नदी आणि शिक्षण


मानवी संस्कृतीच्या इतिहासात नद्यांचे स्थान फार महत्वाचे आहे. भारतातील गंगा, सिंधू, यमुना, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी अशा अनेक नद्यांचा संदर्भ प्राचीन ग्रंथात आढळतो. भारतीयांची वसतीस्थाने नद्यांच्या किनार्‍यावर निर्माण झाली व तेथेच भारतीय संस्कृतीचा विकास घडून आला. आर्यांच्या संस्कृतीचा विकास गंगा व सिंधू नद्यांशी निगडित आहे तर द्रविड संस्कृतीचा विकास नर्मदा, गोदावरी, कृष्णा या दक्षिणेकडील नद्यांशी निगडित आहे. नदी ही जगवणारी आणि शिक्षण हे जागवणारं असते. नदीत जीवन असतं म्हणून नदी जीवनदायीनी. पाण्याविना नदी असू सकत नाही. पाणी हे जगातल्या सर्वच प्राण्यांना प्यावे लागते. रक्ताची द्रवता टिकावी, त्याचे शरीरभर अभिसरण घडावे, शरीरातील अनावश्यक द्रव्यांचा निचरा घडावा यासाठी पाणी लागतेच. किटकांनाही त्यांच्या पध्दतीने पाणी लागतेच. म्हणून पाण्याला जीवन हे नाव दिले. पाणी पाहूनच गावे वसतात, भूगर्भातले पाणी शोधून माणसे घरकूल बांधतात. एखाद्या प्रकारचे धान्य, अन्न नाही मिळाले, तर दुसरे मिळविता येईल, पण पाण्याला पर्याय नाही. पाण्याची तहान कशानेही भागत नाही. अन्नधान्य साठविता येते पण पाणी मर्यादित साठविता येते. पाण्याची ने - आण करणे शक्य नसते. पाणी पंचायतीने, पाणी परिषदेने म्हणूनच पाण्याचा प्रश्‍न अनेकदा चर्चिला आहे. 21 व्या शतकाला पाण्याचे शकत म्हणणे अधिक योग्य ठरेल.

श्रीदत्तात्रेयांनी चोवीस गुरू मानले. त्यातील एक गुरू नदी आहे. गुरू प्रमाणेच नदी खूप काही शिकवते. उदरनिर्वाहासाठी शिक्षण घेतले जाते. शिक्षण पोटापाण्याला लावते. नदी देखील अन्नदात्री - जीवनदायी आहे. नदीमुळे परिसराला पाणी, विहिरी तळ्यांना पाणी असते. नदीकाठी औद्योगिक कारखाने उभारले आहेत, शेतकरी शेती करू शकताहेत. नदीला गंगोत्री म्हणतात तर शिक्षणाला ज्ञान गंगोत्री म्हटले जाते. नदी आणि शिक्षण दोन्ही मानवी जीवनाला प्रवाही ठेवणारे स्त्रोत आहे.

नदी आणि शिक्षण दोन्ही जीवनाला परिपूर्ण करणारे प्रवाह आहेत. नदीमुळेच मानवी वस्त्या झाल्या, नदीनेच मैदानी प्रदेश निर्माण केले. बॉबिलोनिया, मोहोंजोदाडो, हडप्पा या सारख्या प्रगत संस्कृती नदीकाठी निर्माण झाल्या. अकबराने फत्तेपूर शिक्री वसवले पण पाण्याअभावी ते ओस पडले. पश्‍चिम बंगालचा ताग व्यवसाय पूर्णपणे हुबळी नदीशी निगडित आहे. कृष्णा. कावेरी, गोदावरी नद्यांच्या त्रिभूज प्रदेशात जलसिंचनामुळे नागरीकरण झपाट्याने झाले.

औद्योगिकरण तेथेच झाले जेथे पाणी आहे. वस्त्या वाढत गेल्या, लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या गरजांच्या पूर्ततेसाठी सुविधा निर्माण केल्या गेल्या, गावांचा कायापालट झाला.

नदी व्यापक अर्थाची संज्ञा आहे. ओहोळ, निर्झर, ओढा, उपनदी, नदी, नद ही जलप्रवाहाच्या वाढत्या आकारानुसार त्यांना दिलेली नावे आहेत. नदीप्रमाणेच शिक्षण देखील व्यापक अर्थांची संज्ञा आहे. शिक्षण म्हणजे मानवाचा विकास, मानवाच्या क्षमता, वर्तन विकसित करणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण. जीवनाच्या सर्व व्यवहारासाठी महत्वाचे असणारे ज्ञान, कौशल्य, जाणीव, संक्रमित करणारे, संघटितपणे, सातत्याने केलेल अध्यापन म्हणजे शिक्षण. जे माणसाला सुसंस्कृत करते तेच शिक्षण. शिक्षण म्हणजे इष्ट बदल. औपचारिक व अनौपचारिक दोन्ही प्रकारचे शिक्षण प्राचीन काळापासून चालू आहे. आरोग्यासाठी, चांगल्या सवयीसाठी, क्रिडेसाठी, व्यवसायासाठी, योग्यबदलासाठी, उदरनिर्वाहासाठी व्यक्तिच्या संपूर्ण विकासासाठी, चार भिंतीच्या पलिकडे ही सतत शिक्षण चालू असते.

