नद्यांचे अध्यात्म

आपण गंगेला भारतीय पर्यावरणाची पदसिध्द जननी मानतो. सर्व नैसर्गिक अन्नसाखळ्या तिच्या अंतरंगात घटत असतात. जीवजंतू, जलचर, वनस्पती, प्राणी इत्यादी असे सर्व सजीव सरिताजलाच्या उपलब्धीवर जगतात. तथापि, जेव्हा नदीचे जलच अशुध्द होवून ती या अन्नसाखळ्यांची निर्मिती करण्यास अपुरी पडत असेल तर तिच्या आक्रोशाला पारावर नाही. हे नैसर्गिक चक्र प्रतिबंधित झाले आहे. कारण तिच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला.

भौगोलिक, भौतिक, भूगर्भीय, सांस्कृतिक, पुरातत्वीय, अध्यात्मिक या निरनिराळ्या व्यक्तित्वावर ठसलेले नदीचे रूप डोळ्यांसमोर होते. भूगोलात वाहणारी नदी भूगर्भातून बाहेर येवून तिचा माणसाशी कसा संबंध आला याचेही चिंतन सुरू होते. माणसाच्या भौतिक विकासाच्या ढोबळ मानाने तीन अवस्था जाणवतात. प्रथम अवस्थेत निसर्गाचे तुष्टीकरण करून स्वत:च्या कमीत कमी पुष्टीकरणाचा मानवाने प्रयत्न केला. म्हणजे, निसर्ग महान आहे. त्याच्या मदतीने आपण आपले अस्तित्व टिकवू शकतो. त्याचा आपल्यावर कोप होता कामा नये, म्हणून त्याला महानत्व देवून, नदीला मातृत्व प्रदान करून आपल्या भौतिक गरजा पूर्ण करून घेतल्या. तिला श्रेष्ठ मानून स्वत:ला कनिष्ठ उपभोक्ता समजणे हे मानवी मनाच्या पहिल्या अवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण होते. दुसऱ्या अवस्थेत मानवाने स्वत:च्या पुष्टीकरणावर भर देवून निसर्गाचे गरजेनुसार दैवतीकरण केल्याचे स्पष्ट होते. पंचमहाभूतांचे त्याला जसे जसे आकलन होत गेले तसे त्यांच्या प्रकटीकरणासाठी त्यांचे दैवतीकरण करणे, नवसायास करणे सुरू केले. इष्टदेवतांना भोग दिले की, आपल्याला हवे ते भोग त्या उपलब्ध करून देतील, या भूमिकेतून त्याने निसर्गाची उपयुक्ततावादाच्या दृष्टिकोनातून मैत्री करण्याचा, त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला.

निसर्गाबरोबरचे सहजीवन केवळ मानवाच्या पहिल्या अवस्थेतच पाहावयास मिळते. दुसऱ्या अवस्थेत मात्र निसर्गाचे व त्याच्या घटकांचे केवळ दैवतीकरण झालेले दिसते. नद्यांना देवता मानून त्यांची भौतिक पातळीवर पूजा बांधत असताना दुसरीकडे तो जलप्रदूषणाला आमंत्रण देत असतो. तिला नवसायास करणे हा केवळ मानसिक पातळीवरील उपचार असतो. खरे तर यातील अध्यात्मिक तथा भावनिक चिंतनाची संवेदनशीलताही हरवत चालली आहे. कारण, आता मानवाने नदीच्या पाण्याचा भौतिक उपयोग करून घेणे एवढेच आपले उद्दिष्ट ठरविले आहे.

