पाणी शुध्दीकरण उपकरणे व विविध पध्दती


शुध्द पाण्याची गरज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच आहे. ग्रामीण भागात तर फारच कठिण परिस्थिती आहे. नद्या -तलाव - विहीरी यांचे पाणी पावसाळ्यात उपलब्ध होते तेही निसर्गाच्या लहरीनुसार. पण ते शुध्द व पिण्यायोग्य असेलच याची खात्री कोण देणार ? शहरातही, सार्वजनिक ठिकाणी म्हणजे कार्यालये, इस्पितळे, शाळा महाविद्यालये, रेल्वे किंवा बस स्थानके अशा सर्वच ठिकाणी सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही त्या त्या ठिकाणच्या नगरपालिकांची जबाबदारी आहे.

जगाच्या पाठीवर आपण कोणत्याही भागात राहात असलो, तरी हवामानाच्या कमी अधिक उष्णतामानातील चढउतारानुसार माणसाची पाण्याची गरज कमीजास्त होत असते. परंतु सर्वच दैनंदिन व्यवहारांसाठी आणि मुख्य म्हणजे पिण्यासाठी पाण्याची जरूर असतेच. माणसांप्रमाणे जनावरांनाही ती असते.

परंतु बदलत्या ऋतुमानाप्रमाणे, ठिकठिकाणी पाण्याची उपलब्धतासुध्दा कमीजास्त होते. शहरी व निमशहरी भागात जेथे मोठ्या टाक्यातून नगरपालिकामार्फत नळाने पाणीपुरवठा केला जातो, तेथेही विजेच्या भारनियमनानुसार कमीजास्त दाबाने व विशिष्ट वेळीच पाणी मिळू शकते. पाणीपुरवठा व त्याचे शुध्दीकरण करण्याकरिता संबंधित नगरपालिका लाखो रूपये खर्च करीत असते. यापैकी अधिकांश खर्च बांधलेली धरणे व त्यांची देखभाल, कालवे, पाण्याच्या टाक्या व पाणी जोड नलिका आणि त्यांची व्यवस्थित देखभाल याद्वारे पाणी - शुध्द पाणी - उपलब्ध करून देण्यावर होत असतो. पुरवठा केले जाणारे पाणी पूर्णपणे सुरक्षित व पिण्यायोग्य करणे व ते शेवटपर्यंत तसे राखणे याकरिता प्रचंड यंत्रणा कायम कार्यरत ठेवावी लागते. यामध्ये जरासुध्दा दुर्लक्ष किंवा ढिलाई झाली तर ते निरपराध सामान्य माणसासाठी जीवघेणे ठरू शकते. योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण न केल्यास, गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ यांसारख्या रोगांची साथ येते व प्रदूषित हवा पाण्याच्या प्रसारामुळे झपाट्याने पसरते.

पाणी सुरक्षित करण्याचे उपाय :


शुध्द पाण्याची गरज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच आहे. ग्रामीण भागात तर फारच कठिण परिस्थिती आहे. नद्या -तलाव - विहीरी यांचे पाणी पावसाळ्यात उपलब्ध होते तेही निसर्गाच्या लहरीनुसार. पण ते शुध्द व पिण्यायोग्य असेलच याची खात्री कोण देणार ? शहरातही, सार्वजनिक ठिकाणी म्हणजे कार्यालये, इस्पितळे, शाळा महाविद्यालये, रेल्वे किंवा बस स्थानके अशा सर्वच ठिकाणी सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही त्या त्या ठिकाणच्या नगरपालिकांची जबाबदारी आहे. पण प्रदूषणाच्या विळख्यात सर्वच सापडल्यामुळे, नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. आणि शहरी भागातील सांपत्तीकदृष्ट्या सुस्थितीत असलेले नागरिक सार्वजनिक नळातून येणार्‍या पाणी पुरवठ्याच्या शुध्दतेवर विश्वास न ठेवता, घराघरात स्वत:ची छोटी पाणी शुध्दीकरणाची व्यवस्था करणारी खर्चिक यंत्रे बसवून घेतात.

