भविष्यात या नदीच्या उगमापर्यंत साडेपाच कि.मी पर्यंतचे संवर्धन करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी महापालिकेला नदीपात्र अतिक्रमणमुक्त करून देण्यासाठी सहकार्य करावे लागणार आहे. हे काम झाल्यावर उर्वरित गोदावरीपर्यंतच्या बॅकवॉटरकडे जाणार्या ५२. कि.मी पर्यंतचे संवर्धन याच पॅटर्ननुसार ग्रीनब्रीज डेव्हलप करण्यासाठी उद्योगांच्या सहकार्याने काम करावे लागेल.
ताजमहल दिल्लीतील यमुना नदीच्या तीरावर बांधला. त्याची प्रतिकृती औरंगाबादमध्ये बिबी का मकबराच्या रूपाने खामनदीच्या नदीक उभारली. दोन्ही वास्तूंमध्ये प्रेम आणि नदी हे साम्य राहिले. नदीच्या प्रवाहाप्रमाणे या वास्तूंच्या निर्मितीमागील उद्देश सदैव प्रवाही राहावा. हा त्यामागील एकमेव उद्देश असावा. अलिकडच्या काळात त्या दोन्ही वास्तूंच्या लगत असलेल्या नद्यांचे पात्र अतिक्रमित किंवा दूषित होण्यास सुरूवात झाली आहे. यमुना नदीचे पात्र दूषित झाले तर औरंगाबादेतील खामनदीचे पात्र लुप्त आणि अतिक्रमित होवून त्याला नाल्याचे रूप आले. पाच दशकांपूर्वी खळखळ वाहणारी खामनदी औरंगाबादच्या औद्योगिकरण आणि नागरीकरणाच्या रेट्यात नाला बनली. तिचे गतवैभव तिला परत मिळावे, या उद्देशाने सीआयआय, छावणी, व्हेरॉक, पुण्यातील सेरी संस्था आणि शहरातील काही सनदी अधिकारी व उद्योजकांनी पुढाकार घेत सुरूवात केली. दीड कि.मी पर्यंतचे नदीपात्र जे कालपर्यंत नाला म्हणून वर्गीले जायचे. ते पुन्हा नदीरूपात येत आहे. खामनदीचे पात्र जीवंत व्हावे, हाच उद्देश समोर ठेवून सामाजिक बांधिलकी आणि आपण शहराला काहीतरी देणे लागतो, ही भावना उराशी बाळगत केलेला हा प्रयत्न पुढे निरंतर प्रवाही राहण्यासाठी सर्व जण प्रयत्न करीत आहेत.खामनदी औरंगाबादच्या पूर्वेकडील हर्सुल लगतच्या डोंगररांगातून उगम पावते. तेथून ती गोदावरीच्या बॅकवॉटरला जावून मिळते. ६०. कि.मी लांबीची ही नदी औरंगाबाद शहरातून ५० वर्षांपूर्वी ७ ते ८ कि.मी अंतरातून वहात असायची. सध्या ती वाहते परंतु सांडपाणी, शौचमैला घेवून. त्यामुळे या नदीला नाल्याचे रूप आले.
जलसंस्कृती, जलसंवर्धनमुळे या नद्यांचे पात्र पुन:जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्यानंतर प्रा. विजय दिवाण, दिलीप यार्दी यांनी शासनाला नदी संवर्धनाचा प्रस्ताव दिला. परंतु त्याचे बजेट ३०० कोटींवर होते. त्यामुळे त्या प्रस्तावाला चालना मिळाली नाही. मग त्यांनी हा प्रस्ताव सीआयआयचे तत्कालीन चेअरमन प्रशांत देशपांडे, प्रसाद कोकीळ यांच्यासमोर मांडला. त्या प्रस्तावानुसार पथदर्शी प्रकल्प म्हणून होलीक्रॉस व छावणी या केंद्र बिंदूपासून दीड कि.मी पर्यंत संवर्धन करण्यासाठी सर्वांचे एकमत झाले. नंतर सृष्टी एन्व्हार्यनमेंटल रिसर्च इंन्स्टिट्यूट, पुणे (सेरी) यांच्याकडून ग्रीन टॅक्नोलॉजी घेण्याचे ठरविले. सीआयआयने तंत्रज्ञानासाठी तर व्हेरॉक ग्रुपने खर्चाची बाजू सांभाळल्यामुळे खामनदीच्या दीड कि.मी पात्राला गतवैभव प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होण्यास सुरूवात झाली. या संवर्धनात कुठलेली काँक्रीट न वापरता नैसर्गिक विघटन होणार्या घटकांचा वापर करून नदीचे पात्र संवर्धित करण्याचे ठरले.