मानावाच्या मनाच्या तिसऱ्या अवस्थेत मानवाने केवळ स्वत:च्या पुष्टीकरणाचाच विचार केल्याचे दिसते. निसर्गाचा संकोच करून त्याने निसर्गावर विजय मिळविण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर त्याने ज्याप्रमाणे मानवाच्या जागी यंत्राची उपयोजना केली, तद्वतच आजच्या युगात तो यंत्रमानवाच्या मदतीने निसर्गाचा ताबा घेण्याचा, निसर्गावर एकाधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. या तिन्ही अवस्थांचे चिंतन केल्यावर मला हा प्रश्न पडला की, या दोलायमान परिस्थितीचा पंचमहाभूतांवर काय परिणाम झाला असेल ? विशेषत: भूमी आणि जलतत्वावर याचा कसा प्रभाव पडत असेल ? कारण माणसाच्या मनाच्या तिसऱ्या भूमिकेचा भूमी, जल यांच्यावर झालेला विपरित परिणाम दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. निसर्गावर विजय मिळिण्याच्या त्याच्या हटवादी भूमिकेतून प्रत्येक निसर्गतत्वाचे हनन करायला तो सिध्द झाला आहे, पण यामध्ये तो एक गोष्ट प्रामुख्याने विसरत आहे, तो स्वत:चा सर्वनाश स्वत:हून ओढवून घेत आहे. एका प्रजातीची अवास्तव वाढ म्हणजे दुसऱ्या प्रजातीचा विनाश हे आजपर्यंतच्या निसर्गाच्या इतिहासातून सिध्द झाले आहे. मानवानेच शोधलेले हे सत्य त्यालाच पटेनासे झाले आहे.

'ज्याचा उदय होतो त्याचा अस्तही निश्चित असतो' हे तत्व पृथ्वीवरील सर्व चराचरांना लागू असते. मानवाला जगण्याचा अधिकार आहे हे जितके खरे आहे तितकाच अधिकार अन्य जीवांना आहे हे त्याच्या बुध्दीला का पटत नाही? येथे तो चातुर्वर्ण्य सिद्धांताची जाणीवपूर्वक अंमलबजावणी का करतो ? येथे चातुर्वर्ण्य सिद्धांत म्हणजे पाणी माणसासाठी, त्याच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी, त्याला लागणारी उपकरणे तयार करण्यासाठी आणि उर्वरित पर्यावरणासाठी या क्रमाने पाण्याचे वाटप होय. स्वत:च्या अस्तित्वासाठी, भोगलालसेपोटी इतरांचा बळी तो कोणत्या नियमानुसार घेतो ? सहजीवनावर साकार झालेली त्याची जीवनशैली इतकी स्वार्थी कशी झाली ? वास्तविक तो सर्वात विचारी प्राणी. जीवचक्राच्या अंतिम शिखरावर असलेला. त्यामुळे अन्य जीवांच्या रक्षणाची जबाबदारी त्याची, पण तो पाण्यात बुडणाऱ्या माकडीसारखा स्वत:चे अपत्य पायाखाली दाबून जीव वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. हेच त्याच्या वैचारिकतेचे दर्शन !

ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, विषयात गुंतलेल्या जीवाला अन्य कसलेच भान नसते. स्वत:ला विज्ञाननिष्ठ समजत असलेल्या मानवाच्या या वर्तनाचे समर्थन कसे काय करणार ? तो जर नियमात राहणार नसेल तर त्याचा अस्त निश्चित आहे. चिंतन करत असताना सहज मनात येते की कधी ना कधी हे सर्व पंचमहाभूतात विलीन होणार आहे. मग मानवाच्या विघातक कृती निमित्तमात्रच ठरणार का ? या सर्व पंचमहाभूतांचा नाश होणारच आहे. तर मग माणसाने या जलतत्व आणि भूमीतत्वाचा ऱ्हास करणाऱ्या काही विघातक कृती केल्या, तर या तत्वांचा ऱ्हास होण्यात माणसाच्या या कृती निमित्तमात्रच ठरतात का ? मातृवत मानल्या जाणाऱ्या नदीला, जलाला प्रदूषित करण्याची बुध्दी माणसाला होतेच कशी ? या दोन्ही बाजूंचे चिंतन करत माझे मन, अंत:करण नद्यांशी, पाण्याशी कधी एकरूप झाले ते मलाही कळले नाही.

