पाण्याची उपलब्धता आणि वापर याबाबत जे निदर्शनास आले ते मांडण्याचा प्रयत्न केला, याव्यतिरिक्तही पाण्याच्या बचतीसंबंधात मार्ग अवलंबिण्यात येत असावेत. मुद्यांचे स्वरूप जरी किरकोळ वाटले तरी त्यामधील आशय पाणी वापरासंबंधीची जागरूकता प्रतिबिंबित करतो अशी धारणा आहे.
लंडन येथे मुक्कामास असतांना उपलब्ध पाणी आणि त्याचा वापर याविषयी साहाजिकच कुतुहल निर्माण झाले. दररोज चोवीस तास पाणी पुरवठा होणाऱ्या लंडन शहरात यासंबंधी काही निश्चित नियोजन केले असावे अशी धारणा झाली, यामध्ये एक बाब स्प्ष्ट झाली की इंग्लिश माणसाला पाण्याचे महत्व अतिशय आहे, ज्यास आपणास पाण्याबाबतचा Civic Sense असे म्हणता येईल. यादृष्टीने विचार करतांना खालील काही बाबी निरिक्षणात आल्या -1. लंडन शहराला होणारा पाणी पुरवठा प्रामुख्याने थेम्स नदी, त्याचप्रमाणे लहान लहान नद्यांचे पाणी एकत्रितरित्या साठवून करण्यात येते. जलसाठे तयार करण्यात आले असून (Reservoirs) त्यामध्ये पावसाचे पाणी साठविण्यात येते. नदीमध्ये बांध घातले आहेत, जे फिरते आहेत. (River Locks) नदीपात्रातील पाण्याची उंची कमी झाली की दोन बांधांमधील साठविलेले पाणी सोडण्यात येऊन नदीपात्रात आवश्यक पाण्याची पातळी राखली जाते. नदीच्या बाजूकडील भागात असलेल्या विंधण विहिरींतील (Borewell) पाणी आवश्यकतेप्रमाणे नदीपात्रात सोडण्यात येते.
2. नदीतील किंवा अन्य जलाशयातील पाणी कमी व्हावयास लागले, (जो पाणी पुरविण्याचा प्रमुख स्त्रोत आहे) की दूरदर्शनवरून नागरिकांना त्याची कल्पना देण्यात येते. अशा वेळी, बागकामासाठी, गाड्या धुण्यासाठी होज पाईपचा (रबरी पाईप) वापर न करता, झारीने पाणी देण्याचे आवाहन केले जाते, जेणेकरून पाण्याची बचत होईल, आणि त्याप्रमाणे पाण्याच्या वापराचा अवलंब केला जातो. पाणी म्हणजे राष्ट्रीय संपत्ती म्हणून पाहिले जाते. अशावेळी होज पाईपचा वापर केल्यास नियमाप्रमाणे दंडाची तरतूद आहे तथापि, जनमानसात जागरूकता एवढी आहे की दंड करण्याची वेळ येत नाही. घरांच्या परिसरात, रस्त्यांमध्ये पाणी वाहिलेले आठवत नाही, पाण्याचा अपव्यय नाहीच.
3. इंग्रज माणसांना बागकामाचा छंदच आहे. प्रत्येक घराभोवती बाग असतेच असते. आणि झाडांना वेगवेगळे आकार देऊन बाग सुशोभित करण्याचा प्रयत्न केला जातो. बागेसाठी पाणी लागणारच/यासाठी फायबरच्या टाक्यात छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी पन्हाळीतून संकलित करण्यात येते. या टाकीला खालच्या बाजूला तोटी राहते आणि त्याद्वारे बागकामासाठी पाण्याचा वापर करण्यात येतो. आवश्यकतेप्रमाणेच पाणी दिले जाते, त्यामुळे कुठेही पाणी वाहून जातय्, बागेत दलदल झालीय् असे दिसून येत नाही. बरं, लंडनमध्ये वर्षभर लहान मोठ्या प्रमाणात (कमी / अधिक) पाऊस राहतोच, म्हणून टाक्यामध्ये पाणी साठतेच. विशेषत: शनिवार-रविवार सुट्ट्यांच्या दिवशी घरातील इतर कामांबरोबर बागकामाचा छंद जोपासतांना आणि पाण्याचा योग्य वापर करतांना लोक दिसून येतात. यामध्ये वृद्ध दांपत्यांची संख्या काही प्रमाणात अधिकच दिसून येते.
