नद्यांचे गत वैभव प्राप्त करू शकतो का ? - भाग 6


नदीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देणे असे असेल तर आपणास माहिती असणे गरजेचे आहे की हे गतवैभव काय होते ? याबाबत आपण आपली मते नाहक अजमावीत आहोत, खरे पाहता ही मते म्हणजे आपले दावे व आपल्या अक्रियाशील पणाची लक्षणे आहेत, असे वारंवार सर्वच जण जरी बोललो तरी आपण काही सुधारणा करण्याच्या मानसिकतेकडे वाटचाल करतांना दिसत नाही.

नदीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देणे असे असेल तर आपणास माहिती असणे गरजेचे आहे की हे गतवैभव काय होते ? याबाबत आपण आपली मते नाहक अजमावीत आहोत, खरे पाहता ही मते म्हणजे आपले दावे व आपल्या अक्रियाशील पणाची लक्षणे आहेत, असे वारंवार सर्वच जण जरी बोललो तरी आपण काही सुधारणा करण्याच्या मानसिकतेकडे वाटचाल करतांना दिसत नाही. आपणास माहिती आहेच की सर्वच नद्या प्रदूषित आहेत आणि त्याची कारणे सर्वांना पाठ आहेत, जर त्या विषयावर चर्चासत्र ठेवले तर आपल्या पैकी बरेच जण अगदी रसाळ व मनमोहक भाषेत तासन तास विषयावर बोलतील व जातांना मानधन मिळाले नाही म्हणून नाराज होवून अथवा वेळ वाया गेला याचे दु:ख व्यक्त करून तेथे मिळालेल्या चहापानाच्या गप्पा मारत घरी जाणार पण त्यातील एकही बाब स्वत:च्या आचरणात आणणार नाहीत ही आजच्या समाजाची मानसिकता आहे व ही स्थिती बदलणे आवश्यक आहे, पण करायचे काय ? जेणे करून आपण सर्व जण ह्या नदी संवर्धनाबाबत प्रेम व्यक्त करू व नदी माझी माता हे मनातून बोलू लागतील.

आपल्या समाजात ही चर्चा करणारा एक वेगळ्या वयोगटाचा समुदाय दिसून येतो तो वयो गट काही तरी चर्चा करतो व ज्यांना ह्या नद्या हव्या आहेत तो वयोगट मात्र ह्या प्रक्रियेच्या पासून अगदी लांब आहे मग तो वयोगट जर आपण केंद्र बनविला अथवा आपल्या सर्व विचारांना मूळगाभ्याचे स्थान प्राप्त करून दिले तर आपणास लक्षणिय बदल दिसू लागतील त्याचा पहिला प्रयोग इंद्रायणी बचाव कृती समितीने 2004 साली पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये चिखली या गावी इंद्रायणी नदीवर करण्यात आला तो असा.

आपल्या शहरात महानगरपालिकेच्या शाळा अथवा शासकीय शाळा असतात त्या शाळेत मोठ्या वर्गांना अभ्यासक्रमात पर्यावरण हा विषय शिकविला जातो तो विषय शिकणारे विद्यार्थी तो तास किंवा ते लेक्चर फक्त एैकतात व शिकविणारे सुध्दा फक्त विषय एैकवितात त्यामुळे नक्की कोणाचीच त्या विषयाबाबत आपुलकी निर्माण होत नाही हे आम्ही महापालिकेच्या सर्व शाळातून अनुभवले व नंतर त्यासाठी आम्ही एक प्रयोग केला ज्याला आपण धाडसी निर्णय म्हणू, की कित्येक मुलांच्या पालकांना सुध्दा त्या प्रयोगाबाबत आत्मियता वाटली. ज्या दिवशी त्या शाळेतली त्या ठराविक वर्गातील सर्व विद्यार्थी सायकलने जवळच्या नदी घाटावर न्यायचे व घाटाच्या पायऱ्यांवर बसून विद्यार्थांना पर्यावरणाचा पुस्तकातील धडा शिकायचा व तो धडा सुध्दा त्याच पर्यावरण शिक्षकाने शिकवायचा. हा धडा 'तेथे उपस्थित सर्व विद्यार्थी वार्षिक परिक्षेपर्यंत विसरत नाही' हा आम्हास आलेला अनुभव फार महत्वाचा ठरला. प्रत्येक शहरात नदी असेलच असे नाही पण पिंपरी चिंचवड शहरात तीन नद्या आहेत त्यामुळे कोणत्याही दिशेने गेलो तरी 2 ते 3 किलोमीटर वर नदी सापडतेच. यामुळे नक्की काय घडले असेल तर असे की आमच्या सोबत जे विद्यार्थी होते त्यांना नदीचे प्रदूषण म्हणजे काय याचा पक्का नमुना कळला आहे.