.यामागे आपल्या कुटुंबातील कुणाला दूर्षित पाण्यामुळे त्रास होऊ नये हाच मुख्य विचार असतो. बाजारात मोठमोठ्या नावाजलेल्या कंपन्यांची ही खर्चिक व आकर्षक दिसणारी शुध्दीकरणाची साधने शुध्दीकरणाबाबत किती प्रभावी ठरतील याचा तांत्रिक विचार केला जातोच असे नाही. वेगवेगळ्या कंपन्यांमधील या साधनांमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वापरलेले असते. त्या प्रत्येक पध्दतीला तिचे स्वत:चे गुण-दोष आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक प्रकारच्या शुध्दीकरण उपकरणाबरोबर कोणत्या ना कोणत्या प्रयोगशाळेच्या अहवालाचा दाखला दिला जातो. परंतु त्याकरिता, राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त अशी कोणतीही प्रयोगशाळा किंवा तेथील गुणवत्ता तपासणी अनिवार्य करण्याचे काम अद्याप तरी कायदेशीररीत्या झालेले नाही.

आवश्यक अशी मानके घातली गेलेली नाहीत. त्यांना अंतिम मान्यता मिळावी यासाठी अनेक वर्षे नुसती प्रक्रिया चालू असल्याचे सांगितले जाते. निश्‍चित राष्ट्रीय मानकाअभावी कोणत्याही खर्‍याखोट्या प्रमाणपत्राचा जाहीरातींमध्ये आधार घेतला जातो. या शुध्दीकरण साधनाद्वारे मिळणार्‍या पाण्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला जातो.या बाबतीत, देशातील बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणार्‍या ५० कंपन्यांनी एकत्र येऊन वॉटर क्वालिटी असोसिएशन स्थापन केली आहे. आता आरोग्य मंत्रालय, भारतीय मानक संस्था यांच्याशी चर्चा करून, जुलै २००९ अखेर, शुध्द पाण्याची हमी देणारी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. देशातील पाण्याची गुणवत्ता समजण्याची जागृती यावी हे कामही कृती समिती करणार आहे.

वर म्हटल्याप्रमाणे या साधनातील यंत्रणेला स्वत:चे जे गुणदोष असतात, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल. सर्वसाधारणपणे पुढील पध्दतीद्वारे शुध्दीकरण यंत्रे काम करतात.

१. पाण्यातील जंतू मारण्याकरिता, क्लोरिन अथवा आयोडिन या रसायनांचा वापर.
२. जंतूंच्या निर्मूलनासाठी अतिनीस Ultra violate किरणांचा उपयोग.
३. शुध्दीकरणासाठी ओझोन वायूचा वापर.
४. पाण्यातील क्षारांचे प्रमाण कमी करण्याकरिता इलेक्ट्रोलिसिस (electrolysis) किंवा आयोनएक्सचेंज (Ionexchange) या तंत्रांता उपयोग.
५. पाण्यातील जंतू, विषाणू व क्षार नष्ट करण्याकरिता, रिव्हर्स ओस्मोसिस (reverse osmosis) तंत्राचा वापर करताना, सूक्ष्म छिद्रांच्या मेंब्रेनचा वापर.

या प्रत्येक पध्दतीत आपापले गुणदोष तर आहेतच, पण काही उणीवासुध्दा आहेत -

१. अतिनीलकिरण : अल्ट्राव्हायोलेट रेजचा वापर -


या प्रकारच्या यंत्रणेमध्ये, तीन टप्प्यात पाणी शुध्दीकरण केले जाते -

अ - अ‍ॅक्टिव्हेटेड कार्बन फिल्टरचा उपयोग करून पाणी गाळले जाते. त्यामुळे पाण्यातील धुलिकण, बारीक रेती किंवा कचरा दूर केला जातो.

ब - नॅनो सिल्व्हर कोटेड कार्बन फिल्टरद्वारा पाण्यातील अनावश्यक चव-वास-रंग यावर नियंत्रण ठेवून.

क - ११ वॅटचे खूप ताकद असलेले यु.व्ही.दिवे वापरून पाण्यातील जंतू व विषाणू यांना मारून - दिव्याची शक्ती संपली की एक धोक्याची सूचना देणारी घंटेसारखी (Alarm) व्यवस्था यात अंतर्भूत असते.

फायदे : १. यु.व्ही. चेंबरमध्ये, रेडिएटरच्या साहाय्याने, सूक्ष्म जिवाणू - विषाणू मारले जाऊन त्यांची पुर्ननिर्माणशक्ती नष्ट केली जाते.

