नद्यांचे स्वास्थ्य - भाग 3


नद्यांचे गत वैभव म्हणजे नैसर्गिक रूप जे आपण सर्वांनी अनुभवले आहे (अर्थात ज्या वाचकांचे आजचे वय 40 वर्ष असेल किंवा त्यापेक्षा जास्त) जे आज वयाने चाळीसीच्या आतले आहेत त्यांनी मात्र बदलत्या रूपाची स्थित्यंतरे अनुभवली आहेत.

नद्यांचे गत वैभव म्हणजे नैसर्गिक रूप जे आपण सर्वांनी अनुभवले आहे (अर्थात ज्या वाचकांचे आजचे वय 40 वर्ष असेल किंवा त्यापेक्षा जास्त) जे आज वयाने चाळीसीच्या आतले आहेत त्यांनी मात्र बदलत्या रूपाची स्थित्यंतरे अनुभवली आहेत. ज्या नदीत नदी शेजारच्या गावांची मंडळी रोज यथेच्छ पोहायची त्या नदीत आज आपण पाय सुध्दा भिजवायला तयार नाही कारण नदीतील वाढते प्रदूषण व नदी पात्रातील वाढता केरकचरा.

नदीचे पाणी फक्त केरकचरा टाकल्याने प्रदूषित होत नाही तर आजूबाजूच्या प्रगत शेती पध्दतीमुळे सुध्दा प्रदूषित होत आहे कारण आज प्रत्येक लहान मोठा शेतकरी वाढीव पीकाच्या अपेक्षेने पिकांना मोठ्या प्रमाणात कृत्रिम रासायनिक खते देवून नफा कमावण्याच्या लालसेपोटी स्वत:च्या शेतीतील मातीचा पोत तर खालावून बसले आहेतच व त्याचबरोबर आजूबाजूचे पाण्याचे साठे प्रदूषित करून संपूर्ण जलसंपत्तीचे नुकसान करून बसले आहेत.

आपण नदीचे अस्तित्व जमिनीच्या हव्यासापोटी संपविण्याच्या मागे लागलो आहोत. नदीपात्रात भराव टाकून नदीपात्रात अतिक्रमण करीत आहोत व सरकार सुध्दा सतत बदलणाऐया राजकीय विचार धारेमुळे अगदी बेशुध्द अवस्थेत वावरत आहे. कित्येक ठिकाणी नद्यांच्या पात्रांची रूंदी एवढी कमी झाली आहे की जर का अचानक मोठा पाऊस आला तर नदीचा प्रवाह नागरीवस्तीत घुसणार व त्याचा परिणाम मोठ्या मनुष्यहानीत होणार, याची उदाहरणे हल्ली आपण डोळ्याने पहात आहोत व अनुभवत सुध्दा आहोत पण त्या पासून काही बोध घेताना आपले सरकार अथवा आपण संवेदनाहीन प्रवृत्तीचे नागरिक दिसत नाही.

नदीच्या पात्रातील मानवी हस्तक्षेप थांबणे गरजेचे आहे व जर आपण हे हस्तक्षेप हळूहळू कमी करीत गेलो तर आपण परत नदीच्या मुळरूपाची अपेक्षा करू शकतो. राजकीय मानसिकता एवढी भयानक व असंवेदनाहीन बनली आहे की नदी पात्र सुरक्षतेबाबतचे कायदे सुध्दा बदलण्याची चेष्ठा सुरू झाली आहे. नदीचे पाणी प्रदूषित होवू नये म्हणून कायदा करून शासनाने मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न कठोर कायदा घटीत करून केला होता पण नुकताच तो कायदा शासनाने रद्द करण्याची चेष्ठा केली आहे अर्थात ह्या नवीन निर्णयामुळे नदीच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे, एवढेच नाही तर नदीच्या गतवैभवाची पुन्हा अपेक्षा करणे सुध्दा मूर्खपणाचे ठरणार आहे. आपण फक्त आर्थिक स्वार्थासाठी व खुर्चीच्या राजकीय मानसिकतेच्या दडपणाखाली ही असली कृत्ये करू लागतो आहोत व त्यासाठी आपण सर्वच नागरिक दोषी आहोत.

