महिला पाणी मंच


संवेदनहीन लोकांच्या मनापर्यंत हा प्रश्‍न जातच नाहीये. ‘तुम्ही पुढल्या पिढीसाठी पाणी शिल्‍लक ठेवणार आहात की नाही?’ या प्रश्‍नावर ते म्हणतात, ‘पुढल्या पिढीसाठी पैसा, सोनं, घर, जमीन याची सोय करायची असते, पाण्याची सोय काय करायची?’ त्यांना आपण कसं सुशिक्षित म्हणायचं!

पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात असले तरीदेखील शेती व पिण्यासाठी वापरण्यायोग्य पाणी अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्या पाण्याचे प्रमाण व गुणवत्ता दोन्ही दिवसेंदिवस अनेक कारणांनी घसरत चालली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.

पाण्याच्या व्यवस्थापनात, वापरात, संवर्धनात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. महिला या आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे व्यवस्थापन करीत असतात; कारण पाणी व महिला यांचा संबंध अतुट आहे आणि घरगुती कारणासाठी पाण्याचा वापर महिलाच अधिक प्रमाणावर करीत असतात. म्हणूनच महिलांनी जर जलसंवर्धनाच्या कार्याकडे लक्ष दिले तर या अमूल्य अशा जलसंपत्तीचे संवर्धन करणे अशक्य नाही आणि म्हणूनच जलव्यवस्थापनाच्या या प्रक्रियेत, निर्णयात महिलांचा सहभाग असणे हे मला अत्यंत आवश्यक वाटले. त्यासाठी महाराष्ट्र स्तरावर 2001 साली मी‘महिला पाणी मंचा’ची स्थापना केली. मी ‘महिला पाणी मंचा’च्या संस्थापिका व अध्यक्षा आहे. संस्थेच्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील पंचवीस सदस्या आहेत. प्रा. रेखा ठाकरे, डॉ. जया जाणे, समीक्षा सबाने, प्रा. वंदना महात्मे, आशालता ओले, कविता कल्याणकर, अनुया साळुंखे, अल्का देशमुख, अंजली कुलकर्णी इ.

महाराष्ट्रात ‘महिला पाणी मंचा’च्या पंचेवीस शाखा स्थापन झाल्या आहेत. या माध्यमातून जलजागरणाचे कार्य होत आहे. ‘महिला पाणी मंच’ ही संघटना पाण्याचा चिरस्थायी विकास करण्याच्या हेतूने प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्यक ज्ञानाची, विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण करून महिलांचे सहकार्य घेऊन संस्था सर्वांशी समन्वय साधते आहे. ‘जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उद्‍धारी’ असा बदल मूळ म्हणीत केल्यास योग्य होईल, असे मला वाटते.

‘महिला पाणी मंचा’तर्फे महिला व विद्यार्थ्यांना पाण्याच्या थेंबाथेंबाचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. वेगवेगळ्या माध्यमातून आपण देखील पाण्याची बचत करू शकतो, हे त्यांच्या मनावर बिंबविले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्पही संघटनेतर्फे राबविला जातो. वर्धा जिल्ह्यातील निमगाव या गावातल्या महिलांना पाच पाच किलोमीटर दूरवर जाऊन पाणी पाणी आणावे लागायचे; पण ‘महिला पाणी मंचा’च्या सहकार्याने तेथील विद्यार्थ्यांची मदत घेऊन निमगावमधील अनेक घरांच्या छतावरील पावसाचे पाणी साठवून त्यायोगे भूमिपुनर्भरण केले. परिणामी गावातील कोरड्या ठणठणीत पडलेल्या विहिरींना आता पाणी आले आहे. या यशस्वी योजनेमुळे अशा प्रकारची जलसंधारणाची कामे करण्यास महिला व विद्यार्थ्यांना उत्साह आला आहे.

