पाणी आणि ग्रामनामे


जंगल अधिक असताना आणि लोकसंख्या कमी असताना या ओहोळामुळे निर्माण होणारे किंवा करता येण्यासारखे जलाशयामुळे या गावांना व शेतीला बारमाही पाणी उपलब्ध होत असावे शिवाय भूगर्भात पाणी मुरल्याने अनेक जिवंत झरेही असणे शक्य आहे. उदगीर आणि जळकोट या तालुक्यातील बहुतांश गावांशेजारी डोंगरावरून वहात येणारा एखादा ओहोळ असल्याचे दृष्टीस पडते.

(प्रस्तुत लेखकाने लातूर जिल्ह्यातील 950 ग्रामनामांचा अभ्यास सिध्द केला आहे. त्यातील पाणीविषयक ग्रामनामांची माहिती येथे देत आहोत गावाच्या नावापुढे कंसात तालुक्याच्या नावाचे आद्याक्षर दिले आहे. संक्षिप्त रूपांची ओळख - अ - अहमदपूर, उ - उदगीर, औ - औसा, चा - चाकूर, ज - जळकोट, दे - देवणी, नि - निलंगा, रे - रेणापूर, ला - लातूर, शि - शिरूर अनंतपाळ)

कोणत्याही गावाचे नाव कधी व कां पडले हे सांगणे जवळजवळ अशक्य आहे. अपवाद आधुनिक काळात वसलेली गावे जसे नेहरूनगर, वल्लभभाई पटेल नगर इ. त्यातही गावे नवीन वसवली गेली असण्यापेक्षा त्यांचे नवीन नामकरण झाले असण्याची शक्यताच अधिक आहे. असे असले तरी ग्रामनामांसंबंधात काही अनुमान करणे शक्य असते. या अनुमानप्रक्रियेत भौगोलिक परिस्थिती, इतिहास आणि संस्कृती ह्यांचे अनन्य साधारण महत्त्व असते. त्यातही भौगोलिक परिस्थितीचे महत्त्व अधिक असते, कारण सर्व समाजाला जाणवणारी तीच एक बाब सामान्य असते. एोंगरगाव, डोंगरज, डोंगरशेळकी असा नावात डोंगर असल्याचे सूचन आपोआपच मिळते आणि डोंगराळ प्रदेशामुळे त्या गावांना डोंगर हा प्रत्यय लागलेले ग्रामनाम सिध्द झाले असावे असे अनुमान करणे सहज शक्य असते.

मानवाच्या सर्व संस्कृती नदीकाठीच जन्मल्या आणि वाढल्या हे एक ऐतिहासिक सत्य आहे. पाण्याची उपलब्धता हा प्रमुख विचार गाव वसवतांना वसवणाऱ्यांच्या मनात कायम असणार हे उघड आहे. म्हणूनच बहुतांश ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करूनच वस्ती झाली असावी असे अनुमान करता येते. जल आणि संस्कृती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साहजिकच ग्रामनामातही पाणी किंवा तत्संबंधीचे शब्द असणे शक्य असते. प्रस्तुत लेखात लातूर जिल्ह्यांतील पाणीसंबंधात ग्रामनामांचा अभ्यास प्रस्तुत केला आहे. जाताजाता या जिल्ह्यातील ग्रामनामावर कन्नड भाषेचा प्रभाव असल्याचे नमूद करणे आवश्यक आहे.

