महाराष्ट्राची भाग्यरेषा - कोयना जलविद्युत प्रकल्प


महाराष्ट्र राज्यातील दिवसभरातील वीजेच्या वापराचा आलेख पाहिला तर असे दिसून येते की सकाळी व संध्याकाळी विजेची गरज जास्त भासते. (Morning peak & Evening peak) मागणीप्रमाणे वीजनिर्मिती करणे हे औष्णिक विद्युत केंद्रांना शक्य नसते, परंतु जलविद्युत केंद्रांना मात्र मागणीप्रमाणे वीजनिर्मिती करणे शक्य असते. यासाठी पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून आपण पाहिजे त्याप्रमाणे विद्युत निर्मिती करू शकतो.नैसर्गिक संपत्तीने समृध्द अशा महाराष्ट्रात या निसर्गशक्तिचा विकासाच्या कामात उपयोग व्हावा या दूरदृष्टीच्या कल्पनेतून कोयना जलविद्युत प्रकल्पाने आकार घेतला आणि आजपर्यंत पूर्ण झालेल्या विविध टप्प्यामधून औद्योगिक, आधुनिक महाराष्ट्राची भाग्येषा ठरण्याचा बहुमान या महत्वाकांक्षी योजनेला मिळाला.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईसारख्या औद्योगिक शहरामधून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली. या वाढत्या मागणीच्या पूर्ततेच्या संकल्पनेतून कोयना प्रकल्पाचे स्वप्न साकार झाले. या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी 1910 साली टाटा कंपनीने पहिले सर्वेक्षण केले होते परंतु त्यावेळी सुरू असलेल्या पहिल्या जागतिक महायुध्दामुळे काम अपूर्ण राहिले. पुन: 1930 साली प्रयत्न सुरू झाले, तरीपण दुसऱ्या महायुध्दामुळे हा प्रयत्नदेखील अपुराच राहिला. या कालावधीत अनेक नवीन तांत्रिक शोध लागत होते. यामधूनच या प्रकल्पाची सुरवात 16 जानेवारी 1954 मध्ये झाली.

महाबळेश्वरच्या डोंगरात कृष्णा, वेण्णा इत्यादी अन्य नद्यांबरोबर उगम पावलेली कोयना सह्याद्रीच्या कुशीत 65 कि.मी. प्रवास करते. सह्याद्रीच्या या परिसरात पावसाचे प्रमाण भरपूर आहे. पाटण तालुका जिल्हा सातारा येथील देशमुखवाडी येथे जागतिक किर्तीचे कोयना धरण बांधले गेले. हे धरण रबल काँक्रीटचे असून उंची 85.35 मीटर व लांबी 807.72 मीटर आहे. पश्चिमेकडे असलेल्या उताराचा फायदा घेवून पोफळी येथे भूमिगत विद्युतगृह बांधले गेले आहे. (ता.चिपळूण जि.रत्नागिरी) 1 जून 1961 पासून धरणात पाणी साठवण्यास सुरवात झाली व धरणाचे काम 1965 मध्ये पूर्ण झाले. धरणाची क्षमता 2727 दशलक्ष घ.मी. (898.7 टी.एम.सी) एवढी आहे. वार्षिक सरासरी पाऊस 5000 मी.मी. पेक्षा जास्त असल्याने सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यातच धरण पूर्ण भरले जाते. पाणलोट क्षेत्र 811.78 चौ.कि.मी असून या शिवाजी सागर जलाशयातील पाणीसाठा 75 लक्ष लोकवस्तीच्या शहरात 18 वर्षे पुरेल एवढा आहे.

कोयना जलविद्युत केंद्र टप्पा 1, 2 :


धरणाच्या पश्चिमेस डोंगरपायथा समुद्रसपाटीपासून 136 मी उंच आहे. पाण्याची धरणातील पातळी व पायथ्यापर्यंत जवळजवळ 500 मी. फरक वीजनिर्मितीस अत्यंत उपयुक्त ठरला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील विद्युतगृहात 65 मे.वॅ चे 4 जनित्र व 70 मे वॅ चे 4 जनित्र आहेत. असे एकूण 8 संच उभारले गेले. कालांतराने या संचामध्ये नूतनीकरण केले गेले व सद्यस्थितीत 540 मे वॅ क्षमता आता 600 मेगावॅट (70 X 4 + 80 X 4) एवढी झाली आहे. 1967 पासून अव्याहत या मशीन्सद्वारे वीज निर्मिती होत असून मार्च 2010 अखेर एकूण 117961.116 दशलक्ष युनिटस् (MUS) एवढी वीज निर्मिती झाली आहे. बांधकामाच्या वेळी टप्पा 1/2 सह प्रकल्पखर्च 65.29 कोटी रूपये झाला.

