पाणी कोणाचे


नगर जिल्हा एकेकाळचा अत्यंत दुष्काळी जिल्हा. त्यावर उपाय म्हणून भंडारदारा येथे प्रवरा नदीवर धरण बांधले व त्याच्या कालव्यातून सपाटीवरील नदीच्या खालच्या अंगाला असणाऱ्या श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी इ. भागाला पाणी मिळू लागले आणि एकावेळचा दुष्काळी भाग ऊस शेतीमुळे सुजलाम् सुफलाम् झाला. परंतु नदीच्या वरच्या अंगाला असलेल्या अकोला सारख्या तालुक्यातून कालव्यातून पाणी जात असे पण उंच सखल भागामुळे कालव्याचे पाणी त्यास मिळत नसे, पण आज सर्वत्र वीज उपलब्ध झाली आणि विजेवर चालणाऱ्या मोटारीद्वारे धरणातील पाणी खेचण्याचे तंत्र विकसित झाले आणि हजारो मोटारी कार्यरत झाल्या त्यामुळे धरणातील पाणी कालव्याद्वारे नदीच्या खालच्या अंगाला मिळत होते ते बंद झाले, आज 70 - 80 वर्षे जमीन विकसित केली त्यांना पाण्याचा तुटवडा भासू लागला, पाणी कोणाचे नदीच्या वरच्या अंगाचे का खालच्या अंगाचे?आमचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक मोठे चिकित्सक. प्रश्नाला सरळ उत्तर देतीलच ह्याची खात्री नसे. उत्तर द्यायच्या ऐवजी तेच प्रतिप्रश्न करत, अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरूवात - अर्थशास्त्र म्हणजे काय? त्याची व्याख्या काय? अशाने सुरू होई. पण त्यांनी व्याख्येची व्याख्या यावरच सहा व्याख्याने दिली. पुढे अर्थशास्त्रातील सैद्वांतिक विचार यावर त्यांनी चर्चा सुरू केली, त्यातील साम्यवाद व मार्क्सचे तत्वज्ञान याची चर्चा करतांना डायलेक्टीक मटेरिअॅलिझम ही संकल्पना स्पष्ट करू लागले. मार्क्सचे लिखाण तसे बोजड व समजायला कठीणच. मुले अस्वस्थ हे पाहून प्राध्यापक म्हणाले आपण प्रश्नोत्तर रूपाने हा विषय समजून घेऊ. त्यांनी प्रश्न विचारला -

एक बादलीभर पाणी आहे. हे कोणाला द्यायचे सांगा. एक अस्वच्छ, घाणीने भरलेला माणूस आहे, व दुसरा स्वच्छ माणूस आहे. पाणी कोणाला द्यायचे?

विद्यार्थी म्हणाले - अस्वच्छ माणसाला द्यायचे, तो अस्वच्छ आहे त्याला पाणी मिळाले म्हणजे तो स्वच्छ होईल. स्वच्छ माणूस स्वच्छच आहे. त्याला जरूर नाही. प्राध्यापक म्हणाले चूक - अस्वच्छ माणूस नाही तरी अस्वच्छच आहे, त्याला त्याची सवय आहे. स्वच्छ राहिले पाहिजे, तेव्हा बादलीभर पाणी त्यालाच दिले पाहिजे. विद्यार्थीही अस्वस्थ झाले. तेव्हा ते म्हणाले मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो - एक बादली पाणी आहे, ते कोणाला द्यायचे. अस्वच्छाला का स्वच्छ माणसाला. नुकतेच प्राध्यापकांनी दिलेले उत्तर लक्षात घेऊन विद्यार्थी म्हणाले स्वच्छ माणसाला.

प्राध्यापक उत्तरले. चुक. पाणी दोघांनाही द्यावे, अस्वच्छ माणसाला स्वच्छ होण्यासाठी पाणी पाहिजे व स्वच्छ माणसाला स्वच्छ रहाण्यासाठी पाणी पाहिजे. हे उत्तर ऐकून विद्यार्थी चक्रावले. तेव्हा प्राध्यापक म्हणाले - मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो - एक बादली पाणी आह. ते कोणाला द्यायचे? अस्वच्छ माणसाला? का स्वच्छ माणसाला?

विद्यार्थ्यांनी उत्तर दिले, दोघांना. त्यावर प्राध्यापक उत्तरले. चूक. पाणी कोणालाच देऊ नये. अस्वच्छ माणूस अस्वच्छ आहे. त्याला तसे रहाण्याची सवयच आहे. म्हणून त्याला पाणी देऊ नये. जो स्वच्छ आहे त्याला देऊ नये कारण तो स्वच्छ आहे. त्याला कशाला पाणी पाहिजे.

ह्या उत्तरावर विद्यार्थी चक्रावले व प्राध्यापकांना बोलू लागले, तुम्ही अस कस म्हणता? आम्ही अस्वछाला द्या म्हणलं तर तुम्ही स्वच्छ माणसाला द्या असे म्हणता, आम्ही स्वच्छ माणसाला द्या म्हणलं तर तुम्ही म्हणता दोघांनाही द्या, आम्ही दोघांनाही द्या म्हणलं तर तुम्ही म्हणता कोणालाच देऊ नका. हे अन्यायकारक आहे. ही चर्चा चक्रावणारी आहे. तुम्ही उलटसुलट कसं बोलता.