मानवी जीवनात जन्मापासून मृत्यूपर्यंत होणारे सर्व संस्कार जलाशी विशेषत: नदीशी निगडित आहेत. जीवनाच्या बंधनातून केवळ परमेश्वर किंवा नदीच मोक्ष देवू शकते अशी खास करून भारतीयांची धारणा असल्या कारणाने आपण जीवनदायी असलेल्या नदीलाही मातृत्व प्रदान केले आहे. कृतज्ञतेच्या कल्पनेतून नद्यांना मातेचा सन्मान देण्यात आला आहे. नदी ही नवसाला पावणारी देवता असल्याने तिला सामान्यत: स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते. कारण संस्कृती जन्माला घालण्याची क्षमता या दोघींमध्येच असते. नदीला लोकमाता म्हणून गौरविले आहे. कारण, उभ्या समाजाचे पोषण करताना ती हातचे काही राखून ठेवत नाही आणि सजीवांच्या प्रपंचाचा डोलारा पेलताना अहंभावाचा लवलेशही जिच्या कृतीत नसतो, ती स्त्री, माता, पत्नी, भगिनी, कन्या, दायी, दासी या भूमिकाही समर्थपणे निभावते आणि संस्कृती जन्माला घालते तेव्हा एखाद्या कालखंडातील महान संस्कृतीची बीजे पेरून या दोघी पूजनीय न ठरल्या तरच नवल !

प्रत्येक नदी एक स्वायत्त संस्कृतीच असते. ती जर मानवी वसाहतीने पूर्ण असेल तर तिची अभिव्यक्ती अनेक दृश्यादृश्य माध्यमातून जाणवते. नदी जितकी मोठी तितकी तिची व्याप्ती अधिक. ती जर भिन्न वांशिक गटांना पोटात घेत असेल तर तिच्या संस्कृतीचे स्वरूप बहुपेडी असते. जलाच्या चल स्वरूपाचे यथार्थ दर्शन केवळ नदीच घडवू शकते. जलाचे शाश्वतरूप म्हणजेच नदी - सरिता. सर म्हणजे पाणी, सरिता म्हणजे तृषार्ताची तहान भागवून जडात चैतन्य निर्माण करणारी ती सरिता. सर म्हणजे सागर. दोन रित्यांना एका मालिकेत गुंफून चैतन्य प्रवाहित करणारी ती सरिता. उष्णतेने लाही लाही झालेल्या तृषार्ताला पाणी पाजणारी नदी. तृष्णा या शब्दाचा अपभ्रंश होवून तयार झालेला 'तहान' हा शब्द. नदीचा प्रवाह म्हणजे 'जलाच्या सूक्ष्म व्यापक रूपाने चैतन्याला जोडणारा, त्याला प्रवाही करणारा स्त्रोत होय. ' म्हणजेच जिवा - शिवाला जोडणारे अमृत होय. 'शव' म्हणजे अचेतन. जड. 'शव' चे रूपांतर 'शिव' आणि नंतर 'श ' चा 'ज ' होवून जीव हा शब्द तयार झाला. 'शिव' म्हणजेच 'मंगल'. हेच मांगल्य जीवाशी जलाच्या सचेतन प्रवाहामुळे, सरितेमुळे जोडले गेले. शवात शिव ओतणारी ती सरिता.

जलतत्व हे पंचमहाभूतांपैकी एक. भूमितत्वाच्या अगदी विरूध्द असणारे तत्व. भूमी ही अचल स्वरूपात तर 'जल' हे कायम 'चल ' असणारे तत्व होय. सतत कार्यप्रवण असणारे जल हे चैतन्याचे प्रतीक होय. माती आणि पाण्यापासून बनलेल्या सचेतन मानवी देहातही 80 टक्के जलाचेच प्रभुत्व असते. चल असलेल्या जलाचे शाश्वत रूप आपल्याला केवळ नदीत आढळते. याशिवाय आपणास जलाचे सतत भिन्न रूपात दर्शन घडते. सदैव वाहता प्रवाह हा नदीचाच आणि अथांग जल असूनही वरकरणी संथ दिसणाऱ्या व प्रसंगी रौद्र रूप धारण करणाऱ्या समुद्राचा. विहिरी, तलाव यात मात्र जलाच्या जडत्वाचे दर्शन घडते. म्हणून सरोवर आणि नदी यांची तुलना होवू शकत नाही. पाऊस हेही जलाचे चलस्वरूप. पावसाचे पाणी हे नदी तथा भूजलाद्वारे सागरास मिळते. सागराच्या पाण्याचे जलचक्रात नियमानुसार बाष्पीभवन होत असते. ती पाण्याची वाफ परत चल स्वरूपात पावसातून भूमीला मिळते.

