नेसू नदी पूजन : भूमी पुत्रांचा मिलन सोहळा


वर्षातील सहा महिने रोजगारासाठी लगतच्या गुजरात राज्यात जाणार्‍या आदिवासींना उदरनिर्वाहाचे शाश्वत साधन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या प्रकल्पास आज बहुआयामी स्वरुप आले आहे. नेसू नदीवर ठिकठिकाणी बंधारे उभारले. पाणी अडविले आणि त्या पाण्यावर शेती फुलली. पाण्याच्या उपलब्धतेतून स्वत:च्या समृध्दीबरोबरच समुहाच्या सौख्याची कास धरणारा, विविध समित्यांच्या माध्यमातून एकत्र येऊन पाण्याचे व्यवस्थापन करणारा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जीवनदायिनी असलेल्या नदीची स्वच्छता व पर्यावरणशुध्दी यासाठी एकत्र येऊन प्रतिज्ञा करणारा समाज पाहिला की, पाण्यावरुन पेटणार्‍या संभाव्य युध्दाची भीती म्हणजे म्हणजे केवळ पाण्यावरील बुडबुडा ठरेल असा सुखद दिलासा मिळतो.

सन 2016. ऑक्टोबर महिन्यातील 12 तारीख. विजयादशमी नंतरचा दुसरा दिवस. भल्या सकाळी एका खाजगी ट्रॅव्हल्स बसने धुळ्याहून नंदूरबारकडे जाण्यास निघालो. नगांव ओलांडले आणि दाट धुक्याच्या आवरणातून प्रवास सुरु झाला. वास्तविक नगांव हे धुळ्यापासून अवघ्या दहा किमी अंतरावरील गाव. धुळयातून निघालो तेव्हा स्वच्छ कोवळे ऊन पडले होते. नगाव पासून पुढे मात्र संपूर्ण परिसर धुक्याने वेढलेला. मुंबई-आग्रा महामार्गाच्या दुतर्फा असलेली शेतं, पेट्रोलपंप, ढाबे, गावं धुक्यात बुडालेली. सोनगीर जवळील टोल नाका तर पूर्णत: धुक्याने वेढलेला. समोर पाच फुटावर कुणी दिसत नव्हतं. त्यामुळे गाडीचा वेग काहीसा मंदावलेला. नंदूरबारहून पुढे खांडबारा आणि तेथून पालीपाड्यास दहा वाजेपर्यंत पोहचायचे होते. या दाट धुक्याचा सहवास चिमठाण्यापर्यंत लाभला.

पुढे स्वच्छ आकाश आणि कोवळे ऊन सोबतीला पुन्हा आले. ठीक नऊ वाजता नंदनगरीबाहेरील चौफुलीवर उतरलो. तेथून जवळच अंबिका कॉलनीतील ललितजी पाठक सरांच्या घरी पोहोचलो. साडे नऊ वाजता खाजगी वाहनाने पालीपाड्याकडे कूच केले. सोबत ललितजी, त्यांचे ज्येष्ठ बंधू संपादक विद्याविलास पाठक आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधून निवृत्त झालेले लहान बंधू होते. वाटेत यादवराव पाटील गाडीत बसले. परिसराची जीवनरेखा असलेल्या नेसू नदी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नदीच्या काठावरील विविध पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी एकत्र येतात, कलश पूजन करतात. वाजत गाजत शोभायात्रा काढतात. भक्तीभावाने नदीची आरती करतात. शिवाय नदी स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा आणि पाणी जपून वापरण्याचा संकल्प करतात. हे सर्व अचंबित करणारे होते. त्यामुळे नेसू नदी पूजन सोहळयाविषयी सर्वांनाच कुतुहल होते. पालीपाड्यास पोहचण्याची सर्वांना घाई झाली होती.