२. पाण्यात कोणतीही नवीन अपायकारक किंवा उपायकारक रसायने किंवा प्रक्रियेद्वारे कोणतीही सहउत्पादने मिसळली जात नाहीत्

३. पाण्यातील मूळ खनिज घटक बदलत नाहीत.

४. जंतू मारण्याची प्रक्रिया होण्यासाठी काही सेकंद पुरतात. पण या यंत्रणेतील काही त्रुटी मात्र लक्षात घ्याव्या लागतील.

उणीवा : १. जंतू किंवा विषाणू मारले जातात, पण पाण्यापासून वेगळे केले जात नाहीत. काही कालावधीनंतर ते पुन्हा सक्रिय होण्याची दाट शक्यता असते.

२. मूळ पाणी जर खूपच अस्वच्छ किंवा पावसाळ्यात अतिशय गढूळ झालेले असेल, तर दोन वेळा फिल्टर वापरूनही ते पुरेसे स्वच्छ होत नाही.

३. वीज उपलब्ध नसेल तर ही यंत्रणा चालू शकत नाही.

४. यु.व्ही. ट्यूबची शक्ती कालांतराने हळूहळू कमी होत जाते. गढूळपणाने ती कमी होऊ शकते.

५. वार्षिक देखभाल खर्च बराच होतो. मुळात थोडे खर्चिक वाटणारे हे यंत्र यु.व्ही ट्यूब, फिल्टर करण्यासाठी वापरलेले विशिष्ट प्रकारचे फिल्टर यामुळे देखभाल खर्च वाढत जातो.

२. आयनची अदलाबदल :


आयन एक्सचेंज पध्दतीचा उपयोग करून उपकरणे तयार केलेली आढळतात. या पध्दतीचा उपयोग मुख्यत्वे पाण्यातील अतिरिक्त क्षारांचे प्रमाण कमी करण्याकरिता होतो. त्याकरिता रेझिन्सचा वापर केला जातो. ज्या ठिकाणच्या पाण्यात, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम कार्बोनेट्स व बायकार्बोनेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्या पाण्यातील मॅग्नेशियम व कॅल्शियम या क्षारांच्या बदली सोडियमचे क्षार तयार होतात व पाण्याची कठीणता - Hardness कमी केली जाते. याच प्रकारच्या रेझिन फिल्टरद्वारा अन्य धातूंचे क्षार (उदा. लोह, तांबे, शिसे, बेरियम, रेडियम, नायट्रेटस्) कमी करण्याचा दावा केला जातो. काही फिल्टर्सद्वारा अर्सेनिक व सेलेनियमच्या धोकादायक क्षारांचे प्रमाण मर्यादेत ठेवण्याची जाहिरातही केली जाते.

ही आयन अदलाबदल पध्दती व अपायकारक जंतूंचा किंवा विषाणूंचा नाश करणारी यंत्रणा जोडीने वापरली जाते. त्यामुळे पाणी शुध्दीकरण यंत्रणेच्या किंमतीत खूपच वाढ होते व ती सर्वसामान्य ग्राहकाच्या आवाक्याबाहेर जाते.

३. रिव्हर्स ओस्मोसिस : उल्टे अभिसरण -


या पध्दतीचा विचार करण्यापूर्वी ओस्मोसिस (Osmosis) म्हणजे काय हे पाहणे योग्य ठरेल. या पध्दतीचा शोध १७४८ मध्ये लागला. एखाद्या द्रव पदार्थाचे (उदा.पाणी) वहन जर सेमीपरमिएबल मेंब्रेनमधून दुसर्‍या ताकदीच्या द्रावणात केले गेले तर त्या प्रक्रियेला ओस्मोसिस असे म्हणतात.

याच प्रक्रियेत अधिक संशोधन केल्यावर रिव्हर्स ओस्मोसिस ही प्रक्रिया तयार झाली. ओस्मोसिसमध्ये, कमी ताकदीचे द्रव सेमिपरमिएबल मेंब्रेनच्या माध्यमातून अधिक ताकदीच्या द्रावणामध्ये पाठविले जाते, तर रिव्हर्स ओस्मोसिसमध्ये यांत्रिक दाबाचा उपयोग करून ही प्रक्रिया उलट दिशेने केली जाते. म्हणजेच, अधिक ताकदीच्या बाजूकडून सेमीपरमिएबल मेंब्रेनमधून कमी ताकदीच्या द्रवाकडे पाठवले जाते. Solution of higher concentration semi permiable membrane solution of lesser concentration.

