नद्यांचे गत वैभव प्राप्त करू शकतो का? - भाग 5


नदी पुर्नजन्म करायचा म्हणजे नक्की काय करायचे तर त्या नदीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देणे असे असेल तर आपणास माहिती असणे गरजेचे आहे की हे गतवैभव काय होते ? या बाबत आपण मते नाहक अजमावीत आहोत, खरे पाहाता ही मते म्हणजे आपले दावे व आपल्या अक्रियाशीलपणाची लक्षणे आहेत. मागील कित्येक वर्षांपासून आपण फक्त या विषयावर विचार सत्रे व चार भिंतीच्या आत तत्वज्ञानाच्या भेड्यांचा गमतीचा व कुरघोडीचा खेळ खेळत बसलो आहोत.

नदी पुर्नजन्म करायचा म्हणजे नक्की काय करायचे तर त्या नदीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देणे असे असेल तर आपणास माहिती असणे गरजेचे आहे की हे गतवैभव काय होते ? या बाबत आपण मते नाहक अजमावीत आहोत, खरे पाहाता ही मते म्हणजे आपले दावे व आपल्या अक्रियाशीलपणाची लक्षणे आहेत. मागील कित्येक वर्षांपासून आपण फक्त या विषयावर विचार सत्रे व चार भिंतीच्या आत तत्वज्ञानाच्या भेड्यांचा गमतीचा व कुरघोडीचा खेळ खेळत बसलो आहोत. एखाद्याने काहीतरी नदी सुधार विषयक विचार मांडायचे व त्याला इतरांनी कच्चा खायचा अथवा त्याच्या विचारातील उणीवा शोधण्यासाठी एक व्यासपीठ बनवयाचे ही आमची नकारात्मक अक्कल हुशारी आज नदीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्याच्या विचारातील अडकाठी बनली आहे. आपण नदीच्या गत वैभवासाठी विचारच करीत नाही. आपण नदीतील पाणी प्रदूषित आहे म्हणून नदीचा तिरस्कार करू लागलो आहोत व त्यातूनच नदीतील अतीक्रमणे व मानवी हस्तक्षेप प्रक्रिया फार वेगाने सुरू झाली आहे.

नदीला पुन्हा आदर्श व नैसर्गिक रूपात पहायची असेल तर आपणास आपले सध्याचे मानवी हस्तक्षेपाचे चाळे बंद करावयास हवेत पण तसे वर्तन कोणी व कधी पासून करायचे हा प्रश्न आपल्यापुढे आहे. मग ते सरकारी धोरणांनी ? राजकीय मानसिकतेने ? सामाजिक जीवन पध्दतीतील आजची गरजू मंडळीने का अन्य कोणी ? उदा. नदीतील वाळू अशास्त्रिय पध्दतीने उपसणारे वाळू माफिया समुह ज्या बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या उद्योगास कच्चा माल पुरवठा करतात तत्सम अनेक धंदे. आज नद्या प्रदूषित झाल्या, जलसाठे प्रदूषित झाले म्हणून आपण बंद बाटलीतील पाणी पिऊ लागलो आहोत व हे पाणी एवढे प्रचंड प्रमाणात बाजारात सहज उपलब्ध आहे की जरी त्याची अवाजवी किंमत माणसाला मोजावी लागत असली तरी ती बंद पाण्याची बाटली आज मानवाच्या शहरी व काही प्रमाणात ग्रामीण दैनंदिन जीवनशैलीत व जीवनात सहज प्रवेश करून घर करून बसली आहे.

खऱ्या अर्थाने ही बदलती जीवनशैलीच आपल्या नद्यांच्या बाबतच्या अनास्थेचे कारण बनली आहे. सर्वच काही मी कशाला करू इतर सर्व जण करतात मग मी का गप्प बसू अश्या मानसिकतेचे शिकार आपण सर्व जण बनलो आहोत व संवेदनहीन भावनेतून आपण अश्या नैसर्गिक साधन संपत्तीचे वाभाडे काढताना स्वत:ला फार धन्य व हुषार संबोधीत आहोत. स्वत:ला कृतीशील सुधार प्रक्रियेपासून दूर ठेवून फक्त दुसऱ्या कडून अवास्तव अपेक्षा ठेवताना आपण आत्मचिंतन करण्याची बाब विसरत चाललो आहोत.