नेसू नदी पूजन सोहळ्याचे यंदाचे तिसरे वर्ष. यावर्षी पालीपाड्यात हा उत्सव होणार होता. गेल्या वर्षी करंजाळी गावात नदी पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले. त्यावेळी विद्याविलासजी पाठक उपस्थित होते. त्यामुळे नदी पूजन सोहळ्याविषयी ते भरभरुन बोलत होते. आपल्या संस्कृतीत नदीला माता संबोधतात. तिच्या पाण्याला पवित्र मानतात. नदीत स्नान केल्यास पापे धुतली जातात आणि पुण्य पदरी पडते. असे मानणारे तथाकथित सुसंस्कृत शहरी बाबू नंतर त्याच पवित्र नदीत आपले मलमुत्र युक्त सांडपाणी सोडून तिला गटारात रुपांतरीत करतात. नदीच्या उपयोगितेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तर दूरच, परंतू तिचे विद्रुपीकरण करीत असताना कुणाला ना खंत असते ना खेद. या उलट आपण ज्यांना मागासलेले समजतो, ते आदिवासी बांधव एकत्र येतात. निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. नदी स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतात. पाण्यामुळे व्यक्तिगत जीवनात झालेल्या परिवर्तनाची, प्रगतीची गाथा ऐकवितात. तेव्हा नेमके मागासलेले कोण? असा प्रश्न स्वाभाविकच निर्माण होतो. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय त्यांचा विकास होणे शक्य नाही. असा धोशा लावणार्‍यांची कमी नाही. अशा घोषणा करणार्‍यांमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक धुरिण सतत आघाडीवर दिसतात. या मंडळींनी नेसू नदी परिसरातील आदिवासींची निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची रीत एकदा अवश्य पाहवी. त्यानंतर ठरवावे, नेमका मुख्य प्रवाह कुणाचा? नैसर्गिक साधनसंपत्ती अनिर्बंधपणे ओरबडणार्‍या शहरीबाबूंचा की या साधनसंपत्तीचे पूजन करणार्‍या आदिवासींचा?

गुढ्या, तोरण आणि रांगोळ्या :


नंदूरबार-नवापूर मार्गावर खांडबारा हे रेल्वे स्टेशन असलेले व बाजारपेठेचे गाव आहे. खांडबारा ओलांडले की श्रावणी नावाचे गाव येते. नावाप्रमाणे निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या गावापासून पालीपाड्याकडे जाणारा फाटा आहे. साधारण अकरा वाजेच्या सुमारास आम्ही पालीपाड्यात पोहोचलो. तेव्हा शोभायात्रा नेसू नदीकडे गेल्याचे समजले. तडक नदी किनारा गाठला. पारंपारिक आदिवासी पोषाख परिधान केलेल्या कुमारिकांनी नेसू नदीतील पाणी एका सजवलेल्या कलशात भरुन घेतले होते. गावाच्या दिशेने शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेत पंचक्रोशीतील आदिवासी स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. पालीपाडा साधारण 800 लोकवस्तीचं गाव. विशेष म्हणजे गावातील 80 टक्के रस्ते सिंमेट काँक्रीटचे. या रस्त्यांवरुन, गल्लीबोळातून वाजत गाजत शोभायात्रा पुढे सरकत होती. ठिकठिकाणी शोभायात्रा थांबवून जलकलश पूजन होत होते. घरांसमोर रांगोळ्या तर होत्याच परंतू काही ठिकाणी गुढ्या देखील उभारण्यात आल्या होत्या. नदीविषयीच्या एका उपक्रमात संपूर्ण गावाने तनमनधनाने सहभागी व्हावे, हे दृष्य भारावून टाकणारे होते. पारंपारिक भाषेतील गाणी म्हणत संपूर्ण गावात फेरफटका मारल्यानंतर शोभायात्रा नेसू नदी किनारी उभारलेल्या एका मंडपाजवळ थांबली. याठिकाणी घटपूजन विधी होणार होता. शिवाय यज्ञाची देखील तयारी सुरु होती.

