नियोजन पूर्वक पाणी साठवा, वापरा - देशात महासत्ता बनवा


पुणे स्मार्ट सिटी - पुणे आणि पाणी पुरवठा सद्यस्थिती - एक तौलनिक अभ्यास -

एखादे शहर जर खऱ्या अर्थाने स्मार्ट असेल तर त्या शहरास उत्तम पाणी पुरवठा असेल याची खात्री असणे फार आवश्यक आहे. प्रत्यक्षात पुणे शहर पाणी पुरवठा हा फावल्या वेळातील चर्चेचा/टीकेचा विषय होवू पाहत आहे ही फार गंभीर बाब आहे. या विषयाचा खऱ्या अर्थाने सद्य स्थितीबाबत, शासकीय पातळीवर नगर विकास विभाग व जलसंपदा विभाग यांनी एकत्रित प्राथम्याने विचार करणे अगत्याचे झाले आहे. महानगरपालिका/नगरपालिका यांचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे शहरास पाणीपुरवठा करणे, त्यासाठी नियोजन करणे ही बाब अध्यावृत असते. मुबंई महानगर - नगर पालिकेने स्वत:ची अशी आठ धरणे बांधली आहेत (तानसा, वैतरणा, विहार, भातसा इ.) पुणे शहरासाठी पर्वती वरील अंदाजे आठ तासाचे पाणी साठ्या पलीकडे, तातडीच्या साठी म्हणून पालिकेचा असा साठा नाही.

सिंचनासाठी मुख्यत्वे धरणे बांधताना पिण्याचे पाणी, कारखान्यासाठी पाणी इ. बाब मार्गदर्शक तत्वे असतात. सिंचन प्रकल्प नियोजनानुसार अलीकडील काही दशकात, खडकवासला सिंचन प्रकल्पांतर्गत, वरसगाव व वेघरे - टेमघर ही धरणे बांधण्यात आली. आता धरणांसाठी योग्य अशी जागा पुणे शहरात वरील बाजूस राहिलेली नाही. वाढती लोकसंख्या - कारखाने यामुळे पिण्यासाठी पाणी कमी पडू लागले. त्या मुळे 1990 च्या सुमारास शहरासाठी साल 2021 पर्यंत धरणांच्या पाणी साठ्याचे नियोजन केले गेले. त्यास अनुसरूनच जलसंपदा विभाग व महानगरपालिकेचा प्रथमच एक करार झाला. (5 टी.एम.सी पाण्यावर प्रक्रिया करून हडपसर च्या आसपास कालव्यात टाकल्यास एकूण 11.5 टी.एम.सी देय) कराराचे काटेकोर पणे पालन, पाण्याचा योग्य वापर व पाण्याचा अपव्यय टाळल्यास अडचण निर्माण होवू नये. प्रत्यक्षात 2021 साठीचा ठरलेला हा वापर आत्ताच (2014 - 2015) 15-16 टी.एम.सी पर्यंत गेला आहे असे दिसते. नियोजनाची जरी प्राथमिक माहिती घेतली तरी बरेच गैर समज दूर होवू शकतात.

शासनाचे मार्गदर्शक तत्वानुसार सर्व साधारणत: शहरात, दर माणशी दर दिवशी 125 लिटर पाणी असे आहे. प्रत्यक्षत पुणे शहरास खडकवासला धरणातून अलीकडे जवळ जवळ माणसी हा आकडा 225 च्या ही वर पर्यंत गेला आहे असे कळते. मुंबई शहरास हाच आकडा 125 लिटर च्या आसपास आहे. किंबहुना टोकिया सारखी काही मोजकी शहरे सोडल्यास संपूर्ण आशिया खंडात पुणे शहरास पाणी जास्त मिळते असे दिसते. मग प्रत्यक्षात आम्हाला अडचण का भासते हा बहुतेकांच्या मनात प्रकर्षाने उद्भवणारा प्रश्न? खाली दिलेली माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. ह्या संदर्भात खालील रेखाचित्र पहावे.