हा जिल्हा सध्या प्रशासकीय दृष्टिकोनातून दहा तालुक्यांत विभागला गेला आहे. जिल्ह्यांतून बालाघाट पर्वतांच्या रांगा जातात. जिल्ह्याचा जवळजवळ निम्मा भाग डोंगराळ आहे. लातूर जिल्हा हा मांजरा नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. जिल्ह्यातून मांजरा नदी वाहते. ही नदी आणि हिच्या उपनद्या या जिल्ह्याला समृध्द करतात. रेणा, तावरजा, तेरणा, तिरू, घरणी, मन्याड, देव, लेंडी या मांजरेच्या उपनद्या या जिल्ह्याला पाणी पुरवतात. रोहिणी, मानमोडी, विराळ अशीही काही ओहोळांची नावे आहेत. एकूणच हा जिल्हा मांजरा नदीच्या खोऱ्यात मोडतो. अहमदपूर आणि जळकोट हे दोन तालुके व इतर तालुक्यांतील नदींच्या खोऱ्यातील भाग समुद्रसपाटीपासून 300 - 600 मिटर्सवर आहे, तर बाकीचा भाग हा बालाघाट पठारावर म्हणजे समुद्रसपाटीपासून 600 - 900 मीटर्सवर आहे. डोंगरावरून पाण्याचे अनेक प्रवाह वहात खाली दरीत येतात आणि मांजरेला किंवा तिच्या एखाद्या उपनदीला मिळतात. हे ओहोळ बऱ्याचवेळा अनामिक असतात तर काही ओहोळांना एखादे स्थानिक नाव असते. या ओहोळाच्या काठीच गावे वसली गेली असावीत.

जंगल अधिक असताना आणि लोकसंख्या कमी असताना या ओहोळामुळे निर्माण होणारे किंवा करता येण्यासारखे जलाशयामुळे या गावांना व शेतीला बारमाही पाणी उपलब्ध होत असावे शिवाय भूगर्भात पाणी मुरल्याने अनेक जिवंत झरेही असणे शक्य आहे. उदगीर आणि जळकोट या तालुक्यातील बहुतांश गावांशेजारी डोंगरावरून वहात येणारा एखादा ओहोळ असल्याचे दृष्टीस पडते. शासनाने या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन जागोजागी ओहोळ अडवून जलाशय निर्माण केले आहेत.

मांजरा ही नदी जिल्ह्यातून वहाते. हिलाच वांजरा म्हणतात. कदाचित वांजरा हेच मूळ नाव असावे. संस्कृतीकरण होऊन मांजरा झाले असावे. महाभारतात या नदीचा उल्लेख मंजुळा असा आहे तर पुराणात वंजुळा असा आहे. शिलालेखात मांजरा, अंजारिका असाही उल्लेख आहे. तेरणा, तावरजा, रेणा, धरणी, तिरू, देव, लेंडी, मानमोडी व मन्याड या मांजरेच्या उपनद्या या जिल्ह्याला समृध्द करतात. ह्यातील तेरणा (तगर) नदीची ओळख किमान सातवाहनकालापासून आहे. उमरगा (जि. उस्मानाबाद), औसा आणि निलंगा, या तीन तालुक्यांतील गावातच जुनी वस्ती असावी असे उपलब्ध शिलालेखावरून वाटते. हे तिन्ही तालुके तेरणेच्या खोऱ्यात येतात. सातवाहनकालीन (इ.स. चे पहिले शतक) तगर (आजचे तेर ता. व जि. उस्मानाबाद) हे तगर नदीच्या काठचे तगर माहीत होते व ते आंतरराष्ट्रीय व्यापाराकरिता प्रसिध्द होते. तगर म्हणजे आजची तेरणा. नदीच्या काठानेच पुढे वस्ती वाढत गेली असावी. औसा तालुक्याच्या उत्तरेला तावरजा व दक्षिणेला तेरणा आहे. तावरजेच्या काठच्या गावांचा उल्लेख वाकाटकांच्या (इ.स. चवथे ते सहावे शतक) शिलालेखात आहे.

नंतरच्या बदामीचे चालुक्यांच्या (इ.स. 550 ते 744), नळ राजे (इ.स. 566 ते 597), राष्ट्रकूट (इ.स. चे 752 ते 972) आणि कल्याणीचे चालुक्य (इ.स. 973 ते 1150) ह्यांच्या शिलालेखात म्हणूनच या तीन तालुक्यांतील गावांची नावे येतात. (तेरणा व तावरजेच्या नदीच्या खोऱ्याच्या - ज्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व तुळजापूर हे तालुकेही येतात ) राष्ट्रकूटांच्या शिलालेखात (इ.स. चे आठवे ते दहावे शतक) अहमदपूर व चाकुर तालुक्यातील गावांची नावे येतात. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गावांची नावे कल्याण चालुक्यांच्या (इ.स. चे दहावे ते बारावे शतक) काळाच्या आधी आढळत नाहीत.