खांडबारा परिसर विकास समिती, डॉ.हेडगेवार सेवा समिती आणि नंदूरबारचे कृषी विज्ञान केंद्र या स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख कार्येकर्ते उपस्थित होते. मात्र नियोजन व अमलबजावणी संपूर्णत: स्थानिक आदिवासींच करतांना दिसत होते. कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. परंतू हे सर्व शिस्तीत. आदिवासींच्या स्थानिक बोलीभाषेत कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रारंभी किसन वळवी यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. भिलोरी भाषेचा गोडवा सुखावणारा होता. किसन वळवींनी थोडक्यात नेसू नदीच्या पाण्यामुळे स्थानिक आदिवासींच्या जीवनात घडलेल्या परिवर्तनाची कहाणी कथन केली. अनादी काळापासून वाहणार्‍या नेसू नदीने आपल्या पूर्वजांना जगविले. परंतु पावसाळा संपण्यापूर्वीच कोरड्याठाक होणार्‍या नेसू नदीला वाहती ठेवण्याचे काम काही वर्षांपूर्वी झालं. प्रारंभी वनराई बंधारे नंतर सिंमेट बंधारे उभारले गेले. दहावर्षात 12 किमीच्या नेसू नदीवर आज 17 बंधारे आहेत. पाणी थांबलं. पाण्याची पातळी वाढली. स्वयंसेवी संस्थांचे मार्गदर्शन लाभलं. आदिवासींनी एकीचे दर्शन घडविलं; आणि नेसूनदीच्या कृपेने जलक्रांती झाली. आपली समृध्दीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. त्या नेसूनदीला अभिवादन करण्यासाठी आपण जमलो आहोत. प्रास्ताविकामुळे या नदी पूजन संकल्पनेबाबत थोडी स्पष्टता आली. कृष्णदास भाई, डॉ.गजानन डांगे तसेच उपस्थित मान्यवरांनी घटपूजन केले.

जलदूतांचे कथन :


कार्यक्रमाच्या शिरस्त्याप्रमाणे जलदूतांनी आपापल्या परिसरातील पावसाचा लेखाजोखा मांडणे क्रमप्राप्त असते. दैनंदिन पावसाची नोंद ठेवणारे जलदूत गावोगावी कार्यरत आहेत. समितीतर्फे या जलदूतांना पर्जन्य मापन यंत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या नोंदीच्या माध्यमातून दस्तावेज निर्माण करण्याची प्रणाली काहीशी किचकट आहे, मात्र प्रयत्नपूर्वक ती रुजविण्याची प्रक्रिया आता चांगलीच मूळ धरु लागली आहे. तिचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत. जागतिक कीर्तीचे जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी या परिसरास भेट दिली असताना, या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं. जिल्हा प्रशासनाला देखील नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करण्यासाठी या आकडेवारीची मदत घ्यावी लागते. प्रारंभी तर्‍हाडीपाड्याचे जलदूत सुनील वळवी यांनी आकडेवारी जाहीर केली. आदिवासींची कुलदेवता श्री याहीमोगी मातेस प्रमाण करुन त्यांनी यंदाच्या हंगामात झालेल्या पावसाची आकडेवारी सांगितली. खरीप व रब्बीपिकाचे नियोजन जाहीर केले. तर्‍हाडीपाडा हे खांडबार्‍यापासून दोन किमी अंतरावर असलेले गांव. त्यानंतर पालीपाडा, निजामपूर, भोरचक (पश्चिम), खांडबारा आणि करंजाळी येथील जलदूतांनी पावसाची आकडेवारी जाहिर केली.

भ्रमंती थांबली, दैन्य संपले, समृध्दीची पहाट उगविली :


