्वासात घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक इच्छा शक्ती निर्माण करुन पाणी वाटपामध्ये लोकांचा 100 टक्के सहभाग वाढवावा लागेल तरच शेवटच्या (टेलच्या) शेतक-यास पाणी मिळणे शक्य होईल हे जर के ले नाही तर स्वातंत्र्यपुर्वी ज्या प्रमाणे अन्यधान्य आयात करावे लागत होते त्या प्रमाणे पाणी आयात करावे लागेल.उपलब्ध जलसंपत्तीचा उपयोग केला तरी महाराष्ट्रातील 42 टक्के शेती कोरडवाहू राहणार. चितळे आयोग. त्यासाठी सर्व पिकाची कमी पाण्यात उत्पाकता वाढविणे हे अत्यंत गरजेचे आहे.

यापुढे शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था मोठया प्रमाणात स्थापन कराव्यात व शासनाने त्यांना घनमापन पध्दतीने पाणी मोजून द्यावे असे चितळे आयोगाने सुचविले आहे. आपण सर्व गोष्टी मोजून घेतो परंतु अजुनही आपली पाणी मोजून घेण्याची मानसिकता तयार झाली नाही. पाणी वापर संस्थेस घनफळावर आधारीत पाणीपुरवठा करण्याचे धोरण शासनाने अवलंबलेले आहे. ते शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून अत्यंत चांगले आहे. यापुढे पाणी मोजण्यासाठी विविध उपकरणे पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रात बसवली जाणार आहेत त्याचा वापर शेतक-यांनी करुन घ्यावा. पाणी मोजण्याचे प्रशिक्षण वाल्मी संस्थेद्वारे देण्याचे काम मोठया प्रमाणावर चालू आहे.सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा 2005 अस्तीत्वात आला आहे.शासनाने त्याचे नियम देखील 2006 मध्ये जारी केलेले आहे. आता कायद्यान्वये पाणी शेतक-यांच्या हक्काचे आहे त्यावर आपला हक्क स्थापीत व्हावा यासाठी सर्व शेतकऱ्यांनी जागृत होणे आवश्यक आहे. पाण्याचा बंदोबस्त करण्यास संस्थागत व्यवस्था सुचविण्यात आली आहे. सामुहिक रित्या पाण्याचे व्यवस्थापन आत पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून शक्य आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी करुन घ्यावा व आपल्या पाणी वापर संस्था आर्थीक दृष्टया सक्षम करुन पाण्याचा सुयोग्य वापर करावा.

सामाजिक पैलु :
1. पाणी उपलब्धता व उपयोग
2. महिलाचा पाणी व्यवस्थापनेत सहभाग.
3. शेतक-याचा सिंचन व्यवस्थापनेत सहभाग.
4. व्यापारी
5. व्यवस्थापन - संस्था
6. गरीबी-आर्थीक
7. साक्षरता -
8. उत्पादकता - कृषि
9. प्रचार - प्रसार.

बा. मा. शेटे, औरंगाबाद , मो : 9421382215

Path Alias

/articles/paanai-vaapara-sansathaa-va-saamaajaika-paailauu

Post By: Hindi
×