पाणी आणि आरोग्य


जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. शासनाचे विविध विभाग - पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्राम विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. राज्यातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी असून त्याकरिता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येणारी कार्यवाही ही अधिक परिणामकारक, निर्दाेष व नियोजनबध्द व्हावी व जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा याकरिता शासन पुढीलप्रमाणे उपाययोजना करीत आहे.

पाणी म्हणजेच जीवन ! म्हणूनच मानवी जीवनात स्वच्छ व शुद्ध पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. जलजन्य आजार व त्याला प्रतिबंध करण्यासाठी पाणी गुणवत्तेबाबत माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता म्हणजे पाण्यातील भौतिक, जैविक व रासायनिक घटकांची तपासणी करून त्याची योग्यता पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगधंद्यासाठी ठरविणे होय. पाणी गुणवत्ता व स्वच्छता यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. स्वच्छता असेल तेथे आरोग्य नांदेल, आरोग्य नांदेल तेथे भरभराट होईल, असे म्हणतात. आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराबरोबर स्वच्छ मोकळी हवा, आसपासचा स्वच्छ परिसर आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी यांची आवश्यकता असते हे आपण जाणतोच. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सर्व समाज आरोग्य संपन्न हवा, त्यासाठी भरपूर व बारमाही शुद्ध पाण्याचा साठा उपलब्ध असायला हवा.

आपल्याला स्वच्छ व निर्मळ दिसणारे पाणी शुद्ध व सुरक्षित असतेच असे नाही. स्वच्छ व निर्मळ दिसणाऱ्या पाण्यामध्ये मानवास हानिकारक ठरू शकणारे कोट्यावधी रोगजंतू असू शकतात. पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरावयाचे पाणी नियमितपणे निर्जुंतूक करणे अत्यंत महत्वाचे आहे.

पाणी दुषित होण्याची कारणे :


नदीस नाले, ओढे, झरे, तळे, बंधारे यांचे पाणी खालील प्रकारे अशुद्ध होते.

पात्रात किंवा काठावर शौचास बसल्याने, आंघोळ केल्याने, पोहल्याने, कपडे धुतल्याने, गुरे - जनावरे धुतल्याने, वाहन - गाडी धुतल्याने, कारखान्यातील टाकाऊ, रासानिक द्रव्ये नदीत सोडल्याने, गावातील सांडपाणी, मलमूत्र व गटारातील पाणी नदीत सोडल्याने, मानव - पधू - पक्षी यांचे मृतदेह पाण्यात सोडल्याने, धार्मिक विधीस मूर्ती विसर्जन, पूजेचे साहित्य, फुले (निर्माल्य) नदीत टाकल्याने, नदीच्या किंवा कॅनालच्या काठावर वस्ती किंवा जनावरांचे गोठे असल्यास अशुद्ध होते.

कूपनलिकेचे पाणी दुषित होण्याची कारणे :


भोवतालच्या परिसरात 100 फुटांच्या आत खत खड्डा, शौचालय, सांडपाणी साचलेले असल्यास, हातपंपाभोवती योग्य असा सिमेंटचा ओटा नसणे किंवा तो फुटलेला असल्याने, हातपंपाच्या जवळ तसेच ओट्यावर कपडे किंवा भांडी धुतल्याने, कूपनलिका ही नाल्यात, ओढ्यात, पात्रामध्ये किंवा काठावर खोल खड्ड्यात असल्याने, हातपंपाचा पाया ढिला किंवा खिळखिळा झाल्यास, कूपनलिकेची व्यवस्थित देखभाल न केल्याने, कूपनलिकेचे बांधकाम सदोष असल्याने पाणी दूषित होते.