पावसाची आकडेवारी जाहीर करणे हा कार्यक्रमाचा केवळ तांत्रिक अथवा औपचारिक भाग नसतो. यानिमित्ताने झालेले पर्जन्यमान तसेच पर्जन्यमानाचे दिवस सांगितले जातात. याशिवाय पावसाचा खंड कधीपासून केव्हांपर्यंत होता, त्या कालावधीत किती मिमी पाऊस झाला, या नोंदीपण ठेवलेल्या असतात. त्यादेखील जाहीर करण्यात येतात. सध्या शेतामध्ये कोणते पीक आहे, शेतात कोणती कामे सुरु आहेत, रब्बीहंगामात कोणते पीक घेणार यासंदर्भातचे नियोजन जाहीर केले जाते. त्यामुळे नदीपूजन म्हणजे केवळ शोभायात्रा नव्हे हे लक्षात येते. जलदेवतेचे पूजन केल्यामुळे, निसर्गाच्या कृपेबद्दल कृतज्ञ भाव स्वीकारल्यामुळे या परिसरात भात,सोयाबीन, कापसाचीशेती फुलली. गहू, हरभरा, तूर आणि भाजीपाला होऊ लागला. आंबा, आवळा, पेरु या फळांची झाडं बहरली. पूर्वी गुजरातमध्ये मोलमजुरीसाठी जाणे टळले. गावातच शेती करण्याची संधी मिळाली. लहानमोठे पूरक व्यवसाय सुरु झाले. आपण गावात थांबलो, आपली भावी पिढी गावातच राहून उदरनिर्वाह करु शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली. भ्रमंती थांबली, दैन्य संपले, समृध्दीची पहाट उगविली. अशी पक्की धारणा या परिसरातील आदिवासींची झालेली दिसते. त्यामुळे नेसू नदी पूजन सोहळा केवळ एक उत्सवी कार्यक्रम राहत नाही. तो परंपरेचा भाग बनतो.

आदिवासींना सोशल करणं :


आदिवासींचं एक वैशिष्ट्य आहे. ते मूलत: अबोल. एकाकी राहणं पसंत करतात. जास्त बोलत नाहीत. स्वत:विषयी तर सहसा नाहीच. आपलं चांगलं झालेलं ही सांगत नाहीत, किंवा आपली अडचणही मांडत नाहीत. निसर्गाच्या सहवासात राहत असल्यामुळे आज आहे ते उद्या असेलच असे नाही. अशी त्यांची ठाम समजूत. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा. तथापि, संवादाअभावी दरी निर्माण होते. संवाद खुंटतो. प्रगतीला मर्यादा येतात. डॉ.गजानन डांगे यांनी हा मुद्दा हेरला. नेसू नदी पूजन सोहळ्याच्या निमित्ताने चांगले उत्पादन घेणार्‍या आदिवासींचा सत्कार करण्याचा उपक्रम सुरु केला. सत्कारार्थी शेतकर्‍यांने आपण शेतीत कोणते प्रयोग केले हे स्वत: कथन करण्याचा पायंडा पडला.

“आम्ही घडलो तुम्ही बी घडाना “ असा सिलसिला सुरु झाला. यंदा पालीपाड्यात अशा उपक्रमशील शेतकर्‍यांचा सत्कार सोहळा रंगला. कांदा बिज उत्पादनात आघाडी घेणार्‍या अर्चना वळवी, हरीश वळवी आणि सुनील प्रधान यांचा प्रारंभी सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे यामंडळींना पुण्याजवळील राजगुरु नगर येथील राष्ट्रीय कांदा लसूण बियाणे संशोधन केंद्राने देखील गौरविले आहे. खांडबारा येथील विष्णू वसावे यांनी रोपवाटिका केंद्र तसेच भाजीपाला उत्पादन या माध्यमातून तसेच पालीपाड्याच्या मानसिंग वळवी यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्पातून साधलेल्या प्रगतीची गाथा ऐकविली. माझ्या गांडूळखत निर्मिती केंद्रात येऊन खत विकत घ्या असे आवाहन करण्या ऐवजी मानसिंग वळवी यांनी उपस्थित शेतकर्‍यांनी आपापल्या शेतातच आपण गांडूळ खत निर्मिती केंद्र, कसे सुरु करु शकतो याबाबतीत मार्गदर्शन केले. हे विशेष भावले. वांगे उत्पादनात आघाडी घेणार्‍या निभोण्याच्या कृष्णा कोकणी,श्रावणीच्या महेंद्र कोकणी, राईस मिल चालविणार्‍या तलाईपाड्याच्या सुनील वळवी, तांदूळ महोत्सवात लक्षणीय कामगिरी करणार्‍या दिंगबर नाईक यांचा सत्कार करण्यात आला. या मंडळींनी भिलोरी भाषेत अनुभव कथन केले.

