पाणी प्रश्न आणि त्यावरील उपाय


गेल्या वर्षी चांगला पाऊस पडून सुध्दा भूजल पातळीत वाढ झाली नाही अशा बातम्या आपण वर्तमान पत्रात वाचत असतो. असे का घडले याचा मात्र आपण गंभीरपणे विचार केलेला नाही. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रत्यक्ष दिवस कमी होत चालले आहेत. आज सरासरीने फक्त 30 ते 35 दिवसच पाऊस पडतो असे म्हणतात. पण पावसाचे दिवस कमी होवून सुध्दा पावसाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. याचाच अर्थ असा की पावसाचा वेग वाढत चालला आहे.

गेल्या वर्षी चांगला पाऊस पडून सुध्दा भूजल पातळीत वाढ झाली नाही अशा बातम्या आपण वर्तमान पत्रात वाचत असतो. असे का घडले याचा मात्र आपण गंभीरपणे विचार केलेला नाही. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रत्यक्ष दिवस कमी होत चालले आहेत. आज सरासरीने फक्त 30 ते 35 दिवसच पाऊस पडतो असे म्हणतात. पण पावसाचे दिवस कमी होवून सुध्दा पावसाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. याचाच अर्थ असा की पावसाचा वेग वाढत चालला आहे. जितक्या वेगाने पाऊस पडतो तितक्या वेगाने पाणी जमिनीत मुरत नाही. जमिनीत पाणी मुरण्यासाठी पाण्याच्या वेगावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. यासाठी एक सूत्र नेहेमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ते म्हणजे -

धावते पाणी चालते करा
चालते पाणी रांगते करा
रांगते पाणी थांबते करा
थांबते पाणी जिरते करा.


जितका वेग कमी होईल तितके चांगले. मध्यंतरी मी शिरपूरला भेट दिली त्यावेळी तिथे प्रत्येक गावात नाले रूंद केलेले, नाले खोल केलेले व प्रत्येक नाल्यावर साखळी बंधारे बांधलेले बघितले. पाऊस पडल्यावर पाणी नाल्याकडे धाव घेते व तिथेच अडून बसते यामुळे पाणी वाहण्याचा वेग शून्यावर आलेला मी बघितला. त्याचा दृष्य परिणामही बघायला मिळाला. भूजल पातळी वेगाने वाढत असलेली दिसून आली. ही बाब आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही प्रत्यक्ष डोळ्याने बघितली व ती वाढली आहे याची खात्री करून घेतली. हे कशामुळे झाले ? पाणी वाहण्याचा वेग कमी झाल्यामुळेच ना ? पावसाचा दुसरा नियमही विचारात घेणे आवश्यक आहे. कॅच द रेन व्हेअर इट फॉल्स हा तो नियम आहे.

पडलेला पाण्याचा थेंब वाहून गेला म्हणजे मग पस्तावण्याशिवाय आपण दुसरे काहीच करू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील भूजल पातळी घसरत असतांना शिरपूर सारख्या कमी पावसाच्या प्रदेशात ती वाढत आहे यावरून आपण काही बोध घेणार आहोत की नाही ? दोन वर्षांपूर्वी काही मित्रांबरोबर मी गुजराथ राज्याच्या जवळपास दोन आठवडे दौरा केला. वर्तमान पत्रात गुजराथने पावसावर विजय मिळविला आहे अशी बातमी मी वाचली. मला ती खोटी वाटत होती. कारण आपल्या राज्यात तिथल्या पेक्षा दुप्पट पाऊस पडत असतांनासुध्दा आपण जे करू शकलो नाही ते तिथे कसे घडले हा प्रश्न माझ्यासमोर होता.

आम्ही बऱ्याच खेड्यांमध्ये प्रवास केला आणि जे पाहिते ते अचंबा करणारे होते. सर्व गावकरी एकत्र आले, त्यांनी गावातले नाले हुडकून काढले, नाले रूंद केले, थोडे खोल केले आणि प्रत्येक नाल्यावर साखळी बंधारे बांधले. त्यामुळे गावातले पाणी गावातच थांबले व भूजल पातळी इतकी वाढली की तिथले शेतकरी वर्षातून तीन पिके काढावयास लागले. पाणी असल्यावर आमचे शेतकरी ऊसच पिकवतात, तुम्ही तसे कां करीत नाही असे त्यांना आम्ही विचारल्यावर आम्ही काही त्यांच्यासारखे मूर्ख नाही असे उत्तर आम्हाला मिळाले. आम्ही हा प्रश्न कशासाठी विचारला असे आम्हाला झाले. काही शेतकरी तर असे म्हणाले की आम्ही जमिनीत इतके पाणी भरले आहे की पुढील वर्षी पाऊस आला नाही तरी आम्ही तीन पिके घेवू शकू. उगीच नाही तिथला ग्रामीण विकासाचा दर 12.5 टक्क्यांवर गेला. आपल्या राज्याने करोडो रूपये खर्च करूनसुध्दा जे केले नाही ते तिथे घडून आले आहे.