नळ योजना पाणी दुषित होण्याची कारणे :


व्हॉल्व्ह गळती, पाईपलाईन गळती, सदोष पाईपलाईनमध्ये आजूबाजीची घाण पाणी., गटारातील मैलामिश्रित पाणी पाईपलाईनमध्ये झिरपणे, नळाला तोट्या नसणे, पाईपलाईन गटारातून, नाल्यातून, खताच्या खड्ड्यामधून, संडासाजवळून , गटाराच्या मोरीमधून गेल्याने, नळाजवळ खड्डा केल्याने त्यात घाण पाणी साचते व पाईपलाईनमध्ये कमी दाब निर्माण झाल्यावर घाण पाणी पाईपमध्ये जाते व त्यामुळे संपूर्ण नळ पाणीपुरवठा दूषित होतो, नळ योजनेची पाण्याची टाकी नियमित सवच्छ न केल्याने, पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याने पालापाचोळा, पक्षी, प्राणी आत पडून कुजतात व पाणी दूषित होते, पाण्याच्या टाकीवर इतरांना व मुलांना प्रतिबंध न केल्याने पाणी दूषित होऊ शकते, नळ योजनेचा प्रमुख उद्भवच असुरक्षित असणे, घरगुती नळ कनेक्शनसाठी पी.व्ही.सी. पाईपचा वापर केल्याने पी.व्ही.सी पाईप चिरतो व त्यातून गळती होते.

भूगर्भातील पाणी मुळांत शुद्ध असते, पण ते खालील प्रकारे अशुद्ध होते -

विहीर :


उघड्या विहिरीमध्ये पालापाचोळा पडल्यास, विहिरीला कठडा नसल्यास सांडपाणी विहिरीत गेल्याने, आजूबाजूची घाण पावसाच्या पाण्याबरोबर गेल्यावर, विहिरीत पोहल्याने, विहिरीच्या कठड्यावर उभे राहून पाणी काढल्याने पायाची घाण पाण्यात गेल्याने, विहिरीच्या परिसारत 100 फुटांच्या आत खतांचे खड्डे असणे, गुरांचे गोठा असणे, त्यांचे मलमूत्र हे सर्व जमिनीत मुरून विहिरीत झिरपते, विहिरीत उतरून पाणी भरल्याने, हाताची, पायाची व भांड्याची घाण पाण्यात मिसळ्याने, विहीरीचे बांधकाम सदोष असल्याने आजूबाजूची घाण, शेतातील कीटकनाशकमिश्रित घाण पाणी विहिरीत गेल्याने, शेतातून घरी परतताना किंवा शौचाहून आल्यानंतर हात ,पाय अवजारे विहिरीच्या काठावर घुतल्याने पाणी अशुद्ध होते.

घरातील साठवलेले पाणी दुषित होण्याची कारणे :


पाणी साठवावयाचे भांडे, पिंप किंवा माठ अवस्च्छ असल्याने, पाण्याचे भांडे, माठ उंचावर न ठेवल्याने, पिण्याचे पाणी झाकून न ठेवल्याने, पाणी घेण्यासाठी स्वतंत्र लांब दांड्याच्या भांड्याचा वापर न केल्याने हाताचा पाण्याशी संबंध येऊन पाणी दूषित होते, शौचाहून आल्यावर किंवा बाळाची शी धूतल्यावर हात साबणाने स्वच्छ न धुतल्याने व तशाच हाताने पिणण्याचे पाणी हाताळल्याने, पाणी साठवण्याची भांडी, माठ नियमित दररोज साफ न केल्याने, जमिनीत रांजण पुरून व ते नियमित स्वच्छ न करता त्याचा पिण्याचे पाणी साठविण्यासाठी उपयोग करणे. (उदा. उपहारगृहे, पाणपोईमध्ये, यात्रा, धार्मिक महोत्सव इ.) वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव म्हणजेच स्वयंपाक करण्यापूर्वी , अन्न हाताळताना, अन्न वाढण्यापूर्वी, जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ न धुतल्याने, घरातील पिण्याचे पाणी अवस्च्छ हाताने हाताळल्याने अशुद्ध होते.