आपल्या इंद्रायणी नदीच्या प्रवासात आपण देहू पर्यंत शेतकऱ्यांनी वापरलेली रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापरातील अतिरेक व त्यामुळे झालेल्या नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाबाबत चिंता करीत होतो. आत्ता पर्यंतच्या चर्चेत कोठेही नदी प्रवाहात येवून मिळणारे ओढे, नाले अथवा जीवंत झरे हा विषय चर्चेत होता त्यामुळे नदीला सर्व बाजूने पाणी मिळत असणार पण जसजसे शहरीकरण व नागरिवस्ती नदी शेजारी 1975 पासून मोठ्या प्रमाणात होवू लागली तशी ही परिस्थिती बदलून हेच नाले, ओढे व झरे बनले अति प्रदूषित गटारे व ही गटारे नागरीवस्तीमधील मानवी मैला मिश्रीत सांडपाणी तसेच औद्योगिक रसायने मिश्रीत सांडपाणी कोणतीही शुध्दीकरण प्रक्रिया न करता नदीत आणून सोडत आहेत. हा बदल आज सर्वांना परिचित आहे पण समाजातील एकही जनसमुह ह्या परिस्थितीला सकारात्मक दृष्ट्या हाताळतांना दिसत नाही. सरकार दरबारी अनेक प्रदूषण नियंत्रणाचे कायदे आहेत पण त्या कायद्यांची अंमलबजावणी करणारे ताकदवान प्रशासन नसल्याने सर्वच जण त्या कायद्यांना पुस्तकात अथवा इंटरनेटवरच ठेवणे पसंत करतात.

आपल्याकडे अनेक पर्याय आहेत व भौगोलिक परिस्थिती प्रमाणे त्यात बदल केल्यास आपण सहज त्यांचा विचार करू शकतो पण एकच पर्याय सर्वत्र वापरणे मुर्खपणाचे ठरेल. मागील कित्येक शतकांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा देहू गावापासून सुरू आहे त्यासाठी अनेक भाविक वारकरी मोठ्या संख्येने रोज ह्या धार्मिक स्थळाला भेट देतात. आपल्या संतांनी सांप्रदायात इंद्रायणी नदीचे फार पवित्र वर्णन व महात्म्य वर्णीलेले आहे व अनेक महत्वाचे संदर्भ सुध्दा जोडले आहेत. अर्थात त्यात वर्णीलेली नदीची सर्व वर्णने ही मानवास एक आदर्श संकेत व दिशा देण्यासाठी अथवा आदर्श जीवन शैलीची दिशा आहे, पण आज आपण ती वर्णने फक्त मोठमोठाल्या कीर्तनकारांच्या मधुरवाणीतून ऐकतो पण त्यातील मूळ हेतू समजावून घेवून ताडकन चवताळून उठून क्रियाशील बदल करण्याकडे पाठ फिरवतो आहोत व त्यामुळे प्रत्येक नदी ही अतिशय प्रदूषित पहावयास मिळते ती म्हणजे खास करून तिर्थक्षेत्रांच्या परिसरात मुख्यत्वे.

प्रत्येक वारी अथवा दिंडी उपक्रम म्हणजे नद्यांच्या शेजारी प्रचंड मानवी विष्ठा व इतर कचरा यांची मांदीयाळी म्हणावे लागत आहे. आज ह्या परिस्थितीला आपली मानसिकता व राजकीय अनास्था कारणीभूत आहे. नदी बाबतची पावित्र्याची भावना सर्वजण विसरू लागले आहेत त्यामुळे फक्त मोजक्या पर्यावरण प्रेमी मंडळीचे म्हणणे प्रभावहीन बनत आहे आणि त्यांचे प्रयत्न हे निष्फळ होतांनाचा अनुभव अनेक नदी प्रेमींनी घेवून आपल्या मोहिमेत ते घरवापसी करतांना दिसतात. आपणास हे अनुभव आले असतील तर त्यात काही नवे नाही कारण हेच सत्य आहे. आपणास सत्य परिस्थितीचा स्वीकार करून त्यात बदल घडवून आणण्यासाठी एक क्रांतीकारक पाऊल उचलावे लागणार आहे मग ते कोणाच्याही विरोधात पडले व कोणा एखाद्याच्या विरोधात अथवा एखाद्या समुहाच्या विरोधात पडले तरी त्याची तमा आपण बाळगण्याची गरज नाही व त्याबाबत कोणतीही दया माया दाखवण्याची गरज नाही.