नदी नाल्यांच्या व जलसाठ्यांच्या संवर्धनासाठी नुकताच आपण जागतिक जलदिन साजरा केला पण त्या फक्त पोकळ गप्पाच ठरणार आहेत. आपण सातत्याने कृतीशील बनणे गरजेचे आहे. नेमकी आपली मर्जीतील ठराविक मंडळी वर्षातून एकदा वाताकुलीन सभागृहात जमणार व माईक हातात घेवून मी किती ज्ञानी आहे व मला किती कळते याचे आवाज बदलून मोठ्या मार्मीकपणे सादरीकरण करण्यापलिकडे आपण काहीच करू शकलो नाही व त्यात धंदेवाईक सामाजिक संस्था तर दबा धरून हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी धडपडत असतात कारण त्या निमित्ताने वृत्तपत्रकात संस्थेचे नाव व सोबत एखाद्या व्यक्तीचे नाव येते व ती वृत्तपत्रकातील कात्रणे शासकीय अनुदानासाठी अथवा वैयक्तिक पुरस्कारांसाठी उपयोगी पडतात.

जलदिंडीच्या नावाखाली जल पर्यटन करणारे मस्तमौला एखादा आठवडा नदी पात्रातून भटकंती करतात व त्याला पर्यावरण प्रबोधनाचे गोंडस नाव देवून शेजारी असणाऐया उद्योजकांना प्रदूषण ह्या विषयाखाली ब्लॅकमेल करून त्या दिंडीचा खर्च भागवितात तर ग्रामस्थांना भावनिक मुद्यावर भारावणारे एखादे व्याख्यान देवून त्यांची सहानुभूती मिळवून गावात रात्री खाण्याची व झोपण्याची सोय करून घेण्यात शहरी मंडळी अगदी तरबेज झाली आहे व हे कित्येक वर्ष असेच चालले आहे. अश्या दिंड्या जरी मागील एक तपापासून निघत आहेत व तो त्या मंडळींचा एक धंदा बनला आहे मात्र नदीबाबत आस्था निर्माण करण्या कामी अजीबात जनजागृती झालेली दिसून येत नाही म्हणूनच आपण कृतीशील होणे गरजेचे आहे.

जे उद्योग समुह सामाजिक कार्यात आर्थिक मदत करतात त्यांची मदत ही प्रत्यक्षपणे पर्यावरण संवर्धनाच्या कामी लागणे महत्वाचे आहे. आजकाल त्या पैश्याचा वापर सन्मान चिन्हे, हॉल भाडे, नाश्ता चहा व प्रवक्त्याच्या भाषणाच्या मानधनावर खर्च होतांना दिसत आहे. ही अनाठाई उधळणच म्हणावी लागेल. कोणालाही वाईटपणा घ्यायचा नाही, स्वत:ची पोटाची खळगी भरण्यासाठी आज कित्येक सामाजित संस्था सतत कार्यरत आहेत मग ती मानपानाची भूक असेल अथवा श्रेष्ठत्वाची महत्वकांक्षा पोटचा खटाटोप असेल. हे जरी वाचण्यास बरे वाटत नसले तरी ही सत्य परिस्थिती आहे व त्याबाबत येथे अवश्य चर्चा होणे गरजेचे आहे. जर आपल्याला भारतातील नद्यांच्या गत वैभवाबाबत विचार मंथन मालिका ह्या विषयावर आत्मियता दर्शवावी असे वाटत असेल तरच.

