नदीचे मूळ


नदीचं लकाकतं पात्र ओसाड दिसू लागतंय. नदीच्या कुठे कुठे कोरड्या पडलेल्या पात्रातून शिवाराकडे अनेक वाटा लगबगीनं धाऊ लागतात. तर कधी कुठे कोरड्याकंच पात्रातील पट्ट्यात पोरं भर दुपारी मांडतात क्रिकेटचा डाव. गुरांच्या पायातील टोकदार खुरांनी उडालेली नदीपात्रातील धूळ आकाश व्यापू पाहतेय. भर उन्हाळ्यात थेंब-थेंब पाण्यासाठी नदीचं लाजाळू मन कणाकणानं तुटक राहतेय ओलेत्या वैभवाचे सोनेरी दिवस आठवून नदी झुरत राहतेय मनात. आताशा एवढ्यात गावही आक्रसू पाहतंय नदीला. नदीच्या एैसपैस काठावरचे हिरवे हात माणसं मोठ्या निदर्यतेनं छाटू पाहतात चकाकणार्‍या काही नाण्यांसाठी, किनार्‍यावरच्या भागावर वसणार्‍या आगंतुक घरांनी नदी अधिकच वेडी होतेय. उन्हाळा म्हणजेच नदीचं अवकाळी मरण असतंय माणसांनी बळजबरीनं लादलेलं. कधी कुठे पूर्ववाहिनी झालेल्या नदीच्या काठावर उभं असतंय एखादं पुरातन मंदिर.

उंच पर्वताचा एक निसरडा भाग, तिथूनच एक अवखळ छोटासा प्रवाह उड्या घेत खाली येतोय. दर्‍याखोर्‍यात, दाट झाडीतून प्रवाह थोडा रूंदावत जातोय. अनेक टणक, अणकुचीदार दगडांना प्रवाहानं शरण आणलेलं. प्रवाहाच्या मार्गातील वस्तुमात्रांचे भिडस्त अडथळे प्रवाहाला सहजच जागा करून देतात. प्रवाह असतोय आपल्याच गतीत... अनोख्या लयीत! प्रवाह पर्वताच्या पायथ्याशी वाहत येतोय अधिक रूंदावून.... विस्तीर्ण होऊन! या प्रवाहातूनच जन्म होतोय एका जीवनयादी नदीचा! माणसाच्या आयुष्यरूपी वाळवंटाला अमृतरूपी पाण्यानं सचैल करणार्‍या लोकमातेचा!

नदी वाहतेय. सामंजस्य आणि शालीन होऊन, सागराच्या एका वेड्या ओढीनं! नदीचं सुरेख पात्र पुढे पुढे रूंदावत जाणारं. वाहणार्‍या पाण्याला चांदीची लकाकी आलेली, अबोलतेचा अभिशाप भोगत बसलेले नदीचे किनारे निमुळते होत जातात. पाण्यातील विविधरंगी माशांचं जलनर्तन वाढलेलं. नदी वाहतेय सुख-दु:खांच्या देखण्या क्षणांची साक्षीदार होऊन.

एक प्रसन्न सकाळ. सभोवतीच्या चराचराला हलकेच जाग येऊ लागलेली. नदीही जागतेय सुखस्वप्नांच्या साखरझोपेतून! तलम वाळूचे विसतीर्ण किनारे हळूहळू जागे होऊ लागतात. गर्द हिरव्या रंगाच्या पोपटांचा एक मनभावन थवा प्रवाहाच्या अवखळ पाण्यात यथेच्छ डुंबून घेतोय. त्यांंच्या अजबरंगी पोपट गलक्यानं नदीकाठ क्षणभर भारावलेला. सूर्याची तलम किरणं नितळ पाण्याला सोन्याचं भरजरी दान देतात. नदी अधिकच देखणी होऊ लागतेय. नदीओढीची पावलं नदीकाठावर रेंगाळू लागतात. दरम्यान पूर्वेकडचा रानवारा रानवट सुगंधाचा झालेला. जुणी-धुण्यांचा लयबध्द आरोळ्यात नदीकाठ गुंजायमान होतोय. देखण्या गौर हातातील बिल्वर हलकेच किणकिणू लागतात.

कुरणांच्या हिरव्या ओढीनं लगबगीनं निघालेली अवखळ गुरं नदीचं अमृतपाणी पिऊन घेतात. गुराख्यानं छेडलेल्या कृष्णपाव्याचे मंजुळ सूर सार्‍या देशभर घुमू लागतात. सूर्य हळूहळू वर येत असलेला. नदीचं गार पाणी तापू लागतंय. नदीकाठावर रेंगाळलेली पावलं परतू लागतात. नदीकाठावरची सकाळ अधिकच प्रसन्न झालेली.