भले ती क्रुरता वाटेल पण त्याचीच गरज आजच्या मितीला आहे. अश्या विचारांचा आपण धिक्कार करतांना सुध्दा मागेपुढे पहाणार नाही कारण मुळातच आपण सगळे जण घरात बसून नको तेवढी अनावश्यक अक्कल पाजळायला लागलो आहोत म्हणून विनंती करतो की क्रांतीकारक विचारांना मदत करावी तरच आपणास नदीचे गत वैभव प्राप्त करू शकू अन्यथा ह्या फक्त पोकळ गप्पाच राहतील.

आज देहू मध्ये लाखो करोडो वारकरी येतात व वास्तव्य सुध्दा करतात त्यांच्या पासून रोज निर्माण होणारे मलमूत्र व स्थानिक नागरी वसाहती मधील मलमूत्र व पाणी कोणतीही शुध्दीकरणाची प्रक्रिया न करताच नदीत सोडले जाते व हागणदारीमुळे होणारी कचरा समस्या पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहासोबत नदीत वाहून येते व नदीला आपण प्रदूषित होतांना अनुभवत आहोत. अश्या प्रकारांना थांबविण्यासाठी आपण स्वतंत्र भूमीकेत असणे आज गरज बनत चालली आहे. सरकारवर दबाव आणणे व त्यासाठी सकारात्मक मानसिकतेचे राजकीय नेतृत्व निवडणे हे आपल्या हाती आहे व त्या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे व तसा हट्ट धरणे चुकीचे ठरणार नाही.

काही वर्षांपूर्वी देहुच्या घाटावर नदीच्या निळ्या रेषेच्या आत एक धर्मशाळा अस्तीत्वात होती त्यामुळे तेथील सर्व मानवी मलमूत्र थेट नदी प्रवाहात मिसळत होते व हा प्रकार आपल्या सारख्या नदी प्रेमी मंडळीने म्हणजे इंद्रायणी बचाव कृती समितीने वारंवार प्रशासनाकडे पत्र व्यवहार करून शासनाच्या निदर्शनात आणून दिला व नंतर अथक प्रयत्नानंतर ती धर्मशाळा बंद झाली त्याचे श्रेय कोणीही लाटले असले तरी आज तो महत्वाचा भाग नसून ते प्रदूषण होणारे स्थळ बंद झाले व प्रदूषण काही प्रमाणात थांबले यात समाधान मानून त्यातून काही प्रमाणात का होईना जनजागृती झाली ही जमेची बाजू कदापि विसरून चालणार नाही.

नदीत आपण निर्माल्य सोडतो व ती आपली प्राचीन संस्कृती मानतो पण नदीत निर्माल्य सोडणे व निर्माल्य फेकणे यातील खरा फरक पाप पुण्या एवढा वेगळा आहे. पूर्वी भाविक मंडळी घरातील निर्माल्य ओंजळीत घेवून नदी प्रवाहात उतरायचे गुढगाभर प्रवाही पाण्यात जावून उभे राहायचे व आपली ओंजळ पाण्यात बुडवून वाकून भक्ती भावाने ते निर्माल्य नदीत सोडायचे ही खरी आपली प्राचीन पध्दती. निर्माल्य सोडल्यावर नदीला नमस्कार करण्याचे संस्कार त्या सोबत दिसून यायचे व महत्वाचे म्हणजे ते निर्माल्य म्हणजे अनेक औषधी व मानवाच्या आरोग्यास उपयुक्त पाने फुले यांचा संच असायचा. त्यातील देवाचा नैवेद्य म्हणजे दही भात अथवा गोड शिरा किंवा खोबऱ्याचा तुकडा ह्या वस्तू जलचरांचे अन्न असल्याने नदीतील जलचर सुध्दा खूष होते त्यांची अप्रत्यक्ष आपण काळजी घेत होतो.

