नद्यांचे गत वैभव प्राप्त करू शकतो का ? - भाग 8


नदीच्या गतवैभवाबाबत आपण जेव्हा बोलतो अथवा लिखाण करतो त्यावेळेस आपण एका शांत व गंभीर विचारांची शंखला बनवित असतो. विचारांची मालिका अथवा माळ बनवितांना अगदी सुखद आठवणी आपल्या समोर येतात. अगदी क्वचितच आपण नदीच्या संहारक प्रसंगांची उदाहरणे अथवा आठवणींना उजाळा देतो.

नदीच्या गतवैभवाबाबत आपण जेव्हा बोलतो अथवा लिखाण करतो त्यावेळेस आपण एका शांत व गंभीर विचारांची शंखला बनवित असतो. विचारांची मालिका अथवा माळ बनवितांना अगदी सुखद आठवणी आपल्या समोर येतात. अगदी क्वचितच आपण नदीच्या संहारक प्रसंगांची उदाहरणे अथवा आठवणींना उजाळा देतो. पूर्वीच्या काळी नद्यांना महापूर येत असत पण घरे वाहून गेली अथवा गावेच्या गावे वाहून गेली अशी प्रकरणे फार क्वचित घडत होती कारण माणसाला नदीच्या मर्यादांची पूर्ण जाण होती व नदीच्या भयावह रूपाची जाणीव प्रत्येकाला होती. त्याकाळचा मानव नदीच्या मार्गात हस्तक्षेप करित नसे जे आजकाल एकदम विपरित घडत आहे.

आजच्या प्रगत समाज व्यवस्थेत नदी प्रवाहात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. आज शेंबड्या पोरापासून नासाच्या वैज्ञानिकापर्यंत सर्वजण 'जागतिक तापमान' वाढीच्या बाबत फार चर्चा करतांना दिसतात. तापमान वाढले की अर्थात पावसाचे प्रमाण वाढणार व अनियमितता वाढणार हे सर्वांना माहिती असूनसुध्दा त्या नदीच्या प्रवाहातील पाण्याला मोकळा मार्ग देत नाही आणि त्यामुळे अनेक हाहा:कार आपण मागील 60 - 70 वर्षात ऐकले आहेत, पाहिले आहेत किंवा 30 - 35 वर्षात टिव्ही वर पाहिले आहेत. त्याचबरोबर त्यामुळे झालेले अफाट नुकसान मानवाने स्वत:च्या मूर्खपणापोटी सहन केले आहे.

नदीला दर वर्षी पूर येतो मग कशाला नदीच्या पात्रालगत घरे बांधून रहायला जायचा शोक माणूस आज करीत आहे. रिव्हर व्ह्यू नावावर आज खूप बांधकामे अगदी नदीपात्रात सुध्दा होतांना दिसत आहेत त्यामुळे आपण डोळे असूनसुध्दा आंधळे, कान असून बहिरे व बुध्दी असून र्निबुध्द बनले आहोत. आपल्याकडे आज दुष्काळ बाबत खूप बोलले जाते पण त्यामागील खरी कारणे कोणती आहेत या विषयी कोणीही सत्य वचन अथवा सत्य लिखाण करतांना दिसत नाही. जे लिहितात त्यांना विषयाची खोलवर माहिती नसणे व फक्त विषयाला हलकासा स्पर्श करणे हाच हेतू असतो हेच नदी बाबत झाले आहे.

नद्यांच्या गतवैभवाबाबत सखोल माहिती मिळविण्यासाठी आपणास खरोखर नदीपात्रांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. इंद्रायणी बचाव कृती समितीने हा अभ्यास इंद्रायणी नदी बाबत उगमा पासून संगमापर्यंत केला व त्या अभ्यास गटाची सर्व सूत्र नशिबाने मला हाताळायला मिळाली होती व आणखीन एक अतिशय सुदैवाची बाब म्हणजे कै. संदीप जोशी (सेरी ग्रुप) हे पर्यावरण तज्ज्ञ आमच्या टीमचे नेतृत्व करीत होते त्यांनी आमच्या टीमला एक अभ्यासक्रम दिला व त्याप्रमाणे नदी पात्राचा अभ्यास केला गेला. यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा शासकीय अनुदानासाठी आम्ही कोणाकडे सुध्दा भिकेची याचना न केल्याने आमचे प्रयत्न हे कमी महत्वाचे व क्षुल्लक समजून कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. अर्थात इंद्रायणी बचाव कृती समितीने इंद्रायणी बचाव उपक्रम आज पर्यंत तसाच सुरू ठेवला आहे.