नदी पूजन, नदी स्वच्छता, नदी घाट स्वच्छता या सारखे अनेक कार्यक्रम आपोआप सुरू होणार आणि त्यातून नदी बाबत अपेक्षित आपुलकी व आत्मियता जनतेत निर्माण होणार आहे. आज केंद्र सरकारने नदी सुधार विषयाला हात घातला आहे पण नदी सुधार म्हणजे काय याचे उत्तर सरकारकडे नाही म्हणून मी स्वत: आपल्या देशातल्या पर्यावरण मंत्री महोदयांना टिव्ही चॅनेलच्या थेट मुलाखती मधून एक प्रश्न विचारला होता ' ना. मा. प्रकाश जावडेकर साहेब आपण नदी सुधार करणार आहात का नदी संवर्धन करणार '? प्रश्न जरी खोचक होता तरी त्याचे खरे उत्तर मंत्री महोदयांनी दिले नाहीच कारण त्यांना पण कल्पना आहे की नदी संवर्धन करणे खरे आवश्यक आहे व त्यासाठी शासकीय पैशाच्या पाठबळापेक्षा नदी जवळ वावरणाऱ्या प्रत्येक नागरिकाची मानसिकता सुधारणे गरजेचे आहे व तेच अवघड काम करण्यासाठी आपण सर्व जण पुढे येणे गरजेचे आहे.

शहरांच्या हद्दीतून अथवा औद्योगिक वसाहतींच्या बाजूने वाहणारे नाले व नद्या प्रदूषित झाले आहेत ह्या प्रदूषणात आपला सर्वांचा सारखाच वाटा आहेत. काहीजण प्रत्यक्ष तर काहीजण डोळेझाकी करून दोषी आहेतच. शहरात जागेचे भाव आस्मानाला भिडले आहेत त्यामुळे नदी पात्रात राजरोस भराव टाकून जागा गिळंकृत करण्यात आल्या व त्यामुळे नदी वर अतिक्रमण झाली व आज नद्या पात्र बदलतांना दिसत आहेत. नद्यांच्या मूळ रूपाला आपण बदलण्याची अतोनात चेष्टा केली आहे व त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोतच.

नद्या वाहत्या राहण्यासाठी तिला मिळणाऱ्या प्रत्येक नाल्यात पाणी असणे महत्वाचे आहे. आज इंद्रायणी नदीचा मुख्य नाला ज्याला राम झरा ह्या नावाने ओळखले जाते त्याचा उगम चिखली येथील जाधववाडीत होतो व कुदळवाडीतून वहात चिखली मोई फाट्या जवळ तो इंद्रायणीत विलीन होतो. या झऱ्याची अख्यायिका अशी आहे की जगतगुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज जेव्हा आळंदीला पायी वारी करायचे त्यावेळेस ते चिखली गावाजवळील ह्या झऱ्यावर आराम करून तेथे पाणी पिऊन पुढे जायचे त्या झऱ्याला 'रामझरा ' असे नाव होते पण आज ती गटार गंगा बनली आहे. आज त्या झऱ्याचे अस्तित्व संपून तेथे घाणीचे साम्राज्य बनले आहे अर्थात ह्या ऱ्हासाला पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या बेजबाबदार पर्यावरण अधिकाऱ्याची नकारात्मक मानसिकता कारणीभूत आहे त्याला खतपाणी उलट अर्थाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ विभागाचे घातले व म्हणूनच खेदाने बोलावेसे वाटते की सरकारी व प्रशासकीय यंत्रणांना अजिबात स्वत:ची निकोप कार्यपध्दती नाही व ते स्वत: प्रयत्नशील नसण्यामागे काही राजकीय व वैयक्तिक आर्थिक फायदे सुध्दा सामील असणार व ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो तो तिथे जास्त जाणवत आहे.