कोयना जलविद्युत केंद्र टप्पा 3 :


पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील पाणी वीजनिर्मितीनंतर चिपळूण जवळील खाडीत (अरबी समुद्र) मिळत असे. हे पाणी परत एकदा अडवून त्यातून विजनिर्मिती साठी प्रकल्प उभारण्यात आला. त्याकरिता कोळकेवाडी येथे 62 मीटर उंचीचे 497 मी. लांबीचे धरण बांधण्यात आले. जमिनीखाली 80 मेगावट ची 4 जनित्रे बसवण्यात आली. या प्रकल्पाची सुरवात 25 डिसेंबर 1965 मध्ये करण्यात आली व 6 जुलै 1975 ला पहिले जनित्र कार्यान्वित केले गेले. या विद्युत गृहातून आजपावेतो म्हणजे मार्च 2010 अखेर 22865.159 दशलक्ष युनिटस् एवढी वीजनिर्मिती झाली आहे. वीज निर्मितीनंतर सोडलेले पाणी कालव्याद्वारे चिपळूण शहराच्या वरच्या बाजूस वसिष्ठी नदीच्या पात्रात येते. या प्रकल्पास एकूण 60 कोटी रूपये खर्च आला.

कोयना धरणपायथा विद्युतगृह :


कोयना जलाशयातील (शिवाजी सागर ) काही पाणी सिंचनासाठी व बिगर सिंचनासाठी कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येते. तत्पूर्वी या पाण्यापासून देखील विद्युत निर्मिती केली जाते ज्यासाठी धरणाच्या पायथ्याशी 20 मेगॅवॅटची दोन जनित्रे बसवण्यात आली आहेत. 1960 फूट पातळीला 8 फूट व्यासाचे दोन पेनस्टॉक गेट सह डॅम कंन्सट्रक्शनच्या वेळीच यासाठी बसवण्यात आले होते. या मशीन्स्साठी पाण्याचे हेड 59 मीटर, असून 25000 एमएचपी च्या दोन 250 आर.पी.एम. मशीन्स भेल, भोपाळ यांनी पुरवठा केलेल्या आहेत. आतापर्यंत (मार्च 2010 अखेर) या विद्युतगृहाद्वारे 3110897 द.ल.युनिटस् वीजनिर्मिती झाली आहे. या विद्युत गृहासाठी 13 कोटी रूपये खर्च झाला आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्प स्तर 4 :


महाराष्ट्र राज्यातील दिवसभरातील वीजेच्या वापराचा आलेख पाहिला तर असे दिसून येते की सकाळी व संध्याकाळी विजेची गरज जास्त भासते. (Morning peak & Evening peak) मागणीप्रमाणे वीजनिर्मिती करणे हे औष्णिक विद्युत केंद्रांना शक्य नसते, परंतु जलविद्युत केंद्रांना मात्र मागणीप्रमाणे वीजनिर्मिती करणे शक्य असते. यासाठी पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून आपण पाहिजे त्याप्रमाणे विद्युत निर्मिती करू शकतो. किंबहुना विद्युत केंद्र 20 ते 80 सेकंदामध्ये पूर्ण क्षमतेने चालवणे शक्य आहे. (Ramp Rate) याच कारणासाठी कोयना जलाशयातील पाण्याचा दिवसा 5 ते 6 तासासाठी वापर करून विजेच्या अधिक मागणीच्या काळात जास्त वीज उत्पादन करण्याच्या दृष्टीने टप्पा 4 ची आखणी केलेली आहे. हा प्रकल्प 1994 कोटी रूपये चा आहे. खर्च 1467 कोटी रूपये झाला.