नदीच्या गतवैभवाची खासियत अशी होती की नद्यांचे प्रवाह हे वर्षीभर जीवंत असायचे व त्यातूनच नदी पूजन व धार्मिक विधी हे सर्व संस्कार नदीच्या पाण्याशी निगडित झाले. नदीत गणेश मूर्ती विसर्जन हा हिंदू धर्मातील संस्कार तेथेच जन्माला आला पण तेव्हा गणेश मूर्ती मातीच्या (शाडू माती) असायच्या व निर्माल्य हे पर्यावरण पूरक असायचे. गणेश मूर्ती खोलवर पाण्यात विसर्जन करायची व निर्माल्य वाहत्या पाण्यात अर्पण करावयाचे हे सत्यरूप विसरून आज नदीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती ढीग करून पडून राहतात व वाहते पाणी नसल्याने निर्माल्य नदीच्या डोहात कुजतांना दिसत आहे. गणेश मूर्ती विसर्जन हे शुध्द व स्वच्छ पाण्यातच व्हायला हवे व जर ही अपेक्षा आपली सर्वांची असेल तर मात्र आपण बडबड करण्यापेक्षा नदी वाचविण्यासाठी कृतीशील होणे गरजेचे आहे.

आपण पाहतो की नगरपरिषद, महानगरपालिका, शासन यांचे पदाधिकारी अथवा लोक प्रतिनिधी अनेक वेळा जनतेच्या पैश्यावर परदेश दौरे करतात पण त्यातील एक ही व्यक्ती नदी संवर्धन विषयक इतर देशांनी स्वीकारलेली अथवा अवलंबलेली धोरणे या बाबत निरीक्षण करीत नाहीत. प्रत्येक जण जनता आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यापासून मोदी यांना खूष करण्यासाठी गुजराथ कौतुक व साबरमती नदीबाबत चुकीची बडबड करीत आहे. साबरमती नदीला भिंती बांधून अडविण्याचा अविचार जरी पैश्याची उधळ पट्टी करण्यासाठी केला असला तरी निसर्ग मात्र तो प्रयत्न अथवा केलेला बदल स्वीकारण्यास तयार नाही हे एक वर्षात समोर येवू लागले आहे.

आजपर्यंत नदीचे लचके तोडण्यात लुटारूंनी एकाग्रता दर्शविली तर दुसऱ्या बाजूला समाज प्रबोधनकरांनी फक्त बघ्याची भूमिका निभावली आहे. आजपर्यंत काय झाले याची वायफळ चर्चा करण्यापेक्षा आज व आता पासून मला काय करता येईल याबाबत कृती होणे गरजेचे आहे.

मी काय करू शकतो ? हा साधा प्रश्न जर स्वत:ला विचारला तर त्याचे उत्तर आहे की मी स्वत: एखाद्या 'दबाव गटाचा ' सदस्य होणे गरजेचे आहे व स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण करून अश्या कोणत्याही गैरप्रकारांना आश्रय देणार नाही याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना समज देवून त्यांना योग्य काम करण्यास प्रवृत्त करून त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुरूवातीला आपल्या प्रयत्नांची दखल कोणीही घेणार नाही म्हणून आपण नाराज न होता आपल्या दबावगटाची ताकद वाढविणे गरजेचे आहे. सातत्याने पाठपुरावा व लेखी निवेदने देत राहणे ही आपली दिनचर्या होणे गरजेचे आहे. प्रसंगी आपणास विरोध सुध्दा होईल पण त्या विरोधास प्रशासकीय मार्गाने सामोरे जाणे गरजेचे राहील.

एक दिवस असा येईल की आपले सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत असा अनुभव येईल त्या वेळेस न्यायालयीन दाद मागणे हा पर्याय हाती घेणे गरजेचे आहे. न्यायालयात जरी त्वरित न्याय मिळाला नाही तरी हरकत नाही पण त्या विषयात होणारी पर्यावरणाची हानी करणाऱ्या मंडळीस चिमटे बसू लागतात व समोरच्या माणसास मनात एकदा तरी लाज वाटते जरी त्याने ती व्यक्त केली नाही तरी त्याला त्याच्या कृत्याचा पश्चताप होत असतोच. न्यायालयीन प्रक्रिया ही खर्चिक व वेळकाढूपणाची असली तरी त्यामुळे प्रक्रिया थंडावते व हळूवार विषयाचा सखोल अभ्यास प्रक्रिया सुरू होते.