आज नद्यांचे पात्र खोल करण्याबाबत सर्वत्र बोलले जाते पण त्याची गरज नसतांना सुध्दा काही ठिकाणी गाळ काढण्याच्या नावाखाली आर्थिक समिकरणे सोडविली जात आहेत. नद्यांच्या तळाचा गाळ काढण्यापेक्षा नदी प्रवाहात असलेले भरावाचे ढिगारे व इतर अडथळे जर दूर केले तर पावसाळ्यात नदी स्वत: नदी स्वच्छता करेल यासाठी नवे कोणतेही तंत्र अपेक्षित नाही. नदीवर आज अनेक ठिकाणी पुल बांधले गेले आहेत व तो पुल बांधतांना ठेकेदाराने दगडमातीचे तात्पुरते बांध बांधले होते की जे पुल बांधून झाल्यावर संपूर्ण काढून टाकणे गरजेचे असतांना सुध्दा तसे झाले नाही व आज नदीत प्रत्येक पुलाच्या वरच्या बाजूस असे कृत्रिम अडथळे पहावयास मिळतात. त्या ठेकेदाराने कामात हलगर्जीपणा केला व त्याला पोसले. आमच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अर्थात त्यासाठी ठेकेदाराने सर्व अधिकाऱ्यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत.

नदीचे गत वैभव परत आणण्याच्या चर्चेत आपण काय उपाय करायला पाहिजे या बाबात दिशा ठरविणे गरजेचे आहे.
1. जेथे प्रदूषण होत आहे त्या स्थळांना भेटी देणे.
2. भेटीच्या वेळी स्थानिक जनतेस सहभागी करून खरा प्रकार काय आहे ह्याचा अभ्यास करणे.
3. प्रदूषण करणाऱ्या संस्थेच्या अथवा गटाच्या मंडळीस भेटण्याचा मोह टाळणे कारण भेटीत तोडपाणी होण्याची दाट शक्यता असते.
4. अशी प्रकरणे न घाबरता व स्पष्टपणे लेखी स्वरूपात सरकार दरबारी नोंदविणे गरजेचे आहे.
5. अशी सर्व प्रकारणे मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात वर्ग करावीत व त्याची पोहोच घेण्याचे विसरता कामा नये.
6. पुढील 35 दिवसांनी आपल्या अर्जातील तक्रारी बाबत चौकशी साठी माहितीचा अधिकार 2005 चा वापर करावा भले जरी माहिती आयुक्त हे सुध्दा भ्रष्टाचारात बुडले असले तरी आपण हा पर्याय अवश्य वापरणे गरजेचे आहे.
7. स्थानिक राजकारणाचा कोणताही आधार न घेता स्थानिक वृत्तपत्र व टिव्ही माध्यमांचा संपर्क वाढवून त्या प्रकरणास प्रसिध्दी देणे गरजेचे आहे.
8. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय कमी वेळात वारंवार पोहोचणे गरजेचे आहे.
9. स्वत:ची प्रसिध्दी व विषयाची प्रसिध्दी होणे गरजेचे आहे.
10. स्वत:ची प्रसिध्दी झाल्यास आपणास नागरिक अथवा यंत्रणा जेव्हा विषयाची गंभीरता विचारेल त्यावेळेस आपली तत फफ होणार नाही व आपण सत्यासाठी सामाजिक भान ठेवून जबाबदारीची जाणीव राखून परिक्षेचा अभ्यास करू.