उदगीर, दवणी, जळकोट आणि रेणापूर या तालुक्यांतील गावांची नावे उत्कीर्ण लेखात आढळून येत नाहीत. यादवकालीन ( इ.स. 935 ते 1318) एक शिलालेखात कानेगाव (उ) या गावाचे नाव सोडले तर या तालुक्यांतील कोणत्याही गावांचा उल्लेख सापडत नाही). सापडलेल्या शिलालेखावरून उमरगा, निलंगा आणि औसा या तालुक्यात प्रथम वस्ती झाली असावी. अहमदपूर, चाकूर आणि शिरूर अनंतपाळ दुसऱ्या टप्प्यात तर उदगीर, देवणी, जळकोट व रेणापूर तिसऱ्या टप्प्यात वस्ती झाली असावी, असे ढोबळ अनुमान करता येते.

पाण्याचा संबंध असलेली एकूण 87 गावे आहेत. त्यांचे प्रमाण 9.15 टक्के पडते. नदीचेच नाव असलेली 12 गावे आहेत. रेणा, तावरजा, तेरणा, देव, तिरूका, धरणी या नद्यांची नावे असलेली गावे आहेत. मांजरा नदी - वांजारवाडा (नि), वांजारखेडा (ला व शि), रेणा नदी - रेणापूर (रे). देव नदी - जेवर्जन (उ) व देवणी (दे), घरणी (चा), तेरणा - तगरखेडा (नि), तिरू - तिरूका (ज), लहान झऱ्यांच्या नावानेपण गावे आहेत - विराळ (ज), रोहिणा - चा), तुंगी (औ), आडोळवाडी (उ) (आडओहोळवाडी) ही ओहोळांची नावेपण आहेत. मन्याड आणि लेंडी नद्या या जिल्ह्यातून वहातात पण त्यांच्या नावाची ग्रामनामे नाहीत. कोणत्याही वाहत्या पाण्याला गंगा म्हणण्याची गंगापूर (ला व उ) आणि गंगा हिप्परगा (अ) ही गावे दिसतात.

वाहत्या पाण्याची नावे असलेली 12 ग्रामनामे आहेत. झरी, नदी, सेलू, डोह, ऊटि व
1. सांगवी सुनेगाव (अ) व सुनेगाव सांगवी (अ) मन्याड नदी आणि ओढा
2. कबन सांगवी (चा) कब्बु कन्नड शब्दाचा अर्थ ऊस. रोहिणी नदी ( ओहोळ )
3. तांबंट सांगवी (अ) रेणा नदी व ओढा.
4. भाट सांगवी (चा)
5. मर सावंगी (ज) (महार सांगवी) तिरू नदी आणि ओढा.
6. ढोर सांगवी (ज) दोन ओढे एकाला थोरला ओढा म्हणतात. दुसरा अनामिक
7. बेळ (ल) सांगवी (ज) तिरू नदी व ओढा
8. सांगवी घुग्गी (शि), घुग्गी सांगवी (शि) मांजरा नदीला घरणी नदी मिळते. ही दोन्ही गावे नदीच्या दोन तीरांवर आहेत.
9. वळ सांगवी (नि) मांजरेच्या एका वळणावर हे गाव आहे. म्हणून वळ हे पूर्वपद. एखादा ओढा मिळत असल्यास न कळे. वाकडी (ला) हे असेच मांजरेच्या वळणावर गाव असावे.
10. पाखर सांगवी (ला) नावावरून कदाचित Migratory Birds येत असावेत असे वाटते.
11. सांगवी (नि व रे) कोणत्याही पदाशिवाय सांगवी नावाची दोन गावे आहेत. त्यातील निलंगा तालुक्यातील सांगवी तेरणेकाठी आहे. त्याशिवाय
12. संगम (दे) नावाचे गाव पण आहे. देव नदीच्या दोन स्त्रोतांचा संगम या ठिकाणी होवून देव नदी सुरू होते. संगम हे पूर्वापार धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले गेले आहे. संगम आणि जलाशयांची नावे असलेली गावे तौलनिकदृष्ट्या प्राचीन असावीत.