आपण नक्की नद्यांचा विकास करणार आहोत का नद्यांचा सुधार करणार याबाबत अद्याप कोणाकडूनच स्पष्ट होत नाही व त्यामुळे आपण मूळ विषयच विसरत चाललो आहोत तो म्हणजे 'नदीचे संवर्धन'. जर आपण नदी संवर्धन करण्याचे मनावर घेतले तरच आपला निभाव लागणार आहे. नदी संवर्धन व नदी सुधार अथवा नदी विकास यामध्ये नक्की काय फरक आहे ? तसा फरक अगदी मोठा आहे तो म्हणजे विकास करतांना त्याला वेगळे रूप अथवा स्वरूप निर्माण करून देणे त्यासाठी त्यात खूप बदल कृत्रिमपणे घडवून आणणे व त्याचा प्रत्यय लगेच स्पष्ट दिसू लागणे या प्रक्रियेस विकास म्हणता येईल.

नदीवर सिमेंटचे घाट बांधणे, नदीत गरूड स्तंभ उभारणे आदी नदी विकासाची कामे ह्या प्रकियेत येवू शकतात. ते नदी सुधार मध्ये फक्त जुन्या गोष्टी दुरूस्त व नव्याने त्याला बळकटी देणे आदी असू शकतात. तुटलेला घाट दुरूस्त करणे याला सुधार म्हणू शकतो. थोडक्यात जुन्या अस्तित्वात असलेल्या बाबी पुन्हा वापरात आणणे मात्र नदी संवर्धन या बाबीकडे वेगळेपण आहे ते म्हणजे आज नदीचे रूप जे आहे ते जसेच्या तसे आबाधित ठेवून काल अथवा मागील अनेक वर्षात ऐहास पावलेल्या नैसर्गिक जीवन मूल्यांची जोपासना करण्याच्या प्रक्रियेस आपण संवर्धन म्हणू. या प्रक्रियेत भूतकाळाचा संदर्भ आधारभूत मानून त्या वातावरणाची निर्मिती पुन्हा जाणीवपूर्वक व गंभीरपणे करणे याला केंद्रबिंदू मानूनच प्रक्रिया निसर्गाच्या सोबत राहून केली जाते. निसर्ग नियम मान्य करूनच केलेली कार्यपध्दती संवर्धन प्रक्रियेत महत्वाची ठरते.

संवर्धन, सुधार व विकास याबाबत खूप काही विचार असू शकतात पण जर आपल्याला भारतातील नद्यांच्या गत वैभवाबाबत विचार मंथन व कृतीशील आराखडा बनवायचा असेल तर मात्र नदी संवर्धन करावे लागणार आहे.

आपण मागील सत्रात इंद्रायणी नदीचा वडगांवर पर्यंतचा प्रवास चर्चेत घेतला होता व इंद्रायणी नदीत रासायनिक प्रदूषण सभोवतालच्या शेतीतील खतांमुळे आणि ग्रीन हाऊस मधील विविध औषधांच्या मोठ्या प्रमाणात होणाऐया वापर पध्दतीमुळे होतांना ची चर्चा केली होती. इंद्रायणी नदीचा कुरवंडे ते वडगांव प्रवास आपण पाहताना काही गोष्टी लक्षात आल्या आहेत ते म्हणजे ह्या भागात प्रचंड पाण्याचा साठा आहे व त्या साठ्याला निरनिराळ्या छोट्या बंधाऐयात अडवून शासनाने खूप सुंदरा सोय करून ठेवली आहे पण हे जलाशय अथवा जलसाठे प्रदूषित होवू नयेत याबाबत हवे तसे नियंत्रण सरकार कडून राबविले जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. हे प्रदूषण नागरिकांच्यात जनप्रबोधन घडवून आणल्यास नियंत्रणात येवू शकते अर्थात ह्या विषयात पुढाकार घ्यायचा कोणी व त्यासाठी वेळ कोणी खर्च करायचा हा मुद्दा महत्वाचा आहे.

नदीपात्रात म्हणण्यापेक्षा नदीच्या प्रवाहात नेहमी वावरणारी जैव विविधता जोपासण्यासाठी ती जैवविविधता प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर बदलत असते याचा अभ्यास होणे महत्वाचे आहे. प्रत्येक ठिकाणी जैवविविधता बदलत जाते व त्यामुळे जैवविविधते बाबत ठोकताळे बांधणे व मते प्रकट करणे निसर्गास कदापी मान्य नाही.