डॉ.हेडगेवार सेवा समितीचे योगदान :


बंधार्‍यांची कामे केल्यामुळे पाणी उपलब्ध झाले, बचत गट तसेच बँकांचे सहकार्य यामुळे ठिंबक सिंचनाची सोय करता आली, बाजारपेठ मिळाली हे सर्व डॉ.हेडगेवार सेवा समिती आणि कृषी विज्ञान केंद्रामुळे शक्य झाले, हा या सर्व वक्त्यांच्या कथनामधील समान दुवा. उपस्थित समुदायाने हे अनुभव कथन तन्मतेने ऐकले. कौशल्य विकसित केल्यानंतर अशिक्षित, अल्पशिक्षित आदिवासी शेतकरी देखील किती भरारी घेऊ शकतो हे यावेळी प्रकर्षाने जाणविले. विशेष म्हणजे शुध्द कांदा बिज उत्पादनासाठी राजगुरु नगर येथील राष्ट्रीय संशोधन केंद्राने खांडबारा परिसरातील शेतकर्‍यांवर दाखविलेला विश्वास भारावून टाकणार ठरला. यानंतर व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित शेतकर्‍यांना दिशा वळवी यांनी जलशपथ दिली. नेसू नदी की जय अशा घोषणा झाल्यानंतर सभामंडपातच पाच जोडप्यांच्या हस्ते हवन पूजनाचा कार्यक्रम मंत्रोच्चारात पार पडला. त्यानंतर वेळ झाली ती मुख्य कार्यक्रमाची नेसू नदी आरतीची.

मंडळी पुन्हा शोभायात्रेच्या माध्यमातून वाजत गाजत पुन्हा नेसू नदीच्या काठावर हजर झाली. जलकलश माथ्यावर घेतलेल्या कुमारिका आघाडीवर होत्या. नदीपात्राजवळ उभे राहून आरती सुरु झाली. ऑक्टोबरमधील कडक उन्हात भर दुपारी रंगलेला आरती सोहळा अंगावर रोमांच उभं करणारा होता. यथावकाश जलकलशांचे नेसू नदीच्या पात्रात विधीवत विसर्जन करण्यात आले. मंडळी पुन्हा सभामंडपात दाखल झाली. पुढील वर्षी नेसू नदी पूजन सोहळा आयोजित करण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या देवमोगरा गावातील प्रमुख मंडळींनी नारळ स्वीकारला आणि कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ उपस्थितांनी घेतला. ठरल्याप्रमाणे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत कार्यक्रम संपला.

संपूर्ण नियोजन स्थानिक पातळीवरच :


गेल्या दहा वर्षांपासून नेसू नदी परिसरात काम सुरु आहे. गट पध्दतीमुळे शेतकरी जोडले गेले आहेत. नदीचे ऋण व्यक्त करण्याची संकल्पना चांगली भावली आहे. प्रत्येक गावात शेतकरी मंडळ आहेत, या मंडळांच्या प्रमुखांची मासिक बैठक होत असते. नेसू नदी पूजन सोहळ्यासाठी गाव नक्की झाल्यानंतर साधारण मे महिन्यापासून काम सुरु होते.पर्जन्यमापकातील नोंदी व्यवस्थित होत आहे किंवा कसे याचा धांडोळा क्लस्टर कमिटी घेते. दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी नेसू नदी पूजनाचा कार्यक्रम असतो. त्या आधी दोन महिने कार्यक्रमाची पत्रिका तयार होते. कार्यक्रमाच्या दिवशीचे पूर्ण नियोजन स्थानिक पातळीवरील समिती करते. उपस्थितांच्या प्रसादासाठी (भोजनासाठी) गाव पातळीवरच वस्तूंचे संकलन करण्यात येते.