नदीकाठी वस्ती करून संस्कृती निर्माण झाली. त्या वाहत्या पाण्याच्या बरोबरच नैसर्गिक किंवा मानव निर्मित जलाशय असल्याठिकाणी माणसाने वस्ती करावी हे स्वाभाविक आहे. जलाशय दर्शविणारी 32 ग्रामनावे या जिल्ह्यात आहेत. तलाव किंवा जलाशय या आशयाचे कासार, नेल, कोळ, तडाक, टाक, सर, गुळी, सरसी व होक्करणी हे प्रत्यय आहेत. कासार, तडाग, सर, सरसी ल होक्करणी हे संस्कृतोद्भव कन्नड शब्द आहेत. कोळ आणि गुळी हे कन्नड शब्द आहेत. तर तळे आणि डोह हे जलाशयाचे मराठी प्रतिशब्दही प्रत्यय म्हणून दिसतात. कासार म्हणजे तलाव, जलाशय कासार हे पूर्वपद असलेली 6 गावे आहेत. पण सर्वच ठिकाणी जलाशय असले (काही ठिकाणी नदीरूपाने) तरी तळी आहेतच असे नाही. कासार सिरशी (नि) व वाडी कासार सिरशी (नि). जिन्दावल नावाचा नैसर्गिक तलाव शासनाने आता विस्तारित केला आहे. हे नावपण इस्लामी वळणाचे दिसते. पूर्वी आणखी एखाद्या नावाने ओळखला जात असावा. सिरशी म्हणजे शक्तिश्री हे तर तलावाचे नाव नसेल ? (पहा सरसी) कासारखेडा (ला), मांजरेच्या काठी गाव आहे गावाच्या दोन्ही बाजूनी नदी वळसा घेऊन वहाते. पुढे काही अंतरावर रेणा नदी मांजरेला मिळते.कासारखेडा (ला), कासार जवळा (ला), कासार बालकुंदा (नि) नैसर्गिक तलाव आहेत. (शासनाने विस्तारित केले आहेत ). त्यावरून ग्रामनामे तयार झाली आहेत. नेल - नेलवाड (नि) वडूर नावाचा तलाव आहे. वडूर नावाचे गाव पण आहे. कोळ - रावणकोळ (ज) तडाक - ताडकी (ला) सर - सरवडी (नि) जुना तलाव आहे. शासनाने विस्तारित केला आहे. सरसी - कासार सिरशी चा वर उल्लेख आला आहेच. सरसी या जलाशयाच्या नावावरून सिरशी आले असणे शक्य आहे. पण कासार आणि सरसी ही द्विरूक्ती होईल म्हणून दुसरा पर्याय सुचविला आहे. कासार सिरशी शिवाय सिरशी (ला) व सिरशी हंगरगा (नि) अशी दोन गावे जिल्ह्यात आहेत. सारसा (ला) हे गाव पण आहे.हे गाव मांजरेकाठी आहे. (गुळी (कन्नड उ खड्डा, सरोवर - हंडरगुळी (उ) तिरू नदी आहे. टाक - टांका, टाकळी (6), टाकळगाव (6) टाकणी (1) ही सर्व गांवे तळ्यासंबंधातच असतीलच असे नाही. कारण टाक या तळ्याशिवाय टाकळी ही वनस्पतीपण आहे. बार्शीजवळील एड्ढा टाकळीची व्युत्पत्ती टेक्कली म्हणजे बावटा, झेंडा या शब्दापासून झाल्याचे ठोसर सांगतात. लातूर तालुक्यातील व देवणी तालुक्यातील टाकळी नावाची गावं मांजरेकाठी आहेत. रेणापूर तालुक्यातील टाकळगाव हे मांजरेकाठी आहे. बाकी संबंधी माहिती मिळू शकली नाही. बदामी चालुक्य विजयादित्याच्या ताम्रपत्रात रक्ततटाक असा गावाचा उल्लेख आहे. ठोसर हा उल्लेख औसा तालुक्यातील टांका या गावाचा असावा असे मानतात. ग.ह.खरे रक्ततडाग वाचतात आणि हे गाव ता. औसा असावे असे मानतात. हे जलाशय चालुक्य नृपतीने बांधल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. तळे - तळेगाव (4) जिल्ह्यात 4 तळेगाव नावाची गावे आहेत (अ.शि.शि.व दे) यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव बोरी येथे जुना तलाव व गाव मांजरा नदीजवळ आहे. तर तळेगाव दैठणा येथे नदी आहे. गेवणीतील तळेगाव येथे तलाव आहे. डोह - महांडोळ (चा), सांडोळ (चा) मोठा डोह महान डोह महांडोळ. सान सुंदर किंवा लहान डोह, सानडोह - सांडोह, ह चे ळ होते. महांडोळ हा तिरू नदीचा उगम आहे. होकर्णा (ज) हा शब्द होक्करणी या कन्नड शब्दापासून आला आहे आणि त्याचा अर्थ पुष्करणी, तळे, सरोवर असा आहे. गावात ओहोळ आहे. पण तळे सध्यातरी दिसत नाही. पूर्वी कदाचित असावे.