गुजराथमध्ये सौराष्ट्र जलधारा ट्रस्ट नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने मेठ्या प्रमाणावर जेसीपी मशीन्स, पोकलेन्स व डंपर्स विकत घेतले व ते ज्या गावात पाहिजे त्या गावात विनामूल्य वापरायला दिले. गावकऱ्यांना फक्त डिझेलचा व ऑपरेटर्सचा भोजन खर्च करावा लागतो. या सोयीमुळे फक्त काही वर्षात दीड लाखांच्या वर गावकऱ्यांना चेकडॅम्स बांधता आले. या ट्रस्टने सिमेंट कंपन्या व लोखंडी सळ्या तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांची एक सभा घेतली व त्यांनी विनंती केली चेक डॅम्स बांधण्यासाठी कमीतकमी नफ्यात लोखंड व सिमेंट पुरवावे. त्यांनी ही विनंती मान्य केली व त्यामुळे चेकडॅम्स बांधण्याच्या कामाला विलक्षण वेग आला.

असे करण्याच्या ऐवजी आपण मोठ्या धरणांच्या मागे लागलो कारण या कामात पैसे सुटत नाहीत. पैसा खर्च झाला पण पाणी मात्र अडले नाही. जे अडले ते धनगांडग्यांच्या घशात गेले. मी तर धरणांची व्याख्याच तयार केली आहे. ती म्हणजे गरीबाकडून श्रीमंतांकडे पाणी वाहून नेण्याच्या साधनाला धरण म्हणतात. ती धरणे बांधतांना आपण एक मोठी चूक करून बसलो. पैसा नसतांना आंगाबाहेरची कामे घेवून बसलो. सगळ्या दाढ्या अर्धवट करून बसलो व त्यामुळे खर्च झाला पण अपेक्षित यश मात्र मिळाले नाही. जमलेले पाणी फक्त ऊस या एका पिकासाठी वापरले आणि त्यातून काही साखर सम्राट निर्माण करून बसलो. सर्वसाधारण शेतकरी मात्र पाण्यापासून वंचितच राहिला.

आता झाले गेले आपण विसरून जावू या. पुढे काय करायचे याचा काटेकोरपणे विचार करू या. यासाठी मी खालील प्रमाणे एक सूत्र तयार केले आहे, ते असे -

गाव तिथे गाव तळी
शेत तिथे शेततळी
नाला तिथे बंधारे
घर तिथे पुनर्भरण


गाव तिथे गावतळी :


प्रत्येक गावात तीन तळी असली पाहिजेत. एक तळे पिण्याच्या पाण्याचे, एक जनावरांसाठी व एक शेतीसाठी. या तळ्यांचा आकार काय असावा हे त्या गावाच्या गरजेप्रमाणे ठरविले जावे. या वर्षी अजूनही आपल्या हातात दोन ते तीन महिन्यांचा काळ आहे. वेळ निघून गेली नाही. क्षणाचाहि वेळ न दडवता हे काम सुरू व्हावे नसता लोकसभेप्रमाणे विधान सभाही हातातून निघून जाण्याची भिती राहील. या वर्षी पाऊस 30 ते 40 टक्के कमी पडणार आहे असे हवामान खाते सांगत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी अडविण्याच्या मागे हात धुवून लागले पाहिजे. जितके पाणी प्रत्यक्ष अडेल त्याच्या किमान पाचपट पाणी जमिनीत मुरेल. जमिनीचे पोट आपण रिकामे करून ठेवले आहे. ते आपण भरण्याचा प्रयत्न करू या. हे केले तर गावात पाणी राहील व जनावरांसाठी व माणसांसाठी छावण्या उभारण्याची, टँकर्सने पाणी पुरवण्याची गरज भासणार नाही.त्याचप्रमाणे माणसांचे लोंढोच्या लोंढे शहरांकडे धाव घेतांना दिसणार नाहीत. हे काम कृपा करून रोजगार हमीतून करू नका. तसे केले तर त्याचा फायदा आपल्या नातवांना झालेला राहील.

