पाणी आणि शाश्वत आर्थिक विकास


लोकशाही असलेल्या देशामध्ये विकासाची साधने लोकांच्या अधीन असल्यास, त्या देशाची लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होते. पाणी हे एक विकासाचे महत्वाचे साधन आहे. हे साधन लोकांच्या हाती असल्यास आर्थिक विकास निश्चितपणे होवू शकतो.

लोकशाही असलेल्या देशामध्ये विकासाची साधने लोकांच्या अधीन असल्यास, त्या देशाची लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होते. पाणी हे एक विकासाचे महत्वाचे साधन आहे. हे साधन लोकांच्या हाती असल्यास आर्थिक विकास निश्चितपणे होवू शकतो. पाण्याच्या क्षेत्रात संघटित प्रयत्न व सामुहिक चळवळ उभारून हा विकास शाश्वत म्हणजे सातत्याने दीर्घकाळापर्यंत होवू शकतो. कसे ते आता विस्ताराने समजून घेवू -

कायम स्वरूपी पाण्याचा स्त्रोत प्रत्येक गावपातळीवर करणे गरजेचे आहे. या साठी पडणाऱ्या पावसाला अडवण्यासाठी जलसंधारण कार्यक्रम, लोकसहभागातून राबविणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजना, कोल्हापूर पध्दतीचे सरकारी बंधारे याची काय दयनीय अवस्था झालेली आहे हे आपण प्रत्यक्ष पहातोच आहोत.

खरी गरज आहे ती, लोकसहभागातून उभारलेल्या लोकचळवळीची. या बाबत सद्यस्थिती अशी आहे की ग्रामीण भागातील शेती ही निसर्गाच्या कृपा - अवकृपावर अवलंबून आहे. पडणारे पावसाचे पाणी हे अनियमितता वाढल्यामुळे ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे आर्थिक विकासात सातत्य रहात नाही. बरे, प्रत्येक खेडेगावाला धरणाचे पाणी नसते. असले तरी वेळेवर, खात्रीशीर आणि पुरेसे पाणी मिळत नाही. पीकाला पाण्याची गरज ही त्या पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थांवर अवलंबून असते. पिकाला नेमके या संवेदनशील अवस्थेत पाणी मिळाले तर अपेक्षित उत्पादनात वाढ होते, अन्यथा आर्थिक विकास तर दूरच रहातो, पण केलेला खर्च ही न भरून निघता आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो. हे दुष्टचक्र वाढत चाललेले आहे. त्यामुळे शेतीचे शास्त्र न समजल्याने शेती करणारा शेतकरी हा निराशेकडे झुकणे स्वाभाविक आहे.

शेतीच्या आर्थिक विकासात सातत्य ठेवण्यासाठी पाण्याची नेमकी उपलब्धता पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत असण्यासाठी नेमकी काय उपायोजना करावी हे सुचवण्याचा या प्रस्तुत लेखामध्ये रामबाण उपाय समजावून सांगत आहे. उदाहरणादाखल गहू या रब्बी हंगामातील एकशेवीस दिवस कालावधीच्या पिकासाठी पाण्याची गरज ही कृषिशास्त्रानुसार पेरणी पासून 21, 42, 63 आणि 84 व्या दिवशी अत्यावश्यक असते. अर्थात हे प्रमाण ढोबळमानाने सरासरी आहे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या अधिक होवू शकतात. हे पाणी या ठराविक दिवसाच्या पिकांच्या संवेदनशील अवस्थेत मिळाले तर उत्पादनात अपेक्षित वाढ होवू शकते.

परंतु प्रत्यक्षात असे होईलच याची खात्री शेतकरी देवू शकत नाही. कालव्याला सुटणारे पाणी आणि पिकाच्या संवेदनशील अवस्था यांचा पाहिजे तसा मेळ बसत नाही. परिणामी उत्पादन कमी होते. हा सर्व खेळ पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. पाणीच कमी उपलब्ध असेल तर काय करावे या प्रश्नालाही व्यवस्थापकीय कौशल्य उपलब्ध आहे. समजा गहू या पिकाला किमान उत्लादनासाठी चार पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे, पण प्रत्यक्षात तीनच पाणी देता येतील अशी परिस्थिती आहे. अशावेळी उत्पन्नातील सातत्य टिकवण्यासाठी या तीन पाण्याच्या पाळ्या देण्याचा कालावधी 21, 42, आणि 63 व्या दिवशी ठरवावा. आर्थिक विकासात सातत्य टिकवण्यासाठी अशा प्रकारच्या उपाय योजना प्रत्येक पिकाच्या बाबतीत अवलंब करणे गरजेचे आहे. याबाबत सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीनुसार तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पाण्याच्या संदर्भात आर्थिक विकासामध्ये सातत्य टिकवण्यासाठी खालील काही प्रभावी उपाय योजनांचा निश्चितपणे वापर करावा.

यातील महत्वाची बाब म्हणजे पीक लागवडीचा खर्च कमी कसा करता येईल ? याबाबत ज्या निविष्ठा शेतीसाठी लागतात त्या पूर्ण मात्रा हव्यातच. मात्र या निविष्ठांसाठी लागणारा खर्च बाजारमुल्याच्या तुलनेत कमी कसा करता येईल यावर भर देणे गरजेचे आहे. आता, वाढत्या महागाईमध्ये हे कसे शक्य आहे असा प्रश्न पडतो. पण कृषि तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रश्न बऱ्यापैकी सोडवता येतो. याबाबत एक उदाहरण देतो - म्हणजे हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. तो असा की, कोणत्याही पिकाच्या अधिक उत्पादनासाठी स्फूरद (फॉस्फेट) या अन्न घटकाची आवश्यकता असते.

