मधुमेही महाराष्ट्र

भारतात दोन राज्ये अशी आहेत जी साखर उत्पादनात अग्रेसर आहे, आणि ती म्हणजे उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र. उत्तरप्रदेशला तर गंगा आहे पण महाराष्ट्र, जिथे कमी पाऊस, आणि पाण्याची नेहमी मारामारी असते तिथे आज 66 टक्के साखर उत्पन्न करून आपण उत्तरप्रदेशच्या पुढे आहो.ऐकायला आणि वाचायला हे विचित्र वाटत असले तरी एक कटू सत्य आहे. आपल्या पूर्ण महाराष्ट्राला मधुमेहाचा आजार झाला आहे. आजार ज्याला होतो त्याला आपल्या आजारपणाबद्दल आधी कळतच नाही आणि जेव्हा कळते तेव्हा उशीर झालेला असतो. पण कळून सुध्दा रूग्ण साखर खाणं काही केल्या कमी करत नाही कारण गोड सगळ्यांनाच आवडते. या गोड खाण्यापाई त्याला आपला जीव पण गमवावा लागतो. मधुमेहामध्ये शरीर आतल्या आत पोखरत जाते आणि रूग्णाला पत्ताच लागत नाही. हा एक अनुवंशिक आजार आहे. परिवारातल्या एकाला झाला की दुसऱ्याला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हाच आजार म्हणजे मधुमेहाचा, तो, आज आपल्या महाराष्ट्राला झाला आहे. बरोबर ! साखरेचा आजार. ऊसाचा आजार. एखाद्या शुगर पेंशट सारखी अवस्था आज आपल्या महाराष्ट्राची झाली आहे. कळल्यावर सुध्दा आपण त्याच्या बाहेर पडण्याचा विचारच करत नाही व त्यात अजून गुरफटत चाललो आहोत. या ऊसाच्या शेतीपाई भूजलाची स्थिती दर वर्षी वाईट होत असून पाण्याची पातळी खोल खोल जात आहे आणि पिण्याचे पाणी पण दुर्लभ झाले आहे. अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे भूभागावर पावसाच्या पाण्याची साठवण कमी होते परिणामी त्याची पूर्तता बोरवेल द्वारे जमिनीतून उपसा करून पूर्ण केली जाते.

भारतात दोन राज्ये अशी आहेत जी साखर उत्पादनात अग्रेसर आहे, आणि ती म्हणजे उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र. उत्तरप्रदेशला तर गंगा आहे पण महाराष्ट्र, जिथे कमी पाऊस, आणि पाण्याची नेहमी मारामारी असते तिथे आज 66 टक्के साखर उत्पन्न करून आपण उत्तरप्रदेशच्या पुढे आहो.

सन 2011 - 2012 च्या रिपोर्ट प्रमाणे, महाराष्ट्रात 35 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यात 214 साखर कारखाने लागले असून त्यापैकी 172 कार्यरत आहेत. वर दिल्या प्रमाणे मधुमेह साखरेचा आजार हा अनुवंशिक हे सिध्द होते कारण एका जिल्ह्याला झालेला आजार आज 26 जिल्ह्यांना झाला आहे. त्यातल्या त्यात सात एरिया पैकी सगळ्यात जास्त ग्रस्त म्हणजे पुणे एरिया (सातारा, पुणे, सोलापूर) आणि सगळ्यात कमी ग्रस्त नागपूर एरिया (वर्धा, नागपूर, भंडारा) पुणे एरियात 53 साखर कारखाने लागले असून पैकी 51 कार्यरत आहे आणि नागपूर एरियात 6 साखर कारखाने लागले असून 3 कार्यरत आहेत.

महाराष्ट्रातील 81 टक्के साखर ज्या भागात होते तो जवळ जवळ सगळा भाग वॉटर स्ट्रेसफुल एरिया किंवा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. कारण तिथे सरासरी 700 मी. मी रच पाऊस पडतो, जेव्हा ऊसाच्या शेती करीता सरासरी 2100 मी.मी ची आवश्यकता असते असे जाणकार सांगतात. खाली जिल्हे, पडणारा पाऊस आणि करीत असलेले साखर उत्पादन दिले आहे.