पाण्याचे आत्मकेंद्रित असणारे रूप लोभसवाणे आहे. साठवलेले पाणी वाहते करणे आणि ते वाहून जाणे हे पाण्याचे बाह्यकेंद्रिय स्वरूप. पाणी वाहून गेल्यावरही त्या जागेवर उरणारा ओलावा हे जलाचे आत्मकेंद्रित स्वरूप होय. ज्याला पाणथळ म्हणतात. कायमस्वरूपी पाणथळ निर्माण होण्यास शेकडो वर्षे लागतात. कशातही सहज सामावून जाण्याची ही जलाची क्षमता ज्ञानेश्वरांनीही ओळखली होती. ते म्हणतात , 'खाचखळगे भरल्याशिवाय गंगा पुढे जात नाही.' हेच तत्व आपल्याला नदीच्या वहनात दिसते. पात्र रूंदावण्यामागेही हेच सूत्र आहे.

प्रत्येक नदी ही स्वत:च्या सुख - दु:खाच्या स्मृती घेवून वाहणारी लोकमाता. मला प्रश्न पडतो, त्या संगमावर जेव्हा एकमेकींना भेटतात तेव्हा काय बरं बोलत असतील ? बोलताना त्यांना आलेल्या हुंदक्यातला हुंकार हा ओंकाराकडे जाणारा असतो. तोच हुंकार आर्त आत्म्यांची स्पंदने घेवून आलेला असतो काय ? ही स्पंदने केवळ जाणकारांनाच ऐकू येतात. आणि फक्त त्यांनाच नद्यांचा आक्रोश उलगडतो. आक्रोश उलगडत जातो तसा त्यांच्या दु:खाचा चलचित्रपटही अंत:चक्षूंसमोरून सरकत जातो.

नदीचे अंतर्मन हे मातेचे आहे. आज ही लोकमाता आपल्या पुत्रांची जोपासना करण्यास अपात्र ठरते तेव्हा तिचे दुखावलेले अंत:करण काय आक्रोश करत असेल हे समजून घेणारे संवेदनशील मन मानव हरवत चालला आहे. प्रत्येक नदीचा आक्रोश सारखा असेल का ? त्यांच्या काठावर घडलेल्या प्रत्येक घटनेच्या त्या मूक साक्षीदार आहेत. सुखाचे क्षण, दु:खाचे क्षण आणि या क्षणांचे भविष्यावर झालेले खोल परिणाम या सर्व घटनांच्या त्या प्रत्यक्षदर्शी आहेत. त्र्यंबकेश्वरहून वाहत येणारी गोदावरी सीतेच्या नितळ सौंदर्याचे कौतुक करत पुढे जाते तेव्हा रानावनातून वाट काढत येणारी वैनगंगा तिला तिच्या काठी राहून धन्य झालेल्या शबरीची गोंडी कथा सांगत असावी असे मला जाणवते. नद्यांचा ऐतिहासिक काळ वैभवाचा होता, पण वर्तमानात त्यांना अशी मानहानी का स्वीकारावी लागते ? याची उत्तरे माणसांकडेच आहेत. कारण या समस्या त्यांनीच निर्माण केल्या आहेत. माणसे आपल्या टोकाच्या स्वार्थी भूमिकेमुळे लोकमातांचे कृतघ्न पुत्र ठरत आहेत.

प्रत्येक लोकमातेची कथा स्वतंत्र आहे. व्यथा स्वतंत्र आहे. कारण तिचे कुटुंब स्वतंत्र आहे. तिच्या दु:खाचे मुख्य कारण म्हणजे मनुष्य नावाचा दु:खी प्राणी तिच्या सहवासात राहतो. तिच्यावर मातेसमान प्रेम असल्याची बतावणी करतो. हा प्राणी जिथे जातो तिथे दु:खच निर्माण करतो. कारण सुखाला सरसकट हद्दपार करण्याची त्याला सवय लागली आहे. ऐंद्रिय सुखाचा प्रच्छन्न पाठलाग हे त्याच्या दु:खाचे मूळ आहे. ही आपली सांस्कृतिक धारणा आहे. भौतिक सुखप्राप्तीसाठी त्याने नदीजलाचे प्रदूषण करून, जलाचे पावित्र्य नष्ट करून मातृत्वाचे स्थान दिलेल्या नदीलाही प्रदूषित करणे अव्याहतपणे चालू ठेवले.