वैयक्तिकपणे कोणा एकास ह्या विषयात गोवण्यापेक्षा सामाजित गांभिर्यता अभिप्रेत आहे आपण जर एखाद्यास समजविण्यात वेळ घालविला तर त्याचा विपर्यास होण्याची दाट शक्यता आहे व ती समोरची व्यक्ती तुम्हास निजी स्वरूपात त्रासदायक ठरू शकते व त्यामुळे तुमचे काम ठप्प होण्याची दाट शक्यता असते. असे जर विपरित झाले तर आपली गतवैभवाची संकल्पना विरून जाईल.

वाचकांना मी माझा स्वत:चा अनुभव सांगतो की नदीच्या संवर्धनात सतत लिखाण व विषयावर बोलणे (विना शुल्क) याचा मला खूप फायदा झाला तो असा की मला आपल्या समाजातील खूप ज्ञानी मंडळी भेटली व त्यांच्या ज्ञानाचा खूप मोठा भाग त्यांनी मला देवू केला. तसेच समाजातील टीकाकार माझ्यावर धावून आले पण माझ्या जवळ स्वत:चा अभ्यास (आपल्या प्रेमाखातर) होताच व प्रचंड आत्मविश्वास ह्या दोन कारणाने ते टीकाकार आज माझे जवळचे ह्या विषयातील ज्येष्ठ सल्लागार बनले आहेत. नदीच्या विषयात एवढी चांगली मंडळी भेटली की ज्यांना पदवी नाही पण अभ्यास व निरीक्षण शक्ती आहे. ज्यांच्या पाठींब्यावर आपण संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात जनजागृती करण्यात यशस्वी झालो आहोत व ह्या शहरात आज अनेक संस्था नदी स्वच्छते बाबत कार्यरत झाल्या आहेत व हेच आपणा सर्वांना अपेक्षित आहे. नदीचे पूजन, विद्यार्थ्यांना नदी इतिहास सांगणे, नदीचे फायदे, नदीचे महत्व, नदी वर आपण कसे अवलंबून आहोत हे वारंवार डोळ्यासमोर मांडणे आदी गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. मी मोठ्या अभिमानाने माझे एक निरीक्षण आपणा समोर मांडतो की आत्ता वाचकांच्या हाती असलेल्या जलसंवाद मासिकाच्या संपादकाची व माझी ओळख यशदा मध्ये झाली व त्यावेळे पासून मला एक जिद्दी व खरा साठीतील तरूण पर्यावरण वेडा, मित्र म्हणून सापडला व तो साधासुधा मित्र नाही तर करडा व तिखट स्वभावाचा विचारवंत सुध्दा आहे. अशी माणसे ह्या नदी विषयामुळे भेटली व नदी प्रेमी नावांची जमात वाढू लागली आहे.

ह्या अनेक प्रकारच्या विचार मंथनातून आपण थेट नदीच्या संवर्धनाच्या विचार प्रणाली कडे वाटचाल करू लागलो आहोत. प्रत्येकाने वर नमुद केलेले 10 उपाय केले तरच आपल्या हेतूकडे वाटचाल करू शकू. प्रत्येकाने नदीत कचरा होणार नाही अथवा पडणार नाही याबाबत सतत जागृती दर्शवावी व सकारात्मक अशा करण्यावर भर देणे गरजेचे आहे.

नद्या मधील जैवविविधता पाहण्यात जो आनंद मिळतो तो म्हणजे स्वर्गसुख म्हणावे लागेल. विविध जीव व त्यांचे महत्व अभ्यासणे महत्वाचे आहे. प्रत्येक जीव कसा दुसऱ्याच्या उपयोगी येतो व कोणाचे भक्ष कोण आहे व शेवटी कोण हे पहाणे सुध्दा महत्वाचे आहे. नैसर्गिक पाणी शुध्दीकरण व त्यात सहभागी होणारे घटक आणि त्यात त्यांचे महत्व व अस्तित्व सुध्दा तपासणे महत्वाचे आहे. नाले स्वच्छ व जीवंत ठेवणे आपली जबाबदारी आहे व ह्या स्वच्छतेमध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे.

मालिका - श्री. विकास पाटील, पुणे - मो : 07798811512

Path Alias

/articles/nadayaancae-gata-vaaibhava-paraapata-karauu-sakatao-kaa-bhaaga-6

Post By: Hindi
×