हे स्फूरद सिंगल सुपर फॉस्फेट किंवा रॉक फॉस्फेट यातून मिळते. या खताची किंमत मागील दहा वर्षात दुप्पट ते तिप्प्ट वाढली आहे. शिवाय जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेट टाकल्यानंतर तब्बल चाळीस दिवसानंतरच ते पिकाच्या मुळाशी उपलब्ध होते. या सिंगल सुपर फॉस्फेटचा दर रूपये 24 प्रती किलो असा आहे. जर आपण साधून कृषि तंत्रज्ञानावर आधारित फॉस्फेट कंपोस्टिंग तयार केले तर हा खर्च रूपये 24 प्रती किलो वरून रूपये चार प्रती किलो एवढाच होतो. म्हणजे सहापट खर्चात बचत होते. एवढेच नाही तर जे सिंगल सुपर फॉस्फेट चाळीस दिवसांनी मुळाला उपलब्ध होते ते केवळ या फॉस्फेट कंपोस्टिंग मुळे सात दिवसात उपलब्ध होते. या फॉस्फेट कंपोस्टिंगचे प्रात्यक्षिक प्रस्तुत लेखकाने सिल्लोड तालुका, जिल्हा औरंगाबाद येथे रेणुका सोसायटी फॉर डेव्हलपमेंट तर्फे करून दाखवले आहे, ज्याचा शेतकऱ्यांना आर्थिक विकासात सातत्य टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे.

तसेच आर्थिक विकासात सातत्य टिकवण्यासाठी बीन खर्चाच्या किंवा अत्यंत कमी खर्चाच्या पाणी देण्याच्या पध्दतींचा वापर करणे ही खरे तर आजच्या काळाची गरज आहे. असे नवनवीन तंत्रज्ञान मिळवणे आणि त्याचा शेतीमध्ये सातत्याने वापर करण्याची खरी गरज आहे. स्थल विस्तार भयास्त व एकाच सिंचन पध्दतीची माहिती उदाहरणादाखल या ठिकाणी देत आहे. ती सिंचन पध्दती म्हणजे ' तरंग सिंचन पध्दती '. याला इंग्रजीमध्ये वेव्ह इरिगेशन मेथड असे म्हणतात. उदाहरणार्थ गहू या पिकासाठी सारे सिंचन पध्दती वापरतात. यामध्ये एका आड एक सरीत पाणी सोडायचे असते. तसेच एकाच वेळी एक, तीन व पाच नंतरच्या साऱ्यात पाणी सोडायचे असते.

म्हणजेच एकाच साऱ्यात जाणारे पाणी विभागून एका आड एक तीन साऱ्यामध्ये सोडल्याने पाणी संथ गतीने तीन साऱ्यात कमी प्रमाणात जात असल्याने पाण्यावर छोट्या छोट्या लाटा तंरग निर्माण होत पाणी त्या साऱ्यांमध्ये 75 टक्के अंतरापर्यंत गेले की साऱ्याने पाणी बंद करावे. यामुळे राहिलेले 25 टक्के पाणी आपोआप खालून झिरपत शेवटपर्यंत जातच असते. शिवाय एक व तीन क्रमांताच्या साऱ्यात पाणी सोडल्याने मधल्या दोन क्रमांकाच्या साऱ्यामध्ये दोन्ही बाजूने अर्धा अर्धा झिरपा मिळून दोन क्रमांकातील साऱ्यातील पिकांच्या मुळाशी आवश्यक तेवढे पाणी व हवा उपलब्ध झाल्याने पिकाचे सरासरी दुप्पट उत्पादन मिळते.

याबरोबरच पाण्याचीही 50 ते 60 टक्के बचत होते. शेतकऱ्यांना सर्व पिकांना बिनखर्ची 50 टक्के पाणी बचत व उत्पादनात वाढ हे दोन्ही फायदे मिळतात. शाश्वत आर्थिक विकासासाठी पाण्याचा असा वापर करणे म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपाययोजना ठरतो. या तरंग सिंचन पध्दतीवरून पिकाच्या वाढीसाठी जमिनीत पाणी आणि हवा असणे किती गरजेचे आहे हे प्रत्यक्ष अनुभवावरून कळून येते. विशेषत: ऊसाला डुबूक सिंचन करून जमीन खराब करून घेणाऱ्या शेतकऱ्यांनी तरंग सिंचन पध्दतीचा आवर्जून वापर करावा.

या वरून शेतीच्या शाश्वत विकासासाठी कमी पण पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाणी देण्याचे हे तंत्र वनस्पतीशास्त्राचे प्रत्यक्ष धडे देत असते. आपण विद्यार्थी म्हणून शेतात फिरल्यास ते पीक कसे उपासमार किंवा अती खाणे हे जसे माणसाच्या प्रकृतीला अपायकारक आहे, तसेच ते शेतातील पिकांनाही अपायकारक आहे, शेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन शास्त्र यासाठी समजून घेणे गरजेचे आहे.

आतापर्यंतच्या उदाहरणांवरून, शाश्वत आर्थिक विकासासाठी पाण्याचा वापर पिकाच्या संवेदनशील अवस्थेसाठीच करावा, हे मुख्य सूत्र लक्षात आले आहे.

या अवस्थेसाठी गाव तसेच शेतपातळीवर जलसंधारण उपाय योजना राबवून हा प्रश्न सामुहिक पातळीवर सोडवण्याची गरज आहे. यासाठी जलयुक्त शिवार ही लोकचळवळ व्हावी ही अपेक्षा.

डॉ. रे. भ. भारस्वाडकर, औरंगाबाद - मो : 9730093331

Path Alias

/articles/paanai-anai-saasavata-arathaika-vaikaasa

Post By: Hindi
×