शेत तिथे शेततळी :


धरणांची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक लाख कोटी रूपये लागणार असा आपल्या मुख्यमंत्र्यांचा अंदाज होता. माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या मनात विचार आला, एक शेततळे खणण्यासाठी जास्तीत जास्त एक लाख रूपये खर्च येतो, असे असेल तर एक लाख कोटीत एक कोटी शेततळी तयार होवू शकतील. यामुळे शेतातले पाणी शेतातच राहील. धरणे बांधण्यासाठी, जमीन अॅक्वायर करण्यासाठी, त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी, लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी, यासाठी निर्माण होणारी आंदोलने शमवण्यासाठी होणारा खर्च करावयांची गरजच उरणार नाही. शिवाय आज शेततळे व उद्यापासून फायदे असे गणित तयार होणार. या उलट बाप धरण बांधणार व त्याचा लाभ मुलाला होणार हे काय कामाचे ? आपण अशा सर्व योजना हाती घेतो ज्यांचा फायदा झालाच तर वीस पंचवीस वर्षांनी होणार. प्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ कीन्स म्हणतो, इन द लाँग रन ऑल ऑफ अस आर डेड. जनतेला ताबडतोब लाभ आवश्यक असतो. ती इतका वेळ थांबायला तयार नसते. बरेचदा तर असे वाटते की आपल्याला प्रश्न सोडवायचेच नाहीत. दुष्काळ आवडे सर्वांना असे उगीचच म्हंटले जात नाही.

नाला तिथे बंधारा :


जे गुजराथ मध्ये घडले, जे शिरपूर येथे घडले त्यापासून आपण काही शिकणार आहोत की नाही ? महाराष्ट्र सरकारने जी. आर काढल्यानंतर शिरपूर पध्दतीची कामे महाराष्ट्रात सोळा जिल्ह्यात सुरू झाली आहेत हे निश्चितच स्वागतार्ह आहे. फक्त आता या कामांची गती वाढविण्याची गरज आहे. 2012 चा दुष्काळ महाराष्ट्राला एक मोठी देणगी देवून गेला. या वर्षी स्वयंसेवी संस्थांचे मार्फत नाल्यांमधला गाळ जितक्या प्रमाणात काढला गेला तसे आजपर्यंत कधीच घडले नाही. आपण पुढे आलो तर काम होवू शकते ही बाब या दुष्काळाने जनतेच्या मनावर बिंबवली हे ही नसे थोडके. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात, जालना शहराच्या आसपास, नागपूर जिल्ह्यातील शेलू तालुक्यात, औरंगाबाद जवळील पैठण तालुक्यात, बीड जिल्ह्यात, जळगाव जिल्ह्यात ही कामे घेवून जलसाठे वाढविण्याची जी कामे झालीत त्यांना तोड नाही. या कामात उद्योग संस्थांनी, बँकांनी खूपच पुढाकार घेतला. औरंगाबाद शहरातील देवगिरी नागरी सहकारी बँकेनी तर तीसच्या वर बंधारे बांधण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.

घर तिथे पुनर्भरण :


यासाठी चेन्नई महानगराचे उदाहरण फारच बोलके आहे. या शहराची इतकी दैन्यावस्था होती की महानगरपालिका मोठ्या मुष्कीलीने महिन्यातून फक्त एकदाच पाणी देवू शकत होती. पण महापालिका खडबडून जागी झाली व अत्यंत कमी वेळात जलपुनर्भरण अनिवार्य करून शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यात आला. आज जवळच्या धरणांमधून पाणी आणण्याची फॅशन रूढ झालेली आहे. जणू काय धरणे शहरांचे पाणी प्रश्न सोडविण्यासाठीच बांधण्यात आली आहेत. मला मुंबई शहराचे फार कौतुक वाटते. शहर परिसरात 2500 मी मी पेक्षा जास्त पडलेला पाऊस वाहून जावू द्यायचा व 70 - 80 किलोमीटर वरून पाणी आणून दुसऱ्याच्या तोंडातील घास हिरावूवन घ्यायचा. जो स्वत:च्या ताटातील अन्न खातो त्याला माणूस म्हणतात. जो स्वत:च्या ताटातील अन्न दुसऱ्याला देतो त्याला देव म्हणतात व जो दुसऱ्याच्या ताटातील अन्न हिसकावून घेतो त्याला राक्षस म्हणतात. आपण मुंबईला दीड कोटी राक्षस पोसतो आहोत की काय असा बरेचदा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

वरील चारही तत्वात एक समान धागा आहे. तो म्हणजे जलसाठे वाढविणे, नगरपालिका अनियमित पाणी पुरवठा करीत असेल तर घरातील गृहिणी काय करते हो ? एका माठाच्या ऐवजी दोन माठ भरून ठेवते. जे त्या गृहिणीला समजते ते आपल्याला का म्हणून समजू नये हो ? याला एकमात्र उत्तर आहे ते म्हणजे जलसाठे वाढवणे. जलसाठे वाढवा व पाणी प्रश्नापासून कायमची मुक्ती मिळवा हाच खरा व एकमात्र मार्ग आहे यापेक्षा सूज्ञास जास्त सांगणे न लगे.

डॉ. दत्ता देशकर, पुणे - मो : 9325203109

Path Alias

/articles/paanai-parasana-anai-tayaavaraila-upaaya

Post By: Hindi
×