पुणे स्मार्ट सिटी1875 साली काही हजाराच्या आसपास लोकवस्ती असणारे पुनवडी (पुणे) गाव गावास (लोकसंख्या 1960 मध्ये 4.92 लाख, 1991 मध्ये 21.5 लाख ) दुष्काळी कामासाठी म्हणून बांधलेल्या खडकवासला (फाईप धरण) धरणातून सिंचनासाठी पाणी दिल्यानंतर, पाणी द्यावे असे तत्वत: होते. अलीकडील काळात वरसगाव व वेघरे - टेमघर धरणे पूर्ण करण्यात आली, पुणे शहराचे 2021 साला पर्यंतच्या प्रक्षेपित लोकसंख्येचा विचार करून 125 लिटर च्या हिशोबाने 11.5 टी.एम.सी पाणी पुणे शहरास दिल्यास (5.0 टीएमसी देय व 6.5 टीएमसी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून हडपसर च्या आसपास उपलब्ध करून दिल्यानंतर देय) सद्य स्थितीत अंदाजे 15 - 16 टीएमसी पाणी वापर पुणे शहरासाठी होतो असे कळते आता शिल्लक राहिला फक्त नियोजनाचा भाग. या साठी सगळ्यांचाच सहभाग व तीव्र इच्छाशक्ती याची नितांत गरज आहे.

भूतलावरील पाण्यापैकी फक्त 2.5 टक्के पाणी हे गोडे असून 97.5 टक्के पाणी समुद्राचे खारे पाणी आहे. उत्तर व दक्षिण धृवावरील बर्फ स्वरूपातील पाणी सोडल्यास दरवर्षी केवळ 0.26 टक्के पाणी गेली लाखो वर्षे मिळत आहे. ज्या देशांनी उदा. अमेरिका, युरोपिय देश, चीन देश सुध्दा, याचा प्राथम्याने व गांभीर्याने विचार केला ते जल संपत्तीच्या बाबतीत उत्तरोत्तर प्रगत होत आहेत असे चित्र आहे. मुंबई शहराने तर दूर दृष्टी दाखवून तानसा, विहार, भातसा, वैतरणा या सारखी आठ धरणे बांधून एका चांगल्या विचारांचा मार्ग दाखविला. सर्व बाबींचा साकल्याने विचार करता पुणे शहरासाठी खालील उपाय योजना प्राथम्याने, अर्थात नियोजन पूर्वक, अंमलात आणल्यास 11.5 टी.एम.सी पाणी ठरल्याप्रमाणे इ.स. 2021 साली देखील पुरेसे पडण्यात काही अडचण वाटत नाही.

एकंदरीत खालील उपाय योजना निश्चित उपयोगी पडतील असे वाटते.
1. 6.5 टी.एम.सी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून सिंचनासाठी हडपसर जवळ कालव्यात उपलब्ध करून देणे.

2. अ. भविष्यात खडकवासला धरणापासून तळजाई डोंगराखालून हडपसर च्या आसपास बोगद्यातून पाणी नेणे हा एक पर्याय आहे.

ब. सोलापूर बाजार इस्टस्ट्रीट पासून पूर्ण रेसकोर्स खालून मुठा उजवा कालवा एम्प्रेस गार्डन पर्यंत 17 - 18 फूट व्यासाच्या बोगद्यातून जातो हे किती पुणेकरांना माहित आहे ? खडकवासला धरणापासून सोलापूर बाजार पर्यंत सध्याच्या कालव्या मधून पाईप लाईन टाकणे हा पण एक पर्याय आहे.