या उलट्या अभिसरणाच्या - रिव्हर्स ओस्मोसिसचा - पध्दतीचा उपयोग प्रथम पाणबुडीमध्ये केला गेला. पाणबुडीमधील पाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता ही पध्दत विकसित करण्यात आली. या प्रक्रियेत, सर्वसाधारणपणे, पाणी अगदी सूक्ष्म अशा जाळीतून पडद्यातून काढले जाते. ही जाळी एका प्रभावी फिल्टरचे काम करते. आणि शुध्द पेयजल निर्माण केले जाते. दूषित पाणी हे या जाळीच्या एका बाजूला ठेवले जाते. आणि ते रोखण्यासाठी दबाव पैदा केला जातो. तर उलटी प्रक्रिया करून अभिसरण केले जाते. त्यामुळे अगदी शुध्द पाण्याचा पुरवठा केला जातो परंतु या पध्दतीला काही आक्षेप घेतले जातात. ते असे -

१. पाण्यातील सर्व नैसर्गिक खनिजे व इतर आरोग्यदायी घटक या प्रक्रियेमुळे काढून टाकले जातात.

२. या प्रक्रियेत सुमारे ८० टक्के पाणी वाया जाते व फक्त २० टक्के पाणी पिण्यायोग्य राहते.

३. मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा तुटवडा असतो हे लक्षात घेतले, तर पाण्याचा अपव्यय होतो, हे लक्षात घ्यावे लागेल.

४. या यंत्रणेला सूक्ष्म व सतत देखरेखीची गरज असते. शुध्दीकरण करणार्‍या जाळीच्या सूक्ष्म रंध्रातून किटाणूंची वाढ होण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम जाळीच्या क्षमतेवर होऊ शकतो.

५. सूक्ष्म रंध्रांचा आकार सूक्ष्म राहिला नाही, तर अपेक्षित परिणाम साधला जात नाही व जाळी बदलावी लागते. ती खूपच महाग असते.

६. जाळीची क्षमता किंवा उपयुक्तता संपल्याची कोणतीही सूचना आपोआप मिळत नाही. आता काही सुधारित उपकरणांमध्ये अशी सूचना मिळण्याची सोय केली आहे.

७. या सर्वच खर्चिक यंत्रणेची खूप काळजी घ्यावी लागते. काही कारणाने जर यंत्रणेतील फिल्टर्सना - Active carbon filters भेगा पडल्या, तर दूषित पाण्याचा पुरवठा केला जाण्याचा धोका संभवतो.

४. कॅण्डल फिल्टर्स :


या पध्दतीत सिरॅमिक - चिनी माती - कँडल्समधून पाणी झिरपते. पाण्यातील गढूळपणा व क्लोरिनचे प्रमाण काढून टाकले जाते. त्यामुळे, गढूळ पाणी निर्मल दिसू लागते. परंतु या कँडल फिल्टर्समुळे अतिसूक्ष्म जिवाणू काही फिल्टर होत नाहीत. उलट कँडल फिल्टर्स हँ किटाणूंचे माहेरघर होऊन जाते. त्यामुळे, या फिल्टर्सची नियमित साफसफाई करणे अत्यंत आवश्यक असते. सुरळीत व नियमित देखभाल करूनही मूळ पाण्यातील सेंद्रीय किंवा असेंद्रीय घटक व सिस्टस् (गळू) काढून टाकले जात नाहीत.

या यंत्रणेची किंमत फार कमी असल्यामुळे इतर महागड्या यंत्रणांच्या तुलनेत स्वस्त वाटते. मूळ जलस्त्रोत फारसा दूषित नसेल, तर हे कँडल फिल्टर्स लाभकारक ठरू शकतात.