मानवी संस्कृतीच्या इतिहासात नद्यांचे स्थान फार महत्वाचे आहे. भारतातील गंगा, सिंधू, यमुना, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी अशा अनेक नद्यांचा संदर्भ प्राचीन ग्रंथात आढळतो. भारतीयांची वसतीस्थाने नद्यांच्या किनार्‍यावर निर्माण झाली व तेथेच भारतीय संस्कृतीचा विकास घडून आला. आर्यांच्या संस्कृतीचा विकास गंगा व सिंधू नद्यांशी निगडित आहे तर द्रविड संस्कृतीचा विकास नर्मदा, गोदावरी, कृष्णा या दक्षिणेकडील नद्यांशी निगडित आहे.

केवळ भारतातच नव्हे तर जगातील इतर देशाच्या सांस्कृतिक विकासाचा इतिहासही त्या त्या देशातील प्रमुख नद्यांशी निगडित झालेला आहे. इजिप्तची नाईल, इटलीची - पो, चीनची हो-हँग-हो नदीच्या तीरावर त्या त्या देशाच्या विशिष्ट संस्कृती विकसित पावल्या. नदीने पाणी पुरवठा करून कृषी व औद्योगिक विकास घडवून आणला, विद्युत निर्मिती केली, व्यापार वृध्दी केली, नद्या मानवाच्या सुख समृध्दीला कारणीभूत ठरल्या.

नद्या, संस्कृती - संवर्धन कर्त्या आहेत. शिक्षणही संस्कृती संवर्धन व संक्रमण कर्ते आहे. शिक्षण घेतलेली माणसेच या पाण्याचा, ग्रामीण माणसाचा विचार करतात.

युनिसेफने शाळेतील स्वच्छता गृहाची पाहाणी केली. सन 2000 ते 2005 या कालावधीत तीन खंडातील सहा देशात पथदर्शक प्रकल्प हाती घेण्यात आले. या कालावधीत एन.जी.ओ. च्या, शासकीय खात्याच्या व त्या देशातील कार्यालयाच्या मदतीने युनिसेफने हे प्रकल्प कार्यान्वित केले. पथदर्शक कार्यक्रमानंतर 1-2 वर्षांनी 64 शाळांतून या प्रकल्पाचे मूल्यमापन करण्यात आले.

2005 मध्ये सहा देशातील संशोधन समूहांनी मूल्यमापनाची चौकट तयार केली व मूल्यमापन साधन तयार केले गेले. क्षेत्रिय कामाद्वारे विश्‍लेषणात्मक माहिती गोळा केली गेली. मूल्यमापनातून प्राप्त झालेल्या फलनिष्पत्तीचे (निष्कर्षांचे) आदान-प्रदान केले गेले. शेवटी एक कार्यशाळा घेतली या कार्यशाळेत सर्व निष्कर्ष एकत्र केले गेले. आपण काय शिकलो. याचे आदान-प्रदान केले गेले. याचा अहवाल पाणी व शिक्षण यावर प्रकाश टाकणारा आहे. या पथदर्शी अभ्यासाचा उपयोग आपल्या अनेक शाळांसाठी केला तर बालकांचे पाणी शिक्षण होईल.

मुलींना घरकामासाठी जुंपले जाते असे युनिसेफच्या एका प्रकल्पातून सिध्द झाले आहे. पाणी भरणे, यामुळे अनेक मुलींना शिक्षणापासून दूर केले जाते. कित्येकदा पाणी भरण्यासाठी शाळा बुडवली जाते. केरकचर्‍याची विल्हेवाट लावण्याची, पाणी भरण्याची कामे मुलींकडेच असतात. पाण्याचा सोईच्या कमतरतेमुळे मुलींच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होतो. मुलींना सुरक्षित, स्वतंत्र, स्वच्छ, नि:सारणाच्या सोयी शाळेत पुरविण्याची गरज आहे. सुनिसेफने त्यांच्या पाणी व मलमूत्र विसर्जनाच्या कार्यक्रमातून समाजाच्या चांगल्या अभिवृत्ती, सवयी, पध्दती यांचे शिक्षणातून सबलीकरण व्हावे असे म्हटले आहे.

आरोग्य व स्वच्छता हे देखील शिक्षणाचे विषय आहेत. जे नदीशी संबंधित आहेत. आपण बालशिक्षणाचा हक्क कायदा केला, पण तसे वातावरण बालकांपर्यंत पोहचते काय ? युनिसेफने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, 400 हजार मिलियन बालके दरवर्षी अनेक जंतुंनी बाधित होतात. पोटात जंत, अंगाला खाज, अंगावर पांढरे डाग, अशांना व त्यांच्या पालकांना पाणी व स्वच्छता जीवन कौशल्य याचे शिक्षण द्यावे लागेल. शाळांच्या पाहणीतून भयावह स्थिती समोर आली आहे. शाळेमध्ये पाण्याला नेले पाहिजे, बालकांना स्वच्छता शिकवली पाहिजे. पाण्यामुळे शाळेचे वातावरण बदलता येईल.