कुंड आणि तीर्थ हे धार्मिक पवित्र स्थळातील पाण्याच्या साठ्याला म्हणतात. बहुदा झरा असतो आणि ठिकाणी मंदिर आणि कुंड असते. जिल्ह्यात कुंड नावाची 2 गावे आहेत. बेलकुंड (औ) येथे कुंड आहे. वाकाटकांच्या ताम्रपत्रात (इ.स 455 - 480 या काळातील) वेल्पकोंडा (वेलि या द्रविडी भाषेतील शब्दाचा अर्थ शेती होता.) या नावाने या गावाचा उल्लेख आहे. त्यावरून हे गाव बरेच जुने असावे. याच ताम्रपटात डोणीथोम नावाचा उल्लेख आहे. ते आजचे धानोरा (ला) हे गाव असल्याचे ठोसर सांगतात. डोणे या कन्नड शब्दाचा अर्थ कुंड असाच होतो. स्तोम हा शब्द यज्ञासंबंधात वापरतात. यज्ञकुंड असलेले गाव असा अर्थ असावा. शिरढोण (नि) हे ढोण असा प्रत्यय असलेले गाव आहे. गावात लहान तलाव अवशेषरूपाने आजही दिसतो. कासार बालकुंदा या गावाचा वर उल्लेख आलाच आहे. एखादे कुंड असावे. कुंड चे कुंद झाले असावे असे वाटते. तीर्थ (अ), तीर्थवाडी (चा), नागतीर्थवाडी (दे), रामतीर्थ (नि) अशी तीर्थ पद असलेली चार गावे जिल्ह्यात आहेत.

समुद्र हा प्रत्यय असलेले भोईसमुद्रगा किंवा भुईसमुद्रगा नावाचे गाव रेणापूर तालुक्यांत आहे. हे मांजरेच्या जवळ आहे. मांजरेला पूर आला म्हणजे सर्व जमीन समुद्रासारखी दिसते म्हणून तिला भुईसमुद्रगा असे नाव आहे. कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवर उदगीरपासून 20 -25 कि.मि. वर होळसमुद्र म्हणून मांजरेजवळ गाव आहे. सखल प्रदेशामुळे पुराचे पाणी जमिनीवर पसरते आणि समुद्रासारखे दिसते म्हणून त्याला होळसमुद्र असे नाव आहे. भुईसमुद्रगा हेही नाव तसेच आहे. औसा तालुक्यात हसाळा नावाचे गाव आहे. त्याचा वाकाटकांच्या ताम्रपटात पासपकल्ल असा त्याचा उल्लेख आहे. पासु या कन्नड शब्दाचा अर्थ अंथरणे, पसरणे तर पक्कल शब्दाचा अर्थ सरोवर असा आहे. हे गाव तावरजेच्या काठी आहे आणि पूर आला म्हणजे सरोवरासारखे दिसत असावे म्हणून याचे तत्कालीन नाव पासपक्कल असे असावे. या गावाच्या जवळच तावरजेच्या काठी हासेगाव (औ) नावाचे गाव आहे. ते वरील अर्थाप्रमाणे पासेगाव असणे शक्य आहे. (प या ह होतो) वांगजी (औ) नावाचे गाव आहे. वाड्गम् या द्रविड भाषेतील शब्दाचा अर्थ समुद्र होतो. एखादा मोठा जलाशय असावा, त्यावरून हे नाव पडले असण्याची शक्यता आहे. गणेशवाडी (नि) या ठिकाणी कल्याण चालुक्य विक्रमादित्य सहावा याचा सेनापती भीमनाथ याने एक दगडी धरण बांधून जलाशय निर्माण केला आणि त्याला भीमसमुद्र किंवा भीमसागर हे नाव दिले होते. त्यावरून मोठ्या जलाशयाला समुद्र म्हटले जात असावे. जसे पाण्याच्या स्त्रोताला गंगा म्हणतात. महापूर (ला) हे मांजरेच्या काठी गाव आहे. मांजरेला येणाऱ्या पुरावरूनच हे नाव पडले असावे हे उघड दिसते.