५. नळाला लावण्यायोग्य फिल्टर्स - आयोडिनचा उपयोग :


या प्रक्रियेत रेझिन तंत्रज्ञान वापरले जाते. पाणी रेझीनमधून हळूहळू वाहात जाते व त्याबरोबरच त्यामध्ये आयोडिन मिसळले जाते. हानिकारक किटाणू नष्ट होतात. या यंत्रणेला वीजपुरवठ्याची गरज नसते. परंतु सेंद्रीय किंवा असेंद्रीय अशुध्दता किंवा सिस्टस् नष्ट होत नाहीत. यात वापरले जाणारे आयोडिन हे लाल - तपकिरी स्वरूपातील मूलद्रव्य असून घसा,डोळे, त्वचा या सर्वांना त्रासदायक ठरू शकते. त्याला फार त्रासदायक असा एक उग्र दर्प असतो. त्यामुळे आयोडिनचा वापर खूप जपून करावा लागतो. या निमित्ताने, आयोडिनबद्दल थोडी अधिक माहिती देणे योग्य ठरेल.

सन १८११ मध्ये, आयोडिन या मूलद्रव्याचा शोध कर्टिस या संशोधकाने लावला. मूलद्रव्यांच्या यादीतील, हॅलोजन गटातील, आयोडिन हे मूलद्रव्य सर्वात जास्त अणुभाराचे (१२६.९२) आहे. सामान्य तपोमानात, आयोडिन घन स्वरूपात असले तरी तपोमानातील थोड्याशा बदलानंतर ते थेट वाफ स्वरूपात जाते. त्याचा दर्प अतिशय उग्र असतो. ११३.४ सें. तपमानात आयोडिन घन स्वरूपातून द्रव स्वरूपात जाते व १८४.० सें. हा त्या द्रवाचा उत्कलन बिंदू आहे. त्यावेळी आयोडिन जांभळट रंगाच्या वाफेच्या रूपाने व विशिष्ट उग्र दर्पामुळे लक्षात राहते. त्याच्या अनेक उपयोगांपैकी जखमेच्या निर्जंतुकीकरणासाठी ते antiseptic म्हणून वापरले जाते. गलगंड या रोगाच्या प्रादुर्भाव काही डोंगराळ भागात प्राधान्याने आढळतो. त्या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्यात हे मूलद्रव्य फार कमी प्रमाणात किंवा जवळजवळ नसतच. परंतु जे पोटात जाणे विशिष्ट प्रमाणात आवश्यक असते. त्यामुळे गलगंडाच्या उपचारांमध्ये आयोडिनचा अंतर्भाव केलेला असतो. भारतात सरसकटपणे आयोडिनसुक्त मिठाची सक्ती केलेली आहे. कारण प्रत्येक माणूस रोज मीठ खातोच. त्यामुळे ते आपोआप पोटात जाते. असे करणे योग्य की अयोग्य हा एक चर्चाविषय झालेला आहे.

पाणी शुध्दीकरणाकरिता आयोडिनचा उपयोग पहिल्या महायुध्दाच्या वेळी, म्हणजे सन १९१४ मध्ये करण्यात आला. त्यामुळे सैनिकांना जंतुमुक्त पाणी मिळण्याची सोय झाली. ७ टक्के टिंक्चर आयोडिनचे ५ मि.ली. घवण १४० लिटर पाणी जंतुमुक्त करू शकते. या प्रक्रियेला सुमारे १५ ते ३० मिनीटे इतका कमी वेळ लागतो. एैनवेळी उपयोग करायचा असल्यास, ते आयोडाइड या मूलस्वरूपात वापरता येते. आयोडिनच्या उपयोगामुळे पाण्यातील सर्व अपायकारक जंतू व विषाणूंचा (व्हायरस) नाश होतो. आयोडिनचा थेट उपयोग पाणी शुध्दीकरणाकरिता करता येतो -

१.दोन टक्के टिंक्टर आयोडिन या द्रावणाचे ४ ते ५ थेंब फारसे गढूळ नसलेल्या २ ते ३ लिटर पाणी शुध्द करण्यास पुरेसे होतात.

२. अगदीच आणीबाणी असेल, व दुसरा कोणताच उपाय नसेल, तेव्हा आयोडिनचे खडे थेट पाण्यात शुध्दीकरणाकरिता वापरता येतात. वास्तविक थोड्या पाण्यात त्याचे द्रावण करून ते पाण्यात मिसळून व सुमारे तासभर थांबून मगच ते पाणी वापरणे सर्वात योग्य ठरते.