सार्वजनिक विहीर, तळी, नळ कोंडाळे, यांच्या आसपास गुरेढोरे धुणे, आंघोळी करणे, धुणी- भांडी इ. गोष्टी टाळाव्या. जिथून आपण पिण्याचे पाणी भरतो त्याच्या आसपास शौचाला बसू नये. पाण्याच्या स्त्रोताजवळ खत खड्डे, शोष खड्डे इ. घेऊ नये. विहिरीचे कठडे व पाण्याच्या स्त्रोताच्या आसपासचे बांधकाम व्यवस्थित झालेले असेल हे पाहावे. गावातील कचरा व सांडपाणी यांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी, जेणेकरून पाण्याचे स्त्रोत दुषित होणार नाहीत. सर्व स्त्रोतांमधील पाण्याचे नमुने घ्यावेत, पाण्याची नियमित तपासणी करावी आणि हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही याची खात्री करावी. सार्वजनिक पाणीपुरवठा असलेले पाणी नियमित निर्जंतुक करावे. पिण्याच्या पाण्याच्या साठ्याजवळ गुरांचा गोठा असू नये. पिण्याच्या पाण्यात जनावरांचे मलमूत्र व गोठ्यातील केरकचरा मिसळणार नाही याची काळजी घ्यावी. उद्भव योग्य आहे किंवा अयोग्य आहे याचा फलक लावावा.

पाण्यामुळे होणारे आजार - विषमज्वर (टॉयफॉईड), कॉलरा, हागवण, अतिसार, पोलिओ, कावीळ, आमांश, आतड्यांचे आजार, अनेक प्रकारचे जंत व त्यापासून अनेक आजार होतात.

व्यक्तिगत सवयी, सार्वजनिक अस्वच्छता यामुळे पिण्याचे पाणी दूषित होते. त्याचप्रमाणे नळ पाणीपुरवठ्यातील दोष, देखभाल विषयी असणारी लोकांची अनास्था, अनियमित शुद्धीकरण व पाण्याची तपासणी न होणे यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता खूपच असते आणि असे दूषित पाणी पिण्यास वापरल्याने जलजन्य रोग होतात.

शासनाच्या उपाययोजना :


जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. शासनाचे विविध विभाग - पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्राम विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. राज्यातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी असून त्याकरिता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येणारी कार्यवाही ही अधिक परिणामकारक, निर्दाेष व नियोजनबध्द व्हावी व जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा याकरिता शासन पुढीलप्रमाणे उपाययोजना करीत आहे.

पाणी गुणवत्ता व साथरोग नियंत्रणासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका यांना शासनाने पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या ब्लिचिंग पावडरची, सोडियम हायपोक्लोराईड, द्रवरूप (लिक्विड) क्लोरिन व इतर द्रावणांचा वापर स्थानिक गरजा लक्षात घेऊन स्थानिक स्तरावरच आवश्यकतेनुसार विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून खरेदी करण्यास सर्वांना परवानगी देण्यात आली आहे. या द्रावणे / रसायने यांची गुणवत्ता भारतीय मानक संस्थेचा (Bureau of India Standards) च्या निकषानुसार असावी असे बंधनकारक आहे.

- प्रतिवर्षी पावसाळ्यापूर्वी जनतेस शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी व साथरोगास प्रतिबंध करण्यासाठी शासनस्तरावरून आवश्यक त्या सूचना परिपत्रकान्वये सर्व जिल्हा परिषद यांना निर्गमित करण्यात येतात.

- पाण्याची व ब्लिचिंग पावडर यांची वारंवार तपासणी करून गुणवत्ता संनियंत्रण केले जाते. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करून दूषित पाण्याची टक्केवारी कमी करण्याबाबत व राज्यातील जनतेस जलजन्य साथरोगापासून परावृत्त करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जातात.

उपरोक्त उपाययोजना व्यतिरिक्तही लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील आहे. त्यानुसार राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पाणी गुणवत्ता व संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यालाच सुरक्षित जल अभियान असे नामकरण करण्यात येऊन त्याचे बोध वाक्य सुरक्षित पाण्याची शक्ती, रोगराईपासून मुक्ती असे करण्यात आले.