या टप्प्यामध्ये रचना टप्पा 1/2 प्रमाणेच असून 250 मेगॅवॅट क्षमतेचे चार संच बसवण्यात आलेले आहेत. (एकूण स्थापित क्षमता 1000 मे.वॅ) या टप्प्याची कामे 1985 साली सुरू झाली व इ.स. 2000 पर्यंत चारही युनिटस् कार्यान्वित करण्यात आली. आज अखेर या टप्प्यातून (मार्च 2010 अखेर) 17851.341 दशलक्ष युनिटस् एवढी वीज निर्मिती झाली आहे. वीज निर्मिती नंतर पाणी कोळकेवाडी धरणात (तिसऱ्या टप्प्याचे धरण) सोडले जाते.

वरील प्रमाणे कोयना जलविद्युत केंद्राची स्थापित क्षमता खालील प्रमाणे आहे.

 

टप्पा 1

4 X 70 मे. वॅ

280 मे. वॅ

टप्पा 2

4 X 80 मे. वॅ

320 मे.वॅ

टप्पा 3

4 X 80 मे. वॅ

320 मे. वॅ

टप्पा 4

4 X 250 मे. वॅ

1000 मे. वॅ

धरण पायथा

2 X 20 मे. वॅ

40 मे. वॅ

विद्युतगृह

एकूण  1960 मे. वॅ

 

विशेष पूर्ण केलेली कामे :


1. 1963 सालापासून या भागात छोट्या भूकंपाचे धक्के जाणवत होते, मात्र 11 डिसेंबर 1967 साली भूकंपाची तीव्रता 6.5 ते 7 रिश्टर स्केल एवढी होती. जास्त नुकसान कोयनानगर भागात झाले. प्राणहानीही बरीच झाली. धरणाला भेगा पडल्या होत्या पण धरण व्यवस्थित होते व एक वर्षात धरणाला पडलेल्या भेगा बुजवण्याचे काम केले गेले. नंतर 1973 पर्यंत धरणाला आधार भिंती (Buttresses) देण्याचे काम पूर्ण झाले (एकूण 43 भिंती) 11 डिसेंबर 1967 ते 30 डिसेंबर 1967 पर्यंत टप्पा 1/2 मधील मशीनस् इन्सपेक्शन करून, डागडूजी करून पूर्णपणे चालू करण्यात आल्या.

2. कालांतराने इलेक्ट्रीकल, मेकॅनिकलची टप्पा 1/2 मध्ये नूतनाकरणाची बरीच कामे पूर्ण करण्यात आली. त्यात प्रामुख्याने केलेली कामे खालील प्रमाणे आहेत.

- टप्पा 1 मध्ये टरबाइन बरेटने मॉडिफिकेशन 1973

- जनित्रांचे क्लास बी इन्सूलेशन क्लास एफ मध्ये केले गेले

- दोन्ही टप्प्याचे स्पीड गव्हर्नर्स बदलले गेले. (1997 - 1999) (Microprocessor Based Governors)

- कनव्हेंशनल एक्सायटेशन बदलून स्टॅटिक एक्सायटेशन प्रस्थापित (1997 - 1999)

- युनिट अॅटोमेशनची कामे पूर्ण केली गेली.

- रोटर पोल्स् रिनोव्हेशनची कामे पूर्ण केली गेली.

- फॉल्ट लेव्हल वाढल्यामुळे सर्व एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर्स बदलून एसएफ - 6 ब्रेकर्स 220 केव्ही यार्डात बसवली गेली (2005 - 2007)

- जुन्या ऑइल फिल्ड (220 के.व्ही) केबल्स् बदलून नवीन XLPE केबल्स् टाकण्यात आल्या (97 ते 98 मध्ये टप्पा - 1)

- सर्व मशीन्स् कंडेन्सर मोड मध्ये चालवणे शक्य केले.

3. टप्पा 3 मध्ये खालील कामे केले गेलेत

- जनित्रांच्या स्टेटर कोअर रिस्टॅकींग

- जनित्रांचे क्लास बी इन्सूलेशन बदलून क्लास एफ मध्ये केले गेले (1979 ते 89)

- पेढांबे (टप्पा 3 चे) 220 केव्ही स्वीचयार्ड मधील ब्रेकर्स बदलून नवीन एसएफ - 6 ब्रेकर्स उभे केली.