आजपर्यंत न्यायालयीन प्रक्रियेबाबत सगळ्यांची मते जरी उदासिन असली तरी न्यायालयच आपणास न्याय देणार आहे या बाबत खात्रीशीर रहाणे योग राहील. आजपर्यंत खूप वेळी नदीपात्र अतिक्रमण व नदी प्रदूषणाच्या नियंत्रणाबाबत न्यायालयाने योग्य आदेश दिले आहेत पण स्थानिक प्रशासनाकडून त्या आदेशांना योग्य प्रकारे आचरणात आणले गेले नाही कारण स्थानिक प्रशासन, स्थानिक राजकीय मंडळीच्या मनमनी प्रमाणे नोकरीत दिवस भरत असतात म्हणूनच आपला दबावगट हा प्रभावी ठरणे आवश्यक आहे व तसा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

नदी बाबत एकच मंत्र महत्वाचा आहे तो म्हणजे 'नदी अस्वच्छ न करणे'. हा मंत्र अगदी सोपा आहे, नदीच्या बाबतीत मानवी हस्तक्षेप कमी करणे व नदीला नैसर्गिक रूपात ठेवण्याची मानसिकता समाजात वाढविणे किंवा बनविणे. फक्त विचरमंथन करणे, दरवर्षी देखावा करण्यासाठी नदीच्या नावाने कार्यक्रम करणे, नदी उपक्रमासाठी रकमा जमा करणे, प्रसिध्दीसाठी व्याख्याने आयोजित करणे व शेवटी पेपरबाजी करणे हे उद्देश बंद होणे गरजेचे आहे.

आपल्या घरातील महिला, लहान मुले यांना शक्यतो वारंवार नदीचे दर्शन घडविल्यास त्यांना नदी बाबतची संकल्पना लगेच कळेल व प्रत्येक घरातून नदी विषयक चर्चा सुरू होईल मग ती चर्चा आपोआप घराबाहेर पोहोचेल. नदीचे चांगले रूप व गलिच्छ रूप काय याची तुलना करण्याची प्रक्रिया समाजात गतीमान होईल व आपोआप नदी संवर्धन बाबत प्रत्येकाच्या मनात काहीतरी विचार जन्माला येतील. जी तरूण मंडळी आज नदीच्या गोंडस रूपाला मुकली आहेत त्यांना त्या गोंडस रूपाबाबत सांगा, बोला अथवा वर्णन करून त्यांच्या अपेक्षा उंचावणे गरजेचे आहे.

आपण आपल्या घरातून ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मागील 5 वर्षात निर्माल्य दान व मूर्ती दान संकल्पना समाजात नदी स्वच्छतेसाठी मान्यता प्राप्त करू लागली आहे व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याची प्रचिती गणेश विसर्जन काळात दिसून येत आहे. ह्या संकल्पनेस आपण त्याच भावनेने अथवा त्याच गतीने वर्षभर राबविणे गरजेचे आहे व तेच महत्वाचे कार्य आपण सर्व सुज्ञ जनांनी पुढे नेणे गरजेचे आहे. प्रत्येकाची कार्य पध्दती व त्यामागील प्रेरणा वेगळी असते त्यामुळे ज्याला जेवढे शक्य असेल तेवढे स्वत:च्या आत्म्याला आनंद मिळेपर्यंत पुढाकार घ्यावा.

नदी घाट स्वच्छता करून फक्त भागणार नाही तर त्या घाटावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस नदी बाबत आपुलकी व आत्मियता निर्माण होणे गरजेचे आहे तसे जर होणार नसेल तर आपली जबाबदारी आहे की त्यांना पोषक वातावरण निर्मिती आपण निर्माण करून देणे. स्थानिक प्रशासनाकडून आपणास मर्यादित अपेक्षा ठेवता येतात कारण त्यांच्या कार्यमर्यादा ह्या आकारबंध असतात पण आम्हा नागरिकांना कार्य मर्यादा आभाळायेवढ्या असतात.