शहरातील मातीचा कालवा, दाट वाढत्या वस्तीमुळे, माती उकरणे, अस्तराच्या शहाबादी फरश्या काढून नेणे यामुळे फुटू शकतो. अशा वेळी कालवा दुरूस्ती साठी जागेवर पोहोचणे देखील शक्य होत नाही, अशा वेळी, वरील पर्याय कार्यान्वित झाल्यास, येणार नाही. शहरातील उघड्या, जवळ जवळ 20 - 22 किलोमीटर लांबीच्या कालव्या मधून होणारे बाष्पीभवन न झाल्याने वाचलेले पाणी वापरण्यास मिळू शकेल.

3. सध्याच्या पाणी पुरवठा पाईप मधून पुरेसे पाणी येत नसल्यास धरणातून बुस्टर पंपाने पाणी पाईप मध्ये सोडणे तांत्रिक दृष्ट्या शक्य वाटते.

4. पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड महापाललिका यांना अनुक्रमे खडकवासला प्रकल्प व पवना प्रकल्पातून पाणी दिले जाते. या दोन्ही ही पाणी वाटप योजना अगदी टोकाला (बालेवाडी) जोडल्यास अडचणीच्या वेळी मोटार - पाणी पुरवठा टाळता येईल. 1994 च्या दरम्यान आयुक्त, कलेक्टर व मुख्य अभियंता यांची या बाबत एक सकारात्मक बैठक पण झाली होती. ही बाब धोरणात्मक स्वरूपाची आहे.

4. काही ठिकाणी पाणी 24 तास तर काही ठिकाणी दिवसा आड पाणी - असे न होण्यासाठी दर पंधरवाड्यास महानगर पालिका व जलसंपदा विभागाची वरिष्ठ पातळीवरील नियोजन- आढावा बैठक जरूरी दिसते.

6. जमिनीखालील अत्यंत जुन्या पाईपचे जाळे दुरूस्त तरी करावे नाहीतर नवीन पाईपचे जाळे कार्यान्वित करावे. जनतेच्या घरापर्यंत धरणातील पाणी देण्याच्या वाटते होणारा अपव्यय निश्चित कमी होईल.

7. सर्व पातळीवर दिलेले पाणी व वापरलेले पाणी याचा हिशोब असणे अत्यंत अगत्याचे आहे. महापालिका व जलसंपदा विभागातील निगडीत अधिकाऱ्यांची पूर्ण काळासाठी एक समिती असावी. तिने या नियोजनाचा पाठपुरावा करावा. हे सहज शक्य आहे.

8. भामा - आसखेड चे पाणी अडचणीच्या वेळी येरवडे भागास पुरविणे तांत्रिक दृष्ट्या शक्य वाटते.

9. पेशवे कालीन कात्रज घाटातून तत्कालीन पुणे गावठाण्यास, बाहुली हौदासारख्या ठिकाणाहून पाणी पुरवठा होत असे. ती योजना पुनरूज्जीवित कशी करता येईल हे पहावे.

10. वरील सर्व नियोजन काटेकोर पध्दतीने कमीतकमी वेळात करण्यासाठी खालील उपाय सुचवावा असे वाटते -

रेव्हिन्यु कमिशनर पुणे, मुख्य अभियंता जलसंपदा, मुख्य अभियंता महानगर पालिका यांची 'पुणे शहर पाणी नियोजन समिती' व्हावी. दर तीन महिन्यांनी प्रगती आढावा बैठक घेतल्यास पुढील पावसाळ्याच्या आत सर्व गोष्टी मार्गी लागतील अशी खात्री वाटते.

वरील पर्याय खर्चिक आहेत का ? हा विचार काहींच्या मनात येवू शकतो. त्यावर असे म्हणावेसे वाटते की पाणी हे जीवन आहे ती एक अमोल संपत्ती आहे. त्याची किंमत करू पहाणे माझ्या तरी स्वभावात बसत नाही कारण जन्माने मी पुणेकर आहे ना !!

लायन इं. सुरेश शिर्के, पुणे - मो : 09822024203

Path Alias

/articles/naiyaojana-pauuravaka-paanai-saathavaa-vaaparaa-daesaata-mahaasatataa-banavaa

Post By: Hindi
×