4. कोयना जलविद्युत केंद्रास ISO 9001, व 14000 प्रणालीची प्रमाणपत्र पात्र झाली आहेत.

विशेष बाब म्हणजे कोयना जलविद्युत केंद्राची संचलन /सुव्यवस्था ही पूर्ण कामे महाजनको (पूर्वीश्रमीची एम.एस.ई.बी) या कंपनीचे कामगार अभियंते चोख करतात. या केंद्रातील नूतनीकरणाची सर्व कामे देखील महाजनकोच्या कामगार, अभियंते यांच्या परिश्रमातूनच पूर्णत्वास नेली आहेत.

मुख्य धरणाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे / जलसंपदा खात्यातर्फे देखील खालील कामे केली गेली अथवा प्रगतीपथावर आहेत -

अ) कोयना धरणाच्या सहा रेडियल गेटसाठी (Spillway) extensions करण्यात आली त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा 98 टी.एम.सी वरून 103 टी.एम.सी पर्यंत वाढवणे शक्य झाले.

ब) नुकतेच उत्सर्जित भागाचे (Spillway Portion) मजबूतीकरण करण्यात आले. वाढीव पाण्याच्या साठवणूकीसाठी हे गरजेचे होते.

क) चौथ्या टप्प्याच्या अधिजल बोगदा (HRT) धरणाच्या 630 मीटर लेव्हलपासून सुरू होतो (4 A Tunnel) पण या पातळीच्या खाली धरणातील पाण्याची पातळी गेल्यास चौथ्या टप्प्यातून होणारी वीज निर्मिती बंद पडते. यामुळे आणखी एक अधिजल बोगदा (4 बी Tunnel) पूर्णत्वास आहे. यामुळे पाण्याची पातळी आणखी 12 मीटरने जरी कमी झाली तरी तोपर्यंत वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. 4 अे टनेल करिता एक लेक टॅपींग घेण्यात आले होते त्याचप्रमाणे 4 बी टनेल करिता आणखी एक लेक टॅपींग घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी येत्या जुलैमध्ये 4 अे व 4 बी सर्ज वेलस् एकमेकांना जोडण्याचा प्लान आहे.

ड) सध्या रोटेशनप्रमाणे सिंचनासाठी 16 टी.एम.सी पाणी धरण पायथा विद्युत गृहाततून विद्युतनिर्मिती करून नदीच्या पात्रात सोडण्यात येते. कृष्णा पाणीवाटप लवादाप्रमाणे यापुढे जर अधिक पाण्याचा विसर्ग करणे झाल्यास त्यातूनही वीजनिर्मिती व्हावी म्हणून धरणाच्या पूर्वेस भूमिगत 40 मे.वॅ क्षमतेची दोन यंत्रे लावण्यासाठी / उभारणीसाठी सिव्हील कामे हातात घेतली आहेत.

ई) नवजा बाजूने धरणाकडे येताना ओझर्डी धबधबा लागतो. यातून डोंगरमाथ्यावरील पाणी मुख्य धरणात येते. याठिकाणी पण 200 मे.वॅ. च्या दोन मशिनस् (Pumped Storage) उभारणीचा प्रस्ताव आहे (कोयना टप्पा - 5) पण या योजनेस आणखी परवानगी मिळालेली नाही.

फ) नेहरू गार्डन : 10 एप्रिल 1960 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भेटी दरम्यान पश्चिम बाजूस जवळच नेहरू मेमोरिअल पार्क उभारण्याचे ठरवले होते. हा प्रोजेक्ट 2003 मध्ये पूर्ण केला गेला. संपूर्ण पार्कमध्ये विविध प्रकारचे गुलाबपुष्प लावण्यात आलेले आहेत. याशिवाय या पार्कमध्येच एक छोटे सभागृह बांधण्यात आले आहे ज्यामध्ये कोयना प्रकल्पाविषयी फिल्म शो दाखवण्यात येतात. परिसरातले नागरिक तसेच दूरवरून येणारे पर्यटक येथे या आश्चर्यकारक अभियांत्रिकी प्रकल्पांच्या विहंगम दृश्याचा आनंद घेतात.