नदीच्या प्रवाहात व नदी तीरावरील जैवविविधता बाबत आपणास वेगळे अनुभव व सत्यतेचे पुरावे जुन्या पिढीतील माणसांकडूनच कथन करून घेवून नोंदविणे महत्वाचे ठरणार आहे कारण आज नदीच्या किनाऐयावरील घनदाट जंगले नष्ट झाली आहेत त्यामुळे मूलभूत जैवविविधता नष्ट झाली आहे व त्याचे पुरावे जर सापडले तरच आपणास नदीचे गत वैभव पुन्हा निर्माण करणे शक्य आहे. ह्या सर्व प्रयत्नात शासकीय पाठींबा व मानसिकता फार महत्वाची आहे त्याचप्रमाणे आपण सर्व पर्यावरण प्रेमी मंडळींने स्वत:च्या संस्थेसाठी फायद्याच्या अथवा वैयक्तिक मानपानाच्या अपेक्षा सोडून एकत्रित पुढाकार घेणे आवश्यक आहे.

नदीपात्राच्या दुर्तफा मोठ्या प्रमाणात स्थानिक वंशाची झाडे अथवा त्या ठिकाणचा पूर्व इतिहास लक्षात घेवून वृक्षारोपण होणे गरजेचे आहे व त्यांच्या ह्या परिश्रमाचे मोल व्हावे म्हणून त्यांना त्यासाठी आर्थिक लाभाची सोय करून देणे गरजेचे आहे, आजच्या सामाजिक मानसिकतेमध्ये झाडाची योग्य निगा फुकट कोणीही राखणार नाही म्हणून मोबदला स्पष्ट रूपात व योग्य दिला जाणे महत्वाचा मुद्दा विसरता येणार नाही.

घायपात सारख्या बहुउपयोगी वनस्पती पूर्वी नदीपात्राच्या बाजूने मोठ्या प्रमाणात आढळून यायची त्यामुळे नदी पात्राच्या बाजूने एक नैसर्गिक सुरक्षा कवच बनलेले असायचे व त्यात अनेक प्राणी सुरक्षित रहायचे व नदीच्या पात्रात मानवी हस्तक्षेप कमी व्हायचा. ही वनस्पती मानवाच्या व इतर सजीवांच्या दृष्टीने फार महत्वाची होती जीचा आता पूर्ण नायनाट झालेला आढळत आहे. ही वनस्पती नैसर्गिक पध्दतीने जंगले निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील एक विशेष बाब म्हणून संबोधता येईल. अश्या घायपाताच्या झुडपात जर आपण जंगली वनस्पतीच्या बियांची उधळण केली तर पुढील 5 वर्षात तेथे जंगली झाडे कोणतेही वृक्षारोपण न करतासुध्दा वाढताना दिसतील व घायपात कमी होईल. हा बदल बारकाईने लक्षात घेतला तर तेथील घायपाताची रोपे आपणच जर दुसरीकडे पुर्नरोपण केली तर ही घायपात वनस्पती तुमच्या आयुष्यभर तुमच्या सोबत जंगले वाढविण्याच्या प्रक्रियेत सातत्याने सहकार्य करेल व नदी पात्राची होणारी मातीची धूप थांबवण्यात महत्वाची भूमिका निभावू शकते.

करंज, उंबर, वड, पिंपळ, चिंच, जांभूळ आदी जातीची झाडे नदी किनाऐयावर जर वाढविली तर आपणास एकदम सोपे होणार आहे कारण ह्या झाडांना जोपासणे सोपे असते, ही झाडे निसर्गाच्या कोणत्याही परिस्थितीत तग धरून जगतात हे ह्या झाडांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वृक्षप्रेमी मंडळींने नद्यांच्या गतवैभवात वाढ करण्यासाठी हा विचार गंभीरपणे करणे गरजेचे आहे. एकदा नदी पात्राच्या दोन्ही बाजूने झाडांचे अस्तित्व निर्माण झाले की लगेच तेथे विविध पक्षी व प्राणी आपोआप वापर वाढवितात आणि त्यांच्या वावराने आपोआप निसर्गाची चक्रे फिरू लागतात आणि आपोआप अन्नसाखळी सुरू होते व हेच आपणास निर्माण करावयाचे आहे. हे निर्माण करण्यासाठी परिस्थितीत निर्माण केली तर भारतातील नद्यांच्या गत वैभवाबाबत आपण आशादायी ठरू शकणारच.