शिक्षण आणि पाणी जवळचा संबंध आहे. शिक्षणाच्या मदतीनेच उपयुक्त जीवनकौशल्ये आरोग्यदायी सवयी निर्माण करता येतील. शिक्षणातून निर्माण झालेल्या सवयी जीवनभर टिकणार्‍या असतात. शिक्षकांनी रोल मॉडेल म्हणून काम करावे.

धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांपैकी एकाच तालुक्याचा विकास अधिक का झाला ? त्याचे कारण पाणीच आहे.

साक्रीमध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेज नाही, पण शिरपूर मध्ये शिक्षणातील अनेक शाखा-उपशाखांचे उत्कृष्ट शिक्षणाच्या सोयी आहेत. कारण पाण्याची केलेली व्यवस्था. जागतिक दर्जाचे शिक्षण आज शिरपूर मध्ये उपलब्ध आहे. तेथील सर्व लोकांना शुध्द पाणी पुरविले जाते. जे कोणत्याही शहरातील नगरपालिका तसे पाणी पुरवित नाही. आजपर्यंत साक्षरतेचे वर्ग चालवले. आता संगणक साक्षरतेचा काळ आहे. या बरोबर जलसाक्षरता तितकीच महत्वाची आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष्य हा जीवसृष्टीच्या अस्तित्वाला धोका पोहोचवणारा विषय आहे, म्हणून आपण सर्वांनी याकडे अधिक गांभीर्याने पाहायला हवे. राज्य शासनाने या दिशेने पावले उचलली आहेत. स्वतंत्र जलनिती तयार केली आहे. शालेय अभ्यासक्रमात या संदर्भातील मुद्यांचा समावेश केला आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये जलसाक्षरता निर्माण केली जात आहे. पाणी साठा वाढविण्याच्या अनेक योजना राबविण्यात येत ओ. रोजगार हमी योजनेतून सिंचन प्रकल्पकांची कामे चालू आहेत. आता गरज आहे. वैयक्तिक व सामूहिक स्तरावर कृतीतून पाणी जपण्याची व शिक्षण जोपासण्याची. पाण्याची गरज ओळखणे व त्याच्या वापराबद्दल जागरूक असण्याची अनेक प्रकल्प शिक्षणातून हाती घेता येतील. जगभरात पाणी व शिक्षण यावर अनेक चळवळी चालू आहेत. आपणही त्यात सामील होऊ या.

या नव्या शतकात वाहनांना पेट्रोल अन माणसांना पाणी कमी पडणार आहे. समुद्र आटणार नाही, पण पाऊस वेळेवर पडणार नाही. पुरेसाही असणार नाही. सिमेंटची घरे वाढतील, झाडे तोडली जातील. बाष्पीभवन कमी होईल, पाऊस गायब होईल.

पाणी कमी झाले तर नदी कशी होईल ? नदी नसेल तर मी कुठे राहीन ? हा विचार करता करता डोळ्यातले पाणीही आटून जाईल. पाणी - पाणी करण्याची वेळ सर्वांवर येईल. म्हणून पाण्यासाठी प्रयत्नांची पाणपोई ठिकठिकाणी सुरू करा.

नदी आणि शिक्षण यांचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच त्यांच्यामध्ये साम्यभेद आढळून येतो. नदी आणि शिक्षण हे दोघेही प्रवाही आहेत. नदी ही निसर्गत: शुध्द व पवित्र आहे तर ज्ञानगंगोत्री ही अनादि काळापासून शुध्द व पवित्र मानली जात आहे.

जलचक्र अखंड चालू असते व मानवी जीवन चक्र ही अखंडपणे पुढे जात असते. दोन्हीही पंचमहाभूतांमध्ये स्वअस्तित्व विलिन करतात. नदी आणि शिक्षणामुळे समाज आणि राष्ट्र परम वैभवाकडे परमोच्च शिखरावर आरूढ होत असते.

नदीचा प्रवाह अधोमुखी तर शिक्षण प्रवाह उर्ध्वमुखी असतो. नदीला असंख्य उपनद्या येऊन मिळतात तर शिक्षण प्रवाहात असंख्य सहप्रवासी एकत्र येतात. नदीमध्ये लाटा उसळतात तर मानवी जीवनातही सुख, दु:खरूपी लाटा उसळत असतात. मानवी हस्तक्षेपामुळे नदी प्रदूषित होत असते. तर नदीबरोबरच मानवी अस्तित्व टिकविणे, वृध्दिंगत करणे किंवा अस्त या बाबी मानवी शिक्षणामुळेच योग्यपणे करणे शक्य आहे. अशाप्रकारे नदी आणि शिक्षण परस्परपूरक आणि मानवास उपकारक आहेत.

Path Alias

/articles/nadai-anai-saikasana

Post By: Hindi
×