कार्यक्रमांची प्रमुख उद्दिष्ट्ये :


- ग्रामीण भागातील सर्व पाणी स्त्रोतांचे गुणवत्ता संनियंत्रण देखरेख, दुरूस्ती व सर्वेक्षणामध्ये लोकांचा सहभाग वाढविणे.

- ग्रामपंचायतींना या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी करणे व त्यांना सक्षम बनविणे.

- सोप्या पध्दतीने पाणी तपासणीच्या संचाचा वापर करून गावातल्या गावात पाण्याची तपासणी करणे.

- लोकांमध्ये स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठ्याबाबत तसेच अशुद्ध पाण्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणाबाबत जनजागृती वाढविणे.

- पाणीपुरवठा यंत्रणेतील वेळोवेळी उद्भवणारे दोष वा दुरूस्त्या लोक सहभागातून करणे ही प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.

या कार्यक्रमांतर्गत :
- प्रशिक्षण कार्यक्रम :



या कार्यक्रमांतर्गत ग्रामपातळीपर्यंत लोकांना पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता देखरेख व संनियंत्रण यशस्वीरित्या कशा प्रकारे करावे याबाबत माहिती देण्यासाठी राज्यस्तर/ जिल्हास्तर / तालुकास्तर या तीन स्तरांवर प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यस्तरावर 366, जिल्हास्तरावर 1,683 प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ग्रामपाळीवरील तालुकास्तर प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य संसाधन संस्थामार्फत राबविण्यात येत आहे. त्यानुसार तालुकास्तरावर 121773 प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

- फिल्ड टेस्ट किट्सचे वाटप :


या कार्यक्रमांतर्गत रासायनिक दृष्ट्याबाधित ग्रामपंचायतींना 12,528 रासायनिक फिल्ड टेस्ट किट्सचे वाटप करण्यात झालेले आहे. तर 2,51,100 अणुजैविक फिल्ड टेस्ट किट्सचे वाटप करण्यात आलेले आहे. याशिवाय 27,924 मल्टी पॅरामिटर फिल्ड टेस्ट किट, 375 टीडीएस किट्स खरेदी करून सर्व ग्रामपंचायींना वितरित करण्यात आलेले आहेत.

- आरोग्य प्रयोगशाळांचे बळकटीकरण :


99 उपविभागीय आरोग्य प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी या प्रयोगशाळांना प्रत्येकी 6.23 लाख रूपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

- पिण्याचे पाणी दूषित होण्याच्या कारणांमध्ये सार्वजनिक अस्वच्छता व उघड्यावरील मलविसर्जन ही प्रमुख कारणे आहेत. संपूर्ण स्वच्छता अभियान, संतगाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान इ. उपक्रमांद्वारे स्वच्छतेची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त गावे निर्मल करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

- लोकांमध्ये स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठ्याबाबत तसेच अशुद्ध पाण्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती वाढविण्यासाठी दूरदर्शन व रेडिओ व वृत्तपत्रे, भित्तीपत्रके, लिफलेट इत्यादी माध्यमांचा वापर करून माहिती, शिक्षण व संवाद (IEC) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात राज्य व जिल्हास्तरीय प्रेस कॉन्फरन्स, न्यूज कव्हरेज, दूरदर्शन व आकाशवाणीवर स्पॉट, जिंगल्स, चर्चा, लोकनाट्य, कलापथक, पथनाट्य, भित्तीपत्रके, पोस्टर्स, लिफलेट्स, राज्य/ विभाग / जिल्हा/ तालुकास्तरावरील बक्षिसे, प्रदर्शने, मोबाईल व्हॅन्स, डॉक्युमेंटरी, एकस्पोझर व्हिजीट्स, एस.टी बसेसवर संदेश रंगवणे, एस.टी बस स्थानकांवर संदेशांचे प्रसारण करणे इत्यादी बाबींचाही समावेश आहे.

- पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ग्राम विकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे बरोबर एक समन्वयक समिती बनवली असून जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी व पाण्याच्या गुणवत्तेचे सातत्य राखण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर याचा आढावा घेतला जात आहे. जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली पाणी गुणवत्ता विषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

- आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यानंतरच्या स्वच्छता सर्वेक्षणावरून आढळून आलेल्या त्रूटी दूर करण्याच्या कार्यवाहीसाठी मागील वर्षी एक अभियान घेण्यात आले. या अभियानामध्ये तालुकापातळीवर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता (पा.पु) यांची समिती स्थापन करण्यात आली होती व या समितीसमोर लाल कार्ड व पिवळे कार्ड दिलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून सर्वेक्षणातील त्रुटी दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

- प्रायोगिक स्तरावर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केंद्र शासन व जागतिक आरोग्य संघटना यांच्या नवीन निकषाप्रमाणे प्रत्येक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले असून त्यात आढळून आलेल्या त्रुटींचे निराकरण करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाची उपयुक्तता पाहता राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता सर्वेक्षण व त्या आधारे दिल्या जाणाऱ्या लाल कार्ड, हिरवे काड प्रणालीचे बळकटीकरण व सुसूत्रता आणण्यासाठी एक अभ्यासगट स्थापन केला. या अभ्यासगटात युनिसेफ प्रतिनिधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रां.पं) जिल्हा आरोग्य अधिकारी, तांत्रिक सल्लागार व पाणी गुणवत्ता तज्ज्ञ यांचा समावेश करण्यात आला होता. या समितीने अंतिम अहवाल शासनास सादर केलेला आहे. या अहवालाच्या आधारे स्वच्छता सर्वेक्षणाची कार्यप्रणालीची दिशा व त्या आधारे दिल्या जाणाऱ्या लाल कार्ड, हिरवे कार्ड प्रणालीचे बळकटीकरण व सुसूत्रता आणण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

- राज्य शासनाने राज्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण, त्यांना सांकेतांक देण्याची कार्यवाही व त्याची संकेतस्थळावरती नोंद करण्याची कार्यवाही चालू आहे.

- राज्य शासनाने युनिसेफच्या तांत्रिक सहकार्याने पाणी गुणवत्ता विषयक संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यप्रणालीचे बळकटीकरण करण्यासाठी व याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूर्वीचे शासननिर्णय व सद्य:स्थितीचा आढावा घेऊन नवीन कार्यप्रणाली तयार केली आहे. या कार्यप्रणालीमध्ये प्रत्येक घटकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचा ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा, व स्वच्छता, विभाग, आरोग्य विभाग यांच्या सहमतीने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यावर सर्व ग्रामपंचायतींमध्ये लावण्यासाठी एक पोस्टर तयार करण्यात आले असून, ते सर्व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आले आहे.

- राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाणी गुवत्तेबाबतच्या प्रभावी अंमलबजावणीच्या सध्या कार्यरत असणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचारी यांना जलसुरक्षक म्हणून संबोधून त्यांच्या नियमित कामांबरोबर पाणी गुणवत्ता विषयक विशिष्ट कामांसाठी ग्रामपंचायींच्या पगाराव्यतिरिक्त प्रोत्साहनपर मानधन देण्यात येत आहे.

- जलसुरक्षक व पाणी गुणवत्तेबाबतच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवर जल निरीक्षकाची नियुक्ती केली जात आहे. पाणी हे विकासाचे एक महत्वाचे साधन असून, बहुतांश ग्रामीण व शहरी विकास त्यावरच अवलंबून आहे. वर नमूद बाबी लक्षात घेता शासनाने वेळोवेळी जनजागृती करून लोकसहभागाचा समोवेश करून तसेच सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना / आदेश देऊन जनतेस स्वच्छ व शुद्ध पाणी कसे पुरविले जाईल, जेणेकरून साथरोगाचा पूर्ण प्रदुर्भाव टाळता येईल याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.

लोकराज्य माɻसकाच्या सौजन्याने

Path Alias

/articles/paanai-anai-araogaya

Post By: Hindi
×