एक नदी उगम पावल्या पासून समुद्रात विलीन होईपर्यंत अनेक मानव निर्मित प्रांतातून व भौगोलिक परिस्थितीतून वाहत असते त्यामुळे त्या नदीकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रत्येक ठिकाणी भिन्न असतो. नदी शहरी भागातून वाहतांना ती एक फक्त मैलापाणी वाहून नेणारी गटारगंगा असते, तीच नदी एखाद्या तिर्थक्षेत्राजवळून वाहतांना पवित्र नदी (माता) म्हणून मानली जाते तर औद्योगिक परिसरातून वाहतांना विषनदी म्हणून वर्तन करते व पुढे शेती प्रभागात ती फक्त उपसा केंद्र म्हणून अस्तित्वात असते. शेवटी तीचे खरे रूप नष्ट होते ते समुद्राच्या मिलनाने. पण जंगलातून जन्माला आलेली नदी म्हणून संबोधले जाते ही एक व्यथा असली तरी ती दूर करण्याजोगी परिस्थिती / आवश्यकता आज निर्माण झालेली आहे. पुण्यातील 5 नद्या त्यातील इंद्रायणी, पवना व मुळा ह्या पिंपरी चिंचवड शहरात तर मुठा व रामनदी ह्या पुणे शहरात आहेत पण एकही नदी आज स्वच्छ व शुध्द स्वरूपात नाही. पवना नदी साठी आज खूप चर्चा सुरू आहे त्यातील अर्धी चर्चा फक्त पाणी वाटपावरून सुरू आहे तर बाकीची चर्चा श्रेय लाटण्याबाबतची आहे. पवना नदीचे पाणी प्रदूषित होवू नये म्हणून बोलणे अपेक्षीत आहे पण होत आहे अगदी उलट. नदीत पोहण्यासाठी उड्या मारणारे पिंपरी चिंचवडकर नदी पात्रात घरे बांधण्यासाठी उड्या मारत आहेत.

नदीचा मानवाला नक्की उपयोग काय असेल तर तो म्हणजे वर्षभर पिण्याचे पाणी व पिकांना तसेच सजीवांना जगण्यासाठी आवश्यक पाण्याची गरज भागविणारी यंत्रणा. ह्या नदीतील पाणी धरण बांधून अडवून त्या पाण्याचा वापर विविध कार्यासाठी होत असताना असे कृत्रिम पाणीसाठे सुरक्षा कोणी करावयाची या साठी आपण जर भांडत बसणार असू तर आपण पशुच्या जन्माला आलो आहोत का ? असा प्रश्न पडतो. आपल्या जवळपासचा कोणताही जलसाठा डोळ्यासमोर आणा व तेथील परिस्थिती तपासा. आजूबाजूचे नागरिक रोज सकाळी शौचास त्या जलसाठ्यावर हक्काने जातात, नंतर त्यात पोहतात. पोहणे संपल्यावर महिला वर्ग धुणी धुण्यासाठी जातात. धुणी झाली की वाहने धुण्याचे दिवसभर प्रकार दिसतात. जवळच्या स्मशानभूमीत निर्माण झालेली सर्व राख सरळ नदीत ढकलून देतात, नागरी वस्तीतील निर्माण झालेला इमारत बांधकामातील राडारोडा जलसाठ्याच्या किनाऱ्यावर ओतला जातो. हे सर्व विषय सर्वत्र पहावयास मिळत आहेत. याचाच अर्थ आज आपण जलसाठ्यांचे संवर्धन तर सोडाच त्यांचे रक्षण सुध्दा करीत नाही हे सत्य आहे.

पवना नदीवर रावेत गावात एक बंधारा आहे व त्या बंधाऱ्यात पवना धरणातून पाणी विसर्ग केले जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 440 दश लक्ष लिटर / पुणे महापालिका 40 दश लक्ष लिटर / एस.आय.डी.सी 100 दश लक्ष लिटर पाणी रोज वापरासाठी ह्या धरणातून उपसा करतात व नागरिकांची (20 लाख लोकसंख्या) पाण्याची गरज भागवितात. अश्या ह्या महत्वाच्या रावेतच्या धरणाची (जलसाठ्याची) सुरक्षा बेभरोसे आहे. तेथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नाही, 1000 ते 1500 नागरिक सकाळी शौचास बसतात, 100 ते 150 महिला कपडे धुतात, 20 ते 25 धोबी त्यांचा व्यवसाय करतात, पाच पंचवीस दुचाकी, चारचाकी वाहने धुतली जातात. एवढा मोठा गलिच्छ प्रकार पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनास, पर्यावरण संवर्धन समिती 2004 साला पासून निदर्शनास आणून देत आहे पण आज पर्यंत फक्त त्या ठिकाणी एक स्वच्छता नियमांच्या फलका व्यतिरिक्त काहीही सुधारणा केली नाही कारण त्या जलसाठ्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे असे सांगितले जाते. खरे पाहता नदी ज्या गावाची त्या गावाची मालकी नदीवर असते त्यामुळे जो मालक तोच रक्षक असणे योग्य ठरेल पण तसे होतांना दिसत नाही. नदीबाबत कोणतीच जबाबदारी स्वत:हून घेतांना दिसत नाही फक्त एकमेकाकडे बोट दाखविण्यापलिकडे काहीही घडत नाही.