उल्लेखनिय बाबी :


1) टप्पा 1/2 मधील हाऊस जनरेटर :
पूर्णत : वीज बंद होणे ज्याला ग्रीड फेल्युअर असे संबोधतात, या काळात टप्पा 1/2 मध्ये असलेले 2250 हॉर्सपॉवरचे जनरेटर काही क्षणातच चालू करता येते. याद्वारे मिळणारी वीज पॉवर हावूस मधील इमर्जन्सी सप्लाय म्हणून वापरली जाते. यासाठी पाण्याच्या मुख्य पेनस्टॉक्स् मधून सरळ पाणी घेण्याची व्यवस्था आहे. आजकाल डिझेल जनरेटर्स बसवून त्यातून वीज तयार करून ती आणिबाणीच्या वेळी उपयोगात आणतात, तशी व्यवस्था टप्पा - 4 मध्ये करण्यात आली आहे.

2. टप्पा क्र. 4 मधील जी.आय.एस. (Gas Insulated Substation) टप्पा क्र.1/2 व टप्पा 3 ची पॉवर हावूसजसे भूमिगत आहेत पण त्यांचे 220 के.व्ही सबस्टेशनस् जमिनीवर आहेत. टप्पा क्र. 4 चे वैशिष्ट्य म्हणजे येथील 400 के.व्ही चे स्वीचगियर पूर्णत: भूमिगत बोगद्यात आहे यालाच जी.आय.एस. (G.I.S) गॅस इन्सूलेटेड / फिल्ड स्वीचगिअर / सबस्टेशन म्हणतात. सध्या हे जेवढ्या जागेत उभे केले गेले आहे, तेच पारंपारिक (Conventional) पध्दतीने जमिनीवर उभे केल्यास सध्याच्या जागेच्या 13 पट जागा लागली असती. या जी.अय.एस चे संचलन रिमोट कंट्रोलद्वारे होते. चौथ्या टप्प्याची वीज 420 के.व्ही च्या XLPE (Cross linked polyethelene) केबलद्वारे जमिनीवर असलेल्या पॉट हेड सबस्टेशन पर्यंत नेण्यात येते. येथून 400 के.व्हीच्या वाहिन्या न्यू कोयना व लोणीकंद पुणे येथील गृह केंद्रांना जोडल्या आहेत.

3. वीज निर्मितीसाठी पाणी वापर :


प्रथम हा प्रकल्प मुळातच वीज निर्मितीसाठी बांधला गेला, पण कालांतराने पश्चिमेकडे सोडून देण्यात येणाऱ्या (समुद्रास) पाण्यावर कृष्णा पाणी लवदाप्रमाणे निर्बंध आले, ते खालील प्रमाणे :

 

मे 1984 पर्यंत

97 टी.एम.सी

जून 1984 ते मे 1989

87 टी.एम.सी

जून 1989 ते मे 1994

78 टी.एम.सी

जून 1994 च्या पुढे

67.5 टी.एम.सी ।

* याबद्दल चर्चा पुढे चालू आहे.

 

निसर्गाने सौंदर्याची उधळण केलेल्या निर्बीर्ड जंगलातील काळ्या कातळातून निर्माण झालेला कोयना प्रकल्प म्हणजे एक अभियंत्रिकी आश्चर्यच आहे. हजारो श्रमिकांनी आणि अभियांत्यांनी घाम गाळून उभा केलेला हा प्रकल्प म्हणजे विकासाच्या विशाल दालनाचे अति उत्कृष्ठ प्रतिकच आहे असे अभिमानाने सांगावेसे वाटते. महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा साक्षात्कार घडविणारा हा संपूर्ण कोयना जल विद्युत प्रकल्प आता पूर्णत्वास आला आहे. पंडितजींनी कोयना प्रकल्पाचे यथार्थ वर्णन करतांना म्हटले आहे की - निसर्गाच्या सूप्तशक्ती समाजाच्या उन्नती कार्यात लावून उज्वल भविष्याचे किरण दर्शविणाऱ्या मानवी प्रयत्नांचे हे प्रतिक आहे.

सम्पर्क


श्री. सूर्यकांत कुलकर्णी, ऊर्जा सहयोग - (भ्र : 9970168261)

Path Alias

/articles/mahaaraasataraacai-bhaagayaraesaa-kaoyanaa-jalavaidayauta-parakalapa

Post By: Hindi
×