‘महिला पाणी मंच’तर्फे अजून एक महत्त्वाचे काम चालले आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच पाण्याच्या बचतीबद्दल आस्था, कर्तव्याची जाणीव निर्माण होण्यासाठी शाळाशाळांमधून ‘महिला पाणी मंच’ पुस्तिका आम्ही देतो. त्यात प्रत्येक विद्यार्थी कशा, कोणत्या प्रकारे पाण्याची बचत करू शकतो ते त्याने लिहावे. पाण्याची बचत त्याने कोणत्या प्रकारे केली हेही लिहायचे आणि त्यावर आईची स्वाक्षरी घ्यायची.

या उपक्रमात सहभागी होऊन जो विद्यार्थी पाण्याची जास्तीत जास्त बचत करील त्याला ‘महाराष्ट्र वॉटर फ्रेंड’ हा पुरस्कार देण्यात येतो व ज्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात; त्या शाळेला ‘वॉटर स्कुल’ हा पुरस्कार जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते देण्यात येतो. पाणी या विषयावर निबंध व चित्रकलेची स्पर्धाही आयोजित करण्यात येते.

महिला पाणी मंचाचे ध्येय व उद्दिष्ट हे पाणी व त्याच्या गुणवत्तेबद्दल वापराबद्दल विद्यार्थी व महिलांमध्ये जागृती निर्माण करणे हेच आहे. शिवाय खालील काही उद्देश आहेत

- शासनप्रणाली व उपभोक्‍ता यांच्यात समन्वय साधणे.
- पाण्याच्या प्रश्‍नाचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधून संबंधित कार्यकारी यंत्रणेकडे त्याचा पाठपुरावा करणे.
- पर्यावरण व प्रदूषण या विषयी लोकशिक्षण, लोकजागरण करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे.
- जलव्यवस्थापनाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे.
- जलसंस्कृती व जल साहित्य-संस्कृती निर्माण करणे.
- विविध स्तरांवर सभा, संमेलने, कार्यशाळा, अधिवेशने आयोजित करणे.
- त्या विषयांवर लेखन प्रकाशित करणे इत्यादी.

‘महिला पाणी मंचा’च्या माध्यमातून मी वरील उद्देश पूर्ण करण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करते. मी जशी कार्यकर्ती आहे; तशीच मी लेखिकाही आहे. अनेक लेखांतून, वृत्तपत्रांतून मी पाणीप्रश्‍न व त्यावरचा उपाय यावरचे विवेचन केले आहे. तसेच मी विविध कार्यशाळा व परिषदेतून एकेचाळीस पेपर वाचले आहेत.

माझे सर्वात महत्त्वाचे व जल साहित्याच्या इतिहासात नोंद झालेले कार्य म्हणजे ‘जल साहित्य संमेलन.’ पाणी या विषयाच्या संदर्भात साहित्यिकांमध्येही आत्मीयता निर्माण व्हावी, जाणीव वाढावी आणि त्यांच्या लेखनातून ती सामान्य वाचकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मी पहिले ‘अखिल भारतीय जलसाहित्य संमेलन’ 2002 मध्ये नागपूर येथे भरविले. दुसरे ‘अखिल भारतीय जल साहित्य संमेलन’ पुणे येथे 2004 ला झाले. पहिल्या नागपूरच्या जल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नामवंत लेखक, कवी व कृषितज्ञ श्री. ना. धों. महानोर हे होते. आता आठवे जलसाहित्य संमेलन कोल्हापूर येथे आहे.

या जलसाहित्य संमेलनाला शेकडो साहित्यिकांचा उत्स्फूर्त सहभाग व उपस्थिती होती. हा सहभाग केवळ वक्‍ता म्हणून नव्हे तर श्रोता म्हणूनही लाभला होता. अथक परिश्रमातून व सुरेख नियोजनामुळे दोन दिवसांचे नागपूरचे हे पहिलेच ‘अखिल भारतीय जल साहित्य संमेलन’ अत्यंत यशस्वी झाले. दूरदर्शनच्या सर्व चॅनेल्सनी याची नोंद घेतली होती व त्यावरून या संमेलनाच्या कार्यक्रमांचे प्रसारण झाले. याप्रमाणे ‘महिला पाणी मंचा’चे कार्य विविध स्तरावर आकार घेत आहे.