पावसाळ्यात पूर आला तरीही या तंत्राला काहीही परिणाम होत नाही. नदीपात्रात शुध्दीकरण प्लांट तयार केला. पात्रातून ३०० ट्रॅक्टर कचरा निघाला. ६ ग्रीन ब्रीज उभे केले. त्यामध्ये वनस्पती व बॅक्टेरिया दगडांच्या भिंतीमध्ये एकमेकांनी बांधले. कचरा जास्त येत असल्याने महापालिकेने कचर्याचे प्रमाण मागे रोखले. कालव्याप्रमाणे दगडांच्या भिंती बांधल्या. नदीपात्रात दहा फूट खाली नैसर्गिक यंत्रणा उभारली. त्यामुळे पूर सदृष्यस्थितीतही त्या संवर्धन रचनेला काहीही परिणाम होणार नाही. संवर्धन करतांना जैवविविधतेवर जास्त भर दिला आहे. पूर्वी घारीशिवाय कुठलेली पक्षी दिसत नव्हते. घाण असेल तरच घार घिरट्या घालीत असते. मागील सहा महिन्यांपासून दीड कि.मी च्या अंतरातील पाण्यात मासे, मुंगूस, साप, पक्षी, कृमी, किटकांची वर्दळ तेथे वाढली आहे. निसर्ग अन्नसाखळी येथे तयार होवू लागली आहे. सध्या १२० ते १४० एमएलडी पाण्याचे रिसायक्लींग होण्यासारखी परिस्थिती आहे. या पात्राचे दोन्ही बाजूंनी सौंदर्यीकरण करण्यासाठी भविष्यात प्रयत्न होणार आहेत.
हा पथदर्शी प्रकल्प दीड वर्षात पूर्ण झाला असून नदीच्या उगमापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. व्हेरॉक ग्रुपने पूर्ण संवर्धनासाठी लागणार्या खर्चाची जबाबदारी उचलली आहे. टेक्नीकल मदत सीआयआयने केली. माजी सनदी अधिकारी डॉ. उमाकांत दांगट, छावणीचे तत्कालीन ब्रिगेडीयर मनोजकुमार, विद्यमान ब्रिगेडीयर अनुराग वीज, महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या उपक्रमासाठी खारीचा वाटा उचलला आहे.
भविष्यात या नदीच्या उगमापर्यंत साडेपाच कि.मी पर्यंतचे संवर्धन करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी महापालिकेला नदीपात्र अतिक्रमणमुक्त करून देण्यासाठी सहकार्य करावे लागणार आहे. हे काम झाल्यावर उर्वरित गोदावरीपर्यंतच्या बॅकवॉटरकडे जाणार्या ५२. कि.मी पर्यंतचे संवर्धन याच पॅटर्ननुसार ग्रीनब्रीज डेव्हलप करण्यासाठी उद्योगांच्या सहकार्याने काम करावे लागेल. तसेच जलयुक्त शिवार योजना, नदीसंवर्धन कार्यक्रमातून सरकारने हातभार लावला तर खामनदीचे पूर्ण पात्र पुन्हा शुध्द पाण्याने प्रवाही होईल. ३५० कोटींच्या खर्चाचा आराखडा असलेला हा प्रकल्प शासन, उद्योजक, पालिका आणि लोकसहभागाच्या सहकार्यातून पूर्णत्वास जावू शकतो.
डॉ. सुनील देशपांडे, पाणी समिती सदस्य, सी.आय.आय.
Path Alias
/articles/khaamanadai-paunahaa-jaivanta-haotaeya
Post By: Hindi