केंद्र सरकारने असा एखादा कायदा नदी बाबत करावा की त्या अंतर्गत नदी ज्या ज्या ठिकाणी नागरी वस्ती मधून प्रवास करते त्या परिसरात नदी पात्राला जाळ्या लावून सुरक्षीत करावे. कोणालाही नदी पात्रात प्रवेश करण्यास बंदी असणे गरजेचे आहे. नदी पात्रात प्रवेश म्हणजे गुन्हा (दखलपात्र) ठरला पाहिजे. असा कायदा जर तयार झाला तर एखाद वेळेस सत्तापालट होवू शकेल अन्यथा फार मोठी क्रांती घडेल. कायदे करून समस्या मिटत नाही तर दूर होण्यापेक्षा कायद्यातील पळवाटा मुळे कायद्याचे विडंबनच होते हे जरी खरे असले तरी कायद्याचा धाक 95 टक्के नागरिकांना असतोच त्यामुळे मानवी हस्तक्षेप काही प्रमाणात कमी होवू शकेल.

पवना नदीच काय ? आज प्रत्येक नदी बाबत हीच शोकांतिका आहे. पावसाच्या अनियमित वर्तनामुळे आता तरी नदीतील पाणी साठवून ठेवणे व नद्या प्रदूषित होवू न देणे ही एक बाब माणसाच्या हाती शिल्लक आहे. वेळ गेलेली नाही, आज आपण आपल्या मागील झालेल्या चुका दुरूस्त करू शकतो.

इंद्रायणी नदीबाबत जशी जागृती निर्माण झाली तशी सर्व नद्या बाबत होणे गरजेचे आहे. फक्त गंगा यमुना स्वच्छ करण्यात स्वत:ला धन्य मानणाऱ्या पुणे-करांनी आपल्या घरातली रामनदी जीवंत करणे महत्वाचे आहे. मुळा - मुठा संगमावरील गलिच्छ चित्र बदलणे गरजेचे आहे. पुण्यातील नदी विषयक अभ्यसकांकडून मार्गदर्शन घेणे सोडून राजस्थान मधील अभ्यसकांना पुण्यात आमंत्रित करून स्थानिक विचारवंतांना नाराज करण्याची सवय जडलेल्या उत्साही पर्यावरण प्रेमी (अतीउत्साही) मंडळीने त्यांची कार्यपध्दती बदलणे गरजेचे आहे.

नदी विषयक धोरणे ठरवितांना अथवा नियोजनात स्थानिक पर्यावरण अभ्यासक ज्यांचे पाय नदीच्या पाण्यात नेहमीच ओलेचिंब झाले आहेत अश्यांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. एक दिवसासाठी दूरवाचा प्रवास करून येणाऱ्या मंडळीचा ह्या कामी काहीही उपयोग नाही कारण स्थानिक प्रश्न सहज व त्रयस्था मार्फत कधीच सुटकत नाहीत त्यासाठी हवे आहेत स्थानिकच.

पुणे महानगरपालिकेची कित्येक गटारे मुळा - मुठा नदीत कोणतीही शुध्दीकरण प्रक्रिया न करताच बेधडक सोडली आहेत. बाणेर सारखा विकसनशील विभाग व तेथील विकासाची गती पाहता मुळा नदीमध्ये अनेक ठिकाणी मानवी मलमूत्र व सांडपाणी बेधडक सोडले जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकूण सांडपाण्याच्या फक्त 30 ते 40 टक्के सांडपाणी प्रक्रिया करते अर्थात त्याचे सरकारी दावे व आकडेवारी मात्र 70 टक्के एवढी आहे जी पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे.

आपण सर्वांना जर आपल्या शहरातील नद्या स्वच्छ व शुध्द हव्या असतील तर आपल्या स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. हा दबाव एका दोघांकडून पुरेसा होणार नाही. त्यासाठी समुदाय हवाय. असा समुदाय फक्त स्वच्छ हेतू व निस्वार्थी मानसिकतेमधूनच निर्माण होणार आहे.

मालिका - श्री. विकास पाटील, पुणे - मो : 07798811512

Path Alias

/articles/nadayaancae-gata-vaaibhava-paraapata-karauu-sakatao-kaa-bhaaga-8

Post By: Hindi
×