‘महिला पाणी मंचा’च्या माध्यमातून होणार्‍या विविध स्तरांवरच्या कार्याची नोंद घेऊन जपान सरकारने थर्ड वर्ल्ड वॉटर कॉन्फरन्ससाठी मला सन्मानाने निमंत्रित केले होते.

सोलापूर येथे महाराष्ट्र सिंचन परिषद व वालचंद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर यांच्या सहकार्याने दिनांक 5 व 6 फेब्रुवारी 2005 ला झालेल्या सिंचन परिषदेच्या अधिवेशनात मी महिलांसाठी असलेल्या महिला व पाणी या विषयावरच्या कार्यशाळेत महिलांना मार्गदर्शन केले.तसेच वर्धा, नाशीक, अकोला,परभणी अशा अनेक ठिकाणी मी सिंचन परिषदेत सहभागी झाले.

नेपाळला सुद्धा महिला पाणी मंच तर्फे माझे र् वुमन अ‍ॅन्ड वॅाटर र् या विषयावर पेपर रिडिंग झाले आहे.

महिला पाणी मंचने यशोदा खोरे सहभागिता मंच स्थापन केला आहे. वर्धेला 12 जून 2007 रोजी एकात्मिक जलव्यवस्थापनाद्वारे र् वर्धा खोर्‍यातील यशोदा नदी उपखोर्‍याचा सर्वांगिण विकास र् या विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा घेतली. त्यात वर्धा जिल्हाधिकारी, तहसीलदार, अनेक शेतकरी, वर्धा जिल्ह्यातील पाणी संदर्भात काम करणारे एनजीओचे पदाधिकारी, कृषी अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरीकही सहभागी झाले होते.

महिला पाणी मंचमार्फत एक अतिशय वेगळा उपक्रम आम्ही राबविले. रोज सकाळी ‘मॉर्निंग वॉल्क’च्या निमित्तानं 5-6 कि. मी. चा एरिया वेगवेगळ्या भागातला निवडायचा. आणि कोण अशाप्रकारे पाणी वाया घालवतय याचं निरीक्षण करायचं. जो कुणी पाण्याचा अपव्यय करीत करीत असेल, त्याला पाण्याचं महत्त्व समजावून सांगणे, पाणी काटकसरीने कसे वापरावे हे सांगणे, तुमच्याकडे पाणी जास्त येतंय म्हणून तुम्ही नको तेवढे पाणी वापरता म्हणून दुसर्‍याला पाणी मिळत नाही, गाड्या ओल्या कपड्याने पुसा; त्यांची पाईपने आंघोळ घालू नका, घरासमोर पाणी शिंपडा, अंगण धुवू नका, अशा पद्धतीने नागरिकांमध्ये जलजागृती आणण्याचे काम आम्ही रोज करतो. यात आम्हाला इतके वेगवेगळे अनुभव आलेत की त्या अनुभवांच एक स्वतंत्र पुस्तक व्हावं आणि त्याचं नाव ठेवावं ‘कशाला भाजता लष्कराच्या भाकर्‍या?’ किंवा ‘ही नसती उठाठेव तुम्हाला कुणी सांगितली?’

आमच्या या रोजच्या भटकंतीतून निदर्शनास आलेले भीषण वास्तव असे आहे की, पाण्याचा अपव्यय फार मोठ्या प्रमाणात मुख्यत: श्रीमंत आणि सुशिक्षित वर्गातच होत आहे. आम्ही अनेक वस्त्या पालथ्या घातल्या. त्यात सर्वात जास्त अपव्यय करणारा भाग आहे सिव्हिल लाइन्स. त्याखालोखाल अत्रे लेआउट, स्वावलंबीनगर, त्रिमूर्तीनगर, खामला चौक, प्रतापनगर, दीनदयालनगर, फ्रेंडस कॉलनी, गिट्टीखदान, सन्मित्रनगर, सुरेंद्रनगर, सन्मित्र कॉलनी, पांडुरंग कॉलनी, जयप्रकाशनगर वगैरे वगैरे. हे लोक गार्डनला वाजवीपेक्षा जास्त पाणी देतात, त्याचा लोट बाहेरच्या रस्त्यावरून पलिकडे 4 घरापर्यंत वाहत असतो. पण, त्याचसोबत घरासमोरचा रस्ताही पाण्याने धुवून काढतात. घराच्या भिंती धुतात, गाड्या धुतात. या लोकांना पाण्याचा अपव्यय करू नका असे समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला, करतो. तेव्हा त्याचं उत्तर असतं, ‘आमच्याकडे भरपूर पाणी येतं’ किंवा ‘हे आमच्या विहिरीचं पाणी आहे’ यावर आम्ही त्यांना समजावतो, ‘आता पाणी व्यक्‍तीगत राहिलेलं नाही. तुम्ही तुमच्याकडे असलेलं पाणी जपून वापरा. चार घरांच्या पाण्याच्या उधळपट्टीतून इतर तीन कुटुंबांना वापरायला पुरेसं पाणी मिळू शकेल.’