हळद कुंकू सारख्या पूजा साहित्यातून नदीचे पाणी शुध्दीकरण होत होते म्हणजेच आपले देव घरातील निर्माल्य हे जलसाठे अबाधित राहण्यास आपण मदत कार्य करीत होतो पण आज तेच निर्माल्य आपल्या नद्या अथवा जलसाठे प्रदूषित करीत असातंना दिसतात. जरी निर्माल्य तेच असले तरी आज जलसाठे प्रदूषित होतात असे का होते या मागील अनेक कारणांपैकी काही महत्वाची कारणे चर्चेच घेणे उचित ठरणार आहे. पहिले कारण असे म्हणता येईल की आपण हे निर्माल्य एका प्लास्टीकच्या कॅरी बॅगमध्ये भरून गाठ मारून नदी पात्रात भिरकावून देतो व ह्या प्रकारच्या पिशव्या (गठल्या) तश्याच पडून राहतात व त्यातील निर्माल्याची कुजण्याची प्रक्रिया आपोआप सुरू होते व हे घातक प्रदूषण नदी प्रवाहातील पाणी अथवा नदी पात्रात डासांसारख्या कीटकांची निर्मिती करण्यास निमित्त बनतात आणि दुर्गंधी व रोगराई पसरू लागते. आपण कोणत्याही धर्माच्या अथवा परंपरेच्या विरोधात नाही तर त्या परंपरा त्या काळात योग्य व आवश्यक होत्या पण काळ व परिस्थिती बदलल्यामुळे आज त्या पध्दती त्रासदायक ठरू लागल्याने आपण त्या थांबवणे अथवा त्यासाठी सुधारित पध्दती वापरणे योग्य ठरणार आहे.

आपणास मी विनंती करण्यापेक्षा आवाहन करतो की जर आपण शक्य तो परी कृतीशील झालो तर प्रत्येकाने केलेल्या खारीच्या वाट्याने आपण नक्कीच नदीचे गत वैभव प्राप्त करू. सहभागी होण्याची तयारी आपण करणे गरजेचे आहे. नदी पात्र खोल करायचे म्हणजे पुररेषा निळ्या रेषेच्या बाजूला सरकेल अशी ह्या आमच्या राजकीय नेत्यांची मानसिकता आहे. ही मानसिकता व अपेक्षा फक्त नदी काठच्या गुंठेमंत्र्यांची आहे व तेच निवडणुकांना काळा पैसा पुरवतात म्हणून त्यांना खूष करण्यासाठी व नदी सुधार नावाखाली पैसे लुबाडणे काम सुरू आहे. आपण त्या मानसिकतेला नियंत्रणात आणणे आद्यकर्तव्य मानले पाहिजे अन्यथा आपले वाचन व आपली नदी बाबातची तळमळ व्यर्थ जाणार हे मात्र नक्की.

नदीचा सुधार करण्याचे काम मानवाचे नाही तर ते आहे काम फक्त निसर्गाचे. निसर्ग ठरवेल नदी कधी आटवायची अथवा बुजवायची व त्या ठिकाणी सपाट जमीन करायची. मानवाने उगाच लुडबुड करू नये आपण निसर्गाच्या ताकदी समोर किती नगण्य आहोत याची खात्री सर्वांना आहेच. गुजराथ मधील कोरड्या नद्या 2002 च्या भूज भूकंपानंतर प्रवाही झाल्या आहेत हे अगदी नजीकचे अनुभव आहेत आपल्या गाठीशी.

नदीला एका ठिकाणी खड्डा केला तर पावसाळ्यात प्रवाहाच्या वरून येणारे पाणी नदीतील गाळ व माती अथवा वाळू वाहून आणून तुम्ही केलेला खड्डा बूजवून टाकणार हे साधे समिकरण जर आज राजकारणी मंडळीस लक्षात येत नसेल तर खरच ह्यांच्या मानसिकतेला शिरसाष्टांग लोटांगण घालावे लागेल.

आपण क्रांतीकारी बनावे याचा अर्थ नक्षलवादी नाही हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

मालिका - श्री. विकास पाटील, पुणे - मो : 07798811512

Path Alias

/articles/nadayaancae-gata-vaaibhava-paraapata-karauu-sakatao-kaa-bhaaga-5

Post By: Hindi
×