नदी प्रवाहात जर रसायने मिश्रीत प्रदूषित पाणी आले नाहीतर आपण जलचर प्राणी यांच्या आबादी बाबत संतुष्ट होवू शकू कारण ह्या जलचर प्राण्यांचा फार मोठा सहभाग नदीच्या पाण्याच्या शुध्दतेमध्ये व स्वच्छतेमध्ये आहे हे विसरता कामा नये. जलचर प्राण्यात कासव, बेडूक, खेकडे, मासे हे सजीव महत्वाची भूमिका निभावत असतात व त्या प्रजाती भारतातील नद्यांच्या गत वैभवाबाबत महत्वाची जबाबदारी निभावणार आहेत हे सत्य लपणारे नाही.

आज प्रत्येक नदीत मिसळणारे घातक रसायन युक्त प्रदूषित पाणी ह्या जलचर प्राण्यांच्या जीवन मरणाची समस्या म्हणून समोर येत आहे. जरी काही प्रगत तंत्रज्ञानाने मलशुध्दीकरण प्रकल्प राबविले तरी पावसाळ्यात शेतीतून वाहत येणारे पाणी ही घातक रसायने नदीपर्यंत सहज वाहून आणतात. यासाठी आपणास ह्या प्रकारच्या रसायनांच्या वापरावरच बंधने घालणे आवश्यक आहे पण ते बंधन व्यवहार दृष्टीकोन व प्रगत कृषी पध्दतीमधील बदल यांना कितपर्यंत पुरक ठरेल याबाबत विचार मंथन होणे गरजेचे आहे. कीटकनाशके व त्यांचा वापर पध्दती या विषयी अनेक विचार प्राणाली निर्माण झाल्या आहेत. स्वार्थी विचारणसरणी आज बळावत असल्याने आपणास ही समस्या सोडविताना फार मोठ्या सामाजिक मानसिकतेला सामोरे जावे लागणार आहे व हेच खरे आवाहन भारतातील नद्यांच्या गत वैभवाबाबत विचार करताना स्वीकारावे लागणार आहे.

ज्या परिसरात शेती जास्त प्रमाणात आहे तेथील प्रदूषण थांबविणे फार अवघड आहे असे एकंदरीत चित्र आहे कारण औद्योगिक प्रदूषण हे आटोक्यात आणणे अथवा शुन्य प्रदूषण ही प्रक्रिया राबविणे हे सहज शक्य आहे त्यासाठी काही थोड्याच प्रयत्नातून मोठे यश येवू शकते पण ती परिस्थिती शेती बाबत नाही.

नागरी वस्तीतून होणारे प्रदूषण हे आपल्या सारख्या नागरिकांच्या अविवेकी मानसिकतेमधून निर्माण झालेली समस्या आहे व जर भविष्यात आपण जर ही बेजबाबदार वर्तन पध्दती बदलली नाही तर मानव जात एखाद्या साथीच्या आजाराची शिकार होईल व पूर्ण मानव जमात नष्ट होईल आणि फक्त शिल्लक राहणार ती मानव विरहित पृथ्वीच. आज आपण भारतातील नद्यांच्या गत वैभववाबाबत बोलतांना आपणास नुकतीच वर्तविलेल्या शक्यतेबाबत गंभीरतेने विचार करणे महत्वाचे आहे. जागतिक तापमानातील बदलाच्या मुख्य कारणामध्ये आपल्या सर्व नद्यांची आपण केलेली दुर्दशा हा महत्वाचा कळीचा मुद्दा आहे.