एरिया

सरासरी पाऊस

मी.मी मध्ये

राज्याच्या साखर

उत्पन्नाच्या टक्केवारी

 

नाशिक

1076

2.76

औरंगाबाद

734

1.15

जालना

650

1.43

परभणी

956

1.23

अहमदनगर

561

12.79

बीड

743

3.25

पुणे

745

14.96

उस्मानाबाद

842

 4.35

लातूर

769

 2.77

सातारा

768

8.65

सोलापूर

723

17.64

सांगली

629

9.14

कोल्हापूर

1019

19.95

 

वरील टेबलकडे लक्ष दिल्यास असे आढळते की जिथे पाऊस कमी तिथेच साखरेचे उत्पन्न जास्त आहे. ऊसाच्या शेती करिता जास्त पाण्याची गरज असते म्हणून. पाऊस कमी झाला की धरणामध्ये पाणी कमी साठते, परिणामी ऊसाला पाणी हवे म्हणून बोअरवेल वर बोअरवेल खणले जातात आणि जमिनीतून अंधाधुंद रितीने पाण्याचा उपसा केला जातो. पाण्याची पातळी जमिनीत खाली खाली जाते.

चुकीच्या ठिकाणी चुकीची शेती केली तर काय होते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील घोटी हे गाव. शेजारी तालुक्यात बार्शी आणि करमाळा येथे दोन साखर कारखाने आल्यामुळे घोटीच्या शेतकऱ्यांनी ऊसाची लागवण सुरू केली. 2011 आणि 2012 च्या अवर्षणामुळे शेतकऱ्यांनी ऊसाकरिता बोअरवेल खोदायला सुरूवात केली. आज जवळ जवळ 3000 लोकांच्या घोटी गावात 6000 बोअरवेल आहेत. सगळा उपसा ऊसाकडे जायला लागला. 15 वर्षांपूर्वी ज्या गावात पिण्याच्या पाण्याची काही समस्या नव्हती, त्या गावात ऊसाच्या लागवडीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भासू लागल्या, गावकरी आता प्रायव्हेट टँकरने पिण्याचे पाणी मागवून आपली तहान भागवत आहे. एक हेक्टर ऊसाच्या पिकाला लागणारे पाणी चार हेक्टर इतर पिकांना पुरेसे असते. सोलापूर जिल्ह्यातील सरासरी 723 मी.मी पाऊस आणि तिथे राज्यातील साखर उत्पन्नाच्या 17.64 टक्के सारखरेचे उत्पन्न होते. तर अहमदनगर जिल्ह्यात 561 मी.मी पाऊस पडतो आणि साखरेचे उत्पादन 12.79 टक्के आहे. या वरून लक्षात येते की जिथे कमी पाऊस पडतो तिथे ऊसाची लागवण झाली आहे. काही जाणकारांनी आणि काही अहवालांनी या प्रश्नाला वाचा फोडली, पण जवळ जवळ सर्व साखर कारखाने मंत्र्यांच्या मालकीचे असल्यामुळे सरकारने या अहवालाकडे दुर्लक्ष केले. ऊसाचा रस फक्त खाण्याच्या कामाकरीताच गेला असता तर ठीक आहे पण तसे न होता चांगल्या किंमतीत पेट्रोल मध्ये एक एडीटीव म्हणून आणि दारू कंपनीला विकल्या जातो.

ऊस लागवडीला अधिक प्राधान्य दिल्या जात असल्या कारणाने इतर पिकांच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणे कमी झाले किंवा बंद झाले परिणामी शेतकरी आत्महत्या करू लागले किंवा गाव सोडून शहरात चौकीदाराच्या नौकरी करू लागले.

सोलापूर जिल्ह्यातच 155864 हेक्टर ऊसाची लागवड केली जाते आणि त्या करिता 2630 मिलीयन क्युबिक मीटर पाण्याची आवश्यकता असते आणि ती उजनी धरणाच्या क्षमतेपेक्षा 1.73 पटीने जास्त आहे. इतकी पाण्याची मारामार, भूजलाची पातळी खाली खाली चालली, धरणाचे पाणी आटायला लागले किंवा पुरेनासे झाले, असे असून सुध्दा सोलापूर करीता 19 नवीन साखर कारखाने प्लान केले आहे आणि त्यापैकी बहुतांश खासगी असून ते राजकारणी लोकांचे आहेत. या 19 नवीन तसेच 'मधा' हे माननीय शरद पवारांच्या मतदारसंघातील भाग असून तिथे आधीच तीन नवीन कारखाने प्लान केले आहेत. नवीन कारखाने म्हणजे अधिक जागेमध्ये ऊसाची लागवड करावी लागणार. एक हिशोब केला तर शेती आणि कारखाने धरून 7400 एम सी एम पाणी लागेल. या करिता धरण बांधतील, जमिनीतून उपसा करतील, किंवा इतर जिल्ह्यातून पाणी ओढतील.