आयोडिनच्या वापराबाबत काही विशेष सूचना ध्यानात घ्याव्या :


अ. आयोडिनचे द्रावण गडद रंगाच्या काचेच्या बाटलीत ठेवावे. उन्हापासून व जास्त प्रकाशापासून दूर ठेवावे. तसेच ते काही प्रमाणात विषारी असल्याने लहान मुलांच्या सहजपणे हाती लागू देऊ नये.

ब. काही व्यक्तींना आयोडिनची अ‍ॅलर्जी असू शकते. विशेषत: ज्यांना थायरॉइड ग्रंथांबाबत काही अडचणी असतील, त्यांना हा जलशुध्दीकरणाचा प्रकार मानवत नाही.

क. गर्भवती महिला व अगदी लहान मुले यांच्यासाठीही आयोडिनचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

ड. आयोडिनच्या गोळ्या (tablets) योग्य त्या सूचनांप्रमाणे वापराव्या.

जलतरण तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीसुध्दा आयोडिनचा वापर करता येतो. परंतु क्लोरिनपेक्षा आयोडिनचा वापर १० पटीने महाग पडतो. त्याचे प्रमाण ५ भाग प्रतिदशलक्ष लिटरपेक्षा जास्त होता कामा नये.

आयोडिनच्या वाहतुकीकडेसुध्दा विशेष काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. कारण ते तापमानातील बदलामुळे फार लवकर द्रव स्वरूपातून वाफ स्वरूपात जाते.

क्लोरिनचा वापर कमी खर्चिक असून त्याची परिणामकारकता आयोडिनपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे व सुरक्षितही आहे.

अवशिष्ट आयोडिनची मात्रा समजण्याकरिता ऑर्थोटोलेडिन चाचणीचा उपयोग करता येतो.

६. ओझोनचा जलशुध्दीकरणाकरिता उपयोग :


पिण्याच्या पाण्यासाठी क्लोरिनेशन करून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची पध्दत भारतात सर्वसाधारणपणे सर्वत्र वापरली जाते हे आपण यापूर्वी पाहिलेच आहे. मर्यादित स्वरूपात व्यवस्थित देखरेख केली तर सर्वात सोपी व कमी खर्चाची ही पध्दत आहे. पण क्लोरिनेशन नंतर क्रमांक लावायचा झाला, तर ओझोन (O3) चा लावावा लागेल. क्लोरिनेशनमुळे पाण्याच्या चवीत थोडासा फरक पडतो. तसेच क्लोरिनची मात्रा जास्त झाली, तर पाण्याला एक प्रकारचा दर्प येतो. जलतरण तलावातही क्लोरिनची मात्र जास्त झाली तर डोळे चुरचुरण्याचा त्रास होऊ शकतो. परंतु आयोडिन किंवा ओझोन वापरताना ही अडचण उद्भवत नाही.

ओझोन (O3) मॉलिक्युलर वजन ४८) हा एक ऑक्सिजन वायूचाच (Allptropic) स्थितीतील निळ्या रंगाचा वायू आहे. तो अत्यंत अस्थिर असून त्याचा वास किंवा दर्प फार तीव्र असतो. या वायूचा शोध सन १७८५ मध्ये व्हन मारूम (Van Marum) या शास्त्रज्ञाने लावला. कोरड्या हवेतून ४००० ते ३०,००० व्होल्टस् इतक्या उच्च दाबाच्या विजेचा वापर करून त्याने हा वायू निर्माण केला. पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर अतिशय उंचीवर आढळून येतो आणि तो अतिशय धोकादायक समजला जातो. वातावरणात जर ०.२५ भाग प्रतिदशलक्ष इतक्या प्रमाणात ओझोन असेल तर तो माणसाला अतिशय धोकादायक ठरू शकतो. हेच प्रमाण जर १.० भाग प्रतिदशलक्ष इतक्या प्रमाणावर गेले तर तो फारच घातक ठरतो. ओझोन हा गंज निर्माण करणारा अतिशक्तीशाली वायू आहे. परंतु त्यामुळे रबराचे पूर्ण विघटन होते व वनस्पतींवरही त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.