माणूस आणि प्रदूषण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय असे वाटू लागले आहे. माणूस जर नैसर्गिक पध्दतीने जगत असेल तर त्याने केलेले प्रदूषण हे नैसर्गिक पध्दतीनेच दूर होवू शकते, पण तो जर अनैसर्गिक पध्दतीने जगत असेल तर मात्र त्याच्यामुळे झालेल्या प्रदूषणाची विल्हेवाट लावण्यास निसर्ग कमी पडतो. नव्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योगप्रधान नगरांतून मैलापाण्याच्या तथा सांडपाण्याच्या रूपाने, औद्योगिक रासायनिक द्रव्याच्या रूपाने होणाऱ्या प्रदूषणाच्या असह्य वेदनातून मुक्त करा हा तर नद्यांचा आक्रोश आहे. या विघातक द्रव्याच्या मिश्रणामुळे अमृतवाहिन्यांचे विषवाहिन्यांत रूपांतर होत आहे. हे प्राधान्याने कठोर पावले उचलून थांबविणे गरजेचे आहे.

आपण गंगेला भारतीय पर्यावरणाची पदसिध्द जननी मानतो. सर्व नैसर्गिक अन्नसाखळ्या तिच्या अंतरंगात घटत असतात. जीवजंतू, जलचर, वनस्पती, प्राणी इत्यादी असे सर्व सजीव सरिताजलाच्या उपलब्धीवर जगतात. तथापि, जेव्हा नदीचे जलच अशुध्द होवून ती या अन्नसाखळ्यांची निर्मिती करण्यास अपुरी पडत असेल तर तिच्या आक्रोशाला पारावर नाही. हे नैसर्गिक चक्र प्रतिबंधित झाले आहे. कारण तिच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला. असंख्य बंधाऱ्यांची निर्मिती झाली. धरणे बांधताना समोर सामान्य शेतकरी असतो. तथापि लाभ घेणारा मात्र अतिश्रीमंत गटातील अथवा कार्पोरेट क्षेत्रातील असतो. त्याच्या या अपात्रतेचा किती व्यापक परिणाम होतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जैव विविधतेचा ऱ्हासाचा वेग कमालीचा वाढला आहे. वाघ, मगर, डॉल्फिनसारखे पर्यावरण संतुलन सूचक जीव (Environment - Indicators) अस्तित्वाच्या संकटात सापडले आहेत. सरितानी जोपासलेली पाणथळे एका मागून एक नष्ट होत आहेत. एक समृध्द वृक्ष म्हणजे एक लहानसा जलसाठाच असतो. जंगलेच साफ झाल्याने किती प्रचंड जलावरण नष्ट झाले असेल याची कल्पनाच करवत नाही.