पाणी शेंदण्याच्या व साठवण्याच्या वस्तुविशेषांची नावेपण गावांना दिली गेल्याचे दिसते. जसे - पोहरेगाव (रे) हे नाव आडातून विहीरीतून पाणी काढण्याच्या लोखंडी किंवा लाकडी साधनाला म्हणतात. या गावाचे हे नाव का पडले कळत नाही. हे गाव मांजरेकाठी आहे. बिंदीहळ्ळी (ला) लहान तोंडाच्या घागरीला बिंदगी म्हणतात. (मूळ कन्नड शब्द बिंदिगे) या गावाच्या तिन्ही बाजूंनी नदी आहे आणि एकच भाग जमिनीशी जोडलेला आहे. मांजरेला पूर आला म्हणजे लहानच्या चिंचोळ्या भागातूनच गावांशी संपर्क साधता येतो. म्हणूनच या गावाला बिंदगीहळ्ळी म्हणत असावेत. पल्लि, हळ्ळी शब्दाचा अर्थ गाव.

काहीवेळा नावे फसवी असतात. जळकोट (ज) हे असेच नाव आहे. गावाला जलही नाही आणि कोटही नाही. जळकोट नाव का पडले कळत नाही. स्थानिक परंपरेनुसार गावात असलेल्या महादेवाच्या मंदिरात असलेल्या कुंडाभोवती कोट होता त्यावरून हे नाव पडले आहे. बऱ्याच वेळा तलावाचे नाव असले तरी तलाव गावात दिसत नाही. कारण विकासाच्या विकृत कल्पनामुळे बऱ्याच गावात तळी फोडली गेली. उदगीर येथील दोन तळी अशीच गेल्या 30-40 वर्षात नष्ट झाली. तळ्याच्या जागी स्टेडियम होत आहे.

नदी लुप्त होते किंवा नदी आपला मार्ग अचानक बदलते. जसे परवाच कोसी नदीने मार्ग बदलून बिहारमध्ये हाहाकार उडवून दिला. मांजरा नदी ही लातूर जिल्ह्यातून जाते. सध्या लातूर हे शहर त्या नदीच्या दक्षिणेला 10 कि.मी. अंतरावर आहे. पूर्वी हे शहर नदीकाठी असावे. परंपरेप्रमाणे या गावाचे नाव रत्नापूर होते व ते मांजरा नदीकाठी होते. मांजरेनेही असाच मार्ग बदलला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लातूर रोड स्टेशनजवळ हक्कानी बाबाची टेकडी नावाची एक टेकडी आहे. त्यावर दोन-तीन लेण्यापण आहेत. त्या जागी पूर्वी राष्ट्रकुटांनी किंवा रट्टानी शहर वसविले असावे असा ठोसर यांचा अंदाज आहे. कोणत्याही कारणाने रोग, दुष्काळ इ. शहर स्थलांतरित होऊन सध्याच्या जागी आले असावे किंवा मांजरा नदीने आपला प्रवाह बदलला असावा. राष्ट्रकूट मूळचे लातूरचे असोत किंवा नसोत, त्यांची एक शाखा लातूर येथे होती हे निश्चित. पाण्याचे दुर्भिक्ष (जसे नजीकच्या भूतकाळात होते व आहे) असलेल्या ठिकाणी राष्ट्रकूट वंशांतील लोक रहात असावेत हे संभवनीय दिसत नाही. त्यावरूनही ते नदीकाठी असावे या अनुमानाला बळकटी मिळते. लातूर नावाची व्युत्पत्ती लट्टलउरू रट्टलउरू अशी असावी असे मानले जाते. रट्ट लोकांचे गाव (उरू या कन्नड शब्दाचा अर्थ गाव) लत्तलारपूर असाही लातूरचा उल्लेख आहे. त्यावरून कलबुर्गी लतिका हे एखाद्या रट्टांच्या राणीचे नाव असावे व त्यावरून लट्टलउरू हे नाव आले असावे असा कयास बांधतात.