4. घरातील तोट्या गळत असतील तर त्याची दुरूस्ती ताबडतोब करण्यात येते, यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो. अगदी अलिकडे, म्हणजे पाच वर्षांपूर्वीपर्यंत, Water Board मार्फत या दुरूस्त्या होत होत्या, आता मात्र लोक स्वत:च आवश्यक दुरूस्ती करतात. पाण्याचे नळ असोत, संडास बाथरूममधील पाण्याचे वितरण असो, एक छोटेखानी पुस्तिका उपलब्ध असते आणि त्याबरहुकूम घरातील लोकच ही कामे पूर्ण करतात. यायोगे प्लंबिंग संबंधी त्यांना पूर्ण माहिती होते आणि कुठे गळती आढळली की त्वरित दुरूस्ती करण्यात येऊन पाण्याचा होणारा संभाव्य अपव्यय टाळण्यात येतो.
5. मोठमोठ्या मॉल्समध्ये (व्यापारी संकुल) कार पार्किंगमध्ये गाड्या धुण्याची सोय राहते. पाणी कमतरतेच्या कालावधीत याठिकाणी सुद्धा होझ पाईपचा वापर न करता बादलीत पाणी घेऊन फडक्यांना गाड्या पुसण्यात येतात. कुठेही पाणी वाहून चालल्याचे दिसत नाही.
6. उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पाणी साठविण्यासाठी reservoirs तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी काहींचा वापर खेळांसाठी करतात. (Water Park म्हणू!) Welsh harp नावाचा जलाशय यापैकीच आहे. नदीमध्ये ज्यावेळी पाणी कमी पडते त्यावेळी अशा प्रकारच्या जलाशयातील पाणी नदीत सोडण्यात येते आणि मग पाण्यावरचे खेळ बंद करण्यात येतात.
7. शहराला चोविस तास पाणी पुरवठा होतो. कालांतराने यदाकदाचित पाणी पुरवठा कमी व्हायला लागला तर वेळीच त्यावर उपाय असावा, म्हणून समुद्रातील खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करून त्याचा पुरवठा करणे कसे किफायतशीर राहील याचा विचार सुरू असल्याचे ऐकिवात आले.
पाण्याची उपलब्धता आणि वापर याबाबत जे निदर्शनास आले ते मांडण्याचा प्रयत्न केला, याव्यतिरिक्तही पाण्याच्या बचतीसंबंधात मार्ग अवलंबिण्यात येत असावेत. मुद्यांचे स्वरूप जरी किरकोळ वाटले तरी त्यामधील आशय पाणी वापरासंबंधीची जागरूकता प्रतिबिंबित करतो अशी धारणा आहे. वास्तविक आपल्याकडेही वारंवार याविषयी सर्व स्तरावर प्रबोधन झाले आहे, अद्यापही करण्यातही येते आहे. आपण एखादे विषयी आकडेमोड करण्यात समाधान मानतो आणि आपला वैज्ञानिक दृष्टीकोन सिद्ध करू पाहतो. अर्थात, पायाभूत माहिती म्हणून याची आवश्यकता आहेच, पण किती प्रमाणात? त्याऐवजी एक सरळ, साधी संकल्पना, जी सर्वसामान्यांना ज्ञात आहे, की पाण्याचा अपव्यय टाळावा आणि एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून त्याची बचत करावी. हा दृष्टीकोन व्यापक करण्यास काय हरकत आहे? इथं, इंग्रजांचं कौतुक करावयाचा प्रयास नाही, आपणही ते सहतसाध्य करू शकतो, पण.....
सामुहिक प्रयत्न कमी पडतात की काय अशी शंका येते. इंग्लंड आणि आपण यातील लोकसंख्येची तफावत बरीच आहे, म्हणूनच पाण्याच्या वापराविषयी आपण अधिक जागरूक असावयास पाहिजे, नाही कां? पाश्चात्य संस्कृती आपण आनंदाने स्विकारतो, मग पाणी वापराची संस्कृती अंगिकारण्यात गैर ते काय ?
सम्पर्क
श्री. डी.पी. सातभाई, पुणे - (भ्र : 09822025743)
Path Alias
/articles/mahatava-paanayaacae
Post By: Hindi