पाणी हा एक समृध्द जीवनाचा पाया


आपल्या पृथ्वीवर ९७ टक्के पाणी समुद्र रूपात आहे. ते खारे असल्याने मानवी उपयोगाचे नाही. तीन टक्के गोडे पाणी आहे. आपण जलसाठ्यासाठी धरणे बांधली, हजारो एकर सुपीक जमीन आणि वृक्षसंपदा धरणात बुडाली, हजारो शेतकर्‍यांचे संसार बुडाले. आज महाराष्ट्रात ५३ मोठी धरणे आहे, १९३ मध्यम धरणे बांधली, २४१८ लघू जलप्रकल्प बांधले.

वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा ॥ असे परखड विधान संत तुकाराम महाराज अभिमानाने करतात. तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी ॥ भक्ती - ज्ञान - वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रम्हाच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते, विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रम्ह, सगुण साकार होवून, स्वत:ला तुकोबांच्या अभंग भक्ती रसात बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटते. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न यत्न करू ॥ असे म्हणत वायु, अग्नी, जल, भूमी आणि आकाश यांना आपण पंचमहाभूते मानली आहेत. वाढती लोकसंख्या, वाढता विकास, वाढती वाहने, वाढते उद्योगीकरण यामुळे आपण सर्व पंचमहाभूतांना प्रदूषित करून टाकले आहे. जलप्रदूषणामुळे वातावरणात अचानक बदल होवू लागले असून त्याचा परिणाम वेळी-अवेळी पाऊस येण्यात व जल टंचाई होण्यात झाला आहे. याशिवाय माणसाला अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पाणी हे पृथ्वीचा आत्मा आहे. अनेक प्राचीन संस्कृती नदीकाठी विकसित झाल्या व पाण्याअभावी उध्वस्त झाल्या.

आपल्या पृथ्वीवर ९७ टक्के पाणी समुद्र रूपात आहे. ते खारे असल्याने मानवी उपयोगाचे नाही. तीन टक्के गोडे पाणी आहे. आपण जलसाठ्यासाठी धरणे बांधली, हजारो एकर सुपीक जमीन आणि वृक्षसंपदा धरणात बुडाली, हजारो शेतकर्‍यांचे संसार बुडाले. आज महाराष्ट्रात ५३ मोठी धरणे आहे, १९३ मध्यम धरणे बांधली, २४१८ लघू जलप्रकल्प बांधले. त्यासाठी एकूण २५ हजार कोटी रूपये खर्च झाले. नव्याने लहान मोठी मिळून १०५५ जल प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत. एवढे करूनही आपण फक्त १८ टक्के जमिनीला बारमाही पाणी देवू शकलो. ही महाराष्ट्राच्या जलसिंचनाची परिस्थिती आहे.

देशाच्या ३२९ दशलक्ष हेक्टरपैकी १७५ दशलक्ष हेक्टर क्षेत्र पडीक व नापीक अवस्थेत आहे. महाराष्ट्राच्या एकूण ३०७ लक्ष हेक्टर पैकी निम्मे क्षेत्र खराब आहे. पिण्याचे पाणी, अन्नधान्य व भाजीपाला पिकवण्यासाठी लागणारे पाणी वाढत्या कारखानदारीला लागणारे पाणी, इंधन वीज आपण कसे आणि कोठून पुरवणार आहोत? येत्या २५ ते ३० वर्षात धरणांचे पाणी साठवण्याची क्षमता कमी होईल अशी भीती आहे. धरणाची कार्यक्षमता कमी झाली तर शहरांना पिण्याचे पाणी मिळणे अवघड होईल. शेतीला अपेक्षेएवढे पाणी मिळणार नाही. त्यामुळे मोठी भयानक परिस्थिती निर्माण होईल.