असे झाले परिवर्तन : राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प नंदूरबार जिल्ह्यात राबविण्याची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्राकडे सोपविण्यात आली . प्रकल्प अमलात आणण्याच्या अनुषंगाने खांडबारा परिसरातून वाहणार्‍या नेसू नदीच्या काठावरील सुमारे 12 किमीच्या परिघातील आठ गावांच्या समुहाची निवड करण्यात आली. खांडबारा हे सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर वसलेले छोटेखानी गाव. आजूबाजूच्या आदिवासींपाड्याचं बाजारहाटासाठीचं पसंतीचं केंद्र. त्यामुळे व्यापारी उलाढाल उत्तम. तथापि परिसरातील भोरचक, करंजाळी, नगारे आदि गावांमधील आदिवासींची परिस्थिती मात्र अस्थिर. निवडलेल्या गावांचे विविध निकषांच्या माध्यमातून मूल्यमापन करण्यात आले. साधारण 2007 मधील ही परिस्थिती आहे. मूल्यमापनानंतर पाणी हा कळीचा मुद्दा असल्याचे आढळून आले. केवळ पावसाळ्यापुरते वाहणारे प्रवाह अशी राज्यातील अनेक नद्यांची ओळख आहे. खांडबारा परिसरातील नेसू नदीची या पेक्षा वेगळी ओळख नाही.

नागन नदीची उपनदी असलेल्या नेसू नदीच्या काठावरील बहुतांश शेतकरी खरीप पिकांची पेरणी, मशागतीची कामे झाल्यानंतर शेजारच्या गुजरात राज्यात रोजंदारीच्या कामासाठी जातात. पिकांच्या काढणीच्या वेळी तसेच दीपावलीसाठी ते परत येतात. त्यानंतर पुन्हा कामासाठी रवाना होऊन होळीसाठी पुन्हा आपल्या गावी परतात. केवळ जिरायती पिकांपासून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न कुटुंबाचा गाडा समर्थपणे चालवू शकत नाही. त्यामुळे शेतात काम नसलेल्या काळात रोजगारासाठी स्थलांतर करण्याचा हा सिलसिला वर्षानुवर्षे सुरु आहे. या परिस्थितीत बदल घडवून आणून उदरनिर्वाहाचे शाश्वत साधन उपलब्ध करुन द्यायचे असेल तर पाणी या संसाधनाचा पर्याप्त वापर करणे आवश्यक आहे, यावर सर्वांचे एकमत झाले.

पाण्यावरुन युध्दाची भीती व्यर्थ ठरावी


वर्षातील सहा महिने रोजगारासाठी लगतच्या गुजरात राज्यात जाणार्‍या आदिवासींना उदरनिर्वाहाचे शाश्वत साधन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या प्रकल्पास आज बहुआयामी स्वरुप आले आहे. नेसू नदीवर ठिकठिकाणी बंधारे उभारले. पाणी अडविले आणि त्या पाण्यावर शेती फुलली. पाण्याच्या उपलब्धतेतून स्वत:च्या समृध्दीबरोबरच समुहाच्या सौख्याची कास धरणारा, विविध समित्यांच्या माध्यमातून एकत्र येऊन पाण्याचे व्यवस्थापन करणारा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जीवनदायिनी असलेल्या नदीची स्वच्छता व पर्यावरणशुध्दी यासाठी एकत्र येऊन प्रतिज्ञा करणारा समाज पाहिला की, पाण्यावरुन पेटणार्‍या संभाव्य युध्दाची भीती म्हणजे म्हणजे केवळ पाण्यावरील बुडबुडा ठरेल असा सुखद दिलासा मिळतो.