सरितेच्या धार्मिक तथा सांस्कृतिक मूल्यांचाही झपाट्याने ऱ्हास कसा होतो याचे उदाहरण पाहू. भारतात ज्या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यापैकी महत्वाचे ठिकाण उज्जैन. येथे क्षिप्रा नदीच्या काठी भरणारा कुंभमेळा काहीसा आगळा वेगळा असतो, पण सद्य परिस्थितीत क्षिप्रा नदीत पाणीच नाही. सत्तर किलोमीटरवरील नर्मदेतील पाणी नलिकेद्वारे आणून क्षिप्रेत सोडावे लागते. एखाद्या नदीसाठी याहून दुसरी शोकांतिका कोणती असू शकते ? भारतीय धारणेनुसार क्षिप्रेच्या पवित्र जलात उज्जैनच्या महाकालेश्वर तीर्थक्षेत्रात अमृताचे थेंब कधीकाळी सांडले होते. कुंभमेळ्याच्या पर्वणीला त्या जलात ते पुन्हा अवतरतात आणि ते प्राशन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक तेथे एकत्र येतात. तथापि क्षिप्रा त्यांना पाण्याचा एक थेंबही देवू शकत नाही. आपल्या लज्जारक्षणार्थ तिला आपल्या भगिनीची नर्मदेची याचना करावी लागते, ही केवढी शोकांतिका. अशाच एका प्रसंगी मी काहीकाळ क्षिप्रेकाठी अमृतकणांचा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला, पण मन प्रसन्न होण्याऐवजी विषण्णच होत गेले. मला विचित्र संकेत मिळू लागले. अज्ञात आवाजांनी कानाच्या पाळ्या गच्च झाल्या. मला समजले नाही, की क्षिप्रा मला काही सांगू इच्छिते काय ? कुंभमेळ्यातील भक्तगळ जेव्हा क्षिप्रेच्या अमृतमय जलाने सुस्नात होत असतील तेव्हा त्यांच्यापैकी किती जणांना हे ज्ञात असेल, की हे क्षिप्रेचे अमृतकणांनी भरलेले जल नसून नर्मदेचे पाणी आहे ? कदाचित क्षिप्रेच्या पात्रातून रेवेचे पवित्र जल अंगावर घेताना त्यांचा आनंद शतगुणित होत असेलही, पण हे किती दिवस चालणार ?

सिंचनास जल उपलब्ध व्हावे म्हणून धरणे बांधून भौतिक विकास साध्य करून घेतला, तथापि कालनिहाय भौतिक विकासाच्या सीमा विस्तारतच गेल्या. अमर्याद भोगतृष्णेचा पाठलाग करत असताना त्यांच्या महत्वाकांक्षेला नदीजल अपुरे पडले. परिणामी जमीनी दलदलीच्या झाल्या. त्या क्षारफुटीला बळी पडल्या आणि पिकाचा उतारा कमी झाला. त्यांचे वाळवंटीकरण झाले. जिच्या खोऱ्यात कधीकाळी नाईलसारखी संस्कृती बहरली होती. सिंधूसारख्या महाकाय नदीचा बळी गेला. नाईल, पीत, यांगत्येसारख्या नद्याही याला अपवाद ठरल्या नाहीत. आज सिंधु खोरे पाकिस्तानच्या वाट्याला गेल्याने त्यांना हे सिंधूचे दु:ख जाणवत नाही. आणि हिंदूपासून ती दुरावल्याने तिच्या आक्रोशाला अंत नाही.

संपूर्ण जगाला अचंबित करून टाकणाऱ्या महान सिंधू संस्कृतीचा जेव्हा शोध लागला तेव्हा भारतीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. नंतर फाळणी झाली आणि भारतीय संस्कृतीला जन्म देणारी सिंधू नदीच पाकिस्तानची जीवनदायिनी झाली. नंतरच्या काळात भारतीयांचा सिंधूशी असणारा सर्व पातळ्यांवरील संबंध तोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. त्याचाच एक भाग म्हणजे भारतीयांना सिंधू खोऱ्याच्या अभ्यासासाठी मनाई करण्यात आली. सिंधूचा आणि हिंदूचा संबंध राजकारण्यांनी तोडून टाकला. सारे हिंदू- सिंधी भारतात हाकलून दिले. कधीकाळी सिंधूंशी जडलेले अतूट नाते भारतीय तथा सिंधी तोडण्यास तयार नाहीत. केवढा आकांत असेल नदीचा ? नदी स्वत: धर्म, जात - पात, राजकारण, वंश आदी कोणतचे भेद मानत नाही. मानव तिच्यावर त्याच्या भावभावना लादतो. तिला जवळ घेतो, दूर लोटतो. आज सिंधुजल वाटपावरून उभय राष्ट्रामध्ये पराकोटीचे वाद निर्माण झाले आहेत. परिणामी सिंधू रोडावत चालली आहे आणि आज ती सागरमीलनापासून वंचित होत आहे. ती दिवसेंदिवस विरहिणी होत आहे. कोणत्या शब्दात ती आपला आक्रोश व्यक्त करत असेल ?

(डॉ.मोरवंचीकर यांच्या शुष्क नद्यांचे आक्रोश या ग्रंथातून)

Path Alias

/articles/nadayaancae-adhayaatama

Post By: Hindi
×