संवेदनहीन लोकांच्या मनापर्यंत हा प्रश्‍न जातच नाहीये. ‘तुम्ही पुढल्या पिढीसाठी पाणी शिल्‍लक ठेवणार आहात की नाही?’ या प्रश्‍नावर ते म्हणतात, ‘पुढल्या पिढीसाठी पैसा, सोनं, घर, जमीन याची सोय करायची असते, पाण्याची सोय काय करायची?’ त्यांना आपण कसं सुशिक्षित म्हणायचं!

महिला पाणी मंचतर्फे मी आजपर्यंत जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात पाणी-जागरणासंदर्भात व्याख्यानं दिलीत. शाळा, महाविद्यालयं आणि खुले व्याख्यान असे साधारण दीड लाख पेक्षा जास्त लोकांसमोर पाणी प्रश्‍न, जल साहित्य, पाणी वाचवा, पाणी जिरवा, महिला आणि पाणी, जलसाक्षरता अशा विविध विषयांवर माझी मते मी व्यक्‍त केली आहेत.

महिला पाणी मंचतर्फे एक आणखी वेगळा उपक्रम आम्ही घेतो. तो म्हणजे मोठमोठ्या फ्लॅटस्कीममध्ये जाऊन आम्ही मोलकरणींसाठी ‘पाणी वाचवा’ या विषयावर वर्कशॉप घेतो. सध्या सगळ्या गृहिणींची घरं ही घरी काम करणार्‍या मावशीबाईच्या हातात असतात. काम करणारी ही मावशीबाई घरात प्रवेश केल्याकेल्या मोरीत जाते आणि फूल फोर्समध्ये पाण्याचे नळ सुरू करते.

नळाखाली बादली ठेवून बाकी घर झाडायला, पोछा लावायला जेवढा वेळ ती इकडल्या कामात व्यस्त असते, तेवढा वेळ तिचा मोरीतला नळ सुरूच असतो. नंतर भांडी घासून, धुवून भांड्याचं टोपलं घरात आणून ठेवल्यावरच तिचा नळ बंद होतो तसच धुणं धुणारीपण करते. या सगळ्यात ती किती प्रचंड पाणी वाया घालवते हे तिला तर कळतच नाही, पण सुशिक्षित घरमालकीनीलाही कळत नाही. गरज असेल तेव्हा नळ सुरू करावा, कमी पाण्यात काम कसं करावं, वगैरे गोष्टी आम्ही या वर्कशॉपमध्ये काम करणार्‍या मावशीबाईंना शिकवितो.

महिला पाणी मंचच्या सर्व सदस्या आपअपलं काम आणिउघर सांभाळून पलपागृतीच्या कामात सतत पुठाकार घेतात याचा मला आनंद आहे. सर्वांनी ही आपली जबाबदारी समजून हे काम केल्यास लवकरच आपल्याला पाण्यासंदर्भातलं एक सुंदर चित्र बघायला मिळायला हरकत नाही.

अरुणा सबाने
अध्यक्ष महिला पाणी मंच, गणेशगौरी, गुमास्ता ले आऊट, कोतवाल नगर, नागपूर-15. मोबा. 9970095562


Path Alias

/articles/mahailaa-paanai-manca

Post By: Hindi
×