गटांची स्थापना :


नेसू नदीच्या पात्रात ठराविक अंतरावर वाळूच्या पोत्याचे बंधारे उभारण्यात आले. यासाठी परिसरातील समुह पातळीवरील गट, शेतकरी मंडळ, विद्यार्थी, बचत गट आणि युवाशक्तीची मदत घेण्यात आली. नदीच्या पात्रात 12 ठिकाणी आणि नाल्यावर पाच ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. या त्यामुळे पावसाळ्यानंतरही नदीचे पात्र प्रवाही राहिले. सुरुवातीची दोन तीन वर्षे पाणी असूनही कोणी रब्बीचा हंगाम घेतला नाही. अशावेळी एका जबाबदार आणि प्रामाणिक स्वयंसेवी संस्थेच्या भूमिकेतून डॉ. हेडगेवार सेवा समिती आणि कृषी विज्ञान केंद्राशी निगडित पदाधिकार्‍यांनी गावागावात जाऊन संवाद साधला. लागवडीसाठी पाण्याचा उपयोग करण्याचे आवाहन केले. हळूहळू ग्रामस्थांच्या मानसिकतेत बदल होत गेला. पाणी अडविल्यामुळे परिसरातील विहिरींची पातळी वाढली. पुढे मात्र लाभार्थींची संख्या अधिक असल्यामुळे मागणीप्रमाणे पाणी उपलब्ध होत नव्हते. कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा विकास यंत्रणेच्या शास्त्रज्ञांनी कार्यक्षेत्रातील विहिरींचे सर्वेक्षण केले.

या यंत्रणेच्या शास्त्रीय आधारावरील शिफारशीनुसार परिसरातील शेतकर्‍यांनी विहिरींचे खोलीकरण केले. चार ते सहा मीटर असलेली खोली 12 मीटरपर्यंत वाढविली. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढली. परंतु पाणी उचलण्याचे साधनच नसल्यामुळे काही विहिरींचा शेतीला पाणी देण्यासाठी उपयोग होत नव्हता. पाणी उचलण्याचे साधनच बहुसंख्य शेतकर्‍यांकडे नव्हते. या परिसरातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 20 हजार रुपयांपर्यत होते. त्यामुळे राज्य शासनाच्या विविध योजनांमधून विहिर खोदून मिळाली, परंतु पाणी उचलण्याचे साधन खरेदीसाठी निधी उपलब्ध नव्हता. गरजू शेतकर्‍यांची निवड करुन त्यांना डिझेल मोटर पंप,इलेक्ट्रिक मोटरपंप उपलब्ध करुन देण्यात आले. या प्रयोगामुळे प्रत्येक विहिरीतून उपलब्ध होणार्‍या पाण्यावर 8 ते 10 एकर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते असे आढळून आले.

या पाण्याचा वापर खरिप हंगामातील हमखास पिकांसाठी तसेच रब्बीत बागायती पिके घेण्यासाठी उपयोगात आणणे शक्य होते, कारण परिसरातील सुमारे 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत, त्यामुळे शेजारील शेतकर्‍यांना या पाण्याचा उपयोग करुन देता येऊ शकतो हे निदर्शनास आले. त्यानंतर जलस्त्रोत वापर गटाची संकल्पना अस्तित्वात आली. त्यासाठी नियमावली ठरविण्यात आली. गटात समावेश असलेल्या पाच शेतकर्‍यांना खरिपात भात, सोयाबीन, तूर, पिकांना संरक्षित पाणी द्यावे. रब्बीत हरभरा, भाजीपाला, गहू पिकांना पाणी उपलब्धतेनुसार किमान अर्धा व कमाल एक एकरासाठी पाणी द्यावे. दुरुस्ती व व्यवस्थापन खर्चासाठी एकूण किमतीच्या 10 टक्के रक्कम बँक खात्यात जमा करावी. आपल्या विहिरीतील पाणी परिसरातील शेतकर्‍यांना देण्याइतपत मानसिकतेत बदल घडवून आणणे हे या प्रकल्पाचे आगळे वैशिष्ट्य आहे.

आदिवासींची ससेहोलपट थांबण्याची आशा..