बदामी चालुक्य विजयादित्याच्या बोरगाव औसा तालुक्यातील बऱ्याच गावांची नावे आहेत. त्यात नलंद नावाच्या नदीचा उल्लेख आहे. सध्या नलंद नावाची कोणतीही नदी औसा तालुक्यात दिसत नाही. पण नलंदनदीचा उल्लेख ज्या भौगोलिक भागाच्या वर्णनात आहे, त्या भागात नणंद नावाचे गाव आहे. हे गाव तेरणेपासून थोड्या अंतरावर आहे. तेव्हा नलंदनदी असे नाव असलेला एखादा ओढा किंवा उपनदी गावाजवळून जात असावी. त्या नलंद नदीवरूनच नणंद हे गावाचे नाव पडले असावे. कारण नणंद हा नातेसंबंधातला शब्द आहे.आणि अशा शब्दावरून ग्रामनामे क्वचितच दिसतात. औसा तालुक्यात दादगी, लिंबाळा, दाऊ (जाऊ), जाऊ, किणी नवरे, बोपला, मावलगाव, मातोळा अशी ग्रामनामे आहेत. बहुदा ती नणंदवरूनच व नणंदनंतरच पडली असावीत.

ग्रामनामावरून इतिहास आणि संस्कृतीसंबंधात काही एक माहिती मिळते. पाण्यासंबंधातील इतिहास व संस्कृती या ग्रामनामात डोकावते. माणसाच्या वैयक्तिक उपयोगांसाठी व काही अंशी शेतासाठी जलाशय निर्मिती हे प्राचीनकाळापासून जाणीवपूर्वक केली जात होती. ओढे आडवून किंवा धरण बांधूनही जलाशयाची निर्मिती केली जात असल्याचे दिसते. विकासाच्या विकृत कल्पनांमुळे अनेक गावतळी नष्ट केली गेली. ग्रामनामाच्या अभ्यासातून पाण्याच्या इतिहासाचा मागोवा घेता येणे शक्य आहे. गावोगावच्या पाण्याच्या स्त्रोतांचा असा ऐतिहासिक अभ्यास झाला तर आजच्या बऱ्याच समस्यांना उत्तर मिळणे शक्य आहे. ग्रामनानांचा अभ्यास ही सुरूवात ठरू शकते.

डॉ. सुधाकर देशमुख, कन्सल्ंटिग सर्जन, देशमुख हॉस्पिटल, उदगीर जि. लातूर 413 517, दूरध्वनी : (02385) 256 266, भ्रमणध्वनी : 94220 72481, दिनांक : 15 ऑक्टोबर, 2008

वरील लेखात यथार्थ माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपणांपैकी वरील माहितीत काही वास्तविक चूक (Factual error) किंवा कमतरता, त्रुटी आढळल्यास किंवा तत्संबंधी काही अधिक माहिती असल्यास (जसे ग्रामनामांबद्दल आख्यायिका इ.) मला ती आवश्य कळवावी, अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. प्रकल्प निर्दाेष होण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

संदर्भ :
Dr.H.S.Thosar - Historical Geography of Maharashtra & Goa.
2. डॉ.एम.एल. कलबुर्गी - महाराष्ट्रातील कोरीव कन्नड लेख.
3. डॉ.मोरवंचीकर - भारतीय जलंसस्कृती : स्वरूप आणि व्याप्ती

Path Alias

/articles/paanai-anai-garaamanaamae

Post By: Hindi
×