सूर्य चढू लागतोय. दुपार झालेली. काठावरच्या शालीन बाभळीच्या गाभूळलेल्या सावल्या नितळ पाण्यावर पडलेल्या. भर दुपारी रानातून परतलेली गुरं पाणी पिऊन नदी काठावरच्या डेरेदार झाडांखाली रवंथ करत बसलेली. झुडपांच्या हिरव्या सावलीतून निघालेली उनाड हरणं नदीकाठावर पाण्यासाठी काही क्षण रेंगाळतात. मोरही छेडून बसतात. एक दीर्घ केका नदी परिसारत दूरवर घुमणारा. चिकार पाखरांचे बोलके थवे पाण्यावर येऊन बसतात.

दुपार अधिकच आळसावते. भर मध्यान्ही माथ्यावरच्या मंदिरातून निनादलेले घंटेचे स्वर अधिकच गंभीर वाटतात. दुपारचं टळटळीत ऊन चांदीचं झालेलं मस्तपैकी वाळूत पहुडलेल्या शंख-शिंपलींना उन्हातील चमचमत्या मृगजळाचा हवासा भास होत असलेला. नदी अधिकच संथ होतेय. रेंगाळतेय किनार्‍यांपाशी. दुपारच्या शांत प्रहरी गावातून आलेली टवाळपोरं पोहत बसतात. अवखळ पाण्यात यथेच्छ! कातळ डोहाच्या काठावरची हरित लव्हाळी हवालदिल झालेली. उंच कड्यावरून खोल पाण्यात उड्या मारून पोरं माजवतात हुंडदंग नदीकाठावर. नदी मनातच हसू पाहते. दुपार मात्र अधिकच आळसावयेत.

संध्याकाळच्या सावल्या लांबू पाहतात. नदीकाठावरून गेलेल्या वाटा पावलांनी गजबजून जातात. कुरणातली गुरं गावाकडे परतू लागतात. नदीचा अवखळ झुळझुळता होतोय. संध्याकाळचा एक उदास रंग नदी परिसरात पसरू लागतोय. परतीची पाखरं नदीकडे टाकतात एक अधीर दृष्टिक्षेप. मावळतीकडच्या वार्‍यात संध्याकाळचा अनोखा गंध उतरून आलेला. हळूहळू संध्याकाळ सरकतेय रात्रीकडे. आभाळातल्या दुधाळ चांदण्या नदीच्या संथशा पाण्यातून हसू लागतात. ढगाच्या कुठल्याशा काजळ कोपर्‍यातून डोकावणारा राजस चंद्र नदीच्या पाण्यात आपलं गोरं रूप पाहून हरखून जातोय. रात्र चढत राहतेय नदीच्या देखण्या स्वप्नाला गतीचे लोभस रंग बहाल करून! नदी वाहत राहतेय ऋतूंचं ललितचित्र सोबतीला घेऊन. ऋतू आलेत की नदीही हरवून जातेय रंगरूपाच्या देखण्या छबीसाठी. ऋतू येतात आणि नदीला हव्याशा समृध्दीचं दान देतात. ऋतूंचा हा मंगल ठेवा जपत नदी फुलत राहतेय.... नकळत झुलत राहतेय. काळा मेघांचा ईश्वरीय पावसाळा आलाय की नदी गाऊ लागतेय संपन्नतेची सकवार गीतं! पावसाळ्यातील सुघड मेघ पाण्याचं लडिवाळ दान देतात. गाव-गल्लीतून, वळणदार वाटांतून पर्वत-टेकड्यांवर वाहणारे उनाड निर्झर गुलाल धुळीचं पाणी घेऊन नदीला येऊन मिळतात... या आवेगी पाण्यानं नदी अधिक समृध्द होतेय. प्रवाह रूंदावतात. पात्र तुडुंब भरतंय. किनारे मिटवू पाहतात ओळख नदीनं घातलेल्या बंधनाची! किनार्‍यांना भूल देऊन नदीचं रोरांवत पाणी शिरू पाबतंय वाटेवरच्या एखाद्या मायाळू गावात. गाव सैरभैर होतंय. शेताशिवारातली इवलाली पिकं करतात प्रार्थना नीनं असं मत्त होऊ नये म्हणून! डोळे विस्फारणार्‍या पुराच्या पाण्याचे लोंढे गावात शिरू लागतात. नदी मात्र गतीनं गर्वगीत गाऊ लागते.

काठावरची हिरवी समृध्दी सोबतीला घेऊनच नदी वाहत राहतेय. अनेक अवखळ प्रवाहांचं बोट धरून शेतशिवारं फुलून राहतात. नदीच्या मंगल आशीर्वादानं काठावरच्या बाभळीची टपटपलेली पिवळी फुलं वाहत राहतात प्रवाहाबरोबर आनंदून! खरं तर पावसाच्या मंगल कृपेनं एक देखणी नववधू झालेली.