राज्याच्या नकाशावर नजर टाकली की उत्तरेस मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याच्या चिमट्यात अटकलेला नंदूरबार जिल्हा दिसतो. नंदूरबार जिल्हा आपल्या अनेकविध वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. सातपुडा आणि सह्याद्रीच्या पसार्‍यातील टेकड्यांनी पण दरवर्षी राज्यातील आदिवासीसाठींच्या व्यापलेल्या आणि आदिवासी जमातीचं बाहुल्य असलेल्या या जिल्ह्याचा इतिहास, संस्कृती आणि लोकजीवन प्राचीन काळापासून वेगळं आहे. नंदूरबार, नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा आणि धडगाव (अक्राणी) या सहा तालुक्यांचा समावेश असलेल्या विद्यमान नंदूरबार जिल्ह्याचा भूभाग सन 1998 पर्यंत धुळे जिल्ह्यातच सामावलेला होता. 65 टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील पाचही विधानसभा आणि लोकसभेचा एक मतदार संघ आदिवासींसाठी आरक्षित आहे. शिवाय सहा पंचायत समित्या, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील आदिवासींसाठीकडेच असतं.

राज्याच्या अर्थसंकल्पापैकी सुमारे 9 टक्के म्हणजे साधारण दोन हजार कोटी रुविविध योजनांसाठी मंजूर करण्यात येतात. त्यापैकी मोठा हिस्सा नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींसाठी असतो. तरी देखील मानव विकास निर्देशांकानुसार तळाशी असलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदूरबार जिल्ह्याचं अग्रभागी राहणं थांबलेलं नाही. कुपोषण पूर्णत: आटोक्यात आललं नाही. दळणवळणाच्या सोयींच्या अभावाची समस्या पूर्णत: निकालात निघालेली नाही. त्यामुळे शासकीय योजना आणि शासकीय यंत्रणा पाड्यापाड्यांपर्यत पोहोचण्यासाठीचा अडथळा कायम राहिला आहे. स्वजातीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिका-यांची मांदियाळी असताना, विविध योजनांसाठी निधीची चणचण नसताना देखील आदिवासींची ससेहोलपट का थांबली नाही? हा कायम चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. तथापि डॉ.हेडगेवार सेवा समिती आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत नियोजनबध्दपध्दतीने अमलात येणारे उपक्रम निश्चितच मनाला उभारी देणारे आहेत, हे नक्की.

नेसू नदी पूजन सोहळ्याच्या निमित्ताने जाणवलेल्या ठळक बाबी :
1. संपूर्ण कार्यक्रम स्थानिक भिलोरी भाषेत सादर होतो.

2. नेसू नदी काठावरील विविध गावातील जलदूत आपापल्या कार्यकक्षेत्रात झालेल्या पावसाच्या नोंदी जाहीर करतात.

3. गेल्या वर्षी झालेला पाऊस, पावसाचे एकूण दिवस, यंदाचा एकूण पाऊस,पावसाचे दिवस व खंड कळतात

4. खरीप व रब्बी पिकांचे नियोजन करणे शक्य होते

5. नेसू नदीवरील बंधार्‍यांमुळे हमखास पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे झालेल्या जलक्रांतीचे लाभार्थी आपले अनुभव कथन करतात. इतरांनी प्रेरणा घ्यावी यासाठी खास आग्रह

6. पाणी मुबलक उपलब्ध झाले. मात्र ऊस, कांदा या पिकांकडे कुणी वळणार नाही यासाठी कटाक्ष.

7. सोयाबीन, कापूस,गहू, हरभरा, तांदूळ, भाजीपाला या पिकांवरच लक्ष्य केंद्रीत

8. ठिंबक सिंचन व तुषार सिंचनासाठी आग्रह

9. कांदा, लसूण दर्जेदार बियाण्यांचे उत्पदनासाठी वाढता कल.. शेतकर्‍यांचा गौरव

10. तांदूळाच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच मार्केटिंगसाठी तांदूळ महोत्सव, राईस मिल्स यासारखे उपक्रम.

श्री. संजय झेंडे, धुळे - मो : 09657717679

Path Alias

/articles/naesauu-nadai-pauujana-bhauumai-pautaraancaa-mailana-saohalaa

Post By: Hindi
×