ओझोन वायूचे पाण्यात विरघळणे, सर्वस्वी उष्णता व वायूवरील दाब यावरच अवलंबून असते. त्यामुळे हे विरघळणे तसे मर्यादितच असते. निर्जंतुकीकरणाकरिता ओझोनचा उपयोग करताना एक गोष्ट लक्षात येते की, त्याची निर्जंतुकीकरणाची ताकद मात्र क्लोरिनच्या दुप्पट असते.

पृथ्वीवर उंचावर ओझोन वायूचा थर असल्यामुळे, सूर्यापासून निर्माण होणार्‍या उष्णतेवर नियंत्रण राहते. ओझोनच्या थराचे विघटीकरण आणि पुनर्स्थापन कार्य कायमच चालू असते. त्यात खंड पडत नाही.

जीवन सुरक्षा कांडी - (Life straw) आर.ओ.चा उपयोग


रेल्वे, बस इ. वाहनांमधून दूरच्या प्रवासाला जाताना, पूर्वी वाटेत खाण्यासाठी घरचा डबा - त्यात पुर्‍या - शिरा इ. सारखे थोडेसे टिकाऊ पदार्थ आणि पाण्याचा एक फिरकीचा तांब्या किंवा पुढे वॉटरबॅग येवढे घेऊन गेले की पुरेसे असे. वाटेतील स्टेशनवर मिळणारे पदार्थ विकस घेऊन खाणे फारसे हितावह मानले जात नसे. पाणी मात्र संपले तर नळावरून भरून आणून बिनधास्त प्यायले जात असे. आज तो काळ बदलला त्याबरोबर पध्दतीही बदलल्या. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण माणसांच्या मनात शंका निर्माण करते. बिनधास्तपणे घरच्या नळाचे पाणीही आता पीत नाहीत. म्हणून तर वेगवेगळी पाणी शुध्दीकरण यंत्रे वापरली जातात.

परंतु प्रवासात तर काही ही यंत्रे बरोबर घेऊन फिरता येत नाही. बाटलीबंद विकत मिळणारे पाणीही संशयाच्या विळख्यात आहेच. यासाठी एक नवे छोटे स्वत:जवळ बाळगण्यायोग्य आकाराचे व विशेष गुंतागुंत नसलेले उपकरण बाजारात आले आहे. त्याचे नाव (Life straw) - जीवन सुरक्षा नळी किंवा कांडी.

या नवीन उपकरणामुळे कोणतेही गढूळ किंवा जंतुयुक्त पाणी पिण्याची वेळ आली तर डायरिया, कॉलरा, टायफाईड, कावीळ यासारख्या अस्वच्छ पाण्याद्वारे होणार्‍या रोगांच्या जंतूंचा परिणाम होत नाही. यामध्ये शक्तिशाली आयन एक्सचेंज रेझिनचा उपयोग केलेला आसतो. तो पाण्यामधील प्रदूषणकारी पदार्थांचा निगेटिव्ह गुणधर्माच्या हॅलोजन्सचे शोषण करतो.

या उपकरणाचा आकार लांबी ३१ सें.मी. वजन फक्त १४० ते १६० ग्रॅम असून बाहेरचे आवरण जाड भक्कम अशा प्लॅस्टिसिनचे असते. त्याला मोबाईल फोनसारखी कॉर्ड लावून प्रवासात असताना गळ्यात घालता येते. अशा आकाराचे हे उपकरण व्यक्तिगत उपयोगाकरिता जवळ बाळगता येते. हा त्याचा विशेष गुण म्हणावा लागेल.

याची ठळक वैशिष्ट्ये :


१. फक्त ३१ सें.मी. लांबी व १४० ते १६० ग्रॅम बजन असते.
२. गळ्यात घालून सहज हिंडता येते, ३ वर्षे टिकू शकते.
३. एक व्यक्ती दिवसभरात साधारणत: २ लिटर्स पाणी पिते. या कांडीची सुरक्षा शक्ती सुमारे ७०० लिटर्स पाण्यापर्यंत कार्यक्षम असते.
४. त्या नळीचे एक टोक पाण्यात बुडवून ठेवून दुसर्‍या टोकाने पाणी नळीतून थेट तोंडात ओढून घेता येते. त्यामुळे हे उपकरण व्यक्तिगत पध्दतीनेच वापरता येते. सार्वजनिक कारणासाठी नाही.