तसेच वाढता विकास व वाढत्या उद्योगीकरणामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. जगातल्या प्रत्येक देशाला आणि माणसाला भविष्यातील आपल्या विकासासाठी पाणी आणि वीज अधिक प्रमाणात पाहिजे आहे. परंतु जलस्त्रोतांचे प्रमाण झपाट्याने घटत असल्याने पाण्यासाठी तहानलेल्या लोकांच्या संख्येत चारपट वाढ होणार आहे. लोकसंख्या वाढीची तीव्रता आणि जलटंचाईचे धोके जागतिक स्तरावरील अनेक तज्ज्ञांनी दिले आहेत. भविष्यातील हे धोके ओळखूनच लोकजागृती व जलसाक्षरता झाली पाहिजे. जलटंचाईवर मात करण्यासाठी वनीकरण आणि पाणलोट क्षेत्रविकास, नैसर्गिक साधन - संपत्तीचे जतन आणि संवर्धन त्याच बरोबर जल प्रदूषण होणार नाही याची खबरदारी प्रत्येक माणसाने घेतली पाहिजे.

गावातले पाणी गावात आणि रानातले पाणी रानातच जिरवले पाहिजे. पाणलोट विकासामुळे अनेक खेडी सुजलाम सुफलाम होवू शकतात, पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी प्रदूषित करू नका, पाण्याचा काटकसरीने वापर करा त्याचबरोबर पावसाच्या पडणार्‍या पाण्याचा विचार आणि अभ्यास करून पाण्याचा उत्पादनक्षम पध्दतीने वापर करा ही बाब जनमानसात रुजवणे आवश्यक झाले आहे.

कितीही धरणे जलप्रकल्प झाले आणि नदीजोड योजना झाली तरी देशातील ५५ ते ६० टक्के शेती पावसावर अवलंबून रहाणार आहे. पूर्वी पाऊस जून ते सप्टेंबर असा नियमित पडायचा परंतु बदलत्या वातावरणामुळे आता पावसाचे दिवसही बदलत चालले आहेत. महिन्यात पडणारा पाऊस कधीकधी आठवड्यात पडतो तर महिन्याचे पावसाचे दिवस आता कमी झाले आहे. ठिकठिकाणी अतिवृष्टी होते. काही ठिकाणी तो पाठ फिरवतो असा मान्सून लहरी झाला आहे. प्रदूषणामुळे वाढते तापमान व त्याचा होणारा परिणाम यामुळे हे सारे घडत आहे.

निसर्ग आजही आपणास भरभरून देतो आहे. पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरी आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढे तो देत आहे. पण आपण पाण्याचा आदर करत नाही. अमाप पाणी उधळतो, त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. माणसाला चैनीच्या अनेक गोष्टी निर्माण करता येतील पण पाऊस निर्माण करता येणार नाही. समुद्राच्या पाण्याची वाफ करून अब्जावधी टन पाणी आकाशात चढवता येणार नाही. त्याचे ढग बनवून पाऊस पाडता येणार नाही. हे सार निसर्गच करू शकतो म्हणून अतिरेकी वापर करण्याचा अधिकार आपणास नाही. निसर्ग जे काही देतो तो परमेश्‍वाचा प्रसाद मानून त्याचे जतन, संरक्षण व नियमन करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे.

एखादा माणूस कितीही श्रीमंत असला आणि त्याने वाटेल तसा खर्च केला, कामापेक्षा अधिक पैसे अनुत्पादक व्यसने, समारंभ, यावर सातत्याने खर्च केले तर धनाढ्य माणूस कंगाल होतो. त्याप्रमाणे माणसाला निसर्गाने दिलेली जलसंपत्ती वाटेल तशी उधळली त्यामुळेच पाण्याचे बाबतीत कंगाल बनण्याची वेळ आज जगावर आली आहे. पाण्याशिवाय विकास नाही. पाणी हा विकासाचा आत्मा आहे. हा आत्मा चैतन्यशील ठेवायचा असेल तर राजस्थानच्या समाजासारखे पाण्याचे संवर्धन व पुनर्भरण करायला शिकले पाहिजे.

यातून हेच सांगायचे आहे की जलप्रदूषण करू नका, काटकसरीने पाण्याचा वापर करा, नदी प्रदूषण थांबले पाहिजे आणि जलबँक टिकली पाहिजे.

Path Alias

/articles/paanai-haa-eka-samardhada-jaivanaacaa-paayaa

Post By: Hindi
×