या आधी इंद्रायणी नदी आपण वडगांव पर्यंत अभ्यासली होती इथपर्यंत आपल्या नदीत फक्त नागरी वस्तीतील प्रदूषित पाणी व शेतीतून होणारे रासायनिक प्रदूषण हे दोनच विषय समोर होते पण या नदीला प्रदूषित करणारा तिसरा घटक म्हणजे औद्योगिक सांडपाणी प्रदूषण की ज्याच्यावर शासनाच्या कोणत्याही विभागाचे नियंत्रण दिसून येत नाही ही अगदी शासनाच्या बेजबाबदारीची सद्यस्थिती आहे. इंद्रायणी नदीला आणखी एक आंध्रा नावाची उपनदी राजापुरी बंधाऐयानंतर येवून मिळते व हा एक मोठा वर्षभर पाणी पुरविणारा पर्याय इंद्रायणी नदीला उपलब्ध आहे. अर्थात ही आंध्रा नदी एका मोठ्या पाणी साठ्यातून उगम पावते. सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीतील कांबरे, ठोकरवाडी नावाच्या गावाच्या परिसरात पसरलेला हा जलाशय वर्षभर पाण्याने भरलेला असतो अर्थात त्याचा पसार मोठा आहे असे म्हणावे लागेल व या जलाशयावरच आंध्रा धरण बांधले आहे.

ह्या धरणाची पाणी साठवण क्षमता मोठी आहे. आपणास निसर्ग निर्मित नदी काय असते हे पहावयास ह्या नदीवर जावे लागेल व नदीचे नैसर्गिक रूप अनुभवता येईल म्हणूनच मी दावा करतो की जर मानवी हस्तक्षेप कमी झाला तर भारतातील नद्यांच्या गत वैभववाबाबत आपणास समाधानपूर्वक चित्र दिसून येईल. ही आंध्रा नदी आंध्रा धरणापासून पुढे वाहताना त्यात कशाळ वगैरे परिसरातील अनेक प्रवाह मिसळतात व नंतर कोडीवळे गाव पार करून नदी पुढचा नागमोडी प्रवास करीत इंद्रायणीच्या मूळ प्रवाहात विलीन होते आहे. आंध्रा नदीचे पाणी आज सुध्दा खूप शुध्द व स्वच्छ आहे. लोणावळ्यातील मानवी मलमूत्र घेवून सुरू झालेली इंद्रायणी नदी कुंडली नदीच्या पाण्याच्या जीवावर पुढे आली व आता त्यात आंध्रा नदी पण सामील झाली. यानंतर नदीचे पात्र रूंदावले आहे व इंद्रायणी नदी पात्र विशाल वाटू लागते आणि वडगावच्या नागरी वस्तीच्या विळख्यात ही नदी प्रदूषित होणे सुरू होते. या प्रदूषणास काही विशिष्ट प्रदूषण म्हणता येणार नाही कारण सर्वच प्रकारांचा प्रदूषणांचा अतिरेक झालेला आढळून येतो.

आंबी गावाच्या परिसरातून नदी पुढे इंदुरीला पार करून काटेश्वर बंधाऐयात अडकते त्याच्या पुढे शेलारवाडी बंधारा व कानेवाडी त्यानंतर सांगुर्डी या अगदी जवळच्या अंतरावरील तीन बंधारे ओलांडून इंद्रायणी नदी देहू परिसरात प्रवेश करण्याआगोदर तिला आणखी एक छोटी सुधा नदी जाधववाडी वरून येवून देहूच्या बंधाऐयानंतर मुख्य प्रवाहात मिसळते. आपण आता देहू परिसरात आलो आहोत व पाहुया या धार्मिक व संताच्या पुण्यनगरीत आपले भारतातील नद्यांच्या गत वैभवाबाबतचे स्वप्न पुरे करू शकतो का ? वारकरी इंद्रायणी नदीच्या पावित्र्यासाठी काही योगदान करण्यास तयार आहेत का ?

मालिका - श्री. विकास पाटील, पुणे - मो : 07798811512

Path Alias

/articles/nadayaancae-savaasathaya-bhaaga-3

Post By: Hindi
×