तेव्हा प्राध्यापक शांतपणे म्हणाले - ह्यालाच डायलेक्टीक मटेरियालिझम असे म्हणतात.

रोजच्या जीवनातही हेच प्रश्न पडतात, माझा मित्र गणेश तक्रार करत होता की त्याच्या कॉलनीत दोन दोन दिवस पाणी येत नाही. त्याचे म्हणणे त्याच्या कॉलनीतील सर्वजण पाणीपट्टी भरतात पण पाणी मिळत नाही. शेजारच्या झोपडपट्टीत एकच नळ आहे पण त्याला चोविस तास पाणी, पाणी कोणाचे? त्याची किंमत देतात त्यांचे का पाण्याची ज्यांना गरज आहे पण त्याची किंमत देऊ शकत नाही त्यांचे?

नगर जिल्हा एकेकाळचा अत्यंत दुष्काळी जिल्हा. त्यावर उपाय म्हणून भंडारदारा येथे प्रवरा नदीवर धरण बांधले व त्याच्या कालव्यातून सपाटीवरील नदीच्या खालच्या अंगाला असणाऱ्या श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी इ. भागाला पाणी मिळू लागले आणि एकावेळचा दुष्काळी भाग ऊस शेतीमुळे सुजलाम् सुफलाम् झाला. परंतु नदीच्या वरच्या अंगाला असलेल्या अकोला सारख्या तालुक्यातून कालव्यातून पाणी जात असे पण उंच सखल भागामुळे कालव्याचे पाणी त्यास मिळत नसे, पण आज सर्वत्र वीज उपलब्ध झाली आणि विजेवर चालणाऱ्या मोटारीद्वारे धरणातील पाणी खेचण्याचे तंत्र विकसित झाले आणि हजारो मोटारी कार्यरत झाल्या त्यामुळे धरणातील पाणी कालव्याद्वारे नदीच्या खालच्या अंगाला मिळत होते ते बंद झाले, आज 70 - 80 वर्षे जमीन विकसित केली त्यांना पाण्याचा तुटवडा भासू लागला, पाणी कोणाचे नदीच्या वरच्या अंगाचे का खालच्या अंगाचे?

कालव्याचे पाणी सहज व विपूल प्रमाणात मिळू लागले. शेतकऱ्यांनी हव्यासापोटी मिळणारे सगळे पाणी हावरटासारखे आपल्याच शेतात जिरवले. पण हेच पाणी झिरपून शेजारच्या शेतात जाऊन तुंबले आणि त्याचे शेत निकामी झाले? पाणी कोणाचे आणि त्रास कोणाला? एकाचा फायदा दुसऱ्याचा तोटा.

गणपतने आपल्या शेतात विहीर खणली आणि विहीरीला भरपूर पाणी लागले व आनंदित झाला. पण थोड्याच दिवसांनी शेजारचा सखाराम भांडण घेऊन आला. त्याचे म्हणणे गणपतने विहीर खणली व माझं पाणी त्यांनी पळवले. प्रश्न आला पाणी कोणाचे गणपतचे का सखारामचे?

नगर जिल्ह्यातील उत्तरभागात कालव्याचे पाणी आले, पण दक्षिण भाग कोरडाच राहिला. आकाशात ढग दिसतात पण पाऊस पडत नाही. वाऱ्याने ढग पुढेच निघून जातात, शास्त्राने प्रगती केली आणि त्या वांझोट्या ढगांनाही पाझर फुटेल व जिथे ढग तिथेच पाऊस पडेल अशी व्यवस्था करणे शक्य झाले. पण शेजारच्या भागाने तक्रार केली आमच्याकडे येणाऱ्या ढगांना तुम्ही आधीच अडवले व आमचा पाऊस पळवला. प्रश्न आला, ढग आणि पर्यायाने त्यातले पाणी कोणाचे?

वरील प्रश्नाने माझ्या मनात दुसरीच भिती निर्माण झाली आणि मला घाम फुटला, भारतात जो मोसमी पाऊस पडतो त्याचा उगम कुठे तरी दूर हजारो मैलावरील सागरात होतो, तेथील समुद्रावर सूर्याचे प्रखर किरण पडतात, पाण्याची वाफ होते, ढग तयार होतात व भारतातील कमी दाबाच्या प्रदेशापर्यंत वाहून येतात आणि मग भारतात मोसमी पाऊस पडतो. पण समजा त्या दूरच्या समुद्रावर चीनने ताबा मिळवला व समुद्र पाण्याची वाफच होऊ दिली नाही किंवा ढग आपल्या प्रदेशाकडे पळवले तर? अणूूयुध्द पेक्षाही अधिक संहारक? पाणी कोणाचे? समुद्राचे? समुद्र कोणाचा? आहे ना गंभीर प्रश्न?

सम्पर्क


डॉ. नीलकंठ बापट, औरंगाबाद - (भ्र : 9325619236)

Path Alias

/articles/paanai-kaonaacae

Post By: Hindi
×