म्हसोबावाडी पाणलोट विकास कार्यक्रम


म्हसोबा वाडी येथील 180 हेक्टरमधे 50 गरीब कुटुंबांसाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवून त्यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने रोटरी क्लब, पुणे यांनी 1,55,000 डॉलर खर्च करायचे योजिले आहे. ही योजना नंदनवन नावाच्या एका समाजसेवी संस्थेच्या मदतीने पूर्ण होईल. महाराष्ट्रातील जनजातीय समाजाचे उत्थापन करण्याचे ध्येय बाळगून कार्यरत असलेले फादर रॉबर्ट डी.कॉस्टा यांची या कामी मदत घेतली जाणार आहे.

उताराच्या जमिनीवर टेरेसिंग, बंडिंग, मल्चिंग, व्हिजिटेटीव्ह बॅरियर्स आणि ड्रेनेज लाईनट्रीटमेंट या पद्धतींद्वारे मृदा आणि ओल यांचे संवर्धन करण्याची ही योजना आहे. बहुउद्देशीय वृक्ष लागवड, झुडुपे, गवत, कुरणे यांचा विकास करुन हे साध्य केले जाणार आहे. Agro-फॉरेस्टरी व हॉर्टिकल्चर विकासाला गती मिळणार आहे. गली प्लगिंग व नाला बंडिंग पद्धतींचा वापर करुन छोट्या आकाराचे जलसाठे निर्माण केले जाणार आहेत. त्याच प्रमाणे वृक्ष व जंगल विकासावरही भर दिला जाईल.

25 व 26 फेब्रुवारीला पुणे क्लबच्या सदस्यांनी स्वित्झर्लंड येथून आलेल्या श्री. रोलांड फ्रुटींग या कंसल्टंट बरोबर शिवार फेरीचा कार्यक्रम आखला गेला. प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होत आहे हे जाणून घेणे हा या शिवार फेरीचा उद्देश होता. या फेरीतून खालील गोष्टी लक्षात आल्या :

1. बाभूळवाडीचा हिस्सा असलेल्या म्हसोबावाडी या खेड्यातील जवळपास सर्वच कुटुंबे ही दारिद्य रेषेखालील होती. एकूण 180 हेक्टर जमिनीपैकी 80 हेक्टर जमीन ही लागवडीयोग्य आढळली. खेड्यात एकूण 98 जनावरे होती. यापैकी 36 गायी, 35 बैल, 20 बकर्‍या व 7 म्हशी होत्या.

2. 115 हेक्टर जागेवर पाणलोटविकास कार्यक्रम राबविला गेला आणि त्यामुळे आणखी 41 हेक्टर जमीन लागवडीखाली आली. आतापावेतो 50 कुटुंबांपैकी 41 कुटुंबांना प्रकल्पाचा लाभ प्राप्त झाला आहे.

3. जी नवीन जमीन लागवडीखाली आणण्यात आली तिच्यापासून 1-4-2016 पासून ते 31-12-2016 पर्यंत तांदूळ, तेलबिया व शेंगदाणा या पिकांपासून मिऴणारे उत्पन्न 2,29,750 रुपयांपासून 5,87,300 रुपयांपर्यंत वाढलेले दिसून आले. केलेल्या कामासाठी मजुरीच्या स्वरुपात शेतकर्‍यांना 4,72,969 रुपये वाटण्यात आले. यामुळे जे लोक गाव सोडून मजुरीसाठी गावाबाहेर जात होते ते जाणे आता थांबले. एकत्र येवून शेती करण्याचे लाभ शेतकर्‍यांच्या लक्षात आले आणि त्याचा परिणाम म्हणून गट शेतीमुळे उत्पादन खर्च कमी झाला. एवढेच नाही तर त्यांनी एकत्रित विपणन करण्यास सुरवात केली.

रोटरी क्लबचे सदस्य व ग्रामस्थ यांच्यामध्ये या प्रकल्पामुळे संवाद सुरु झाला. शेतकर्‍यांच्या जमिनीचे सपाटीकरण केल्यामुळे पाणी शेतात थांबायला लागले व त्याचा लाभ अधिक पीक येण्यात झाला. बंडिंग व चरांमुळे पाणी वाहून जाण्याचा वेग कमी झाला व जमा झालेले पाणी शेतीसाठी वापरले जाऊ लागले. टेकडीवर पाणी जमा करण्यासाठी टाकी बांधण्यात आली. खोदलेल्या चरांचे काठावर वृक्ष लागवडही करण्यात आली.

Path Alias

/articles/mahasaobaavaadai-paanalaota-vaikaasa-kaarayakarama

Post By: Hindi
×