७. उर्ध्वपतनाद्वारे तयार केलेले शुध्द पाणी : Distilled water -


आता आधुनिक काळात वापरात येणार्‍या यंत्राबरोबरच पाणी शुध्दीकरणाचा पूर्वीचा हमखास उपाय वाचारात घेतलाच पाहिजे. पूर्वी आजारी माणसाला, बाळंतीण व बाळ यांना पाणी उकळून गाळून प्यायला दिले जात असे. असे पाणी पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित समजले जात असे. सुमारे १५ ते २० मिनीटे उकळून घेऊन ते पाणी स्वच्छ वाटलीत किंवा पातेलीत नीट झाकून ठेवले तर २/३ दिवस वापरायला हरकत नसे. परंतु ते खूप दिवस वापरणे योग्य नसे. पण एकंदरच या प्रक्रियेला वेळ व उर्जा उपलब्ध असावी लागते. खर्चही बराच येतो. इतर कमी खर्चाच्या पध्दतींमुळे डिस्टील्ड वॉटरचा उपयोग पिण्यासाठी केला जात नाही. या पध्दतीत सर्व जंतू मरून जातात. परंतु त्याची नीट साठवणूक झाली नाही, तर पुनरूत्पादित होण्याचा संभव नाकारता येत नाही. अर्थात कोणत्याही पध्दतीने पाणी शुध्द केलेले असले, तरी त्यासाठी योग्य, स्वच्छ, सुरक्षित साठवण हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहेच.

हे डिस्टिल्ड वॉटर इतर कोणत्याही पाण्याप्रमाणे शरीरात शोषून घेतले जाते. परंतु उकळल्यामुळे त्यातील खनिज क्षार कमी होतात, आणि त्या पाण्याची चवही नेहमीपेक्षा वेगळी सपक अशी लागते. आणि तहान भागत नसल्याची भावना मनात येते. इतर पाण्यात असलेले कॅल्शियम व लोह यांचे प्रमाणही कमी होते. परंतु आहारातील इतर पदार्थांमधून ही उणीव भरून काढू शकतो. डिस्टिलेशनमुळे, पाण्यात विरघळलेली इतर द्रव्ये वेगळी होतात.

अशा प्रकारच्या पाण्याचा उपयोग मुख्यत: रासायनिक प्रयोगशाळांमध्ये, निरनिराळ्या ताकदीचे रीएजंट बनवताना होतो. तसेच, सर्व प्रकारच्या वीज साठवण्यासाठी वापरता येणार्‍या बॅटरीज (मोटार, इन्व्हर्टर्स इ.) मध्ये वापरतात. काही प्रकारच्या इंजेक्शन्स टोचताना, वैद्यकीय व्यवसायात या पाण्याच्या कुप्या (अँपुल्स) वापरतात.

भन्नाट सायकल - अ‍ॅक्काडक्ट :


पाणी शुध्दीकरण पध्दती ग्राहकोपयोगी, सोपी, फिरती करण्यासाठी जे निरनिराळे प्रयोग सुरू आहेत त्यात ब्रिटेनमध्ये कोणत्याही कृत्रिम ऊर्जेविना कार्यान्वित होणारी जलशुध्दीकरण यंत्रणा वापरून, केवळ पॅडल मारल्याने निर्माण होणार्‍या शक्तीवर चालणारी भन्नाट सायकल अ‍ॅक्काडक्ट ही तयार केली गेली आहे. यात अशुध्द पाणी भरलेल्या, सायकलला खालच्या बाजूने जोडलेल्या छोट्या टाकीतून तीन टप्प्यात पाणी शुध्द होऊन हँडलजवळील छोट्या टाकीत भरले जाते. प्रवासात असताना प्रवास करता करताच हे पाणी शुध्द होऊन जाते. परंतु या सायकलमध्ये कोणत्या प्रकारची जलशुध्दीकरण यंत्रणा वापरण्यात आलेली आहे याचा मात्र बातमीमध्ये खुलासा केलेला नाही. जेथे विद्युतशक्ती पोहोचलेली नाही अशा ग्रामीण व डोंगराळ भागात या भन्नाट बाईकचा पुढेमागे निश्‍चितच वापर करता येऊ शकतो.

Path Alias

/articles/paanai-saudhadaikarana-upakaranae-va-vaivaidha-padhadatai

Post By: Hindi
×