हीच परिस्थिती उस्मानाबाद, जालना, परभणी आणि मराठवाड्याची आहे. प्यायला पाणी मिळणे कठीण आहे तरी कारखाने उभारल्या जात आहेत, आहे न मधुमेहाची बिमारी, परिणाम समोर आहे तरी साखर सोडवत नाही.

उस्मानाबाद मध्ये 10 नवीन साखर कारखाने प्लान केले आहेत, बीडला 8 असून 14 नवीन लावायची तयारी आहे. अहमदनगरला 20 असून 8 पुन्हा उभारण्याची तयारी आहेच. लातूरला 12 कार्यरत असून 5 ची तयारी आहे आणि साताऱ्याला 11 काम करत असून 14 नवीन लागणार आहेत.

आहे की नाही साखरेचा किंवा मधुमेहाचा आजार महाराष्ट्राला. ज्याला झाला आहे तो त्यात अधिक गुरफटत चालला आहे. कमी आणि अवेळी पाऊस पडून सुध्दा नवीन कारखान्यांना परवानगी मिळत आहे. कोण यांना परवानगी देतो, अॅग्रीकल्चर विभागाचा आणि वॉटर रिसोर्स विभागाचा ह्यात काही सहयोग आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. का सगळे राजकारणी आपली मनमानी करत सत्तेचा दुपपयोग करत आहे ? या सगळ्यावर त्वरित आळा घातला गेला तर ठीक, नाहीतर नजीकच्या दिवसात महाराष्ट्रावर सजल संकट अधिक गंभीर झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा ऊसाची लागवड झाली की कारखानदार शेतकऱ्याच्या मागे लपतात आणि म्हणतात की आम्ही जर ऊस खरेदी नाही केला तर शेतकऱ्यांचे काय होईल ? ऊस उत्पन्नाची जोखीम आणि त्याकरिता लागणाऱ्या पाण्याकरिता भांडणे हे शेतकऱ्याचेच काम असते. कारखानदार स्वत:ला या सगळ्या भानगडी पासून दूर ठेवतो.

इस्त्राईल सारखा लहानसा देश जिथे सरासरी 432 मी.मी. च पाऊस पडतो तरीपण तो आज भारतापेक्षा कितीतरी क्षेत्रात पुढे आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत पण आत्मनिर्भर आहे. आपले राजकीय नेता त्या देशाला भेटी देवून येतात आणि तिथल्या प्रगतीचे गुणगान करतात. ते जर 432 मी.मी इतकी प्रगती करू शकतात तर आपले जिल्हे 700 मी.मी मध्ये का नाही ? आपल्या नीती चुकीच्या आहे, आपले ध्येय चुकीचे आहे असे कुठेतरी वाटते. इस्त्राईल कडे पाहता, आपल्या जिल्ह्यात पाऊस कमी पडतो असे आपल्याला म्हणताच येणार नाही, दुष्काळ हा नाहीच आहे. अविचारी बुध्दीने जमिनीतून पाण्याचा उपसा हेच याला कारण आहे.

वर दिल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या 35 मुलांना (जिल्ह्यांला) पैकी 26 मुलांना मधुमेह झाला आहे. त्यातल्यात्यात नागपूर एरिया म्हणजे वर्धा, नागपूर आणि भंडारा याला नुकतीच सुरूवात झाली आहे, ती जर वेळीच आटोक्यात आणली नाही तर नागपूर एरियाची स्थिती पुणे एरिया म्हणजे सातारा, पुणे, सोलापूर सारखी झाल्याशिवाय राहणार नाही, आणि मग कितीही माधव चितळे, खानापूरकर किंवा दत्ता देशकर आले तरी महाराष्ट्राला या संकटातून वाचवू शकणार नाही.

श्री. विनोद हांडे

श्री. विनोद हांडे, नागपूर - मो : 09423677795

Path Alias

/articles/madhaumaehai-mahaaraasatara

Post By: Hindi
×