हिरवं मखमलीपण घेऊन हिवाळा येतोय. हिरव्या समृध्दीचा नव्हाळ रंग सर्वत्र दिसू लागतोय. नदीचे काठ गवताच्या तलमपणानं झाकोळून येतात. नदीच्या गढूळ पाण्याचे नितळ आरसे झालेले. चांदीचं पाणी चकाकू लागतंय. प्रवाहाचा आवेग हळूहळू मंदावू लागलेला. पाणी एवढं नितळ होतयं, की सूर मारणारे मासे डोळ्यांना दिसू लागतात. तळातील पाण्यात शंख -शिंपली आणि काचेच्या गारगोट्या हसू लागतात.

काठावरून गार वारा वाहू लागतोय. नदीच्या पाण्याच्या गार सोबतीनं गारवा अधिकच वाढलेला. हिवाळ्यातील गुलाबी थंडीच्या मौन रात्री नदी अधिकच संथावून जातेय. दूरदूरपर्यंत ऊन झिळमिळू लागलंय, की उन्हाळा येऊ पाहतोय. सभोवारचं हिरवं देखणं वैभव करड्या - फिक्कट रंगाचं होऊ लागतंय. आतापर्यंत दुथडी भरून वाहणारी नदी अचानक आक्रसून जातेय. किनारे दिसू लागतात. नदीचं देखणं रूपडं हलकेच वाळवंटी होऊ लागतंय. डोह्याच्या पाण्यात खोल बुडालेले कातळ हत्तीखडक ओकेबोके दिसू लागतात. लव्हाळ्याची हिरवी नव्हाळी कधीचीच हरवलेली. गायी-गुरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झालेली. पाखरंही शोधत डबक्यात थांबलेल्या पाण्याचे नितळ आरसे.

नदीचं लकाकतं पात्र ओसाड दिसू लागतंय. नदीच्या कुठे कुठे कोरड्या पडलेल्या पात्रातून शिवाराकडे अनेक वाटा लगबगीनं धाऊ लागतात. तर कधी कुठे कोरड्याकंच पात्रातील पट्ट्यात पोरं भर दुपारी मांडतात क्रिकेटचा डाव. गुरांच्या पायातील टोकदार खुरांनी उडालेली नदीपात्रातील धूळ आकाश व्यापू पाहतेय. भर उन्हाळ्यात थेंब-थेंब पाण्यासाठी नदीचं लाजाळू मन कणाकणानं तुटक राहतेय ओलेत्या वैभवाचे सोनेरी दिवस आठवून नदी झुरत राहतेय मनात. आताशा एवढ्यात गावही आक्रसू पाहतंय नदीला. नदीच्या एैसपैस काठावरचे हिरवे हात माणसं मोठ्या निदर्यतेनं छाटू पाहतात चकाकणार्‍या काही नाण्यांसाठी, किनार्‍यावरच्या भागावर वसणार्‍या आगंतुक घरांनी नदी अधिकच वेडी होतेय. उन्हाळा म्हणजेच नदीचं अवकाळी मरण असतंय माणसांनी बळजबरीनं लादलेलं. कधी कुठे पूर्ववाहिनी झालेल्या नदीच्या काठावर उभं असतंय एखादं पुरातन मंदिर. आस्थेची साजूक शाश्वती देणारं! नदी करत राहतेय वाहणार्‍या प्रवाहाच्या किलकिलत्या डोळ्यांनी काठावरच्या यात्रेचं कौतुक!

कधी कुठल्याशा अनिर्बंध ओढीनं समुद्राकडे धावणार्‍या नदीला माणसं घालतात राक्षसी घरणाचा आवर! नदी हुरमुसतेय. माणसांच्या या आजब कृत्याचा निषेधही नोंदवू पाहतेय. माणसं बांधू पाहतात नदीला हवं तसं. घालतात तिच्या अवखळपणाला आवर. पण नदी मात्र सोडत नाहीय आपलं नित्य कर्म. ती वाहत राहतेय झुळझुळत, आपल्या रौद्र रूपाला आवर घालीत!

अलीकडे नदी पूर्णपणे बदलीलय. शहर ओढूनं धावणार्‍या नदीला प्रदूषणानं घातलाय अजगरी विळखा. अधिकच्या हव्यासापोटी जमिनीच्या राक्षसी लालसेपोटी खळाळणार्‍या चैतन्यदायी नदीचे जीवघेणे नाले कधी झालेत ते माणसालाही कळत नही फरसं!

Path Alias

/articles/nadaicae-mauula

Post By: Hindi
×